मी नाही केले, माझ्या मेंदूने करायला लावले ! (माय ब्रेन मेड मि डू इट : एलाजर स्टर्नबर्गच्या पुस्तकाचा परिचय)

मानवी इतिहास म्हणजे माणूस व निसर्गातील चढाओढीची कथाच. माणसाने निसर्ग आजमावण्याचा आणि त्याच्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. निसर्गाच्या चमत्कारांनी तो स्तिमित झाला आणि प्रश्न विचारू लागला. यांतल्या कित्येक प्रश्नांची उत्तरे मिळविताना आपण कितीतरी पुढे आलो आहोत, पण तरीही या प्रश्नांची लांबीरुंदी मात्र फारशी कमी झालेली नाही. काही बाबतीत तर आपण अश्या पायरीवर आलो आहोत, जिथे या प्रश्नांच्या उत्तरांनी आपला गोंधळ अधिकच वाढतो आहे. गोंधळात टाकायला सुरुवात केली आहे.
‘माय ब्रेन मेड मी डू इट : द राइज ऑफ न्यूरोसायन्स एण्ड द थ्रेट टू मॉरल रिस्पॉसिबिलिटी’ हे बडिस युनिव्हर्सिटीत न्यूरोसायन्स आणि तत्त्वज्ञानाचा विद्यार्थी असलेल्या एलायजर स्टर्नबर्ग या बावीस वर्षीय तरुणाने लिहिलेले पुस्तक. आपल्या अत्यंत आवडीच्या दोन विषयांना एकत्र आणताना तो मानवी मेंदूच्या अभ्यासातील एक सर्वांत मोठे द्वंद्व सोडवण्याचा प्रयत्न करतो; ते म्हणजे, आपल्या कृतींवर आपले प्रत्यक्ष नियंत्रण असते की नाही. माणूस म्हणून आपण इतर सजीवांपेक्षा अधिक प्रगत, बुद्धिमान आणि विशेष आहोत, असे वाटून घ्यायला आपल्याला आवडते. बहुतेकांच्या मते या विशेषत्वाचे कारण म्हणजे आपली विचार करण्याची आणि स्वेच्छे’ (free will) ने आपले वर्तन स्वतःहून नियंत्रित करण्याची शक्ती. मात्र मेंदू-विज्ञानातील (neuroscience) नवे संशोधन या गृहीतकाला धक्का देते. आपली प्रत्येक कृती ही आपल्या मेंदूतील सूक्ष्म चेतापेशींद्वारे स्रवल्या आणि स्वीकारल्या जाणाऱ्या रसायनांचा परिणाम असते, असे मेंदूचा जीव-रसायनशास्त्रीय (bio chemical) अभ्यास, नवे मेंदू प्रतिमापन तंत्रज्ञान आणि वैद्यकीय संशोधन दर्शवते. अत्यंत गुंतागुंतीच्या अशा चेतापेशीय जाळ्यांमध्ये निरंतरपणे होत असलेल्या रासायनिक आणि विद्युत संदेशांच्या देवाणघेवाणीतून आपला भवताल जाणून घेण्याची आणि त्यावर प्रतिक्रिया देण्याची प्रक्रिया घडून येत असते. मग इथे ‘मी’ची भूमिका कुठे येते? असा काही ‘मी’ असतो का? माझे शरीर करीत असलेल्या चांगल्या-वाईट कृतींचे श्रेय या ‘मी’ला जाते का? विधिनिषेध जाणणारी एक व्यक्ती म्हणून माझ्या कृतींसाठी या ‘मी’ला जबाबदार ठरवता येते का? की ‘मी’ म्हणजे केवळ माझ्या मेंदूतील विशिष्ट कळ दाबली की चालणारे आणि बोलणारे फक्त यंत्र आहे!
स्टर्नबर्गने ‘नियतिवाद’ (determinism) आणि ‘स्वेच्छा’ (free will) या विज्ञान आणि तत्त्वज्ञानाच्या सीमारेषेवरील संकल्पनांवर अनेक उदाहरणांसह आणि सुगम शैलीत लिहिले आहे. ज्यांवर आपली सामाजिक व्यवस्था उभारली आहे त्या आपल्या नैतिकताविषयक कल्पनांना धक्का द्यायला सर्वांत प्रथम वैद्यकीय क्षेत्रातील निरीक्षणांनी सुरुवात केली. स्वेच्छाविषयक प्रश्नाचा उगम कोठे झाला, तो प्रश्न विचारला जाण्याची गरज का आहे, आणि तो समाधानकारकपणे कसा सोडवता येईल; हे त्याने साहित्य, मिथके, इतिहास आणि विज्ञानातील उदाहरणे देऊन मांडले आहे. तो पुस्तकाची तीन भागांत विभागणी करतो; प्रकरण एक ते चारमध्ये ‘स्वेच्छे’चा प्रश्न आणि त्यातून निघणारे निष्कर्ष; प्रकरण पाच ते तेरा मध्ये ‘स्वेच्छे’च्या अस्तित्वाविषयी शंका निर्माण करणाऱ्या वैज्ञानिक संशोधनांची चर्चा; आणि प्रकरण चौदा ते अठरा मध्ये मेंदू-विज्ञान आणि ‘स्वेच्छे’च्या सहअस्तित्वाच्या शक्यतांचा वेध घेतला आहे.
स्टर्नबर्गला एखाद्या विस्तृत कथेतून, साहित्यातील एखादा उतारा देऊन किंवा एखादा ऐतिहासिक प्रसंग सांगून प्रकरणाची सुरुवात करायला आवडते. पहिल्या प्रकरणाची सुरुवात एका गुन्ह्याच्या प्रसंगाने होते. एक माणूस दुकानात प्रवेश करतो आणि दुकानदाराची गोळी घालून हत्या करतो. आरोपी पकडला गेल्यानंतर वैद्यकीय चाचणीमध्ये आरोपीच्या मेंदूतील एका विशिष्ट रसायनात झालेली लहानशी वाढ वगळता इतर काहीच कारण दिसून येत नाही. गुन्ह्यासाठी ती व्यक्ती नव्हे तर त्याचा मेंदू जबाबदार होता, हे सांगण्यासाठी बचाव पक्षाचे वकील या निष्कर्षाचा उपयोग करू पाहतात. त्याने स्वतःच्या इच्छेने गुन्हा केला नसल्यामुळे गुन्ह्यासाठी त्याला जबाबदार धरले जाऊ नये, असा बचाव ते देतात.
एखादी कृती करण्यासाठी कुठल्या क्षणी निर्णय घेतला जातो ती अचूक वेळ निश्चितपणे सांगता येईल का? या प्रश्नावर लेखक पुढे चर्चा करतो. ‘अ’ या क्षणी आपल्यासमोर पर्याय असतात आणि उपलब्ध पर्याय व त्याच्या परिणामांची जाणीव असते. ‘ब’ या क्षणी आपण निर्णय घेतो. तेव्हा ‘अ’ आणि ‘ब’ बिंदूंच्या मधल्या वेळात निर्णय घेतला जातो. इथे प्रसिद्ध तत्त्वज्ञ जॉन सर्लचा दाखला देत स्टर्नबर्ग म्हणतो, की जर ‘अ’ या क्षणी घडत असलेल्या मानवी मेंदूतील सर्व चेतापेशीय घडामोडी ‘ब’ या क्षणी घेतल्या जाणाऱ्या निर्णयाप्रत पोहोचण्यासाठी पुरेश्या असतील, तर निर्णय घेण्यासाठी जाणीव किंवा ‘स्वेच्छे’ची गरज नसते. अन्यथा निर्णय घेण्यासाठी ‘स्वेच्छे’चा सहभाग लागतो, आणि म्हणून त्या कृतीची नैतिक जबाबदारी घ्यावी लागते.
सैद्धान्तिकदृष्ट्या हे सत्य आहे, मात्र प्रत्यक्षात ‘एकूण चेतापेशीय सक्रियते’च्या मोजमापाची कल्पनाही करणे कसे अशक्य आहे याकडे मात्र लेखक दुर्लक्ष करतो. एका नवजात बालकाच्या मेंदूत सुमारे शंभर अब्ज चेतापेशी असतात, ज्यांतील प्रत्येक पेशी जवळपास इतर हजार पेशींशी जोडलेली असते. या चेतापेशीय दुव्यांची (synapses) जोडणी किती प्रकारे होऊ शकेल? ती संख्या अफाट मोठी आहे. वाढते वय आणि अनुभवांसोबत या दुव्यांमध्ये (synapses) अधिकाधिक भर पडत राहते. हे पुस्तक मेंदूची विलक्षण गुंतागुंत, या गोष्टीकडे कानाडोळा करते.
पुस्तकाच्या या सुरुवातीच्या टप्प्यावरच लेखकाचा कल लक्षात येतो. आपली कायदेव्यवस्था ‘स्वेच्छे’च्या गृहीतकावर आधारित आहे. (आपले नातेसंबंध, एखादी व्यक्ती आवडणे किंवा न आवडण्याविषयीची आपली कारणे, लोकांना दोषी ठरवणे किंवा श्रेय देणे हे लोक जे काही करतात ते सर्व पूर्णपणे स्वेच्छेने आणि जाणीवपूर्वक करतात, याच गृहीतकावर आधारित आहे. यामुळे हे गृहीतक सोडून देणे इतके सहजसोपे नक्कीच नाही.
स्टर्नबर्ग ‘चेताजीवशास्त्रीय नियतिवादा’ची कल्पना पुढीलप्रमाणे मांडतो. “…प्रत्येक मानवाच्या विचार आणि कृती या पूर्णपणे मेंदूतील रासायनिक घडामोडींनी निश्चित केलेल्या आहेत.” तो म्हणतो की जीवशास्त्रज्ञांच्या मते शरीरातील प्रत्येक कृती ही पूर्वनियोजित रासायनिक आणि भौतिक आंतरक्रियांची साखळी असते; आणि तो “मग मेंदूच्या सर्व कृती या पूर्वनियोजित प्रक्रियांनी बद्ध असतात’ या निष्कर्षाप्रत येतो. आपल्या निवडी, आपल्या इच्छा, आपल्या श्रद्धा, आपल्या प्रतिक्रिया; सर्व काही चेतापेशीय आंतरक्रियांनी निश्चित केलेले असते.” “…तुमच्या मेंदूविषयी पुरेशी माहिती पुरविली तर एक चेताशास्त्रज्ञ तुमचे विचार कृती आणि भविष्याबद्दलही अंदाज वर्तवू शकेल.” असा निष्कर्ष त्यातून निघतो.
ऐच्छिक निर्णय मेंदूच्या कुठल्या भागात घेतले जातात याकडे निर्देश करण्याचा प्रयत्न स्टर्नबर्ग करतो. Tourette’s, Huntington’s and the ‘alien hand’ syn drome मनोविकारांतील चेताशास्त्रीय (neurological) दोष आणि ते मानवी वर्तनावर कशा प्रकारे परिणाम करतात, याविषयीची उदाहरणे तो देतो. या विकारांमधील लक्षणे ही स्वेच्छेच्या अभावाची उदाहरणे आहेत. आणि ती मेंदूच्या विशिष्ट भागांना हानी पोहोचल्यामुळे निर्माण होतात असा दावा तो करतो. पार्श्वखंड हाच ‘स्वेच्छेचे’ उगमस्थान असण्याची शक्यता तो व्यक्त करतो.
स्टर्नबर्ग बेंजामिन लिबेटच्या प्रयोगाबद्दल पुस्तकात माहिती देतो. [ही माहिती इतरत्र आली आहे – सं.1, पण त्याच्याशी तो सहमत आहे की नाही याबद्दल काहीच बोलत नाही.
तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात नवख्या असलेल्या व्यक्तीच्या दृष्टीतून स्टर्नर्बच्या पुस्तकाची जमेची बाजू म्हणजे तत्त्वज्ञ आणि त्यांच्या कल्पनांविषयी पुस्तकात असलेली मुबलक माहिती. तो वाचकाला उद्भूत गुणधर्म (emergent property) या कल्पनेचा परिचय काही रंजक उदाहरणांसह करून देतो. उदा., सोडियम आणि क्लोरीन हे दोन्हीही वस्तुतः खाद्यही नसतात आणि खारटही. पण त्यांचे संयुग असलेल्या सोडियम क्लोराइडमध्ये म्हणजे मिठामध्ये हे दोन्ही गुणधर्म असतात. मीठ हे त्याच्या मूलद्रव्यांच्या गुणात्मक बेरजेपेक्षा अधिक असते. तो सुचवतो की, जागृतावस्था’ किंवा ‘स्वेच्छा’ हे अशा मेंदूतील चेतापेशींच्या आंतरक्रियांमधून उद्भवणारे उद्भूत गुणधर्म असू शकतात.
स्टर्नबर्गचे पुस्तक वाचनीय आणि माहितीपूर्ण आहे. त्यातील अनेक कथा मनोरंजक आहेत. पण हे सर्व शेवटी बिनबुडाच्या निष्कर्षाप्रत पोहोचते. तत्त्वज्ञानाचा विद्यार्थी असो किंवा विज्ञानाचा असो, प्रायोगिक आधार नसलेली एखादी कल्पना कोणीही स्वीकारू शकणार नाही. बाहेर आणि हाइजेनबर्गचा उल्लेख तो करतो पण मानवी वर्तनातील स्वैरता (randomness) ही मूलतः अनिश्चिततेतून उगम पावते, हे तो स्वीकारू शकत नाही. शास्त्रीय अभ्यासासाठी आवश्यक सैद्धान्तिक साधने अगोदरच उपलब्ध आहेत. तेव्हा शास्त्रज्ञांनी ‘जाणिवेची पातळी नियंत्रित करणाऱ्या यंत्रणे’चा शास्त्रीय अभ्यास करावा असे आवाहन स्टर्नबर्ग शेवटच्या प्रकरणांमध्ये करतो. त्याच्या मते, आपल्या अनुभूतींचा निर्वेधपणा आणि कार्यकारणभाव ‘नियतिवादा’ने स्पष्ट करता येत नाही, म्हणून ‘स्वेच्छे’चे अस्तित्व असलेच पाहिजे.
‘स्वेच्छे’च्या अर्थाविषयी एक तारतम्यपूर्ण चर्चा ‘इज गॉड अ ताओइस्ट'(2) या निबंधात सापडली. यामध्ये एक माणूस आणि देव यांच्यातील विस्मयकारक, विनोदप्रचुर संवाद आहे. ‘स्वेच्छा’ ही काही निर्मात्याने मानवाला दिलेली विशेष शक्ती नव्हे, हे त्यात अधोरेखित होते. देव म्हणतो, “तुला स्वेच्छा’ प्रदान करण्याच्या बाबतीत मी एका समभुज त्रिकोणाला समकोन त्रिकोण बनवावे की नाही यापेक्षा अधिक स्वातंत्र्य देऊ शकणार नाही. मूलतः समभुज त्रिकोण बनवायचा की नाही या बाबत मी निवड करू शकतो, पण एकदा ते झाले की त्याला समकोन त्रिकोण बनविण्यापेक्षा वेगळा पर्याय माझ्याकडे उरतच नाही.” एक कल्पना(3) अशीही आहे, की निसर्गाने मानवी समुदायाचा व्यवहार व्यवस्थित चालावा यासाठी आवश्यक असलेली जबाबदारीची भावना प्रदान करण्यासाठी स्वेच्छा’ व ‘स्वत्वा’च्या जाणिवेचा आभास निर्माण केला आहे. सोप्या शब्दांत सांगायचे म्हणजे आपल्या कृत्यांना आपण जबाबदार आहोत, ही भावना आपल्याला इतरांना हानी पोहोचवण्यापासून थोपवते. विचारवंतांनी हेही मांडले आहे की, ‘स्वेच्छा’ आणि ‘दायित्वभावने’चे अस्तित्वच नसेल तर आपली दंडप्रणाली, कायद्यांचा आणि समाजरचनेचाच पुनर्विचार करावा लागेल. आपण स्वेच्छेने, जाणीवपूर्वक निर्णय घेतो हा समज म्हणजे मुळात भोवतालच्या परिसरातून येणारे संदेश, आपली जनुके व आपल्या नियंत्रणापलिकडे असलेल्या प्रक्रियांचे प्रतिबिंब आहे.
संदर्भ:
1. Cashmore A. R. PNAS, January 2010
2. Smulyan R.M., 1977[ ‘देव ताओवादी आहेत का?’ हा रेमंड स्मल्यानचा दलाओ इज सायलंट या पुस्तकातील संवाद आजचा सुधारक (जून 1994,
अंक 5.3) मध्ये प्रकाशित झाला आहे. – सं.]
3. Carter R., Exploring Consciousness, University of California Press, Berkeley, 2002
4. De Duve C., Vital Dust, Basic Books, New York,, 1995 –

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.