पत्रसंवाद

गंगाधर रघुनाथ जोशी, 7, सहजीवन हौसिंग सोसायटी, ‘ज्ञानराज’ सिव्हिल लाईन्स्, दर्यापूर, जिल्हा अमरावती -444803.
आजचा सुधारक चा जून-जुलै 12 चा मेंदू विज्ञानावरचा जोडअंक वैचारिक मेजवानीच ठरावा. सर्व लेख वाचून झाल्यावर अतृप्तीच शिल्लक राहाते; व त्या अतृप्तीचेही समाधान वाटावे अशी त्या अंकाची मांडणी दिसते. अनेक शास्त्रज्ञांचे संदर्भ त्यात आहेत. पण ठोस निर्णयापर्यंत कोणीही येऊ शकले नाही..
प्रास्ताविकात म्हटल्याप्रमाणे मातीचे मडके तयार होते. त्या मडक्यात पोकळी असते. म्हणजे काहीच नसते. काहीच नसण्याचा अस्तित्वाचा घटक त्या मडक्याच्या उपयोगितेला कारण ठरतो!
माणसाच्या कवटीच्या आत मेंदू असतो. आपल्याला कवटीची जाणीव असते पण आतला मेंदू अनाकलनीय असतो. त्याला आकलनक्षेत्रात आणण्याची मेंदूशास्त्रज्ञांची धडपड व प्रयोग खरोखरच अचंबित करणारे आहेत. ‘अणुरेणूहूनि थोकडा, तुका आकाशाएवढा’ ह्या तुकारामांच्या चरणांशी आपला माथा टेकतो.
स्मशानात मृताला अग्नी देतात तेव्हा प्रेतयात्रेत जमलेली मंडळी मृताची कवटी फुटण्याची वाट पहात असतात; व ती फुटल्याचा मोठा आवाज ऐकू आल्यावर घरोघर परततात. याचा अर्थ कवटीच्या आतले आकाश अनंताकाशात विलीन झाले, असा तर नसेल!
असेही वाचनात आल्याचे स्मरते की सिगमंड फ्राइडच्या मते आपणआपल्या आई-वडिलांकडून जो DNA (डिओक्झिरिबो न्यूक्लिक ॲसिड)चा वारसा निसर्गतःच आपल्या पदरी पडलेला असतो. त्याचाच प्रामुख्याने आपल्या विचारप्रक्रियेवर प्रभाव असतो. आपण आपल्या आयुयात जे आपले म्हणून निर्णय घेतलेले असतात. त्यांपैकी दोन तृतीयांश निर्णय आपले नसतातच. ते DNA ने घेतलेले असतात. आपले निर्णयस्वातंत्र्य कितीतरी मर्यादित असते!
‘पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा!’ असे म्हणण्याखेरीज आपण तरी काय करणार!

डॉ.सुभाष आठले, स्वानंद कुंज, गंगावेश, कोल्हापूर-416003 भ्र.ध्व. 9420776247, E-mail : subhashathale@gmail.com .
आजचा सुधारक, मे 2012 हा अंक खरोखरच विचार करायला लावणारा आहे.
मुखपृष्ठ 1) मध्यमवर्ग : स्वप्न आणि काळजी: टिकेकर म्हणतात तो मध्यमवर्ग फक्त स्वातंत्र्यापूर्वीच्या 70-80 वर्षांत प्रभावी होता. त्यापूर्वी तो कधीही प्रभावी नव्हता किंवा अस्तित्वात नव्हता. ब्रिटिश राजवटीचा, कायद्याच्या राज्याचा, आणि नीतिमूल्ये, मानवी मूल्ये शिकवणाऱ्या ब्रिटिश शिक्षणपद्धतीचा परिणाम म्हणून मध्यमवर्ग अस्तित्वात आला. त्या मध्यमवर्गाला पारतंत्र्याचा आणि आपल्या समाजाच्या दुरवस्थेचा खेद वाटू लागला, म्हणून तो वर्ग सर्व समाजाची जबाबदारी आपल्याच खांद्यांवर या भावनेने कार्यप्रवण झाला.
स्वातंत्र्य मिळण्याच्या दोन दशके आधीपासूनच शिक्षणाची धोरणे ठरवणे राजकीय नेत्यांच्या हातांत गेले; आणि शिक्षणाचा हास सुरू झाला. स्वातंत्र्यानंतर पोलिसखातेदेखील निवडून आलेल्या नेत्यांचे आणि प्रतिनिधींचे गुलाम झाले. त्यामुळे कायद्याचे राज्यही नष्ट झाले. शिक्षण आणि कायद्याचे राज्य हे दोन मूलाधार गेल्यावर मध्यमवर्गाचा प्रभाव नष्ट झाला. व्यंग्यचित्र प्रकरणानंतर श्री पळशीकर यांच्या कार्यालयाची नासधूस केली जाते, व पळशीकरांनी राजीनामा दिल्यावर तो परत घ्या असे कोणीही राजकारणी म्हणत नाही! यापासून आजी व भावी पळशीकर काय धडा घेतील! मध्यमवर्गाला राज्यकर्तेही विचारेनात, आणि जनताही विचारेना. स्वतः राजकारणात भाग घ्यावयाचा तर जातीवर, भेदाभेदावर आधारित मूल्यहीन, भ्रष्ट राजकारण करण्याची तयारी हवी.
घराणेशाहीला सलाम करण्याची तयारी हवी. अशा तडजोडी करणारे काही थोडे मध्यमवर्गीय राजकारणात टिकले. स्वातंत्र्यापूर्वीचा मध्यमवर्ग मोठ्या प्रमाणात ब्राह्मण होता. गांधीहत्येनंतरच्या जाळपोळीमुळे त्याने हाय खाल्ली. (निदान महाराष्ट्रात). त्याने समाजकारण करण्याची, लष्करच्या भाकरी भाजण्याचे, बंद केले. तो स्वतःपुरते पाहू लागला, अमेरिकेला जाण्याची स्वप्ने पाहू लागला. आता अमेरिकेतील राजकारणातदेखील तो सक्रिय होत आहे; पण भारतात ते शक्य दिसत नाही. तरीदेखील राजकारण वगळता अन्य क्षेत्रांत मध्यमवर्गीयांनी आपला हिस्सा नक्कीच उचलला आहे. एस.एम.जोशी, ना.ग.गोरे, प्रधान वगैरेंनी राजकारणाला चांगले वळण लावण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, पण सत्तेअभावी तो अयशस्वी झाला. श्री. आरोळे, आमटे, बंग, मेधा पाटकर, पटवर्धन, अण्णा हजारे, यांनी खूप काम उभे केले. ज्यांची नावे लोकांना माहीत नाहीत अशी अनेक माणसे विविध क्षेत्रांत काम करत आहेत. अर्थात् मध्यमवर्गाच्या एकूण लोकसंख्येच्या मानाने अशी कार्यप्रवण माणसे पूर्वीही कमी होती, व आजही कमी आहेत. असेच असणार. अख्खा मध्यमवर्ग समाजाचे वैचारिक आणि नैतिक नेतृत्व करेल ही श्री टिकेकरांची अपेक्षा चुकीची आहे. ब्रिटिशांविरुद्ध लढणे ही तुलनेने सोपी गोष्ट होती. स्वदेशी भ्रष्ट सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध लढणे ही फार अवघड गोष्ट आहे. पण तसा केविलवाणा प्रयत्न श्री अण्णा हजारे, त्यांचे सहकारी, तसेच अनेक व्हिसल ब्लोअर्स आणि माहितीच्या अधिकाराचा सक्रिय वापर करणारे लोक स्वतःच्या प्राणांची बाजी लावून करत आहेत. राजकीय सत्तेच्या अभावी हे प्रयत्न केविलवाणेच राहणार!
2) पैशाचे वास्तव स्वरूप :
श्री. दिवाकर मोहनी यांनी आपले एकदम स्वतंत्र आणि मूलभूत विचार मांडले आहेत. पैसा निर्माण होण्यापूर्वी श्रममूल्य संचित करण्याचे सर्व प्रकार काळाबरोबर नाश पावणारे होते. पण प्रथम सोने, नंतर सुवर्णनाणी, त्याहीनंतर कागदी नोटा, आणि आता लिखित किंवा संगणकीय नोंदी या स्वरूपात संचित श्रममूल्य जवळपास अविनाशी झाले, आणि त्याचे वारसाहक्कामुळे संक्रमण झाल्याने, आणि व्याज, डिव्हिडंड, आणि मूल्यवृद्धी (कॅपिटल गेन) यांच्या द्वारे श्रमाविना संपत्ती वाढत राहिल्याने, संपत्ती आणि श्रम यांचा संबंधच राहिला नाही. पण श्रम आणि सेवा-वस्तू यांच्या विनिमयासाठी, मागणी आणि पुरवठा यांचा मेळ घालण्यासाठी, पैसा हेच साधन दिसते. बलुतेदारीवर दीड-दोनशे लोकांचे खेडे फक्त काम करू शकेल. लाखभर वस्तीची गावे, अब्जावधी वस्तीचे देश, आणि जग, बलुतेदारीवर कसे चालणार? तेव्हा पैसा हे ‘नेसेसरी इव्हील’ आहे, त्याचे दुष्परिणाम कसे कमी करता येतील यावरच विचार केंद्रित करावे. मृत्यु-कर, संपत्ती कर, मिळकतीबरोबर वाढता (प्रोग्रेसिव्ह) कर हे उपाय सध्याच माहीत आहेत. पैशाला पर्याय सापडेपर्यंत श्री. मोहनी यांच्यासारखे स्वप्नरंजनदेखील बद्धीला चालना देणारे आहे. महत्त्वाचे आहे.
3) अमेरिकेची दिवाळखोरी:
श्री. खांदेवाले यांनी सध्याच्या जागतिक अर्थ – राजकीय व्यवस्थेतील दोष दाखवले आहेत. अर्थ – राजकीय व्यवस्थेतील दोष दाखवले आहेत. यावर खांदेवाले कोणताही उपाय सुचवत नाहीत. सामान्य माणसाने संघटित होऊन, पुढाकार घेऊन यावर उत्तरे शोधावी, ही त्यांची अपेक्षा अवास्तव आहे. तसे जगाच्या इतिहासात कधीच घडलेले नाही. उत्तरे शोधण्याची, विचार करण्याची क्षमता असलेल्या व्यक्तींजवळ समाजाला संघटित करण्याची क्षमता नसते. तर समाजाला संघटित करण्याची क्षमता असलेल्या व्यक्तीजवळ विचार करण्याची क्षमता नसते. मार्क्स आणि लेनिन मिळून एक व्यक्ती सहसा असत नाही. म्हणून अशी समाज-निर्मिती आवश्यक आहे की ज्यामध्ये सर्वसाधारण मतदार नवीन विचार, धोरण, समजून घेऊन, आपल्या पसंतीचे विचार, धोरण स्वीकारणाऱ्या राजकीय पक्षाला मतदान करेल आणि व्यक्ति-वैशिष्ट्यांपेक्षा पक्षाच्या विचारसरणीला जास्त महत्त्व देईल.
या लेखाअखेरची संपादकीय टीपदेखील वादास्पद आहे. गेल्या 100 वर्षांचा इतिहास पाहिला तर खुली बाजारपेठ स्वीकारणारे देश रशियासारख्या समाजवादी देशांपेक्षा खूपच चांगल्या अवस्थेत आहेत. समाजवादी चीनने बऱ्याच प्रमाणावर खुली बाजारपेठ स्वीकारल्याने त्याने चांगली प्रगती केली. पण खुली याचा अर्थ अनियंत्रित नाही. बैलगाडीचे अपघात मोटरगाडीच्या अपघातापेक्षा कमी गंभीर असतात, तसे भारताचे झाले आहे. पण मोटारीच्या नियंत्रणात सुधारणा होत आहे. प्रत्येक अपघातानंतर माणूस नवीन काही शिकत असतो. तेव्हा धीर धरा.
4) ‘सिंगापूर आणि टी-टेंटी वृत्ती’ मध्ये शेखर गुप्ता संकल्पनांचा गोंधळ घालत आहेत. ब्राह्मण आणि ब्राह्मण यांमध्ये घोळ घातल्याप्रमाणे हे आहे. मुळात प्रश्न अभिजन आणि दलित हा नसून भ्रष्टाचार आणि नैतिकता यांमधील आहे. प्रश्न निर्माण झाला कारण आपण लोकसभेला म्हणजेच खासदारांना नको इतके प्रचंड आणि सर्वगामी अधिकार देऊन बसलो आहोत. अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, संमति-वय, व्यंग्यचित्रांची योग्यता, पुस्तके
चित्रे-नाटके, सिनेमा यांच्यावर सेन्सार करण्याचा हक्क, कायदे करणे लोकसभेचा अनादर करणाऱ्यांना शिक्षा करणे, शिक्षणाचे धोरण ठरवणे, अशी अनेक क्षेत्रे यात अंतर्भूत आहेत. पण खासदार म्हणून निवडून येणाऱ्या व्यक्ती संपन्न व्यक्तिमत्त्वाच्या, सारासार विचार करणाऱ्या व नीतिमान असतील अशी काहीतरी व्यवस्था करायला आपली घटना विसरली. (बाबासाहेब आंबेडकरांची क्षमा मागून हे विधान करत आहे). उलट आपली घटनामान्य निवडणूकपद्धत भ्रष्टाचारी, गुन्हेगारी आणि भ्रष्ट-संपत्तीने बरबटलेल्या (फिल्थी रिच) व्यक्तींनाच झुकते माप देत आहे. त्यामुळे लोकपालासारखी यंत्रणा राजकारणाचे शुद्धीकरण करू शकणार नाही हे जितके खरे, तितकेच मतदारांना शहाणे करणे हादेखील उपाय शक्य कोटीतील नाही. नीतिमान व्यक्ती खासदार म्हणून निवडून येऊ शकतील अशी निवडणूक पद्धती स्वीकारणे हाच योग्य मार्ग आहे. भारताची दुरवस्था अनीतिमान राज्यकर्त्यांमुळे आहे, नीतिमान राज्यकर्ते जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत तरी मुक्त बाजारपेठ जास्त श्रेयस्कर, कारण मग तेवढा एक तरी भाग भ्रष्ट राज्यकर्त्यांच्या नियंत्रणाबाहेर राहतो. त्यात प्रगती होते, निदान गरिबी तरी कमी होते. विषमता वाढल्याने गरिबी कमी होण्याचे मूल्य कमी होत नाही. येथे देखील संपादकीय टिपण मान्य होण्यासारखे नाही. दूरदर्शन, सह्याद्रीवर संयत बातम्या मिळाल्या तरी त्या वाहिन्या ‘जागल्या’चे काम करू शकत नाहीत. तहेलका’ सारखी स्टिंग आपरेशनस सरकारी वाहिन्यांवर प्रसृत होऊ शकत नाहीत.

वसंत केळकर, पी 3, ब्लॉक 25, केन्द्रीय विहार, सेक्टर 38, नेरूळ, नवी मुंबई, 400706.
पैशाचे मला दिसणारे स्वरूप
(1) कोणत्याही वस्तूला किंवा सेवेला मूल्य येते, ते तिला असलेल्या मागणीमुळे. सोन्याला व रत्नांना जी किंमत असते ती त्या वस्तू मुबलक नसल्यामुळे. रत्नपारखी हावेमुळे जन्म घेत नाहीत. सुसंस्कृत व्यक्ती सोने व रत्ने जवळ नसल्यास शोक करीत नाहीत.
आरोप केल्याशिवाय कोणत्याही वस्तूला मूल्य नसते. कागदी नोटेला सगळेच मानतात. म्हणून त्या नोटेचे मूल्य. सोन्याचा तुकडाच मला हवा असेल तर त्या तुकड्याला माझ्या लेखी मूल्य आहे. मला तो तुकडा उच्च शिक्षणासाठी वापरायचा असेल तर उच्च शिक्षणाला माझ्या लेखी मूल्य आहे व त्या तुकड्याला केवळ उपयोगिता आहे असे म्हणता येईल. पण पुढे त्या उच्च शिक्षणाच्या आधारावर मला चांगला रोजगार मिळाला तर उच्च शिक्षणाला उपयोगिता प्राप्त होते. या
अमेरिकेत जाऊन तेथल्या पहिल्या दर्जाच्या विद्यापीठात शिक्षण घेणे, उत्तम चित्रकलाप्रदर्शन घडवणे, सुंदर अलंकार बनवणे, कलात्मक चित्रपट बनवणे, आय.ए.एस.मध्ये उत्तीर्ण होणे, उद्योगसमूहांचे कर्णधार बनणे, तंत्रज्ञ बनणे, शल्यचिकित्सक बनणे याही गरजाच आहेत. यांना हाव म्हणता येणार नाही.
विवेकवादी चिंतनाचा त्याग करून स्वतःचे कल्याण, समाधान, न्याय लक्षात न घेता नी आवड अयोग्य पद्धतीने तृप्त करण्याचा मी अट्टाहास केला तरच त्या आवडीचे रूपांतर ‘हाव’ या मला न आवडणाऱ्या भावनेत होईल.
पैशाचा वापर बंद झाल्यास व्यवहार फार कठीण होतील हे तर आलेच पण उपभोग प्राप्त करण्याची आवड कमी होईल असेही नाही. आधी, पैशाचा उपयोग केवळ हावेपोटी आणि उपभोगाच्या लालसेपोटी होतो हेच तत्त्व नाकारायला पाहिजे.
उत्पादन केवळ उपभोगासाठीच (म्हणजे ऐषारामासाठी) नाही. उत्पादन केवळ मजुरांच्या श्रमांतून उत्पन्न होत नाही. उत्पादनासाठी गरज (हाव?) सर्वांना सारखी नाही. रतन टाटा, लक्ष्मी मित्तल, प्रेमजी, नारायण मूर्ति, त्यांचे तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, हिशेबनीस, कामगार, हमाल हे सर्व उत्पादन करण्यात भाग घेत आहेत. हे पूर्ण उत्पादन सरकारजमा करून, सर्वांना दोन किलो तांदूळ, एक किलो भाजी, substandard माळ्यावर गाळा, दोन तास पाण्याचा नळ (‘वर’ ओळख असेल तर एक तास आणखी) मिळण्याची व्यवस्था झाली व टाटा, बिर्ला काय, त्यांचे इंजीनिअर्स काय, शास्त्रज्ञ काय, सर्वांनी लाईनमध्ये राहून आपले वाटप घ्यावे अशी ‘सरकारी’ व्यवस्था झाली तर दुःखद अनुभव कमी होतील हा केवळ भ्रम आहे.
पैसा सगळ्यांजवळ सारखाच आहे असे झाले तर उत्पादक नष्ट होतील, उत्पादन नष्ट होईल. शासन अधिकच उन्मत्त व भ्रष्टाचारी बनेल आणि लोकशाही औषधालाही उरणार नाही.
(2)
अठराव्या शतकात इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रान्ती झाली. त्याचे मूळ व्यापार, पैसा, हाव हे नसून ज्ञानसाधना हे आहे. उष्णता ही एक ऊर्जा आहे. वीज ही एक ऊर्जा आहे. हे समजण्यासाठी त्या अगोदरच्या विज्ञाननिष्ठ अलौकिक माणसांचे कुतूहल परिश्रम महत्त्वाचे आहेत. गॅलिलिओ दुर्बिणी तयार करत होता व पृथ्वीची आणि इतर ग्रहांची गति निश्चित करत होता. तेव्हा शिवाजी महाराज महाराष्ट्रात स्वराज्याचा श्रीगणेशा करीत होते. न्यूटन गुरुत्वाकर्षण सिद्ध करत होता, गणितज्ज्ञ कॅलकुलसची निर्मिती करत होता तेव्हा औरंगजेब महाराष्ट्रात दख्खनच्या मुसलमान राज्यांशी व मराठ्यांशी संघर्ष करीत होता. डच, पोर्तुगीज व इंग्रज भारतात येऊन दाखल झाले होते. समुद्रप्रवासाशी व भारताबाहेरच्या पाश्चात्त्य जगाशी भारत परिचित नव्हता. त्यानंतरच्या घडामोडींमुळे पौर्वात्य व पाश्चिमात्त्य हे जगाचे दोन भाग कल्पिले जाऊ लागले. भारत ही एक सलग entity आहे ही कल्पना इंग्रजांमुळेच आपल्याकडे आली. दक्षिण भारतातील लोकांना मद्रासी म्हणण्यासारखीच ही कल्पना होती. कारण जम्बुद्वीप, आर्यावर्त, भारतवर्ष या कल्पना जरी अस्तित्वात होत्या तरी Nation ही कल्पना भारतात परकीयच होती.
मॅग्ना कार्टा, पोपचे झुगारलेले वर्चस्व व युरोपमध्ये आधुनिक विज्ञानाचा जन्म या तीन स्वतंत्र घटना आहेत. त्यांपैकी आधुनिक विज्ञानानेच औद्योगिक क्रान्ति, समाजवाद, मार्क्सवाद, इतिहासाचा प्रवाह (irrestible, irreversible dielect process of his tory) इत्यादि कल्पनांना जन्म दिला आहे.
माणसाने आपल्या गरजा स्वतःच भागवाव्या ही गोष्ट आज अशक्य तर आहेच पण व्हावी असे पण वाटत नाही. एक दुसऱ्यांना मदत (एकमेकां साह्य करू, अवघे धरूं सुपंथ) प्राणी अनादि कालापासून करतच आले आहेत. “मी हे काम करतो तू ते काम कर” ही श्रमविभागणी प्राणी करतात. मानवप्राणी पण करत आलेला आहे. त्यातूनच नवरा, बायको, मुले व कुटुंब इथपर्यंत माणूस पोहोचला.
पण मोठ्या प्रमाणावर निर्मिती, त्यासाठी लागणारे ज्ञान, व सामान अनेक श्रमिकांची नियुक्ती, त्यांच्यावर होणारा अन्याय, आर्थिक विषमता इत्यादी प्रश्न मात्र औद्योगिक क्रान्तीमुळे उत्पन्न झाले आहेत. म्हणूनच महात्मा गांधींना ही व्यवस्था नकोशी वाटत होती व या व्यवस्थेतून होणारे फायदे मिळवणे म्हणजे हाव (आजचा शब्द चंगळवाद) असेच ते मानत होते. पण स्वयंपूर्ण गावे प्रस्थापित करणे, शहरीकरण थांबवणे, पर्यावरणाची दखल घेणे हा मार्ग इंग्लंडने व अमेरिकेने तर पत्करला नाहीच पण सोव्हिएट युनियन, चीन व नेहरूंच्या भारतानेही पत्करला नाही. आपल्याला आवडणारा आगगाडीचा प्रवास, टेलिफोनची सुविधा, वैज्ञानिक संशोधन, शल्यचिकित्सा, संगणक, निरनिराळ्या संस्कृतींची व सामानांची ओळख इ. अनेक फायदे बंद झालेले कोणालाच आवडणार नाही. गांधींना पण आवडले नसते. पाठ फिरवून मागे जाणे कधीच शक्य नसते.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.