नैतिकतेचे जीवशास्त्रीय मूलाधार (ख्रिस्तोफर शी यांच्या लेखाचे स्वैर भाषांतर)

पॅट्रिशिया चर्चलन्ड ह्या कॅलिफोर्निया विद्यापीठामध्ये तत्त्वज्ञान विषयाच्या प्राध्यापक आहेत. ह्या तत्त्वज्ञान आणि मज्जासंस्था ह्या दोन विषयात त्या काम करतात. आजच्या नीति-तत्त्वज्ञान शाखेच्या क्षेत्रामध्ये त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. प्रचलित नीतिशास्त्रातील प्रवाहासंदर्भात त्या असमाधानी आहेत. उत्क्रान्तीला किंवा माणसाच्या मेंदूला टाळून होणाऱ्या नीतिशास्त्रातील ह्या चर्चा पोकळ आहेत असे त्यांचे मत आहे. गेली चार दशके नैतिक वर्तणूक आणि मेंदू ह्यांतील संबंधांबाबत त्या संशोधन करीत आहेत, म्हणूनच त्यांची वरील मते ही महत्त्वाची आहेत. तत्त्वज्ञांनी त्यांच्या अभ्यासामध्ये मेंदूसंशोधनाच्या क्षेत्रामधून निर्माण होणाऱ्या ज्ञानाचाही विचार केला पाहिजे अशी त्यांची धारणा आहे.

चर्चलन्ड ह्यांच्या विचारांशी सहमत नसणारेही बरेच आहेत. त्यांच्या मते मेंदू आणि त्याचे कार्य, म्हणजेच मेंदूची रचना (हार्डवेअर) आणि मेंदूची विचार करण्याची प्रक्रिया (मेंदूचे सॉफ्टवेअर) हे वेगवेगळे आहे, आणि म्हणूनच त्यांचा एकत्र विचार करण्याचे कारण नाही. परंतु चर्चलन्ड ह्यांच्या म्हणण्यानुसार मेंदूची रचना आणि मेंदूची कार्यप्रणाली, विचार करण्याची क्षमता, ह्यांचे नाते इतके घट्ट आहे की त्यांचा वेगवेगळा विचार करणेही अशक्य आहे. म्हणूनच तत्त्वज्ञान हे नुसते तत्त्वज्ञान नाही तर ते मेंदूतत्त्वज्ञान (न्यूरो-फिलॉसॉफी) आहे असे मानण्याला पर्याय नाही.

जाणिवांचे स्वरूप ह्या विषयातील संशोधनामुळे चर्चलन्ड यांची ओळख निर्माण झाली. ‘ब्रेनट्रस्ट : न्यूरोसायन्स आपल्याला नैतिकतेबद्दल काय सांगते’ (Braintrust: What Neuroscience Tells Us About Morality) हे त्यांचे नवीन पुस्तक चर्चेत आहे. ह्या पुस्तकात त्यांनी नैतिकतेबद्दल एक नवीनच भूमिका मांडली आहे. नैतिकतेची ही कथा त्यांनी पेप्टाईड ऑक्सिटोसिन (peptide oxytocin) आणि इतर मज्जा-रसायनांच्या जीवशास्त्रीय पायावर रचली आहे.

आई आणि अर्भकामधील भावबंध घट्ट करणे हा ऑक्सिटोसिनचा मुख्य हेतू असतो असे जीवशास्त्रज्ञांच्या अभ्यासातून दिसते. ह्या रसायनाचे इतर काही परिणामही शरीरावर दिसतात. ऑक्सिटोसिनच्या सहाय्याने निर्माण होणाऱ्या प्रेमाच्या नातेसंबंधांचा विस्तार कुटुंब आणि स्व-गटातील व्यक्तींनाही त्यात सामील करून घेतो. (आर्जिनाइन हॅसोप्रेसिन हे दुसरे मज्जारसायनसुद्धा अशीच भूमिका बजावते, ज्यामुळे सहकार्याची प्रेरणा आणि मदतीचा आनंद मिळतो.)

जीवशास्त्रीय रचनेमध्ये इतरही घटक आपली भूमिका निभावतात. आपल्या कपाळामागील मेंदूच्या भागामुळे परिस्थितीचा आढावा घेण्याची क्षमता आपल्याला प्राप्त झाली आहे. हा भाग मानवी उत्क्रान्तीच्या क्रमात सर्वांत नवीन भाग मानला जातो. इतर प्राण्यांना असे विकसित कॉर्टेक्स नसल्यामुळे हे जमत नाही. केवळ ‘पळा’ किंवा ‘लढा’ हे दोन टोकाचे प्रतिसाद त्यांना देता येतात. परंतु मानवी शरीरातील ऑक्सिटोसिन आणि त्याच्याशी संलग्न रसायनांमुळे सह-अनुभूतीची (empathy) क्षमता माणसाला मिळाली असावी असे वैज्ञानिक मानतात.

मेंदूउत्क्रान्तीचा परिणाम म्हणून मानवांजात सामाजिक रचना आणि संस्कृती ह्यांचा उगम झाला असावा आणि त्यामधूनच समाजांमध्ये नैतिक व्यवस्थाही निर्माण झाली असावी, असा वैज्ञानिकांचा कयास आहे. फुकटात लाभ पदरात पाडून घेणाऱ्या आणि त्रासदायक ठरणाऱ्या सामाजिक घटकांना दूर ठेवण्याचे काम ठोशास ठोसा ह्या तत्त्वामुळे सुलभ होते. ह्या वर्तणकीची आणि अशाच इतर सामाजिक नियमांची जाणीव प्रौढ व्यक्ती आपल्या वागणुकीतून मुलांना करून देतात. त्यातूनच सांस्कृतिक व्यवस्थांची सुरुवात होते. परक्यांनाही सामाजिक-सांस्कृतिक नियमांनुसार सामील करून घेण्याचे व्यवहार करता येतात. असे सामाजिक नियम वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या काळात घडत असतात तसेच बदलतही असतात. उदाहरणार्थ काही समाजांत अपंग आणि अवांच्छित अपत्यांना मारण्याची रीत असते, तर इतर काही संस्कृतीमध्ये हे पाप मानले जाते. काही जमातींमध्ये शत्रूचे मूठभर मांस खाणे हे शौर्य वाढविण्यासाठी आवश्यक मानले जाते. इतर संस्कृतींमध्ये ते रानटीपणाचे लक्षण मानले जाते.

अशा सामाजिक रचनेच्या जडणघडणीतून मानवाच्या कथेला सुरुवात होते, ज्याचा विचार नीतिशास्त्राच्या सैद्धान्तिक अभ्यासासाठी आवश्यक आहे. नीतिशास्त्र हे तत्त्वांचा, नियमांचा शोध घेण्याचे शास्त्र नाही, तर दररोजच्या सामान्य सामाजिक व्यवहारातील नीतिविकासाची प्रक्रिया समजून घेण्याची ती धडपड आहे. मेंदूचे कार्य समजून घेण्याची अनेक तंत्रे अलिकडे उपलब्ध झाली आहेत. मेंदूचे काम चालू असताना मेंदूमधील प्रक्रियांची चित्रे (स्कॅनिंगने) काढता येतात. सामाजिक प्रश्न सोडविताना किंवा नैतिक पेच सोडविताना काढलेल्या मानवी मेंदूच्या स्कॅनिंगचा अभ्यास केला असता त्यात काहीच फरक दिसत नाही. असे असूनही तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये चर्चलन्ड ह्यांची मते पुरेशी सुस्पष्ट मानली जात नाहीत.

नीतिशास्त्र हे काही नीतिनियम बनविण्याचे शास्त्र नाही तर समाजातील अनुभव, प्रशिक्षण आणि रास्त भूमिका ह्यांचे जतन कसे करायचे ह्याचा विचार करणारे शास्त्र आहे. माणसाच्या जीवशास्त्रीय कथानकात तर्क आणि भावना ह्या वेगळ्या करता येत नाहीत असे राम यांचे मत आहे. उत्स्फूर्तपणे घडणाऱ्या मानवी प्रतिक्रियांचे विश्लेषण केवळ तकनिच केले पाहिजे, ह्या तत्त्वज्ञांच्या मताला छेद देणारे हे विचार आहेत. चर्चलन्ड ह्यांच्या मते तर तत्त्वज्ञानाची (तर्काधिष्ठित) पीठे निर्माण करणारे लोक हे खलनायक आहेत. जेरेमी बेन्थम यांची संकल्पना (जास्तीत जास्त लोकांचा सर्वाधिक फायदा), किंवा कांट ह्यांची सुस्पष्ट आदेश-तत्त्वे (कधीही खोटे बोलू नये!), किंवा न्यायशास्त्राचा पाया घालणारा जॉन रॉल ह्या सर्वांचा समावेश त्या अशा खलनायकांमध्ये करतात.

अपवाद नसलेले नियम शोधण्याच्या तत्त्ववेत्त्यांच्या प्रवृत्तीमुळे आधुनिक नीतिशास्त्र विकृत झाले आहे असे चर्चलन्ड ह्यांचे मत आहे. अर्थात ह्या दिशेने विचार करणाऱ्यांनीही काही प्रयोग करण्याचे प्रयत्न केले आहेत. त्यातून काही बाबींवर प्रकाशही पडला आहे. काही मर्मदृष्टीचे ज्ञान (इनसाईटस) मिळाले आहे. परंतु हे सर्व प्रयत्न म्हणजे चिरतारुण्याच्या किंवा अव्याहत, अविराम चालणाऱ्या यंत्राच्या शोधासारखे आहे. अपवाद नसलेले नियम कधीही सापडणार नाहीत असे चर्चलन्ड म्हणतात. त्यांना असे वाटते की सर्व मानवांकडे एक समान, मूलभूत पातळीची क्षमता(प्लॅटफॉर्म) असते आणि नैसर्गिक परिसर, काही विशिष्ट गरजा आणि काही परंपरा ह्यांमधून त्या समाजाचे नीतिनियम ठरत असावेत. त्यांच्या ह्या विचारपद्धतीचे काही फायदे आहेत. अनेकदा आपल्याला पडणाऱ्या नैतिक समस्यांना उत्तर सापडत नाही. अशा वेळी त्यातल्या त्यात सुयोग्य वाटणाऱ्या मार्गांबाबत सहमती घडवून, आपण जीवन जगतो. अशी सहमती कशी घडते ह्याचा अभ्यास करणे जीवशास्त्रीय आणि मेंदूज्ञानामुळे अधिक सुस्पष्ट होते.

ओवेन फ्लॅनागन हे यूक विद्यापीठातील एक प्रोफेसर चर्चलन्ड ह्यांचे मित्र आहेत. ते म्हणतात की, समाजात स्थान असणाऱ्या व्यक्ती समाजाचे नीतिनियम घडवतात आणि इतर सर्व त्या नियमांचे पालन करतात. चर्चलन्ड ह्यांच्या मते हा मतप्रवाह संपूर्णपणे चुकीच्या समजुतींवर किंवा वंशवादावर आधारित आहे. आपले आणि प्राणिजगताचे नाते जवळचे आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. काही सस्तन प्राणी, पक्षी यांच्या समूहात नैतिक जाणिवा असतात आणि त्यांनाही सामाजिक प्रश्न सोडविण्याची गरज पडत असते. ह्या जाती नात्याने आपल्या जवळच्या आहेत. त्यांच्या जीवनात काही वळणांवर जे नैतिक पेच उभे राहतात त्यांचा जर अभ्यास केला तर आपल्याला मानवाच्या नैतिक आचरणाचे प्रत्यक्ष पुरावे सापडू शकतील. चर्चलन्ड ह्यांचे हे मत जीवशास्त्रज्ञांच्या निरीक्षणांवर आधारलेले आहे.
चर्चलन्ड ह्या एकदा नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये गेल्या असताना त्यांना मॉन्टन व्होल आणि प्रेअरी व्होल ह्या एकाच प्रजातीच्या परंतु दोन विभिन्न परिसरात राहणाऱ्या प्राण्यांची माहिती मिळाली. हे दोन्ही प्राणी एकाच जातीचे असून त्यांच्यातील फरक सामान्य माणसांना समजून येत नाही. शास्त्रज्ञांना मात्र ते फरक अभ्यासातून स्पष्टपणे आढळले आहेत. प्रेअरी व्होलच्या जातीमध्ये नर-मादीचे नाते हे जन्मभरासाठी असते; मात्र मोन्टन व्होलमध्ये ते तसे नसते. प्रेअरी व्होल जातीचे नर आपल्या पिल्लांच्या संगोपनात मादीच्याबरोबरीने सहभाग घेत असतात. इतकेच नाही तर इतरांच्या पिल्लांनाही चाटून, गोंजारून त्यांचे पालकाप्रमाणेच संगोपन करतात. ह्याउलट मोन्टेन व्होल स्वतःच्या पिल्लांची काळजी घेण्यात काहीच रस घेत नाहीत. हा फरक कशामुळे पडला असावा असा प्रश्न सहाजिकच उद्भवतो. प्रेअरी व्होल ह्या प्राण्यांच्या मेंदूमधील विशिष्ट भागामध्ये संशोधकांना ऑक्सिटोसिन शोषून घेण्याची क्षमता आढळून आली आहे, आणि ती क्षमता असल्यामुळेच नर पिल्लांच्या संगोपनात सहभागी होतात, असा शास्त्रज्ञांचा कयास आहे. प्रेअरी व्होलच्या ह्या शोषक क्षमतेमध्ये अडथळे आणले तर त्यांच्यातील नाते संपते हेही संशोधकांना आढळले आहे.

ही माहिती मिळाल्यावर चर्चलन्ड ह्यांना एक तत्त्वज्ञ म्हणून खूप आश्चर्य वाटले. जोडीदाराशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय हा एका सहचराचा असतो आणि त्यामागे कदाचित कान्ट ह्यांच्या मतानुसार काही कारणे असतील, असे त्यांना वाटत होते. परंतु अशा एकनिष्ठतेमागे जीवशास्त्रीय कारणे असतात हे ह्यातून दिसून आले. आता ऑक्सिटोसिन आणि मनुष्यजातीसंबंधीही पुष्कळ संशोधन होत आहे. एका प्रयोगशाळेतील संशोधनात दोन व्यक्तींच्या सहकार्यावर काही प्रयोग केले गेले. एकाने दुसऱ्याला पैसे भेट देण्याचा हा प्रयोग होता. तेव्हा ज्या व्यक्तींच्या नाकात ऑक्सिटोसिनचा फवारा मारला होता ते फवारा न टाकलेल्या व्यक्तीपेक्षा प्रत्येक वेळी जास्त पैसे भेट देताना आढळले. क्लेरमॉन्ट ग्रॅज्युएट विद्यापीठातील पॉल बॅक ह्या अर्थतज्ज्ञाने असे प्रयोग केले आहेत. ते नैतिक रेणू’ (द मॉरल मोलेक्यूल) ह्या नावाचे पुस्तक लिहीत आहेत. ते स्वतः चर्चलन्ड यांच्या विचाराशी सहमत आहेत. ते म्हणतात की ऑक्सिटोसिन हे रसायन भावनिक पातळीवर काम करते. त्यामुळे आपल्यात चूक आणि बरोबर ह्या भावना सहजपणे निर्माण होतात. कान्ट ह्यांना वाटले होते तितक्या त्या अचूक नसतात. पण आपल्या सामाजिक प्राणी म्हणून झालेल्या शारीरिक उत्क्रान्तीशी त्या मिळत्या-जुळत्या आहेत.

चर्चलन्ड ह्यांच्या ह्या विचारांचे अनेक समर्थक आहेत. त्यात जेस प्रिन्झ ह्या न्यूयॉर्कच्या सिटी विद्यापीठातील तत्त्वज्ञाचा समावेश आहे. विज्ञानाचा आधार घेणारी नैतिकता ह्या विषयावरील अनेक पुस्तके अलिकडच्या काळात सामान्य वाचकांसाठी लिहिली गेली आहेत. त्यांचा विशेष भर मानसिक उत्क्रान्तीवर असतो आणि ह्या सर्वांमध्ये परोपकाराच्या, भूतदयेच्या मानवी वृत्तीचा उल्लेख नेहमी केला जातो. उत्क्रान्तिक्रमात मानवांमध्ये परोपकारी वृत्तीचा विकास होत गेलेला दिसतो. त्यामागे कोणतेही कृत्रिम कारण दिसत नाही. दोन प्राणी सामाईक लाभ मिळवण्यासाठी एकत्र काम करतात, ही एक मोठी क्षमता आहे. परंतु असे एकत्र काम करता करता संस्था घडवून नीतिनियम प्रस्थापित करण्याचा संबंध काय आणि कसा आहे हे अजन तरी नीटसे उलगडलेले कोडे नाही.

ह्या कोड्याची उकल करण्याचा प्रयत्न ब्रेनट्रस्टमध्ये दिसतो. ह्या पुस्तकाचा तो एक महत्त्वाचा चर्चाविषय आहे. माणसामध्ये नैतिक निर्णय घेण्यासाठी आवश्यक असणारी विशिष्ट क्षमता असते हे चर्चलन्ड दाखवून देतात. निर्णय घेताना नैतिक निर्णयाची प्रक्रिया कशी घडते ह्याचे वर्णन त्या करतात. पण एक पर्याय दुसऱ्या पर्यायापेक्षा का चांगला आहे ह्याचा निर्णय कसा होतो, ह्याबाबत मात्र त्या काही सांगत नाहीत. त्यांनी दिलेले एक उदाहरण बघू. एका शेतकऱ्याला आपल्या शेजारील शेतकऱ्याच्या शेताचे कुंपण तोडून सफरचंद खाणारे हरिण दिसले. अशा वेळी कान्ट ह्यांच्या पुस्तकातील नीतिनियमांचे वाचनही न केलेला माणूस हरणाला पळवून लावायचे का नाही हा निर्णय घेऊ शकतो. असा निर्णय घेताना तो अनेक बाबींचा विचार करतो. माझ्या शेजाऱ्याने मदत केलेली मला चालेल का? माझ्या संस्कृतीमध्ये अशा कृत्याचे कौतुक केले जाते का? हरणामुळे माझ्या शेतामध्ये काही नुकसान होणार नाही ना? अशा अनेक बाबींचा विचार करून माणसे निर्णय घेतात. आपल्या निर्णयामुळे समाधान किंवा असमाधानही मिळू शकते. अशा वेळी किती प्रमाणात समाधान होऊ शकेल ह्याचा अंदाज घेऊन कृतींबाबत निर्णय केले जातात, असे चर्चलन्ड ह्यांना वाटते. मात्र मेंदू ह्यासंबंधात समाधानाची मर्यादा कशी काय ठरवतो हे अजून पुरेसे स्पष्ट नसले, तरी ढोबळमानाने बघता अशा निर्णयप्रक्रियेत अनेक घटक आणि त्यांच्या संभाव्य परिणामांचा विचार करून समस्यांच्या उत्तरांबाबत निर्णय घेतले जातात.

अनेक घटक आणि त्यांचे निर्णयातील महत्त्व ह्या गोष्टी ढोबळ आणि अस्पष्ट आहेत हे खरे असले तरी ते वास्तव आहे, असे त्यांचे समर्थन ओवेन फ्लॅगनन हे तत्त्वज्ञ करतात. त्यांच्या मते नैतिक निवड ही काळजीपूर्वक निर्णय करण्याची प्रक्रिया असते. नैतिक निर्णय आणि नदीवर कशा प्रकारचा पूल बांधायचा ह्याचा निर्णय, हे दोन्ही एकाच प्रकारचे आहेत. नैतिकता ही देवाची देणगी असते किंवा ती एक तात्त्विक जाणिवेमुळे निर्माण होत असते, ह्या दोन्ही शक्यता त्यांना ग्राह्य वाटत नाहीत. फ्लॅगनन तर असे म्हणतात की चर्चलन्ड ह्यांची ही नैतिकता अधिक लोकशाही स्वरूपाची आहे. एखाद्या परिस्थितीमध्ये नैतिक निर्णय करताना सामान्य माणसे उपलब्ध माहितीचा आधार घेत असतात, हे चर्चलन्ड ह्यांचे मत त्यांच्या ब्रिटिश कोलंबियामधील ओकाहोमा येथील शेतावरील स्वानुभवातून बनलेले आहे, असे ह्या समर्थकाला वाटते. त्यामुळेच त्यांना लोकशाही पद्धतीमधून दिसणाऱ्या जाणिवांचे महत्त्व जास्त वाटते. जुन्या जाणत्या शेतकऱ्यांचे शहाणपण हे सेमिनारमधील तज्ज्ञाच्या शहाणपणापेक्षा जास्त उपयुक्त असते!

जेव्हा नदीवरील पुलासंबंधी चर्चा असते तेव्हा लोकांना पुलाची संकल्पना योग्य वाटते. परंतु तत्त्वज्ञांना असे उपयोगवादी सामाईक उद्दिष्ट हा नैतिक क्षेत्रातील प्रश्न आहे, हेच मान्य होत नाही. म्हणूनच त्यांना गर्भपातासारखे नैतिक निवाडे आणि पूल बांधण्याचा निर्णय ह्यांचा काही संबंध आहे हे जाणवत नाही. हे दोन वेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत असे त्यांना वाटते.

माणसांचे आयुष्य इतके गुंतागुंतीचे आहे की त्यांच्या नैतिक कृतींचे सुविहित विश्लेषण करणे हे सामान्य लोकांच्या कुवतीच्या आणि उपलब्ध साधनसामग्रीच्या बाहेर आहे, असे चर्चलन्ड ह्यांच्या विचारांना आक्षेप घेणाऱ्या कहाने आणि इतर काही तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकांना वाटते. ते म्हणतात की आपल्या जाणिवा ह्या लहान गटांतील लोकांबरोबर असलेल्या संबंधांतून आकाराला येत असतात हे जरी खरे असले तरी सध्याच्या काळात आपण काही आपले संबंध लहान गटांपुरतेच मर्यादित ठेवू शकत नाही. त्यामुळे अनोळखी लोकांच्या गटांबरोबर कसे वागावे ह्याचाही विचार करावा लागतो. पारंपरिक तत्त्वज्ञानामध्ये तत्त्वज्ञ असा व्यापक विचार करीत असत. परंतु अशा विचारवंतांना चर्चलन्ड ह्या संपूर्णपणे नाकारतात हे योग्य नाही. उदाहरणार्थ भविष्यातील पिढ्यांच्या संबंधात (बदलत्या हवामानाचा विचार करता) आपली (आजच्या पिढीतील लोकांची) कर्तव्ये काय? जगाच्या काही भागात असलेल्या असंख्य गरीब लोकांचे (ज्यांना आपण कधीच भेटलेलोही नसतो) आणि आपले नाते काय? असे प्रश्न चर्चलन्ड ह्यांचे विरोधक उपस्थित करतात.

स्व-गटाच्या बाहेरील सर्व लोकांना शत्रू मानावे असे तत्त्व उत्क्रान्तीच्या प्रक्रियेतून पुढे आले आहे, असे मानले जाते. ह्या संबंधात तात्त्विक विवेचन करताना रेलटोन हा तत्त्वज्ञ मात्र इतरांना शत्रू मानण्याची ही सवय संपूर्णपणे नाकारतो. केवळ इतर गटांना बदनाम करण्यासाठी हे शत्रुतत्त्व वापरले जाते, असे त्याचे म्हणणे आहे. हे जरी सहजपणे घडत असले तरी अनुभवाच्या माध्यमांतून स्वगटाच्या संबंधांतील सहवेदनेच्या जाणिवेचा परिघ विस्तारता येतो. अशा आक्षेपांना प्रत्युत्तर देताना चर्चलन्ड म्हणतात की परकीय लोकांबरोबर सातत्याचा लढायांचा अनुभव घेतल्यावर त्यांतील व्यर्थता, लढ्यांमधून होणाऱ्या दोन्ही गटांच्या नुकसानाची जाणीव एखाद्याला होते. पण ती केवळ तत्त्वज्ञालाच होऊ शकते असे मानणे चूक आहे. एखाद्या राजकारणी माणसाला, अर्थवेत्त्याला किंवा साध्या शेतकरी नागरिकालाही अशी व्यापक जाणीव होऊ शकते, असे चर्चलन्ड ह्यांना वाटते.

अनेक प्रस्थापित तत्त्वज्ञांच्या मतांवर हल्ला करायला चर्चलन्ड अजिबात कचरत नाहीत. प्रिन्स्टन विद्यापीठातील एक प्राध्यापक पीटर सिंगर हे पाश्चिमात्त्यांनी आपल्या जीवनमानात बदल करून गरीब, विकसित देशातील लोकांना मदत करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन करणारे तत्त्वज्ञ आहेत. त्यांच्या ह्या मतावर आक्षेप घेताना चर्चलन्ड म्हणतात की पाश्चिमात्त्य तत्त्वज्ञ आपणच लोकांचे भले करतो ह्या समजुतीमधून इतर देशांच्या संदर्भात अशा अवाजवी अपेक्षा करतात आणि त्यांच्या आधारे इतर समाजांच्या व्यवहारात नाक खुपसतात. लोकांना मदत करण्याच्या निमित्ताने पाश्चिमात्त्य लोक इतर लोकसमूहांच्या जीवनात प्रमाणाबाहेर हस्तक्षेप करतात. लोकांचे स्वातंत्र्य हे समानतेच्या तत्त्वापेक्षा जास्त महत्त्वाचे असून पाश्चिमात्त्यांच्या अशा लोकांचे भले करण्याच्या आग्रहातून नसते संघर्षही उभे राहतात असे चर्चलन्ड ह्यांना वाटते.

चर्चलन्ड ह्यांच्या स्वातंत्र्य आधी की समता आधी ह्या नैतिक वादामध्ये, ऑक्सिटोसिनचा संबंध काय, असा प्रश्न साहजिकच त्यांना विचारला जातो. तेव्हा त्या म्हणतात की पीटर सिंगर ह्यांचा जगासंबंधीचा दृष्टिकोण हा कृत्रिम आहे. आपली नैतिक मूल्ये दूरस्थ परकीयांवर लादण्याचा हा प्रकार जीवशास्त्रीय प्रेरणांच्या मूलतः विरोधी आहे. पीटर सिंगर हे बोले तैसा चाले असे वागणारे आहेत. त्यांची ‘गिव्ह व्हॉट वी कॅन’ ह्या नावाची एक संस्था आहे. ह्या संस्थेचे अनेक विद्यापीठांमध्ये पसरलेले सभासद स्वतःच्या कमाईपैकी बरीचशी कमाई लोककल्याणासाठी दान करतात. अशा देणग्यांमधून असंख्य लोकांचे प्राण .वाचत असतील, त्यांमधून देणाऱ्याला समाधान मिळत असेल, तर त्यांत अयोग्य काय आहे, असे प्रश्न चर्चलन्ड ह्यांना त्यांच्या विरोधकांकडून विचारले जातात.

जोनाथन हैट ह्या व्हर्जिनियातील मानसशास्त्रज्ञांचा त्यांना काही मूलभूत सर्वंकष नैतिक निकष सापडल्याचा दावा आहे. समाजातील दीन-दुबळ्यांना मदत करण्याची वृत्ती, अन्याय दूर करण्याची प्रेरणा, सामाजिक बांधिलकीची जाणीव, अधिकाराचा आदर, पावित्र्य असे काही नैतिक निकष मूलभूतपणे सर्व मानवांमध्ये असतात, असा त्यांचा दावा आहे. त्यांना उत्तर देताना चर्चलन्ड म्हणतात की ही तत्त्वे जरी कितीही चांगली असली ती केवळ काही निवडक नैतिक निकषांची यादी आहे. सर्व नैतिक प्रेरणांमागे जीवशास्त्रीय आधार आहे असे काही दिसत नाही. १९७० च्या दशकात, जेव्हा उत्क्रान्तीचा अभ्यास बाल्यावस्थेत होता तेव्हा कदाचित अडीच लाख वर्षांपूर्वी उत्क्रांतिक्रमात आफ्रिकेतील मानवांमध्ये त्यांची निवड झाली असेल हे म्हणणे ठीक होते. पण आज ते सिद्ध करण्यासाठी प्रत्यक्ष पुराव्यांची आवश्यकता आहे.

चर्चलन्ड ह्यांच्या नैतिकतेच्या भूमिकेमध्ये सांस्कृतिक भेदभावांबद्दल असलेली काही निरीक्षणे पुरेशी स्पष्ट नाहीत, असेही काहींना वाटते. सॅम हॅरिस हे नव-निरीश्वरवादी मानले जातात. त्यांनीही न्यूरोसायन्समध्ये पीएच.डी. मिळवलेली आहे. त्यांच्या मते आरामखुर्चीत बसून केलेल्या तत्त्वज्ञानाच्या आणि धर्मांच्या नैतिक चर्चांना पर्याय देण्याची क्षमता आधुनिक न्यूरोसायन्समध्ये आहे. आदिवासी लोकांमधील लहान मुलांना मारून टाकण्याची प्रथा किंवा शत्रु-समाजातील स्त्रियांना पळवून नेण्याची प्रथा त्या त्या समाजांच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीवर समर्थनीय ठरू शकतील, असे चर्चलन्ड ह्यांना वाटते. मात्र अशा समर्थनांना सॅम हॅरिस ह्यांचा पाठिंबा नाही. एकोणिसाव्या शतकातील हिंदू समाजातील सतीप्रथेबद्दल हॅरिस ह्यांनी त्यांना टोकले होते, तेव्हा चर्चलन्ड ह्यांनी आपल्याला हिंदू संस्कृतीची पुरेशी माहिती नाही म्हणून उत्तर देणे टाळले. वर सॅम ह्यांनाही त्या संस्कृतीबद्दल फारशी माहिती नाही, असाही आक्षेप घेत इतरांच्या संस्कृतींमधील उदाहरणे तपासण्यापेक्षा स्वतःच्या समाजातील उदाहरणे घेऊन बोलणे जास्त महत्त्वाचे आहे असेही सांगितले, अमेरिकेतील समाजात हत्यारे बाळगण्याचा अधिकार हा काही लोकांच्या फायद्याचा नाही, अशी मल्लीनाथीही त्यांनी केली.

अनेकदा नीतिशास्त्रापेक्षा शुद्ध विज्ञानावर चर्चलन्ड भर देतात. त्यांना नैतिकतेचा जीवशास्त्रीय पाया अधिक महत्त्वाचा वाटतो. तो जर समजला तर आपल्याला समाजातील गुंतागुंतीचे प्रश्न समजून घेता येतील असे त्यांना वाटते. त्यांच्या नव्या पुस्तकाने तत्त्वज्ञानाच्या, क्षेत्रामध्ये मात्र खळबळ माजवली आहे. त्यांच्याशी एक प्रकारचे अघोषित युद्धच पुकारले आहे. चर्चलन्ड मात्र ह्या वैचारिक युद्धाचा पुरेपूर आनंद उपभोगत आहेत.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.