चिं.मो.पंडित

एंजिनीयरिंग कॉलेजात आम्हाला एक अभ्यासक्रम असायचा तंत्रज्ञानाचा इतिहास’ नावाचा. केमिकल एंजिनीयरिंगच्या क्षेत्रात ऋषितुल्य मानले जाणारे प्रा. एन.आर.कामत आम्हाला 1962-63 साली हा विषय शिकवायचे. एंजिनीयरिंग-तंत्रज्ञान क्षेत्रातल्या पातळ्या पिंजत वेगवेगळ्या पातळ्यांवर अपेक्षित कौशल्ये सांगणे प्रा.कामतांना आवडायचे.
आज पन्नासेक वर्षांनंतर जसा आठवतो तसा कामतसरांचा क्रम नोंदतो —
(1) एखादे काम कसे करायचे ते जाणणारे, ते कारागीर; गवंडी. मशिनिस्ट, सुतार, लोहार, इत्यादी. असे म्हणूया, की आज ज्यांना (ITI) संस्थांमध्ये प्रशिक्षण मिळते, ते लोक म्हणजे कारागीर. (2) एखादी योजना समजणारे, त्या योजनेनुसार घेगवेगळ्या कारागिरांचे एकत्रित काम करवून घेऊ शकणारे, ते तांत्रिक पर्यवेक्षक किंवा फोरमेन. यांचे प्रशिक्षण डिप्लोमा देणाऱ्या पॉलिटेक्निक्समध्ये केले जाते. (3) अशी योजना आखली का जाते? कोणती तरी समाजाची गरज पुरी करण्यासाठी विज्ञानाचा वापर करून योजना आखल्या जातात. अशा उपयोजित विज्ञानातला तज्ज्ञ, योजना आखू शकणारा, तो एंजिनीयर. यांना डिग्री कॉलेजांत शिक्षण दिले जाते. (4) पायाभूत विज्ञान चांगल्या त-हेने जाणणाराच विज्ञानाचे उपयोजन सुधारत नेऊ शकतो. हा झाला टेक्नॉलजिस्ट.
कामत सरांचे विश्लेषण या टप्प्यावर येऊन ठेपायचे. मग ते जराशी दिशा बदलायचे. सांगायचे, की टेक्नॉलजिस्ट सरकारी नोकऱ्यांतही जाऊ शकतो, आणि खाजगी कंपन्यांमध्येही, काळ आठवा; 1962-63; नेहरूंनी तंत्रज्ञान-विज्ञानातून सार्वजनिक न्यास (Public Sector Undertakings) घडवण्याचा काळ. ‘सरकारी कर्मचारी’ ही शिवी न झालेला काळ, ‘नोकरशाही’, babudom’ हे हेटाळणीचे शब्द लोकप्रिय होण्याआधीचा काळ.
मग जरा थांबून कामत सर म्हणायचे, “आणि काही जास्तच हुषार टेक्नॉलजिस्ट इतरांच्या अडचणी सोडवणारे सल्लागार, Consultants होतात.’ एक मंदसे स्मित.
मला भेटलेले पहिले स्थापत्यशास्त्रातले सल्लागार डॉ. चिंतामणी मोरेश्वर पंडित, ऊर्फ चिंमो, सीएम, मणी किंवा (माझ्यासाठी) नुसतेच ‘पंडित’. ते आमच्या कंपनीसाठी, इसरांसाठी पूल, जलसेतू (Aqueducts), कारखाने इत्यादींची संकल्पचित्रे करणारे सल्लागार.
मला मात्र ते एंजिनीयरिंग शिकत असतानाच भेटले. आम्हाला शेवटच्या वर्षी भक तपशीलवार डिझाइन करून परीक्षकांपुढे मांडावे लागे. त्यासाठी माझ्या मार्गदर्शक पोल्या शकुंतला भगत. त्या जर्मनीत शिकून, त्यांचे वडील एस.बी.जोशी यांच्यासोबत कामे करून प्राध्यापक झाल्या होत्या. त्यांचे जर्मनीतले गुरु डॉ. फ्रित्झ लिओन्हार्ट हे पुलबांधणीतले जगद्विख्यात तज्ज्ञ. जर्मन प्रथेप्रमाणे ते स्टुटगार्ट विश्वविद्यालयाच्या प्रचलास्थापत्य विभागाचे मानद विभागप्रमुखही होते. (जर्मन विद्यापीठे प्रत्यक्ष काम वारणाऱ्यांनाच विभागप्रमुख करतात. यामुळे अभ्यासक्रम नेहेमीच अद्ययावत आणि यवहारी राहतात). आणि त्यांचेच आचार्यपदासाठीचे विद्यार्थी होते. चिं.मो. पंडित.
काही कारणाने मला मार्गदर्शन करायला सुरुवात केल्यावर लवकरच भगत मैडम दोनेक महिन्यांच्या वैद्यकीय रजेवर गेल्या. काम सुरू झाले होतेच. रजेवर जाताना त्या म्हणाल्या, “फार अडचण आली तर पंडितांना विचार.’ पंडितांचा सल्लागारीतला भागीदार माझा आतेभाऊ शरद मोटे मध्येच भारत सोडून परदेशवासी झाला होता, त्यामुळे पंडित माझ्या ओळखीचे होते. तर असे पंडित माझे ‘थेट’ गुरू झाले…
ह्या ’66 सालच्या घटनेनंतर आजपर्यंत पंडितांशी बोलून निर्णय घेणे सवयीचे राहिले आहे. आणि हे केवळ पूलबांधणी आणि तत्सम तांत्रिक बाबींपुरतेच नाही.
प्राध्यापक कामतांचे तंत्रज्ञानाच्या पातळ्यांचे विश्लेषण अपुरे होते. मुळात समाजाच्या गारजा कोणी ठरवायच्या? तंत्रज्ञान वापरून योजना किती दूरदृष्टीने आखायच्या? कधी योजनाकाराने “ही गरज नाही, हाव आहे” असे म्हणायचे की नाही? एका समाज घटकाच्या गरजा पुऱ्या करताना इतर समाज-घटकांनी किती मोल मोजणे न्याय्य समजायचे? या आणि असल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा हक्क कोणाचा? आणि जबाबदारी कोणावर? प्रा. कामतांचे विश्लेषण या प्रश्नांना भिडत नव्हते. विद्यार्थिदशेत आम्हाला हे प्रश्न पडले नव्हते. पण कामाला लागल्यावर सर्वच जबाबदार माणसांना हे प्रश्न पडू लागतात.
“प्रश्न सोडवायचा हक्कही माझा, आणि जबाबदारीही माझीच,” असे म्हणणारी जी थोडीशीच माणसे मला भेटली, त्यांत पंडित हे एक महत्त्वाचे नाव.
त्यामुळे पंडित तंत्रज्ञानविषयक सल्लागारीपुरते मर्यादित राहिले नाहीत. त्यांचे काही मित्रांसोबत शेती करण्याचे बदलापूरचे प्रयोगही महत्त्वाचे होते. मराठी विज्ञान परिषदेला ‘निवृत्त प्राध्यापकांचा क्लब’ या वर्णनाबाहेर काढण्याचे पंडित, शरद नाईक आणि अ.पां. देशपांडे या सचिव-त्रयीचे प्रयत्नही महत्त्वाचे होते. काही महिने केवळ कच्ची फळे व भाज्या यांवर जगण्याचे स्वतःवरचे परिणाम तपासणेही महत्त्वाचे होते.
श्रीपाद दाभोलकरांच्या दहा गुंठे प्रयोगाची व्याप्ती आणि सीमा तपासणेही महत्त्वाचे होत. बरे, या ‘बाहेरख्याली’ वृत्तीमुळे मूळ रचनास्थापत्य दुर्लक्षितही झाले नाही.
अनेक अपघातानंतरच्या चौकशी समित्यांवर पंडितांना बोलावले जायचे. तंत्रज्ञानाच्या दृष्टीने बिनचूक, जबाबदारी ठरवण्यात तटस्थ, स्वार्थाच्या आणि प्रसिद्धीच्या हव्यासापासून पूर्णपणे मुक्त, अशी पंडितांची ख्याती होत गेली. यामुळे शत्रूही ‘लाभले’!
पण मित्रपरिवार वाढत गेला. दर्जेदार होत गेला. अनेक ख्यातनाम, मान्यवरांच्या कामांमधल्या काही कळीच्या बाबी पंडितांच्या सूचनांमधून येत. याबाखत श्रेयनिर्देश झाला, न झाला याचे पंडितांना सोयरसुतक नसे.
आजचा सुधारक च्या सुरुवातीपासून पंडित वाचक, लेखक, भागीदार होते. दोन मोठ्या विशेषांकांचे ते अतिथिसंपादक होते; आणि दोन्हींचा संबंध रचनास्थापत्याशी नव्हता.
शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था (मे-जून 2007, अंक 17-2/3) या विशेषांकानंतर अनेक शेतकऱ्यांचे “या अंकाच्या सर्व लेखकांशी आमचा संवाद घडवून आणा.”, असे निरोप आले! आसु चा जीव लहान. आम्ही काही करू शकलो नाही. पण विषयाला अनेक अंगे आहेत, आणि एकेक करून त्यांवर विचार-मंथन व्हायला हवे, याची खात्री पटत गेली.
त्यातून पाणीवापर (आजचा सुधारक जून-जुलै 2011, वर्ष 22, अंक 3-4) विशेषांक घडला. पंडित असमाधानी राहिले. सांगोपांग विचार मांडणार लेखन ‘उभारणे’ जास्तजास्त अवघड होत होते. जागतिकीकरण-खाजगीकरण-उदारीकरण यांच्या रेट्याने सर्वांत हवालदिल झाले, ते भारतीय शेतकरी. त्यांच्या प्रश्नांना आपण नीट भिडू शकत नाही, याने पंडित खंतावत असत. आमच्या “करत राहूया”च्या जपाने ते
आश्वस्त होत नसत. यात वय, एकटेपण यांचाही मोठा भाग होता.
अशातच पंडितांना हृदयविकाराचा झटका आला. उपचार करताना मेंदूशी संलग्न कर्करोगही आढळला. 10 ऑगस्टच्या संध्याकाळी, ऐंशी वर्षे पूर्ण होण्याच्या जरा आधी पंडित गेले.
आजचा सुधारक चा, संपादक-सल्लागार-विश्वस्तांचा, माझा एक मित्र हरपला.
193, शिवाजीनगर, मश्रुवाला मार्ग, नागपूर 440010.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.