हिंदू : भारताचा ऐतिहासिक भौतिकवाद रेखाटणारी कादंबरी

हरितक्रांतीनंतर भांडवलाचा शिरकाव शेतीमध्ये झाला आणि शेती हळूहळू बाजारपेठेशी जोडली गेली. या प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांची मुले शिकायला लागली. ती खेड्यांकडून शहराकडे आली आणि शहरांमध्ये आल्यानंतर शहरात ती ‘अनफिट’ ठरली. ही ‘अनफिट’ ठरलेली सगळी मंडळी नेमाडे यांच्या आधीच्या ‘कोसला’ व ‘चांगदेव चतुष्टय’ कादंबऱ्यांचे नायक आहेत.
ही ‘अनफिट’ मंडळी समाजवाद्यांकडे, कम्युनिस्टांकडे गेली मात्र कुठेही ती फिट झाली नाहीत. मग ती अगतिकपणे (त्यांची इच्छा नसताना) खेड्यांमध्ये परत गेली. पण शेतकरी म्हणून नव्हे तर एक अॅलियन क्लास म्हणून – एक नवीन वर्ग म्हणून.
शरद पवारांपासून सदानंद मोऱ्यांपर्यंत आणि अगदी माझ्यापर्यंत म्हणता येईल. हे सगळे त्या पिढीचे प्रतिनिधी आहेत. हे वास्तव – अतिशय समर्पकपणाने नेमाडे मांडतात. अशाप्रकारचे वास्तव मराठीतला दुसरा कोणताही लेखक मांडत नाही. परंतु या परिस्थितीला नेमाडे त्यांच्या या कादंबऱ्यांतून (‘कोसला’, ‘चांगदेव चतुष्टय’) पर्याय सुचवत नाहीत. पर्याय न सुचवल्यामुळे विजय तेंडुलकरांच्या कादंबऱ्यांमध्ये जसा आक्रोश येतो व जे समाजवास्तव येते आणि शेवटी तेंडुलकरांचे नायक जसे अगतिकपणे त्या वास्तवातच जगायला लागतात, तसेच नेमाड्यांचे नायकसुद्धा ते वास्तव स्वीकारून शेवटी त्यातच जगायला लागतात. तेंडुलकर आणि नेमाड्यांमधील हे साम्य म्हणून सांगता येईल. दुसरे म्हणजे ‘हिंदू’मध्ये त्यांनी महत्त्वाची फारकत घेतली आहे, ती म्हणजे नेमाडे हरितक्रांतीच्या पुढे गेले आहेत.
हरिक्रांतीमध्ये पारंपरिक पीकपद्धती नष्ट होते. आणि त्याची जागा भांडवली पीकपद्धती घेते. ट्रॅक्टर, लोखंडी नांगर, प्लॅस्टिकच्या वस्तू, नवीन बियाणे, कीटकनाशके, रासायनिक खते आदींच्या रूपाने भांडवल शेतीमध्ये जाते. या सगळ्या गोष्टी खेड्यात गेल्यानंतर शेतकऱ्याला पारंपरिक अवजारे पुरवणारा ओबीसी वर्ग व दलितांमधल्या उत्पादक जातीचा वर्ग या शेतकऱ्यांपासून हळूहळू तुटत (alienate) जातात. कारण तो जे जे तयार करतो, ते कारखान्यांतून येत असल्यामुळे त्याची गरज आता संपू लागली आहे. या सगळ्यांचा समाजजीवन म्हणून काय परिणाम होतो? नगदी पिके घेणाऱ्या शेतकरी जाती शिरजोर होतात. सुरुवातीला 1960 आणि 1970 च्या दशकातले सर्व सामाजिक ताणतणाव पाहिल्यास दलितांवर अत्याचार पुन्हा सुरू होत आहेत. मांगांवर अत्याचार होत आहेत. खरे तर त्याआधी सोशल रिफॉर्मच्या अनेक चळवळी झाल्या, पण त्यांत एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार झाले नव्हते, जे 1960-70 च्या दशकात होताना दिसत आहेत. अर्थात हे हरिक्रांतीचे बायप्रॉडक्ट आहे.
‘हिंदू’मधला नायक खानदेशातला आहे. खानदेशात 1864 च्या सुमारासच कापूस खूप मोठ्या प्रमाणात आलेला आहे. तेव्हापासून ते आत्तापर्यंत कापूस हेच तिथले मोठे नगदी पीक राहिले आहे. नेमाडे ज्या भागाचे वर्णन करताहेत, त्याच्यामध्ये केळ्यासारखे नगदी पीक येते. त्याच्याआधी केळी नव्हती. म्हणजे कापसाऐवजी केळी येते. हा सगळा उत्तर खानदेश आहे. जळगावच्या उत्तरेकडचा म्हणजे तापीच्या वरचा भाग. जमीन अत्यंत सुपीक आहे.
या प्रक्रियेत गावातला शेतकरी सधन होताना दिसतो व तो सधन झालेला शेतकरी ज्या काळापर्यंत कलेक्टिव्ह शेतीचा प्रतिनिधी होता, तर तो तसा न राहता शेती नावाच्या व्यक्तिगत मालकीच्या गोष्टीतून मोठा होतो. यांमध्ये गावाचे सामूहिकत्व जे असते, ते तुटते आहे आणि गावातला ओबीसी बाहेर फेकला जातो आहे. हे व्यक्तिगत मालकीने मोठे झालेले शेतकरी आहेत – हा वर्गच पुढच्या काळामध्ये तथाकथित सहकार चळवळीचा प्रमुख सामाजिक आधार होतो. म्हणून तर संपूर्ण सहकार चळवळीमध्ये आपल्याला दिसते की त्यात ओबीसी नाहीत व ते त्यापासून तुटलेले आहेत. येथे ओबीसी म्हणजे प्रत्यक्ष शेती करणाऱ्या जाती असे मी म्हणत नाही, तर शेती करण्यासाठी अवजारे पुरवणाऱ्या, सेवा पुरवणाऱ्या, शेतीमालावर प्रक्रिया करणाऱ्या जातींच्या संदर्भात मी बोलतो आहे. उदा. तेली नष्ट झाले – कारण भांडवलशाहीने तेलांचा व्यापार हस्तगत केला. त्यामुळे सरळसरळ तेलबियांची शेती भांडवली बाजारपेठेशी जोडली गेली. याच्यामध्ये शेतकरी-तेली हे नाते तुटले. कोष्टी जातीचेही असेच झाले. (किर्लोस्करांचा नांगर आला आणि त्यामुळे सुतार आणि लोहार यांचे गावातले महत्त्व संपुष्टात आले. कारण नांगर, बैलगाडी हे सगळे तयार मिळायला लागले. या दुराव्याच्या प्रक्रियेमध्ये शेतकरी वर्ग म्हणून सहकाराचा आधार बनतो.
‘हिंदू’चा नायक खंडेराव हा अशाप्रकारे सधन झालेल्या शेतकऱ्याचा मुलगा आहे. (त्या तुटलेपण आलेल्या गावातला नायक आहे.) तो पौगंडावस्थेमध्ये-किशोरवयात जेव्हा औरंगाबादला शिकायला येतो तेव्हा तो सगळ्या आयडिया विचारप्रवाहांशी लॉजिज्शी, सगळ्या इझम्सशी ‘डील’ करताना दिसतो. तो समाजवाद्यांच्या जवळ जातो, कम्युनिस्टांच्या जवळ जातो, संघाची पण चेष्टा करतो आणि आंबेडकरांना श्रेयही देतो. अशा प्रकारे एका बाजूला तो दलितांवरती टीका करताना दिसतो. दुसरीकडे आंबेडकरांमुळे दलितांमध्ये जो वर्गबदल झाला, त्याचीही सकारात्मक नोंद घेतो. स्वागत करताना दिसतो. म्हणजेच तो कुठलीही एकांगी किंवा फक्त नकारात्मक भूमिका घेत नाही. ‘कोसला’, ‘बिढार’, ‘हूल’, ‘जरीला’, ‘झूल’ या कादंबऱ्यांचे नायक जिथे थांबतात तिथून हा ‘हिंदू’चा नायक-खंडेराव पुढे जाताना दिसतो. कारण काळ पुढे सरकला आहे
ओबीसी शहरात आले. त्यांच्याकडे जे कौशल्य होते ते भांडवलशाहीने ‘अकुशल’ करून टाकले आहे. त्यामुळे भांडवलशाहीच्या दृष्टीने कुचकामी असताना म्हणजेच साठ ते ऐंशीच्या काळातला ग्रामीण भागात होणारा हा जो वर्गबदल आणि त्यानुसार होणारा जाणीवबदल आहे – या वर्गबदलाच्या व जाणीवबदलाच्या सकारात्मक व नकारात्मक नोंदी भालचंद्र नेमाडे ‘हिंदू’मधून घेताना दिसतात. त्या दृष्टीनेसुद्धा ‘हिंदू’ ही खूप वैशिष्ट्यपूर्ण कादंबरी आहे. निर्माण होणाऱ्या परिस्थितीला प्रतिक्रिया देणारे लेखन आपल्याकडे झालेले आहे. अशाप्रकारच्या (सकारात्मक/नकारात्मक) नोंदी नाकारणारे किंवा ग्लोरिफाय करणारे काही तोकडे प्रयत्न झाले असले तरी त्या नोंदीचे समग्र आणि व्यापक आकलन मांडण्याचा प्रयत्न आपल्याकडे भालचंद्र नेमाडे यांच्याशिवाय अन्य कोणी केला नाही, याची नोंद आपण घेतलीच पाहिजे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पुन्हा ‘कोसला’ किंवा त्यानंतरच्या त्यांच्या कादंबऱ्याचे नायक समाजवाद्यांकडे, कम्युनिस्टांकडे जातात आणि निराश होतात. कारण इथल्या ज्या पुरोगामी चळवळी आहेत या शहरी व इंग्रजी शिकलेल्या मध्यमवर्गाच्या ताब्यात आहेत. त्यांच्या समाजविकासाच्या आणि बदलाच्या संकल्पना योग्य नाहीत. त्यांना महाराष्ट्राच्या खेड्यांमध्ये काय घडते आहे. याचा थांगपत्ताही नाही. शिवाय त्यांच्या समतेच्या चर्चा ह्या आदर्शवादी होऊन बसतात. त्यामुळे हे जे काही बोलतात ते या खेड्यांतून आलेल्या नायकांचे वास्तवच नाही. म्हणजेच नायकाच्या वास्तवाचे ह्यांना भान नाही. त्यामुळे त्यांच्याकडे ठोस असा कार्यक्रमही नाही. म्हणून नेमाड्यांच्या कादंबऱ्यांचे नायक हे ‘अॅलिनेटेड हिरो’ ठरतात. ‘कसेल त्याला जमीन’ ही समाजवाद्यांची आणि कम्युनिस्टांची घोषणा होती. पण भूमि-सुधारणानंतर त्यांच्याकडचा बेस संपला. ग्रामीण भागात जाऊन काही करावे किंवा सामाजिक, सांस्कृतिक असा कार्यक्रमही त्यांच्याकडे नव्हता. महागाई हा काही सामाजिक परिवर्तन करणाऱ्यांचा कार्यक्रम नाही. तो भांडवलशाहीने दिलेला आहे. तो प्रतिक्रियात्मक असल्यामुळे कुठल्याही पार्लमेंटरी पार्टीचा असू शकतो. त्यासाठी कम्युनिस्ट किंवा समाजवादी असण्याची गरज नाही. नंतर त्यांच्याकडे भाषावार प्रांतरचनेचा कार्यक्रम होता आणि तोही 1960 च्या आसपास काही ठिकाणी भाषावार प्रांतरचना झाली म्हणून संपला. 1960 नंतर जगामध्ये जे एक आंतरराष्ट्रीय राजकारण आकाराला येत होते, त्यामध्ये भारताच्या बाल्कनायजेशनचा कार्यक्रम सीआयएचा आहे, अशी हाकाटी सोविएत युनियनने पिटायला सुरुवात केली. कम्युनिस्टांच्या दृष्टीने भाषावार प्रांतरचनेचा कार्यक्रम हा सीआयएचा झाला आणि त्यांनी तो सोडून दिला. त्यामुळे ग्रामीण भागाला, ग्रामीण माणसाला आकर्षित करेल असा काही ठोस कार्यक्रम त्यांच्याकडे नव्हता. मग नेमाड्यांच्या आधीच्या नायकांना, समाजवादी व कम्युनिस्ट हे पर्याय म्हणून भावत नाहीत हे स्वाभाविकच नव्हे काय?
परिणामी तिथे निर्माण होऊ पाहणाऱ्या नव्या वर्गाचे त्यांचे नायक अगतिक होऊन ग्रामीण भागाकडे परतून तिथे निर्माण होऊ पाहणाऱ्या नव्यावर्गाचे प्रतिनिधी बनताना दिसतात. हे नवे वर्ग इथल्या प्रस्थापितांना जास्त पूरक आहेत. (या नव्या वर्गाकडे त्यांचा म्हणून काही सांस्कृतिक वा आयडियालॉजिकल पर्यायही नाही) म्हणूनच नंतरच्या काळात, ह्या नवीन वर्गाने मोठ्या प्रमाणात देवळाच्या जीर्णोद्धाराचे कार्यक्रम केलेले दिसतात. सत्यनारायणाच्या पूजा – ज्या आधी फारश्या होत नव्हत्या – त्यांचेही प्रमाण वाढलेले दिसते. खरे तर 1948 ला गांधींच्याहत्येनंतर ब्राह्मण एका बाजूला हद्दपार झाले होते, परंतु 1960 नंतरचा हा वर्ग परत ब्राह्मणांना प्रतिष्ठित करू बघतोय. म्हणजेच या नव्या वर्गाचे ब्राह्मणीकरण होताना दिसते. याचे कारण या नवीन वर्गाकडे कुठलाही सांस्कृतिक पर्याय नसणे हे होय. पण ‘हिंदू’चा नायक खंडेराव मात्र अस्वस्थ आहे. ठोस पर्याय शोधायचा प्रयत्न करतो आहे. पर्याय शोधताना आपल्याच इतिहासाचे नव्याने आकलन करून घेतो आहे. म्हणूनच तो वारकऱ्यांना, महानुभावांना आणि सूफींना टाळकुंटे ठरवत नाही, तर त्या त्या काळातल्या समाजाची बंडखोर अभिव्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहतो.
तीस वर्षांनंतर ‘हिंदू’ आली. या तीस वर्षांत काय झाले? तर हरितक्रांतीमुळे भ्रमनिरास झाला. ओबीसी तर बाहेर पडलाच. म्हणजेच उत्पादक जातींशी असलेली नाळ तुटली आणि जे काही नवीन नाते निर्माण झालेले आहे ते ‘कमर्शियल’ आहे. ते वस्तुविनिमयाच्या, देवाणघेवाणीच्या मूल्यावर नाही. ‘मी एवढे देतो, तू किती देतोस ते सांग’ – म्हणजेच भांडवली बाजारभाव आला. त्यामुळे दिसायला जरी गाव असले तरी ते खऱ्या अर्थाने गाव राहिलेले नाही. गावाची मूल्यव्यवस्था ही बाजारू – भांडवली झाली. त्यामुळे नातीसुद्धा भांडवली झाली. हळूहळू शेती तोट्यात जाऊ लागली. सुरुवातीच्या काळात नगदी पिकांमुळे ज्या शेतकऱ्यांनी मुजोरी दाखवली, त्यांची पुढची पिढी – म्हणजे आताचा हा नायक – खंडेराव आहे. आता ह्या पिढीसमोर वास्तव आहे ते म्हणजे शेतीमध्ये साठलेपण आलेले आहे. 1980 नंतरच्या शेतकरी चळवळीने आणलेल्या अर्थव्यवस्थेमुळे शेती ही आतबट्ट्याची झाली आहे. त्यामुळे आधीची मुजोरी संपून आता नवी कोंडी निर्माण झाली आहे. या कोंडीनेच खंडेराव आता अस्वस्थ आहे. त्याला खेड्यात पर्याय दिसत नाही आणि बाहेर तर कोंडी आहे. मात्र खंडेराव आधीच्या नायकांप्रमाणे अगतिकपणे, हताशपणे परत जायला तयार नाही.
‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’च्या या भागामध्ये ही अस्वस्थता चित्रित होताना दिसते. या सगळ्यांची सूक्ष्म नोंद नेमाडे यांनी घेतलेली आहे. तूर्त नेमाडे यांच्यामध्ये झालेला हा बदल खूप महत्त्वाचा, सकारात्मक आणि स्वागतार्ह आहे, हे नक्कीच.
दुष्काळ पडलेला आहे, तेव्हा अशा स्थितीत गावचा पाटील आपल्या घरातील धान्याची कणगी उघडू देणारच. अण्णाभाऊ साठे हा एकमेव असा लेखक की ज्याने जातिनिहाय विचार न करता लेखन केले. ‘फकिरा’ कादंबरी हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. ‘फकिरा’मधील जो पाटील आपल्या घरातले धान्याचे कोठार उघडतो, तोच आपल्याला पुन्हा ‘हिंदू’मध्ये दिसतो. आधुनिक निकष लावायचे झाले तर खंडेरावचा बाप एक फिलॉसॉफिस्ट आहे. ‘बाबरनाम्या’मध्ये बाबर हुमायूनला सांगतो, ‘याद रख, तू मुसलमान है। लेकिन तू हिंदूओंका राजा है।’ म्हणजे राज्य कोणासाठी केले पाहिजे – तर हिंदूंसाठीच. तसेच ‘हुमायूननाम्या’मध्ये एक भन्नाट प्रकरण आहे. हुमायून आणि त्याचा भाऊ फिरायला निघालेले आहेत. एका कबरस्तानच्या जवळ ते दोघे येतात. एक कुत्रा तिथल्या एका कबरीवर मुतत असतो. हुमायूनचा भाऊ नमाजी आहे. तो हुमायूनला म्हणतो, ‘ये कुत्ता जरूर काफीर होगा।’ त्याच्यावर हुमायूनचे उत्तर फार महत्त्वाचे आहे. हुमायून म्हणतो, ‘वो कबर जो है ना जरूर तेरे जैसे नमाजीकी होगी।’ आणखी एक उदाहरण घेऊ. जहाँगिर सलीमने राणी दर्गावतीला तिचे राज्य ताब्यात घेण्यासाठी एक लाख फौजेनिशी घेरलेले होते. राणी दुर्गावती सलीमला राखी पाठवून देते आणि जहाँगिर सलीम सर्व फौज घेऊन परत जातो. ह्याचे उत्तर आपण कसे देणार.
कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये दुष्काळाच्या काळात राजाने काय केले पाहिजे याची कर्तव्ये दिली आहेत. त्यात पहिले कर्तव्य असे की धान्याची कोठारे उघडून धान्य वाटले पाहिजे. मग तो राजा एका गावचा का असेना! जगामध्ये कुठेही तुम्हाला हे सापडणार नाही. इथेसुद्धा खंडेरावचा बाप दुष्काळामध्ये हेच करताना दिसतो. त्याची नोंद जशी ‘फकिरा’मध्ये अण्णाभाऊंनी घेतली होती, तशीच नेमाडे ‘हिंदू’मध्ये घेताहेत. अण्णाभाऊ साठे काय मराठ्यांची बाजू घेणारे आहेत? की मांग म्हणून मराठा पाटलांचे उपकार घेताहेत? इथे पाटील हा युरोपमधल्यासारखा सामंतशहा नाही, तर तो एक जबाबदार अधिकारी आहे.
‘हिंदू’मधले सिंधू संस्कृतीपासूनचे एकेका टप्प्याचे वर्णन पाहिले तर ही कादंबरी आपल्याला इतहिासाचे दोन भाग सांगते. एक- शेतीकेंद्रित उत्पादनव्यवस्थेचा इतिहास, शेतीमध्ये युरोपियन भांडवलदारांचा होणारा शिरकाव आणि ज्यामध्ये शेती पहिल्यांदा बाजारपूरक व्हायला लागते तो वसाहतवादाचा इतिहास. दोन – इंग्रज गेल्यानंतरची शेती. एका बाजूला गुलामगिरी, फ्युडोलिझम, सरंजामशाही, प्रिमिटिव्ह कम्युनिझम, या तिन्ही टप्प्यांमध्ये समाजात होणारे बदल व या समाजरचनेमध्ये बदलत जाणाऱ्या भूमिका म्हणजेच वाताहत, रि-कन्स्ट्रक्शन आणि कन्स्ट्रक्शन. रि-कन्स्ट्रक्सशनमुळे निर्माण झालेला समूह आणि त्यांच्या भूमिका हे सगळे आयाम ही कादंबरी उभे करते. त्या दृष्टिकोणातून पाहिले तर नेमाडे भारताचा ऐतिहासिक भौतिकवाद कादंबरीच्या रूपाने आपल्यासमोर उभा करत आहेत. कृषिकेंद्रित समाजव्यवस्था, कृषिपूरक समाजव्यवस्था आणि भांडवलशाहीमध्ये जेथे कृषी दुय्यम होते ती समाजव्यवस्था असे, तीन महत्त्वपूर्ण आयाम ‘हिंदू’ उभे करताना दिसतात. आत्तापर्यंत ज्या जातींच्या समाजपरिवर्तनामधील भूमिकांची मराठी साहित्यामध्ये (अण्णाभाऊंसारखा एखाददुसरा लेखक सोडला तर) नोंदच घेतली गेलेली नव्हती, ती (सकारात्मक/नकारात्मक) भालचंद्र नेमाडे व्यापक पातळीवर घेताना दिसतात.
कादंबरीच्या माध्यमातून इतिहासाचा वेध घेणारे नेमाडे हेच मराठीतील पहिले लेखक आहेत असे म्हणावे लागेल. नेमाड्यांनी ऐतिहासिक वा कपोलकल्पित कादंबरी लिहिलेली नाही. ‘हिंदू’मध्ये नेमाडे त्यांच्यासमोर असलेला समाज आणि त्या समाजामध्ये गेल्या सहा-सात हजार वर्षांमध्ये होणारे व्यवहार असा एक व्यापक विस्तृत पट घेत आहेत. अशाच प्रकारचा परंतु संकुचित पट घेतलेल्या अनेक कादंबऱ्या आहेत. उदा. लॅटिन अमेरिकन, स्पॅनिश साहित्यात अॅलेक्स हॅलीची ‘रूट्स’ ही कादंबरी – गोरे आफ्रिकेमध्ये कसे जातात, काळ्यांना गुलाम म्हणून कसे पकडून नेतात, गुलाम केल्यानंतर त्यांचे पुढे काय होते, असा चार-पाचशे वर्षांचा इतिहास ही कादंबरी मांडते. ही कादंबरी इतिहास म्हणून जितकी भावते तितकी काळ्यांचा इतिहास म्हणून भावत नाही. ‘ए इजिक्वलटू बी’ असे सांगत नाही. ती गोष्टीच सांगतो. कादंबरी हा एक फॉर्म आहे. त्या फॉर्ममध्ये असलेल्या आशयाचे तुमचे नेमके आकलन काय आहे. प्रतिसाद देता त्यानुसार तुम्ही रिअॅक्ट होता. आपल्याकडील वेगवेगळ्या प्रवाहातले लोक नेमाडे व ‘हिंदू’संबंधी ज्या पद्धतीने प्रतिसाद दिसतात, ते पाहता मला असे वाटते की मी व कॉ. शरद पाटील यांचा अपवाद वगळता ‘हिंदू’बद्दल फारसे सकारात्मक कोणी बोललेले नाही. कॉ.शरद पाटील यांनी तर ‘परिवर्तनाचा वाटसरू’मध्ये अत्यंत निःसंदिग्धपणे लिहिले आहे की “या शतकातली ‘हिंदू’ ही सर्वांत महत्तम कादंबरी आहे.”
‘हिंदू’बद्दल शहरांमध्ये वाढलेलेच जास्तकरून रिअॅक्ट झाले. त्यांना ‘हिंदू’ म्हणजे ‘फाफटपसारा’ वाटतो. काहींना ती ‘चन्हाट’ वाटते. पण चव्हाट काय आहे? तर विहिरीतून पाणी काढण्यासाठी जो दोरखंड वापरतात तो पाणी काढताना चर्रऽऽ चर्रऽऽ असा आवाज करतो, त्याला ‘च-हाट’ म्हणतात. ज्यांनी आयुष्यात कधी विहिरीतून पाणी काढले नाही, ज्यांना ‘चन्हाट’ मुळात कुठल्या अवस्थेत आहे तोच माहीत नाही, त्या
कार चव्हाट’ म्हणणार? त्यामुळे ‘हिन्दू’च्या निमित्ताने आतापर्यंत जे जे एकांगीपणे रिअॅक्ट झाले व होत आहेत – त्यातून त्यांचे अज्ञान दिसते आहे. ह्या सगळ्यांतून एवढेच कळले, मराठीमध्ये आपण आतापर्यंत ज्यांना विद्वान-ज्ञानी वगैरे समजत होतो. ज्यांना विहीर समजत होतो ते तर डबके पण नाही.
‘हिंदू’वर परंपरा किंवा विशिष्ट जातीच्या गौरवीकरणाचा एक आरोप होताना दिसतो. या देशामध्ये जातिव्यवस्था नावाची एक उत्पादनव्यवस्था होती, आहे. ती शेतीकेंद्रित अर्थव्यवस्थेचा एक अविभाज्य घटक होती. त्या उत्पादन-व्यवस्थेचे सामाजिक व सांस्कृतिक अंग फारसे कौतुकास्पद नव्हते व नाही. पण त्याच्यामध्ये जे सकारात्मक होते ते सांगायचे की नाही? हा खरा प्रश्न आहे. नाही तर मग ‘फकिरा’सुद्धा जातिव्यवस्थेचे उदात्तीकरण करते असे म्हणायचे का? कारण फकिरा इंग्रजांच्या आणि सावकारशाहीच्या विरोधात लढतो आहे. या लढाईत पाटलांपासून ते मांगापर्यंत ज्या ज्या जाती सावकारशाहीच्या पिळवणुकीच्या बळी ठरल्या आहेत, त्या सर्व एकत्र येत आहेत. त्यातला पाटील हा पाटीलच आहे, तो काही मांग होत नाही. मग याला गौरवीकरण म्हणायचे की वास्तववाद? मला असे वाटते की जातीकडे निखळ अस्मितादर्शी दृष्टिकोणातून बधणाऱ्या मंडळींना ते जातिव्यवस्थेचे गौरवीकरण आहे, असे वाटत असावे. मुळात जातिव्यवस्थेचे अस्मितादर्शी आकलन एकांगीच असते. अस्मिता हा जातिव्यवस्थेचा एक दुय्यम भाग आहे. तो जर दुय्यम नसता तर भांडवलशाहीनंतर लोकांनी ती फेकून दिली असती. पण तसे झाले का? महारांचे बौद्ध झाल्यानंतरसुद्धा ‘आमच्याच जातीतील मुलगी/मुलगा पाहिजे’ असा आग्रह धरणे म्हणजे दुसरे नेमके काय आहे? तर हे काही फक्त मराठ्यांमध्ये आहे का? फक्त ब्राह्मणांमध्ये आहे का? ते प्रत्येक जातींमध्ये आहे. खरे म्हणजे उत्पादनव्यवस्थेपासून छाटल्या गेल्यानंतर भांडवली व्यवस्थेत जी चेहराविहीनता त्या चेहराविहीनतेला सामोरे जाताना अस्मितेला पकडून बसण्याची एक अहमहमिका समाजामध्ये आहे. त्याच्यामुळे अस्मिता आता तीव्र डॉमिनेट होताना दिसते. पण म्हणून गेली सहा-सात हजार वर्षे इथे केवळ अस्मिताच होती, असे म्हणणे म्हणजे वेडेपणाच आहे. उत्तर पेशवाईच्या काळात अस्पृश्यांची परिस्थिती अत्यंत वाईट होती. परंतु सर्व महाराष्ट्रात कोतवाल महारच होते. ते केव्हातरी सांगावे लागेल की नाही? आणि गावाची जी सत्ता आहे त्याची वाटणी ही पाटील, कुलकर्णी आणि कोतवालांमध्ये आहे. मग सत्ता कुणाची झाली? पाटलांचा आणि कुलकर्ण्याचा हिंचमेन म्हणून हातात दंडुका घेऊन कोण जातो आहे? कोतवालच ना? तर हे आहे तसे मांडणे म्हणजे गौरवीकरण झाले का? ‘ही फार महान गोष्ट आहे’ असे नेमाडे कुठेच म्हणालेले नाहीत. आंबेडकरांमुळे समाजात ज्या सकारात्मक गोष्टी झाल्या आहेत त्यांची ते आवर्जून नोंदही घेत आहेत. नेमाडे ह्यांनी घेतलेल्या अशा सकारात्मक नोंदींकडे दुर्लक्ष करायचे आणि विशिष्ट जातीचे गौरवीकरण केले म्हणून भुई धोपटायची, हा आपमतलबी धंदा आहे. अशी एक रिअॅक्शन स्त्रीवाद्यांनीही दिली आहे. एका बाजूला नेमाडे विडंबनात्मक पद्धतीने स्त्रीवादिनी-नटव्या स्त्रीवादिनी’ असा शब्द वापरतात. हा शब्द ते कोणासाठी वापरत आहेत; शहरी भागातल्या उच्चवर्णीय व पुस्तकी स्त्रीवाद्यांसाठी ते हा शब्द वापरत आहेत. पण दुसरीकडे याच ‘हिंदू’मध्ये ग्रामीण भागातील बहुजन समाजातील वेगवेगळ्या कितीतरी स्त्रियांची चित्रणे ते करीत आहेत. उदा. त्यांची आत्या. शेताच्या कोणत्या कोपऱ्यात काय पेरायाचे याचा ती ‘आदेश’ देत आहे. म्हणजे ती सुचवत नाही तर ‘आदेश देते आहे आणि खंडेरावच्या बाप तो ‘आदेश’ मानतो आहे. मग कमांड पोजिशनमध्ये खंडेरावची आत्या आहे को बाप? आणि त्याच कादंबरीमध्ये मुस्लिम स्त्रियाही येतात, स्त्रीवादाच्या शहरी, उच्चवर्णीय स्वरूपाबद्दल नेमाडे टीकात्मक असले तरी शेतीकेंद्रित समाजव्यवस्थेमध्ये स्त्रियांचे नेमके स्थान काय आहे, यांचे त्यांनी गौरवीकरण केलेले आहे. केवळ उल्लेख केलेले नाहीत, आणि हे गौरवीकरण करताना स्त्रीसत्ता या संकल्पनेकडे हळूहळ बोट दाखवत जातात. याची साधी नोंदसुद्धा कोणी घेत नाही..
ग्रामीण समाज व अर्थव्यवस्थेतील ओ की ठो माहीत नाही किंवा ग्रामीण साहित्य म्हणजे दिनकर द. पाटील यांचे मराठी सिनेमेच, यापलीकडे यांच्या आकलनाची मजल गेली नाही. ‘सामना’मधील हिंदूराव पाटील या खलनायकाच्या विरोधात लढणारा एक ब्राह्मण शिक्षक आहे. आणि प्रश्न मात्र मारुती कांबळेचा आहे. ही युती कशी आहे पाहा. या युतीचा भाग असणारेच प्रतिक्रिया देणार, कारण याबद्दलचे त्यांचे आकलन यामुळे विस्कळीत होते आहे. थोडक्यात ‘सामना’मधल्या मारुती कांबळेनेही ‘हिंदू’ नाकारली आणि हिंदूराव पाटलांच्या विरोधात लढणाऱ्या मास्तरनेही ‘हिंदू’ नाकारली. आणि कारण काय नेमाड्यांच्या ‘हिंदू’चा नायक हा आता दुरावलेला त्या हिंदूराव पाटलांचा पोरगा आहे. त्या नायकाने जर ती व्यवस्था स्वीकारली असती तर लोकांना अतीव आनंद झाला असता. मात्र इथे गोची अशी आहे की त्याने ती व्यवस्था नाकारल्यामुळे व्यवस्था नाकारण्याचा अधिकार आपला आहे असे जे समजत होते, ते लोक तसेच राहिले.
भालचंद्र नेमाडे यांचे बहुतेक वास्तव्य हे औरंगाबादऐवजी पुण्यात गेले असते तर नेमाडे अशा प्रकारची बहुस्तरीय व व्यापक पट असलेली कादंबरी लिहू शकले असते की नाही, याबद्दल शंका वाटते.
विलास कुणाल प्लाझा, चिंचवड, पुणे.
संपर्क: 9422520574,8796593974

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.