हे सर्व येते कोठून ? (विज्डम : स्टीफन हॉल यांच्या पुस्तकाचा परिचय)

अलौकिक कलागुण अंगी असणाऱ्यांच्या बाबतीत आपल्याला नेहमी प्रश्न पडतो – ही मंडळी हे कोठून घेऊन येते? अलौकिक बौद्धिक प्रतिभा असलेल्या लोकांच्या बाबतीतही हा प्रश्न आपल्याला पडतो, खरेच हे सर्व कोठून येते?
थोर तत्त्वज्ञ वैचारिक पातळीवरून विश्वाच्या अवघ्या पसाऱ्याचा अन्वय शोधू पाहतात, विश्वात मानवाची भूमिका काय, त्याच्या जीवनाचे प्रयोजन काय आहे, हे तपासून पाहतात. व्यवहारात कसे वागावे हे आपल्याला सांगू, शिकवू पाहतात. पण शहाण्या विचारांचा उगम कुन होतो याचा वेध घेताना आढळत नाहीत. त्याचा शोध घेणे हे विज्ञानाचे काम आहे, तो तत्त्वज्ञानाचा प्रांत नाही असे त्यांना वाटत असावे. फार प्राचीन काळी अगम्य प्रश्नांच्या उत्तरासाठी आकाशातल्या बापाकडे पाहायची पद्धत होती. सर्व आदेश आणि मार्गदर्शन तिथूनच येई. राजाला स्वप्ने पडत, साक्षात्कार होई, त्यानुसार राजा प्रजाहिताचे आदेश काढे. नंतरच्या कालखंडात नवे विचार मांडणारी, समाजाला हिताच्या चार गोष्टी सांगू इच्छिणारी शहाणी माणसे जन्माला आली. पण या शहाण्या माणसांची, त्यांच्या शहाणपणाची त्या काळच्या समाजाने फारशी कदर केल्याची उदाहरणे कमी आहेत. ज्यांनी ज्यांनी शहाणे विचार मांडले त्यांच्या नशिबी उपेक्षा आणि छळ आला असे इतिहास सांगतो. ख्रिस्ताला क्रूसावर चढवले गेले, सॉक्रेटिसला विषाचा प्याला ओठाला लावावा लागला. कन्फ्युशिअसचीही आयुष्यभर उपेक्षा झाली. सर्वसाधारण माणसाची वैचारिक पातळी आणि शहाण्या माणसाची वैचारिक पातळी, त्याचा भोवतालच्या जीवनव्यवहाराकडे पाहायचा दृष्टिकोण यात नेहमीच अंतर राहिल्याने हे घडले; आणि आजही घडते आहे.
याचा अर्थ शहाणपण नेहमीच केवळ थोर विचारवंतांपाशी केंद्रित झालेले असते असा नाही. शहाणपणाची जातकुळी वेगळी असेल; व्याप्ती कमी-जास्त असेल पण वेगवेगळ्या पातळीवरचे, वेगळ्या रूपातले शहाणपण साध्यासध्या नागरिकापाशी असल्याचा फार मोठे शहाणपण आढळून येते.
हे कसे काय शक्य होते? मेंदूत शहाणपणाचे केंद्र असते काय? असेल तर ते कुठे असते आणि कशाप्रकारे कारभार करते? व्यवहारातले कोणते घटक या क्रियेत गुंतले आहेत? शहाणपण हे नेमके आहे तरी काय? हे आणि असे अनेक प्रश्न, मानवी जीवनातील शहाणपणाचे अस्तित्व, त्याची भूमिका, स्वरूप आणि त्याची उपयुक्तता याचा शोध घेण्याचे काम स्टीफन हॉल यांनी केले. शहाणपण या संकल्पनेबाबत तत्त्वज्ञांनी, मानसशास्त्रज्ञांनी, वैज्ञानिकांनी वेळोवेळी मांडलेले विचार, सादर केलेले शोध-निबंध वाचून, अभ्यासून हॉल यांनी शहाणपण या संकल्पनेविषयी आपल्याला जे काही समजले, उमजले ते विस्डम : फ्रॉम फिलॉसॉफी टू न्युरोसायन्स या पुस्तकात मांडले. या विषयाच्या अनुषंगाने शहाणपणाशी निगडित असलेल्या लहानमोठ्या घटकांबाबत विचार करण्याचे प्रयत्न ज्यांनी केले त्यांच्या कामाचा, प्रयोगांचा, त्यांनी मांडलेल्या अनुमानांचा धांडोळा घेत हॉलनी हे लेखन केले आहे.
आपण एक साधेसुधे विज्ञान-पत्रकार आहोत, या विषयातले कोणी तज्ज्ञ नाही आहोत, हे स्टीफन हॉल यांनी सुरुवातीला सांगून टाकले असले तरी हॉल यांची व्यासंगी वृत्ती पुस्तकात पानोपानी दिसते. पुस्तकातल्या प्रकरणांची शीर्षके नजरेखालून घातली तरी हॉल या विषयाला सर्व बाजूंनी किती शिस्तशीरपणे भिडले आहेत हे लक्षात येते. ‘शहाणपण म्हणजे काय?’ ‘हृदय आणि मन’, ‘भावनिक नियंत्रण व्यवस्था’, नैतिक तार्किकता’, ‘धीर मोठ्या लाभासाठी अधिक काळ वाट पाहाण्यामागची जैविक प्रक्रिया’ ‘अनिश्चिततेशी सामना’, ‘त्यागी आणि परोपकारी भावना’, ‘सामाजिक न्याय’, ‘समता भाव’ ही त्यांच्या काही प्रकरणाची शीर्षके.
काही वेळा अत्यंत गुंतागुंतीचा निर्णय आपण चुटकीसरशी फार वैचारिक घोळ न घालता घेतो. आणि नंतर काही कालावधी उलटल्यावर तपासाअंती आपल्यालाच नवल वाटते, झटपट घेतलेला आपला निर्णय किती अचूक निघाला याचे. हे कसे काय घडते? आपण तर काय कोणी विचारवंत, साधुपुरुष नाही आहोत. शहाणपण या संज्ञेचा वेध घेताना या हॉल यांनी कोणताही लहान घटक बाजूला सारलेला नाही, आपले लिखाण त्यांनी विद्वज्जनांच्या खंडन मंडनात्मक चर्चेपुरते मर्यादित ठेवले नाही. जर निर्णय घेण्याची शक्ती प्रत्येक मानवापाशी असेल आणि ती शास्त्रोक्तपणे अभ्यासण्याची साधन-सुविधा अस्तित्वात असेल तर? तर आपली निर्णयशक्ती आपल्याला अधिक कार्यक्षम, अधिक निर्दोष बनवता येईल का? हॉल स्वतः यावर विचार करतात आणि आपल्याला विचार करायला लावतात.
शहाणपण केवळ अकादमिक पातळीवर न राहाता ते व्यावहारिक भूमीवर उतरले पाहिजे या ऊर्मीने ते शहाणपणाची संकल्पना मुळापासून समजून घेऊ पाहतात. या संकल्पनेच्या इतिहासाचा, काळानुसार त्यात होत गेलेल्या बदलाचा, तसेच वेळोवेळी समाजासमोर येत गेलेल्या नवनव्या वैचारिक मांडणीचा, हॉल शोध घेतात. जीवनोपयोगी चीज म्हणून शहाणपणाकडे पाहाता येईल का, त्याचे परिणामकारक व्यवस्थापन करता येईल का? त्यासाठी काही शास्त्रीय उपाययोजना उपलब्ध आहे का याची चाचपणी करणे हॉलना आवश्यक वाटते. शहाणपण थोडेबहुत जरी आत्मसात करता आले तर शहाणपणाशी थेट संबंध असलेली आपली निर्णय यंत्रणा अधिक निर्दोष होईल, हे हॉल यांचे म्हणणे कोणालाही मान्य व्हावे. पण असलेले शहाणपण विकसित करायच्या खरोखरच काही युक्त्या आहेत काय, किंवा मुळात शहाणपण नसेल तर ते कसे आत्मसात करायचं? शहाणपणाचे धडे देता येतात का? विस्डम : फ्रॉम फिलॉसॉफी टू न्युरोसायन्स हा या सर्व शंकांना बरोबर घेऊन केलेला लेखन प्रवास आहे. शहाणपणाचे अंतरंग आणि बाह्यरंग जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे. कोणताही पांडित्याचा अभिनिवेश न आणता हॉलनी शहाणपणाच्या संदर्भातल्या नव्या जुन्या संकल्पना आपल्या पुढे ठेवल्या आहेत.
शहाणपण या संकल्पनेबाबतच्या विद्वज्जनांच्या उलटसुलट विचारांचा यात समावेश आहे; या विद्वज्जनांत, मनोविकार तज्ज्ञ आहेत, साधुपुरुष आहेत आणि मेंदूशास्त्रज्ञही आहेत. या मंडळींनी आपल्या संशोधनातून, पाहणीतून आणि प्रयोगातून काढलेले निष्कर्ष समोर ठेवत हॉल या विषयाला भिडले आहेत. तत्त्वज्ञांच्या, शास्त्रज्ञांच्या मतांना त्यांनी आपल्या चिंतनाची जोड दिली आहे. नाहीतर हा उपक्रम म्हणजे शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ यांच्या मतांचा आणि मतांतरांचा संदर्भकोश झाला असता. विस्डम मधले हॉल यांच्या चिंतनाचे योगदान या विषयाच्या त्यांच्या व्यासंगाची, आस्थेची आणि सखोल निरीक्षणाची साक्ष पटवणारे आहे.
शहाणपणाच्या व्याख्या करण्याचे प्रयत्न अनेक झाले. पण शहाणपणा बाळगायला आणि शहाणी कृती करायला शहाणपणाची व्याख्या माहीत असण्याची आवश्यकता नसते. प्राप्त परिस्थितीत शहाणी कृती कोणती हे ताडण्याची आंतरिक जाणीव आपल्यापैकी सगळ्यांपाशी असते. हॉल यांनी स्वतःचे उदाहरण देऊन हे आपल्या मनावर विंबवायचा प्रयत्न केला आहे. पण त्यांचे हे विधान थोडे चिकित्सकपणे तपासावे लागेल. प्रसंगावधान आणि शहाणपण याची गल्लत करून चालणार नाही. प्रतिक्षिप्त क्रियेवरून व्यक्तीच्या वैचारिक क्षमतेचा अंदाज घेणे योग्य ठरणार नाही. शिवाय हॉल यांची गणना सामान्य माणसात करून चालणार नाही. शहाणपण म्हणजे काय हे ओळखायचे उपजत शहाणपण सर्वसाधारण माणसापाशी असते असा निष्कर्ष हॉल यांच्या अनुभवातून काढता येणार नाही. आढळून येणाऱ्या माणसाच्या शहाणपणावर. इथे जरा गोंधळ आहे. शहाणपणाची सर्वसाधारण माणसाची समज त्याच्या मानसिक जडणघडणीवर, दृष्टिकोणावर बेतलेली असल्याने ती निर्दोष असेलच नाही. आपली कृती शहाणपणाचीच आहे यावर प्रत्येकाचा ठाम विश्वास असतो हे मात्र सर्वत्र अनुभवाला येते. आपल्या देशाचे वास्तव लक्षात घेतले तर व्यक्तिगत हटवादीपण शहाणपणावर मात करते असे आढळून येईल. अनेकदा हे ते हटवादीपण, ही हेकेखोर वृत्ती समाजाच्याच नव्हे तर त्या व्यक्तीच्या व्यक्तिगत विकासाच्याही आड येतानाही दिसेल.
शहाणपणाची कृती असे जरी आपण म्हणत असलो तरी काही वेळा कृती न करणे ही देखील एक शहाणपणाची कृती ठरते याचीही नोंद हॉल यांनी घेतली आहे. विशिष्ट क्षणी प्रतिक्रियात्मक हालचाल न करणे, विशिष्ट कृती करण्यापासून स्वतःला रोखून धरणे ही एक वैचारिक कृती असते; ठरवून घेतलेला तो एक शहाणा निर्णय असतो. विद्वज्जनांनी आपल्या निरीक्षणातून शहाणपणाच्या व्याख्या करायचा प्रयत्न केला खरा पण सर्वसमावेशक व्याख्या अजून हाताशी लगलेली नाही.
शहाणपण म्हणजे काय याचा शोध घेण्याचे काम लहानमोठे सारे आपल्या बौद्धिक पातळीनुसार करत आले आहेत. बऱ्याचदा आपुलाचि संवाद आपणासी अशीच ही शोध प्रक्रिया बनते. शहाणपणाचा अवलंब करून आपल्याला आपल्या जीवनशैलीचा गुणात्मक दर्जा कसा सुधारता येईल यासाठीच माणसे आयुष्यभर कळत नकळत धडपड करत राहातात. हॉलनी लहानसहान उदाहरणे देऊन हे सारे नीट मांडले आहे.
वरकरणी साध्या वाटणाऱ्या पण अंमळ थांबून खोलवर विचार करावा अशा योग्यतेच्या गोष्टी या पुस्तकात सर्वत्र विखुरलेल्या आहेत. विचारवंतांच्या विधानांवर त्यामागील गृहीतकांवर आक्षेप घेण्याचे हॉलनी टाळले आहे. मात्र विचारवंतांच्या विधानांवर इतर विचारवंतांचे आक्षेप किंवा त्यांच्या संशोधनातून नकळतपणे व्यक्त झालेले आक्षेप या पुस्तकात बरेच आहेत. चित्त स्थिर ठेवून हे सारे ग्रहण केले नाही तर मनाचा गोंधळ उडण्याची शक्यता आहे.
तत्त्वज्ञान, मेंदू विज्ञान, अध्यात्म अशा या विषयाशी जोडल्या गेलेल्या तीन्ही क्षेत्रांत हॉल सहजत्या फेरफटका मारतात. शहाणपण या संकल्पनेचा सखोल वेध घेण्याचे काम अखंड चालणारे असून या तिन्ही शाखांना हातात हात घालून हे काम करावे लागणार हे यातून सूचित होत राहाते. मेंदूविज्ञानक्षेत्रात संशोधनासाठी उपयुक्त अशी अत्याधुनिक तांत्रिक उपकरणे अलीकडे विकसित झाली आहेत. त्यांनी या कामाला वेग आला आहे. शहाणपणाचा उगम, शहाणपणाची व्यवहारातली अभिव्यक्ती, उपयुक्तता याचा जैविक परिप्रेक्ष्यातून अभ्यास करण्यासाठी आता मेंदू-विज्ञानक्षेत्रातले जे संशोधक आणि तज्ज्ञ पुढे सरसावले आहेत. त्यांचा उत्साह या नव्या साधनांमुळे वाढला आहे. नवनवी निरीक्षणे, नवी माहिती पुढे येण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे.
स्मरणशक्ती आणि मानवापाशी असलेली तार्किक बुद्धी यांचे शहाणपणाशी जे नाते आहे; ते काय स्वरूपाचे आहे हे तपासायच्या कामी हार्वर्ड विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाचे प्रमुख आणि मेंदू-विज्ञानतज्ज्ञ स्टीफन कोसलीन यांनी विशेष रस दाखवला, ही स्वागतार्ह घटना असल्याचे हॉल यांनी पुस्तकात नमूद केले आहे. स्मरणशक्तीचे विविध प्रकार असल्याचे शास्त्रज्ञांच्या आता लक्षात येऊ लागले आहे. आपल्याला ज्ञात नसलेल्या स्मरणश्यक्तीच्या प्रकाराचे नाते शहाणपणाशी असण्याची शक्यता कोसलीनने बोलून दाखवली.
स्वतःच्या आत डोकावून पहा असे अध्यात्म सांगत असते. एकापरीने यायोगे माणसाच्या स्वकेंद्री वृत्तीला उत्तेजन द्यायचे काम अध्यात्म करत आले आहे, असे काहींना वाटते. अध्यात्माच्या समर्थकांना या आक्षेपाचे अजून खंडन करता आलेले नाही. वैज्ञानिकांच्या कार्यपद्धतीवर असे आक्षेप घेता येणार नाहीत. विज्ञानाच्या परिप्रेक्ष्यातून शहाणपणाचे रूप बरेच व्यापक आहे. अध्यात्माप्रमाणे स्वजाणीवेकडे डोळसपणे पाहायला लावणे हा शहाणपणाचा एक भाग आहे यात शंका नाही. पण कायम स्वकेंद्रित न राहता बाहेरील बाहेरील जगाची आस्थापूर्वक जाणीव बाळगणे शहाणपणात अभिप्रेत आहे. बहिर्मुखता हा शहाणपण या संकल्पनेचा दुसरा आणि अधिक महत्त्वाचा भाग आहे. हॉल यांच्या मते हा शहाणपण या संकल्पनेचा हा गाभा आहे. स्वतःच्या विश्वाबाहेरील विश्वाचा संदर्भ सतत समोर ठेवून स्वजाणिवेची समीक्षा करायला शहाणपण शिकवते. आपल्याभोवती जग आहे, समाज आहे याचे भान आपल्या दैनंदिन व्यवहारांत, विचारांत असायला पाहिजे. दुसऱ्याविषयीची आस्था, निःस्वार्थीपण, अनुकंपा, दुसऱ्यासाठी त्याग करण्याची प्रेरणा, परोपकारी भाव इत्यादी मानवी संवेदना हा मानवी मूल्यव्यवस्थेचा आत्मा आहे. या सर्व घटकांचा शहाणपणाशी असलेला अतूट धागा स्पष्ट करण्यासाठी हॉलनी विस्डम : फ्रॉम फिलॉसॉफी टू न्युरोसायन्स या ग्रंथात वरील प्रत्येक घटकावर स्वतंत्र प्रकरणे लिहिली आहेत.
समग्रतेचे सतत भान ठेवायचे हे शिक्षण म्हणजेच शहाणपण. मानवी समाजाच्या उन्नयनासाठी धडपड करायची, सद्यः पर्यावरणात सुपरिवर्तन घडवण्यासाठी किंवा आमूलाग्र बदल घडवून नवे पर्यावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहायचे हे सर्व शहाणपणात अंतर्भूत आहे. इथे पर्यावरणाचा अर्थ भोवतालच्या निसर्गापुरता मर्यादित नाही तर मानवी नातेसंबंधातील भावनिक पर्यावरणाशीही तो संबंधित आहे. शहाण्या विचारावर आधारलेल्या व्यवस्थेत कुटुंबांतर्गत आणि समाजांतर्गत चांगले वातावरण निर्माण करण्याची क्षमता असते किंवा असावी लागते. हॉल यांच्या चिंतनात यावर भर आहे.
शहाणपणा या संकल्पनेचे भावना या घटकाशी असलेल्या नात्याचे निरीक्षण आणि त्यातून उद्भवलेली उद्बोधक चर्चा पुस्तकात आहे. सुरवातीच्या काळात भावना हा तत्त्वज्ञानी मंडळींच्या अखत्यारीतला विषय समजला जायचा. वैज्ञानिकांना देखील भावभावनांचे विश्व, हा आपला प्रांत नाही असे वाटायचे. भावभावना ही शरीरशास्त्राशी निगडित चीज आहे; जैवविज्ञानाच्या अभ्यासाचा ती विषय बनू शकते हे आता वैज्ञानिकांना कळून चुकले आहे. पण हे आकलन अगदी अलीकडले म्हणजे एकोणीसाव्या शतकाच्या उतरार्धातले. व्हिव्हियन क्लेटन या मनोविकारतज्ज्ञ महिलेने या विषयावर संशोधनपर निबंध सादर केले. शहाण्या कृतीत भावना हा मुख्य घटक असल्याचे तिने पहिल्यांदा ठामपणे मांडले. यावरल्या तिच्या सखोल संशोधनाची आणि सिद्धान्ताची दखल पुढील संशोधकांना घ्यावी लागली. मेंदू संशोधनाला गती मिळाल्यापासून मानवी निर्णयप्रक्रियेत भावनोद्दीपन किती महत्त्वाची कामगिरी बजावते हे अधिक सुस्पष्टपणे पुढे येत चालले आहे. भावना सुबुद्ध निर्णयात अडथळे निर्माण करते, भावना दूर सारून घेतलेले निर्णय हे अधिक सुबुद्ध असतात, हे पूर्वापार समज खोटे असल्याचे नव्या संशोधनात आढळून आले. निर्णयप्रक्रियेत भावना कोणती विधायक भूमिका बजावते; भावनांची सुयोग्य आणि प्रमाणित हाताळणी निर्णयात परिपक्वता आणते हे वैज्ञानिक चाचण्यांत दिसून आले आहे. थोडक्यात, भावना आणि शहाणपण यांची उत्तम सांगड आपल्याला शहाण्या मार्गाने नेते. भावनांचे उत्सर्जन विधायक आणि विघातक अशा दोन्ही भूमिका बजावत असते हेही आता मान्य होऊ लागले आहे. भावना या घटकाचा निर्णय प्रक्रियेतल्या हस्तक्षेपाचे प्रमाण किती असू द्यावे हे ठरवण्याचे शहाणपण व्यक्तीपाशी असायला हवे हे मात्र खरे आहे. निर्णयासाठी समोर आलेला पेचप्रश्न आणि इतर तत्कालीन संदर्भ यांवर हे प्रमाण अवलंबून राहणार हेही तितकेच खरे आहे. या वैज्ञानिक प्रांतात कुठलेही फॉर्म्युले नाहीत. हॉल यांनी निरीक्षण आणि प्रयोग यांचे दाखले देऊन विस्तृत विवेचन केले आहे.
शहाणपणाविषयी विचार करताना; निरीक्षणावर आधारित काही अनुमाने मांडू पाहताना एक भान कायम बाळगावे लागते ते म्हणजे एका क्षेत्रातले शहाणपण दुसऱ्या क्षेत्रात वेडेपण ठरू शकते; कारण शहाणपण संदर्भनिष्ठ असते. शहाणपण हे त्याच्या सर्व कंगोऱ्यांसह नीट समजून घेण्यासाठीदेखील आपल्या अंगी मोठे शहाणपण असावे लागते असे हॉलनी म्हटले आहे. स्वतः स्टीफन हॉल पत्रकारितेच्या क्षेत्रातले. त्यांना तुलनेने अपरिचित असलेल्या तत्त्वज्ञान आणि विज्ञान या अशा विषयात ते उतरले. त्यांना वास्तविक मेंदूविज्ञानावर पुस्तक लिहायचे होते, मेंदूवैज्ञानिकांनी त्यांना या विषयावर पुस्तक लिहायचा आग्रह केला. मग चौफेर वाचन आणि संशोधन करून हॉल यांनी शहाणपण या संज्ञेचा मागोवा घ्यायला सुरुवात केली.
शहाणपण सामाजिक बांधिलकी मानते आणि, नुसते मानत नाही तर शहाण्या निर्णयाचा आणि त्यातून आकाराला आलेल्या नवनिर्माणाचा डोलारा समाजकल्याण आणि सहजीवन ह्यांवर उभारलेला आहे. हॉल यांनी हे ओळखले. शहाण्या विचारांना कृतीची जोड नसेल तर त्यात काही अर्थ नाही असे स्पष्ट प्रतिपादन त्यांनी पुस्तकात केले आहे. विचार हीच एक कृती आहे असे म्हणून आपल्या कृतिशून्यतेचे समर्थन करणाऱ्या आपल्याकडल्या पोथीनिष्ठ विचारवंतांनी या मुद्द्यांवर विचार करण्याची आणि आपल्या सद्यः भूमिकेची फेरतपासणी करायची गरज आहे.
काळ वेळ आणि परिस्थितीचे तारतम्य बाळगून केलेला आपल्या बुद्धीचा आणि ज्ञानाचा अचूक आणि प्रसंगोचित वापर अशी शहाणपणाची ढोबळ व्याख्या करता येईल. बुद्धीला समाजाभिमुखतेशी देणेघेणे असेलच असे नाही. मात्र समाज-मूल्याचे अधिष्ठान हा शहाणपणाचा गाभा आहे क्लेटनने स्पष्ट केले आहे. समाजाच्या मानसिक, नैतिक पर्यावरणात समाजहितदायी असा अनूकूल बदल घडवून आणण्यासाठी बुद्धीचा वापर करणे अधिक शहाणपणाचे मानायला हवे हे कोणीही मान्य करील. शहाण्या कतीमागे हा हेत असायला हवा. शहाणपणाच्या वैशिष्टयपूर्ण पैलूंचे दर्शन घडवताना हॉल यांनी या उद्दिष्टाचा जोरदार पुरस्कार केला आहे.
संस्कारक्षम वयातच चांगल्या मूल्यांची बीजे पेरली गेली पाहिजेत असे आपण म्हणतो. विद्यार्थी जीवनालील ज्ञान संपादनाच्या क्रियेला शहाणपणाची मिती असणे महत्त्वाचे आहे हे विचारवंतांच्या लक्षात येऊ लागले आणि शहाणपणाचे धडे अभ्यासक्रमात कशाप्रकारे समाविष्ट करता येतील यावर विचार चालू झाला. अमेरिकेत टफ्ट (Tuft) विद्यापीठाचे डीन रॉबर्ट स्टनबर्ग यांनी याबाबतीत पहिली पावले टाकली. दैनंदिन शिक्षणक्रमाच्या जोडीने विद्यार्थ्यांना शहाणपण शिकवता येईल का हे अजमावण्याचे प्रयोग त्यांनी सुरू केले आणि त्याला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला. आपल्याकडे मूल्यशिक्षणाचा अंतर्भाव शालेय शिक्षणात करण्याचे जे प्रयत्न झाले ते काहीसे याच स्वरूपाचे होते. मात्र या प्रकल्पाचा पाठपुरावा करून त्याचे परिणाम तपासण्याची तसदी समाज-संशोधकांनी वा प्रशासनाने घेतली नाही.
शहाणपणावर आधारलेल्या निर्णयप्रक्रियेची गरज उद्योगक्षेत्रातही मोलाची ठरू शकते. पाश्चात्त्य जगात अलीकडे जे आर्थिक अरिष्ट कोसळले त्याच्या मुळाशी फाजील आर्थिक हाव होती हे आता उघड झाले आहे. केवळ आर्थिक क्षेत्रातल्या अज्ञानमूलक व्यवहाराचे हे फलित नव्हते तर त्या क्षेत्रातल्या मूल्यहीन बौद्धिक दिवाळखोरीची ती परिणती होती. धंद्याच्या क्षेत्रात नीतिमत्तेला थारा नसतो असा पूर्वापार समज आहे. व्यवसायाची गणिते नीट सांभाळण्यासाठी, आर्थिक अंदाजाचा अचूक वेध घेण्यासाठी, योग्य वेळी योग्य व्यवसायिक निर्णय घेण्यासाठी बौद्धिक तारतम्याची म्हणजेच शहाणपणाची किती गरज आहे नव्याने सांगायची गरज नाही. पण हा निर्णय नैतिकतेची बूज राखणारा असावा. खाजगी व्यवसायक्षेत्रात हा विचार रुजवायचे प्रयत्न आता सुरू झाले आहेत. व्यावसायिक क्षेत्रात निव्वळ व्यवसायनिष्ठ बुद्धिमत्ता पुरेशी नसते. सर्व व्यावसायिक हालचालीमागे शहाणपणाचे अस्तित्व गरजेचे आहे. कार्यक्षेत्रात शहाणपणचे स्वरूप कोणत्या प्रकारचे हवे आणि ते कशासाठी हवे; व्यवहारात ते कसे उतरवता येईल यावर हॉल यांनी विवेचन केले आहे. कॉर्पोरेट जगतातल्या प्रत्येकाने ते नीट समजून घेणे आवश्यक आहे. समाजहिताची मूल्ये पायदळी न तुडवता नैतिकता अबाधित ठेवून स्पर्धेचे वातावरण टिकवता येते. फक्त त्यासाठी व्यावसायिक शहाणपणाची तत्त्वे जाणून घ्यायची आणि ती प्रयत्नपूर्वक प्रत्यक्षात आणायची इच्छा असली पाहिजे.
नम्रता किंवा विनयशीलता याचे शहाणपणाशी किती अतूट नाते आहे हे ठसवण्यासाठी हॉलनी महात्मा गांधीच्या व्यक्तिमत्त्वावर, लंडनच्या वास्तव्यातील त्यांच्या जडणघडणीवर दोन पानी मजकूर लिहिला आहे. अरेरावी आणि उद्धटपणा हा एखादे उपयुक्त मूल्य असल्याप्रमाणे आज समाजात मिरवला जातो आहे, या पार्श्वभूमीवर विनम्रतेमागील शहाणी भूमिका आणि तिचे सामर्थ्य नीटपणे समजून घेण्याची आत्यंतिक आवश्यकता आहे. विनयशील स्वभाव हा शहाण्या व्यक्तिमत्त्वाचे अविभाज्य अंग असल्याचे प्रतिपादन करणारे एक पूर्ण प्रकरण पुस्तकात सापडते. एक अहिंसक अस्त्र म्हणून गांधीजींना तत्कालीन राजकीय चळवळीत आपल्या विनम्र व्यक्तिमत्त्वाचा कसा आणि किती लाभ झाला हे आपल्याला ज्ञात आहे.
परिस्थितीनुरूप आपल्या आधीच्या वैचारिक चौकटीची पुनर्तपासणी आणि त्यानुसार आधीच्या निर्णयातला फेरफार ही देखील शहाणी कृती आहे. यासाठीही महात्मा गांधीकडेच आदर्श म्हणन पाहावे लागेल. शहाणे नेते देशाला शहाण्या दिशेने नेतात. शहाण्या नेत्याची निवड करण्याचे सामूहिक शहाणपण समाजाकडे असणे गरजेचे असते. ज्या समाजाला, ज्या देशाला असे नेते लाभले किंवा निवडता आले, शहाणपणाचा मार्ग अवलंबायचे शहाणपण दाखवता आले तो समाज, तो देश प्रगतीच्या दिशेने अधिक वेगाने झेपावला. खरे तर एखाद दुसऱ्या देशापुरते हे मर्यादित नाही. संपूर्ण विश्वात प्रगतिपथावरल्या पडणाऱ्या प्रत्येक मानवी पावलामागे शहाणे विचार आहेत.
पूर्वसूरींची विद्वज्जनांची, धार्मिक नेत्यांची बोधवचने सोडली तर शहाण्या विचाराला त्या त्या काळाची चौकट असते. अनेकदा शहाणपण स्थलसापेक्षही असते. शहाणपण ही किती घटकांनी मिळून आकाराला आणलेली आणि नियंत्रित केलेली गुंतागुंतीची प्रक्रिया
आहे हे विस्डम वाचल्यावर प्रकर्षाने जाणवते. शहाणपणाचे विज्ञान नावाची स्वतंत्र ज्ञानशाखा विज्ञानात अस्तित्वात आहे का? असेल तर या विज्ञानाचा आधार घेऊन जीवनात अचूक निर्णय घ्यायला तिची मदत होईल का? त्यायोगे आपल्याला मनाला शिस्त लावता येईल का? हे विज्ञान आत्मसात करून आपले, आपल्या परिवाराचे आणि समाजाचे भले साधता येईल का? असे प्रश्न स्टीफन हॉलनी पुस्तकात उपस्थित केले आहेत. पुस्तकातले एकूण विवेचन या प्रश्नांची थेट उत्तरे देत नाही. शहाणपणावरले कोणतेच पुस्तक रेडिमेड स्वरूपात जीवनोपयोगी शहाणपण हातावर ठेवत नाही. विस्डम मधले शहाणे विवेचन भोवतालच्या प्रश्नांकडे तात्त्विक आणि वैज्ञानिक दृष्टिकोणातून पाहायला लावते. शहाणपण या संकल्पनेच्या संदर्भातले विद्वज्जनांचे, शास्त्रज्ञांचे विविध दृष्टिकोण आणि चिंतनशील विचार हॉल यांनी आपल्यासमोर ठेवले आहेत. थेट शिकवण देण्याऐवजी इथे विविध शिकवणींची चिकित्सक मांडणी आहे. विस्डम : फ्रॉम फिलॉसॉफी टू न्युरोसायन्स चा हा शहाणा आकृतिबंध पुस्तकात ज्या विषयाचा ऊहापोह केला आहे त्याला साजेल असा आहे.
समाजाला शहाणपण शिकवायचे प्रयत्न आपल्याकडेही काही प्रमाणात झाले. प्रशासकीय आणि राजकीय शहाणपण शिवाजी महाराजांनी दाखवले. शहाणा राजा म्हणून आजही त्यांचा गौरवाने उल्लेख होतो.संतमंडळींनी समाजाला हिताच्या चार गोष्टी सांगायचा प्रयत्न केला. प्रत्येक संतांच्या रचना, शब्द वेगळे असले तरी संदेश एकच होता. समता, मानवता आणि बंधभावाचा संदेश. दर्देवाने संतमहात्म्यांची वैचारिकता अंतिमतः ईश्वरशरण भाववृत्तीकडे अधिक झुकत गेली. त्यातून भजनी वृत्ती वाढीला लागली. सॉक्रेटिस आस्तिक होता. त्याचा अधूनमधून ईश्वराशी संवाद चाले. मात्र आपल्या वैचारिक शिकवणुकीत सक्रिटिसने देव, धर्म आणले नाहीत. आद्य सेक्युलर विचारवंत म्हणून तो ओळखला जातो. ‘शहाणे करून सोडावे सकल जन’ या भावनेने प्रबोधनाचे काम करणारे समाज धुरंधर हे सारे शहाण्या विचारांचे दूत म्हणता येतील. पण या शहाण्या माणसांचे दैवतीकरण करण्याच्या वृत्तीमुळेही आपला समाज शहाणपणापासून दूर सरकत गेला. त्या आधीच्या काळात पुराणकथांतून, मिथकांतून समाजाला बरेवाईट शिक्षण देण्याचे प्रयत्न झाले. महाभारतासारख्या महाकाव्यात विपुल शहाणपण विखुरलेले आहे. जगभरातले उत्तम वाङ्य मानवतावाद, सेवाभाव, बंधुभाव यासारखी मूल्ये उचलून धरणारे आहे. आपल्या मराठी समाजापुरते बोलायचे तर लोकमान्य टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर, गोपाळराव आगरकर, जोतीबा फुले यांनी समाजशिक्षण हेच उद्दिष्ट ठेवून लेखन केले. वि.स.खांडेकर, पं. महादेवशास्त्री जोशी यांच्या कथा-कादंबऱ्यांत आदर्शवादी मूल्यांचा अतिरेक झाला असेल, पण तेही समाज शहाणा करून सोडण्याच्या प्रामाणिक हेतूने लिहिले गेले आहे ही वस्तुस्थिती नजरेआड करून चालणार नाही. आजच्या मराठी साहित्याने या भूमिकेपासून फारकत घेतली आहे असे म्हणता येत नाही.
प्राचीन साहित्यातल्या हॅन्स अँडरसनच्या परिकथा, खलिल जिब्रानच्या रूपककथा, बोधिसत्त्वाच्या जातककथा, पंचतंत्र, झेनकथा आणि अगदी आजीकडून नातवाला सांगितल्या जाणाऱ्या गोष्टी हे सारे आजच्या आधुनिक विश्वातही घट्ट पाय रोवून उभे आहे. याचे कारण काळ कोणताही असो, देश कुठलाही असो शहाणपणाला पर्याय नाही. हे सर्व कोठून येते याच प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी या मानवनिर्मित पर्यावरणाकडे संशोधक वृत्तीने पाहावे लागेल.
Wisdom: From Philosophy to Neuroscience – by Stephen S. Hall

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.