मानवी अस्तित्व (४)

गितामा हे विश्व फक्त आपल्यासाठीच आहे का?

या प्रश्नाचे उत्तर कदाचित गोल्डिलॉक पॅराडॉक्समधून मिळू शकेल. अणूमधील परमाणूंना घट्ट धरून ठेवणारे सशक्त आण्विक बल जरूरीपेक्षा जास्त असते तर सूर्यासारख्या तळपत्या ताऱ्यातील हायड्रोजन वायू क्षणार्धात भस्मीभूत झाले असते. आपल्या माथ्यावर तळपणाऱ्या सूर्याचा स्फोट होऊन तुकडे तुकडे होत तो तारा नष्ट झाला असता व या पृथ्वीवर एकही जीव अस्तित्वात आला नसता. तद्विरुद्ध सशक्त आण्विक बल काही टक्क्यांनी जरी कमी असते तर आपल्या या जगाला आकार देणारे जड मूलद्रव्य अस्तित्वात आले नसते व त्याप्रमाणे मनुष्य प्राणीसुद्धा……
गुरुत्व बल आहे त्यापेक्षा कमी असते तर सूर्याचा गाभा फोडू शकणारी आण्विक , प्रक्रिया सुरू झाल्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत सूर्य किरण पोचले नसते. आणि सूर्यकिरणाविना जीवसृष्टी अस्तित्वात आली नसती. हेच गुरुत्व बल जास्त असते तर करोडो वर्षापूर्वीच सूर्यामधील सर्व प्रकारचे वायू जळून खाक झाले असते व आपण जन्मालाच आलो नसतो.
या प्रकारची उदाहरणे भौतिकशास्त्रातील काही महत्त्वाच्या स्थिरांकांना अधोरेखित करत असतात. त्यामुळे या सृष्टीतील अत्यंत महत्त्वाच्या पॅरामीटर्सचे – मूलभूत कणामधील बल, त्यांचे वस्तुमान इ.इ. – मूल्य अचूकपणे निर्दिष्ट केलेले असून त्यांचे मूल्य फक्त या सृष्टीतील जीवोत्पत्तीला अनुकूल असतील इतपतच आहेत असे वाटण्याची शक्यता आहे. या मूल्यात अगदी किंचितसाही फरक पडला असता तरी – कमी किंवा जास्त – हे सांगण्यासाठीसुद्धा आपल्यापैकी कुणीच जिवंत राहिले नसते; किंबहुना कुणीही जन्मालाच आले नसते.
यावरून काय निष्कर्ष काढता येईल? एक शक्यता अशी आहे की या विश्वातील महत्त्वाच्या पॅरामीटर्सची निश्चिती व या पॅरामीटर्सचे फाइन-ट्यूनिंग करणारी एखादी शक्ती या विश्वात असावी – कदाचित परमेश्वर? या प्रकारची सर्वेसर्वा असलेली परमेश्वर संकल्पना बहुतेकांना आवडत असली तरी वैज्ञानिकांना मात्र या ब्रह्मांडातील गतिविधींना नियमित, नियंत्रित व फाइन-ट्यून करण्यासाठी अतिनैसर्गिक शक्ती असलेल्या परमेश्वराची गरज वाटत नाही. 1808 साली स्वतः लिहिलेल्या पुस्तकाची एक प्रत नेपोलियनला देणाऱ्या लॅप्लास या खगोलशास्त्रज्ञाला, नेपोलियनने ‘या पुस्तकात कुठेही परमेश्वराचा उल्लेख का नाही?” असे विचारल्यावर, त्या गृहीतकाची मला गरज भासली नाही असे उत्तर लॅप्लास देतो. अंतरिक्षातील घडामोडींच्या स्पष्टीकरणासाठी पौतिकीतील सिद्धान्त पुरेसे आहेत यावर वैज्ञानिकांचा संपूर्ण विश्वास आजही आहे.
अजून एक शक्यता अशी आहे की याव्यतिरिक्त दुसरे काही असूच शकत नाही. या पृथ्वीवरील सजीवांना अनुकूल अशा वातावरणाची निर्मिती या विश्वातील काटेकोर नियमांमुळे तयार झालेली आहे. त्यामुळे ते असेच होणार होते व त्याला दुसरा पर्याय नव्हता. यावरून आपण आपले सुदैव म्हणून इतर कुठल्याही विश्वात जन्म न घेता याच विश्वात जन्म घेतलेले आहोत व आपल्या या बुद्धिमान जीवनाला पूरक असे हे वातावरण आपल्याला सुदैवाने मिळाले आहे, असाही निष्कर्ष काढता येईल. परंतु बहुतेक वैज्ञानिकांना हा दावा पटणार नाही.
अजून एका स्पष्टीकरणानुसार या अंतराळात अनेक विश्वे असून प्रत्येक विश्वाचे वेगवेगळे भौतिकीचे नियम आहेत. आपण मात्र सजीवांना पूरक व अनुकूल ठरणाऱ्या विश्वात जन्माला आलेलो आहोत. बहुविश्वाची (multiverse) कल्पना अत्यंत आकर्षक असून या संकल्पनेला भौतिकी सिद्धान्तांचा पाठिंबा आहे. तंतु सिद्धान्तानुसार (string theory) ब्रह्मांडात सुमारे 10500 विश्वे असून प्रत्येकाचे भौतिकी तत्त्व-नियम वेगवेगळे आहेत. (सहारा वाळवंटातील वाळूच्या कणांची एकूण संख्या 1025 आहे. यावरून 10500 या संख्येचा अंदाज करता येईल.)
अजून एक शक्यता अशी आहे की यासाठी कुठल्याही स्पष्टीकरणाची गरज नाही. अशा प्रकारची निर्दिष्टता, फाइन-ट्युनिंग ह्या मुळातच चुकीच्या कल्पना आहेत. एका तज्ज्ञाच्या मते हायड्रोजन, हीलियम व लिथीयम या वायूंव्यतिरिक्त, विश्वात इतर कुठल्याही गोष्टींचे अस्तित्व नाही. आपल्या शरीरात आढळणारी कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन व लोह यांसारखी मूलद्रव्ये दूरदूरच्या ताऱ्यांमधून पृथ्वीवर आदळली आहेत. फ्रेड हॉयल या खगोलशास्त्रज्ञाच्या मते काही वैश्विक योगायोगामुळे अशाप्रकारची मूलद्रव्ये अस्तित्वात येऊ शकली. तीन हीलियम अणूंच्या संयोगातून 12 केंद्रक असलेले कार्बन मूलद्रव्य तयार झाले असावे. एखाद्या तारेतील उष्णता तीन हीलियम कणांना जोडण्याइतकी असल्यास कार्बन रेणू तयार होण्यास विलंब लागणार नाही.
फाइन-ट्युनिंगच्या बाबतीत इतरही काही आक्षेप आहेत. फाइन-ट्युनिंगचा विचार करताना सामान्यपणे फक्त एकाच पॅरामीटरचा विचार केला जातो. निसर्गातील एखादे बल वा परमाणूच्या गर्भातील आण्विक शक्ती अशा एखाद्याच पॅरामीटरचे विश्लेषण केले जाते. त्यामुळे बाकीच्या इतर गोष्टी स्थिर आहेत असे समजून पॅरामीटरच्या स्थितीत कमी जास्त बदल करत निष्कर्ष काढले जातात. मुळात हे गृहीत असंभवनीय व चुकीचे वाटते.
सर्वसमावेशक सिद्धान्तात (Theory of everything) – अजूनही पूर्णपणे सिद्ध करता आले नसले तरी – भौतिकी पॅरामीटर्स सुटेसुटे नसून त्या एकमेकाच्या संपर्कात असतात व त्यातील एखाद्यातील बदल इतरांवर कशा प्रकारे परिणाम करू शकतात, याचे स्पष्टीकरण देता येते. मुळात भौतिकीतील वेगवेगळे नियम एखादी सर्वस्वी वेगळ्या प्रकारची जीवोत्पत्ती करूच शकणार नाही असे ठाम विधान आपण कसे काय करू शकतो?
एक मात्र खरे की फाइन-ट्यूनिंगची कल्पना आपण इतक्या सहजासहजी धुडकावूनही लावू शकत नाही. उदाहरणार्थ, कृष्ण ऊर्जेमुळे (dark energy) विश्वाचे प्रसरण होत आहे, हे आपण नाकारू शकत नाही. क्वांटम सिद्धान्तानुसार ही विस्मयकारक ऊर्जा आपण गृहीत धरत होतो त्यापेक्षा 10120 पट जास्त आहे. जर कृष्ण ऊर्जा खरोखरच इतकी नसती तर अवकाशातील दीर्घिकांची निर्मिती झाली नसती. व आपणही अस्तित्वात आलो नसतो. त्यामुळे कृष्ण ऊर्जा योग्य प्रमाणात असल्यामुळेच आपले अस्तित्व आहे हे मान्य करायला हवे.
परंतु हीच कृष्ण ऊर्जा बहुविश्वाच्या संकल्पनेला पुष्टी देत आहे, हे विसरता येत नाही. त्यामुळे इतर वैश्विक स्थिरांकाचे फाइन-ट्युनिंग झाले असावे याला मात्र काही पुरावा नाही.
8, लिली अपार्टमेंटस्, वरदायिनी सहकारी गृहसंस्था,
पाषाण सूस रोड, पाषाण, पुणे 411 021

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.