प्रमोद सहस्रबुद्धे, बी 4/1101 विकास कॉम्प्लेक्स, कॅसल मिल कम्पाउंड, ठाणे (पश्चिम) 400 607
मेंदू-विज्ञान विशेषांक : एक प्रतिक्रिया
मेंदू-विज्ञान विशेषांक (खरे तर मेंदू-विज्ञान-तत्त्वज्ञान विशेषांक म्हणायला हवे.) हा अंक वाचताना एक उत्सुकता होती. मेंदूविज्ञानातील प्रगती अजूनही तत्त्वज्ञानातील प्रश्न सोडवण्या इतपत झालेली नाही असे माझे एक मत होते. त्यामुळे हे दोन विषय संलग्न नाहीत असे मला वाटत असे. हा अंक वाचताना माझ्या मताविषयी काही मजकूर येऊन माझे मतपरिवर्तन होईल अशी एक शक्यता वाटत होती आणि म्हणून त्याबद्दल उत्सुकता होती.
अंक वाचताना आणि तयार होताना असे जाणवले की संपादकांनी बरीच मेहनत घेऊन अंक तयार केला आहे. कित्येक पुस्तकांची यादी या अंकात सापडते. लेखकांनी ही पस्तके वाचून त्यावर आपले मत प्रदर्शित केले आहे. ही मते कधी पटली नसली तरी ती लिहिताना केलेला व्यासंग भावतो. काही लेख विशेषत: पॅट्रिशिया चर्चलँड यांचा लेखानुवाद, तसाच सुलक्षणा महाजन यांनी स्वैर भाषांतर केलेला लेख ही आवडला. नर्मदा खरे, अभिजित रणदिवे यांचेही लेख आवडले.
विशेषांक म्हटला की विशेष विषयासंबंधी माहितीपूर्ण लेख येणे अपेक्षित असते. माहितीपूर्ण लेखात आशतोष मुळ्ये, मोनल कातरणीकर, दीप्ती गंगावणे, वैजयंती बेलसरे, सुबोध जावडेकर यांचे लेख चांगले वाटले. याशिवाय विषय तत्त्वज्ञान असल्यामुळे तात्त्विक वाद असलेले लेख बहुसंख्येने अपेक्षित होते. त्या लेखातील राजीव सान्यांचा लेख पटला नसला तरी आवडला.
अंकाच्या मांडणी बद्दल थोडेसे. हल्लीच्या मेंदू विज्ञानावर जास्त माहितीपूर्ण आणि स्वतंत्र लेख हवा होता असे वाटले. कुठले नवीन प्रयोग झाले काय निष्कर्ष निघाले हे सांगणारा स्वतंत्र लेख हवा होता. राजीव सान्यांचा लेख खोडणारा लेख हवा होता हे वाटले. तत्त्वज्ञानातील तीन महत्त्वाचे प्रश्न, आत्मा शरीर द्वैत, ज्ञानाचे स्वरूप आणि नीती यावर अजून चांगले वाचावयास मिळायला हवे होते. चर्चलँड यांचा लेव सोडल्यास या प्रश्नांना मनापासून भिडणारे काही वाचायला मिळाले नाही. इतर लेखांत यासंबंधी चर्चा होती पण ती प्रश्नांना न भिडणारी वाटली.
तत्त्वज्ञानाच्या विवेकवादी बैठकीत एक वेळ चिद्वादी (जग भासमान मानणारे) मावू शकतील पण द्वैतींना (आत्मा आणि जग दोन्ही मानणारे) त्यात स्थान नाही. विज्ञानांनी अंगीकारलेली इहवादी भूमिका ही विवेकवादाची खरी बैठक, ही बैठक नसलेले लेख विवेकवादाला वाहिलेल्या मासिकात येऊ शकतात. पण त्याच बरोबर ही विज्ञानवादी भूमिका सोडणारे कुठे चुकले याची चर्चा संपादकांनी करायला हवी. नाहीतर अविवेकवादी विचारांची गाठराखण तर होत नाहीना असे वाटते. अंकात बहुतांशाने विवेकवादी भूमिका मांडली आहे. पण जिथे ती नाही (राजीव साने यांची द्वैती आणि मीनल कातरणीकर यांची चैतन्याबाबतची) तिथे प्रतिवाद मांडलेला दिसत नाही.
संपादकीय
संपादकीयात हे वाक्य आहे – ‘मनाचे उद्देश हे मडक्याच्या पोकळीसारखे अमूर्त असतात … पण ते शरीर व्यवस्थेचा भौतिक भाग नसतात.’ हा विचार इहवादी नसून देकार्तच्या द्वैतासारखा (आत्मा-शरीर) आहे. मनाला (देकार्तच्या आत्म्याला) भौतिक अस्तित्व नसते असे देकार्तचे मत आहे. देकार्तचे द्वैत हे अर्थातच विवेकी विचारात वा मेंदूविज्ञानात मोडत नाही. मनाच्या उद्देशांना (संपादकांच्या मताप्रमाणे आकलन आणि अनुमान) मेंदूत भौतिक (जड) स्थान नसते. या विचारात साम्य आहे. मनाच्या (खरेतर मेंदूच्या) या आकलन अनुमान या क्रिया कदाचित मनात सॉफ्टवेयर प्रमाणे असतील. पण हे सॉफ्टवेयर पोकळीसारखे अमूर्त वा अजड नाही तर मेंदूच्या रचनेत आणि साठविलेल्या माहितीत (जी देखील जडस्वरूपात आहे.) दडलेली आहे. अशावेळी मनाच्या उद्देशांना अजड मानणे हे मन/आत्मा अजड म्हणण्याइतके अविवेकी नसले तरी अविवेकीच आहे.
राजीव साने
राजीव साने ह्यांचा लेख याच प्रकाराची एक प्रकारे री ओढतो. आपण मेंदूचे गुलाम नव्हे या शीर्षकातून आपण आणि आपला मेंदू असे एक द्वैत आहे असे मांडले जाते. त्यांच्या लेखातून जे द्वैत प्रगट झाले आहे ते देकार्तचे द्वैत नसावे. पण देकार्तच्या द्वैताला त्यात खोडलेही गेलेले नाही. लिबेट इत्यादींच्या संशोधनाच्या अर्थावर जे आक्षेप घेतले आहेत ते मान्य करण्यासारखे आहेत. या संशोधनाने फ्री-विल संकल्पना खोटी पडते आहे असा दावा करणारे चुकीचे आहेत. पण याच संशोधनातून ती सिद्धही होत नाही. राजीव साने ‘मी आणि माझा मेंदू’ हे वेगवेगळे आहेत असे धरतात. अशा परॉडॉक्सिकल गृहीतकाने केलेल्या सिद्धतेत परॉडॉक्स येऊ शकतो. या लेखाचा उद्देश कॉम्पटिबलिस्ट विचारसरणी सांगण्याचा दिसतो. कॉम्पटिबिलिटीवरील टीकात्मक लेख (विकीवरील वाचला तरी चालेल) वाचता येतात. हा लेख अध्यात्मवादी नसला तरी तो एकाच संवेगाने (मोमेंटमने) सोडलेले तोफगोळे हे दोन मार्गानी जाऊ शकतात हे त्यांचे म्हणणे चुकीचे आहे. एकाच अंतरावर, एकाच गतीने तोफगोळे मारायचे असतील तर ते दोन संवेगाने पाठवता येतात (कोन 45 अंशाचा नसल्यास जमीन सपाट असल्यास वगैरे गोष्टी गृहीत धरल्यावर.). कारण संवेग शोधायचे समीकरण क्वाड्रेटिक आहे. एकदा संवेग (म्हणजे दिशा+गती) ठरली की मार्गानुक्रमण तेच राहते (हवेशी संबंध सोडल्यास.) विज्ञानात ज्या गोष्टी शक्याशक्यतेवरून ठरतात त्याचे हे उदाहरण नाही. शक्याशक्यतेने देखील फ्री विलचा तिढा सुटत नाही. कारण मेंदूत अशा क्रिया होत असतील तर परिणाम हे रँडम व्हायला हवेत. अशा रँडम परिणामांनी होत असलेल्या गोष्टींची जबाबदारी ‘मी’ वर येत नाही.
आनंद जोशी
आनंद जोशी यांचे संपादकीय धरून तीन लेख आणि त्यातील संकल्पनाविशेष यावर विस्ताराने लिहीत आहे. मेंदूविज्ञान… सीमारेषा हा लेख तत्त्वज्ञानाकडे काही नवीन दृष्टीने पाहतो. पण हे पाहत असताना कित्येक वाक्ये आणि संकल्पना खटकतात.
मेंदू शिवाय आकाराला, घातला अस्तित्व नाही, असा मेंदूच्या जैवविद्ध्यान्नात सिद्ध्यंत आहे हे वाक्य आश्चर्यकारक आहे. कदाचित चिद्वादी घाटाला आणि आकाराला मिथ्या म्हणू शकतील. पण इहवादाची (रिलिज्म) कास धरलेले विज्ञान तसे म्हणते हे नवलाचे वाटले. अशा वाक्याचा वा सिद्धान्ताचा संदर्भ मिळेल का?
आपल्याला निसर्गाने दृष्टी कशासाठी दिली आहे? आपण बघतो कशासाठी? ज्ञान मिळविण्यासाठी हे प्रश्न (सीमारेषा) आणि त्याला दिलेले उत्तर दोन्ही विज्ञानाच्या चौकटीत बसत नाहीत. ज्ञान मिळविण्यासाठी आपण अतिनील किरणे, क्ष किरणे वा इतर एलेक्ट्रोमाग्नेतिक प्रकार कस बघत नाही? निसर्ग लाही उद्देशाने कार्यरत आहे का?
आरामखुर्ची आणि प्रयोगशाळा हा लेख काही पुस्तकांवर आधारित आहे असे दिसते. या लेखाच्या पहिल्या भागात पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाची एक ओळख करून दिली आहे. पण ती पुरेशी नाही आणि आसुच्या विवेकी धोरणास शोभणारी नाही. फिलॉसॉफीस्ट (पाश्चात्त्य तत्त्वज्ञानी) हे आरामखुर्चीत बसून मनातल्या मनात प्रयोग करतात आणि अंत:प्रेरणेने त्याचा निर्णय घेतात असा काहीसा आक्षेप ते घेतात. हे कठले प्रयोग की ज्याचा निष्कर्ष अंत:प्रेरणेने (इंट्युशन) घेतले आहेत. आणि ते कुठल्या नियतकालिकात प्रसिद्ध केले आहेत हे मात्र सांगितले नाही. पुढील भागात असेच प्रयोग विज्ञानात होतात असे नमूद केले आहे. या विवेचनात एक महत्त्वाची चूक आहे. ती म्हणजे असे मनातले प्रयोग (गेडांकेन एक्सपिरिमेंटस) हे अंतर्विरोध शोधण्यासाठी केले जातात. मात्र त्यांचा निष्कर्ष कधीच इंट्युशनने काढला जात नाही. (काढला गेला तर त्यास मान्यता नसते.) तर तो पूर्णपणे तर्काने (लॉजिक) घेतला जातो. कधी कधी त्यात आकडेमोड असू शकते. या विवेचनातील इंट्युशन शब्दाने फिलॉसॉफीवर चुकीचा आरोप झाला आहे. याच लेखाच्या पुढील भागात विचारप्रयोगांचे महत्त्व लेखकाने सांगितले आहे आणि ते पटण्यासारखे आहे.
विश्लेषणात्मक पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाची (त्यांच्या भाषेत फिलॉसॉफी) पद्धत काय आहे? (ले. आरामखुर्ची) श्रद्धा मूल्ये, कर्मकांडे, परंपरा यांचे कूळ आणि मूळ शोधणे आणि त्यातून ज्ञानाची निर्मिती करणे संस्कृती आणि इतिहास यातून फिलॉसॉफीचा उगम झाला आहे. ही वाक्ये शिथिल आहेत शिवाय गर्भितार्थाने चुकीची आहेत. विवेकवादी विचारपद्धती कर्मकांडे, परंपरा यांचा विचारही करत नसावीत.
अॅनलिटिकल फिलॉसॉफी नावाने संबोधली गेलेली फिलॉसॉफी हे करते का? ही तिची पद्धत आहे का? सर्वसाधारणपणे लॉजिकल पॉजिटिविज्म हा ज्या तत्त्वज्ञानाचा गाभा आहे, अशी विवेकवादी विचारपद्धती म्हणजे नलिटिकल फिलॉसॉफी (संदर्भ विकी). हे तत्त्वज्ञान परंपरांचा, कर्मकांडांचा शोध घेते हे म्हणणे बरेच धाडसी ठरेल. या तत्त्वज्ञानानुसार श्रद्धा झूठ आहे मग तिचा शोध कशासाठी? हे काम इतिहासकारांचे, समाजशास्त्रज्ञांचे. विज्ञानावर विश्लेषणात्मक लिहिणे (पॉपर), गणिताचे विश्लेषण करणे (रसेल), ज्ञानशास्त्रातील विचारपद्धतींचा ऊहापोह करणे (एपिस्टेमॉलॉजी), नीतिशास्त्र, सौंदर्यशास्त्र या फिलॉसॉफीच्या प्रमुख विभागांत कर्मकांडे आणि परंपरा कशी बसणार?
सुबोध जावडेकर
सुबोध जावडेकरांनी लिहिलेल्या लेखात (मेंदू-विज्ञान लिहीत आहे उद्याचे नीतिशतक) अशाच पद्धतीची मौज आहे. मेंदूनीतिशास्त्र हे त्यांनी लिहिल्याप्रमाणे मेंदूविज्ञान वापरताना येणाऱ्या नीतिप्रश्नांशी संबंधित आहे. हे नीतिप्रश्न गंभीर आहेत. तरी तत्त्वज्ञानातील प्रश्न म्हणजे नीतिनियमांची उपज कशी होते या प्रश्नाशी निगडित नाही. जर मेंदूविज्ञानाने या प्रश्नाची उकल करण्यास मदत केली असती तर मेंदू-विज्ञान शिकून उद्याचे नीतिशतक लिहिता येईल; पण लेखात या संबंधी काहीही नाही. बेशुद्धावस्थेतील रुग्णाच्या प्रतिसादानुसार त्या रोग्याची उपचारपद्धती बदलता येते का? त्याच्या प्रतिसादानुसार त्यास दयामरण देता येऊ शकेल का? अभ्यासात गती आणणाऱ्या औषधांना परवानगी द्यावी का? बुद्धिमत्ता सुधारणारी औषधे द्यावीत का? दुसऱ्याच माणसात प्रेमभावना जागृत करणारे औषध त्यास नकळत (फवारणी वा अत्तराच्या स्वरूपात) द्यावे का? हे प्रश्न उद्याचे नीतिशतक लिहिण्यास कुचकामी आहेत. हे प्रश्न व्यवसायनीतीत शोभून दिसतील. व्यवसाय-नीती ही समाजनीतीचा एक छोटा भाग आहे. यातील कित्येक प्रश्न हे इतर क्षेत्रांत पूर्वीच चर्चिले गेले आहेत. उदा. शरीरप्रकृती सुधारण्यासाठी स्टिरॉइडस द्यावीत का, दयामरण हा हक्क असावा का?, रुग्णापासून रोग लपवावा का?, जीप उघडी आहे हे सांगावे का? समाजनीती कशी आली (ज्यावर दि.य.देशपांड्यांचे अतिशय उत्तम लेख आसु मध्ये येऊन गेले आहेत.) यावर मेंदूविज्ञानास काहीच म्हणायचे नाही असे लेखावरून वाटले.
पॅट्रिशिया चर्चलँड
मेंदूविज्ञान हे खूप प्रगती करीत आहे त्यामुळे तत्त्वज्ञानक्षेत्रातील प्रश्नांवर त्याचा परिणाम झाला आहे. असा दावा संपादक करतात. हा परिणाम कुठला याची चुणूक पॅट्रिशिया चर्चलँड यांच्या लेखात येते. मेंदूतील रसायनांनी प्राणिमात्रांचा नीतिमूल्यात्मक दर्जा बदलतो हे प्रयोगाने सिद्ध झाले आहे. त्यामुळे नीतिपूर्ण वागणुकीत रसायनांचा हात असतो, मुक्त इच्छेचा नसतो. तत्त्वज्ञानातील मुक्त इच्छेचा वाद यामुळे संपुष्टात येतो असे हे विवेचन आहे. या विवेचनातील मुख्य दोष म्हणजे हे पूर्वी माहीत नव्हते आणि हल्लीच्या प्रयोगांनी माहीत झाले असे म्हणणे आहे. दारू पिऊन वा इतर अमली पदार्थ घेऊन मानवी नीतिमूल्यात फरक पडत असतो आणि हे पूर्वापार माहीत होतेच. त्याचबरोबर कल्पितांमध्ये वश करणारी विद्या औषधे, संमोहनाने ताब्यात घेऊन अशा गोष्टींनी माणसाच्या इच्छा बदलता येतात असा समज देखील पूर्वीपासूनचा आहे. त्यात काही अधिक रसायनांची भर पडली. मुक्त इच्छेचा प्रश्न जर पूर्वीच्या रसायनांनी सुटला नाही तर नवीन रसायनांनी कसा सुटेल?
एकंदर अंकात मेंदूविज्ञान क्षेत्रातील लोकप्रिय वादांचा वापर केलेला दिसतो. त्यामुळे त्यातील अधिकृत भूमिकांचा परिचय फारसा होत नाही. लोकप्रिय पुस्तकात रंजक विधाने केली जातात. (उदा. मनात काय चालले आहे हे कळणारे यंत्र निघत आहे.) ही विधाने म्हणजे चालू असलेल्या प्रयोगांमध्ये अती वाढवून थापेबाजी करणे. अशा विधानांवर अधिकृत मत जाणून घेणे गरजेचे असते. अंकातील काही लेखक अशा विधानांना बळी पडलेले दिसतात. आशुतोष मुळे यांच्या पहिल्या लेखात मेंदू शब्दाबद्दलची जी उदाहरणे आहेत ती वैद्यकक्षेत्रातील आहेत. त्यांना तत्त्वज्ञानक्षेत्रात मानायचे प्रयोजन नाही. लेख माहितीपूर्ण आणि उचित आहे.
एखाद्या नवीन विषयावर लिहिताना आणि अधिकृतरीत्या काम करणाऱ्याचा सहभाग नसताना असा अंक तयार करणे हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. ते अतिथी संपादकांनी घेतले याबद्दल ते कौतुकास प्राप्त आहेत. अंक तयार करताना अनेक पुस्तके वाचली गेलेली आहेत. अशा रीतीने अंकात अभ्यासाचा अभाव आढळत नाही. चुकातून धडपड करत शिकणे ही विज्ञानाची एकरीत आहे. याच रितीनुसार असे पाऊल उचलले याबद्दल संपादकद्वयांचे आभार.
संपादकीय खुलासा
[श्री प्रमोद सहस्रबुद्धे यांनी आजचा सुधारक च्या मेंदूविज्ञान व तत्त्वज्ञान विशेषांकावर सविस्तर पत्र लिहिले आहे. अंक बारकाईने वाचून त्यावर विस्तृत विवेचन दिल्याबद्दल आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभारी आहोत. पत्राचा पुष्कळसा भाग या अंकात त्यांना काय आवडले, काय आवडले नाही, त्यांच्या काय अपेक्षा होत्या, त्या कितपत पुऱ्या झाल्या, आणखी काय काय हवे होते, काय पटले, काय पटले नाही, वगैरे तपशिलाने व्यापला आहे. अमुक गोष्ट पुरेशा विस्ताराने व खुलासेवार आलेली नाही, तमुक गोष्ट आजचा सुधारक च्या धोरणास साजेशी नाही, अमुक इथे अप्रस्तुत आहे, तमुक कुचकामी आहे, अशी मतेही व्यक्त केलेली आहेत. ही त्यांची वैयक्तिक मते आहेत. त्या सर्वांबद्दल आम्हाला काही म्हणायचे नाही. सहस्रबुद्धे यांच्या प्रामाणिक व परखड मतांचा (आणि प्रतिकूल शेऱ्यांचाही) आम्ही आदर करतो. फक्त ज्या गोष्टींबद्दल त्यांनी आक्षेप नोंदवून त्याचे स्पष्टीकरण संपादकांनी करावे अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे, अशा गोष्टींचा खुलासा खाली देत आहोत. ]
श्री सहस्रबुद्धे म्हणतात, विज्ञानवादी भूमिका सोडणारे कुठे चुकले याची चर्चा संपादकांनी करायला हवी. नाहीतर अविवेकवादी विचारांची पाठराखण तर होत नाही ना असे वाटते. अंकात बहुतांशाने विवेकवादी भूमिका मांडली आहे. पण जिथे ती नाही (राजीव साने यांची द्वैती आणि मीनल कातरणीकर यांची चैतन्याबाबतची) तिथे प्रतिवाद मांडलेला दिसत नाही.
कुठल्याच विचारांची पाठराखण करण्यासाठी किंवा कुठल्याही विचारांचा प्रतिवाद करण्यासाठी या विशेषांकाचे संपादकत्व आम्ही स्वीकारलेले नाही. मतांचे खंडन मंडन करणे हा या विशेषांकाचा उद्देशच नाही. तत्त्वज्ञान व मेंदूविज्ञान यांच्या सीमारेषा एकमेकांत कश्या मिसळत आहेत, या दोन ज्ञानशाखांचा प्रभाव एकदुसऱ्यावर कसा पडत आहे आणि भविष्यात पडणार आहे, ते दाखवणे येवढेच उद्दिष्ट हा अंक काढण्यामागे आम्ही ठेवले होते. ते पुरे करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न आम्ही केला आहे.
‘मनाचे हे उद्देश मडक्याच्या पोकळीसारखे अमूर्त असतात. ते शरीरव्यवस्थेचे भौतिक भाग नसतात’, असे वाक्य संपादकीयात आहे. ते उद्धृत करून ‘मनाच्या उद्देशांना अजड मानणे हे मन/आत्मा अजड मानण्याइतके अविवेकी नसले तरी अविवेकीच आहे’, असे श्री सहस्रबुद्धे म्हणतात.
वैचारिक लेखनाच्या प्रत्येक परिच्छेदात काही कळीचे शब्द असतात आणि संदर्भाचा ओघ असतो. विविध संस्कृतीमधील माणूस हजारो वर्षे शरीर व मन याबद्दल विचार करत आला आहे, हे सांगण्यासाठी मडक्याचा दृष्टान्त दिलेला आहे. ‘कॉन्स्टीट्युटीव अॅबसेन्स’, ‘हजारो वर्षे’, ‘संस्कृती’ हे या परिच्छेदातील कळीचे शब्द आहेत. सुजाण वाचक हे शब्द लक्षात घेत, संदर्भाचा ओघ पाहात, वाचत असल्यामुळे त्यांचा गैरसमज होणार नाही असे आम्हाला वाटते. ज्ञान हे कोणत्याही वादात बांधलेले नसते. ‘विज्ञानवाद’, ‘विवेकवाद’ ही मानवाने विचारांचे वर्गीकरण करण्यासाठी तयार केलेली सुलभता आहे. जेव्हा विज्ञान ही आधुनिक संकल्पना अस्तित्वात नव्हती तेव्हासुद्धा माणूस साकल्याने सूक्ष्म विचार करत होता, हे महत्त्वाचे. विज्ञानवादी, विवेकवादी माणसे फक्त आम्हीच तर्कशुद्ध विचार करून ज्ञानाची निर्मिती करतो, असे कधीच मानणार नाहीत.
मेंदूशिवाय आकाराला, घाटाला अस्तित्व नाही असा मेंदूच्या जैवविज्ञानात सिद्धान्त आहे.’ असे जे वाक्य आनंद जोशींच्या लेखात आहे ते आश्चर्यकारक आहे असे श्री सहस्रबुद्धे म्हणतात. या वाक्याचा संदर्भ त्यांना हवा आहे. हे वाक्य सेमिर झेकी (Semir Zeki) यांचे आहे. ते न्युरोबायॉलॉजी व कॉग्नीटिव्ह न्युरॉलॉजीचे युनिवर्सिटी कॉलेज लंडन येथे प्राध्यापक आहेत. ‘आर्ट अँड द ब्रेन’ या डिडॉलस (daedalus, Spring) मधील निबंधात त्यांनी हे विधान केले आहे. हा निबंध खालील दुव्यावर उपलब्ध आहे.
http://www.vislab.ucl.ac.uk/pdf/daedalus.pdf ‘ए विजन ऑफ द ब्रेन’ या पुस्तकात त्यांनी विजनची न्युरोबायॉलॉजी दिली आहे. (A Vision of the Brain (1993 – Blackwell, Oxford)).
‘आपल्याला निसर्गाने दृष्टी कशासाठी दिली आहे?’ ‘आपण बघतो कशासाठी?’ ज्ञान मिळविण्यासाठी’ हे प्रश्न आणि त्याला दिलेले उत्तर दोन्ही विज्ञानाच्या चौकटीत बसत नाहीत. असे श्री सहस्रबुद्धे यांचे म्हणणे आहे. ज्ञान मिळवण्यासाठी आपण अतिनील किरणे, क्ष किरणे, वा इतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक प्रकार का बघत नाही? निसर्ग काही उद्देशाने कार्यरत आहे का? असे श्री सहस्रबुद्धे विचारतात. जेव्हा माणूस समोर पाखरू, दगड पाहतो तेव्हा ती नुसती माहिती नसून ते ज्ञान असते. ते ज्ञान दृष्टीमार्फत मिळालेले असते. ते ‘ज्ञान’ का असते यावर एक निबंध लिहिता येईल. ‘मेंदूतील माणूस’ ह्या आमच्या पुस्तकात ‘दृष्टिसंवेदन व दृष्टिबोध’ या प्रकरणात याचा थोडाबहुत ऊहापोह करण्यात आला आहे. माहिती वा ज्ञान यातील सूक्ष्म फरक वाचकाने समजून घ्यायला हवा. ज्ञान म्हणजे काहीतरी जडजंबाळ, शाब्दिक असते असा बऱ्याच जणांचा समज असतो. ज्ञान मिळवणे हे प्राण्याला तगून राहण्यासाठी जरुरीचे असते आणि तोच निसर्गाचा उद्देश असतो.
‘आरामखुर्ची व प्रयोगशाळा’ हा लेख काही पुस्तकांवर आधारित आहे असे दिसते, हे श्री सहस्रबुद्धे यांचे विधान बरोबर आहे. लेखाचा प्रमुख आधार ‘इंट्युशन इमॅजिनेशन अँड फिलॉसॉफिकल मेथॉडॉलॉजी’ हे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने प्रकाशित केलेले पुस्तक आहे. (त्याचे नाव त्या लेखात आहे.) ते पुस्तक तमारा झंबो जेन्डलर यांनी लिहिलेले आहे. या पुस्तकाच्या लेखकाबद्दल, तसेच त्यांच्या पुस्तकाबद्दल लेखात लिहिले आहे. बोधनविज्ञानाच्या प्रायोगिक पद्धती व फिलॉसॉफीच्या पारंपरिक पद्धती या एकमेकांना समृद्ध करणाऱ्या आहेत असे गृहीतक त्यांनी त्यांच्या पुस्तकात मांडले आहे, हेही लेखात दिले आहे.
शरीरप्रकृती सुधारण्यासाठी स्टिरॉइडस द्यावीत का?, रुग्णापासून रोग लपवावा का?, यातील कित्येक प्रश्न हे इतर क्षेत्रात पूर्वीच चर्चिले गेले आहे. असे श्री सहस्रबुद्धे म्हणतात.
खरे आहे. श्री रणदिव्यांनी उल्लेख केलेल्या प्रश्नांपैकी कित्येक प्रश्न आधीच चर्चिले गेले आहेत, ही गोष्ट अर्थातच बरोबर आहे. पण हे प्रश्न नव्याने समोर आले आहेत, मेंदूविज्ञानामुळे निर्माण झाले आहेत, असा दावा लेखात केलेला नाही. लेखात “असे नैतिक प्रश्न जीवशास्त्रामध्ये किंवा वैद्यकीय उभे राहतात. याहीपेक्षा कितीतरी अडचणीचे प्रश्न उद्या मेंदूविज्ञानाच्या संदर्भात उभे ठाकणार आहेत” असे स्पष्टच म्हटले आहे. मेंदूविज्ञानामुळे समोर ठाकलेले प्रश्न कोणते त्याची चर्चाही लेखात आहे.
एकंदर अंकात मेंदूविज्ञान क्षेत्रातील लोकप्रिय वाङ्मयाचा वापर केलेला दिसतो. त्यामुळे त्यातील अधिकृत भूमिकांचा परिचय फारसा होत नाही. लोकप्रिय पुस्तकात रंजक विधाने केली जातात. (उदा. मनात काय चालले आहे हे कळणारे यंत्र निघत आहे.) ही विधाने म्हणजे चालू असलेल्या प्रयोगांमध्ये अती वाढवून थापेबाजी करणे. असे श्री सहस्रबुद्धे म्हणतात.
संपादकांनी ‘ओरिजिनल’ संदर्भ लेखनासाठी घेतले आहेत. ‘पॉप्युलर सायन्स’ या स्वरूपाची पुस्तके वाचून हा अंक तयार केलेला नाही. उदाहरणार्थ, मनात काय चालले आहे ते वाचणारी यंत्रे भविष्यात निघतील हे विधान म्हणजे चालू असलेल्या प्रयोगामध्ये अती वाढवून केलेली थापेबाजी आहे असे श्री सहस्रबुद्धे यांना वाटते. या विषयावर अनेक युनिव्हर्सिटीजमध्ये संशोधन होत असून गेल्या तीनचार वर्षांत प्रसिद्ध झालेले प्रयोगाचे निष्कर्ष पुढीलप्रमाणे आहेत. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीत 2008 साली झालेल्या प्रयोगात माणूस कुठल्या गोष्टीकडे बघत आहे (खुर्ची, घोडा की एखादी व्यक्ती) हे त्याच्या मनातले वाचण्यात शास्त्रज्ञांना यश आले. तेथेच नंतर झालेल्या प्रयोगात काहीजणांना रोजच्या व्यवहारातल्या काही घटना दाखवून त्या नंतर आठवण्यास सांगण्यात आले. तो कोणती घटना आठवत आहे ते त्याच्या मेंदूचा वेध घेऊन शास्त्रज्ञांना यश आले. मॅक्स प्लॅन्क इन्स्टिट्यूमध्ये झालेल्या प्रयोगात भाग घेणारा दोन आकड्यांची बेरीज करत आहे की वजाबाकी ते शास्त्रज्ञांना समजू शकले. त्याच्या पुढील वर्षी कॅलिफोर्निया व रूटगर युनिव्हर्सिटीत झालेल्या प्रयोगात एखादा शब्द वाचून तो मोठ्याने उच्चारणे, एक शब्द सांगितल्यावर त्याच्याशी जुळणारा दुसरा शब्द सांगणे, निरनिराळे स्वर ऐकून ते किती आहेत ते मोजणे, आदेश मिळाल्याप्रमाणे हाताची तशी हालचाल करणे, आर्थिक निर्णय घेणे, अश्यासारखी आठ कामे निवडण्यात आली. ती करत असताना 130 लोकांच्या मेंदूचा स्कॅन करण्यात आला. त्यातल्या 129 व्यक्तीच्या मेंदूतल्या विशिष्ट काम करताना उजळल्या जाणाऱ्या मज्जापेशींचा पॅटर्न कसा आहे हे बघून अमुक कामासाठी अमुक पॅटर्न असा ठोकताळा बनवण्यात आला. मग 130 व्या व्यक्तीच्या मेंदूत उजळलेल्या मज्जापेशींचा पॅटर्नच केवळ पाहून ती व्यक्ती आठपैकी काय मनातल्या मनात करत असावी त्याचा अंदाज करायला एकाला सांगण्यात आले. पाचपैकी चार वेळा त्याचा हा अंदाज बरोबर ठरला. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीत 2010 साली केलेल्या प्रयोगात याच्याही पुढची पायरी गाठण्यात आली. त्या वर्षीच्या उन्हाळ्यात येणाऱ्या काही दिवसांत सूर्यप्रकाश तीव्र होणार असल्याने लोकांनी उन्हात जाताना गॉगल्स लावावेत अशी सूचना कॅलिफोर्नियाचे हवामानखाते सतत देत होते. त्यावेळी हा प्रयोग हाती घेण्यात आला होता. वीसजणांना पुढील आठवड्यात तुम्ही खरोखरच गॉगल्स वापराल का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यांची उत्तरे नोंदवून ठेवण्यात आली. उत्तरे देताना त्यांच्या मेंदूचा स्कॅन केला जात होता. त्यावरून ते प्रत्यक्षात गॉगल्स वापरतील की नाही त्याचे अनुमान करण्यात आले. आश्चर्य म्हणजे मेंदूतज्ज्ञांनी बांधलेला हा अंदाज लोकांनी स्वतः दिलेल्या उत्तरांपेक्षा प्रत्यक्षात जास्त अचूक ठरला.
वर्षभरापूर्वी म्हणजे सप्टेंबर 2011 मध्ये जॅक गॅलंट (Jack Gallant) या मेंदूशास्त्रज्ञाने तर एखादा प्रसंग बघताना माणसाच्या मनात उमटणाऱ्या प्रतिमांचे चलच्चित्रणच तयार केले. त्यासाठी त्याने काहीजणांना यू-ट्यूबवरचे हजारो व्हीडीओज् पहायला लावले. पाहताना त्यांच्या मेंदूचा स्कॅन करून क्षणोक्षणी त्यांच्या मेंदूत काय होते आहे ते नोंदवून ठेवण्यात आले. नंतर त्यांना दोन नवीन व्हीडीओज् दाखवून ते पाहताना त्यांच्या मेंदूत उजळणाऱ्या मेंदूपेशींचा पॅटर्न आणि आधी प्रत्यक्ष व्हीडीओज् पाहताना उजळलेल्या मेंदूपेशींचा पॅटर्न यांची तुलना करून संगणकाच्या साहाय्याने दोन चित्रफिती बनवण्यात आल्या. त्याकरता त्या पॅटर्नशी जुळणारे रंग, आकार, चित्रफितीतल्या पात्रांच्या हालचाली, अशी एक एक गोष्ट आधी बघितलेल्या वेगवेगळ्या व्हीडीओजमधून उचलली होती. संगणकाने बनवलेल्या या दोन चित्रफितींतल्या पात्रांचे चेहरे मूळ चित्रफितींपेक्षा पूर्णपणे वेगळे होते. पण ते सोडले तर त्यातले रंग, आकार व बऱ्याचशा हालचाली “दाखवण्यात आलेल्या मूळ चित्रफितीसारख्याच होत्या. चित्रचौकटीतल्या रचनेत तर विलक्षण साम्य होते! मूळ व्हीडीओ व बनवलेल्या या चित्रफिती इंटरनेटवरील
तो वाचला तर लेखात दिलेली माहिती ही थापेबाजी नाही हे तर दिसून येईलच पण उद्याच्या काळात एखाद्या व्यक्तीच्या मनातले विचार जाणून घेता येतील या अनुमानाला बळकटी मिळेल.
चुकांतून धडपड करत शिकणे ही विज्ञानाची रीत पाळल्याबद्दल श्री सहस्रबुद्धे यांनी त्यांच्या पत्राच्या शेवटी आमचे कौतुक केले आहे. त्याबद्दल आभार.
– डॉ. आनंद जोशी, सुबोध जावडेकर