आरामखुर्ची आणि प्रयोगशाळा

श्रद्धा, मूल्ये, कर्मकांडे, परंपरा यांचे मूळ व कूळ शोधणे त्यातून ज्ञानाची निर्मिती करणे ही विश्लेषणात्मक फिलॉसॉफीची पद्धती आहे. (पाश्चात्त्य तत्त्वज्ञान या अर्थाने फिलॉसॉफी हाच शब्द सोयीसाठी लेखभर वापरला आहे). फिलॉसॉफीच्या विश्लेषणाच्या पद्धती विकसित होऊ लागल्यामुळे फिलॉसॉफी मानव्यविद्यांपासून दूर जाऊ लागली. संस्कृती व इतिहास यांतून फिलॉसॉफीचा उगम झालेला आहे. या उगमाचा फिलॉसॉफीला विसर पडला की काय असे बऱ्याच जणांना वाटते. फिलॉसॉफीने विज्ञानाच्या पद्धतीला पसंती दर्शविली आहे. वस्तुनिष्ठ सत्याच्या शोधात विज्ञानाकडे जो आत्मविश्वारस आहे त्यात फिलॉसॉफी सहभागी होऊ इच्छिते. खरे पाहता विज्ञान व फिलॉसॉफी यांचे संबंध काही नवीन नाहीत. त्यांत ताणतणाव आहेत, आरोप-प्रत्यारोप आहेत. पण संबंध आहेत. वैज्ञानिक संशोधन हा तर्कबुद्धीचा आदर्श नमुना आहे असे विज्ञानाचे तत्त्वज्ञ मानतात. भौतिकी तसेच जैवविज्ञानातील थिअरीमुळे मेटाफिजिकल विचारांत काही पडसाद उठले आहेत. या पडसादांचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न विज्ञानाचे तत्त्वज्ञ, फिलॉसॉफर्स ऑफ सायन्स, करतात. आजच्या जमान्यात मनाचे तत्त्वज्ञ मेंदू-विज्ञान, उत्क्रान्तिवादी मनोविज्ञान यांतील संशोधनाचे अनुभवाधिष्ठित निष्कर्ष, ‘परसेप्शन’ कसे होते, मनरचनेचे संघटन कसे होते, याबाबत वापरताना दिसतात. बोधनविज्ञानामुळे (कॉग्निटिव सायन्स) फिलॉसॉफी अप्रस्तुत ठरत आहे की काय असा आवाज काही गटांतून ऐकू येत आहे. त्याला कारण आहे; नैतिकता, फ्री विल, धर्म हे विषय परंपरेने फिलॉसॉफीच्या कक्षेत मोडतात. बोधनविज्ञान त्यात संशोधन करत आहे. विचारप्रयोग(‘थॉट एक्सपेरिमेंट्स’) ही फिलॉसॉफीची परंपरागत पद्धती आहे. या पद्धतीवर कडक टीका करण्यासाठी बोधनविज्ञानाचा उपयोग केला जात आहे. फिलॉसॉफीच्या एका गोटातून येणाऱ्या आवाजाचे हे कारण आहे.
विचारप्रयोगात परिकल्पित प्रसंग घेतात. विचार प्रयोग करणारा अंतःप्रज्ञेने (इंट्यूशन) त्याबाबत निर्णय करतो व त्यातून सुविकसित अशी स्पष्टीकरणात्मक थिअरी तयार करतो. विचारप्रयोगाचे हे सुलभ रूप आहे. पण या अंतःप्रज्ञेची मुळे सामाजिक, सांस्कृतिक आणि मेंदूच्या क्रियांमध्ये असतात असे प्रयोगवादी तत्त्वज्ञांचे (एक्सपेरिमेंटल फिलॉसॅफर्स) म्हणणे आहे. त्यासाठी ते पुढील उदाहरण देतात. ‘व्हॉट कॉन्सिटट्यूट्स नॉलेज’? ज्ञान कशामुळे घटित होते? ज्ञानाची घडण कशी होते? हा विश्लेषणात्मक फिलॉसॉफीचा मध्यवर्ती प्रश्न आहे. उत्तर देणारा पूर्व आशियातील का पाश्चात्त्य देशातील यावर या प्रश्नाचे उत्तर अवलंबून आहे. जोनाथन वेनबर्ग हे इंडियाना विद्यापीठात फिलॉसॉफीचे व बोधनविज्ञानाचे सहप्राध्यापक आहेत. शॉन निकॉल्स हे अॅरिझोना विद्यापीठात फिलॉसॉफीचे प्राध्यापक आहेत. स्टीफन स्टिच हे रुटगर्स विद्यापीठात फिलॉसॉफीचे प्राध्यापक आहेत. यांनी वरील उदाहरण दिले आहे.
जोशुआ नॉब (येल विद्यापीठात फिलॉसाफी व बोधनविज्ञानाचे प्राध्यापक) व स्टीफन स्टिच यांनी डिटरमिनिझम-नियतिवाद व नैतिक जबाबदारी संशोधन केले आहे. नियतिवाद व नैतिक जबाबदारी यांच्या परस्पर संबंधांबद्दल लोकांचा निर्णय हा मनोवैज्ञानिक ज्याला अॅफेक्ट म्हणतात, म्हणजे त्याक्षणीचा मूड, भावविकार, मनःस्थिती, यावर अवलंबून असतो. ‘या नियतिवादी जगातील व्यक्तीवर तिच्या कृतींची नैतिक जबाबदारी असते का?’ असा अमूर्त प्रश्न विचारला तर बरेचजण म्हणतील ‘नाही, त्या व्यक्तीवर नैतिक जबाबदारी नाही.’. पण श्रीरंगने त्याच्या प्रेयसीशी संबंध ठेवण्यासाठी बायको मुलांचा खून केला तर मात्र तेच लोक श्रीरंगवर त्याच्या कृत्याची नैतिक जबाबदारी आहे असे म्हणतील. यावरून संशोधकांनी एक निष्कर्ष काढला; तो पुढीलप्रमाणे. अंतःप्रजेतून थिअरी निर्माण करणे ही जी फिलॉसॉफीची पारंपरिक पद्धती आहे तिला ‘डिस्क्रेडिट’ प्राप्त होते. ती अविश्वसनीय ठरते. त्यामुळे आरामखुर्चीतील विचारप्रयोगांची जागा आता प्रयोगशाळेतील प्रयोगांनी घेण्याची वेळ आली आहे, असे प्रयोगवादी तत्त्वज्ञांचे म्हणणे आहे.
तमारा झंबो जेन्डलर या येल विद्यापीठात बोधनविज्ञानाच्या प्राध्यापिका होत्या. आज त्या येल विद्यापीठात फिलॉसॉफीच्या प्रमुख प्राध्यापिका आहेत. दोन्ही विषयांत त्यांचा अधिकार आहे. ‘इंटयूशन, इमॅजिनेशन अँड फिलॉसॉफिकल मेथॉडॉलॉजी’ हे त्यांचे पुस्तके नुकतेच ऑक्सफर्ड युनिवर्सिटी प्रेसने प्रकाशित केले आहे. बोधनविज्ञानाच्या प्रायोगिक पद्धती व फिलॉसॉफीच्या पारंपरिक पद्धती या एकमेकींना समृद्ध करणाऱ्या आहेत, असे गृहीतक त्यांनी या पुस्तकात मांडले आहे.
मानवी वर्तन आणि मन याबद्दलच्या फिलॉसॉफीतील मूलभूत प्रश्नांवर बोधनविज्ञान प्रकाश टाकते. त्याचप्रमाणे आरामखुर्चीतील फिलॉसॉफीची पद्धती ज्ञानापर्यंत कशी घेऊन जाते यावरसुद्धा बोधनविज्ञान प्रकाश टाकते. बोधनविज्ञानातून निघालेल्या निष्कर्षाचा अन्वयार्थ लावण्यास फिलॉसॉफी मदत करते. मानवी मनोव्यापारांचे, मनोजीवनाचे आणखी चांगले आकलन फिलॉसॉफीमुळे होते. या सर्वांचा ऊहापोह त्यांनी या ग्रंथात केला आहे. गॅलिलिओपासून आइनस्टाइनपर्यंत कितीतरी वेज्ञानिकांनी विज्ञानात विचारप्रयोग केले आहेत. तसेच विचारप्रयोग तत्त्वज्ञही करतात. मानवी मनात ‘टॅसिट-नॉलेज’ – मूक किंवा गर्भित ज्ञान असते, जे शब्दांत मांडता येत नाही. विचारप्रयोगात कल्पनाशक्तीचा झोत या गर्भित ज्ञानावर पडून ते ज्ञान उघड होण्याची संभाव्यता असते. त्यामुळे विचारप्रयोगावर टीका करणे हे विज्ञान तसेच फिलॉसॉफी या दोघांसाठी धोकादायक ठरू शकते. प्रयोगशाळा व आरामखुर्ची यांमधील सीमारेषा वाटते तितकी ठळक नसते.
अंतःप्रज्ञेने परिकल्पित घटनांबद्दल घेतलेले निर्णय आणि व्यवहारातील घटनाबद्दल घेतलेले निर्णय, यांमध्ये फरक दिसून येतो. फ्री विल आणि नियतिवाद यांचा अभ्यास करताना हे बोधनाचे असंतुलन प्रकर्षाने आढळून येते; याची चर्चा जेन्डलर यांनी या पुस्तकात केली आहे. या परिकल्पित व व्यावहारिक घटनांबद्दल निर्णय घेताना माणूस संस्करणाच्या दोन मानसिक पद्धती वापरतो. त्याला जेन्डलर यांनी ‘ड्युअल प्रोसेसिंग’ म्हटले आहे. विचारप्रयोगामुळे कधीकधी एकाच प्रश्नाबद्दल परस्परविरोधी अंतःऊर्मी निर्माण होतात. एखाद्या प्रश्नाचा फिलॉसॉफीच्या पद्धतीने शोध घेण्यासाठी हा ‘फिनॉमेना’ ही एक पूर्वअट असते. अंतःप्रज्ञेने घेतलेले निर्णय पद्धतशीरपणे लावणे एवढेच तत्त्वज्ञाचे काम नसते. तत्त्वज्ञ फक्त तर्कबुद्धीचे ‘एक्झिक्युटर्स नसतात. जेव्हा फिलॉसॉफी सर्वोत्तम स्तरावर काम करते तेव्हा ती एक कला असते, हे जॉन रॉल्स या अमेरिकन फिलॉसॉफरने दाखवून दिले आहे.
मानवी बोधनाच्या असंतुलनाचे विश्लेषण करताना कल्पनाशक्ती, ढोंग, बिलीफ विश्वास, स्वतःची फसवणूक या सगळ्यांचा परस्परसंबंध काय, याची चर्चा या पुस्तकात आहे. काही वेळेस माणसाचे वर्तन त्याने बाळगलेल्या विश्वासाच्या विरुद्ध असते. हा एक विलक्षण मानसिक ‘फिनॉमिना’ आहे.
समजा एक काचेचा पूल आहे. तो उंच टांगलेला आहे. पूल पडगार नाही असा विश्वास त्यावर उभ्या असलेल्या माणसास आहे. आपण सुरक्षित आहोत हे त्याला पटलेले आहे तरीसुद्धा तो घाबरतो. भीतीने त्याचे हातपाय कापतात.
एखाद्याला सांगितले की हे बेडपॅन नवीन व निर्जंतुक आहे. त्यातून त्याला संत्र्याचा रस प्यायला दिला. पेल्याइतकेच बेडपॅन स्वच्छ व निर्जंतुक आहे याची खात्री असूनसुद्धा माणूस बेडपॅनमधून रस पिणार नाही.
मनोवैज्ञानिकांनी गोऱ्या उमेदवारांवर प्रयोग केले. हे गोरे उमेदवार उदारमतवादी आहेत. त्यांच्या मनात वंश-वर्णद्वेष नाही. अशा उमेदवारांना कृष्णवर्णीयांच्या चेह-याची छायाचित्रे दाखवली व काही शब्द दाखवले. त्यांना शब्द व चेहरे यांच्या झटकन जोड्या लावायला सांगितल्या. उमेदवारांनी कृष्णवर्णीयांच्या चेहऱ्याच्या नकारार्थी शब्दांशी जोड्या लावल्या.
वर सांगितलेल्या तीन्ही प्रयोगाचा अर्थ कसा लावायचा? परस्परविरोधी ‘बिलीफ’ माणूस मनात बाळगू शकतो का? हे ‘ऑटोमॅटिक रिस्पॉन्सेस’, आपोआप घडलेले प्रतिसाद आहेत; त्यांचा अन्वयार्थ काय?
याची उत्तरे देण्यासाठी जेन्डलरने एक थिअरी मांडली आहे. बिलीफ ही जशी एक बोधनस्थिती, ‘कॉग्निटिव स्टेट’ असते तशीच ‘अलीफ’ ही एक बोधनस्थिती आहे. ‘कॉन्शस’ विचारांवर अलीफ अवलंबून नसतो. त्यामुळे या बोधनस्थितीवर तर्कबुद्धीचे नियंत्रण नसते. त्यामुळे ‘अलीफ’ हे ‘बिलीफ’ला समर्पक, समान व समांतर असतीलच असे नाही.
या दोन बोधनस्थितींमुळे माणसाचा फायदाही होतो. ‘हॉरर सिनेमा’ पाहणे आपल्यासाठी आनंददायी असते. पण या हॉरर्स वास्तव जीवनात आल्या तर त्या माणसाला काळजीत टाकतात, दुःख देतात; मात्र सिनेमा आनंददायी ठरतो. हे माणसाच्या दोन बोधनस्थितीमुळे शक्य होते. या दोन बोधनस्थिती माणसाचे अनुभवविश्व व जीवन समृद्ध करतात, असे जेन्डलर यांचे म्हणणे आहे.
मनोवैज्ञानिकांच्या मते जेन्डलर यांची थिअरी चांगली आहे पण त्यात काही नवीन नाही. ‘अलीफ’मधील गोष्टी अंतःऊर्मी, सवयी, कल्पनाशक्ती, दांभिकपणा या सामान्य संकल्पनांमध्येसुद्धा बसवता येतात, त्यांचे स्पष्टीकरण देता येते, हे जरी खरे असले तरी अलीफमुळे बिलीफ या फिनॉमिनाची तुलना करता येते व त्यातील वैधर्म्य दाखविण्याची संधी मिळते.
बिलीफ या मानसिक स्थितीचे ‘सत्य’ हे लक्ष्य असते. त्यामुळे बिलीफ हा पुरावे व युक्तिवादाला प्रतिसाद देतो. तर्कबुद्धीने बिलीफ या संकल्पनेला चालना मिळते, असा परंपरावादी फिलॉसॉफीचा बिलीफबद्दलचा दृष्टिकोण असतो.
अंधश्रद्धा, पूर्वग्रह, आपोआप घडणारे उत्स्फूर्त प्रतिसाद यांनासुद्धा बिलीफमध्ये धरायचे असतील तर ते परंपरावादी फिलॉसॉफीच्या दृष्टिकोणात बसणारे नाही. कारण या सांगितलेल्या गोष्टींवर पुरावे व युक्तिवाद यांचा परिणाम होत नाही. त्यामुळे फिलॉसॉफीच्या बिलीफ या मानसिक स्थितीलाच बाध येतो. अलीफ व बिलीफ या दोन बोधनस्थिती वेगळ्या मानल्यामुळे वरील गोष्टींचे स्पष्टीकरण देता येते व तर्कबुद्धीच्या युक्तिवादाचा मार्ग मोकळा राहतो.
पुरावे व युक्तिवादाला प्रतिसाद देणारी माणसाची तर्कबुद्धी फिलॉसॉफी गृहीत धरते. माणूस या वर्णनात चपखल बसणारा नाही, असे बोधनविज्ञान वर्धिष्णू पद्धतीने संशोधनातून दाखवत असते. तर्कबुद्धीने मनन करण्याची क्षमता असलेला, पण अपरिपूर्ण जगात राहणारा प्राणी ही माणसाची नियती आहे. तिचा आपण स्वीकार करावा असे जेन्डलर याचे समन्वयात्मक म्हणणे आहे. आपण फक्त अनुभवाधिष्ठित चौकशीचे विषयवस्तू (ऑब्जेक्ट्स) नसून आकलन व तर्कबुद्धीचे कर्ते – (सब्जेक्ट्स)सुद्धा आहोत. तेव्हा आपण फिलॉसॉफीच्या पद्धती वापराव्या, असे आवाहन जेन्डलर करत आहेत.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.