संपादकीय

मेंदू-विज्ञानाचा तत्त्वज्ञानावर झालेला किंवा होऊ घातलेला परिणाम या विषयावरील ‘आजचा सुधारक’चा विशेषांक वाचकांच्या हाती देताना आम्हाला आनंद होत आहे. या विशेषांकामध्ये लेखनसाहाय्य करणाऱ्या लेखकांचे मनःपूर्वक आभार.

गेल्या काही वर्षांत मेंदू-विज्ञानात लागलेल्या शोधांमुळे मेंदूचे कार्य कसे चालते त्याबद्दल अधिकाधिक माहिती जमा होत आहे. आत्तापर्यंत जे फक्त तर्काने जाणणे शक्य होते त्याचे प्रत्यक्ष प्रमाण मिळू लागले आहे. पूर्वापार चालत आलेल्या काही समजांना बळकटी मिळू लागली आहे, तर काही कल्पना मोडीत निघाल्या आहेत. या उलथापालथीचा परिणाम तत्त्वज्ञानाच्या संकल्पनांवर होणे स्वाभाविक आहे. अश्या संकल्पना कोणत्या? मेंदू-विज्ञानातल्या प्रगतीमुळे त्या संकल्पनांमध्ये मूलभूत स्वरूपाचा काही बदल झाला आहे का? भविष्यात होईल असे वाटत आहे का? तत्त्वज्ञानाचे अभ्यासक मेंदू-विज्ञानाकडे कोणत्या दृष्टीतून पाहतात? या विषयांवर मराठीतून काही लिहिले गेलेले नाही. त्याची निदान अंशतः तरी पूर्तता करावी या विचारातून हा विशेषांक काढायचे ठरले.

तत्त्वज्ञानातील पारंपरिक प्रश्नांची उत्तरे विज्ञानाच्या मदतीने शोधण्यास वैज्ञानिकांनी सुरुवात केली त्याला आज काही दशके होऊन गेली. संशोधनाच्या सीमा विस्तारत गेल्या. उत्तरांचे स्वरूप किती गुंतागुंतीचे आहे हे स्पष्ट होऊ लागले. कॉन्शसनेस, जाणीव, संवेदन, आकलन, वर्तन, मानवी भावभावना, नीतिमूल्ये, असे या संशोधनाचे अनेक पैलू आहेत. या सगळ्याचा समावेश ‘मन’ या सर्वसमावेशक शब्दात करता येतो. मेंदू व मन हे द्वैत नाही, अशी सर्वसाधारणपणे मेंदू-विज्ञानाची धारणा आहे. हे सिद्ध करणे सोपे नाही. सिद्ध झाले तरी मन ही संकल्पना जनमानसातून पुसली जाणार नाही. ती रद्दबातल करणे इष्टही नव्हे.

ख्रिस्तपूर्व ४०० शतकातील चिनी तत्त्वज्ञानात एक छान उदाहरण आहे. मातीपासून मडके तयार करतात. मडक्यातील पोकळी मडक्याचे कार्य ‘सफल’ करते. मडक्याला मडकेपण फक्त मातीने येत नाही तर त्यातील पोकळीमुळे येते. पोकळीचा ‘कॉन्सिट्यूटिव्ह अॅबसेन्स’ (‘नसणे’ हा घटक!) महत्त्वाचा, माती आणि पोकळी एकाच वेळी अस्तित्वात येतात तेव्हाच मडके तयार होते. सजीव व त्याचे मन यांचे नाते मडके आणि पोकळी यांसारखेच असते. पोषण मिळवणे, वाढणे, प्रजोत्पादन करणे, या उद्दिष्टांभोवती शरीराची रचना झालेली असते. आकलन, भविष्यातील घटनांबद्दल अनुमान, आडाखे बांधणे या उद्देशांभोवती मनाची गतिमान रचना उभी असते. मनाचे हे उद्देश मडक्याच्या पोकळीसारखे अमूर्त असतात. ते शरीराच्या व्यवस्थेवर, वर्तनावर प्रभाव पाडतात. पण ते शरीरव्यवस्थेचे भौतिक भाग नसतात. मडक्यातील पोकळीच्या ‘नसण्या’च्या असण्यासारखे कार्यशील असतात. हजारो वर्षे जगातील विविध संस्कृतींमधील माणूस शरीर व मन याबद्दल विचार करत आला आहे. मडक्याचा दृष्टान्त हेच दाखवतो. अशी उदाहरणे माणसाला विचार करायला लावतात. आरामखुर्चीतील विचार हा प्रयोगाकडे जाणारा मार्ग असतो. किंबहुना असे दृष्टान्त हे छोटेछोटे विचार-प्रयोग असतात असे म्हणायला हरकत नाही.

सजीवांमधील या पोकळीचा’ भौतिक पाया शोधायला सुरुवात होऊन बरीच वर्षे झाली. अर्विन श्रॉडिंजर (Erwin Schrodinger) या भौतिकीतज्ज्ञाने व्हॉट इज लाइफ (सजीवता म्हणजे काय)? यावर सर्वसामान्य लोकांसाठी व्याख्याने दिली. त्यांचे पुस्तक 1944 साली प्रकाशित झाले होते. जैवविज्ञानाला भौतिकी विज्ञानाचा झालेला स्पर्श त्याने बोलून दाखवून दिला होता. 1935 साली गॉटिन्गेन विद्यापीठाच्या छोट्याशा विज्ञानपत्रिकेत एक शोधनिबंध प्रकाशित झाला होता, त्याचा भरपूर आधार श्रॉडिजरने या व्याख्यानांसाठी घेल्ला होता. मॅक्स डेलब्रुक (Max Delbruck) हे थिऑरिटिकल फिजिसिस्ट, कार्ल झिमर (Karl Zimmer) हे रेडिएशन फिजिसिस्ट, निकोलाय टिमोफीफ रेसोवस्की (Nikolai Timofeeff Ressovsky) हे ड्रॉसोफायला या माश्यांवर संशोधन करणारे जेनेटिसिस्ट या तिघांनी मिळून हा शोधनिबंध लिहिला होता. ऑन द नेचर ऑफ जीन म्युटेशन अँड जीन स्ट्रक्चर असे त्या शोधनिबंधाचे शीर्षक होते. सूक्ष्मातिसूक्ष्म जनुकाची रेण्वीय रचना काय असेल या संबंधात काही मूलभूत विचार त्यात या तिघांनी मांडला होता. आज जो ह्यूमन जिनोम सिद्ध झाला आहे त्याची बीजे या शोधनिबंधात आहेत.

आज पंच्याहत्तर वर्षांनंतर या शोधनिबंधाचा इंग्लिशमधील अनुवाद पुस्तकरूपाने प्रकाशित झाला आहे. क्रिएटिंग फिजिकल बायॉलॉजी हे या पुस्तकाचे नाव आहे. फिलिप स्लोन (Phillip R Sloan) आणि बँडन फोगेल (Brandon Fogel) या विज्ञानाच्या तत्त्वज्ञांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे, हे महत्त्वाचे. जैवविज्ञानाकडे पाहणारा भौतिक शास्त्रज्ञांचा दृष्टिकोण (फिजिकॅलिस्ट अॅप्रोच) व अनेक शास्त्रशाखांचा समन्वय साधून होणाऱ्या संशोधनाचा (इंटरडिसिप्लिनरी रिसर्चचा) इतिहास या पुस्तकाच्या रूपाने आपल्यासमोर आला आहे.

नील्स बोर (Niels Bohr) या भौतिकीतज्ज्ञाने १९३२ साली लाईट अँड लाइफ हे व्याख्यान दिले होते. प्रकाश हा लहरींचा बनलेला असला तरी कधी लहर असतो तर कधी कणही असतो. जैवविज्ञान म्हणजे सजीवांचे विज्ञान. सजीवांमध्ये भौतिक आणि रासायनिक भाग असतात, तसेच ‘व्हायटॅलिस्टिक’ जैवशक्तीचाही भाग असतो. या दोन्हींचा परस्परसंबंध कळला तरच सजीवाचे पूर्णत्वाने आकलन होईल. प्रकाश आणि सजीव यांची अशी तुलना नील्स बोरने केली होती.

मेंदू-विज्ञानाचा मुख्य भाग म्हणजे न्यूरोबायॉलॉजी; मेंदूचे जैवविज्ञान. त्यामुळे मेंदू विज्ञानाला फिजिकॅलिस्ट अप्रोच असणार हे उघड आहे. माणसाला गूढ, अद्भुत यांचे जसे आकर्षण असते त्याचप्रमाणे अमूर्त गोष्टी मूर्त करून दाखविण्याची ऊर्मीसुद्धा असते. त्यामुळे मन, कॉन्शसनेस, या अमूर्त गोष्टी मूर्त करण्याचा मेंदू-विज्ञानाचा प्रयत्न असणे स्वाभाविक आहे. हे सर्व प्रश्न तत्त्वज्ञानातही चर्चिले जातात. म्हणून तत्त्वज्ञानावर मेंदू विज्ञानाचा अशा रीतीने प्रभाव पडणे अनिवार्य आहे.

‘चक्षुर्वैह सत्यम्’ हे माणसाला आवडते. आणि समजतेही! विज्ञान त्याला हात घालते. म्हणून प्रभावी ठरते. या विशेषांकाची ही पार्श्वभूमी आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.