गिल्बर्ट राईल (1900-76) हे एक ब्रिटिश विश्लेषणवादी तत्त्वचिंतक. ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांनी तत्त्वज्ञानाच्या अध्यापनाचे कार्य केले. ‘Mind’ या जगप्रसिद्ध तत्त्वज्ञानाशी निगडित जर्नलचे संपादक जी.ई.मूर या विश्लेषणवादी तत्त्वचिंतकानंतर त्यांनी भूषविले. तत्त्वज्ञानावर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. विशेषतः 1949 साली त्यांनी लिहिलेल्या ‘Concept of Mind’ या पुस्तकामुळे त्यांचे नाव आणि विचार चर्चेत आले. साधारणपणे 1950-60 या दशकात ब्रिटिश तत्त्वज्ञानावर त्यांचा प्रभाव राहिला. विश्लेषणवादी तत्त्वज्ञान हे 20 व्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात रसेल आणि मूर या दोन तत्त्वचिंतकांच्या प्रभावातून चळवळीच्या स्वरूपात उदयास आले. या तत्त्वचिंतकांवर मुख्यतः वैज्ञानिक ज्ञान व पद्धती याचे स्वरूप आणि त्यामुळे वैज्ञानिक ज्ञानाला प्राप्त होणारी नि:संदिग्धता, ही अचूकता, नेमकेपणा या गुणांचा प्रभाव होता आणि तत्त्वज्ञानालाही असे स्वरूप प्राप्त कसे करता येईल या दृष्टीने हा विचारप्रवाह प्रयत्नशील होता. विश्लेषणवादी तत्त्वज्ञानाच्या चळवळीने तत्त्वज्ञानाने भाषिक वळण घेतले (linguistic turn) असे या चळवळीच्या तत्त्वज्ञानाच्या स्वरूपावरील परिणामाचे वर्णन केले गेले. विश्लेषणवादी तत्त्वज्ञानातही भाषेच्या संदर्भात दोन प्रमुख विचारप्रवाह होते. एका प्रवाहाच्या मतानुसार तत्त्वज्ञानातील समस्यांचे निरसन आदर्श भाषेची रचना करून करता येईल तर दुसऱ्या विचारप्रवाहाच्या अनुसार आपली दैनंदिन व्यवहारातील भाषा ही समृद्ध आहे; आपल्याला तिच्या उपयोगातून गोष्टी जाणून घेताना काही एक अंतर्दृष्टी देत असते. फक्त बऱ्याचदा तिचा उपयोग करत असताना त्या उपयोगाचे विशिष्ट तर्कशास्त्र जाणून न घेतल्यामुळे तत्त्वचिंतक गल्लत करतात आणि त्यांतून काही तात्त्विक प्रश्नांची निर्मिती होते. राईल या दुसऱ्या विचारप्रवाहाशी निगडित होते.
या लेखात आपण राईल यांनी ‘Concept of Mind’ या पुस्तकात मनाचे स्वरूप, मनोव्यापार, शरीर-मन संबंध यांविषयी व्यक्त केलेल्या विचारांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. सामान्य माणूस, विविध क्षेत्रांशी निगडित विद्वान यांच्यावर कळत नकळत वैचारिक परंपरेतील काही कल्पना, विचार, दृष्टिकोण यांचा परिणाम होत असतो. या कल्पना, विचार ग्राह्य मानूनच सामान्य माणूस तसेच विद्वज्जन आपला व्यवहार अथवा अभ्यास करीत असतात. या विचार, कल्पनांकडे चिकित्सकपणे पाहण्याचा विचार अथवा आवश्यकता आपल्याला भासत नाही. राईल यांच्या मते मन, मनोव्यापार आणि शरीरमनसंबंध यांविषयीच्या आपल्या कल्पना, विचार, दृष्टिकोण या प्रकारात येतात. देकार्त यांनी मांडलेल्या शरीर मनसंबंधाविषयीच्या सिद्धान्ताची चिकित्सा राईल यांनी ‘Concept of Mind’ या पुस्तकात केली आहे. ही चिकित्सा तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोणातून तर महत्त्वपूर्ण आहेच पण सामान्य माणसालाही त्याच्या असलेल्या काही धारणा, समज यांबाबतीत सजग बनविणारी आहे आणि भाषिक व्यवहाराकडे डोळसपणे पाहायला प्रवृत्त करणारी आहे.
Concept of Mind’ या पुस्तकात राईल देकार्त यांनी शरीर-मन स्वरूपाविषयी मांडलेल्या आणि नंतर कार्टेशिअन परंपरा या नावाने प्रचलित असलेल्या दृष्टिकोणाला ‘अधिकृत सिद्धान्त’ असे नाव देतात. या अधिकृत सिद्धान्ताचे वर्णन ते शरीर-मनाविषयीची द्वैतवादी मांडणी असे करतात. पुस्तकात या अधिकृत सिद्धान्ताची मांडणी राईल यांनी आपल्या खास शैलीत केली आहे. हा सिद्धान्त जर आपण स्वीकारला तर या सिद्धान्तातून निष्पन्न होणाऱ्या कल्पना, विचार, दृष्टिकोण ही आपण स्वीकारतो असा त्याचा अर्थ होईल याची आपल्याला जाणीव करून देऊन हा अधिकृत सिद्धान्त नाकारणे का आवश्यक आहे याची ते खलासेवार मांडणी करतात. उदाहरणांच्या सहाय्याने त्यांनी केलेली ही अधिकत सिद्धान्ताची चिकित्सा तात्त्विक विश्लेषणाचा उत्तम नमुना म्हणून खरोखरच मुळातून वाचण्याजोगी आहे. आणि आधी म्हटल्याप्रमाणे आपल्याला आपल्या काही धारणा, समज तपासून पाहण्यास प्रवृत्त करणारी आणि भाषिक व्यवहाराविषयी काहीशी चिकित्सक बनविणारी आहे.
राईल यांच्या मतानुसार अधिकृत सिद्धान्त सामान्य माणूस, तत्त्वचिंतक, मानसशास्त्रज्ञ, धर्मोपदेशक अशा विविध स्तरावरील लोकांमध्ये प्रचलित आहे. या सिद्धान्तानुसार वेडी माणसे आणि आपण तान्ही बाळे यांचा अपवाद वगळता – 1) प्रत्येक माणसाला शरीर आणि मन दोन्हीही असते. 2) शरीर आणि मन सामान्यतः एकत्रितरीत्या नियंत्रित केले जाते. 3) (2)शरीराच्या मृत्यूनंतर कदाचित् मन अस्तित्वात राहू शकते आणि कार्य करू शकते. राईल हा सिद्धान्त पूर्णतः नाकारतात. हा सिद्धान्त जर आपण स्वीकारला तर त्या अनुषंगाने आपण काय काय नकळतपणे स्वीकारत असतो याचे ते दिग्दर्शन करतात.
अधिकृत सिद्धान्तानुसार मानवी शरीर अवकाशात (space) अस्तित्वात असते आणि अवकाशात अस्तित्वात असणाऱ्या इतर भौतिक वस्तूंप्रमाणे यांत्रिकनियम (me chanical laws) मानवी शरीराचे कार्य/व्यापार निर्धारित करीत असतात. प्राणी, पक्षी, झाडे यांच्याप्रमाणे माणसाच्या शारीरिक प्रक्रिया, अवस्था यांचेही अवलोकन बाह्य निरीक्षक करू शकतात. म्हणजेच माणसाचे शारीरिक जीवन ही एक सार्वजनिक क्रिया-प्रक्रिया आहे. शारीरिक जीवनाच्या अनुषंगाने जेव्हा आपण मनाबद्दलचा विचार करू लागतो. तेव्हा अधिकृत सिद्धान्त असे कथन करतो की मानवी मन अवकाशात अस्तित्वात नसते. तसेच मनोव्यापारांचे नियमनही यांत्रिक नियमांच्या कक्षेत येत नाही. एका व्यक्तीच्या मनात चालू असणाऱ्या क्रिया-प्रकियांचे बाह्य निरीक्षक साक्षी नसतात म्हणजे बाह्य निरीक्षकाला या मानसिक प्रक्रिया निरीक्षणासाठी साक्षात् उपलब्ध नसतात तर व्यक्तीच्या हावभाव, शारीरिक हालचाली इत्यादींच्या आधारे तिच्या मनात काय चालले आहे याचे फक्त इतरांना अनुमान करता येते. म्हणजेच फक्त ती ती व्यक्तीच तिच्या मनातील क्रिया-प्रक्रियांच्या साक्षात् दखल घेऊ शकते. अधिकृत सिद्धान्ताची ही मांडणी योग्य आहे असे जर आपण मानले तर अधिकत सिद्धान्ताच्या पुरस्कर्त्यांप्रमाणे आपल्यालाही असे मानावे लागेल की जगात दोन प्रकारची अस्तित्वे अथवा अस्तित्वांचे स्तर आहेत. जे जे असते अथवा घडते ते ते एकतर भौतिक स्वरूपाचे अस्तित्व असते/असू शकते अथवा मानसिक स्वरूपाचे अस्तित्व असते/अस शकते. भौतिक स्वरूपाच्या अस्तित्वाचे हे आवश्यक लक्षण असते की ते काल आणि अवकाशात अस्तित्वात असते. मानसिक स्वरूपाचे अस्तित्व हे कालात अस्तित्वात असते पण अवकाशात अस्तित्वात असू शकत नाही. जे जे भौतिक स्वरूपाचे असते ते ते एका जड तत्त्वाचे बनलेले असते अथवा जड तत्त्वाचे कार्य या स्वरूपाचे असते आणि जेजे मानसिक स्वरूपाचे असते ते ते जाणीवरूप असते अथवा जाणिवेचे कार्य या स्वरूपाचे असते. याचाच अर्थ असा होतो की मानवी शरीर आणि मन या दोन भिन्न स्वरूपाच्या, अलग वस्तू असून त्यांच्या स्वरूपात टोकाचा विरोध असतो. म्हणजेच अधिकृत सिद्धान्त असे सुचवितो की आपल्या अनुभव विश्वात भौतिक वस्तू आणि मानसिक वस्तू अशा दोन भिन्न प्रकारच्या वस्तू समाविष्ट असतात. मानवी अस्तित्व शरीर आणि मन या दोन भिन्न वस्तूंचे बनलेले असते. शारीरिक प्रक्रियांमध्ये यांत्रिक नियमांनी निर्धारित होणारा कार्यकारणात्मक संबंध असतो आणि शारीरिक व मानसिक प्रक्रियांमध्ये जो आंतर-संबंध घडून येत असतो, त्याचे स्वरूपही कार्यकारणात्मक असते. कधी शारीरिक प्रक्रिया/अवस्था हे मानसिक प्रक्रिया/अवस्था याचे कारण असते तर कधी मानसिक प्रक्रिया/अवस्था शारीरिक प्रक्रिया/अवस्थेचे.
राईल यांच्या मतानुसार अधिकृत सिद्धान्त पूर्णतः चुकीचा आहे ही चूक (प्रमाद) तपशिलाबाबतची नसून तत्त्वाबाबतची आहे. या चुकीला त्यांनी कोटिप्रमाद (Category Mistake) असे खास नाव दिले आहे. अधिकृत सिद्धान्त कोटिप्रमाद करतो असे त्यांचे मत आहे. कोटिप्रमाद म्हणजे काय याचे विवेचन तर त्यांनी केले आहेच, पण हा प्रमाद कसा आणि का घडतो याची काही उदाहरणे देऊन त्यांनी स्पष्टीकरण केले आहे. त्यांपैकी एखादे उदाहरण आपण तपशिलाने मांडू या; फक्त त्याची मांडणी करत असताना आपण ती थोडी आपल्या सोयीनुसार करू या..
एक पाहुणा प्रथमच पुणे विद्यापीठाला भेट द्यायला आला आहे. त्याने विद्यापीठाचे संपूर्ण आवार फिरून पाहिले. जिथे काही विभागांच्या इमारती, कार्यालयाच्या इमारती, वाचनालय, कॅण्टीन, बागा, प्राध्यापक निवास, आयुका, आरोग्यकेंद्र अशी अनेक ठिकाणे काही प्रत्यक्ष जाऊन, काही जाता जाता त्यांनी पाहिली. कुलगुरूंचे कार्यालय, विविध विषयांचे अभ्यासाचे वर्ग, शिक्षकांच्या खोल्या, प्रयोगशाळा इथेही त्यांनी प्रत्यक्ष भेट दिली. पण नंतर त्या पाहुण्यांनी त्यांच्याबरोबर हे सर्व दाखविण्याऱ्या व्यक्तीला असे विचारले की मी तुम्ही दाखविलेले सर्व अगदी व्यवस्थित फिरून पाहिले पण तुम्ही मला विद्यापीठ कुठे आहे हे कुठे दाखविले? पाहुण्यांचा हा प्रश्न त्या व्यक्तीला गोंधळवून टाकेल. तिला असे वाटेल की मी जे पाहुण्यांना सर्वत्र फिरून दाखविले त्या इमारती, ती कार्यालये, चालू असलेले अध्यापन, अध्ययनाचे काम, चालू असलेले प्रयोग, कार्यालयीन व्यवहार, हे सगळे एकत्रित म्हणजेच तर विद्यापीठ, या सर्वांहून वेगळे असे अलगरीत्या विद्यापीठ म्हणून काही अस्तित्वात असते/असू शकते का? आणि हा सर्व विचार त्या व्यक्तीला पाहुण्याला समजावून सांगावा लागेल की जरी भाषिक व्यवहारात आपण विद्यापीठ हा शब्दप्रयोग करत असलो आणि विद्यापीठातील इमारती, विभाग असे वर्णनपर शब्द वापरत असलो तरी प्रत्यक्षात विद्यापीठ म्हणून भिन्न, अलग असे काही अस्तित्वात असत नाही. विद्यापीठ म्हणून काहीतरी भिन्न, अलग असे अस्तित्वात आहे असे मानणे म्हणजे कोटिप्रमाद करणे.
राईल यांच्या मते या उदाहरणामध्ये कोटिप्रमाद घडला आहे. असा प्रमाद अशा लोकांकडून घडतो ज्यांना विद्यापीठासारख्या शब्दांचा अथवा शब्दरचनांचा प्रयोग अर्थपूर्णरीत्या कसा करायचा याचे ज्ञान नसते.
या उदाहरणाद्वारा राईल असे सिद्ध करू पाहतात की अधिकृत सिद्धान्ताचा द्वैतवाद अथवा दोन समांतर जीवनविषयक उपपत्ती ही कोटिप्रमादामुळे निष्पन्न होते. शरीर-मन यांबाबत कोटिप्रमादाची शक्यता का निर्माण होते याचे ते विवेचन करतात. व्यक्तीचे विचार, भावना, हेतुपूर्ण कृती यांचे पूर्णतः वर्णन भौतिक, रसायन आणि शरीरविज्ञानाच्या परिभाषेत करता येणे शक्य नाही म्हणून त्यांचे वर्णन त्याच प्रकारच्या दुसऱ्या परिभाषेत केले गेले पाहिजे, या धारणेतून हा प्रमाद घडतो. ज्याप्रमाणे मानवी शरीर ही एक व्यामिश्र व्यवस्था असलेले एकक आहे. त्याचप्रमाणे मन हे ही एक दुसऱ्या प्रकारची व्यामिश्र व्यवस्था असलेले एकक आहे असे मानायचे. जरी दोन्हीही एककांचे घटक आणि संरचना भिन्न प्रकारच्या असल्या तरीही शरीर हे जसे कार्यकारणाचे एक क्षेत्र आहे, तसेच मनही दुसऱ्या स्वरूपाच्या कार्यकारणाचे क्षेत्र असते असे मानायचे. असे करत असताना हा सिद्धान्त शारीरिक आणि मानसिक यांतील फरक वस्तू, गुणधर्म, अवस्था, प्रक्रिया, बदल (परिवर्तन), कारण, कार्य या संकल्पना कोटींच्या सामायिक चौकटींच्या अंतर्गत असलेला फरक म्हणून सादर करतो. थोडक्यात मन ही एक वस्तूच आहे पण शरीरापेक्षा वेगळ्या प्रकारची वस्तू आहे, असे म्हणत एका बाजूस त्यांच्यातील भिन्नत्वाला अधोरेखित करीत दुसऱ्या बाजूला त्यांना वस्तू या एकाच संकल्पनाकोटी प्रकारचे म्हणून गणले जाते. याच धर्तीवर ते मानसिक प्रक्रियांमध्येही कार्यकारणात्मक संबंध आहे, पण शारीरिक प्रक्रियांतील कार्यकारणसंबंधापेक्षा वेगळ्या प्रकारचा संबंध आहे असे म्हणत भिन्नत्व दर्शवीत पुन्हा दोन्हीचीही गणना एकाच प्रकारच्या संकल्पना कोटीत करतात. ज्याप्रमाणे पाहुण्यालाही विद्यापीठ हे इमारत, कार्यालय इ.पेक्षा भिन्न आणि अलग अस्तित्वात असले पाहिजे असे वाटत असते त्याचप्रमाणे अधिकृत सिद्धान्ताच्या पुरस्कर्त्यांनाही मन, मानसिक प्रक्रिया या शरीर, शारीरिक प्रक्रिया यांच्यापेक्षा भिन्न स्वरूपाच्या असल्यामुळे त्यांना अलग अस्तित्व असले पाहिजे असे वाटते. पण अलग अस्तित्वाची मांडणी करत असताना मात्र या अस्तित्वाला शरीराप्रमाणेच वस्तू, गणधर्म या समान संकल्पनाकोटींच्यामध्ये असलेले अस्तित्व, असे मानल्यामुळे जे जे शरीर आणि शारीरिक प्रक्रियांबाबत संभवते ते ते मन आणि मानसिक प्रक्रियांबाबतही संभवत असले पाहिजे असे ते मानून चालतात.
अशा प्रकारचा कोटिप्रमाद का घडला असेल याची मीमांसा करताना राईल असे सुचवितात की जेव्हा गॅलिलिओ या वैज्ञानिकाने असे निदर्शनास आणून दिले की त्यांची वैज्ञानिक संशोधनाची पद्धती ही यंत्रवादी उपपत्ती मांडण्यासाठी सक्षम आहे; ही उपपत्ती ज्यांनी ज्यांनी अवकाश व्यापले आहे अशा प्रत्येक अस्तित्वाला लागू होईल/होऊ शकेल; तेव्हा देकार्त या तत्त्वचिंतकाच्या मनात दोन परस्परविरोधी प्रेरणांमध्ये संघर्ष झाला असला पाहिजे. एक वैज्ञानिक म्हणून यंत्रवादी उपपत्तीचे दावे त्यांना मान्य होते. पण एक धार्मिक आणि नैतिक विचारवंत म्हणून हॉब्ज या तत्त्वचिंतकाप्रमाणे यंत्रवादी उपपत्तीचा पूर्णतः स्वीकार मनाच्या बाबत करण्यास ते राजी नव्हते म्हणून त्यांनी दुसरा पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला. हा पर्याय शोधताना त्यांनी मन आणि मानसिक प्रक्रिया हे यांत्रिक नियमांच्या कक्षेत येत नाही असा दावा जरी एका बाजूला केला तरी दुसऱ्या बाजूला शरीर या भौतिक रचनेप्रमाणे आणि त्यात चालू असलेल्या परस्परांशी संबंधित प्रक्रियांप्रमाणेच मनही एक जणू काही शरीराप्रमाणेच एक परस्परांशी संबंधित मानसिक प्रक्रियांची बनलेली मानसिक रचना आहे असे मानले. आता प्रश्न असा उद्भवतो की ही रचना म्हणून जर अस्तित्वात आहे तर ते अस्तित्व आहे कुठे? हे अस्तित्व तर नेमके मानवी व्यक्तींमध्ये कुठे आहे हे सांगता येत नाही; म्हणूनच या मांडणीचे राईल उपरोधाने ‘यंत्रातील भूत’ (Ghost in the Ma chine) असे वर्णन करतात.
एकदा का आपण दोन वेगळ्या प्रकारच्या अस्तित्वाची मांडणी स्वीकारली की काही महत्त्वाच्या समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते. ही दोन प्रकारची अस्तित्वे म्हणजे जणू काही दोन प्रकारची विश्वे. यांतील जे भौतिक विश्व आहे ते सार्वजनिक आहे, तर दुसरे जे मानसिक विश्व आहे ते खासगी आहे. म्हणजेच भौतिक/शारीरिक व्यवहार, अवस्था इ.चे साक्षात् अनुभवाचे ज्ञान होत असते; पण मनोविश्व हे खाजगी असल्यामुळे त्या विश्वातील व्यवहारांचे ज्ञान इतर व्यक्तींना साक्षात् होऊ शकते का हा तत्त्वज्ञानात्मक प्रश्न निर्माण होतो. या प्रश्नाचा सखोल विचार करत गेल्यास जर आपल्याला इतर मनोविश्वांचे साक्षात ज्ञान संभवत नसेल तर इतर मनोविश्वे अस्तित्वात आहेत/असतात हे मानण्यास आपल्याजवळ काय आधार आहे, असा प्रश्न उपस्थित होऊन इतर मने अस्तित्वात असतात का या तात्त्विक प्रश्नाची निर्मिती होते. ज्यांची पुढे वाटचाल फक्त मी आणि माझे मनोविश्वच खऱ्या अर्थाने अस्तित्वात असते/असू शकते, या सिद्धान्तापर्यंत होऊ शकते. आणि हा टोकाचा सिद्धान्त टाळता यावा म्हणून तत्त्वचिंतक अनेक प्रकारचे पर्याय शोधताना दिसतात. पण राईल यांच्या मते हे पर्याय शोधत असताना अधिकृत सिद्धान्ताची मूळ चौकट कायम राहूनच तिच्यात काही फेरफार सुचविले जातात. राईल स्वतः या मूळ चौकटीलाच धक्का लावू पाहत आहेत आणि अशी चौकट निर्माण होण्याचे कारण त्यांच्या मते भाषिक व्यवहाराचे तर्कशास्त्र नेमकेपणाने न उमजणे, हे आहे.
Concept of Mind या पुस्तकात मांडलेल्या विचारांचे प्रयोजन राईल यांच्या मते माणसाला मनाविषयी लाभलेल्या ज्ञानाचा संकल्पनात्मक/तार्किक भूगोल (conceptual geography) सुधारणे हे आहे. राईल यांना असे वाटते की मनाशी निगडित संकल्पनांचा उपयोग करणे ही एक गोष्ट झाली, तर या संकल्पना परस्परांशी कशा जोडायच्या त्यांच्यात सहसंबंध कसे प्रस्थापित करायचे हे माहीत असणे, ही वेगळी गोष्ट झाली. लोक संकल्पनांचा वापर करून वस्तुस्थितींविषयी अर्थपूर्ण संभाषण करू शकतात पण ते या संकल्पनांच्या उपयोगाविषयी अर्थपूर्ण संवाद साधू शकतीलच असे नाही. सवयीने लोकांना संकल्पनांचा अर्थपूर्ण उपयोग कसा करायचा हे ज्ञान होते, पण अशा प्रकारे उपयोग करण्याविषयी तार्किक नियमने ते सांगू शकतीलच असे नाही. संकल्पनांचा योग्य उपयोग करण्यासाठी संकल्पनांचा भूगोल जाणून घेणे, म्हणजेच त्यांच्या उपयोगाचे कार्यक्षेत्र आणि त्या कार्यक्षेत्रातील संकल्पना परस्परांशी कशाप्रकारे निगडित होऊ शकतात, कशाप्रकारे निगडित होऊ शकत नाहीत, कुठल्या संकल्पनांच्या अर्थाची व्याप्ती नेमकी कुठपर्यंत असते, त्या केवळ कशाचे निदर्शन करतात, की निदर्शन न करता फक्त आशयच सूचित करतात, इ. गोष्टी जाणणे हे आवश्यक आहे. तत्त्वज्ञानाचे हे एक महत्त्वाचे कार्य आहे. संकल्पनांचा तार्किक भूगोल निश्चित करणे म्हणजे ज्या तर्कशास्त्रात विधाने बांधली गेली आहेत ते तर्कशास्त्र प्रकट करणे. कुठले विधान कुठल्या विधानाशी सुसंगत आहे, कुठल्या विधानाशी विसंगत आहे ते दर्शविणे. कुठल्या विधानांतून वैध (योग्य) पद्धतीने कुठली विधाने निष्पन्न होऊ शकतात, कुठली होऊ शकत नाहीत, याची उकल करून दाखविले.
राईल अशी मांडणी करतात की जेव्हा आपण इतर व्यक्तींचे वर्णन करताना मन/ मनोव्यापार यांच्याशी निगडित पदांचा उपयोग करत असतो तेव्हा आपण आपल्याला निरीक्षणासाठी उपलब्ध नसलेल्या आणि म्हणूनच त्याचा पडताळा घेता येणार नाही अशा जाणिवेच्या प्रवाहात घडणाऱ्या घटनांविषयी काही अनुमान करीत नसतो, तर आपण ते लोक त्यांचे प्रमुख सार्वजनिक व्यवहार कसे करत असतात/करू शकतात त्या पद्धतीचे वर्णन करीत असतो. हे अर्थातच बरोबर आहे की असे वर्णन करताना आपण जे पाहिले आहे, ऐकले आहे त्याच्या पलीकडे जातो (going beyond). पण असे जे पाहिले आहे, ऐकले आहे त्याच्या पलीकडे जाणे म्हणजे त्याच्या मागे काहीतरी आहे असे मानून त्याच्यापर्यंत जाणे असे नाही (going behind). काही तरी अनुभवाला उपलब्ध होऊ न शकणाऱ्या गूढ कारणांपर्यंत जाणे असे नाही; तर त्या व्यक्तीचे व्यवहार ज्या क्षमता आणि शक्यतांबाबतचे व्यवहार आहेत/असू शकतात त्यांच्याविषयी विचार करणे. राईल उदाहरणांच्या सहाय्याने आपला मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करतात. ते असे म्हणतात, “बुद्धिबळाची काहीही माहिती नसणाऱ्याने बुद्धिबळाचा खेळ पाहणे आणि बुद्धिबळ या खेळाविषयी माहिती असणाऱ्याने तो खेळ पाहणे या दोन्हीही अनुभवांमध्ये फरक आहे. पहिला नुसताच पाहील तर दुसरा पाहीलही आणि समोर काय चालले आहे हे त्याला समजेलही, त्याला खेळाडू करत असलेल्या चाली, मात यांचे आकलन होईल आणि तो खेळाचा आनंद लुटू शकेल. हे आकलन होते म्हणजे नेमके काय होते, ते कसे घडते, हे प्रश्न या संदर्भात उद्भवू शकतात. राईल यांच्या मताप्रमाणे अधिकृत सिद्धान्ताचे पुरस्कर्ते या प्रश्नाचे उत्तर देताना असे म्हणतील की बुद्धिबळाच्या खेळातील चाल समजणे म्हणजे पटावर खेळाडू ज्या खेळी/हालचाली करीत असतात त्यांच्या आधारे त्या खेळाडूच्या खासगी मनोविश्वात जे मनोव्यापार घडत असतील (जे अर्थातच पाहणाऱ्याला पाहण्यासाठी उपलब्ध नाहीत) त्यांच्याविषयी निष्कर्ष काढणे/अनुमान करणे. पण एका बाजूला या सिद्धान्तानुसार दुसऱ्या व्यक्तीचे मनोविश्व खासगी स्वरूपाचे असल्यामुळे त्या व्यक्तीचे मनोव्यापार व त्यांना नियंत्रित करणारे नियम दुसऱ्या व्यक्तीला कधीच ज्ञात होऊ शकणार नाहीत. या उदाहरणाला अनुसरून राईल आपल्याला असेही सूचित करतात की जर आपण अधिकृत सिद्धान्त स्वीकारला तर आपल्याला असेही स्वीकारावे लागेल, की खेळाडू मैदानावर जे करत असतो ते आपल्याला आकळू शकत नाही. युक्लिड यांनी जे आपल्या पुस्तकात लिहिले आहे ते आपण वाचतो, पण त्या अनुषंगाने त्यांच्या मनात जे काही विचार झाले असतील त्यांची आपल्याला पुसटशीही कल्पना असत नाही/असू शकत नाही. राईल यांच्या मते अधिकृत सिद्धान्ताच्या पुरस्कर्त्यांची ही सर्व विचारप्रक्रियाच आत्मविसंगत (absurd) आहे. राईल यांना असे ठामपणे वाटते की जो बुद्धिबळ खेळू शकतो त्याला इतर खेळाडू काय करत आहेत हे बऱ्यांपैकी समजू शकते. ज्याने भूमितीचा अभ्यास केलेला आहे, त्याला युक्लिड यांची विचारप्रक्रिया/युक्तिवाद यांचे चांगल्यापैकी आकलन होऊ शकतो. असे आकलन होण्यासाठी मानसशास्त्रीय नियमांचे अधिष्ठान असण्याची आवश्यकता नसते. आकलनाची प्रक्रिया म्हणजे दुसऱ्यांच्या बाह्य कृतींच्या आधारे त्यांच्या मनात काय घडते आहे यांविषयीचा अंदाज बांधणे अथवा अनुमान करणे असे असत नाही. आकलनाची प्रक्रिया ही कसे जाणावे (knowing how) प्रक्रियेशी निगडित आहे. विशिष्ट प्रकारच्या वैचारिक कृती समजण्यासाठी जे ज्ञान आवश्यक असते ते त्या त्या प्रकारच्या कृती समजण्याची क्षमता असण्याशी/प्राप्त करण्याशी निगडित आहे.
राईल यांच्या मतानुसार जेव्हा आपण एखाद्याच्या मानसिक अवस्थेचे विशिष्ट प्रकारे वर्णन करत असतो तेव्हा आपण केलेल्या निरीक्षणाच्या आधारे तिच्या आंतरिक अवस्थेविषयी काही अनुमान करीत नसतो तर केवळ त्या त्या व्यक्तीच्या निरीक्षणक्षम वर्तनाचे वर्णन आणि मूल्यांकन करीत असतो, त्या व्यक्तीच्या वर्तनात आढळून येणाऱ्या पद्धतीविषयी कथन करीत असतो. मनोव्यापारांसाठी वापरले जाणारे शब्द अथवा पदे ही खाजगी अवस्थांची नावे नसतात. या शब्दांचा उपयोग आपण केवळ वर्तनाचे वर्णन करण्यासाठी करीत असतो, आणि तशा प्रकारच्या वर्तनाच्या शक्यता सुचवीत असतो. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला उद्देशून बुद्धिनिष्ठ अशा शब्दाचा प्रयोग करतो तेव्हा अशा प्रकारचा विचार आणि वर्तन करण्याकडे त्याची प्रवृत्ती आहे, एवढेच आपल्याला म्हणायचे असते. म्हणजेच राईल यांच्या दृष्टिकोणानुसार मानस-भाषिक व्यवहार हा एखाद्याच्या मन म्हणून अस्तित्वात असलेल्या अंतर्विश्वाबद्दलचा व्यवहार नसून तो व्यक्तीच्या कृती, भाषा, प्रक्रिया इ. मधून व्यक्त होण्याच्या तिच्या वृत्तिप्रवृत्तीविषयीचा व्यवहार आहे. राईल यांचे असेही मत आहे की, व्यक्तीला जसे तिच्या मनोव्यापारांचे आकलन होऊ शकते तसेच इतर व्यक्तींच्याही मनोव्यापारांचे आकलन होऊ शकते. व्यक्ती जेव्हा तिच्या स्वतःच्या मनोव्यापारांच्या संदर्भात मला पाहिजे, मला आशा आहे, मला आवडत नाही, मी निराश झालो आहे, मला भूक लागली आहे, मला असे वाटते इ. प्रकारची विधाने करीत असते तेव्हा मी तिच्या आत तिला सापडलेल्या/प्राप्त झालेल्या भावना, विचार यांबद्दलची माहिती (report) देत नसते, तर ती तिच्या भावना, विचार प्रकट करत असते. तसेच जेव्हा आपण क्ष रागावलेला आहे असे म्हणतो तेव्हा आपण तो ओरडून बोलू शकेल/बोलेल, वस्तू मोडू शकेल/मोडेल, एखाद्याला मारू शकेल/मारेल असे सुचवीत असतो. क्षच्या जाणिवेच्या प्रवाहातील खासगी प्रक्रियांविषयीची माहिती देत नसतो. राईलचे असे स्पष्ट मत आहे की व्यक्तीला तिच्या मानमिक अवस्थांचे ज्ञान बऱ्याचशा प्रमाणात त्याच प्रकारे होते जसे तिला इतरांच्या मानसिक अवस्थांविषयी होते. माझे माझ्याविषयीचे ज्ञान आणि इतरांविषयीचे ज्ञान यांतील फरक अंशात्मक (of degree) स्वरूपाचा असतो, प्रकारात्मक (of kind) स्वरूपाचा नाही.
थोडक्यात राईल देकार्तप्रतीत द्वैतवादाचे पूर्णतः खंडन करण्याचा प्रयत्न करतात आणि मनोव्यापारासंबंधी तार्किक/तात्त्विक वर्तनवादी भूमिकेचा अंगीकार करतात. मनाच्या तत्त्वज्ञानाच्या संदर्भात राईल यांच्या विचारांचे मोल त्यांच्या मनाविषयीच्या तात्त्विक वर्तनवादी मांडणीपेक्षा त्यांनी देकार्तप्रणीत शरीर-मन द्वैतवादी भूमिकेची चिकित्सा ज्या प्रकारे केली आहे त्यासाठी अधिक आहे. रोजच्या व्यवहारात आपण ‘माझ्या मनात असे चालले आहे’, माझे अंतर्याम मला असे सांगते’ अशा विधानांचा सर्रास उपयोग करत असतो. पण अशा उपयोगामुळे जर आपण खरोखरच ‘अंतर्याम’ ‘मनाच्या आत’ अशा गोष्टींच्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर आपला प्रवास चुकीच्या दिशेने होईल. व्यवहारात असे भाषिक व्यवहार आपण करत असतो आणि अशा व्यवहारातून आपल्याला काय अभिप्रेत आहे हे समोरच्या व्यक्तीलाही उमगत असते. पण अशा भाषिक व्यवहारांच्या आधारे मनाचे अलग अस्तित्व सिद्ध करणारा प्रयत्न टाळायचा असेल तर भाषिक व्यवहारांचे तर्कशास्त्र समजून घेणे गरजेचे आहे; हे राईल यांचे मत नक्कीच स्वीकारावे लागेल.
टिपा:
1) देकार्त (1596-1650) या काळातील फ्रेंच तत्त्वचिंतक. यांना बुद्धिवादाचे आणि आधुनिक तत्त्वज्ञानाचे जनक मानले जाते. त्यांनी शरीर (जडतत्त्व) आणि मन (जाणीव) अशा दोन मूलभूत पदार्थांनी हे जग बनलेले आहे असे मानले. शरीर आणि मन हे स्वतंत्ररीत्या अस्तित्वात असले तरी मानवी व्यक्तिमत्त्वात या दोहोंमध्ये आंतरक्रिया घडून येत असते, असे मत मांडले.
2) भारतीय तत्त्वज्ञानाप्रमाणे पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात, विशेषतः देकार्त या तत्त्वचिंतकाच्या मांडणीत mind, self, soul या संकल्पनांचा उपयोग करताना त्यांच्या आशयात फरक आहे असे मानलेले आढळून येत नाही. बऱ्याचदा हे शब्द ते परस्परांना पर्याय म्हणून वापरताना आढळतात. भारतीय तत्त्वज्ञानात मात्र मन (mind), जीव (self), आत्मा (soul) या संकल्पनांचा उपयोग भिन्न अर्थाने केलेला दिसून येतो.
3) अवकाशात अस्तित्व असणे म्हणजे त्या अस्तित्वाला अवकाशात विस्तार असणे, त्याने काही अवकाश व्यापणे. त्या वस्तूने व्यापलेले अवकाश दुसरी वस्तू व्यापू शकत नाही, असे मत.