लोकनेता: शाहणा

मे महिन्यातली सकाळ! कडक उन्हाळा! सकाळचे नऊ-साडेनऊ वाजलेले! काल संध्याकाळी गावाशेजारच्या मोठ्या गावात मोर्चा निघालेला होता, व शेवटी मोर्चा सरकारी धान्याच्या गोडाउनवर गेला. नंतर पोलिसांच्या लाऊडस्पीकरवरून कडक सूचना. शेवटी मोर्चेकऱ्यांनी न ऐकल्याने लाठीमार, अश्रुधूर व गोळीबाराचे आदेश. सात-आठ लोकांचा गोळ्या लागल्याने जागेवरच मृत्यू व अनेक जखमी. बाकीचे हौशे-नवशे आपापल्या गावांकडे पळाले.

अर्थातच रात्री व रात्रभर याची चर्चा गावागावांत चालू होती. पोलिसांच्या समोर सरकारी गोडाऊन फोडण्याच्या घटनेमुळे लोकांना एकप्रकारचा आत्मविश्वास आलेला होता. आपल्याला हवी असलेली वस्तू सरकारी मालकीची व सरकारी बंदोबस्तात असली तरी ती हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो! व याचा परिणाम म्हणजे सकाळी नऊ-साडेनऊ वाजता पंचवीस-तीस जणांनी, ज्यांत पाच-दहा लोक धाडसी होते. पाच-दहा लोक उडाणटप्पू होते, व उरलेले प्रवाहाबरोबर जाणारे होते; एका गावात दरोड्याचा प्रयत्न केला.
संबंध तालुक्यात वातावरण तंग होते. पोलिसांच्या गाड्या अधूनमधून गस्त घालत होत्या.

या पंचवीस-तीस जणांनी गावातल्या वाड्यावर मोर्चा नेला, हलगी वाजवत कपाळाला गुलाल लावून. जुन्या वाड्याच्या प्रमुख दाराला बाजूच्या दोन बाह्या ज्याच्यावर टेकत ते मोठे दगडाचे चिरे असत, व दोन्ही बाजूच्या चिऱ्यांमध्ये जे अंतर रहात असे त्यात एक लाकडाचा उंबरा घट्ट बसविलेला असे. तो लाकडी उंबरा पहारीने ठोकून आत ढकलला. तेथे जी जागा झाली त्यातून एक लहान मुलगा आत गेला, त्याने मुख्य मोठ्या दाराची कडी व अर्गळ काढली व दार उघडले. मग इतर सर्व आत आले.

त्या जमावाने बहुतेक वाड्यात प्रवेश करण्यापूर्वीच कोठे जायचे व काय काय करायचे हे ठरविले होते. त्यामुळे ते तडक दुसऱ्या मोठ्या दाराजवळ असलेल्या घराकडे गेले, व तेथे असलेल्या ज्वारीला त्यांनी लक्ष्य केले. त्या बाजूचा मोठा दरवाजा उघडण्यात आला व ज्वारी पोत्यांनी वा अर्ध्या पोत्यांनी भरून खाली गावात असलेल्या चावडीत आणण्यात आली.

साधारणतः पंचवीस-तीस पोती ज्वारी आणण्यात आली. त्यासाठी सुमारे एक तास लागला. नंतर सर्व मोर्चेकरी ज्वारीभोवती जमा झाले. तोपर्यंत गावात सगळीकडे बातमी पसरून गावातले जुने लोक तेथे जमा झाले होते.

सर्वांचे मत पडले की झाले हे योग्य झाले नाही. बरीच चर्चा झाली व खाली आणलेली ज्वारी परत वाड्यात जेथून आणली होती तेथे नेऊन टाकण्याचे ठरले व त्याप्रमाणे ज्वारी परत नेण्यात आली.

दरम्यान पहाटेच असे होणार अशी कुणकुण लागल्याने वाड्याशी संबंधित लोकांनी लपत-छपत जवळच्या पोलिसस्टेशनला जाऊन रिपोर्ट केला होता, व तालुक्याच्या ठिकाणी जेथे वाड्याचे मालक रहात होते, त्यांनाही निरोप दिला होता. त्यामुळे त्यांनी तालुक्यामधून पोलिसस्टेशनला फोन करून तक्रार दिली होती. त्यामुळे दहा वाजण्याच्या सुमारास दहा-पंधरा पोलिस एक मोठी पोलिस व्हॅन घेऊन व एका जीपमध्ये सब इन्स्पेक्टर व इतर अधिकारी गावात दाखल झाले होते. अर्थात तोपर्यंत ज्वारी नेहमीप्रमाणे जागच्या जागी गेलेली होती. म्होरक्ये लोक कारवाईच्या भीतीने फरारी झालेले होते. नंतरच्या अर्ध्या तासात तालुक्याहून मालक लोक व अधिकारी लोक यायला सुरुवात झाली. थोरले मालक साधारण अकरा-साडेअकरा वाजता गावात आले. अर्धा तास चावडीपाशी थांबून विचारपूस करून नंतर वाड्यात गेले. व त्यानंतर सुमारे अर्ध्या तासाने डी.एस.पी. आले. ते केरळीय गृहस्थ होते. साधारण चाळीस-पन्नास वर्षे वयाचे होते. गावातच चावडीवर एक तास घालवून नंतर ते वाड्यात थोरल्या मालकाच्या भेटीला गेले. त्यांच्याशी त्यांनी बराच वेळ चर्चा केली व अशा प्रकारच्या गुन्ह्याचा तपास चांगल्या पद्धतीने केला पाहिजे, ह्या वृत्तीचा चांगला बंदोबस्त केला पाहिजे, अशा प्रकारचे बोलणे झाले. त्यासाठी एका चांगल्या अधिकाऱ्याची नेमणूक करून साहेब परत येतो म्हणून परत जिल्ह्याला गेले. ते दुसऱ्या दिवशी त्यांची बॅग वगैरे घेऊनच आले.

केसची मांडणी व्यवस्थित व्हावी यासाठी साहेबांनी व्यवस्थित आखणी केली. आता सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आरोपींची नावे. एकूण चाळीस आरोपी होते. प्रत्येक खेड्यात असा एक प्रघात असतो की कोणतीही गोष्ट घडली की त्याचा उपयोग आपल्याला काय होईल याचा विचार करायचा व शक्यतो तसा प्रयत्न करायचा. आता या आरोपींच्या यादीत प्रत्येकाला आपल्या शत्रूचे नाव असावे असे वाटत असते, भले मग तो परगावी गेलेला असला तरीही. अशा या यशस्वी-अयशस्वी प्रयत्नांनंतर एकदाची आरोपींची यादी पूर्ण झाली, व वॉरंटस् निघून त्यांना अटक झाली. अर्थात काही मंडळी फरारी होतीच. बाकी सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले, व तालुक्याच्या ठिकाणी हलवले.

तेथे हा खटला सेशन-कमिट झाला. हा खटला जिल्ह्याच्या ठिकाणी दाखल झाला. इकडे गावात या चाळीस-पंचेचाळीस आरोपींना प्रत्येकी दोन याप्रमाणे जामीन देण्याची धावपळ सुरू झाली, म्हणजे या 500-600 उंबऱ्याच्या गावात जवळ जवळ प्रत्येक घर हे खटल्याशी संबंधित झाले. त्यातून पुन्हा तलाठी ऑफिसचा वेळकाढूपणा. शेवटी थोरल्या मालकांनीच जामीन राहणाऱ्यांना व आरोपींच्या घरच्यांना वाड्यात बोलावून घेतले. तलाठी व इतर संबंधित मंडळींना बोलावले. जामिनदारांच्या उताऱ्यांची सोय केली.
मग दुसऱ्या दिवशी हे सर्व लटांबर जिल्ह्याच्या ठिकाणी रवाना झाले. पुन्हा सर्वांचा मिळन एकच वकील, कां, कसे याच्यावर चर्चा झाली. वकिलांची फी किती व कशी द्यायची यावर चर्चा होऊन एकदाची जिल्ह्याच्या ठिकाणी जामिनदारांची नोंद झाली. तरी पण खटल्यांचे स्वरूप व महत्त्व लक्षात घेऊन जामीन लगेच मंजूर झाले नाहीत. ते नंतर तीन-चार महिन्यांनी मंजूर झाले, व नंतर आरोपींची जामिनावर सुटका झाली.

थोरले मालक हे ज्याप्रमाणे त्यांच्या कुटुंबाचे प्रमुख होते, त्याचप्रमाणे ते गाव कुटुंबाचेपण प्रमुख होते. मुळातच त्यांचा स्वभाव हा प्रत्येक गोष्टीचा खोलवर जाऊन विचार करून निर्णय घेण्याचा होता. प्रत्येक निर्णय घेताना सर्व बाजूंचा पूर्ण विचार करून समोरच्या माणसावर अन्याय न होईल अशा प्रकारचा निर्णय घेण्याची त्यांची पद्धत होती. समोरची व्यक्ती जर गरीब असली तर मग अधिकच काळजीपूर्वक निर्णय घेत असत. “लोक काय म्हणतील?” हा विचार असे. त्यामुळे जेव्हा केस कोर्टात बोर्डावर आली व तारीख पडली तेव्हा बऱ्याच आरोपींच्या परगावच्या पाव्हण्यारावळ्यांनी त्यांना भेटून ही केस मिटवावी अशी विनंती केली. त्यांचा कल केस मिटवण्याकडेच बराच झाला. जवळ जवळ सगळे गाव ज्यात गुंतलेले होते, अशा प्रकरणात केस लढवून त्यात आरोपींना शिक्षा होऊन फार काही साध्य झाले नसते. त्यामुळे त्यांनी आरोपीचे वकील, सरकारी वकील यांना भेटून तशा प्रकारची कारवाई करण्यासंबधी चर्चा केली, व आरोपींचा एक माफीनामा स्टँप पेपरवर घेऊन व चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र घेऊन ही केस मिटवावी, असे ठरविले. व त्याप्रमाणे कारवाई करविलो, व ही सर्व आरोपी मंडळी पोळ्याच्या दिवशी दिवस मावळताना गावी परत आली. हे प्रकरण एकदाचे मिटले.

पण या सर्व प्रकरणात थोरल्या मालकांना बराच मनस्ताप झाला. या भागात दुष्काळ ही नेहमीची गोष्ट आहे, तरीसुद्धा लोकांना त्यांची सवय झालेली नसते. दरवेळी दुष्काळ पडला की लोकांना तणाव जाणवायला लागतो. वर वर जरी लोक सामान्य दिसले तरी त्यांच्या अंतर्मनांत तणाव असतो, व तो त्यांच्या वागण्या-बोलण्यात दिसतो.

आपण गावात सकाळी, जेव्हा बरीच मंडळी गावातच असतात, तेव्हा फेरफटका मारला तरी आपल्याला हा तणाव जाणवतो. गावकरी मंडळी आशावादी असतात, जे त्यांच्यासाठी आवश्यक असते; ‘पॉझिटिव्ह थिंकिंग’! अक्षय तृतीयेला एखादा पाऊस येईल, पाडव्याला येईल, असे प्रत्येक सणादिवशी पूर्वीचा दाखला देऊन लोक पावसाची वाट पाहात असतात: जण काही पूर्वजांनी सणांची आखणी पाऊस पडण्यासाठीच केलेली असते! शेवटी पोळ्याला (बैलपोळा), श्रावण अमावस्या, चार थेंब तरी पडणारच. पण त्या वर्षाचा पोळा उजाडला व संपला तरी थेंबाचा पत्ता नाही. लोक अधिकच खिन्न झाले. दिवस मावळला. बैल मिरवून रानात परत गेले व त्यानंतर साधारण एक तासाने पाऊस पडायला सुरुवात झाली. मोठा पाऊस! धुंवाधार पाऊस. लोक आनंदाने रस्त्यावर आले. सर्व ओढ्यांना पूर आला होता. व त्यातच खटल्यातून मुक्त झालेले लोक जिल्ह्याच्या गावाहून सुटून आले होते. पूर आलेल्या नदीतून डोक्यावर सामान घेऊन ही सर्व मंडळी रात्री गावात पोहोचली.

गावाच्या वाड्याच्या दृष्टीने एका नकोशा असलेल्या प्रकरणाचा शेवट झाला. याचा सर्वांनाच फार मनस्ताप झाला. या घटनेला, त्या छोट्याशा गावातल्या त्या मानाने मोठ्या घटनेला, अनेक पदर होते. ही घटना काही पक्षीय चिथावणीतून झाली होती का? त्याच्यासाठी तुरुंगात गेलेल्या लोकांना कोणत्या पक्षाचा आधार होता का? वाड्यातल्या लोकांची काही चूक होती का? थोरल्या मालकांना तालुक्याच्या, जिल्ह्याच्या कोणत्याही पुढाऱ्यांनी, कोणत्याही पक्षाच्या पुढाऱ्यांनी त्यात भाग घेऊ नये यासाठी बरीच कसरत करावी लागली! यासाठी प्रसंगी गुन्हेगारांना, त्यांच्या घरच्या लोकांना मदतही करावी लागली. त्यांनी कधीही असे होऊ दिले नाही, की तुरुंगात गेलेले व वाड्यातले लोक हे एकमेकांचे शत्रुत्व असलेले आहेत. या घटनेला पक्षीय संघर्षाचे स्वरूप येऊ नये, म्हणून त्यांनी बरेच प्रयत्न केले. किंवा काही जणांचा आवडता शब्द ‘वर्गसंघर्ष’! त्यांची प्रथमपासूनच अशी धारणा होती की हा गावातला मामला आहे. काही जणांनी सरकारी गोडाऊनवर नेलेल्या मोर्चापासून स्फूर्ती घेऊन हा प्रकार आखला, व दुष्काळामुळे त्रस्त झालेल्या इतरांनी इतर काही उपाय न सुचल्याने त्याला साथ दिली. तो या पातळीवरच हाताळला पाहिजे!

या घटनेचा पक्षीय राजकारणासाठी कोणालाही उपयोग करून घेता आला नाही. याचे श्रेय जाते थोरल्या मालकांचे अनेक पक्षांतील नेत्यांशी असलेले संबंध व त्यांना थोरल्या मालकांविषयी वाटणारा आदरभाव व आपुलकी, यांकडे! आता या घटनेला चाळीस वर्षे उलटली. आताच्यापेक्षा तेव्हा सरकारचे प्रशासन अधिक चांगले होते. पोलिस अधिकारी विशेषतः आयपीएस अधिकारी अधिक निःस्पृह व कर्तव्यदक्ष होते. लोकांना पोलिसांचा थोडातरी धाक होता.

या निमित्ताने अनेक गोष्टी पुढे आल्या. ज्यांच्या मालाला हात लागला नव्हता ते वाड्यातील लोकच पोलिसांना चहापाणी करून आपले ज्याच्याशी किरकोळ कारणावरून वाकडे आलेले आहे, त्यांचे नाव यादीत घालण्याचा आग्रह करत होते. तो माणूस त्या वेळी गावात नव्हता, परगावी होता हे माहीत असून, अशा करण्याने सर्व केसच दुबळी होते, याचेकडे दुर्लक्ष करून!

या घटनेनंतर पोलिसांनी एक चौकी, जिच्यात चार पोलिस होते, ती गावात सहा महिने ठेवली. वाड्यातले लोक त्या पोलिसांच्या जेवणाखाणाची व्यवस्था करत होते.

अशा तऱ्हेने गावाच्या इतिहासातील एक कटु अध्याय कोणाचे फारसे नुकसान न होता संपला! या घटनेतून अनेक गोष्टी पुढे आल्या. दररोज बैठकीत बसणारे लोकसुद्धा एखाद्याच्या चिथावणीने कितीही टोकाची गोष्ट करू शकतात! अनेक मंडळी उत्कृष्ट अभिनयक्षमता असलेली आहेत. पण गावात काही मंडळी विचार करणारी आहेत व त्यांचे गाववाले ऐकतातसुद्धा. अशा त-हेने वागणे सर्वसामान्यांना आवडत नाही. त्यांचा अशा गोष्टींना विरोध असतो. पोलिस व शासन जर खंबीर असेल तर गुन्ह्याचा तपास पूर्णपणे लावला जातो. शाहणे राजकारणी अशा प्रकारच्या गुन्ह्यांत फारसा हस्तक्षेप करत नाहीत.

सुंदरबन, सुर्डीकर बंगला,
अध्यापक कॉलनी, बार्शी, जि.सोलापूर 413 411

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.