गावगाडा – खाद्यसंस्कृती

पूर्वी खेडेगावातल्या प्रथेप्रमाणे लहान, थोर, श्रीमंत, सर्वांकडे, आपल्या इथे जे पिकते तेच खायचे अशी पद्धत होती. त्यामुळे बहुतेकांच्या घरी सारखाच मेनू असे. दररोजच्या जेवणात ज्वारीची भाकरी, साधारण परिस्थिती असलेल्या लोकांकडे कोरडे कालवण, ‘कोरड्यास’ म्हणजे भाजी अथवा दाळ, जी भाकरीवर घालून भाकरी दुमडून ‘पॅक’ करता येईल असे पदार्थ असत. जरा बरी परिस्थिती असलेल्यांकडे पातळ कालवण भाजी अथवा दाळ, कधी कधी भुईमूग अथवा सूर्यफूल अथवा इतर तेलबियांची कोरडी चटणी, सोबत सीझनप्रमाणे कांदा अथवा काकडी, हा मेनू न्याहारीत व दुपारच्या जेवणात असे. घरी जेवायचे असल्यासच पातळ कालवण कांदा वगैरे असे. मध्यम वयाच्या कष्ट करणाऱ्या व्यक्तीचा आहार साधारणतः न्याहारीला दोन भाकरी मध्यान्हीच्या जेवणाला दोन भाकरी व रात्री दोन भाकरी असा असतो. यात व्यक्तीप्रमाणे थोडाफार फरक पडतो. जर पावसाची परिस्थिती चांगली नसल्याने दुष्काळ असला आणि ज्वारीचा तुटवडा असला, तर त्याऐवजी मका, शक्यतो देशी, नाहीच मिळाली तर हायब्रिड किंवा तांबडी ज्वारी, मका, भाकरीसाठी वापरावी लागते. शहरांतसुद्धा सध्या ज्वारीचा भाव चढा असल्याचे व रेशनवर तांदूळ मुबलक व स्वस्त दराने मिळत असल्याने बरेच लोक तांदूळ व ज्वारीचे पीठ मिसळून त्याची भाकरी करतात. बऱ्याच वेळा मका व ज्वारी मिसळावी लागते! भाज्यांचे भाव पण खूप वाढले आहेत. तेव्हा जेवणात दाळीचा पर्याय म्हणून भाजी करणे हेही अवघड आहे. अगदी खानावळीतील आमटी करायची म्हटले तरी परवडत नाही. खानावळीतली म्हणजे वाटीभर आमटीत 2-4 डाळीचे दाणे सापडणे मुश्कील. म्हणजे आता चौरस आहार वगैरे गोष्टी इतिहासजमा झाल्यात की काय असे वाटते. शाळेतल्या मुलांना या गोष्टी शिकवतात. त्यांना हे कळणे अवघड जात असेल. पूर्वी घरातल्या स्त्रिया घरीच दाळी वगैरे तयार करत. त्यांच्या दाळ, दाळगा व कळणा अशा तिन्ही गोष्टी उपयोगी पडत. कळणा दुभत्या गाईला, दाळगा अडचणीच्या वेळी, व दाळ नेहमीकरता. घरी पिकवलेलेच खायचे अशी पद्धत असल्याने सर्व धान्ये घरच्या शेतातच पिकवायचा प्रयास असायचा. तीळ, कारळे, जवस, शेंगा, मूग, सूर्यफूल, चवळी, शेवगा, निरनिराळे भोपळे, मटकी, वाटाणे, तोंडली, कारली, इत्यादी. तसेच आवळा, चिंच, आंबा, अशा प्रकारच्या बागा कोणी लावत नसत. त्यांची खाण्यापुरती एकदोन झाडे बांधांवर असत. आताच्या नोकरदारासारख्या सर्व गोष्टी विकत आणण्याच्या प्रघातामुळे शेती करणाऱ्यांना प्रपंच करताना त्रास होतो. नोकरदारांना महागाई वाढली की महागाई भत्ता वाढवून मिळतो. तशी सोय शेतकऱ्यांना नाही. उलट महागाईचे प्रमाण त्यांच्याजवळ असलेल्या गोष्टींवर अवलंबून असल्याने सरकार शेतकऱ्याकडे असलेल्या वस्तूंचे भाव न वाढावेत असा प्रयत्न करते.

शेती ही निसर्गाच्या कलाने करावयाची गोष्ट आहे. त्यामुळे जेव्हा शेतकरी निसर्गाला अनुकूल पिके घेतो तेव्हा त्याला ती पिके घ्यायला कमी त्रास होतो. त्यामुळेच कदाचित काही लोक शेती ही ‘कला’, आहे असे म्हणतात. असो.

हे झाले रोजच्या खाण्याविषयी. सणासुदीला मात्र सर्व घरांत पुरणपोळी, दाळ भात, वगैरे साग्रसंगीत जेवण करण्याचा प्रघात आहे. पुरणाची पोळी ही हरभऱ्याची डाळ व गळ घालन केलेली असते. पोळ्या आकाराने मोठ्या व्यासाच्या असतात. त्याच्याबरोबर कटाची आमटी असते. भजी वगैरे असतात. गृहिणी फार टुकीने संसार करणारी असली तर कुरड्या-पापड्या तळलेल्या असतात. मुख्य सण म्हणजे, पोळा व गुढीपाडवा, अक्षयतृतीया, होळी, लग्नकार्ये. दिवाळी फारशी नाही. यांपैकी प्रत्येक सणाला पक्वान्ने आणण्याचा प्रघात नाही. लग्नकार्यांत मात्र आचारी लावून जिलेबी, बुंदी अशी पक्वान्ने केली जातात. भात खाण्याची फारशी आवड नाही. त्यातल्या त्यात पांढरा भात तर नाहीच. मसालेभात क्वचित केला जातो. मोठे जेवण म्हणजे भंडारा किंवा लक्ष्मणशक्ती किंवा इतर वेळचा पाच-दहा हजार लोकांना प्रसाद म्हणजे मसालेभात आणि नुक्ती (बुंदीच्या लाडूचा चुरा) असे दोनच पदार्थ असतात. वाढपाला सोपे जाते व तयार करायला पण सोपे. लग्नांत मात्र याशिवाय चपात्या, भाज्या वगैरे असतात. त्यामुळे लग्नांत आळीतल्या व भावकीतल्या, नात्यातल्या बायांना रात्रभर पोळ्या-चपात्या कराव्या लागतात. हल्ली लग्नात पुरणपोळी बहुधा नसते.

पाहुणे आल्यावर वगैरे फोडणीचे पोहे असतात. घरच्या साळी वगैरे असल्यावर घरचेच पोहे असतात. भात हे इकडचे नैसर्गिक पीक नाही. (हे जिल्हा सोलापूर, बार्शी परिसराचे वर्णन) पण काही जमिनी किंवा जमिनीतील काही भाग सखल असतो. तेथे पाणी साठत असते व वाफसा लवकर होत नसल्याने नेहेमीची पिके पेरता येत नाहीत; तेव्हा तेथे साळ केली जाते. ती फारश्या काळजीने सांभाळली जात नाही. कारण ते मुख्य पीक नसते. पूर्वी त्या त्या भागातल्या साळीच्या जाती असत. शेतकरी त्याचे बियाणे सांभाळून ठेवत. योग्य हवामान व पाऊस असेल त्या वर्षी साळीचे पीक भरपूर येत असे. साळ भरडण्याची गिरणी चारपाच गावात एखादी तरी असे. त्यापासून तांदूळ तयार केला जायचा. घरचा तांदूळ! अशा त-हेने शेतकरी घरी प्रपंचाला लागणाऱ्या बहुतेक गोष्टी, वस्तू घरी तयार करण्याच्या प्रयत्नात असायचा. फक्त कापड-चोपड, यंत्रांचे सुटे भाग व प्लास्टिकच्या वस्तू तेवढ्या बाजारातून आणायच्या. पण यासाठी शेती करणाऱ्या शेतकऱ्याची वृत्ती प्रापंचिक असावी लागते. चांगला शेतकरी चांगला प्रपंचही आपोआप करतो. किंवा चांगला प्रापंचिक माणूस शेतीही चांगली करतो. शेती ही जीवनशैली आहे. त्यामुळे शेतीचा मुख्य उद्देश त्या त्या व्यक्तीचा उदरनिर्वाह नीट चालावा असा असतो. ती व्यवसाय म्हणून करत खूप पैसे मिळावेत, असा नसतो. त्यामुळे शेतीवर प्रपंच करणारा माणूस आपोआपच अल्पसंतुष्ट व कमी महत्त्वाकांक्षी असतो. आपल्याकडच्या शेतीसाठी माणूस फार महत्त्वाकांक्षी व शेतीव्यवसायात फार धाडस करणारा चालत नाही. कारण निसर्ग, बाजार, सरकारी धोरणे वगैरे. शेतकरी वर्गाच्या ज्या अपेक्षा असतात त्या, अथवा त्यांच्या संघटना ज्या मागण्या करतात त्या पूर्ण होण्याची अपेक्षा करणे म्हणजे मृगजळामागे धावण्यासारखेच आहे. नेहमीप्रमाणेच शेती व ग्रामीण भाग म्हटले की चर्चा नेहमीप्रमाणेच नेहमीच्या मुद्द्यांवर आली. असो. आता आपण आपल्या सध्याच्या विषयाकडे वळू. हे झाले शाकाहारी जेवणाबद्दल. आणखी एक मोठा वर्ग मांसाहारीही असतो. मांसाहारी म्हणजे आठवड्यात एक दोन वेळा मांसाहार करू शकणारा. दररोज मांसाहार करणारे कोणी नसतात. कारण आर्थिक.

खेड्यात मांसाहारी वर्गासाठी सहसा मटनाची दुकाने किंवा स्टॉल्स नसतात. एखादा बोकड कापायचा असेल तर कापणारा खाटीक तो किती वजनाचा भरेल याचा अंदाज करतो. हा अंदाज अगदी अर्धा किलोपर्यंत बरोबर असतो. तो नेहमीच्या गि-हाईकाला विचारतो. काही वेळा तर बोकड पाहून गि-हाईक मागणी नोंदवते. त्यांची भरती झाली की तो ठरावीक वारी बोकड कापायचे ठरवतो. बहुधा मंगळवार किंवा शुक्रवार हे देवीचे वार. मग बोकड कापून ऑर्डरप्रमाणे त्यांना माल देतो व पैसे घेतो. नेहमीप्रमाणे त्यातही उधारी असतेच. मग त्या बोकडाचे कातडे व शीर ढोराला विकतो. व त्यांचा हिशोब बरोबर झाला का ते पहातो. त्यात पुन्हा बोकड जर बडविलेला असला तर (नसबंदी केलेला) मटनाला दोन रुपये भाव जास्त असतो. हे सगळे विचारात घेऊनच मूळ शेतकऱ्याला बोकडाचा दर मिळत असतो. ज्यांना मटन खाण्याची आवड असते. ते लोक अक्षरशः मटन खाण्याच्या दिवशी उत्तेजित होतात; लहान थोर सर्व. कालवणात शहरातल्या सारखे फार मसाले नसतात. तेलाचे प्रमाणही कमी असते. त्यामुळे रस्सा हॉटेलासारखा फार दाट नसतो. पण मटन ताजे असल्याने व इतर काही कारणांमुळे बऱ्याच लोकांना शहरातल्या मटनाच्या कालवणापेक्षा खेड्यातले कालवण जास्त आवडते.

याशिवाय इतर वारी कोंबडीच्या कालवणाचा पर्याय असतो. कमी वेळ व बजेट असेल तर अंडी असतात. शिवाय जाळे लावून तित्तर किंवा ससे पकडणारे मित्र जर असले तर तेही प्रकार असतात. बरेच लोक मांसाहार करण्यापूर्वी ‘तीर्थप्राशन’ करू इच्छितात. त्यामुळे जेवण जास्त जाते अशी समजूत असते.

या साऱ्यामुळे मांसाहार करणे हा एक निराळाच प्रकार होऊन बसतो. हल्ली दहा पंधरा वर्षांत तळ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे त्यांतले मासे पण खूप लोक खातात. अर्थात मासे खाणे हे मटनाला पर्याय होऊ शकत नाही; पण अडचणीच्या वेळेस चालते. मासे खाणे स्वस्त असते. त्यामुळेही ते खाणाऱ्यांची संख्या खूप असते. गावचा ओढा वाहत असला तर त्याला जाळे लावून पण शौकीन लोक मासे पकडतात. पुन्हा मोठे पाझर तलाव किंवा सरकारी लघुपाटबंधारे वगैरे तलाव. त्यांचे मासे पकडायचे वर्षाचे कंत्राट असते. तेही काही लोक घेतात. या सर्व गोष्टींमुळे माशांची उपलब्धता वाढते. शिवाय माशांचा किलोचा भाव मटनापेक्षा निम्मा किंवा त्याहूनही कमी असू शकतो.
माशांचा अथवा मटन, चिकन, अंडी यांचा खाद्यप्रकार हा सहसा पातळ कालवण म्हणजे ‘करी’ प्रकारात असतो. क्वचित भाजलेला किंवा तेलावर परतलेलाही असू शकतो. अंडी उकडून किंवा त्यांची पोळी करून (ऑम्लेट)ही खाल्ली जातात.

मुस्लिम त्यांच्या लग्नकार्यात बिर्यानी करतात. त्यावेळेस इतर जातीच्या लोकांना, खेड्यातला पुरणपोळीच्या दर्जाचा मांसाहारी प्रकार खायला मिळतो. जो दर्जा शाकाहारी जेवणांत पुरणपोळीला तोच दर्जा मांसाहारी जेवणात बिर्याणीला समजला जातो.

याशिवाय निवडणुकांच्या पूर्वी व विजयी झाल्यावर ज्या जेवणावळी असतात त्या मांसाहारी असण्याकडे कल असतो. त्यांत मटनाचे पातळ कालवण असते व ऐन वेळी त्याचे आकारमान वाढविण्याची सोय असते. शाकाहारी असेल तर भात, चपाती, वांग्याची भाजी आणि बुंदीचे लाडू अथवा जिलेबी असा बेत असतो. याशिवाय सामुदायिक जेवण होण्याचा प्रसंग म्हणजे आषाढी किंवा कार्तिकी वारीला पंढरपूरला जाणारी किंवा परत येणारी पालखी गावात जेवणाच्या वेळेला किंवा मुक्कामाला थांबते तेव्हा वारकऱ्यांना जेवण द्यायचे असते. त्यावेळेस गावकरी दोनदोन, चारचार वारकरी प्रत्येक जण आपल्या घरी नेऊन जेवू घालतो. किंवा पट्टी (वर्गणी) करून साधे जेवण त्यांना करतात; पिठले भाकरी अथवा भाजी भाकरी.

प्रत्येक खेड्यात एक मुख्य ग्रामदैवत असते. तो सगळ्यांचा देव. याशिवाय प्रत्येक घराला म्हसोबा, सटवाई, एखादा पीर, ज्याच्या त्याच्या शेतातला देव, असे अनेक देव असतात. त्यांचा वार्षिक देव देव असतो. तो केला नाही तर देव कोपतो अशी समजूत असते. तो देव देव म्हणजे आपल्या ऐपतीप्रमाणे देवाला कोंबडा, बकरे कापून देवाची पूजा करून त्याला नैवेद्य दाखवून सर्व भावकी व पाहुणेमंडळींना देवाच्या समोरच प्रसाद द्यायचा; म्हणजे ही नातेवाईक मंडळीही कोप पावत नाहीत. हे एक जेवणच असते. असे देव साधारणतः शेतात दूरवर अथवा गावच्या शिवेवर असतात. देव एखाद्या झाडाखाली असतो. त्याच्या शेजारी तीन दगडांची चूल मांडून कालवण केले जाते व भाकरी घरूनच आणल्या जातात. जे प्रसाद घ्यायला येतात, ते त्यांची त्यांची भांडी, ताट,वाटी, वगैरे आणतात. तेथेच पंगत बसते. आता गाव लहान असले तरी जवळ जवळ सगळेच देवदेवाला बोलवावे लागतात. काही भावकी म्हणून, काही पाहुणे म्हणून. त्यामुळे आमंत्रितांची संख्या खूप असते. साहजिकच बऱ्याच वेळा पातळ करावे लागते. त्यावरूनसुद्धा कधी कधी वाद होतात. यजमानाने घरून मोजक्याच भाकरी आणलेल्या असतात, प्रत्येकी दोन समजा! तो प्रत्येकी तेवढ्याच भाकरी वाढतो. पण काही जणांना अशा जेवणात जास्त रस असतो. ते जास्त भाकरी मागतात. यजमान वाढायला टाळाटाळ करतो, कारण त्याला आणलेले अन्न सर्वांना पुरवायचे असते. असा प्रसंग येऊ नये म्हणून अनुभवी जेवणारे आपल्या आपल्या घरूनच जास्तीच्या २-३ भाकरी प्रत्येकी कागदात गुंडाळून घेऊन येतात; पण जेवण व्यवस्थित करतात. कालवण ‘अन्लिमिटेड’ असते. अर्थात रस्सा फक्त! त्यातले मटनाचे तुकडे मर्यादितच असतात. ते जास्त मागावयाचे नाहीत असा रिवाज.. अशा त-हेने जेवण चारपाच वाजेपर्यंत संपते मग प्रत्येक जण यजमानाला काहीतरी ५-१० रुपयांचा आहेर करतो, व कार्यक्रम संपतो. अशा वेळी कालवण सर्वांना पुरवणी यावे असे वाढणे, ही एक कलाच असते. काही तरी वाढले असे तर वाटावे पण प्रत्यक्षात फक्त पाणीच वाढलेले. असो. यातसुद्धा जे लोक दोनतीन पिढ्यांपूर्वीच दुसऱ्या गावातून कामधंद्यासाठी येथे आलेले असतात व येथेच स्थाईक होतात, त्यांना देव देव करण्यासाठी आपल्या मूळ गावाच्या देवाला जावे लागते. सगळे साहित्य व बोलावणे केलेले लोक एका टेंपोत घालून सकाळीच ते त्या गावाकडे रवाना होतात, व संध्याकाळी परत येतात. यजमानाला या कार्यासाठी बराच खर्च असतो. अगदी जवळचे परगावचे पण लोक बोलवावे लागतात. जावई-मुलगी, बायकोच्या माहेरचे वगैरे.

याशिवाय या दहा-पंधरा वर्षांत खाण्याच्या सवयी व पदार्थ यात झालेला महत्त्वाचा बदल म्हणजे बहुतेक खेड्यांत आता मोठ्या गावासारखी कँटीन्स किंवा हॉटेले झाली आहेत. गावच्या आत चावडीसमोर किंवा बँकेसमोर एक आणि हमरस्त्यावर एस्टी स्टँडवर एक किंवा दोन. या ठिकाणी उधारीची सोय असते. शिवाय सर्व खारे व गोड पदार्थ मिळतात. शेव, चिवडा, फरसाण, बर्फी, पेढे, सकाळी व संध्याकाळी बटाटेवडा, सांबार, लाडू इत्यादी. शिवाय चकचकीत पॅकिंगमधले बहुतेक सगळे, अगदी हल्दीरामची पाकिटेसुद्धा फरसाण, चिप्स, वेफर्स, खारे दाणे, कुरकुरे इत्यादी. शिवाय या ठिकाणी फ्रिजची व्यवस्था असल्याने शीतपेये, कोला, पेप्सी, सोडा वगैरे, आणखी बिसलेरीसारखे पाणी ज्यांच्या, कंपन्या गावोगाव आहेत. सर्वांना बिसलेरीच म्हटले जाते. या लोकांनी मार्केटिंगचे जाळे चांगलेच उभारले आहे. प्रत्येक लहान गावात हे मिळते.

या हॉटेलवर पतवान लोकांना उधारीवर चहा, कॉफी, नाष्टा वगैरे मिळतो. तेथे फोन असतो. ते एक भेटण्याचे ठिकाण झालेले असते. काही स्टँडवरच्या हॉटेलांत ड्रायव्हर कंडक्टरना मोफत चहा मिळतो. एकमेकांचे निरोप पोहचविणे (जरी मोबाइल फोनमुळे हे कमी झाले असले तरीसुद्धा) हे येथेच होते. शिवाय निवडणुकीच्या काळात तर हे स्टँडवरचे हॉटेल हे एक महत्त्वाचे ठिकाण असते.

थोडक्यात म्हणजे शहरात वा ग्रामीण भागात लोकांची मूळ वृत्ती सारखीच असते. हातात पैसे असल्यावर ते खर्च करण्याच्या पद्धती सारख्याच असतात. हातात अतिरिक्त पैसे असणे ही मुख्य गोष्ट.

जुगार खेळणे, नशा करणे, या गोष्टी ‘अल्टिमेट’ मजेसाठी करण्यात येतात. तरीही खेड्यांत अजून दारू विकणाऱ्याला प्रतिष्ठा नाही.. तो झाकूनच धंदा करतो. पण जुगार मात्र उघड खेळला जातो. पत्ते, क्वचित-प्रसंगी पट. खेड्यांत हे वागण्याचे सर्व प्रकार बेमालूमपणे एकमेकांत मिसळलेले असतात. दिवाळीच्या पहिल्या आंघोळीच्या (जी पहाटे करायची असते) आदल्या रात्री अजूनतरी लोक रात्रभर पट खेळतात. एका बाजूला दहापंधरा लोक, व दुसऱ्या बाजूला पण तेवढेच; असा सामुदायिक खेळ. ज्यांना पट खेळता येत नाही ते आपले पत्ते कुटतात.

नशा करणाऱ्यांचा आणखी एक परंपरागत मार्ग म्हणजे गांजा, अफू, भांग इत्यादी. हे पण झाकूनच विकले व घेतले जातात. पण यांचा दर्जा दारूवाटपापेक्षा कमी असतो. सध्या विडी ओढणारे कमी दिसतात तर त्याऐवजी सिगारेट पिणारे जास्त. काही दिवसांपूर्वी आमच्या परिचयाचे एक गृहस्थ, जे नेहमी लालधागा विडी ओढतात, ते सिगारेट सारखी पांढऱ्या वर्गातली विडी ओढताना दिसले. प्रतिष्ठेत थोडीशी वाढ. पान खाणे मात्र बहुसंख्येने चालते. पान तंबाखू किंवा नुस्ती तंबाखू, तंबाखू खाणे लहान-थोरांत फार लोकप्रिय. कमी खर्च व उघडकीला येण्याची शक्यता कमी. बाळगून पान खाणाऱ्यांचा खर्च सध्या खूप म्हणजे काही पटींत वाढला आहे. पूर्वी शेकड्यांवर सकाळी पान घेणारे आता सकाळी पाच दहा पानेच घेऊ शकतात. लोकांचे पगार वाढले तशी महागाईही भयंकर वाढली.

आता एक अडाणी शंका, सरकारने आयोग नेमून कर्मचाऱ्यांचे पगार वाढवायचे व त्या लोकांनी भरपूर पैसे खर्च करून समृद्धी आली असे मानायचे, ही खरी प्रगती आहे का? शेतीक्षेत्रातले उत्पादन जर कमी होत असले, तर अशा प्रकारची समृद्धी आलेली योग्य मानायची का?
अशा त-हेने आपण गावातल्या खाण्याच्या सवयी व त्यातली गेल्या दहापंधरा वर्षांतली स्थित्यंतरे यासंबंधी ढोबळ मानाने काही माहिती घेण्याचा प्रयत्न केला. गावच्या नुसत्या खाण्याच्याच नाही तर बऱ्याच गोष्टींमध्ये या काळात बरेच बदल झालेले जाणवतात.

याचे प्रमुख कारण गावांत पैसे जास्त यायला लागले. लोकांचे पगार वाढले. रोजगार तर चारपाचपट वाढला. सर्व व्यवहार रोखीने व्हायला लागले. गावातील बँकांत. पतसंस्थात ठेवी वाढल्या. आणि पूर्वी जे आपण म्हणायचो की शेतकरी गावच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, ते जाऊन आता नोकरदार लोक या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत की काय, असे वाटायला लागले. हे सर्व गेल्या दहापंधरा वर्षांपासून चालू असलेल्या ‘जागतिकीकरणा’चे झिरपलेले परिणाम आहेत की काय?

सुर्डीकर बंगला, बार्शी

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.