एका फसलेल्या अपहरणाची गोष्ट

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक विमान कंपनी होती. तिचे नाव कुठल्याशा पक्ष्यावरून दिले होते; म्हणजे अशी जुन्या लोकांची आठवण होती. आता मात्र तिला सर्वजण केएफए म्हणजे खाली फुकट एअरलाइन्स म्हणून संबोधायचे. ही कंपनी डबघाईला आली होती. वैमानिक संपावर गेले होते आणि कर्मचाऱ्यांना अनेक महिन्यांचा पगार मिळाला नव्हता. तिला ज्यांनी मोठमोठी कर्जे दिली अश्या बँका बुडू लागल्या होत्या. पण त्या कंपनीचे एक वैशिष्ट्य होते, ज्यामुळे तिला कधी प्रवाशांची ददात पडत नसे. ती हायजॅकप्रूफ होती. ही प्रसिद्धी कंपनीला कशी मिळाली, त्याचा हा किस्सा —
काही महिन्यांपूर्वी घडलेली गोष्ट. केएफेच्या उड्डाण क्र.333 च्या तीन अपहरणकर्त्यांपैकी डुलक्या खात बसलेले दोघे खडबडून उठले आणि तीक्ष्ण हत्यारांसारख्या दिसणाऱ्या वस्तू परजण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यांच्यापैकी एकाने विमानसेविकेचे बखोट धरून तिला बजावले, “अजिबात इथून हलायचे नाही. हे अपहरण आहे. हे विमान आम्ही कराचीला घेऊन जात आहोत.”
“एक मिनिट थांबा. तुम्ही हे विमान कराचीला नेऊ शकत नाही.” बँकरसारखा दिसणारा एक माणूस म्हणाला, “थकबाकी वसूल करायला तुमच्या अगोदरच माझ्या बँकेने ते जप्त केले आहे. हे विमान आता लिलावासाठी मुंबईला नेण्यात येत आहे.”
“थोडे थांबा.” अपहरणकर्ता म्हणाला, “माझी तिकिटे पाहून एकदा खात्री करून घेतो. कदाचित आम्ही चुकीच्या विमानात चढलो आहोत.” तिकिटे पुन्हा एकदा निरखून पाहिल्यानंतर तो म्हणाला, “आम्ही बरोबर आहोत. आम्ही अपहरण करणारच. तुमची बँक गेली खड्ड्यात.”
एक अपहरणकर्ता सेविकेला आपल्यासोबत घेऊन कॉकपिटकडे सरकला. दुसरा मधल्या दीर्घिकेत उभा राहिला. तिसऱ्याने मागच्या बाजूस पाय रोवले. कॉकपिटचा दरवाजा धक्का मारून उघडल्यावर पहिल्याने झटकन आत घुसून तो लावून घेतला.
“घाबरण्याचे काही कारण नाही. शांत रहा. हे अपहरण आहे. आम्ही सांगू तसे कराल तर जिवानिशी वाचाल, सांगून ठेवतो.” वैमानिकाच्या चेहऱ्यावरील आश्चर्य पाहून तो म्हणाला, “तू कोण आहेस?”
“मी विमानसेवक आहे, वैमानिक नाही.” वैमानिकाच्या खुर्चीतील गणवेशधारी बोलला, “गेल्या तीन महिन्यांचा पगार न मिळाल्याने सर्व वैमानिक संपावर गेलेत.”
“मग हे विमान चालवणार कोण?” अपहरणकर्ता काळजीच्या स्वरात विचारतो.
“कुणीच नाही. आपण अजून उड्डाण घेतले कुठे?” जमिनीवरच तर आहोत.
घटनेला मिळालेले हे वळण पाहून अपहरणकर्ता चक्रावून जातो खरा, पण र सावरतो. कदाचित मला डुलकी लागली असेल तो स्वतःची समजूत घालतो.
“तुला हे विमान चालविता येईल का?” तो विमानसेवकाला विचारतो.
“पण माझ्याकडे लायसन नाही.” सेवक म्हणतो.
“तुझ्या मानेवर चाकू ठेवला तर?” अपहरणकर्ता धमकावतो.
“मग चालवता येईल कदाचित. पण आणखी एक समस्या आहे. आपल्याकडे इंधन नाही.”
“काय?” अपहरणकर्ता.
“तेल कंपन्या आपल्याला इंधन देणार नाहीत कारण त्यांची बरीच थकबाकी अजून आपल्याकडे शिल्लक आहे.” सेवकाला गौप्यस्फोट करावाच लागतो.
अपहरणकर्ता थोडा वेळ विचार करतो. मग तो आपल्या खिशातून सॅटेलाइट फोन काढून कराचीला एक फोन लावतो. “कराची, एक अडचण आलीय. तू दहा-एक हजार डॉलर्स हवाई इंधन खरेदी करण्यासाठी केएफेच्या खात्यात जमा करशील का?”
कराची मान्य करते. परंतु पैशाचे उगमस्थान लपवण्याकरता तो अनेक खात्यांमधून फिरवावा लागतो, आणि त्याला उशीर लागतो. दरम्यान अपहरणकर्ता सेविकेवर खेकसतो, “कॉफी आण मला थोडी.”
“सॉरी सर, पण साहेबांचा आलिशान शिकारा गहाणातून सोडविण्यासाठी कंपनीने कॉफी, बिस्किटे आणि टॉफ्या मेन्यूतून काढून टाकल्या आहेत.’
त्यानंतर कदाचित एका तासाभराचा वेळ गेला असावा. एक गाडीभर इंधन येते आणि ते विमानात ओतले जाते. “आता तरी आपण निघू शकतो का?” अपहरणकर्ता.
“मला नाही वाटत अजून निघता येईल म्हणून. विमानात एकच इंजिन आहे”,
विमानसेवक,
“का? दुसऱ्याचं काय केलं तुम्ही?” अपहरणकर्ता गुरकावतो.
“ते साहेबांच्या फॉर्म्युला कारला जोडलं आहे.”
आता मात्र अपहरणकर्ता हताश झाला आहे. अपहरण फ्लॉप होणार की काय? “मला तुमच्या साहेबांशी बोलायचं आहे.” तो ओरडतो. घाबरलेला सेवक साहेबांना फोन लावून तो अपहरणकर्त्याकडे सोपवतो. अपहरणकर्ता थोडा वेळ फोन कानाशी लावून मग तो परत करतो.
“काय म्हणाले ते?” वि.से.
“काहीच नाही. मोबाइल कंपनी म्हणते की गेल्या सहा महिन्यांचं बिल न भरल्यामुळे सिम कार्ड बाद केलं आहे.” असे म्हणून अपहरणकर्ता निघून जातो.
(नवहिंद टाईम्सवरून अनुवादित साभार)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.