पत्रसंवाद

बाबूराव चंदावार, साईनगर, दी. 1, फ्लॅट-13, सिंहगड रोड, पुणे 411030. दूरध्वनी – 020-24250693
आमचे चिरंजीव उत्पल चंदावारकडे आजचा सुधारक येतो. अधूनमधून मी पाहत असतो. मार्च2012 चा अंकही पाहिला आहे. यात नक्षलवादी, लोकशाहीच देशाची अखंडता’ हा श्री देवेन्द्र गावंडे यांच्या पुस्तकातला अंश मुखपृष्ठावर दिलेला आहे विरोधातलीच भूमिका आजचा सुधारकची आहे, असेच मला वाटले. श्री देवेन्द्र गावंडे यांची भूमिका विरोधातलीच आहे, हे मला या आधीपासूनच माहीत आहे. अर्थात नक्सलवादाची राजकीय विचारसरणी क्रांतीची आहे, ती सुधारणावादाची नाही. म्हणून, आपली नक्सलविरोधाची भूमिका याला साजेशीच आहे, असे म्हणायला हरकत नसावी. पण, यामुळे नक्सली-माओवादाकडे पाहण्याचा दृष्टिकोण सदोष राहन जात असेल तर, तो तसा राहू नये या विषयीची काळजी घ्यायला हवी. सुधारकांनी काळजी घेण्याचे कारण नाही असे म्हणून टाळू नये!

मी गेली कित्येक वर्ष नाक्सली-माओवादी प्रभावित क्षेत्रांच्या संपर्कात आहे.विशेषतः बिहार-झारखंड ही माझी क्षेत्रे राहिलेली आहेत. महाराष्ट्र राज्यातल्या गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांतल्या नक्सली-माओवाद प्रभावित क्षेत्रांतही दोनदा निरीक्षण व अभ्यासासाठी मी जाऊन आलो आहे. लोकजीवनातले जे प्रश्न मूलभूत स्वरूपाचे म्हणता येतील त्यांच्या समाधानाचे उपाय दहशत व हिंसेतून माओवादी करतात, हे मला मान्य नाही. पण, या ” प्रश्नांच्या समाधानाचे निश्चित स्वरूपाचे उपाय शोधायलाच हवेत, याविषयी मतभेद असू नयेत! या बाबतीत आजचा सुधारक कोणती निश्चित स्वरूपाची भूमिका घेतो याची मला कल्पना नाही. पण. अशी काही स्पष्ट भमिका घेतली गेली असेल. तर ती मला कळायला हवी. या अनुषंगाने आपणाकडून काही कळू शकले, तर ते मी माझ्या लाभाचेच मानीन!

शशिकान्त हुमणे, 132, फार्मलँड, शिवसुधा अपार्टमेंट, रामदासपेठ, नागपूर-440010. भ्रमणध्वनी 963764439
भगवद्गीता राष्ट्रीय ग्रंथ होऊ शकत नाही.
श्रीमती सुषमा स्वराज यांनी तसेच शिवसेनेचे आमदार रूपेश म्हात्रे यांनी ‘भगवद्गीता’ हा ग्रंथ राष्ट्रीय ग्रंथ म्हणून जाहीर करावा अशी जोरदार मागणी केलेली आहे. ब्राह्मणांनी गीतेला प्रस्थानत्रयीत स्थान दिले. त्यामुळे देशात सर्वत्र सर्वभाषिकांनी गीताग्रंथाच्या भाषांतराची शेकडो पुस्तके प्रसिद्ध करण्याचा चंग बांधला आहे. आजही ती पुस्तके मोठ्या प्रमाणात, त्यातील अर्थामध्ये थोडाफार फरक करून, गीतेत अभिप्रेत नसलेले अर्थ पुराण-पोथ्यांच्या साहाय्याने वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांची भक्तांवर प्रचंड मोहिनी पडली आहे. गीतेचा गांभीर्याने व चिकित्सक बुद्धीने अभ्यास न करता तिचा बँडबाजी प्रचार व जल्लोष सर्वत्र पहागला मिळतो. तिच्यात ज्ञान-तत्त्वज्ञान किती, तिचा उद्देश काय व गीतेने युद्धाच्या प्रचारापासून काय साध्य केले याचा जरा शांतपणे विचार करणे गरजेचे आहे. निव्वळ श्रीकृष्ण हा देवाचा अवतार आहे असे मानल्याने त्याच्या मुखातून आलेला शब्द न शब्द खरा आहे, त्यामुळे ते शब्द पवित्र, पूजनीय व अनुकरणीय आहेत असे मान्य केल्याने गीतेतील ज्ञानाची विश्लेषण करण्यापासून, चिकित्सा करण्यापासून सुटका होत नाही. जरी गीतेत व्यावहारिक दृष्टिकोण असणारे काही श्लोक प्रत्येक अध्यायात असले तरी ते श्लोक कोणत्या संदर्भात आहेत व मागच्या पुढच्या श्लोकांचा विचार व त्या अध्यायातील विषयाचा त्याचा काय व किती संबंध आहे याचा विचार करणे क्रमप्राप्त आहे. अनेक विचारवंत नेमका एखादा प्रलोक उचलून तो कोणत्या संदर्भात आहे हे स्पष्ट न करता भाषणात ठोकून देतात व विद्वत्तेच्या टाळ्या मिळवितात.
श्रीकृष्ण धर्माच्या अभ्युदयाची घोषणा करतो. या घोषणेचा कौरव पांडव या चुलतभावांनी राज्यासाठी केलेल्या युद्धाशी काय संबंध आहे? श्रीकृष्णाच्या गीतेपासून धर्माचा अभ्युदय न होता अधोगतीच होत आहे. श्रीकृष्णाने स्वतः निर्मिलेल्या(!) वर्णाश्रमधर्मामुळे जातीपातीचे कधी न संपणारे विषारी पीक आल्याने देशाची शांतता सतत भंग होत आहे. श्रीकृष्ण एकूण सतरा अध्यायांत विविध योगांचे ज्ञान सांगतो. स्थितप्रज्ञ याविषयी सर्वच वाचकभक्त आदराने या भूमिकेचा स्वीकार करतात. श्रीकृष्णाने ज्या योगविद्या सांगितल्या त्यांचा तो तज्ज्ञ होता काय? तो स्थितप्रज्ञाचे गुणविशेष सांगतो, तो स्वतः स्थितप्रज्ञ आहे काय? की, ते फक्त लोकांसाठीच सांगावयाचे ज्ञान आहे? त्याचे जीवन तर धूर्तपणा, लबाडी व कावेबाजपणा यांनी भरले असताना त्यास हे ज्ञान सांगण्याचा अधिकार आहे का? त्यामुळेच कट कारस्थानाला ‘कृष्णकृत्य’ हे नाव मिळाले असावे,
गीतेतील 700 श्लोकांत कृष्णाने बोललेले 620 श्लोक आहेत. त्यांत मी, माझे, मला, माझ्यामुळे असे एकूण 375 श्लोक आहेत. सातव्या अध्यायात श्लोक 20 व 27 सोडून सर्वत्र ‘मीच मी’ आहे. परस्परविरोधी श्लोकांच्या 16 जोड्या म्हणजे 32 श्लोक दाखविता येतील. त्यामुळे त्यांच्या अर्थाचा विचका झाला असून केवळ परंपराशरण म्हणून ते श्रद्धेने स्वीकारले जाते. नवव्या अध्यायात 34 श्लोक असून त्यात ‘मी’ या शब्दाचा 69 वेळा प्रयोग करण्यात आलेला आहे. या व इतर अध्यायांत स्वतःच्या तोंडून स्वतःची इतकी असभ्य स्तुती केली आहे की वाचताना शिसारी येते. यासंबंधी प्रामुख्याने अध्याय क्र.7 व अध्याय क्र. 10 काळजीपूर्वक वाचावा. प्रचंड कर्तृत्वाची महानता ही स्वतःच्या स्तुतीने नष्ट होते. खालच्या पातळीवरील केलेली ही स्तुती नीतिमत्तेलाही धरून नाही. अध्याय 11 मधील ‘विश्वरूपदर्शन’ हे प्रकरण तर अभिरुचीला सोडून बीभत्स स्वरूपाचे आहे. यातील निवेदन म्हणजे ज्ञानाचा विपर्यास होय.
गीता हा युद्धाचा प्रचार करणारा ग्रंथ आहे. कृष्ण प्रेमावतार म्हणून ओळखला जातो. येथे मात्र तो अर्जुनास युद्धाच्या खाईत लोटतो. विरुद्धपक्षाकडे आपले सर्व सैन्य देतो. स्वपक्षाकडे युद्धात स्वतः अर्जुनाचा सारथी होतो, याची संगती लावणे कठीण आहे. जेथे जेथे व्यावहारिक जीवनात उपयोगी पडणारे उच्च दर्जाचे थोडे श्लोक आढळतात तेथेही कृष्णाने स्वतःच्या भक्तीचे तुणतुणे वाजविल्यामुळे तेही दूषित होताना दिसतात कारण नैतिकता-नीतिमत्ता देवधर्माच्या भक्तीवर वा त्याच्या आधारावर अवलंबून नाही. नीती स्वनिर्मित, सर्वमान्य व सर्वस्वी साधु असते. श्रीकृष्णाने सांगितलेल्या निष्काम कर्मयोगातील थोडीफार नीतिमत्ता, अर्जुनास युद्धासाठी प्रवृत्त करताना जिंकलास तर भूलोकीच्या राजवैभवाचे व पराजित झालास तर स्वर्गप्राप्तीचे प्रलोभन दाखविल्याने, संपुष्टात आली आहे; आणि हे निष्काम कर्मसुद्धा वर्णाश्रमधर्मविहित आहे. ते शास्त्रसंमत भेदाभेदाच्या नीतीने ठरविलेले कर्म आहे. त्यात निवडण्याचे स्वातंत्र्य नाही. शेवटी गीताप्रणीत युद्धाचा हेतू, गीतेची शिकवण व युद्धाचा परिणामही शून्यवत झालेला दिसतो. भक्ती मात्र इते आहे. गीताभ्यासकांनी खाली दिलेल्या श्लोकांचा गंभीरपणे अभ्यास करावा. अध्याय तीनमधील श्लोक क्र.12 यात ‘देवाचे भोग त्याला न देता जो स्वतःच भोगतो त्याला चोर म्हटले आहे.’ देवाच्या तोंडी हे शब्द हिणकस वृत्तीचे द्योतक वाटतात, अध्याय 3 मधील प्रलोक क्र. 13 यात, ”यज्ञानंतर राहिलेले अन्न खाणाऱ्यांना सदाचारी म्हटले आहे. जे स्वतःसाठी तयार केलेले अन्न स्वतःच खातात त्यांना पापी म्हटले आहे.” येथे सदाचाऱ्यांची व पापी यांची नवीन व्याख्या केली आहे. अध्याय 33 मधील प्रलोक क्र.32 यात, जे कृष्णाच्या मताप्रमाणे आचरण करीत नाहीत त्यांना ‘मूर्ख’ म्हणून त्यांचा नाश होणार असे म्हटले आहे. अध्याय 4 श्लोक क्र. 40 यात, “अज्ञानी व संशयग्रस्त हे नाश पावतात व त्यांना सुख व परलोकही मिळणार नाही’ असे म्हटले आहे. त्याला अशा जनतेविषयी मुळीच कणव नाही, प्रेम नाही. अध्याय 7 श्लोक क्र.15 यात, कृष्णाला जो शरण येत नाही त्याला त्याने ‘नराधम’ म्हटले आहे. येथे कृष्णाने सभ्यतेचे संकेतही पाळले नाहीत. अध्याय 16 प्रलोक क्र. 19 यात, असुर लोकांना ‘नराधम’ संबोधून त्यांची रवानगी सातत्याने त्याच योनीत केली आहे. त्यांच्यासाठी सुधारण्याचे दरवाजे बंद केले आहेत. अध्याय क्र. 16 श्लोक 20 असुरांना ‘मूर्ख’ म्हणून “त्यांना कायमचे अधोगतीत टाकतो” असे म्हटले आहे. स्त्रिया, वैश्य व शूद्रांना गीतेने पापयोनीत टाकले आहे. (अध्याय 9.32).
सुज्ञांनी, अभ्यासकांनी वरील श्लोकांच्या अर्थांचा गंभीर विचार करावा. चिकित्सक अभ्यास करावा व सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवून सांगावे की, हा कृष्णाचा-व्यासाचा -ब्राह्मणांचा गीता ग्रंथ राष्ट्रीय ग्रंथ होण्यास खरेच पात्र आहे काय? सांख्ययोगातील सत्त्व, रजस्, तमस् या संज्ञा वापरून गीतेत ब्राह्मण, क्षत्रिय वैश्य व शूद्रांच्या गुणावगुणांचे कॉपीराईट पद्धतीने केलेले निरूपण जातिनिष्ठ स्वभावधर्माचा, वर्णाश्रमधर्माचा छुपा प्रचार आहे. गीतेत अखिल मानवजातीच्या कल्याणाचा, समाजाच्या सर्वांगीण उन्नतीचा, भावनिक ऐक्याचा व परिवर्तनशीलतेचा मानवी सहजीवनाचा मार्ग शोधूनही सापडला नाही. तेव्हा असा हा ग्रंथ ‘राष्ट्रीय ग्रंथ’ होण्याच्या योग्यतेचा मुळीच नाही. असे माझे स्पष्ट मत आहे.

गंगाधर रघुनाथ जोशी, 7, सहजीवन हौसिंग सोसायटी, ‘ज्ञानराज’ सिव्हिल लाइन्स, – दर्यापूर, जि.अमरावती 444803
हिंदू, हिंदुत्व व धर्मनिरपेक्षता
1) ‘हिंदू’ हा शब्द संस्कृतिनिदर्शक आहे. ती संस्कृती सिंधू खोऱ्यात राहणाऱ्या लोकांच्या जीवनपद्धतीतून निर्माण झाली. व्युत्पत्तिशास्त्रानुसार ‘स’चा ‘ह’ होऊन ‘सिंधू’चा ‘हिंदू’ झाला म्हणून ‘हिंदू संस्कृती’
2) वेद, शास्त्रे, पुराणे, गीता ह्यात ‘हिंदू’ शब्द आढळत नाही.
3) जीवन निरामय, शांततापूर्ण, सुखी, सुरक्षित, सुसंस्कृत, समृद्धीने व सभ्यतेने जगता येण्याची धारणा ठेवणारी ही संस्कृती आहे. सामुदायिक सुरक्षिततेची धारणा नैतिकतेने राखणे व वृद्धिंगत करण्याचा ह्या संस्कृतीचा नैसर्गिक स्वभाव म्हणून तो धर्माचा वाचक झाला.
4) ह्या हिंदू धर्माचा कोणी एक प्रेषित नाही. त्याचा कोणता एक प्रमाण ग्रंथ नाही. प्राणिजीवनाचा सर्वव्यापक, साकल्याने विचार करण्याची मानसिक बैठक या संस्कृतीने दिलेली आहे. ह्या संस्कृतीत निरीश्वरवादही आहे.
5) ‘हिंदुत्व’ म्हणजे ह्या संस्कृतीचा भाग असणे, विकसित होणे व कृतार्थ जीवन व्यतीत करणे.
6) ‘हिंदुत्व’ या शब्दात स्वाभिमान’ असेल, आहेही. तो अयोग्य मुळीच नाही. पण आपली संस्कृती इतरांवर लादण्याची इच्छा हिंदुत्वात उत्पन्न झाली तर ते -मुद्दलीच असंस्कृत होईल. ‘गर्व से कहो’ तीत बसत नाही. त्यामुळेच गांधीवध झाला. पं. नेहरूंची प्रतिक्रिया चूक नाही.
7) मानवी स्वभावाच्या स्खलनशीलतेने व कमकुवतपणाने ह्या संस्कृतीत जी जी वैगुण्ये,
वाईट प्रथा, दुष्ट चालीरीती, अंधश्रद्धा निर्माण झाल्या त्यांना छेद देण्याचे कार्य ह्या संस्कृतीतील थोर पुरुषांनी, प्रसंगी इतर संस्कृतींची मदत घेऊनही केलेले आहे. विश्वात्मक देवाची पूजा बांधणारी ही संस्कृती आहे.
8) हिंदू संस्कृतीचा कणा मुळातच पंथनिरपेक्ष आहे. ती हजारो वर्षे टिकून राहिलेली आहे. तिच्या अंगभूत वैशिष्ट्यांनी ती पुढेही टिकणार आहे. पापाचा अंधार नष्ट होवो. हे जग स्वधर्मरूपी सूर्याने प्रकाशित होवो. सत्य, शिव व सुंदरतेचा जयजयकार करणारी ही संस्कृती आहे.
9)धर्मनिरेपक्षता हा शब्द वदतोव्याघात आहे. धर्म म्हणजे व्यक्ती वा वस्तूचा स्वभाव, नैसर्गिक गुण, त्या गुणालाच निरपेक्ष राहून त्या व्यक्तीने वा वस्तूने कसे राहायचे हे कोणी सांगेल काय? प्रकाश हा सूर्याचा स्वभाव आहे तर त्याला प्रकाशनिरपेक्ष राहता येईल काय? जीवनधारणा करणारा जर धर्म तर धर्मनिरपेक्ष राहून जगणारे कसे जगत असतील ह्याची कल्पनाच करवत नाही. ‘सेक्यूलर’चा अर्थ ‘ऐहिक’, इहलोकसंबंधीचे, असाच होत. ‘धर्मनिरपेक्ष’ असा होत नाही. हिंदू संस्कृती पंथनिरपेक्ष आहे. सर्व पंथांचा ती आदर करणारी आहे. उदारमतवाद हे तिचे व्यवच्छेदक लक्षण आहे.
10) गीतेत परमेश्वराचे सहा गुण सांगितलेले आहेत. निष्कलंक यश, अवियुक्त लक्ष्मी, अमर्याद व स्वतंत्र औदार्य, अप्रतिहत ज्ञान, शुद्ध वैराग्य आणि सत्तालंकृत ऐश्वर्य. ह्या गुणांची उपासना करणारी ही संस्कृती आहे. परमेश्वर असो, नसो. पण हे सहा गुण तर शेवटी सार्थ ऐहिक जीवनासाठीही अपरिहार्यच राहणार आहेत.

वसंत म. केळकर, सी-25/फ्लॅट क्र.3, केंद्रीय विहार, सेक्टर 38, नेरळ, नवी मुंबई 400706.
सभ्यता, सुधारणा व विकास
जानेवारी ते मार्च अंक एकदमच मला मिळाले. (मी नुकतीच वर्गणी भरली आहे.) त्यांपैकी दोन भागांवर माझ्या प्रतिक्रिया लिहितो.
फेब्रुवारी 2012 च्या अंकांत सभ्यता आणि सुधारणा या शीर्षकाखाली महात्मा गांधींचे विचार आहेत. महात्मा गांधींचे राजकीय कार्य त्यांना आपण दिलेल्या राष्ट्रपिता’ या पदवीला अनुरूपच आहे. पण त्यांचे सामाजिक व आर्थिक विचार इतर थोरा-मोठ्यांना पटलेच आहेत असे नाही. उदा. जवाहरलाल नेहरू यांचे विचार वेगळे होते…
1850 च्या अगोदर जगाच्या व्यवहाराला लागणारी ऊर्जा माणसे, बैल, घोडे देत होती व ती त्यांना अन्नामधनच मिळत होती. अन्न सौर ऊर्जेमळे (प्राणी व वनस्पती) बनत होते. सौर ऊर्जेला पूरक अशी विस्तव निर्माण करण्याची कला प्राचीन काळापासूनच अवगत असल्याने आकाशात सूर्यनारायण व पृथ्वीवर अग्नी आम्हाला लागणारी ऊर्जा देत होते. अजूनही देत आहेत. विस्तवदेखील लाकडी कोळसा व लाकडे जाळून मिळत असल्याने मूळ रायणच होते व आहेत; वनस्पती, प्राणी आणि मानवप्राणी यांच्यामार्फत.
1850 च्या आसपास उष्णता ही एक ऊर्जा आहे याचे ज्ञान झाले व दगडी कोळसा जाळून मोठ्या प्रमाणावर उष्ण वाफ तयार करता येते व त्या उष्णतेचे 20 टक्के रूपांतर आगगाडीच्या गतिमध्ये करता येते ही जाण कुतूहलातून, प्रयोगशीलतेतून, परिश्रमामधून व हुशारीमुळे आली आहे. हे सगळे शास्त्रज्ञ हावरट किंवा घमेंडखोर होते असे म्हणणे बरोबर नाही. आधुनिक विज्ञानप्रणाली युरोपमध्ये निर्माण झाली हा योगायोगाचा भाग आहे. त्यामुळे पौर्वात्य व पाश्चात्त्य असे जगाचे दोन भाग पाडणे पण बरोबर नाही. यातला एक आध्यात्मिक
व दुसरा ऐहिक ही धारणा पण चूकच आहे.
दगडी कोळसादेखील सूर्यनारायणाचेच वरदान आहे. पण ही संपत्ती fixed de posit या स्वरूपाची आहे. दगडी कोळशाबरोबरच खनिज तेले यांचे पण तेच काम आहे. ही संपत्ती पण fixed deposit याच धर्तीची आहे. यातून निर्माण झालेल्या आगगाड्या, मोटरकार, जहाजे, विमाने, त्यातून निर्माण झालेली औद्योगिक क्रान्ती, आर्थिक विषमता, बदलती जीवनशैली, पर्यावरणावर विपरित परिणाम इ. बऱ्या वाईट गोष्टींचा आपण सामना करीत आहोतच.
महात्मा गांधींच्या विचारांवर प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे करता येईल, आज लोक बाह्य वस्तूंच्या शोधात व शरीरसुखात सार्थकता मानतात तर तसे ते पूर्वीही मानत होते. पूर्वी आमच्या विचारांत आध्यात्मिकता होती व आजही आहे. जग कधीच स्थिर नव्हते. बदलती जीवनशैली हा त्याचा भाग आहे. आगगाडीचा प्रवास, विमानाचा प्रवास, संगणक, तंत्रज्ञान, विमाने तयार करणे, जहाज तयार करणे, रेफ्रिजरेटर्स, एअर-कंडिशनर्स, सर्व-संस्कृतीशी ओळख, खेळ, गायन, वादन, तत्त्वज्ञानं या सर्व बाबी हाव व घमेंड’ या सदरात येत नाहीत. निसर्गाच्या सानिध्यात राहायला आपल्याला आवडत नाही असेही नाही, परंतु बदलत्या जगाला तोंड देणे हे आपले नेहमीच कर्तव्य ठरलेले आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.