मेंदू-विज्ञानाचा तत्त्वज्ञानावर परिणाम

[पॅट्रिशिया स्मिथ चर्चलंड कॅलिफोर्निया विद्यापीठ, सॅन दिएगो, ला होया येथील तत्त्वज्ञान विभागात कार्यरत आहे. तिच्या The Impact of Neuroscience on Philosophy या न्यूरॉन (Neuron 60, Nov 6, 2008) या नियतकालिकातील लेखाचे हे सुलभीकृत रूपांतर.]
व्होल-उंदरांची सामाजिकता….
व्होल (vole) नावाचे काही उंदरांसारखे जीव असतात. त्यांच्या वेगवेगळ्या प्रजातींमध्ये नरमादींमधल्या युगुल-बंधनाचे (pair-bonding) वेगवेगळे प्रकार दिसतात. सपाट प्रदेशातल्या कुरणांवरच्या व्होल्समध्ये एक नर-एक मादी अश्या जोड्या जुळतात, आणि त्या आयुष्यभर टिकतात. पिल्ले वाढवण्यात आई आणि बाप अशा दोघांचाही सहभाग असतो. एकूणच सपाटीवरचे व्होल्स सामाजिक जाणीव ठेवून वागतात. डोंगराळ भागातल्या व्होल्सच्या नरमादींमध्ये एकनिष्ठा नसते. घरट्याची राखण, पिल्ले वाढवणे यांतही नर मादीला मदत करत नही. सपाटी-व्होल्स गट करून राहतात, तर डोंगरी-व्होल्स वृत्तीने एकांडे असतात.
शेजारी-शेजारी राहणाऱ्या या दोन प्रकारच्या व्होल्सच्या मेंदूंचा अभ्यास केला गेला. मुख्य फरक आढळला तो दोन जैवरसायनांच्या बाबतीत. मेंदूतल्या आणि मज्जासंस्थेतल्या पेशींमध्ये वेगवेगळी रसायने ग्रहण करणाऱ्या पेशीस्थानांमध्ये (receptor sites) फरक असतात. ऑक्सिटोसिन (oxytocin, यापुढे OT) आणि आर्जिनाइन व्हॅसोप्रेसिन (arginine vasopressin, यापुढे AVP) या दोन रसायनांना ग्रहण करणाऱ्या जागा सपाटी-व्होल्सच्या मेंदूत दाट (जवळजवळ) असतात, तर डोंगरी-व्होल्सच्या मेंदूत विरळ असतात. रसायनांची ग्रहणस्थाने दाट असली तर पेशींची जाळीही दाट बनतात. ग्रहणस्थाने विरळ असली तर जंजाळेही विसविशीत होतात. ही बाब इतर सस्तन प्राण्यांमध्येही दिसते. साध्या उंदरांमधल्या जास्त दाट ग्रहणस्थाने असलेल्या, जास्त दाट पेशी-जंजाळे असलेल्या जीवजातींमध्ये जोडीदारांबाबतची एकनिष्ठाही जास्त असलेली दिसते. उलट -हीसस माकडांमधल्या विरळ ग्रहणस्थानांसोबत विसविशीत पेशी-जंजाळे आणि शिथिल युगलबंधनेही दिसतात. आज (तरी) माणसांमधल्या OT-AVP ग्रहणस्थानांबाबत तुलनात्मक माहिती उपलब्ध नाही.
OT हे रसायन मैत्री घडताना सवते. एकमेकांशी लढणे, (मैत्री न दाखवता) थिजून उभे राहणे, पळून जाणे, असल्या बचावात्मक वागणुकींना OT अडथळे आणताना दिसते. पण OT चे नेमके परिणाम संदर्भानुसार बदलताना दिसतात. नर उंदरांना OT दिले तर ते परक्या उंदरांबाबत आक्रमक होतात, पण पिल्लांबाबत मात्र तटस्थ आणि अनाक्रमक होतात. AVP बद्दल आजतरी फार माहिती नाही.
…. आणि तत्त्वज्ञानावरील परिणाम
या व्होल्सबाबतच्या, जैवरसायनांबाबतच्या निरीक्षणांनी तत्त्वज्ञ अस्वस्थ झाले. त्यांना जोडीदाराशी एकनिष्ठ असणे हा बराच व्यामिश्र प्रकार वाटला होता. एक वैश्विक नियम पाळत, जाणीवपूर्वक स्वतःवर नियंत्रण ठेवत, विवेकाने आपण जोडीदार निवडतो आणि त्याच्याशी/तिच्याशी एकनिष्ठ राहतो; असे समजले जात होते. एकनिष्ठ राहणे हे एक नैतिक कर्तव्य आहे; आणि ते विचार, विवेक, संयम, एखादेवेळी ईश्वरी नियम पाळून पार -पाडले जाते; असे मानले जात होते. आता तो काही रसायनांच्या पेशींमधल्या ग्रहणस्थानांच्या दाटीनुसार ठरणारा प्रकार आहे, असे दिसत होते. विवेकी नैतिकतेची जागा दोन साधीशी जैवरसायने घेताना दिसत होती.
विश्वासार्हता
माणसांमधली सामाजिकता हुबेहूब व्होल्स किंवा उंदरांमधल्या सामाजिकतेसारखी नाही; त्यामुळे व्होल-उंदीर संशोधनांवरून माणसांबाबत मते घडवू नयेत, हे खरे. परंतु सपाटी-व्होल्स आणि माणसे हे दोन्ही प्राणी जोडीदारांशी एकनिष्ठ असताना दिसतात, हेही खरेच. माणसांमध्ये जशी अपत्ये, नातलग वगैरेंवर प्रेम दिसते, तशीच सपाटी-व्होल्समध्येही दिसते. स्थानिक चालीरीती पाळणाऱ्यांचे व्होल्स-समाजात कौतुक होते, तसेच मानवी सस्तनांतही होते.
वेगवेगळ्या जीवजातींमध्ये अनेक बाबतींत समरूपता असते असे उत्क्रान्तीचा अभ्यास सांगतो. एका जीवजातीत दिसणारी रचना आणि जैवरसायने इतरही जीवजातींमध्ये दिसतात. उदा. मेंदूची रचना आणि जैवरासायनिक क्रियांबाबत सर्व सस्तन प्राण्यांत साम्ये दिसतात. त्यामुळे OT-AVP ग्रहणस्थानांची दाटी आणि विरळपणा यांबाबत माणसे आणि व्होल्स यांचे समाज सारखेच परिणाम दाखवणे अशक्य नाही. अजून हे संशोधन पूर्ण होत आलेले नाही; पण दिशा स्पष्ट आहे.
उदाहरणार्थ, AVP ग्रहणस्थानांची दाटी एका जीनच्या असण्यानसण्याने कमीजास्त होते. या जीनची एक आवृत्ती पुरुषांमध्ये (मानवी नरांमध्ये!) दाटी आणते, तर दुसरी विरळपणा देते. या दोन आवृत्त्या असलेल्या पुरुषांचा स्वीडनमध्ये एक अभ्यास केला गेला. AVP ग्रहणस्थानांच्या दाटीसोबत युगुल-बंधने बदलतात, असे मानायला जागा आहे.
OT च्या वापराने माणसांची वागणूक बदलते, असेही मानायला जागा आहे. दोन व्यक्तींमध्ये कितपत विश्वास ठेवला जातो आहे ते मोजायला मेंदूवैज्ञानिक एक खेळ वापरतात, गुंतवणूकदार (Investor किंवा दाता) नावाचा. एकाने दुसऱ्याला, विश्वस्ताला (Trustee) विश्वासाने पैसे द्यायचे, इथून खेळ सुरू होतो. देणारा, घेणारा यांच्यात विश्वासाचे नाते असले तर त्या जोडीला जास्त गुण मिळतात. विश्वास जितका कमी, तितके गुणही कमी, असा हा मज्जा-आर्थिक (neuro-economic) खेळ आहे.
आता हा खेळ खेळणाऱ्या काही जोड्यांच्या नाकांत OT चे फवारे मारले गेले, तर इतरांना तुलनेसाठीचे प्रमाण (control) म्हणून नैसर्गिक स्थितीतच खेळायला लावले. (म्हणजे ज्यांच्या नाकात OT चा फवारा मारलेला नसतो) OT फवारलेल्या जोड्या साध्या जोड्यांपेक्षा जास्त परस्पर-विश्वासाने वागून जास्त गुण कमावताना दिसल्या. सपाटी-व्होल्स आणि माणसे या दोन्ही जीवजातींमध्ये OT च्या वाढीव प्रमाणाने सामाजिक जाणीव वाढताना दिसते. आधी विश्वास ठेवणे वाढते. पुढे जोडीदारांशी व इतरांशी स्थिर भावबंध घडताना दिसतात.
लहान मुलांना जवळ घेऊन लाडाकोडाने वाढवले तर त्यांच्या मेंदूंमधला OT स्राव वाढतो. कुटुंबात सोबत वाढलेली मुले अनाथाश्रमांत लाडाशिवाय वाढलेल्या मुलांपेक्षा जास्त OT स्रवतात.
जर स्थिर भावबंद घडवणे जमत नसेल, घडलेले भावबंध टिकवता येत नसतील, तर अश्या व्यक्ती सहकार्यामुळे मिळणाऱ्या लाभांना मुकतात. अशा भावबंधांमध्ये कच्च्या व्यक्तींचा एक प्रकार BPD (Borderline Personality Disorder) या नावाने ओळखला जातो. त्यातील व्यक्ती व्यक्तिमत्त्वांच्या सामान्य निकषांपेक्षा थोड्या असलेल्या वेगळ्या व्यक्तिमत्त्वांच्या असतात. तर अश्या BPD व्यक्तींना गुंतवणूकदार हा खेळ खेळायला लावला. त्या व्यक्ती घेणाऱ्याच्या, आणि सामान्य व्यक्ती देणाऱ्याच्या भूमिकेत होत्या. BPD व्यक्तींना जोडीदारावर विश्वास टाकता येत नाही असे दिसले. आपण विश्वासार्ह आहोत, हे ते जोडीदाराला पटवून देऊ शकत नसत. काही कारणाने नाते तुटायच्या बेतात आले, तर ते सावरून घेऊ शकत नसत. अर्थातच ते खेळात मागे पडत. बरे, साध्या माणसांना आणि BPD माणसांना जेव्हा विचारले गेले, की तुम्ही विश्वासाची किती पातळी गाठू शकतात, तेव्हा BPD लोकांची पातळी सर्वसाधारण माणसांपेक्षा कमी दिसली.
माहिती सांगायला हवी.
हे प्रयोग, त्यांतून मिळणारी माहिती, सारी विस्तृतपणे लोकांपर्यंत पोचायला हवी. माणसे निर्णय कसे घेतात, वेगवेगळ्या पर्यायांमध्ये निवड कशी करतात, यावर या प्रयोगांमधून नवा प्रकाश पडत आहे. [याच अंकात माय ब्रेन मेड मी डू इट नावाच्या पुस्तकाचे परीक्षण आहे. तेही आवर्जून वाचावे. – सं.]
या साऱ्यांबाबत पारंपरिक नीतिशास्त्रज्ञ म्हणू शकतील, “मग काय झाले? नातेसंबंधांचा, भावबंधांचा, विश्वासाचा नीतीशी संबंध काय?” या लेखात सुचवले जात आहे ते असे :
विश्वास टाकणे-निभावणे हा भावबंधांपैकी एक बंध असतो. तो नीतीचा एक प्रमुख आधार असतो. आपले नीतिनियम विश्वासार्ह वागणुकीला, विश्वास टाकण्याच्या पद्धतीला बळ देणारे हवेत. विश्वास टाकण्या-निभावण्यातून माणसांना काहीतरी लाभ देणारे हवेत. माणसे आणि इतर सामाजिक प्राण्यांना एकमेकांसोबत राहायला आवडते. विशेषतः अशांसोबत, ज्यांच्याशी भावबंध जुळले आहेत, हा मूळ मुद्दा आहे. अशांसोबत राहता आले नाही तर ताण उत्पन्न होतो.
निर्णयामागचा भूप्रदेश
कसे वागावे ते ठरवताना माणसे अनेक बंधनांना एकाचवेळी पाळायला धडपडत असतात. बंधन पाळण्यातून मिळणारे हे समाधान (constraint-satisfaction) हा सर्व निर्णयांचा पाया असतो. बंधनांमध्ये परिस्थितीने आखलेल्या मर्यादाही आल्या, आणि सामाजिक पद्धतीही आल्या. अश्या सर्व बंधनांना महत्त्व देत मेंदूमधील पेशींची जंजाळे एखादी स्थिर स्थिती गाठायला धडपडत असतात. अशी स्थिती गाठली गेली, की कृतिकार्यक्रम निश्चित केला जातो. नेहेमीच अशी स्थिर स्थिती घडते, असेही नाही. उदाहरणार्थ, आपत्ती आली असताना पालकाने हे मूल वाचवावे, की ते मूल वाचवावे? अश्या समस्यांना शृंगापत्ती (dilemma) म्हणतात. साधारणपणे बंधनांची एकमेकांशी थेट तुलना करता येत नाही. सैनिकांना माणसे मारण्याला तर शिकवायचे, पण त्यानंतर सैनिक खुनी होणार नाहीत, याची खात्री कशी बाळगावी?
विश्वास ठेवणे – न ठेवणे आणि त्यातून उद्भवणारे भावबंध यांतून अशा प्रश्नांना नेमकी उत्तरे मिळत नाहीत. पण आवड-नावडीच्या भावना व्यामिश्र सामाजिक प्रश्न कसे सोडवता येतील, याचा अवकाश ठरवतात. एका रूपकातून हे स्पष्ट करायचा प्रयत्न करू. सामाजिक प्रश्नांची संभाव्य उत्तरे हा एक भूप्रदेश समजू. या भूप्रदेशातले चढउतार रेखतात ते भावबंध. जोडीदाराला खूष ठेवण्याकडे कल असतो. उपऱ्यांना हाकलून लावण्याकडे कल असतो. बाळांचे संगोपन करण्याकडे कल असतो. कल असणे-नसणे, कल कितपत तीत आहे, वगैरे भावबंधानुसार ठरते.
या चढउतारांच्या भूप्रदेशावर निर्णय घेण्याची प्रक्रिया घडते. आजूबाजूच्या परिस्थितीबद्दलचे आकलन, शेजारी असलेले (भक्षकांसारखे) धोके, भूक कितपत आहे शरीरातल्या हॉर्मोनपातळ्या, अशा साऱ्या घटकांनी आणि मूळ भावबंधांच्या भूप्रदेशानुसार मज्जापेशींची-जंजाळे थरथरतात आणि शेवटी स्थिरावतात.
ही क्रिया खूप-व्यामिश्न असते, हे तर खरेच. काही बंधने तात्कालिक, काही ताजडतोबीच्या इच्छा, सवयींचा रेटा, स्वतःची कीर्ती टिकवायची इच्छा, इतरांच्या अपेक्षा, एकूण सुचणारे पर्याय, या साऱ्यांमागे भावबंध असतात; आणि यांपैकी प्रत्येक घटक तपासून, त्याचे मूल्यमापन करून, त्याला मज्जापेशींच्या जंजाळांत सामील करून मग निर्णयाची स्थिर-स्थिती घडते. हे सारे नेमके कसे आणि कोणत्या क्रमाने होते याचा हिशोब आजचे मेंदु-विज्ञान करू शकत नाही. निर्णय घेण्याचे नियम आणि ते लावण्याचा क्रम हेही एक बंधन असते.
माझ्या मते व्यवहारी विचार म्हणजे हेच; बंधने पाळून त्यांचे समाधान करण्याचा मार्ग शोधणे. तर्कवेत्त्यांचे लाडके डिडक्शनचे तत्त्व प्रश्नाची उकल करण्यात फार महत्त्वाची भूमिका निभावू शकणार नाही. ते फारतर एक दुय्यम, तदर्थ (ad hoc) भूमिकाच फक्त निभावू शकते.
मेंदूची रचना, मज्जाव्यवस्थेतील ग्रंथी व साव, या सर्व बाबतींत माणसे आणि इतर सामाजिक प्राण्यांमध्ये साम्य असते. असे असूनही खरी नीतिमत्ता माणसांतच असते, असा युक्तिवाद केला जाऊ शकतो. याचे कारण असे दिले जाते, की मानवी नीतिमत्ता सर्व मानवांना लागू पडते. तर (उदाहरणार्थ) एका प्रदेशातल्या चिंपांझींचे नीतिनियम सर्व जगातल्या चिंपांझींना लागू पडत नाहीत.
आता मानवी नीतिमता खरेच इतकी सार्वत्रिक आणि उदात्त आहे का? हे विवाद्य आहे. ती तशी असती तर टोळीयुद्धांपासून देशादेशांतील महायुद्धांच्या प्रदीर्घ इतिहासाचा, परक्याबाबतच्या वैरभावाचा, अर्थ कसा लावायचा? मुळात मानवी हक्क सार्वत्रिक मानावे, ही स्तुत्य कल्पनाही तशी अलीकडची आहे, इतिहासाचा बहुतांश काळ मानवी हक्क ही कल्पना सार्वत्रिक नव्हती.
पण इतिहासही बाजूला ठेवू. माणसांचे मोठाले गट घडतात, आणि चांगुलपणा केवळ नात्यागोत्यांपुरता मर्यादित नसतो. ही बंधने चांगुलपणा ओलांडताना दिसतो. ह्या बाबी माणूस आणि देव यांच्या एकमेवाद्वितीय नात्यामुळे घडतात, असे मानण्याकडे पारंपरिक नीतिशास्त्र्यांचा कल असतो. माणसांमधला अंगभूत चांगुलपणा, माणसांची [प्राण्याच्या तुलनेत.] ज्यादा बुद्धिमत्ता, यांच्या मिश्रणातून चांगुलपणाच्या घटना घडतात, असे मानण्याकडेही कल असतो. हे सारे असेलही, पण सोबत नातीगोती ओलांडणाऱ्या भावबंधांमध्ये जीवशास्त्रातून आज आकळणारे कलही असतात, याचा विचार व्हावा.
नक्कल
परोपकार आणि मारक स्पर्धा या बाबी माणसांत सहउत्क्रांत झाल्या, असे बोल्स (Bowles) हा शास्त्रज्ञ सांगतो. चिंपांझी टोळ्या शेजारच्या दुबळ्या चिंपांझींना मारून टाकून आपले क्षेत्र आणि संसाधने यांचा विस्तार करतात. सुरुवातीच्या माणसांना किंवा माणसांच्या पूर्वजांना असेच वागायची सवय असणार. पण सोबतच दुर्बल शेजाऱ्यांशी काही न्याय्य अशी क्षेत्रविभागणी (संसाधनविभागणी) केल्याने त्यांच्या निष्ठा कमावता येतात, हे उमजले असणेही शक्य आहे. गटाचे क्षेत्र वाढवण्यास संख्या वाढवणारे नातेसंबंधही महत्त्वाचे ठरतात.
पण असे इतरांना सामावून घेणे निर्धोक नसते. एखादा पुंड नवखा एकूण गटालाच अस्थिर करू शकतो. मग नवख्यांना सामावून घेणे हे शाप आहे की वरदान? नवखे जुन्यांशी भावबंध घडवण्याबाबत विश्वासार्ह आहेत की नाहीत. हे ओळखायचे कसे? एक सचना अशी आहे, की नकळत केलेली नक्कल, ही विश्वासार्हतेची पहिली कसोटी म्हणून उपयुक्त आहे.
जेव्हा मनोवैज्ञानिक एखाद्या व्यक्तीचा अभ्यास करतात, तेव्हा अश्या अजाणतेपणी नकला घडताना दिसतात. ज्या व्यक्तीचा अभ्यास केला जात असतो, ती आपसूकच मानसशास्त्रज्ञाची उभे राहण्याची ढब, अंगविक्षेप, बोलण्याची भाषा आणि लय वगैरेंची नक्कल करू लागते. जर दोघांनी मिळून काही काम करायचे असेल, तर नक्कल अधिकच थेट होते. जर मनोवैज्ञानिक अभ्यासविषय व्यक्तीची नक्कल करू लागला, तर ती व्यक्ती मानसशास्त्रज्ञाला जास्त मान देते.
सर्वसाधारण माणसे इतर अनोळखी माणसांना भेटतात तेव्हाही हाच एकमेकांच्या नकलेचा प्रकार दिसतो. तसे वागणे हा एक प्रकारचा सामाजिक गोंद असावा, बंध सोपे करणारा. आता इतरांचे निरीक्षण करून नक्कल करायला काही मेहेनत लागते. पुढ्यातली व्यक्ती आपल्यावर तितपत मेहेनत घेत आहे, यातून पुढेही नातेसंबंधांवर मेहेनत घेतली जाईल, असे सूचन होते. सोबतच सामाजिक वागणुकीची कौशल्ये समोरच्या व्यक्तीत आहेत, हेही कळत असावे.
इतर कपीपेक्षा माणसे खूपच जास्त प्रमाणात नकला करतात. लहान मुले मोठ्यांच्या नकला करू लागतात, तेव्हा बालक-पालक नाते एका नव्या, वरच्या टप्प्यावर पोचते. आपले बाळ आपली नक्कल करते, याने पालक खूष का होतात? इतर बाबीही असतील, पण बाळाचे नक्कल करणे त्याच्यापाशी शिकण्याला, जगण्याला आवश्यक अशी मज्जा जंजाळे आहेत, हे दाखवत असते. समाजात, जगात वावरायला आवश्यक उपकरणे बाळापाशी आहेत, हे जाणवून आईबाप सुखावतात. याउलट नक्कल न करू शकणारे बाळ त्याच्यापाशी काही जीवनावश्यक हत्यारे नाहीत हे सुचवत असते. असे दिसल्यास आईबाप अशा मुलांतली गुंतवणूक कमी करतात. नकला करता येणे हे एका महत्त्वाच्या सामाजिक क्षमतेचे सूचन असते, असे मला म्हणायचे आहे. नकलांमधून बाळ इतरांची मने ओळखू शकते, इतरांच्या धारणा, इच्छा-आकांक्षा, भावना समजू शकते, हे दिसत असते. आणि जे बाळांबद्दल घडते, तसेच परक्यांबद्दलही घडते, असे मला वाटते.
सारे सामाजिक व्यवहारांतील नकला विश्वास टाका, टाकत राहा, कारण तिकडूनही विश्वास टाकला जाईल, त्यामुळे नवखा चांगला नागरिक चांगला समाजघटक होण्याला सक्षम आहे, असे सारे सुचवतात. अजाणतेपणे केलेल्या, अजाणतेपणे ओळखल्या गेलेल्या नकला, हा आलबेलचा संदेश असतो. त्यांतून OT चा स्राव वाढतो. विश्वास वाढतो.. बचावात्मक सावधगिरीची गरज घटते. नकला सामाजिक सुरक्षिततेची खात्री देत नाहीत. त्यांच्यापासून सुरुवात होऊन अविश्वासार्हता मात्र टाळता येते. जर विश्वासाला वाव दिसला तर व्यवहार-व्यापार वाढू शकतात.
काही धोकेबाज परके जाणूनबुजून नकला करतील, तर काहींना ते जमणार नाही. एखादा विकृत (sociopathic) परका आपल्या समाजात घुसूही शकेल. अनुभवी लोक जाणती नक्कल आणि अजाणती नक्कल यांतले फरक ओळखूही शकतील. एकूण पाहता पहिली चाळणी म्हणून नकला उपयुक्त ठरतात, असे माझे मत संशोधनावरून बनले आहे.
तत्त्वज्ञानाच्या क्षेत्राचा संकोच
प्रायोगिक विज्ञानातून काही प्रश्नांची उत्तरे देणारी, विश्वासार्ह वाटणारी तत्त्वे घडवली जातात. ज्या प्रश्नांना अशी उत्तरे मिळालेली नाहीत ते परंपरेने तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात गणले जातात. प्राचीन ग्रीसमधले लोक जीव म्हणजे काय, सूर्याचे वर्तन कसे असते, भरती ओहोटी का येतात, आपण शिकतो कसे, आपण निर्णय कसे घेतो, अशा अनेकानेक प्रश्नांवर तत्त्वज्ञानाचे क्षेत्र मानले जाई. आज यांतल्या काही प्रश्नांना प्रयोगाधारित विज्ञानातून उत्तरे मिळाली आहेत. तत्त्वज्ञानातल्या परिकल्पनांचे (अटकळी, speculations) क्षेत्र आस्ते आस्ते प्रायोगिक विज्ञानाकडे जात आहे. एकूण विज्ञानाचा इतिहास पाहता म्हणता यातून अधिकाधिक भरवशाच्या विज्ञानशाखा घडत आहेत. खगोलशास्त्रात याची सुरुवात झाली. आज भौतिकी, रसायनशास्त्र, भूशास्त्र, जीवशास्त्र, पुरातत्त्वशास्त्र, प्राणिवर्तनशास्त्र (ethology), मानसशास्त्र, मेंदू-विज्ञान (neuroscience) वगैरे विज्ञानशाखा तत्त्वज्ञानापासून सुट्या होऊन प्रायोगिक पायांवर उभ्या होत आहेत. विश्व, जीव, भूतमात्र (matter), ऊर्जा इत्यादींबाबत व्यापक तत्त्वे सुचवली, तपासली आणि वापरली जात आहेत. आता मनाची पाळी आली आहे.
मनाबाबतचे अभिजात प्रश्न निर्णयस्वातंत्र्य (free will), स्व (the self), जाणीव (consciousness), विचारांमधून अर्थ निघणे, अमुक गोष्ट तमक्या बद्दल’ असणे (aboutness’), ज्ञान मिळवणे आणि वापरणे. यांबद्दल असतात. हे प्रश्न नीतीबाबतच्या प्रश्नांशीही जुळलेले असतात. मूल्ये कुठून येतात, आपल्या निर्णयांत विवेकाचा भाग किती आणि भावनांची भूमिका काय; यांतून जबाबदारी, गुन्ह्यांना शिक्षा यांबाबतचे प्रश्न येतात.
अशा प्रश्नांपैकी देकार्तचा मन/शरीर यांबाबतचा प्रश्न बराच काळ चर्चेत आहे. देकार्तला मन ही पूर्णतः अभौतिक बाब वाटत असे. तेव्हा अशी अभौतिक बाब मेंदूसारख्या भौतिक रचनेच्या वर्तनावर परिणाम कसा काय घडवू शकते?; हा देकार्तचा प्रश्न. आज मानसिक क्रिया म्हणजे वास्तवात मेंदूव्यवहार असतात, याला भरपूर पुरावा मिळाला आहे, त्यामुळे देकार्तचा प्रश्न नाहीसा झाला आहे. त्या प्रश्नाची जागा आज विविध प्रश्नांनी घेतली आहे. शिकणे, निर्णय घेणे, स्वतःला फसवणे, अश्या क्रियांमागे कोणते मेंदूव्यवहार असतात; हे आणि असे प्रश्न आज अभिजात मन/शरीर प्रश्नाची जागा पटकावून आहेत. आज तो एक प्रश्न नाही, तर ते बोधनिक मेंदू-विज्ञानाचे (cognitive neuroscience) एक प्रचंड मोठे संशोधन-क्षेत्र आहे.
संकल्पना-विश्लेषण, चिंतन-मनन
विसाव्या शतकातली मन आणि नीती यांच्या तत्त्वज्ञानातली पद्धत मुख्यतः वेगवेगळ्या संकल्पनांचे विश्लेषण करण्यावर बेतलेली होती. संकल्पना-विश्लेषण जनमानसातल्या मानसशास्त्रातल्या अभेद्य भासणाऱ्या तत्त्वावर चिंतन-मनन करते. कधीकधी या मनन चिंतनातून काल्पनिक प्रयोग रचून मनाबाबतची तथ्ये शोधायचा प्रयत्नही केला जातो. विज्ञानाच्या तत्त्वज्ञांना ही पद्धत मुळीच पटत नाही; ते तिला अज्ञानी तत्त्वज्ञान (know
nothing philosophy) म्हणतात.
संकल्पना-विश्लेषण हे प्रश्न सोडवायचे पूर्वप्राप्त (a priori) धोरण आहे, हे उघडच आहे. त्या धोरणासाठी आधारभूत मानलेली अनेक जनमानसातली सत्ये मेंदू विज्ञान व मज्जासंस्थेच्या अभ्यासातून आलेल्या मानसशास्त्रीय निष्कर्षांपक्षा वेगळी होती. उदाहरणार्थ, मेंदूच्या उजव्या आणि डाव्या अर्धकांमधले संबंध तुटलेले रुग्ण. या विसंवादातून कोणत्या क्षमता हरवतात, कोणत्या टिकून राहतात, याबद्दलचे प्रायोगिक निष्कर्ष संकल्पनात्मक सत्यां पेक्षा वेगळे आहेत. हे नवे निष्कर्ष अनुभवजन्य, प्रयोगसिद्ध आहेत. ते मेंदूच्या वागणुकीचे एक नवेच चित्र दाखवतात; संकल्पनात्मक विश्लेषणाच्या निष्कर्षापक्षा फारच वेगळे.
यामुळे मेंदू-विज्ञान आणि मानसशास्त्र यांचे विसाव्या शतकातील मन-शरीर नीतीबाबतच्या तत्त्वज्ञानावर एकूणच गंभीर परिणाम होत आहेत. जग जसे दिसते तसे नसते, तसेच मनही वरवर (common sense) आपल्याला वाटते त्यापेक्षा वेगळे असल्याचे दिसून येते. दिसण्यात पृथ्वी सपाट आहे, चंद्र एखाद्या लहान गोट्यानेही झाकला जाण्याइतका लहान आहे,आणि रोगराई पापांमुळे उद्भवलेल्या दैवी प्रकोपात उद्भवते. जनमानसातल्या भौतिकीप्रमाणे आणि जनमानसातल्या जीवशास्त्राप्रमाणे जनमानसातले मानसशास्त्रही बऱ्याच जागी चुकीच्या दिशेने जाताना दिसते. दैनंदिन व्यवहारांत ते कामचलाऊ रीतीने उपयोगी असेलही; पण ते यथातथ्य मात्र नाही. मनन-चिंतन उपयुक्त असते; मेंदूचे व्यापार आपल्याला वाटतात त्यापेक्षा वेगळ्या प्रकारे चालतात. आपण खिन्न का होतो, प्रेमात का पडतो, सेरोटॉनिन (serotonin) हे जैवरसायन आपल्या निर्णयप्रक्रियेवर काय परिणाम करते, असले प्रश्न चिंतन-मननातून सुटत नाहीत, तर तिथे प्रयोगच लागतात.
तत्त्वज्ञांना चिंतन-मनन, अंतःप्रेरणा वगैरेंतून मिळणारी सूत्रे अभेद्य नसून ढिसाळ आहेत हे जाणवू लागले; आणि ती विश्लेषणपद्धती त्यागली गेली. आज मन/शरीर यांच्या तत्त्वज्ञानात सर्वाधिक उपयुक्त भाग प्रायोगिक विज्ञानावरच बेतला जातो. असे करणाऱ्या तत्त्वज्ञांच्या शैली मात्र वेगवेगळ्या असतात. कोणी शुद्ध प्रायोगिक निष्कर्ष तपासतो, तर कोणी तात्त्विक अंगांवर लक्ष केंद्रित करतो; कोणी संश्लेषक असतो तर कोणी अटकळी बांधतो, इ.इ.
वर्तनशास्त्रे, मेंदू-विज्ञान वगैरेंमधली प्रगतीही नीतिशास्त्रज्ञांना फारसे बदलू शकलेली नाही. ते अजूनही विद्यार्थ्यांना आश्वासने देतात, की नीतिशास्त्राला मेंदू-विज्ञानापासून काही शिकता येत नाही. तो गड तरी मेंदू-विज्ञानापासून सुरक्षित आहे.
हाही एक भ्रम आहे. गेल्या काही दशकांतील वर्तनशास्त्रातील संशोधन नीतिशास्त्र, माणसे निर्णय कशी घेतात याचे शास्त्र, इत्यादींना एक नवी निसर्गवादी चौकट पुरवत आहे. याची थोडक्यात ओळख करून देण्याचा माझा प्रयत्न आहे. हा काहीसा मिनटाभरात हॅम्लेट सादर करण्यासारखा आणि संक्षिप्त प्रकार आहे [ पूर्ण हॅम्लेट नाटक करायला पाचेक तास लागतात! – सं.]. पण या मेंदू-विज्ञानाच्या तत्त्वज्ञानावरील परिणामांच्या कहाणीला जीवशास्त्र आणि सामाजिक शास्त्रांची भरगच्च पार्श्वभूमी आहे.
आणि शेवटी….
जर आपली मूल्ये जीवशास्त्रावर आधारलेल्या सामाजिक भावनांमधून घडत असली, तर आपण सामाजिक-नैतिक प्रश्न सोडवायला आपली जीवशास्त्रीय घडण जास्त का तपासू नये? सामाजिक व्यवहारांचे मेंदू-जीवशास्त्र आपल्याला काही नेमकी उत्तरे देऊ शकेल का? सक्तीची लष्करी सेवा, कोकेनचा वापर कायदेशीर मानणे, असले प्रश्न सोडवू शकेल का? अर्थातच नाही. तसे कोणी सुचवतही नाही. सामाजिक प्रश्न सोडवणे ही एक अत्यंत व्यामिश्र क्रिया आहे. त्यासाठी अनेक तथ्ये तपासावी लागतात. सांस्कृतिक परंपरा, मेंदूंच्या आवडीनिवडी, अमुक केले तर तमुक होईल असली भाकिते, सारेच आवश्यक असते. मळात नैतिक-सामाजिक प्रश्न वेगवेगळ्या नियमांचे एकत्रित समाधान करण्याबाबत असतात: आणि तेही अनेक पातळ्यांवर, एका व्यक्तीचे प्रश्न जसे तिच्या मेंदूच्या पातळीवर सोडवले जात असतात, तसेच हेही. सामाजिक-नैतिक प्रश्न सोडवायला नैतिकतेवरचा आग्रह आणि काटेकोर नियम यांपेक्षा गंभीर, संयत, सामूहिक चर्चेतून बंधनांना सामावून घेणारे समन्वयन जास्त उपयोगी ठरते.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.