चळवळी का यशस्वी होतात? का फसतात?

[2011 सालाच्या सुरुवातीला आनंद करंदीकरांनी ‘निर्माण’ चळवळीच्या मुलामुलींपुढे एक भाषण दिले. त्या भाषणावरून खालील लेख घडवला आहे. भाषणातील तळमळ आणि जोम कायम राखण्याचा प्रयत्न केला आहे. (जरी त्यामुळे कुठेकुठे प्रमाण भाषेबाबतच्या संकेतांचे उल्लंघन होते!) – संपा. ]
भारतात किंवा महाराष्ट्रात किंवा गावागावांत दोन-तीन महत्त्वाचे सामाजिक बदल घडले, त्यांचा माझ्या परीने मी एक धावता आढावा घेणार आहे. हा काही त्यांचा पूर्ण इतिहास नाही. पण मला जे पुढे मांडायचे आहे ते मांडण्यासाठी एक सामाजिक भूमिका निर्माण व्हावी म्हणून मी त्यांचा धावता आढावा घेणार आहे. आणि नंतर काही महत्त्वाची प्रिन्सिपल्स आहेत किंवा त्यांचे आधार आहेत, ते उलगडून दाखवण्यासाठी मी या उदाहरणांचा वापर करणार आहे. सामाजिक बदल हे का घडतात, कशा स्वरूपात सुरू होतौत याच्याबद्दल मी काही सार्वत्रिकीकरण करणार आहे, पाच-सहा सूत्रे मांडणार आहे. त्या केस स्टडीज आहेत. त्या मुद्दामहून अशासाठी निवडल्या आहेत की त्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत आणि त्या आत्ता बदलाच्या वेगवेगळ्या अवस्थेत आहेत. मी चार मुख्य चळवळींबद्दल बोलणार आहे; चळवळी म्हणा, रचनात्मक कार्यक्रम म्हणा, सामाजिक बदल म्हणा.
संकरित गाईंचा जो कार्यक्रम महाराष्ट्रात महत्त्वाचा झाला होता आणि ज्याच्यातून धवलक्रांती भारतात घडली, त्याच्याबद्दल बोलणार आहे. मी लहान असताना आम्हाला रेशनची कार्डे मिळायची. आणि ती घेऊन रांगेत उभे राहायला लागायचे, दूध हवे असल्यास. आता विश्वास बसणार नाही. चांगली पंधरावीस मिनिटे रांगेत थांबले की सकाळचे दूध मिळायचे. मग तसेच रांगेत थांबले की दुपारचे दूध मिळायचे. दसऱ्याला जर आईने असे ठरवले असेल, की श्रीखंड करायचे आहे, तर वीस दिवस आधी अर्ज करायला लागायचा, मग तो अर्ज मंजूर व्हायचा, मग त्या दिवशी पाच लीटर जास्तीचे दुध मिळायचे. आता वाण्याकडे जाऊन दूध मागितले की दूध मिळते, पिशवीत. चोवीस तास मिळेल, वाण्याचे दुकान उघडे असेल तर. ही वरपांगी दिसणारी क्रांती आहे.
दुसरे, मी स्त्री-मुक्ती चळवळीबद्दल बोलणार आहे, पण ती सत्तर सालच्या नंतरची. या चळवळीत मी पूर्वीपासून होतो. आम्ही जेव्हा चळवळीला सुरुवात केली तेव पुण्यात सामान्यत: रोज एक बाई जळून मरायची; लग्न केल्यापासून पुढच्या दोन वर्षात आणि हे नोंदलेले भाग होते. वर्षाला तीनशे साठ बायका जळून मरायच्या; ससूनमध्यो ‘जळिताच्या केसेस’ असे ज्यांना म्हटले जायचे, त्या जवळजवळ दरवर्षी पाच हवा असायच्या. माहीत नसायचे की त्या जाळून मेल्या की अॅक्सिडेंटने जळून मेल्या. गेल्या तीस वर्षांत हे प्रमाण जवळपास नगण्य झाले आहे. कालच एक बातमी दुर्दैवाने आली एका सनेने आत्महत्या करून घेतली म्हणून, सासरच्या जाचाला कंटाळून. आणि पोलिसांनी तिच्या नवऱ्याला आणि सासूला अटक केली. तीस वर्षांपूर्वी अशी अटक झाल्याची हकीकत माहीत होत नव्हती लोकांना. हा बदल कसा घडला याच्याबद्दल मी काही के तुमच्याशी बोलणार आहे.
तिसरे, एकूणच अंधश्रद्धा निर्मूलन, लोकविज्ञान चळवळ आणि बुद्धिप्रामाण्यवाद ही एकाच गोष्टीची वेगवेगळी अंगे. ही चळवळ महाराष्ट्रात खूप प्राचीन काळापासून चालू आहे. सत्तर सालानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समिती, लोकविज्ञान चळवळ, बुद्धिप्रामाण्यवा मंच ह्यांनी ही चळवळ करण्याचा प्रयत्न केला. माझ्या मताने फारसा यशस्वी न झालेला हा प्रयत्न आहे, ज्याने समाजात विशेष काही बदल घडलेले दिसत नाहीत. याच्याच दुमत असू शकेल.
मग पर्यावरण रक्षणाची चळवळ; 1980 सालानंतर, ’90 सालानंतर, आणि आता 2000 सालानंतर, अधिकाधिक व्यापक होताना दिसते आणि तिलाही अजिबात यश आलेले नाही, असा माझा समज आहे. तो माझा समज का आहे ते सांगेन तुम्हाला.
हे मी त्या चळवळी चांगल्या की वाईट ह्या अर्थाने बोलत नाही आहे. ह सगळ्याच चळवळी करण्यासारख्या आहेत, ह्याच्याबद्दल काही आपले कोणाचेच दुमत असण्याची शक्यता आहे असे मला वाटत नाही. मी युवक क्रांती दलात होतो. त्याची सुरुवातच मुळात भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढ्याने झाली होती. भ्रष्टाचाराविरुद्धचे लढे असेल त्या कामाचे मुख्यतः स्वरूप होते, मग तो कृषिविद्यापीठातला भ्रष्टाचार असेल, मेडिकल कॉलेजच्या अॅडमिशनमधला भ्रष्टाचार असेल, काहीही असेल. त्याचे कल्मिनेशन है। जयप्रकाशजींच्या चळवळीत झाले, ज्याने गुजरातमधले सरकार कोसळून पडले, बिहारमाध्यत सरकार कोसळून पडण्याच्यापर्यंत आले. त्याचे पर्यवसान इमर्जन्सीमध्ये झाले. त्यानंतर विरोधी पक्षांच्या हातात पहिल्यानेच सत्ता आली, ज्याच्यातून एक नवे नेतृत्व मोट्या प्रमाणावर सत्तेवर आले. तरीसुद्धा आज त्यावेळी होता त्यापेक्षा कदाचित जास्त भ्रष्टाचा राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात घडताना दिसतो. काही चळवळी यशस्वी झाल्या निदान त्यांनी काही यश निश्चितपणे प्राप्त केले. काही चळवळींना यश हे लाभलेच नाही. असे का झाले, असा खरा प्रश्न आहे.
तीन थोर लोकांनी तीन विचार मांडले. आणि ते परिवर्तनाच्या आणि बदलाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. माझ्या मांडणीशी त्यांचा काही संबंध जोडणार नाही आहे. ही मांडणी त्या व्यापक आणि भव्य पातळीवर करण्याचा माझा हेतू नाही. कार्ल मार्क्सने असे म्हटले होते की, “तत्त्वज्ञ हे जगाचा अर्थ लावत आले. खरा प्रश्न जग बदलण्याचा आहे.” “Philosophers have interpreted the world. The real task is to change it.” भीमाच्या गाण्यांमध्ये एक गाणे आहे, “जग बदल घालुनी घाव, सांगून गेले आम्हा भीमराव” [शाहीर : अण्णाभाऊ साठे – संपा.]. जेव्हा सुरुवातीला मी भीमाचे गाणे ऐकले तेव्हा मला वाटले हे महाभारतातल्या भीमाचे गाणे आहे. आंबेडकरी चळवळीत भीमाच्या गाण्यांची एक प्रचंड परंपरा आहे. तिसरे गांधीजींचे फार मोठे वाक्य आहे, की, “जगात जे बदल अपेक्षित आहेत त्यांची सुरुवात ही आपल्यातल्या बदलापासून होते”. तात्त्वज्ञानिक पातळीवरचे व्यापक विषय आहेत हे. तो आत्ता माझ्या बोलण्याचा भाग नाही. अधिक व्यावहारिक पातळीवर थोडे बोलण्याचा प्रयत्न करणार आहे.
आता या चळवळींचे स्वरूप आपण थोडक्यात समजावून घेऊ. गाय ही भारतात दैवत मानली जाते. तिच्या पोटात चाळीस कोटी देव असतात, अशा दैवी अवस्थेला नेऊन बसवलेले जनावर आहे. त्याची अनेक आर्थिक कारणे होती. युरोपमध्ये शेतीचे काम नांगरायला घोडे वापरायचे, त्याच्यामुळे गाईचा किंवा बैलाचा नांगरट करायला कुणाला उपयोग नव्हता. सामान्यतः गाई-बैल किंवा कुठल्याही मॅमलमध्ये नांगरण्याची शक्ती वाढवायचे ठरवले, तर त्यांची दूध देण्याची क्षमता कमी होते. आणि त्यांची दूध देण्याची क्षमता वाढवली, तर त्यांची नांगरण्याची क्षमता कमी होते. असा निसर्गनियम आहे. युरोपमध्ये घोडे नांगरण्यासाठी वापरल्यामुळे गायी दुधासाठी जोपासणे आणि संकर करणे शक्य झाले. आपल्या इथे बैल हे मुख्यत: नांगरणीसाठी वापरल्यामुळे गाईंची धाची क्षमता वाढवणे शक्य नव्हते; कारण की दोन्ही एकावेळी अजूनपर्यंत जगात कोणाला करायला जमलेले नाही. दुष्काळ पडला की समोर दिसणारी गाय ही भाकड़ असते. ती खायला तयार असते, पण ती दूध फार कमी देत असते. अशावेळी तिला मारून टाकून पोट भरणे हा एक चांगला मार्ग असतो. तुम्ही पर्ल बकची ‘गुड अर्थ’ कादंबरी जर कधी वाचलीत, (वाचा!) तर चीनमध्ये दुष्काळ पडल्यानंतर घरातली गाय मारायचा प्रसंग आला त्या कुटुंबावर, की त्यांची मानसिकता काय होते याचे वर्णन सुरेख आहे. पण अश्या गाई मारून टाकल्या तर शेतीची उत्पादने करायला किंवा कामे करायला पुढे बैल कसे निर्माण होणार, हा प्रश्न निर्माण होतो. आणि असे जर बैल निर्माण करू शकला नाहीत तर तुमच्या शेतीचा ह्रास होतो. म्हणून सगळ्यांत फास्ट टर्नओव्हर कम्युनिटीज, म्हणजे ज्याच्यात गाय, बैल आणि शेती हे एकत्र आहेत आणि जिथे बैलांचा वापर हा शेतीसाठी केला जातो, तिथे गायींच्या रक्षणाची काहीतरी व्यवस्था केली जाते. मग तिला देवता बनवण्यात येते; अमुक, तमुक, तमुक.
हळूहळू शेतीमध्ये यांत्रिकीकरण यायला सुरुवात झाली. असे सांगतात की गांधीजी हे जेव्हा उरळीकांचनला होते तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांचे एक अनुयायी होते मणिभाई देसाई. मणिभाई हे त्या 1942 च्या चळवळीत बाँब बनवणारे क्रांतिकारक होते. पण ते गांधीजींचे अनुयायी बनले आणि गांधीजींनी त्यांना असे सांगितले, “इथे राहा आणि गोसेवा करा”. उरळीकांचन हे पुण्याजवळ जे गाव आहे तिथे मणिभाईंनी गोसेवा करायचे व्रत घेतले. त्यांच्या असे लक्षात आले की ह्या भाकड गाई जगवायचा एकच मार्ग आहे. त्यांचे दुध वाढवले पाहिजे. त्या उत्पादक झाल्या पाहिजेत. ढोर जी जनावरे कापायचे, त्यांच्याबरोबर स्वत: बसून त्यांनी गाईंची शवविच्छेदने करून गाय हा प्राणी काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. ह्या सगळ्या ऐकीव कथा आहेत. खऱ्या जर असल्या तर त्यातन आपल्याला शिकण्यासारखे बरेच असते. मग त्यांनी परदेशात एवढ्या गाई कश्या काय पाळतात, ह्याचाही अभ्यास केला. आणि असा निष्कर्ष काढला की जास्त दूध देणाऱ्या गाईंच्या वंशाचे वीर्य हे आपण जर देशी गाईंना टोचले, त्यांचे आर्टिफिशिअल इन्सेमिनेशन केले, आणि त्यामुळे जर गाई गाभण राहिल्या; तर या ज्या संकरित गाई होतील, त्या कितीतरी जास्त दूध देतील आणि शेतकऱ्यांना ती गाय सांभाळणेही परवडेल. हे तंत्रज्ञान परदेशांत होते. ते भारतात आणणे हे सोपे काम नव्हते. कारण वीर्य लिक्विड नायट्रोजनमध्ये उणे 180° तापमानात ट्रान्सपोर्ट करावे लागते. ह्या स्वरूपाच्या कोल्ड चेन्स उपलब्ध नव्हत्या. त्या निर्माण करणे हे प्रचंड काम होते. मणिभाईंनी त्याच्या यंत्रणा उभ्या केल्या. त्याला जोडून मग जे जे प्रश्न उद्भवतील त्या त्या प्रश्नांची सार्वत्रिक उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. 1970 साली पुण्यात येणारे नव्वद टक्के दूध हे म्हशींचे होते. 1990 साली पुण्यात येणारे पंच्याऐंशी टक्के दूध हे गायींचे झाले. दुधासाठीचे रेशनकार्ड ही इतिहासजमा गोष्ट झाली. गावागावांमध्ये दूध-संकलन सुरू झाले ज्याला आपण धवलक्रांती म्हणू, ती प्रत्यक्षात घडली.
मी ज्या सामाजिक बदलाच्या चळवळी सांगणार आहे त्यांचा प्रत्येकाचा एक छोटा इतिहास हा आधी सांगणार आहे. (प्रश्न : सरकारची काही भूमिका होती का?) हो! सगळीचकडे दुधाच्या विक्रीसाठी सहकारी संस्था निर्माण करणे, त्यांच्या त्यांच्या को-चेन्स निर्माण करणे आणि शहरी भागात ते नेऊन विकणे याच्यासाठी सरकारने दुधाला हमीभाव देण्याची जरूरी आहे, सरकारने असे म्हणणे, की “हे दूध आम्ही या किमतीला निश्चितपणे घेऊ”. तसे घेणे हे महाराष्ट्र सरकारने केले, गुजरात सरकारने केले, दिल्लीच्या सरकारने केले. पण हे असे घडणे आवश्यक होते. ही सरकारी योजना आहे, आणि ती सरकारने काही ठिकाणी चांगली राबवली; काही ठिकाणी वाईट राबवली. पण सरकारचा ह्याच्यात नक्की भाग आहे. याच्यात खाजगी उद्योगांचा भाग आहे. उदाहरणार्थ गाईंचे मेजर फंडिंग हे मफतलाल इंडस्ट्रीजने केले. मफतलाल इंडस्ट्रीजने खूप मोठ्या प्रमाणावर सातत्याने सुरुवातीला मदत केली. त्याच्यात आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानाचा भाग आहे. असे सगळेच आहे.
धवलक्रांती ही आता भारतात सर्वत्र आहे. ज्यावेळी सुरुवात झाली तेव्हा बाइफचे (BAIF, भारत ॲग्रो-इंडस्ट्रीज फाउंडेशन) काम महाराष्ट्रात सुरू झाले. पण नंतर दहा वर्षांत यू.पी., बिहार, कर्नाटक, आंध्र, गुजरातमध्ये ती संस्था गेली. नंतर मुख्यत: पंजाब, राजस्थान, दिल्ली. अजूनही पश्चिम बंगाल, ओरिसा, हे जे रेड्यांनी भातशेती करण्याचे प्रांत आहेत तिथे हा प्रश्न नीटसा सुटलेला नाही.
दुसरा जो भाग आहे तो स्त्री-मुक्ती चळवळीचा. अंदाजे सत्तर सालच्या दशकातली गोष्ट आहे. त्याच्या एकाच अंगाबद्दल बोलणार आहे. कुटुंबांतर्गत स्त्रीवर होणारे अत्याचार. स्त्रीवर कुटुंबांतर्गत अत्याचार हे जगभर होतात. 1970-80 च्या दशकात हा प्रश्न फार प्रामुख्याने शहरी भागात पुढे आला. त्याला काही त्यावेळची निमित्ते घडली. अत्यंत चांगल्या मध्यमवर्गीय कुटुंबात अचानकपणे सुना जळून मरतात. मी तुम्हाला सांगितले, अंदाजे ’74 किंवा ’75 यांपैकी एका वर्षी रोज एक या गतीने दखलपात्र, नक्की अपघात नाही, अशी जाळून मारण्याची रोज एक केस घडत होती.
दुसऱ्या बाजूला फुले, आंबेडकर, कर्वे या सगळ्यांच्या चळवळीतून निर्माण झालेली महाराष्ट्रातील स्त्रियांची पहिली पिढी होती, की जिला केशवपन करावे लागले नाही. माझे वडील विंदा करंदीकर काव्यवाचन करायचे. ते अलीकडे एक गोष्ट सांगायचे, की “माझी कविता काही वेळा लोकांना कळत नाही, याचा मला आनंद होतो. मला छान वाटते की माझी कविता कळली नाही लोकांना”. ते उदाहरण काय सांगायचे? त्यांची एक ‘धोंड्या न्हावी’ नावाची कविता आहे. तुम्ही कीर्तन, भजन म्हणत होता, तसे ते कविता वाचन. म्हणजे कीर्तन कसे चालायचे? त्याच्यात लोक कसे रंगून जायचे? पण तरीसुद्धा महार-मांगांना कसे वेगळे बाहेर बसवायचे? असे होत होत ते कीर्तन रंगते. तशी ही कविता. ‘धोंड्या न्हावी’ कवितेत अनेक उल्लेखांतला एक उल्लेख असा आहे, की हा धोंड्या न्हावी मागच्या दारी जायचा आणि भलतेच काही करायचा जे आम्हाला कोणी पाहू द्यायचे नाही. हा उल्लेख लोकांना कळत नाही याबद्दल ते आनंद व्यक्त करायचे. कारण की हा धोंड्या न्हावी विधवांचे मुंडन करायचा, मागच्या दारी जाऊन. चाळीस सालची ही कविता आहे. अजून शंभर वर्षेसुद्धा झालेली नाहीत. ह्या सगळ्यांतून बाहेर पडणाऱ्या पहिल्या पिढीच्या स्त्रिया ह्या आता बऱ्याच अधिकारावर पोचल्या होत्या. सुलभा ब्रम्हे सांगायच्या की, जगातल्या सगळ्यांत बलशाली आणि स्वतंत्र स्त्रिया आता महाराष्ट्रातल्या ब्राह्मण स्त्रिया आहेत. हे पुण्यातली ब्राह्मण स्त्री म्हणते, हे लक्षात घ्या.
तेव्हा स्त्री-मुक्तीचे जे अनेक गट होते, त्यांना हा प्रश्न पडला, की हे काय चालले आहे? मी त्यावेळी जनवादी महिला संघटनेचा कार्यकर्ता होतो. आमच्या अमृता देशमुख नावाच्या लढवय्या नेत्या होत्या. ही एका संघटनेची जबाबदारी नव्हती. जेव्हा असे काही घडेल तेव्हा त्या नवऱ्याला व सासूला आम्ही सोडणार नाही, अशी भूमिका घेऊन अनेक ठिकाणी जेथे जळिताचे प्रसंग घडले, तिथल्या सोसायटीतल्या प्रत्येक कुटुंबात जाऊन ‘तुम्ही काय झोपा काढत होता का?’ असे विचारणे, पोलीस स्टेशनला घेराव घालणे, वकिलांना घेराव घालणे असे अनेक जहाल, मवाळ प्रचाराचे कार्यक्रम हे ह्या सगळ्या स्त्री संघटनांनी पुण्यात घेतलेले मला माहिती आहेत. असेच भारतभर घडायला लागले.
दुसऱ्या बाजूला काहींनी खूप मोठ्या प्रमाणावर वैचारिक मंथनही सुरू केले की असे का घडते? आणि असे भारतातच का घडते? म्हणजे कौटुंबिक अत्याचौर आणि कुटुंबांतर्गत हिंसा हा जरी जागतिक प्रश्न असला तरी सुनेला जाळून मारणे ही काही जागतिक परंपरा नाही. ह्याला टोक आले ते रूपकंवर सती गेली तेव्हा राजस्थानमध्ये. एका गावात एक रूपकंवर नावाची बाई सती गेली. आजही भारतात एखादी स्त्री सती जाते, तिचा सगळा गावातला समाज तिला प्रोत्साहन देतो आणि ती सती गेल्यानंतर तिथे देऊळ उभारले जाते. हा अधिक प्रतीकात्मक प्रश्न आहे. ऐतिहासिक आढावे, लिखाण, वाचन आणि मंथन सुरू झाले. सरकारला कायदे करणे भाग पडले.
त्यातले एका कायद्याचे कलम असे आहे की अशी बाई जळिताबद्दल बोलल्यानंतर तो आधी गुन्हा आहे असे गृहीत धरायचे. नवऱ्याने आणि सासूने असे सिद्ध केले पाहिजे की आम्ही त्याच्यात गुंतलेलो नव्हतो. खटला भरल्यानंतर स्त्रीसंघटना येतात, आणि त्या खटल्यांतून सहजासहजी सुटका होऊ शकत नाही, हेही सिद्ध झाले. याला कायदेशीर पाठबळ मिळाले. राजनैतिक पक्षांचे पाठबळ मिळाले. स्त्रीसंघटनांनी हा प्रश्न जवळजवळ वीसपंचवीस वर्षे सातत्याने लावन धरला. याच्यात अनेक स्वरूपाचे अनलिसिस करण्यात आले. अमृता देशमुख. त्यांच्याबरोबर आम्ही भोंडल्याच्या गाण्यातला मजकूर काय आहे ते तपासले. तुम्हाला असे दिसेल को सासरच्या छळाचे वर्णन आहे, “अस्सं माहेर सुरेख बाई खावया मिळतं, अस्सं सासर द्वाड बाई कोंडूनी मारीतं”. ही गाणी मी चाळीत असताना सर्व लहान मुली गोल फेरे धरून आनंदाने गायच्या. अजूनही गातात. ‘कोंडूनी मारीतं’ हेच वर्णन आहे. आणि सुखाची परिसीमा काय, तर ‘खावया मिळतं’. आज परिस्थिती अशी आहे की हा प्रश्न बऱ्यापैकी निकालात निघाला आहे. बऱ्यापैकी. द्याचे कारण कालच दर्दैवाने पिंपरीमध्ये एका सनेने सास आणि नवरा छळ करतात म्हणून आत्महत्या केली. पण त्यांना पुढच्या तीन तासांत अटक झाली. (प्रश्न – ही चळवळ फक्त पुण्यात होती का भारतभर?) ही चळवळ भारतभर झाली. त्याच्या तीव्रता कमी-जास्त होत्या. स्थानिक परिस्थिती वेगळी असेल, प्रश्न वेगळे असतील. महाराष्ट्रात जे कमावता आले, पुण्यात जे कमावता आले, तेच बिहारमध्ये कमावता आले, हेही खरे नाही. सामाजिक प्रगती सुद्धा कमी-जास्त होती. पण चळवळ ही भारतभरची होती. (प्रश्न – नेतृत्व?) एक नेता असा नव्हता. आमच्या अमृता देशमुख होत्या. विद्या बाळ या एकेकाळी ‘स्त्री’ मासिकाच्या संपादिका होत्या. ‘स्त्री’ मासिक किर्लोस्कर ग्रूपच्या मालकीचे आहे. म्हणजे एका अर्थाने भांडवलशाहीच्या टोटल मालकीचे मासिक आहे ते. पण विद्या बाळ संपादक असताना त्यांनी ते पूर्णत: स्त्री-मुक्ती चळवळीचे व्यासपीठ बनवले. खूपशा अकादमीय लोकांनी, खूप प्राध्यापिका, प्राध्यापक यांनी त्याच्यावर कामे केली. त्यात चारपाच नेते नक्की होते. (प्रश्न – ह्या सगळ्या चळवळी एकत्र जोडल्या जातात का त्या इंडिपेंडन्ट असतात?) काही स्त्रियांच्या संघटना ह्या अखिल भारतीय आहेत. त्या राजकीय पक्षांशी जोडलेल्या आहेत. जनवादी महिला संघटना, सी.पी.एम.ची फ्रन्ट ऑर्गनायझेशन आहे, त्यामुळे ती भारतभरची संघटना आहे. अशीच भाजपाचीही आहे. अशीच काँग्रेसवाल्यांचीही आहे. कमी-जास्त प्रमाणात ह्या चळवळीत ह्या सगळ्या राजकीय पक्षांच्या स्त्री-संघटनांचे एकमत होते. प्रत्यक्ष कुटुंबांतर्गत अत्याचाराबद्दल आवाज उठवलाच पाहिजे, आणि हे थांबवलेच पाहिजे, ह्याबद्दल सर्व प्रकारच्या स्त्री संघटनांत एकमत होते. वैचारिक मतभेद असे असतील की ह्याला हिंदू धर्म किती कारणीभूत आहे, ह्याला पुरुषांचा पुरुषीपणा किती कारणीभूत आहे, ह्याला ढासळणारी कुटुंबव्यवस्था किती कारणीभूत आहे, इत्यादी इत्यादी.
ह्या जश्या दोन माझ्या मते यशस्वी चळवळी आहेत तश्या मी तुम्हाला दोन किंवा तीन (माझ्या मते) अयशस्वी चळवळी, सांगणार आहे. पहिली अंधश्रद्धा निर्मूलन, लोकविज्ञान आणि ज्याला रॅशनॅलिस्ट किंवा बुद्धिप्रामाण्यवाद म्हणतात ती. लोकविज्ञान चळवळीत मी अंदाजे आठदहा वर्षे खूप काम केले. आम्ही अनेक प्रदर्शने भरवली, राष्ट्रीय पातळीवरती फिल्मस् केल्या. केरळ शासन साहित्य परिषद ही ह्या चळवळीतली सगळ्यांत मोठ्या स्वरूपाची चळवळ, जी. परमेश्वरन् नावाचे गृहस्थ चालवत. केरळमध्ये लाखोंनी शाखा उघडल्या, अनेक पुस्तके प्रकाशित केली.
महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती, लोकविज्ञान चळवळ, बुद्धिप्रामाण्यवादी मंच वगैरे चळवळी होत्या.
ह्यांनी काम करायचा खप प्रयत्न केला. सातत्याने काम केले. एखाद्या देवीला ‘बळी दिले जात होते ते थांबवणे किंवा देवीला वाहिलेल्या बाईने केस विंचरू नयेत, तर तिला केस विंचरायला लावणे; इथपासून अनेक अंधश्रद्धांचे निर्मूलन झाले. वैज्ञानिक जाणिवांची वाढ करण्यासाठी प्रयोग करायचे कार्यक्रम घ्यायचे. वीस-वीस हजार लोक एकत्र येऊन ते बघत असत. तरीसुद्धा मी अयशस्वी का म्हणतो? त्यांनी एकत्र कामे केली नाहीत, आणि व्यापक परिणामही झाला नाही.
उदाहरणार्थ – मदर टेरेसा ह्या सेंट होत्या की नाही? सेंट म्हणून औपचारिकरीत्या मान्य करायचे असले तर त्या व्यक्तीने चमत्कार केलेले असले पाहिजेत, ही आवश्यक अट आहे. तेव्हा मदर टेरेसांनी असे चमत्कार केले का, हे शोधण्यासाठी कमिटी भारतात आली. त्यांना लोकांनी पुरावे दिले. नरेंद्र दाभोलकरांनी पत्रक काढले, याला विरोध करणारे, की हे काही बरोबर नाही. आणि असे चमत्कार घडू शकतात ही अंधश्रद्धा आहे. पण बाकी सर्व समाजात काहीही हालचाल झाली नाही. तुम्ही-आम्ही सर्वांनी काहीही केले नाही, ही वस्तुस्थिती आहे. ह्या स्वरूपाच्या अंधश्रद्धांना खतपाणी घालणे, त्या वाढवणे आणि ते फोफावत नेणे हे उलट जास्त चाल आहे.
आज टीव्हीवर तुमचे मनोरंजन चांगले होते. मनोरंजनाचे माझ्या मताने इंटरनेटवरचे सगळ्यांत मोठे दोन भाग आहेत. एक अश्लील वाङ्मय, साहित्य. मला वाटते 40% इंटरनेट ट्रॅफिक हा पोर्नोग्राफीवर असतो, असे लोक म्हणतात. त्याच्या खालोखाल धर्मांध प्रचार. एक मुस्लिम होता, त्याची साईट शेवटी बॅन करण्यात आली म्हणे. त्याचे पहिले नाव झकीर. आपण बघणार नाही, कारण आपण मुसलमान नाही. मग आपण काय करतो? आपण हिमांशू महाराज, अजून दुसरे महाराज, तिसरे. पेव फुटले आहे. आणि ह्याला काहीही विरोध होत नाही. मला बऱ्याच वेळा असे वाटते की तीस वर्षापूर्वीचे बरे होते ह्याबाबतीत. निदान मुख्यमंत्री उघडपणे स्वामी व बुवांमागे जायला धजावत नव्हते. वसंतराव नाईक, शरद पवार आणि अशोक चव्हाण यांच्यात काय फरक आहे? तर एक दखलपात्र फरक असा आहे, की हे उघडच करायला लागले. त्याचा जोड पुढच्या चळवळीशी, म्हणजे भ्रष्टाचार. माझे म्हणणे असे नाही, की अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ करू नये. मी परत परत तुम्हाला सांगतो, की चळवळ माझ्या दृष्टीने आवश्यक आहे, योग्य आहे. आणि तरी ती यशस्वी होत नाही. मग का? असा प्रश्न आहे.
बी. टी. रणदिव्यांनी एक लेख लिहिला होता. My party members are communist in public life and Hindu husbands at home. हे त्यांना म्हणावेसे वाटले हे लक्षात घ्या. अंधश्रद्धेने लोक मरत नाहीत हेही खरे नाही! मरतात. उलट जास्त मरतात. मी खरे म्हणजे एक यादी द्यायला तयार आहे. बुवांकडे जाऊन औषधे घेणे. तुम्हाला माहिती आहे का, की ग्रामीण भागात सरासरी दरडोई औषधोपचाराचा खर्च शहरी भागापेक्षा दीड पट होतो. का होतो? नुसते चांगले निदान होत नाही असे नाही. लोक बुवांकडे जातात, ते खोटी औषधे देतात, ती लागू पडत नाहीत, माणसे मरतात.
हाच प्रश्न भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचाही आहे. सुरुवात झाली, कृषि विद्यापीठामध्ये. वशिल्याने अॅडमिशन दिल्या, म्हणून दोन हजार विद्यार्थी कृषि विद्यापीठामध्ये ’72 साली तुरुंगात गेले. काँग्रेसला भयानक हिसका बसला. शेतकऱ्यांची मुले काँग्रेसच्या सरकारविरुद्ध तुरुंगात जातात म्हणजे काय? जातीय भाषेत बोलायचे झाले तर मराठ्यांची मुले मराठा सत्ताधीशांविरुद्ध तुरुंगात जातात म्हणजे काय? जयप्रकाशजी नारायण यांच्या नेतृत्वाखाली या चळवळीला खरे टोक आले. लाखोंनी तरुण त्याच्यात सामील झाले. गुजसत सरकार भ्रष्टाचाराच्या प्रश्नावरने खाली ओढण्यात आले. इमर्जन्सीनंतर ह्या चळवळीतून पुढे आलेल्या लोकांच्या हातात सत्ता आली. प्रत्यक्षात भ्रष्टाचाराविरुद्ध काही झाले नाही. दिसते ते असे, की तो वाढतच गेला. विकिलीक्सने बातमी छापली. राडिआ टेप्स बाहेर आल्या. कोणीतरी काहीतरी भ्रष्टाचार केला, हे तुम्हाला आम्हाला कळले. कोणीतरी मंत्री राजीनामा देतात, कोणीतरी अधिकारी सस्पेंड होतो, विषय संपला. बडतर्फसुद्धा होत नाही.
शेवटचा प्रश्न पर्यावरण, पर्यावरणरक्षण. मुळात पृथ्वी गरम होते आहे, की गार होते आहे, ह्याच्यावर दोन मते आहेत. प्रत्येक राष्ट्राने आपण पर्यावरणाचा विनाश किती जास्त करणार ह्यावर मर्यादा घालून घ्यायची आहे. त्या निमित्ताने जगातल्या सगळ्या मोठ्या कंपन्यांनी एक काहीतरी टार्गेट घ्यायचे. आम्हाला कोणीतरी काम दिले की या सगळ्या कंपन्यांचे रिपोर्टस् अभ्यासा. जवळ जवळ पंचवीस हजार आहेत. सगळे जण गोलगोल गोलगोल गप्पा मारतात, प्रत्यक्षात काही खरे सांगत नाहीत. आणि ह्याला जनरल मोटर्सपासून टाटा मोटर्सपर्यंत कोणाचाही अपवाद नाही. प्रत्यक्षात पर्यावरणाला धोका आहे आणि त्याच्यामुळे लोक मरतात. उदाहरणार्थ – पर्यावरण दूषित झाल्यामुळे लोक कशामुळे मरतात भारतात ? डोमेस्टिक स्मोक – स्वयंपाकघरातला धूर. त्याचे आकडे आहेत, बरे! 10 लाख बायका मरतात. ग्रामीण भागातल्या स्वयंपाकघरांतल्या धुराने सर्वांत जास्त बायका मरतात. कोणाला प्रश्न सुद्धा वाटत नाही. पर्यावरण वगैरे मरू दे. पण स्वयंपाकघरातल्या धुराने लाखो बायका मरतात याच्याबद्दल पर्यावरणवादी काहीही करत नाहीत.
प्लास्टिकच्या पिशव्या म्हणे मुंबईच्या मिठी नदीतून वाहताना तुंबल्या आणि त्याच्यामुळे मुंबईत एक महापूर आला, म्हणून प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर बंदी घातली. म्हणजे पातळ पिशव्या विकायच्या नाहीत. जाड पिशव्या विकल्या तर चालतील. डॉ. माशेलकर म्हणतात, “अहो, काय चाललंय? आम्ही प्लास्टिक अजून पातळ करा, अजून पातळ करा म्हणतो, सगळी टेक्नॉलॉजी डेव्हलप करतोय की ज्याच्यातून एकूण प्लास्टिकची क्वांटिटी कमी लागेल आणि तुम्ही पर्यावरणवादी पातळ पिशवी विकायची नाही म्हणून आग्रह धरून बसता.” मला काही कळत नाही. मला कळते ते एवढेच को ना मोठ्या कंपन्या काही करत, ना जगातली सरकारे काही करत, ना प्रत्यक्ष कृतिशील पर्यावरणवादी लोकांच्या पर्यावरणाच्या प्रश्नांबद्दल काही करत. ह्याचा अर्थ पर्यावरणाचे रक्षण करू नये असे नाही. उलट केले पाहिजे.
भरपूर बदल घडतात रोजच्या जीवनात. हळूहळू हे बदल घडत जातात. माझ्या मताने वरिष्ठ जातीतला शिक्षणाचा प्रसार हा ह्याप्रकारचा आहे. ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार थोडाबहुत झाला असता. होणारच होता. कर्मवीर भाऊराव पाटील झाले म्हणून त्याला वेग आला. असे नाही की हे एकमेव नाव आहे. हळूहळू शिक्षणाचे सर्वत्रीकरण होणे, हे अनेकांच्या कार्यवाहीमुळे झाले. स्त्री-मुक्ती चळवळ ही एका अंडरकरंटमधून निर्माण झाली. एका क्षणी निर्माण झाली आणि एका क्षणी काहीतरी क्रांतिकारक बदल झाला, असे काही घडले नाही.
मूल्याधारण
माझ्या दृष्टीने आजचा कळीचा मुद्दा आहे, चळवळी कधी यशस्वी होतात आणि कधी यशस्वी होत नाहीत. माझ्या दृष्टीने ह्याला पाच महत्त्वाची कारणे आहेत. त्यांतले सगळ्यांत महत्त्वाचे कारण असे की ह्या चळवळीला, ह्या बदलाला काही मूल्याधिष्ठान किंवा मूल्याधिकार होता का? काही एक मूल्याधार आहे का? मूल्ये अनेक प्रकारची असतात. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मला महत्त्वाची मूल्ये वाटतात, आणि हे सांगायला मला काही कमीपणा वाटत नाही. आयान रँडचा व्यक्तिवाद हा मला टाकाऊ आहे. ज्या मूल्याला माझा तीव्र विरोध आहे ते आयान रँड. तिचे सगळे लिखाण अत्यंत व्यक्तिवादी. मनोरंजन छान होते, पण त्यातून जी मूल्ये ओवण्याचा ती प्रयत्न करते त्या भांडवलशाहीच्या पराकोटीच्या व्यक्तिवादी भावना आहेत. पण तेही एक मूल्य आहे. शौर्य हे बाय इटसेल्फ मूल्य [स्वतोमूल्य – संपा. ] असू शकते. मग त्यासाठी युद्ध करावे लागले तर युद्ध करायचे; हेही मूल्य असू शकते. पण बदल जर व्हायचा असला तर कुठले तरी मूल्य आपण पुढे नेतो. मग
आणि शक्यतोवर जे शाश्वत मूल्य आहे ते मूल्य आपण पुढे नेतो आहे, असे घडावे लागते. माझ्या दृष्टीने शौर्य हे शाश्वत मूल्य नाही. व्यक्तिवाद, स्पर्धा ही शाश्वत मूल्ये नाहीत. पण स्वातंत्र्य, समता, बंधुता ही शाश्वत मूल्ये आहेत आणि ही शाश्वत मूल्ये पुढे नेण्यासाठी ही चळवळ बांधील आहे, हे पहिल्यापासून जाणवावे लागते. तो चळवळ पुढे नेणाऱ्यांचा जाणीवपूर्वक प्रयत्न असावा. तो जितका स्पष्ट दिसेल तितकी चळवळ पुढे जायला मदत होते किंवा यशस्वी व्हायला मदत होते. तुम्ही म्हणाल संकरित गाई घ्या. त्यांचा संकर करायचा आणि त्यांचे दूध जास्त निर्माण करायचे, ह्याच्यात शाश्वत मूल्य काय आहे? त्यात एक अहिंसेचे मूल्य आहे. की गाय ही जर चांगल्या प्रकारे जगवली नाही तर ती मारली जाते. ही वस्तुस्थिती होती. गांधीजींच्या मते, मणिभाई देसाईंच्या मते, अहिंसा हे त्यांचे एक शाश्वत मूल्य होते. मणिभाई देसाई अनेक भाषणांतून असे सांगायचे की भाकड गाय जगवण्यापेक्षा मारलेलीच बरी. त्यामुळे जेव्हा साधूंनी गोहत्याबंदीचा मोर्चा काढला तेव्हा त्यांचा विरोध होता. त्यांचे म्हणणे असे होते की कायद्याने गोहत्या बंदी करून काही होणार नाही. प्रत्यक्ष लोक उपाशी ठेवून मारतील. संकरित गाईंची वासरे अशीच मारली जातात, आजही. म्हणून गोव्हा जन्माला आला तर त्याचा उपयोग नसतो. मग त्याला सोडून देतात. मग तो उपाशी राहून मरतो. दुसरे त्याहून जास्त महत्त्वाचे हे गरिबी घालवणे आणि पोटाची भूक भागवणे. हा समतेच्या मूल्याचाच आविष्कार आहे, आणि त्याला ते ठामपणे बांधील होते. असे मला करायचे आहे, असे ते जाहीरपणे सांगायचे.
भारतातील एकूण परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणे, दुधाची मुबलकता वाढणे, हे समतेच्या दृष्टीने आपण करतो. याच्यात कुठेतरी मूल्यांमध्ये विसंवाद येऊ शकतो का? येतो. त्याबद्दल नेत्यांना भूमिका घ्याव्या लागतात. विनोबा दुसरे गांधीवादी. मणिभाईंना त्यांनी असे सांगितले की हे काम बंद करा. असे मणिभाई सांगतात हं! का? गाईंचा जो नैसर्गिक आनंद आहे, तो तुम्ही हिरावून घेता. गाईला काही एक संभोग आनंद मिळतो, आणि तुम्ही आर्टिफिशिअल इन्सिमिनेशन केले की हा निसर्गक्रम तुम्ही चक्रमपणे बदलवता. मणिभाईंची याच्याबद्दलची भूमिकाही स्पष्ट होती की मला गाय जगवणे जास्त महत्त्वाचे आहे. मला शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणे जास्त महत्त्वाचे आहे. मूल्याधार असावा लागतो. हा पहिला मुद्दा आहे.
तुम्ही स्त्री-मुक्तीच्या चळवळीबद्दल बघितले. बाईचा जगण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे, स्वातंत्र्य आहे, त्याच्यात बंधुता आहे, त्याच्यात प्रेम आहे. पण त्याच्यातला सगळ्यांत महत्त्वाचा अधिकार हा आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. त्या काळात स्त्री-मुक्ती चळवळीने पुढे पुढे असेही म्हटले, की बाकी पुढची समता नंतर बघू. जगण्याचा अधिकार आहे की नाही? अशा स्वरूपात विचारल्यानंतर निदान जे विरोधक आहेत त्यांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ शकतो, की अरे, मी जगण्याचा अधिकार बाईला नाकारला तर मग मी पुरुष म्हणून जगू शकतो का? कुठेतरी मूल्यविचाराचा आधार
असावा लागतो.
अंधश्रद्धा निर्मूलनाचा मूल्याधार काय हो, असा जर प्रश्न विचारला, तर प्रचंड गोंधळ आहे. हे लक्षात घ्या. श्रद्धा कशाला म्हणायचे आणि अंधश्रद्धा कशाला म्हणायचे इथपासून ती सुरुवात आहे. मदर टेरेसा ही चमत्कार करू शकते की नाही? हा श्रद्धेचा प्रश्न आहे की अंधश्रद्धेचा प्रश्न आहे? विज्ञान कशाला म्हणायचे आणि कशाला म्हणायचे नाही? सावरकर विज्ञाननिष्ठ होते असा एक प्रचंड समज आहे. आसाममध्ये नागांनी बंड सुरू केले. सावरकरांचा उपाय होता, ॲटम बॉम्ब टाका, अमेरिकेतून आणून. हा माणूस विज्ञाननिष्ठ असू शकतो का? निरीश्वरवाद हे आपले मूल्य आहे का? याच्याबद्दल गोंधळ आहे. भ्रष्टाचाराबद्दल मूल्याधिकार आहे, की समता, स्वातंत्र्य या सगळ्याच्या विरुद्ध भ्रष्टाचार काम करतो म्हणून तो गेला पाहिजे. पर्यावरणाच्या चळवळीचा मूल्याधार काय, हा परत एक चमत्कारिक प्रश्न आहे. त्याचा प्रचार केला जातो तो आहेरेंनी नाहीरेंच्या विरोधात करायचा असा प्रचार आहे. सरळ, स्वच्छ मूल्याधिकार आणि मूल्यांचा आधार हा जर चळवळीला नसला, आणि तो जर नेत्यांनी, त्या चळवळीने जाहीरपणे मांडला नाही तर एक अडचण निर्माण होते.
ज्ञानाधार
दुसरा महत्त्वाचा आधार हा त्याच्याहूनही जास्त महत्त्वाचा आहे. त्याला मी ज्ञानाधार म्हणतो. तंत्रज्ञान हा ज्ञानाचा एक भाग आहे. सामाजिक परिस्थितीचा केलेला विशिष्ट उलगडा, हा ज्ञानाचा दुसरा भाग आहे. आपण जे करतो आहोत त्याच्याबद्दल आपल्याला पुरेसे ज्ञान आहे का, आणि चळवळीतून ते ज्ञान पुढे जाते आहे का, हा प्रश्न आहे. चळवळीला नुसता ज्ञानाचा आधार असून पुरत नाही. चळवळीने संबंधित ज्ञान पुढे न्यावे लागते. असे जर होत नसले तर बऱ्याच वेळा त्या चळवळीत होणारे बदल यशस्वी ठरत नाहीत. ज्ञानाचा अर्थ पुस्तकी ज्ञान असासुद्धा आहे. पुस्तकी ज्ञान म्हणून ते कमी प्रतीचे असे नाही. अनुभवसिद्ध ज्ञान याचा अर्थ मला अनुभवाला येईल तेवढेच ज्ञान. असे मत कार्यकर्त्यांमध्ये व्हायला नको, की मी, माझा निकटचा परिसर आणि त्यातला माझा अनुभव, हाच जणू काही अंतिम ज्ञानाचा निकष आहे. अशी जर गुर्मी कार्यकर्त्यांना यायला लागली, तर प्रश्नच निर्माण होतात. तेव्हा ते पुस्तकी ज्ञान असेल, ते जागतिक ज्ञान असेल, ते अनुभवातून आलेले ज्ञान असेल, ते तांत्रिक ज्ञान असेल, ते फिलॉसॉफिकल ज्ञान असेल, ते समाजशास्त्रीय ज्ञान असेल; या सगळ्या ज्ञानाचा आधार त्या बदलाच्या मागे आहे का? आणि त्या बदलाच्या प्रक्रियेत ज्ञानवृद्धी होते आहे का?
संकरित गाईंच्या संदर्भात असा एक मोठा ज्ञानाधार आधी होता की एकूणच जगभरच्या अर्थशास्त्रज्ञांनी गाईंचे अर्थशास्त्र कसे प्रगत होत जाते, गोहत्या बंदी का निर्माण होते, का आवश्यक ठरते, का ठरत नाही, कुठल्या अर्थकारणामध्ये काय स्वरूपात दुधाच्या अर्थशास्त्राचे स्थान आहे, याच्याबद्दल प्रचंड अभ्यास केलेले होते.
तंत्रज्ञान, म्हणजे वीर्य घ्यायचे कसे, ते वीर्य कसे साठवायचे, हे सातत्याने चालू होते. भारतातल्या अर्थशास्त्राचे ज्ञान की इथून दूध जर मुंबईत नेऊन विकायचे असेल तर काय केले पाहिजे? अनेक प्रयोग पंचेचाळीस सालापासून चालू राहून त्यांतून अनुभवसिद्ध ज्ञान, की हे दूध कसे काय वाहून आपण विकू शकतो. हा कार्यक्रम विकसित व्हायला लागला, तश्या चाऱ्याच्या नव्या नव्या जाती, कुठल्या भागात कुठल्या जाती लावता येतील आणि कशातून चाऱ्याची प्रॉडक्टिव्हिटी खूप वाढेल याच्यावर खूप संशोधन झाले, ते याच काळात झाले. ते इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्निकल्चरल रिसर्चच्या प्रायोजनाने झाले. ते अनेक कृषिविद्यापीठांतून झाले. ते बाईफसारख्या संस्थेने स्वत:च्या शेतांवर करून पाहिले. संकरित गाईंचा कार्यक्रम विकसित होत असताना त्याच्यासाठी योग्य असे ज्ञान हे फक्त आधीचे नाही, तर सातत्याने नवे नवे ज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न हा त्या चळवळीने केला. त्यातला काही चांगला झाला. उदाहरणार्थ – सुबाभुळवर अशी टीका आहे की त्याच्यामुळे काही ठिकाणी मोनोकल्चर्स निर्माण झाली. पण त्याच्यात अनेक चाऱ्याच्या नव्या जाती निर्माण झाल्या. गाईच्या कुठल्या प्रती टिकवून ठेवल्या पाहिजेत, हाही याच चळवळीचा भाग होता. हे काही आधी झालेले नव्हते. तेव्हा ज्ञानाचा आधार असणे आणि तो विकसित होत जाणे,
स्त्री-मुक्ती चळवळीबद्दलही खूप घटना आहेत. स्त्री-मुक्ती म्हणजे काय? स्त्रियांच्या संघटनांच्या मागण्या काय आहेत? त्याबद्दलचे भारतीय इतिहासाचे आकलन, भारतीय समाजशास्त्राचे आकलन, जागतिक पातळीवरती त्याचे असलेले आकलन; हे राष्ट्रीय पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर विकसित झाले. याच्यावर खूप चर्चा झाली. मुलीचे संमतीचे वय, (म्हणजे कोणत्या वयात तिच्याशी संभोग केला तर ते बेकायदा मानू नये), हे वाढवावे आणि चौदा करावे असा जेव्हा कायदा येणार होता (सारडा अॅक्ट), तेव्हा त्या कायद्याला विरोध करणाऱ्यांमध्ये रवींद्रनाथ टागोर होते. त्यांनी जाहीरपणे असे सांगितले की अल्पवयात मुलीशी संभोग केला तर तो तिला दुःखदायक असतो. त्यामुळे तिची कामेच्छा मारली जाते आणि त्यामुळे आमच्या कुटुंबांचे रक्षण होते. हे थोर कवी, राधाकृष्णांची प्रेमकाव्ये लिहिणाऱ्या रवींद्रनाथ टागोरांनी सारडा अॅक्टला विरोध करताना लिहिले होते. हा रवींद्रनाथ टागोरांचा छोटेपणा किंवा मोठेपणा म्हणून मी तुम्हाला सांगत नाही, मी तुम्हाला सांगतो घटनेची, वादाची तीव्रता. त्या काळातले आगरकरांचे लेख वाचले तर अंगावर काटा उभा राहतो. तिथपासून चालत आलेली ही एक ज्ञानाधाराची परंपरा आहे. हे काय होते आहे? कसे घडते आहे? का घडते आहे? ह्याच्याबद्दल प्रचंड चर्चा, प्रचंड वादविवाद, प्रचंड ज्ञाननिर्मिती आणि चळवळींनी ती ज्ञाननिर्मिती पुढे जाणार. आमचा सांस्कृतिक वारसा काय? हा प्रश्न ऐंशी साली सुद्धा रूपकंवरबद्दल विचारला गेला. त्याचे विश्लेषण केले गेले. ससूनमध्ये जाऊन केस हिस्ट्रीज् गोळा करून, घरोघर जाऊन तपास करण्याचे काम स्त्री-चळवळींनी केले. त्या एक नवा ज्ञानसाठा बनवत होत्या, की काय आहे. जळिताच्या केसेस म्हणजे खरेच किती जळिताच्या केसेस नायलॉनच्या साड्या आणि जमिनीवरच्या शेगड्यांमधून निर्माण होतात? तेव्हा हा ज्ञानाधार निर्माण होऊन तो वेगाने वाढवावा लागेल.
दुर्दैवाने असे वादविवाद हे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ, लोकविज्ञानवाले सुद्धा फारसे करत नाहीत. ते एका अंधश्रद्धेबद्दल बोलतात. त्याचा उलगडा करून दाखवतात. ते केलेच पाहिजे. पण त्याच्यापलिकडे जाऊन ह्याच्याबद्दल एकूण ज्ञानप्रसार करणे ‘व्हायला हवे. भ्रष्टाचार का निर्माण होतो? कशातन निर्माण होतो? भ्रष्टाचारी माणस वाईट, त्याच्यावर खटला भरला पाहिजे, त्याला तुरुंगात टाकले पाहिजे, त्याला शिक्षा झाली पाहिजे; हे सगळे बरोबर आहे. पण हे कशामुळे होते? का होते? याची मुळे कशात आहेत? याच्यामागे प्रेरक शक्ती कुठल्या आहेत? एकूण समाजात एवढ्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार का होतो? जयप्रकाशजींनी लिहिलेली ‘लोकतन्त्र के नाम चिट्ठी’ तुम्ही वाचली असेल. पुस्तिका चांगली आहे. पण जर तुम्ही असा प्रयत्न केला शोधण्याचा की भ्रष्टाचार का होतो आणि होऊ नये म्हणून काय करावे, तर याच्याबद्दल तीमध्ये किती आहे हो? फार कमी आहे.
पर्यावरणाच्या चळवळीबद्दलसुद्धा हेच. नेमके आपण काय म्हणतोय, याच्याबद्दल माहिती करून द्यायची. शेरेबाजीच जास्त. ह्या कशाबद्दलच फारसे काही माहिती नाही. त्याच्यात कोणीही आपणहून भाग घेत नाहीत त्या चर्चेत. माशेलकर जेव्हा म्हणाले, प्लास्टिक पातळ करत नेणे हाच कार्यक्रम आहे, तेव्हा एकानेही माशेलकरांना जाहीरपणे चर्चेचे आवाहन केले नाही. असे करून चालत नाही चळवळीमध्ये. अशी निष्ठा लागते की आम्हीच खरे. आणि आम्ही तुम्हाला पटवून देणार आहोत, की का आम्हीच खरे ! त्याला जबरदस्त ज्ञानाधार लागतो. नुसता आरडाओरडा आणि भांडण पुरेसे नाही.
कार्याधार
तिसरा महत्त्वाचा कार्याधार लागतो. बदल यशस्वी व्हायचा असला तर त्याला जीवनदायी कार्यकर्ते लागतात. काम सातत्याने, नेटाने करण्याची आवश्यकता असते. नेतृत्व लागते, पण नेतृत्व हे महत्त्वाचे नसते अनेक वेळा, माफी मागून मी असे म्हणू इच्छितो की महात्मा फुले जरी झाले नसते तरी सुद्धा महाराष्ट्रात स्त्री-शिक्षण झाले असते. सावित्रीबाई फुल्यांना शिव्याशाप खायलाच लागले. त्यांनी ते खाल्ले आणि तरीही स्त्रियांना शिकवले. अनेक अत्यंत निष्ठावान लोकांनी शिक्षण संस्था सुरू करून त्या अत्यंत निष्ठेने चालवल्या. मी ज्या शाळेत शिकलो ते एक इंग्लिश स्कूल होते. गरीब बिचारी आमची शाळा. तिसऱ्या मजल्यावरचे पाणी तळमजल्यापर्यंत पोचले पावसाळ्यात, की आमची शाळा बंद व्हायची. पण आमच्या हेडमिस्ट्रेसबाई होत्या मनोहर नावाच्या, त्यांनी निष्ठेने ती शाळा चालवली. कारण की त्यांचे म्हणणे असे होते की गुंडांच्या वस्तीत, गुंडांसाठी शाळा हवी. आम्ही गुंडांच्या वस्तीत नव्हतो, पण ती आमच्या घराजवळ होती. असे शाळा चालवणारे निष्ठावान लोक लागतात. त्यांची त्या शिक्षणाला कमिटमेंट लागते. त्यांनी ते आयुष्याचे कार्य म्हणून स्वीकारलेले असावे लागते. त्यासाठी योग्य संस्थांची उभारणी करावी लागते. त्या योग्य संस्थांमध्ये सातत्य राहील आणि सातत्याने नवे लोक येतील याची काळजी घ्यावी लागते. हे जर झाले नाही तर चळवळी यशस्वी होत नाहीत. नेते जे लोकांत सांगतात ते त्यांनी स्वत:च्या आयुष्यात राबवावे लागते. अशी विसंगती चालत नाही, की मी बाहेर एक बोलतो, घरी दसरेच करतो. साधा व्यावहारिक मुद्दा आहे. मणिभाईंनी एक संस्थाच निर्माण केली असे नाही तर वारसदार सुद्धा निर्माण केले. गिरीश सोनी एका चर्चासत्राला आले होते. मी म्हटले, “अहो, मणिभाई गेले हे कळले. हेगडे गेले कळले. आता तू पण तेच काम करणार?” आणि तो म्हणाला, “हो, मी तेच करणार, आणि माझ्यानंतर काम करायला लोक या संस्थेत आहेत.” हे सातत्य आहे. नवे नवे कार्यकर्ते येणे आणि त्या संघटनेतसुद्धा एक अंतर्गत डेमॉक्रसी असणे, हे सगळे त्या कार्याधाराचेच भाग आहेत.
लोकविज्ञान चळवळीने मार कुठे खाल्ला? आजचे संचालक म्हणतात, “पंचवीस वर्ष मी कॅलेंडर काढत आलो. पण मला एडिटिंग करायला सुद्धा एक माणूस मिळत नाही हो!” लोकविज्ञानचे एक कॅलेंडर काढतात, चांगले काढतात. पाहिले आहे का कुणी? तमच्याचसाठी निघते आणि तुमच्यापैकी कुणी पाहिलेले सद्धा नाही! संचालक म्हणतात, “प्रूफ रीडिंगलासुद्धा माझ्याकडे माणूस नाही.” याचा अर्थ काय? तुम्ही संस्थात्मक उभारणी करू शकला नाहीत. आणि सातत्याने नवे नवे लोक त्याच्यात बोलवू शकला नाहीत. अमृता देशमुख सांगायच्या, “काही संस्थांमध्ये चौकशी करतात, की तुम्ही का आत येताय? म्हणजे जणू काही लोक तुमची संघटना ताब्यातच घ्यायला आलेत, तुमच्याशी लढाई करायलाच आलेत. असा बाहेरच्या माणसाला आत न येऊ देण्यासाठी केलेला बंदोबस्त. काही संघटनांचे स्वरूप होते की आमचे आम्ही ! दुसरा कुणी जर आला तर आम्ही भ्रष्ट होऊ अन् तो येणारा थोडा भ्रष्टच असणार. तुमच्या इथे सगळे शुद्ध असतात, तर प्रश्नच मिटला ना सगळा !” कार्य करण्याची पद्धत अशी की आम्ही आमच्याभोवती एक कुंपण घालून घेणार. एकेकाळी कम्युनिस्ट पक्षात असायचे, “तुला कार्ड द्यायच्या आधी तपासून बघतो.”
हाच प्रकार तुम्हाला पर्यावरणाविषयी दिसेल. ते कोण आपले, नोबेल प्राईज ज्यांच्या संघटनेला मिळाले ते. तपासा, आणि लक्षात येईल, अरे. ते टाटाच्या पेरोलवर आहेत. त्यांनी दिलेले रिपोर्टस् खोटेच होते. लोकांचे म्हणणे आहे, की हे पर्यावरणवादी नसलेला धोका फार मोठा करून सांगतात. असे जर नेतृत्व असले आणि त्याला जर ज्ञानाधारही नसला आणि कार्याधारही नसला तर चळवळीने बदल होत नाहीत.
जनाधार
ह्या सगळ्यांतून निर्माण होणारा पुढचा भाग हा महत्त्वाचा आहे, जनाधार. आपण हे कोणासाठी करतो? आपली मानसिकता काय आहे? चार लोकांपुरती आपापसातली हौस आहे, की याच्यात ज्यांना काहीतरी मिळवायचे आहे आणि ते ज्या मूल्यांच्यावर मिळवायचे आहे, त्यांचा मोठ्या संख्येने सहभाग आहे? किती, कोण एकूण याप्रकारे सहभागी आहे; याला जनाधार म्हणता येईल. संकरित गाईंच्या कार्यक्रमात महाराष्ट्रातली एक कोटी कुटुंबे सहभागी होती. महाराष्ट्रातल्या जनतेचा अंदाजे वीस टक्के भाग हा याच्यात थेटपणे सहभागी होता, शहरी भागात ज्यांना दूध मिळाल्याने
ना आनंद झाला असे बघितले, तर ती संख्या अजून वाढेल. स्त्री-मुक्तीचा कार्यक्रमही असाच आहे. प्रत्यक्ष कृतीच्या पातळीवर सुद्धा हजारो स्त्रिया संबंधित होत्या. भावनिक पातळीवर तर हा प्रत्येक स्त्रीचा प्रश्न होता. आणि हळूहळू तो निम्म्या पुरुषांचा प्रश्न बनला. ‘पुरुष उवाच’ नावाची स्त्री-मुक्तीला मदत करणाऱ्या पुरुषांची संघटना होती. जनाधार हा ज्या वर्गाचा नेमका फायदा आहे त्याच्या पलीकडच्या वर्गामध्ये जाऊन पोचतो का?
बऱ्याच वेळा दलित चळवळीवर टीका होते. काही प्रमाणात खरे आहे, की बौद्धांची चळवळ, त्यांच्यात मांग येतो म्हटले, नकोसे वाटते. मातंग येतो म्हटले की नकोसे वाटते. गारुडी तर चालतच नाही. गारुड्यांबद्दलही खरे आहे. त्यांनी जातीची संघटना केली की त्यांना इतर कोणी चालत नाही. जनाधाराचा एक अर्थ असा आहे की जे सगळे शंभर टक्के येणार नाहीत, पण ज्यांचा नजीकचा फायदा आहे असे सोडून इतर लोक त्यात सामील होतात का?
संकरित गाईंच्या कार्यक्रमामध्ये अनेक शेतकरी सामील झाले. काहींनी चारे वाढवले. काहींनी दुधाच्या गाड्या चालवल्या. काही शहरामध्ये आनंदाने दूध प्यायले. ज्यांचा प्रत्यक्ष गाई संकरित करण्याशी काही संबंध नाही असे अनेक जनसमुदाय त्या कार्यक्रमांमध्ये गुंतू लागले. स्त्री-मुक्तीच्या कार्यक्रमात गुंतणारे पुरुष मी स्वतः अनेक पाहिलेले आहेत. काही वेळा असे होते की संकुचित जनाधार अधिक व्यापक होण्याचे प्रयत्न हे फारसे होत नाहीत.
माझा एक अनुभव सांगतो, मी एकेकाळी उदगीरला युवक क्रांती दलाचा पूर्णवेळ कार्यकर्ता होतो. तिथे एक दुधाची डेअरी होती. त्यांनी सांगितले, आम्हाला शंभर युवकांना नोकऱ्या द्यायच्या आहेत. तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की जो जो पाच हजार इथे आणून देईल त्याला नोकरी. लोकांनी घरावरचे पत्रे सुद्धा विकले आणि त्याला पाच हजार रुपये नेऊन दिले. शेवटी त्याने वीसच लोकांना नोकऱ्या दिल्या. बाकीचे लोक आमच्याकडे आले. आम्ही मोर्चा काढला. आम्हाला पोलिसांनी पकडून जेलमध्ये टाकले. आम्ही पंधरा दिवस जेलमध्ये राहिलो. मग सुटून आलो. त्या ऐंशीतल्या अजून वीस लोकांना नोकऱ्या मिळाल्या. बाकीच्या लोकांचे काय म्हणणे होते? अरे चोरांनो, तुम्ही आधी पैसे नेऊन दिले होते ना! तेव्हा तुमचा भ्रष्टाचार विरोध कुठे गेला होता? उदगीरमधल्या रिक्षा स्टँडच्या रिक्षावाल्याला असे वाटले नाही की हा आपला लढा आहे. आमची युनियन त्या रिक्षावाल्यांमध्ये सद्धा होती. उदगीरमध्ये एक खादी ग्रामोद्योगाचे केंद्र आहे. तिथे चरख्यावर काम करणाऱ्या बायकांमध्ये पण आमची युनियन होती. पण त्या कोणालाही असे वाटले नाही की ह्या पोरांचा लढा आपला आहे. आम्ही काही त्यांना फारसे इन्व्हॉल्व्ह करून घेऊ शकलो नाही. म्हणजे मूल्याधार जो आपण म्हणतो भ्रष्टाचाराविरुद्धचा, तो खरा आमच्याकडे नव्हता. आमच्याकडे म्हणजे एक आनंद करंदीकर सोडा. आनंद करंदीकरांना नोकरी पण नको होती. लोक म्हणतात, तुम्हाला हौसच आहे तुरुंगात जायची! तेव्हा तुमचे सोडा. बाकीच्यांचे काय? भ्रष्टाचाराचा फायदा झाला तर आम्ही भ्रष्टाचारी, भ्रष्टाचाराचा फायदा नाही झाला तर आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात. इतके जेव्हा ते संकुचित आहे, तेव्हा तो काही लढा व्यापक जनाधाराचा लढा असू शकत नाही.
कालाधार
शेवटचा महत्त्वाचा भाग की एक कालाधार ही लागतो. ती त्या काळाची गरज असावी लागते. हा अधिक व्यापक विषय आहे. कुठलेच समाजातले बदल हे स्वयंपूर्ण, तेवढ्यापुरते घडत नाहीत. त्यांचा सगळ्या इतर गोष्टींशी संबंध असतो. वर्तमानपत्रे छापायची असली तर प्रिंटिंग प्रेसचा शोध लागलेला असावा लागतो. एका बाजूला तंत्रज्ञानाची गरज असावी लागते, दुसऱ्या बाजूला मला लोकांना काहीतरी सांगायचे आहे अशी निकड वाटावी लागते, कारण तुम्हाला स्वातंत्र्याची चळवळ लढायची आहे. भारतातली वर्तमानपत्रे ब्रिटिशांच्या बोटीतून आलेला कुठला माल विकाऊ आहे हे जनतेला कळावे म्हणून सुरू झाली. ती व्यापारी गरज होती. जाहिराती छापाक्ला वर्तमानपत्राचा तेव्हा मुख्य उपयोग होता. बॉम्बे गॅझेट, मुंबई समाचार नंतर आले.
वर्गीय जाणीव ही काय भानगड असते? आता हा मार्क्सवाद्यांचा शब्द आहे. कामगार वर्गाला असे वाटायला लागले होते, की भांडवलशाहीच्या विरुद्ध मी लढा करणार आहे. ह्याला ते वर्गीय जाणीव म्हणतात. वर्ग वेगवेगळे असू शकतात. शेतकऱ्यांची म्हणून एक वर्गीय जाणीव असू शकते. मजुरांची म्हणून एक वर्गीय जाणीव असू शकते. ह्या जाणिवा सुद्धा विकसित व्हाव्या लागतात. दोनशे वर्षापूर्वी, तीनशे वर्षापूर्वी सतीच्या चालीला का विरोध झाला नाही, हा प्रश्न हास्यास्पद आहे. एकूण समाजामधली समतेची भावना, वैयक्तिक स्वातंत्र्याची भावना, जगण्याच्या अधिकाराबद्दलची जाणीव ही विकसित व्हावीच लागते. जशी तंत्रज्ञानामधली प्रगती अपेक्षित असते तशीच समाजातल्या मूल्यसंस्थांतील प्रगतीही आवश्यक आहे. प्रत्येकच पिढी असे म्हणते की आमच्यावेळी बरे होते, आता यांची मूल्यव्यवस्था ढासळली आहे. कोणी गांभीर्याने म्हणत नाही, बरे का! मी तरी म्हणत नाही. तुम्ही जर कालक्रम बघितला तर असे म्हणायला काही जागा नाही. आपण असा नक्कीच आशावाद ठेवू शकतो की ज्या मूल्यांवर आपण श्रद्धा ठेवतो ती इतिहासाच्या विकासक्रमात घडत आलेली मूल्ये आहेत, आणि ती एकूण पुढेही वाढत जाणार आहेत.
चांगल्या अर्थाने व्यक्तिस्वातंत्र्य (मी कमालीचे एकांगी व्यक्तिस्वातंत्र्य म्हणत नाही), किंवा एकूणच समाजामधले लोकशाहीकरण वाढत चाललेले आहे. बदलाच्या चळवळींच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे. आपण जे बदल करू इच्छितो त्याला एक कालाधार आहे. जी मूल्ये वर्धिष्णु आहेत; स्वातंत्र्य असेल, समता असेल, बंधुता असेल, अहिंसा असेल, कोणीतरी म्हणाले प्रेम आहे, आहेच ते. बंधुतामध्ये घालून टाकतो; असा कालाधारही त्या चळवळींना असावा लागतो. कालाधाराचा एक अर्थ असा, की त्या इतर चळवळींशी आणि इतर विचारांशी किती जोडलेल्या आहेत: किती विविध अंगांनी जीवनाच्या किती क्षेत्रांत ती चळवळ जाऊन भिडली आहे?
संकरित गाईंची मूळ ठेवण वीर्य आणायचे, टोचायचे आणि संकरित वासरू निर्माण करायचे अशी असली, तरी दुसऱ्या बाजूला मग अख्खी चाऱ्याची पिके आणि त्यामुळे पूर्ण शेतीचे नियोजन, हाही त्या चळवळीचा भाग बनतो. गाई-म्हशी कश्या सांभाळायच्या हे गुजरातमधल्या शेतकऱ्यांना जेव्हा कळायला लागले तेव्हा त्यांना पहिल्याने आपल्या बायकोची काळजी घेणे का महत्त्वाचे आहे हेही कळायला लागले. बाईला दिवस राहिले की तिची काळजी किती नीटपणे घेतली पाहिजे, हे त्याला गर्भार म्हशीची काळजी घ्यायला जेव्हा आम्ही शिकवले, तेव्हा नीट कळायला लागले, असे कुरियन म्हणतात. मुद्दा असा की जीवनाच्या विविध क्षेत्रांना ही चळवळ जाऊन भिडली पाहिजे. स्त्री-मुक्तीची चळवळ, त्यात कोअरचा भाग कुटुंबांतर्गत हिंसा थांबवणे असा जरी असला तरी राजकारणामध्ये आम्हाला स्थान काय आहे, पुण्याच्या किती शिक्षण संस्थांच्या प्राचार्य स्त्रिया आहेत? पंच्याहत्तर साली एवढा सगळा शिक्षणाचा प्रसार झाल्यानंतर त्यांनी असा प्रश्न विचारला, साधा, की एवढी पुण्यात चाळीस कॉलेजेस आहेत. किती कॉलेजेस्च्या प्राचार्य स्त्रिया आहेत? उत्तर होते; शून्य. लॉ कॉलेजची प्राचार्य पहिल्याने त्या काळात झाली. लॉ कॉलेजचे प्रिन्सिपॉल स्त्री-मुक्ती चळवळीशी संबंधित होते. कालाधार याचा अर्थ, हा प्रश्न कुटुंबातील अत्याचाराशी संबंधित आहे का, की पुण्याच्या किती संस्थांच्या प्रिन्सिपल्स या स्त्रिया आहेत? वरकरणी नाही. समाजातले एकूण स्त्रियांचे स्थान, सत्तेतील एकूण स्त्रियांचे स्थान याच्याशी तो जरूर संबंधित आहे.
एल.आय.सी.ची जाहिरात होती आत्ता आत्तापर्यंत, की विमा हा मुलाच्या शिक्षणासाठी आणि मुलीच्या लग्नासाठी. ह्याच्यावर त्या चळवळीने रान उठवले. एल.आय.सी.वाल्यांना या जाहिराती बंद कराव्या लागल्या. याचा प्रत्यक्ष संबंध जळिताच्या केसेसशी आहे का? म्हटले तर आहे. कारण की हुंडा मिळेल म्हणूनच लग्न करायचे आणि एकीला जाळून परत लग्न केले की परत हुंडा मिळतो. एकाने अभ्यास केला, की अशा आधी ज्या केसेस झाल्या, पुढच्या तीन वर्षांत त्या पुरुषाचे लग्न होते आणि त्याला परत हुंड्यासकट बायको मिळते. प्रश्नाच्या विविध अंगांना जाऊन भिडावे लागते. आणि असे म्हणावे लागते, की ठीक आहे, हा गाभ्याचा प्रश्न आहे. मगच त्याचा कालाधार आहे की नाही ते कळते.
दुर्दैवाने “भ्रष्टाचाराचा संबंध भांडवलशाहीशी आहे का हो?” असा प्रश्न सुद्धा विचारलेला अनेकांना चालत नाही. पण राजकारणी भ्रष्टाचारी आणि त्यांना पैसे देणारे सगळे कोण? आत्ता कधी नव्हे ते सीबीआय निदान त्यांचे इन्टरव्ह्यू घ्यायला लागले. एकालाही अजून अटक केलेली नाही. कोण कोण पत्रकार वीर सिंघवी आणि बरखा दत्त, हे त्या नीरा राडियाशी चर्चा करतात, की ह्या मुलाखतीचा अंत कसा व्हायला पाहिजे? मध्य कसा असला पाहिजे? आम्ही तुमच्यासाठी सगळी मुलाखत कशी डिझाईन करू? हा भ्रष्टाचाराचा भाग नाही? मिडिया दाबून ठेवते, बरोबर आहे. इतर कोण बोलतात? आयपीएलबद्दल! पहिल्या दिवशी बातमी आली, की हे देशपांडे आणि अॅनालॉग यांनी म्हणे डील केले होते. मग दुसऱ्या दिवशी बातमी आली, की सुप्रिया सुळे म्हणतात, की आमचा त्या कंपनीशी काही संबंध नाही. तिसऱ्या दिवशी बातमी आली की बोर्डाच्या सभेला आम्ही हजर नव्हतो. चौथ्या दिवसापासून एका शब्दाने एकही बातमी नाही. इतका सुद्धा भ्रष्टाचाराचा संबंध बाजूला काढून इतर कोणाशी जोडायचा नाही, असे जर झाले, तर त्याचा कालाधार उरत नाही. त्याला जनाधारही राहात नाही. दुर्दैवाने भ्रष्टाचारविरोधी चळवळीचे हेच आहे. पर्यावरणविरोधी चळवळीचे हेच आहे. आणि अंधश्रद्धा आणि लोकविज्ञान चळवळी या इतर कुठल्याही गोष्टीशी काहीही संबंध जोडायला भांडत नाही. कारण
माझा स्वत:चा अनुभव आहे, की पेटंट कायद्याला विरोध करायला पाहिजे, इन्टलेक्चअल प्रॉपर्टी राईटसला. अशी आम्ही भमिका घेतली. लोकविज्ञानमधल्या सगळ्यांनी विचारले, की याचा लोकविज्ञानशी काय संबंध आहे. पेटंट अॅक्टचा, आणि बौद्धिक मक्तेदारी असावी की नसावी; परदेशी कंपन्यांचा आणि लोकविज्ञान चळवळीचा काही संबंध नाही. अंधश्रद्धा निर्मूलनचा तर त्याहून नाही. मग आम्ही त्यांना पटवून दिले, की ह्याच्यामुळे औषधे महाग होतात; आणि स्वस्त औषधे असा आपला कार्यक्रम आहे की नाही? म्हणून आपण इन्टलेक्चुअल दादागिरीला विरोध केला पाहिजे; असा त्यांचा संबंध जोडू शकतो. एकूण शिक्षणातली ब्राह्मणी मक्तेदारी याच्यावर खरे सर्व चळवळींनी बोलले पाहिजे. ते अजिबात बोलणार नाहीत. असे बोलणे त्यांना आवडत नाही. कारण की ते एकजात, मी धरून, सगळे ब्राह्मण आहेत. आणि आपण एका जातीच्या छोट्या कळपात अडकलो आहोत, याचेही भान त्यांना राहात नाही. असे झाले की कालाधारही जातो, जनाधारही जातो.
समारोप
माझ्या दृष्टीनी जर चळवळीला मूल्याधार असला, तर तो बरोबर मूल्याधार असावा लागतो. तिने व्यापक ज्ञान आत्मसात केले असले आणि ज्ञानवृद्धीत तिने सातत्याने भर घातली असली तर ज्ञानाधार लाभतो. तिच्यात सातत्याने काम करणारे प्रामाणिक कार्यकर्ते असले; (नेते आवश्यक असतात, ते निर्माण होतात, पण जे इतरांना आत घ्यायला तयार आहेत, सातत्याने काम करायला तयार आहेत, लोकशाहीने वागायला तयार आहेत, संस्थात्मक उभारणी करायला तयार आहेत आणि आपले वैयक्तिक जीवन आणि आपला सार्वजनिक मुखवटा याच्यात काहीएक कन्सिस्टन्सी बाळगायला तयार आहेत) तर कार्याधार घडतो; जर ज्यांचा लगेचचा फायदा आहे असे सोडून इतर लोकांचा सहभाग यायला लागतो, तेव्हा चळवळीचा जनाधार निर्माण होतो. इतर चळवळी, जीवनाची विशिष्ट अंगे, तंत्रज्ञान, इतर ज्ञान, इतर चळवळी ह्यांच्याशी संबंध आहे, की ते फक्त एका संकुचित प्रश्नाबद्दलच मर्यादित आहे? त्यांचा टोकाचा प्रश्नही असू शकतो; पण त्या प्रश्नाची नाती ही सार्वत्रिक जोडलेली आहेत का? आणि त्या त्या कालक्रमाप्रमाणे आहेत का? हे प्रश्न आपण विचारले पाहिजेत. या सगळ्या प्रश्नांना होकारच मिळेल अशी खात्री नाही. हा होकार करण्याकडे आपला प्रयत्न असला पाहिजे. त्यातूनच कालाधार मिळतो. चळवळीचा जनाधार घडवावा लागतो. चळवळीचा कार्याधार घडवावा लागतो. चळवळीचा ज्ञानाधार घडवावा लागतो. चळवळीला मूल्ये स्वीकारावी लागतात. एखादवेळेस मी एक लहान संस्था उभारून तिथे हे काम करत असेन. ती जर बदलाची असेल तर तीही चळवळच आहे. असे जर झाले तर चळवळी यशस्वी होतात. महाराष्ट्रामध्ये हे झालेले आहे. अशा चळवळी यशस्वी होण्याचीच मुख्य परंपरा आहे. अयशस्वी होण्याची परंपरा आता कमी आहे. हा आपल्या दृष्टीने फार चांगला भाग आहे.
मेट्रिक कन्सल्टन्सी लिमिटेड,
91, फ्लोरिडा इस्टेट, केशवनगर, मुंढवा, पुणे 411036

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.