आपण मेंदूचे गुलाम नव्हे, तर मालक!

[निर्णयस्वातंत्र्याचा प्रश्न आणि मेंदू-विज्ञान]
मेंदू-विज्ञानामुळे जे अवघड प्रश्न पुढे आणलेले आहेत त्यांतला सर्वांत कठीण प्रश्न आहे तो फ्री विलसंबंधीचा. फ्री विल म्हणजे स्वेच्छा किंवा मुक्त इच्छा. आपण आपला स्वतःचा म्हणून, स्वायत्तपणे काही निर्णय घेऊ शकतो की मेंदूतल्या पेशींच्या जुळण्या आणि मेंदूतली रसायने मिळून आपण काय करायचे, कसे करायचे, केव्हा करायचे, ते सगळे ठरवत असतात?
याची सुरुवात झाली पंचवीस वर्षांपूर्वी. मेंदूसंबंधी सुरू असलेल्या संशोधनामुळे फ्री विल या संकल्पनेला हादरे बसू लागले. 1983 साली बेंजामिन लिबेट (Benjamin Libet) याने काही प्रयोग केले होते. त्या प्रयोगात भाग घेणाऱ्या स्वयंसेवकांना सांगण्यात आले होते की त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा त्यांनी आपले बोट हलवायचे. त्याच वेळी त्याच्या डोक्यावर इलेक्ट्रोड्स लावून मेंदूतील विद्युत्लहरींचे मोजमाप केले जात होते. त्यात दिसले की ज्या क्षणाला बोट हलायचे त्याच्या जवळपास पाव सेकंद आधी मेंदूत काही विशिष्ट घडामोडी होत. त्या पाहून एखादा माणूस बोट हलवायचा निर्णय केव्हा घेणार आहे त्याचे भाकित लिबेट करू शकत होता. थोडक्यात, मनात इच्छा निर्माण व्हायच्या आधीच बोट हलवायचा निर्णय मेंदूत होत होता. हे विलक्षण होते. पण पाव सेकंद हा काही फार मोठा कालावधी नाही. त्यामुळे प्रयोगात काही चूक झाली असावी असा आक्षेप काही लोकांनी घेतला.
अलीकडे नेचर न्यूरोसायन्स या नियतकालिकाच्या 13 एप्रिल 2008च्या अंकात एक शोधनिबंध प्रकाशित झाला आणि हा आक्षेप निकालात निघाला. प्लॅन्क इन्स्टिट्यूटमध्ये प्रोफेसर जॉन डिलॅन हाइन्स (John-Dylan Haynes) याने केलेल्या प्रयोगात बोट हलवायचा निर्णय मेंदूत फक्त पाव सेकंद नाही तर चक्क सहा ते दहा सेकंद आधी होतो असे दिसले. लिबेटच्या प्रयोगात चूक नव्हती. म्हणजे जेव्हा आपल्याला वाटते की आपण निर्णय घेत आहोत तेव्हा खरे तर आधीच झालेल्या निर्णयाला आपण फक्त ‘मम’ म्हणत असतो की काय?
आणि आपल्या रूढ समजुतीला मोडीत काढणारा हा निष्कर्ष हे काही निव्वळ तत्त्वज्ञान नव्हते. तर प्रत्यक्ष प्रयोगाने सिद्ध झालेली गोष्ट होती.
हे काहीतरी भलतेच होते! आपण समजतो तसे आपण स्वतंत्र बुद्धीने, साधकबाधक विचार करून, निर्णय घेतो. हे खरे नसते?
प्रौढ व्यक्तीने केलेल्या प्रत्येक कृतीस ती व्यक्ती स्वतः जबाबदार असते असे आपण मानतो. त्याचे जे काही बरेवाईट परिणाम होतील ते त्याने भोगायलाच हवेत, या तत्त्वावर समाजव्यवहार चालू असतात. कायद्याचा पाया हा असतो.
पण मग ‘माझ्या मेंदूतले अमुक एका रसायनाचे प्रमाण जास्त झाले म्हणून मी चोरी केली, त्यात माझा काय दोष?’ किंवा ‘माझ्या मेंदूतले तमुक नियंत्रणकेंद्र नीट काम करत नसल्यामुळे मी बलात्कार केला, माझा नाइलाज होता. मला शिक्षा करू नका.’ असे कुणी म्हणायला लागले तर?
या प्रयोगांमुळे अनेक विचित्र प्रश्नांना आपल्याला सामोरे जावे लागणार आहे. एखादी गोष्ट करायच्या आधीच ती करण्याचा निर्णय जर होत असेल तर मग ती केल्याबद्दल त्या व्यक्तीला जबाबदार धरणे बरोबर आहे का? किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर मुक्त इच्छा (free will) ही आपण समजतो तशी खरोखरच मुक्त किंवा स्वतंत्र असते का? आपल्या प्रत्येक इच्छेच्या मागे नेणिवेचे प्रॉम्टिंग असते का? तसे मानले तर एखादी गोष्ट करायची नाही असे ठरवणे हाही निर्णयच असतो! त्याचे काय? त्याच्या मागेही नेणिवेत घेतलेला निर्णय असतो का? तो केव्हा होतो? आणि बोट हलवायचा निर्णय एकदा घेतला गेला की बोट हलणारच का? की नेणिवेत निर्णय झाला असला तरी जाणिवेत आपण तो बदलू शकतो?
अशा प्रश्नांचा मागोवा राजीव साने यांनी आपल्या लेखात घेतला आहे. – संपादक ]
(माणसाची स्व-नियामकता (ऑटोनॉमी) ही गोष्ट मेंदू-विज्ञानातील नव्या निरीक्षणांनुसार आभासी ठरते, या मताचे खंडन)
एखाद्या सांगकाम्याने शब्दशः अर्थ घेऊन घोळ घातला तर वरिष्ठ त्याला म्हणेल की ‘अरे जरा डोकं चालवलं असतंस तर…”. पण वरिष्ठ असे म्हणू लागताच त्याने “मी कोण डोकं चालवणार, साहेब? डोकंच मला चालवतंय’ असे उत्तर दिले, तर जसा वैताग येईल तसेच काहीसे प्रगत मेंदू-विज्ञानाचे काही निष्कर्ष ऐकून दार्शनिक जडवादाचा विजय झाला आहे असे समजणाऱ्या काही मंडळींची वक्तव्ये ऐकून वाटते!
“करता करविता ‘तो’ आहे. आपण त्याच्या कळसूत्री बाहुल्या!” या धारणेत, फक्त ईश्वर काढून मेंदू घातला की आपण विज्ञान-निष्ठ ठरतो असे मानणे भाबडेपणाचे ठरेल.
अगदी सेव्हन हॅबिट्सवाला कोवेसुद्धा सुरवातच अशी करतो की, स्टिम्युलस आणि रिस्पॉन्सच्या मध्ये, रिस्पॉन्स निवडणारे आपण’ असतो. म्हणूनच आपण घटनाक्रम बदलू शकतो आणि स्वतःलाही बदलू शकतो. बाह्य निसर्गाबाबत जशी पोस्टपोनमेंट करता येते. (उदा. “आता वाळवून ठेवले तर नंतर खायला मिळेल), तशीच शरीरांतर्गत निसर्गाबाबतही करता येते. “आता मी काही बोलणार नाही पण नेमकी वेळ आल्यावर सुनावल्याशिवाय सोडणार नाही’ असे ठरवून, सुनावताना लागणारा आवेशही, आपण ‘नेमक्या वेळे’साठी राखून ठेवू शकतो. ही पोस्टपोनमेंट करताना आपण ‘शरीरांतर्गत निसर्गात’ इनोव्हेशन करत असतो.
‘मी निर्णय घेतो, रेट्रन तडीला लावतो आणि त्याची जबाबदारी घेतो’ या, मानवी भावविश्वातील अनिवार्य अशा घटिताला, एक शारीरिक व विशेषत्वाने मैंद्विक बाजूही असते, हे कोणीच नाकारणार नाही. पण यावरून या गोष्टीचे वर्णन “मेंदू निर्णय घेतो” असे करणे अनुचित आहे. मेंदू जरी झाला तरी, तो म्हणजे एखादे, “निर्णय घेणे” या अर्थाची क्रिया करणारे व प्रयोजन-भान असलेले अस्तित्व, (टेलिओलॉजिकल एन्टिटी), नाही. मेंदूत अनके विकल्प शक्य असणाऱ्या प्रक्रिया घडू शकतात व त्यांपैकी काही प्रक्रियांचे पर्यवसान, इतर विकल्पांत न होता, विशिष्ट विकल्पात होते एवढेच म्हणता येईल. अन्यथा, नुसता ‘फ्यूज उडाला’ असे न म्हणता ‘तारा जळतील इतका प्रवाह वाहण्याची शक्यता निर्माण होताच ते न होऊ देण्यासाठी फ्यूजने आत्मसमर्पण केले” असे म्हणण्यात जी चेतनगुणोक्ती केली जाते तीच मेंदूबाबत केली असे होईल..
दृष्टीने होणारी सृष्टी : आय डीम देअरफोर इट सीम्स
‘जीवनाच्या भाषेतील भावप्रत्यया’ला जोडून असणारे विज्ञानाच्या भाषेतले जडघटित’ बदलले तर भावप्रत्यय बदलतो, ही बाजू जडवादी लोक ध्यानात घेतात. पण नेमकी उलट प्रक्रियाही घडविता येते हे मात्र ते विसरतात. जीवनाच्या भाषेतली ‘गरम वस्तू’ म्हणजेच विज्ञानाच्या भाषेत ‘जिचे रेणू जोरात कंप पावत आहेत अशी वस्तू’. आपल्याला थरथर जाणवत नसून गरमपणाच जाणवतो. आपण गरम वस्तू गार करण्यासाठी तिला गार वस्तूच्या संपर्कात आणतो आणि ती गार होतेही. हेच ‘विज्ञाना’च्या भाषेत असे म्हणता येईल की, अधिक कंपायमान वस्तूतील गति-ऊर्जा कमी कंपायमान वस्तूत जिरते. आपण पिवला आणि निळा रंग मिसळून हिरवा बनवू शकतो हीच गोष्ट “अमुक फ्रीक्वेन्सी परावर्तित करणारी रेणूंची रचना बदलून…..” असेही म्हणता येईल. तसेच आपण तार लावताना ती स्वराशी लावतो, कंप्रतेशी नव्हे. पण मग यामुळे तिची कंप्रता निश्चित होते की नाही? अर्थात होतेच.
थोडक्यात जीवनाच्या भाषेतले भावप्रत्यय आणि विज्ञानाच्या भाषेतली जडघटिते यांच्यात समकक्षता (कॉरस्पॉडन्स) असते.
हे जसे शरीरबाह्य जड-जगाबाबत खरे आहे तसेच ते शरीरांतर्गत जड-जगाबाबतही खरे आहे. पोटात गोळा येतो हेही खरे आणि अभिनलीन पंप होते हेही खरे. धक्कादायक बातमी ही अफवा होती असे कळताच हुश्श होते ‘जिवात जीव येतो हेही खरे आणि स्ट्रेस रीलीजिंग हार्मोन स्रवते हेही खरे.
कृत्रिम-हास्य-क्लब हे तेव्हाच यशस्वी होतात की जेव्हा त्या खोटे हसणाऱ्यांना खरे हसू येऊ लागते व खरा हास्याशी समकक्ष अशी जी काही जैवरासायनिक घटिते असतील तीही त्यांच्या मेंदूत व ग्रंथींत इ. ठिकाणी घडतात. विनोदामुळे हसणे, नायट्रस ऑक्साईड (लॉफिंग गॅस) मुळे हसणे आणि कृत्रिम-क्लबमधले हसणे, यात फरक नक्कीच आहेत (त्यांपैकी “विनोदामुळे हसणे’ हे उत्तम असे माझे वैयक्तिक मत आहे). विविध भावनांचे आकार (फॉर्स) तेच असतात व त्यांची मैंद्विक बाजू समान प्रकारची असते. पण या भावनांचे आशय काय असतील हे चिह्नमय जगातल्या संदर्भावर अवलंबून असते. ओशाळलेपणाने उदा. भिवईच्यावर दुखणे, हे दोन व्यक्तीत समान असेल पण कोणाला कशाचे ओशाळलेपण वाटेल याचा आशय अगदीच वेगळा असेल. आणि मुख्य म्हणजे हा आशय मैंद्विक घटितांमध्ये उकलता येणारा नसेल.
इतकेच नव्हे तर एखाद्या जास्त वयाच्या व्यक्तीने जरी नव्याने वाद्य शिकायला घेतले, आणि भरपूर रियाझ केला, तर त्याच्या कानांशी तसेच हात-बोटे यांच्याशी संबंधित मेंदूपेशींचे चक्क रीवायरिंग होते. म्हणजेच जाणिवेतल्या निर्णयांनी मेंदूचे हार्डवेअरसुद्धा बदलता येते. अर्थात आपण ‘रीवायरिंग करत आहोत’ अशी जाणीव पूर्वी मेंदू-विज्ञानाच्या अभावी नसे, पण आता ती होईल. म्हणजेच, कारण-संबंध म्हणून पाहता जाणिवेतून जडात, असेही कारणत्व नेहमीच अस्तित्वात होते. तसे पाहता फिजिओथेरपी हा हस्तक्षेप शारीरच आहे पण त्यासाठीची मनःपूर्वकता (सिन्सिअरिंटी) निर्माण होईल की नाही हे ती व्यक्ती जाणिवेत काय धारणा बाळगून आहे यावर अवलंबून असणार आहे. यावर तुम्ही “पण त्या धारणा रुजण्यासाठी आवश्यक अशी मेंदूवैशिष्ट्ये होतीच की” असे म्हणू शकाला, व त्यावर मीही म्हणेन की ती मेंदूवैशिष्ट्ये शाबूत राखण्यासाठी त्या व्यक्तीने लहानपणापासून घेतलेले जाणिवेतले निर्णय कारणीभूत आहेत. ही अनवस्था किंवा चक्रीयता टाळता येणार नाही, कारण ती खरी आहे. जाणिवेने अंतर्गत जडाला घडविणे ही बाजू वजा करून चालणार नाही, एवढेच मी म्हणत आहे. अंतर्गत जड-वैशिष्ट्ये जाणीव घडविण्यात योगदान करतच नाहीत असे माझे अजिबात मत नाही.
आपले संवेद्य-प्रत्ययसुद्धा (पर्सेप्शन्स) आपण ठरवून बदलू शकतो. पूर आलेल्या नदीच्या पुलावर उभे राहून नदीकडे पाहिले की कधी पूलच हलतो आहे असा विचित्र प्रत्यय येतो. तर कधी पूल स्थिर आहे व नदीच हलते आहे असा वास्तवोचित प्रत्ययही येतो. हे का होते आहे याचे बौद्धिक आकलनही होते. पण विशेष महत्त्वाचे असे की आपण त्या दोहोंपैकी कोणता प्रत्यय यावा हे ठरवू शकतो. पूल हलतो आहे असे बघायचे ठरविले तर तसे दिसते आणि नदी हलते आहे असे बघायचे ठरवले तर तसेही दिसते.
प्रत्यय हा अर्थपूर्ण असतो. एकच संवेद्य हे अनेक अर्थांनी प्रत्ययाला येते. आय डीम देअरफोर इट सीम्स असे हे अनुभव असतात.
निर्णय ही घटना मेंदत अगोदर घडते आणि आपल्याला नंतर कळते?
‘आधीची घटना ही नंतरच्या घटनेमुळे कशी घडू शकेल?’ हा वर वर पाहता बिनतोड वाटणारा युक्तिवाद वापरून मेंदूवाद्यांनी खळबळ माजवली आहे. या प्रयोगाते माणूस निर्णय होताच एक बटन दाबतो पण त्याच्या मेंदूच्या स्कॅनमध्ये निर्णयाची झळाळी अगोदरच दिसलेली असते. पण हे दाखवले जाते तितके चमत्कारिक नाहीच.
उदा. वीज अगोदर चमकते, गडगडाट नंतर ऐकू येतो. जर कोणी गडगडाटा’मुळे’ वीज चमकते असे मानले तर त्याला कारण-नंतर व कार्य-अगोदर या विसंगतीत पकडता येईल. पण आपल्याला हे माहीत आहे की या घटना दोन नसून ती एकच घटना आहे. प्रकाशाचा वेग हा ध्वनीच्या वेगापेक्षा फारच जास्त असल्याने दृक्-प्रत्यय आधी येतो व श्रुत-प्रत्यय नंतर येतो. तद्वतच निर्णय व्हायला लागणारा वेळ आणि त्याचे आकलन होऊन तो द्यायला लागणारा वेळ यात फरक पडणे अत्यंत स्वाभाविक आहे. कारण आकलन हे इतर अनेक धारणांमध्ये सुसंगत ठरून व्हावे लागते. अनुमोदन मिळून निर्णय पास होताना त्याचे आकलन पुरे होत असते. अनेकजण गुंतलेले असतानाचा निर्णय हा आपण दृष्टान्त म्हणून घेऊ. औपचारिकता पूर्ण करायला लागतात इतर ‘खात्यांच्या’ ‘ना हरकती’ घ्याव्या लागतात. समोरच्या पार्टीला आपला प्रस्ताव पटणे आणि प्रत्यक्ष दस्तावेज हाती पडणे यांत वेळ जातोच. साहेबांनी हो म्हटलेलेच आहे ही बातमी प्यूनने फोडायची नसते! मेंदूचा स्कॅन करणाऱ्या चुंबकीय लहरी तोंडाळ प्यूनचे काम करतात व त्यामुळे ‘स्वतःच्या’ अगोदर शास्त्रज्ञांना बातमी लागते. ही बातमी त्यांनी बातमी म्हणून छापायला काही हरकत नाही. पण ते त्याच अंकात “निर्णाता मी हा केवळ एक भास” असा अग्रलेखही ठोकायला लागले तर त्याला माझा आक्षेप आहे. निर्णायक मज्जापेशींमध्ये फ्लॅश होणे आणि इतर सर्व मज्जापेशींकडून तो फ्लॅश ‘पचवला’ जाणे, यात दुसरी प्रक्रिया वेळखाऊ आहे. आकलनाला ‘कॉम्प्रिहेन्शन’ म्हणतात ते उगीच नाही. ते एकुणात (कॉम्प्रिहेन्सिव्हली) व्हावे लागते. दुसरे असे की स्कॅनमध्ये फ्लॅश पडण्याअगोदरपासून अनिर्णित काळातली दोलायमानता (अम्बिव्हॅलन्स), किंवा ही केस कशात मोडते या माहितीचा शोध (स्क्रुटिनी) या गोष्टी चालू नसतात की काय? ही दोलायमानता व स्क्रुटिनी भोगणारा मी म्हणजेच निर्णाता मी. तो कार्यरत असल्याचे चित्र स्कॅनमध्ये अगोदरपासून दिसत नाही. काय? म्हणजे शोध, दोलायमानता, निर्णायकता आणि आकलन हा कालक्रम तर अजिबात मोडला गेलेला नाही. त्यामुळे काळाच्या संदर्भात उलट्या दिशेने कारणत्व, हा त्या प्रयोगाचा योग्य निष्कर्ष नसून गैर-अर्थ-लावणे (मिसइंटरप्रिटेशन) आहे.
याखेरीज ‘मेंदू अगोदर ठरवतो’ या मताला माझा आणखी एक स्वतंत्र आक्षेप आहे. पुन्हा आपण निर्णयात अनकेजण गंतलेले असतानाचा दृष्टान्त घेऊ. समजा मला हे खात्रीने माहीत आहे की उदाहरणार्थ दर पौर्णिमेच्या दिवशी मी अनावर होऊन एक खून करणारच. एरषी मी सज्जन आहे. मी माझ्या हितचिंतकांना सांगेन, की त्या दिवशी मला कोंडून ठेवा मी कितीही आरडाओरडा केला तरी अजिबात सोडू नका. आता त्या दिवशी मी मनासारखे वागायला स्वतंत्र नसेन. पण हा माझाच निर्णय असेल व म्हणूनच एकूण घटनेचा निर्णाता ‘मी’च असेन. ही टोकाची परिस्थिती झाली म्हणून त्यात इतरांचे साह्य लागले. परंतु, मला ऐन प्रसंगी कोणते मोह होतात हे ओळखून, मी माझ्या ‘उत्स्फूर्ततेला’ एरवीच काही वळण लावून ठेवतो. ऐन प्रसंगी म्हणाल तर मी या मीच लावलेल्या ‘वळणा’ला वश असतो व त्या क्षणी स्वैर नसतो. पण एकूणात मी स्वनियंता असतो व म्हणजेच स्वतंत्र असतो. मी माझ्या इन-व्हॉलेंटरी (वस्तुतंत्र) अंगाला (नेणीव हा शब्द टाळावा) व्हॉलेंटरीली (पुरुषतंत्ररीत्या) घडविलेले असते. मी माझ्याच शिस्तीचा गुलाम असल्यामुळे मला आकलन व्हायच्या आधीच माझा निर्णायक प्रतिसाद उमटेल व नंतर मी त्यावर शिक्कामोर्तब करीन. याही मार्गाने आपण, स्कॅनमध्ये फ्लॅश अगोदर पडणे आणि कळूनसवरून बटन नंतर दाबले जाणे, या गोष्टीला ‘फ्रीविल नसल्याचा पुरावा’ म्हणून बाद ठरवू शकतो व मेंदूनियततावादी मताचे खंडन करू शकतो. खरेतर फ्रीविल या शब्दातल्या ‘फ्री’मुळे मुक्त हा चुकीचा शब्द घेतला जातो. खरा प्रश्न व्यक्त करण्यासाठी ‘ऑटोनॉमी = स्वयम्-नियामकता’ हा अधिक योग्य शब्द आहे व त्यातही परफेक्ट ऑटोनॉमी अभिप्रेत नाही. आपली स्वयम्-नियामकता बाह्य रेट्यांपुढे (जसे की सत्तेपुढे शहाणपण) व अंतर्गत रेट्यांपुढे (जसे की व्यसन सोडता न येणे) अनेकदा थिटी पडते हे तर उघडच आहे. पण थिटी पडणे आणि मुदलातच नसणे (किंवा आभासी असणे) या अगदी वेगळ्या गोष्टी आहेत.
त्याने त्याप्रसंगी जे केले त्यापेक्षा तो तेव्हा वेगळे करू शकला असता(च) का?
सध्याचे कडवे इहवादी सॅम हॅरिस यांनी त्यांच्या ब्लॉगवर ‘फ्रीविल’चे अस्तित्व नाकारून मोठाच धक्का दिलेला आहे. अत्यंत क्रूर गुन्ह्याचे वर्णन करून, “माझे मलाच कळले नाही की मी हे कसे करू शकलो?” असे उद्गार देऊन व त्या गुन्हेगारावर बालपणी कसे अत्याचार झालेले होते हे सांगून हॅरिससाहेब म्हणतात. “अणू अणू पर्यंतचे तपशील चोख पाळून जर माझ्यातील अणूंपासून तो गुन्हेगार बनवला तर मीही तेच करेन की जे त्याने केले”. अहो पण जर अशी सर्वांशाने अदलाबदल जाली तर तुम्ही सॅम हॅरिस असणारच नाही आहात. तुम्ही ‘तो’च असणार आहात याचे काय? तुमच्या मेंदूत उभवलेला जाणीवस्वरूप सॅम हॅरिस तसाच राहून अदलाबदल केली तर तुमच्यावर बालपणी अत्याचार झालेले असणार नाहीत. ‘तुम्ही त्याच्या जागी असतात तर’ या प्रश्नाला कट्टर-चिद्वादी विनोबाजींनी बऱ्याच काळापूर्वी अगदी हेच उत्तर दिले होते. सर्वांशांनी त्याच्या जागी’चा ‘मी’ म्हणजे ‘तो’च! ‘मी’ नव्हेच.
जेव्हा आपण एखादा माणूस वेगळी निवड करू शकला असता असे म्हणतो त्या वेळी आपल्यावर तसे सिद्ध करण्याची जबाबदारी येते काय? त्याला इतर कोणी दमनाने भाग पाडले नव्हते ना इथपर्यंत आपण (निदान सिद्धान्ततः) जबाबदारी घेऊ शकतो. पण तो माणूस त्याच्या आंतरिक निसर्गाच्या किती अधीन असेल आणि त्यावर कितपत स्वार असेल यावर बाहेरून फार खात्रीने बोलू शकत नाही.
स्व-निर्णातेपण असणे म्हणजे नेहमीच ते यशस्वी ठरणे, असे कोणीच म्हणणार नाही. जेव्हा अयशस्वी ठरते तेव्हा ते स्व-निर्णातेपणच नव्हे असे जर मानले तर मग कोणत्याही गुन्ह्याला नेहमीच इन्सॅनिटी-डिफेन्स मान्य करावी लागेल. जसे मला कायदाच माहीत नव्हता हा बचाव (प्लीडिंग इग्नरन्स) चालत नाही तसाच माझ्यातील निसरड्या जागा मला माहीतच नव्हत्या हाही डिफेन्स चालणार नाही.
फ्रेडरिक हायेक या विचारवंताने त्याच्या कॉन्स्टिट्यूशन ऑफ लिबर्टी या ग्रंथात मार्मिक मांडणी केलेली आहे. हायेकच्या मते मुळात चिद्वाद्यांनी एक घोळ घालून ठेवल्याने जड-नियतिवाद्यांचे फावले आहे. हायेकच्या मते तो घोळ असा, “निर्णाता-स्व हा जर कार्यकारणभावाच्या कक्षेत असेल व प्रभावाखाली असेल तर मग तो ‘स्व-निर्णाता’ राहणारच नाही व जबाबदारी घेणे या गोष्टीची शक्यताच राहणार नाही. जर जबाबदारी घ्यायची असेल तर निर्णाता-स्व हा कार्यकारणभावाच्या बाहेर राहणारा प्रभावमुक्त-अतीत आत्मा असायला हवा’ हायेकच्या मते उलट निर्णाता-स्व हा अतीत-आत्मा नसून तो कार्यकारणभावाच्या कक्षेत येतो म्हणूनच तो सुधारण्याची आशा असते! हायेक म्हणतो की अनावर होणे/ढेपाळणे हा दोषच मानला पाहिजे. स्वतःला आवरता आले नाही तर शिक्षा होते किंवा निदान निंदा होते, या अनुभवातूनच माणूस स्वतःला आवरायला शिकतो. ‘तेव्हाचा जो तू होतास तो तू कदाचित तेच करू शकत होतास की जे तू केलेस. मग तरीही मी तुला का झापतो आहे? तेव्हाचा तू हा न झापलेला तू होतास. आता झापल्याने तुझ्यावर काहीतरी परिणाम होईल व यापुढे तत्सम प्रसंग आला तर झापलेला तू वेगळा असशील व वेगळे करशील या आशेने मी तुला झापतो आहे. तू जर निंदा-स्तुती, लाज-गौरव, शिक्षा-बक्षीस या साऱ्यांपासून अविकारी राहणारा असा आत्मा असतास तर नैतिक निवाड्यांना व्यवहारात अर्थ उरला नसता. तू कार्यकारणभावाच्या पार नाहीस हेच बरे आहे!
” (कॉन्स्टिट्यूशन ऑफ लिबर्टी ग्रंथातील रिस्पॉन्सिबिलिटी हे प्रकरण)
आंतरिक-स्वातंत्र्याबाबत असेच म्हणता येईल. आपल्याला पूर्णतः आंतरिक स्वातंत्र्य असते असे (अस्तित्ववादी वगळता) कोणीच मानत नाही. निवड करताना जे द्वंद्व अनुभवास येते ते द्वंद्व जर आपण पूर्णतः निसर्गाधीन असतो तरी आले नसते, आणि उलटपक्षी जर आपण पूर्णतः स्वाधीन असतो तरी आले नसते. स्वातंत्र्य म्हणजे मुक्ती नव्हे; तर स्वातंत्र्य म्हणजे बंधनातील वाव वापरून नव्या प्रसंगीच्या बंधनांची निवड करण्याची/तसा कौल देण्याची संधी (किंवा कौल देण्याचे संकट) होय. ही मानवी स्थिती, भौतिक खुलासा होऊ शकण्याचे टळत नसते व एकेकाळी भौतिक खुलासा नव्हता, म्हणून ती उद्भवली होती, असेही नाही.
अनुल्लंघ्य नियमबद्धता म्हणजे आधीच ‘लिहून’ ठेवलेले.कथानक नव्हे.
टळलेल्या, टाळलेल्या वा सोडून द्याव्या लागलेल्या, म्हणजेच, प्रत्यक्षात न आलेल्या शक्यता या अस्तित्वातच नसतात, कारण त्या होत्या तेव्हा केवळ ‘शक्यता म्हणून’ होत्या व आता त्या ‘शक्यता म्हणून ही शिल्लक नाहीत. हा एक फसवा युक्तिवाद आहे. केलेली निवड हा इतर विकल्पांचा त्याग असतो, पण त्यामुळेच ती काहीएक किंमत देऊन केलेली निवड असते. सोडलेले लाभ वा टाळलेली हानी यांचे मूल्य खरे असते. कारण त्यांच्याशी तुलना केल्याशिवाय माणसाला त्याने केलेली निवडही मूल्यवान वाटणारच नसते. मूल्य ही निसर्गविज्ञानाची विषयवस्तूच नव्हे. त्यामुळे जड-जगातल्या घटना म्हणून जरी त्या कधीच घडलेल्या नसल्या तरी जीवनचरित्रात त्या ‘न घडलेल्या’ म्हणून असतातच. नियतिवादी मंडळी भूतकाळ आणि भविष्यकाळ यांच्यात जी असममिती आहे तिचा गैरफायदा घेतात. ज्या अर्थी घडले आहे त्या अर्थी त्यासाठी पुरेशी कारणे उपस्थित होतीच, व ज्या अर्थी पुरेशी कारणे उपस्थित होती त्या अर्थी ते घडणारच होते. यातून “जे व्हायचे असते ते झाल्याशिवाय राहत नाही” या लाडक्या मताप्रत ते पोहोचतात. मी उलट असा प्रश्न विचारतो की ‘घडणारच असणे’ या क्रियापदाचा ‘काल’ कोणता. भूतकाळात ज्या अर्थी ते घडले नव्हते त्या अर्थी पुरेशी कारणे जमा झालेली नव्हती म्हणजेच ते घडणारच होते असे नाही. आता ते घडणारच असणे शक्यच नाही कारण ते अगोदरच घडलेले आहे. आणि प्रत्यक्ष घडत होते तेव्हा ते घडणार-असणारे नसून घडत-असलेले असणार. त्यामुळे घडणारच असणे हे कोणत्याच काळात नसते.
एखादी अगदी निरपवादपणे नियमबद्ध अशी व्यवस्था असली तर त्या व्यवस्थेत नव्या व वेगळ्या अश्या काही घटनाच घडू शकत नाहीत असे मानायचे काय कारण आहे?
निसर्ग हा कारणबद्ध असण्याने त्यात विकल्पच राहणार नाहीत हे म्हणणे खोडून काढायला फार वरच्या दर्जाचे सिद्धान्तन अजिबात आवश्यक नाही. एकाच संवेगाने (मोमेंटमने) सोडलेले तोफगोळे हे दोन मार्गांनी (क्वाड्रेटिक इक्वेशन ला दोन उत्तरे असल्याने) जाऊ शकतात व यामुळे तटावरून पलीकडे मारा करणारी उखळी तोफ आणि तटावर मारा करणारी कुल्पी तोफ हे विकल्प असतात एवढेच उदाहरण यासाठी पुरेसे आहे.
निसर्गनियम हे कितीही समजले तरी नुसत्या नियमांपासून प्रत्यक्ष घटितांची भाकिते करता येत नाहीत. कोणताही नियम जर वापरायचा असेल तर त्यात ‘आरंभिक स्थिती’ (इनिशियल कंडिशन्स) दिलेल्या असाव्या लागतात आणि या ‘आरंभिक स्थिती’ नेहमीच ‘ऐतिहासिक’ असतात. पृथ्वीवर पाणी आहे हे एक आपातिक (कंटिजंट) तथ्य आहे. पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर हेही एक आपातिक (कंटिंजंट) तथ्य आहे. अशा अनेक ‘दिलेल्या गोष्टी’ घेऊनच विज्ञान मांडावे लागते.
मेंदूघटित, भावघटित
मेंदू जड-जगातलाच असला तरी मानवी भावविश्व हे जड म्हणून उलगडता येणारे नाही. जसे सजीव हा वस्तूही असतो पण वस्तूचे नियम त्याला पुरेसे नसतात.
जेव्हा जेव्हा साध्या घटकांपासून उच्चतर पातळीवरचा संघात (कॉम्पोझिट) बनतो तेव्हा तेव्हा त्या संघाताला असे काही उद्भूत-गुण (इमर्जन्ट प्रॉपर्टीज्) लाभतात की, जे निम्नतर घटकांच्या गुणांत घटविता येत नाहीत. तरीही ते तसे घटविण्याचा अट्टहास म्हणजे निम्नघटनवाद (रिडक्शनिझम) होय. विज्ञानाने विश्लेषण करायचे असते निम्न-घटन नव्हे. यामुळेच कारणमीमांसा ही कितीही केली तरी ती प्रयोजनमीमांसेची जागा घेऊ शकत नाही.
वरिष्ठ – “अरे काल माझी बी पी ची गोळी घ्यायची राहून गेली होती, त्यामुळे मी तुझ्यावर जास्तच भडकलो.”
कनिष्ठ – “चालायचंच साहेब. पण मी जो मुद्दा मांडला होता तो तुम्हाला आता पटतोय की नाही?”
साहेबाच्या क्रोधाची मात्रा (डिग्री) अनाठायी का होती याची कारणमीमांसा मिळाली, पण क्रोधाचा आशय योग्य होता की अयोग्य याचे उत्तर मात्र असे ‘मनो-वैग्यानिक’ (हिन्दी) असून चालणार नाही. आशयासाठी प्रयोजनमीमांसाच लागेल. कनिष्ठ सुचवत होता तो मार्ग कंपनीच्या उद्दिष्टांशी जास्त सुसंगत होता काय? कंपनीची उद्दिष्टेच चुकत होती की काय? ही प्रश्न-मालिका ‘कशासाठी’ची प्रश्न-मालिका आहे. ती ‘कशामुळे’च्या भाषेत बोलताच येणार नाही.
उदाहरणार्थ स्वतःच्या प्राणांचे बलिदान करावयास तयार असणाऱ्यांचा मनःपिंड हा एका प्रकारचा असेल व तो तसा का बनला याची कारणे जमेल तितकी शोधताही येतील. पण ज्या प्रयोजनासाठी हे बलिदान दिले जात आहे ते प्रयोजन मानव-हिताचे आहे किंवा कसे याचे उत्तर कधीच “मनःपिंड असा का बनला?” यांच्या कारणांमध्ये सापडणार नाही. हे दोन विषयच, किंबहुना आयामच अगदी वेगळे आहेत..
कारणमीमांसा उपलब्ध होण्याने मूळ अनुभवाच्या स्वरूपात फारसा फरक पडत नाही. पहिल्या पावसात येणारा मातीचा सुगंध हा विज्ञान म्हणून पाहता, जे उष्णतेतच व कोरड्या स्थितीतच जगू शकतात असे जीवाणू मरून त्यांचा प्रेतांचा जो दुर्गंध(!) पसरतो, तो असतो. पण हे ज्यांना समजले आहे त्यांचाही अनुभव सुंदरच राहतो.
हिरा शुद्ध कार्बनच असतो, जसे की ग्राफाईट असते. पण हे कळल्याने हिऱ्याचे आकर्षण कमी होत नाहीच उलट टेट्राहेड्रॉन रचनेमुळे येणारे काठिण्य आणि षटकोनी पातळ्यांमुळे येणारी मृदुता समजण्याने दोन्हीची अद्भुतता अधिकच खुलून दिसते. या संदर्भात आपण रिडक्शनिझमने केलेला मोठा दावा तपासून पाहिला पाहिजे. तो दावा असा की, आपल्या जाणिवेत घडणारे कोणतेही भाव-घटित हे दुसरे तिसरे काही नसून मात्र एक मेंदूघटितच असते.
भावविश्वाची स्वायत्तता आणि त्याचे मेंदू-विज्ञानात न मावणे
कोणत्याही अगदी साध्या भाव-घटिताशी समकक्ष (कॉरस्पॉडिंग) असे बरेच गुंतागुंतीचे काही ना काही मेंदू-घटितसुद्धा अस्तित्वात असणार, ही गोष्ट मान्य करता येण्याजोगी आहे. इतकेच नव्हे तर जर कोणाला आपली मेंदू-घटिते नियंत्रित करता आली तर त्यांद्वारे तो हुकूमशहा आपल्या भाव-घटितांवरही नियंत्रण मिळवू शकेल, अशीही कल्पना करता येईल. पण हुकूमशहा-नियंत्रित असोत वा निसर्ग-नियमित आपली भाव घटिते ही त्यांच्या ‘मागील’ मेंद-घटितांपासन अगदीच भिन्न स्वरूपाची असतात हे कधीच विसरून चालणार नाही.
नॉर्मल माणसांचा मेंदू कसकसा विकसित होतो यातही रचना आणि कार्य यांच्या अगदी भिन्न जुळण्या संभवतात. मनाचे अमुक एक कार्य हे माझा मेंदू ज्या हार्डवेअर मार्गाने साधतो त्यापेक्षा अगदीच वेगळ्या हार्डवेअर मार्गाने तेच कार्य तुमचा मेंदू साधत असेल पण यांचा प्रत्यय आपल्याला कधीच येणार नाही. कारण युजर फ्रेंडली पातळीवरच आपल्याला मनाचा अनुभव येतो, मशीन-लँग्वेजमध्ये नव्हे. तसेच माझ्या हाताने ठोसा मारला, मी नव्हे असे म्हणणे आणि माझ्या मेंदूने मत्सर केला, मी नव्हे असे म्हणणे हे आपले एकूण अस्तित्व फक्त जड-वस्तूंच्या विश्वात ढकलणेच ठरेल. इतकेच काय पण माझा लाल/हिरवा हा तुमच्या लाल/हिरव्या पेक्षा प्रत्यय म्हणन वेगळाही अस शकतो. जोवर आपण पानासारखा सिग्नल हा “जा’ या अर्थाने व रक्तासारखा सिग्रल हा “थांबा’ या अर्थाने घेतो तोवर आपण भावविश्व शेअर करतो. समजा दोन चिंतातर आहेत. एकाची अति-चिंता एका औषधाने तर दुसऱ्याची अतिचिंता ही दुसऱ्या औषधाने आटोक्यात येऊ शकते. पण दोघांच्या चिंतांचे आशय, हे समान असतील की भिन्न? हे त्यांना समान औषध लागू पडते की भिन्न, यावर अजिबात अवलंबून नसते. चिंतांचे आशय हे भाव-विश्वातल्या घटितांवर अवलंबून असतात. मेंदू-विश्वातल्या घटितांवर नव्हे.
आपल्याला जेव्हा विराटाचा अनुभव येतो तेव्हा समकक्ष मेंदू-घटित मात्र कवटीत मावणारे व म्हणून उघडच अ-विराट असणार. ‘निळ्या रंगाच्या अनुभवाचे’ समकक्ष मेंदूघटित हे काही ‘निळ्या रंगाचे’ असणार नाही. तसे काय एकेक रंग ही खरेतर एकेक फ्रिक्वेन्सीच असते असे म्हणून रंगांचे रंग-पण जाणार आहे काय? रातराणीचा सुगंध जी मोहक अस्वस्थता आणतो, ती तो का आणतो यावर घनघोर संशोधन करून कोणत्या चेतापेशीत काय घडते हे सांगितलेच तर फारतर त्याचा उपयोग एखादे कृत्रिम अत्तर बनविण्यास होईल, अस्वस्थतेचे काय करायचे, याचे उत्तर मात्र मिळणार नाहीच! मानवाची उत्क्रान्ती आणि रातराणीची उत्क्रान्ती यातील ‘भाव-घटित-बाह्य’ कारणमीमांसा करून कोणी खुलासा केलाच तर ती अस्वस्थता ‘रातराणी’ याच प्रकारची असणार. त्याचे सी टी ए जी मधील वर्णन काही सुगंधी/अस्वस्थ करणारे असणार नाही.
इतकेच नव्हे तर आपण मेंदू-विज्ञान विकसित करीत आहोत त्यातील गोष्टीसुद्धा भावघटिते या स्वरूपातही आपल्या भाव-विश्वात सामील होत चालल्या आहेत. पण त्या ‘गोष्टी’सुद्धा स्वतःसारख्या असत नाहीत. उदा. सायनॅप्सचे ज्ञान काही खुद्द सायनॅप्स मध्ये स्टोअर होत नसते किंवा सायनॅप्सच्या आकृतीचा मेंदूतील ठसा हा सायनॅप्सच्या आकृतीसारखा असत नाही. सिरोटोनिन, डोपामिन इत्यादी घटत चालले असल्याची घटना आपल्यावर डिप्रेशन या स्वरूपात आदळते. डिप्रेशनग्रस्त जाणीव कोणाला “मीच जगायला नालायक आहे”, अशी होते तर कोणाला “जग हेच माझ्या लायकीचे नाही” अशीही होऊ शकते, हे आशय भावविश्वातलेच असतात, मेंदूविश्वातले नव्हेत. पण मेंदूतील रासायनिक वाहकांबाबत जर ज्ञान असले तर “आता जरी मला निरर्थक वाटत असले तरी खरे म्हणजे जीवन निरर्थक नाही. मी जर उपचार घेतले तर ‘अर्थपूर्ण वाटणारा मी’ अजूनही माझ्यातच पुन्हा उभा राहू शकेल. मुख्य प्रश्न रसायने कमी पडत आहेत हा आहे” अशी जाणीव होईल. पण बऱ्या झालेल्या डिप्रेशनवाल्याला कशात सार्थक वाटेल हे मात्र सिरोटोनिन/डोपामिन च्या भाषेत सांगता येणार नाही. सारांश आपली कोणतीही भाव घटिते ही मेंदू-घटितांपासून भिन्न स्वरूपाचीच राहतात.
जेव्हा माझा मेंदू बंद पडेल तेव्हा माझ्यापुरती मानवी भाव-विश्वाची ‘मी’ विशिष्ट-आवृत्ती विझेल, पण शेवटच्या क्षणीसुद्धा माझे तोवरचे आत्मचरित्र हे भाव-घटित स्वरूपातच असेल. ते कधीच ‘मेंदू-घटितांबाबतच्या वस्तुनिष्ठ निरीक्षणांचा अहवाल’ असणार नाही.
टीप : याविषयावरील तत्त्वज्ञान समजण्यासाठी सखोल वाचन करायचे असल्यास काही ग्रंथ पुढे सुचवत आहे.
1. फिनॉमिनॉलॉजी ऑफ पर्सेप्शन – मॉरिस मेर्लोपॉन्ति 2. फ्रीडम ॲण्ड नेचर – पॉल रिकर
3.एल्बो रूम- डॅन डेनेट 4. कन्सेप्ट ऑफ माइंड – गिल्बर्ट राईल

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.