ही स्त्री कोण? (भाग-3) धर्म आणि बाईजात

‘धर्म आणि धर्मजात’ या शब्दप्रयोगात उघडपणे दोन शब्द किंवा संकल्पना आहेत, असे दिसते. पहिली धर्म आणि दुसरी बाईजात. आता शब्द दोनच असले तरी संकल्पना चार आहेत. धर्म, बाई आणि जात अशा मूळ तीन परस्पर भिन्न सट्या अलग करता येणाऱ्या संकल्पना आणि ‘बाईजात’ ही चौथी संमिश्र संकल्पना.
बाईजात’ ही एकच एक संकल्पना नाही. तिच्यात बाई आणि जात अशा दोन भिन्न संकल्पना दडलेल्या आहेत. म्हणजे तीन सुट्या संकल्पना आणि एक संमिश्र संकल्पना, अशा चार संकल्पना मिळून ‘धर्म आणि बाईजात’ दोन संकल्पनांचे शीर्षक बनते.
मागील दोन लेखांकात आपण ‘बाई’ ही बहुभाषिक संकल्पना आणि स्त्रीवाद यांचा व्युत्पत्तिदर्शक अर्थ पाहिला. आता ‘धर्म’ ही संकल्पना आणि धर्म ही संस्थात्मक रचना ‘बाईजात’ या नावाची जात कशी अस्तित्वात आणते, ते पाहू. विशेषतः भारतीय धर्म, म्हणजे मुख्यतः वैदिक हिंदू धर्म ‘बाईजात’ या नावाजी जात तयार करतो. हीच संकल्पना सर्वसाधारण व्यवहारात ‘बाईजात’ या नावाने अमल गाजवते. उदाहरणार्थ, बाईच्या जातीला हे शोभत नाही, ते शोभते इत्यादी. या शब्दप्रयोगात ब्राह्मण, मराठा, माळी, राजपूत, लिंगायत इत्यादी हजारो जातींप्रमाणे बाईजात या नावाची जणू काही स्वतंत्र जात असावी, असे गृहीत धरले जाते आणि कोणत्याही जातिवर्णाच्या धर्माच्या प्रदेशाच्या बाईने बाईजातीनुसारच वागावे, बाईजातीत्व टिकवून ठेवावे, असा आग्रह धरला जातो.
संस्कृती कोणतीही असली आणि धर्म कोणताही असला तरी हा आग्रह मात्र सर्वांमध्ये आढळतो. त्यामुळे संक्षेपात संस्कृति’चाही संकल्पनात्मक अर्थ पाहू.
माणसाने संस्कृती निर्माण केली, असा माणसाचा (म्हणजे आपला) दावा असतो. आता, मानवी संस्कृतीचे स्वरूप इतके संमिश्र व जटील आहे की तिची व्याख्या करणे कठीण आहे. तिचा आशय अतिशय भरीव, व्यापक आणि सतत विकसित होत जाणारा असल्याने ती सततची परिवर्तनशील घटना आहे. माणसाने आतापर्यंत केलेली सुधारणा किंवा प्रगतीचा आज गाठलेला टप्पा हासुद्धा संस्कृतीचाच हिस्सा असतो. साधारणतः आत्मविकास (कल्चर), समृद्धी (सिव्हिलायझेशन) आणि सर्वहितकारक सामाजिक न्याय या तीन गोष्टींचा प्रमुख्याने समावेश संस्कृती या संकल्पनेत होतो, असे म्हणता येईल.
आता, माणूस म्हणजे काय? याचे उत्तर गुंतागुंतीचे आहे. कारण असे की ‘माणूस’ ही शब्दरचना आणि प्रत्यक्ष माणूस’ ही ज्ञानाची वस्तू’ असे काहीही वास्तव वस्तुतथ्य नसते. शब्दाचा अर्थ स्पष्ट करताना साधारणतः तो शब्द ज्याच्याशी जोडला गेला आहे, ती वस्तू दाखविली जाते.(1) असा संबंध दाखविता येणे म्हणजे एकास एक संबंध स्पष्ट करणे. वेगळ्या अर्थाने एखादा शब्द आणि तो शब्द स्पष्ट करणारी प्रत्यक्षातील अनुभवाला येणारी वस्तू यांचा संबंध दाखविता येणे. जसे सागवानी नक्षीदार खुची हा शब्द आणि त्या शब्दाशी जोडलेली प्रत्यक्ष ‘खुर्ची’ नावाची वस्तू दाखविता येणे.
असा संबंध माणूस व प्रत्यक्ष माणूस यांच्यात नसतो. ‘माणूस’ हा शब्द आणि त्या शब्दाशी जोडलेली प्रत्यक्षातील ‘माणूस’ नावाची वस्तू किंवा प्राणी, असे स्वतंत्र अस्तित्व दाखविता येत नाही. माणूस दाखवावयाचा झाला तर कोणीतरी पुरुष अथवा स्त्री यांचाच निर्देश करावा लागतो. कारण केवळ माणूस असे काही स्वयंभू अस्तित्व उपलब्ध नसते.
असे का घडते? कारण, माणूस ही संमिश्र संकल्पना आहे. या संकल्पनेचे दोन भाग आहेत : स्त्रीत्व आणि पुरुषत्व. या दोन्हींना मिळून माणूस ही संकल्पना उभयान्वयी बनते. माणसाची ही दुपेडी संकल्पनाच स्त्री आणि पुरुषातील संघर्षाचे कारण बनते.(2) यह थोडक्यात, माणूस या संकल्पनेतील स्त्री व पुरुष या संकल्पनांना अलग करता येत नाही, पण प्रत्यक्षात अलग असल्याचे दाखविता येतात. त्यामुळे माणसाने संस्कृती विकसित केली अथवा संस्कृतीची निर्मिती माणसाने केली, असे म्हणताना या दोघांनी मिळून ती केली आहे, असे म्हणणे योग्य ठरते. ही निर्मिती मुख्यतः निसर्गाशी झगडा करूनच झाली.
आता, या झगड्याचेही स्वरूप दुहेरी आहे. एका पातळीवर मानव विरुद्ध निसर्ग आणि दुसऱ्या पातळीवर मानव विरुद्ध मानव. त्यातही प्रथम स्त्री विरुद्ध पुरुष आणि नंतर एक पुरुष विरुद्ध दुसरा पुरुष (किंवा गट) यांचाही परस्पर संघर्ष झाला. स्त्री विरुद्ध पुरुष युद्धात स्त्री हारली. पुरुष जिंकला. म्हणजे स्त्रीप्रधानता मागे पडली, पुरुषप्रधानता जिंकली. सर्व त-हेची सत्ता पुरुषाने काबीज केली. त्यात ज्ञानाची सत्तासुद्धा त्यानेच हातात घेतली. चिंतन, मनन, लेखन इत्यादीवरही पुरुषाचीच मालकी निर्माण झाली.
परिणामी इतिहास लिहिला गेला तो मुख्यतः पुरुषाकडूनच.त्याने या लेखनकलेचा व्यापक व विधायक उपयोग केला. पण तो करतानाही स्त्री विरुद्ध पुरुष ही लढाई लक्षात ठेवूनच त्याने इतिहासलेखन केले. त्यामुळे संस्कृतिविकासातील स्त्रियांचा सहभाग, स्त्रियांची भूमिका यांना खूपच दुय्यम स्थान दिले गेले. इतके दुय्यम, इतके संस्कृतीच्या निर्मितिप्रक्रियेत स्त्रीची प्रतिमा जवळपास नाहीशीच करण्यात आली. इतिहासासह सर्व ज्ञानव्यवस्था आणि समाजव्यवस्था पुरुषी बनविली गेली.(3)
संस्कृतीची रचना अन्न, वस्त्र, निवारा आणि संततिसातत्य या मुख्य प्रेरणांनी होते. त्या साऱ्या प्रेरणांचा आविष्कार साहित्य, संगीत, कला, विज्ञान, तत्त्वज्ञान आणि धर्म या संस्कृतीच्या मुख्य घटकांमार्फत समावेश होतो. संस्कृत संस्कृती, तिची प्रेरणा आणि तिचे सर्व घटक ही कृत्रिम रचना आहे, याचे भान राखणे आवश्यक आहे. यात काहीही दैवी, अतिमानवी नाही. ही सगळी मानवी रचना असल्याची जाणीव सतत जागती ठेवणे कठीण असले तरी आवश्यक आहे.
मानवी संस्कृती पुरुषी व पुरुषप्रधान असल्यामुळे धर्म हा मुख्य घटक आणि जात हा उपघटकसुद्धा पुरुषी बनतात. विशेषतः ‘जात’ ही संकल्पना खास वैदिक हिंदू म्हणजे अस्सल देशी संकल्पना आहे. साहजिकच ‘जात’ हे विशेषण जोडून जो कोणताही शब्दसमूह तयार होतो, त्यावर खास हिंदूंचाच अधिकार प्रस्थापित होतो. म्हणूनच ‘बाईजात’ ही मूलतः हिंदू संस्कृतीची गोष्ट आहे.
तथापि आज ‘बाईजात’ ही केवळ हिंदू संस्कृतीची गोष्ट उरलेली नाही. ती आणखी विस्तारली, भारतीय बनली आहे.(4) पुढे जाऊन ‘बाईजात’ या खास भारतीय संकल्पनेने इतर देशातील आणि संस्कृतीतील मुळात अस्तित्वात असलेल्या स्त्रीच्या दुय्यमत्वावर जणुकाही शिक्कामोर्तबच केले, असे म्हणता येईल. म्हणूनच या विषयाला खास भारतीय संदर्भ असला तरी या विषयाची व्याप्ती जगातील सर्व धर्मरचनांना आणि समाजरचनांना कवेत घेणारी आहे.
भारतीय धर्म:
भारतातील तीन प्राचीन मुख्य धर्म म्हणजे हिंदू, बौद्ध जैन. ‘वेद’ नावाचे अफाट वाङ्मय हा हिंदू धर्माचा मूळ आधार आहे. जे वेद स्वीकारतात ते वैदिक आणि जे वेद नाकारतात ते अवैदिक. हिंदू धर्माच्या व्यावहारिक आणि तत्त्वज्ञानात्मक विरोधातून निर्माण झालेले बौद्ध धर्म व जैन धर्म, हे दोन्ही धर्म वेद नाकारीत असल्यामुळे ते अवैदिक आहेत. फक्त हिंदू धर्मच तेवढा वैदिक धर्म आहे. आणि जातिव्यवस्था हे खास हिंदू धर्माचे लक्षण असल्यामुळे ‘बाईजात’ या संकल्पनेवर पहिली मक्तेदारी हिंदू(5) वैदिक धर्माची आणि वैदिक संस्कृतीची ठरते.
आता, भारतात केवळ हे तीनच धर्म आहेत, असे नाही. साधारणतः तीनशे वर्षांपूर्वी शीख या नव्या धर्माची स्थापना झाली. पण हा धर्म अवैदिक नाही. तो मुख्यतः हिंदू धर्माची तात्त्विक परंपरा सांभाळतो. हा चौथा देशी भारतीय धर्म आहे. गेल्या हजार वर्षांत जगातील इतरही मानवगट येथे विविध कारणांमुळे स्थिरावला. त्यांनी त्यांचे धर्म येथे आणले. त्यात इस्लाम, ख्रिश्चन, पर्शियन या धर्मांचा समावेश आहे. जगात साधारणतः अकरा धर्म असून सर्व धर्माचे अनुयायी भारतात प्राचीन काळापासून वसती करून आहेत.
भारत: धर्मांची प्रयोगशाळा
हिंदू धर्माची विघातक म्हणा किंवा विधायक म्हणा, पण कार्यपद्धती, रचना अतिशय अगाध आहे. या धर्माने आक्रमकांच्या तसेच इतर कारणांनी आलेल्या अनेक धर्मांना येथे आश्रय दिला. त्यांना सामावून घेतले. साहजिकच प्रत्येक धर्म व त्यांचे अनुयायी इथे राहिले. रुजले. जणू काही भारत ही ‘सर्वधर्माची प्रयोगशाळा'(6) बनली. त्या प्रक्रियेत प्रत्येक धर्मात हिंदु धर्म आणि संस्कतीने शिरकाव केला, आपली संस्कृती रुजविली. त्यांच्या अंतरंगात घुसून वर्ण, जाती आणि लिंगभेद या तीन मूळ विषमता निर्माण करणाऱ्या गोष्टीही घुसविल्या. अशा रीतीने इतर धर्णांचेही जणू काही सनातनी हिंदूकरण झाले. त्यांच्यातही जातिव्यवस्था निर्माण झाली. हे सर्व धर्म आजच्या भाषेत भारतीयीकरण झालेले धर्म आहेत. म्हणूनच धर्म आणि बाईजात हा विषय केवळ हिंदू धर्मापुरता मर्यादित राहात नाही, तो सर्व धर्मांना लागू होणारा व्यापक विषय बनतो.
इतर धर्मीयांचे भारतीयीकरण झाले याचा अर्थ, केवळ इस्लाम अथवा केवळ ख्रिश्चन धर्म असे न होता, त्यांचे रूपांतर भारतीय इस्लाम, भारतीय ख्रिश्चन, भारतीय पर्शियन इत्यादी नव्या समाजव्यवस्थेत झाले. विशेषतः इस्लाम व ख्रिश्चन धर्माचा येथील विकास शूद्र जातींच्या धर्मांतरामुळे झाला. (अर्थात काही उच्चवर्णीयांनी सुद्धा हे नवे धर्म स्वीकारले.) त्यामुळे मूळचे हिंदू संस्कार नव्या धर्मांतरितांमध्येही प्रवाहित होऊन टिकून राहिले. उदाहरणार्थ, नवबौद्ध हा आज स्वतंत्र धर्म बनलेला नाही. कारण तो जातिव्यवस्थेत अडकला आहे. त्यामुळे तो हजारो जातीपैकी एक जात म्हणूनच जास्त टिकलेला आहे.
धर्म :
वैदिक हिंदू तत्त्वज्ञानातील ‘धर्म’ या संस्कृत संज्ञेचा अर्थ स्पष्ट करणे आणि व्याख्या अवघड तसेच महाकठीण आहे. कारण तिच्याभोवती अतिशय गडद गूढतेचे वलय आहे. तरीही भारतीय चिंतनविश्वातील त्याचे तीन ठळक अर्थ सांगता येतील. पहिला, धर्म म्हणजे नैतिक नियम आणि दुसरा वर्णाश्रमधर्म. म्हणजे वर्णजातिव्यवस्थेनुसारचा धर्म किंवा कर्म करण्याचे कर्तव्य. आणि तिसरा अर्थ संस्थात्मक धर्म हा आहे.
संस्कृतमधील ‘धृ’ या धातूपासून धर्म ही संज्ञा बनते. ‘धृ’ म्हणजे धारण करणे. म्हणून धर्म म्हणजे लोकांनी धारण करावा असे तत्त्व किंवा नियम होय. ‘लोकांना एकत्र आणणारा नियम’ या अर्थाने धर्म ही सामाजिक संकल्पना आहे. व्यक्ती व समाज यांनी काय करावे? कसे वागावे? कोणती आचारसंहिता आचरणात आणावी? व्यक्ती व समाजाने परस्परांशी कसे वागावे? याचे नियम कोणते या सगळ्याची चर्चा धर्म या संकल्पनेत आहे. बौद्ध तत्त्वज्ञानात धर्म म्हणजे निसर्गाचे नियम असे सांगितले आहे. थोडक्यात धर्म म्हणजे व्यक्तीने स्वतःशी आणि परस्परांशी योग्य व नैतिक आचरण करण्याचे नियम.)
महाभारतात ‘धारणाद्धर्मः इत्याहू धर्मेण विधृताः प्रजाः । यः स्याद्धारणसंयुक्तः स धर्म इति निश्चयः'(8) आणि लोकयात्रार्थमेवैह धर्मस्य नियमः कृतः'(9) म्हणजे लोकयात्रा, लोकव्यवहार नीट चालविणे हेच धर्माचे कार्य असते, अशा व्याख्या केल्या आहेत. अशाच व्याख्या अन्य काही ठिकाणी आहेत. हे सारे भौतिक, इहवादी अर्थ आहेत, यांचा देव, स्वर्ग, पापपुण्य, इत्यादींशी संबंध नाही, हे अधोरेखित करणे आवश्यक आहे.
थोडक्यात, प्रजेला धारण करणारे- एकत्र आणणारे आणि प्रजेकडून धारण केले जाणारे तत्त्व किंवा नियम म्हणजे धर्म, असा त्याचा अर्थ आहे. आधार देणे, पोषण करणे, पालन करणे, नैतिक कायदे आचरणाचे नियम असा त्याचा व्यापक अर्थ बनतो. थोडक्यात धर्म म्हणजे योग्य आचरण.
तथापि कालांतराने धर्म संकल्पनेत ‘शिक्षण’ संकल्पनेचा समावेश करण्यात आला. शिक्षण कशाचे? तर प्रत्येक व्यक्तीने कोणते नैतिक नियम पाळावे याचे व्यक्तीला समाजात विशिष्ट स्थान असते. इतर प्रत्येकाशी तिची एक निश्चित भूमिका असते. तिच्या विविध प्रकारच्या शारीरिक, मानसिक, वैचारिक क्षमता असतात. अशा विविध संदर्भात ती व्यक्ती समाजात वर्तन करते. साहजिकच त्या वर्तनाचे नियम बनविले जातात. ते नियम त्या व्यक्तीला तिच्या शिक्षणातून मिळतात. कुणी कुणाशी कसे वागावे? आपली कर्तव्ये कोणती याचे प्रशिक्षण म्हणजे धर्म असे म्हटले गेले. त्याप्रमाणे जे शिक्षण दिले गेले त्यास धर्मशिक्षण असे म्हणतात. ही धर्मशिक्षणाची शुद्ध तत्त्वज्ञानात्मक भूमिका होती. तथापि या संकल्पनेत प्राचीन भारतात अन्य दुसऱ्या एका सामाजिक संकल्पनेची मिसळण झाली, ती संकल्पना म्हणजे वर्ण आणि जातिव्यवस्था होय. मुख्यत्वेकरून वर्णव्यवस्था (10) धर्मसंकल्पनेत मिसळली जाऊन धर्माचे स्वरूप वर्णप्रधान बनले.
वर्णप्रधान धर्म
धर्म म्हणजे शिक्षण, अशी नवी मांडणी झाल्यानंतर वर्ण व जातीशी धर्म जोडला गेला. तो पुरुषार्थ संकल्पनेतील पहिला, मूलभूत संकल्पना म्हणून पुढे आला. पुरुषार्थ कल्पना मांडण्यात आलेल्या काळात प्रत्येक वर्णाला विशिष्ट प्रकाराचे काम होते. त्या कामाचे शिक्षण घेणे म्हणजे धर्माचे शिक्षण घेणे म्हणजे धर्मपालन करणे, अशी व्याख्या झाली. आपापला वर्णधर्म पाळणे म्हणजे ‘स्व-धर्म पालन करणे, असा त्याचा अर्थ लावण्यात आला आहे.
थोडक्यात धर्म हा पुरुषार्थ असला तरी वर्णजातिव्यवस्थेमुळे तो संकुचित झाला. धर्माने वागणे म्हणजे नैतिक वागणे, असे मुळात असले तरी वर्णजातिव्यवस्थेने तो धर्म विकत केला आणि धर्मालासुद्धा शोषणाचे साधन बनविले गेले. अशा त-हेने हिंदू धर्म व धर्मपुरुषार्थ ही अन्याय करणारी व शोषण करणारी पद्धतशीर रचना बनली.
संस्थात्मक धर्म
सनातन वैदिक धर्माने अशा रीतीने धर्म हे मूळ नियमनात्मक तत्त्व पुरुषार्थ म्हणून पुढे आणले, ते व्यक्तीकडून विनाप्रश्न पाळले जावे यासाठी. नंतर या जीवनपद्धतीवर आधारलेली समाजरचना बनविली. त्याचा हिंदू धर्म बनला. हे सारे हेतुतः घडले, असे नाही. पण कालक्रमात विकसित झालेल्या जीवनदृष्टीनुसार ‘हिंदू जीवनदृष्टी’ या अर्थाने वैदिक धर्म आकार धारण करता झाला. तो स्थिरावला, जुना होत गेला, तसा जास्तच थोर आणि दिग्गज बनला. परिणामी विनाप्रश्न अतिशय निघृणपणे राबविला गेला.
मूळ धर्म भावना संस्थात्मक धर्म म्हणून समाजापुढे आदर्शवत बनली. ती स्वीकारली गेली. याची दोन ठळक कारणे सांगता येतील. पहिले असे की ही रचना अतिशय संथपणे कळत नकळत अस्तित्वात आली. दुसरे म्हणजे सगळी सत्ता पुरुषांच्या हातांत दिली गेली. ती त्यांनी बेसुमार ताकदीने वापरली. परिणामी प्रत्येक वर्णातील आणि जातीतील प्रत्येक पुरुषाला त्याच्या उंबऱ्याच्या आतील प्रत्येक स्त्री विविध कामांसाठी मजूर म्हणून बिनपैशाची नैसर्गिकरीत्या उपलब्ध झाली. ‘पिता रक्षिति कौमारे…’ हे गुलामगिरीचे गोंडस रूप तयार झाले.
खरे तर प्राचीन काळापासून भारतात धर्म आणि नीती ही क्षेत्रे एकच समजण्यात येत होती. त्यात तत्त्वज्ञान या विषयाची भर पडून या तिन्हींचा एकत्रित विचार आणि विकास झाला. ही अर्थातच भूषणावह बाब नाही. मात्र धर्म म्हणजेच नीती असे अभिमानाने मिरविले जाते, ते केवळ चुकीचेच आहे असे नाही त्यामुळे चांगलीच दिशाभूलही होत गेली. निखळ नैतिक प्रश्नांचा विचार फारच कमी वेळा झाला. जसे की द्रौपदीचे प्रश्न नैतिक होते पण उत्तरे धर्माशी घोळ घालूनच देण्यात आली. त्यामुळे स्वतंत्र भारतीय नीतिशास्त्र नावाची गोष्टच भारतात फारशी रुजली नाही. हे दुर्दैव. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात मात्र धर्म व नीती ही क्षेत्रे प्राचीन काळापासून स्वतंत्रपणे विकसित करण्यात आली. साहजिकच त्या संस्कृतीत स्वतंत्र नीतिशास्त्र विकसित झाले. आज आपण तोच आधार घेऊन नैतिक समस्यांची चर्चा करीत आहोत. प्रस्तुतचा लेखाचा विषय त्याच अंगाने जाणारा आहे.
स्त्रीधर्म
या पातळीवर नवी संकल्पना अस्तित्वात आली. तिचे नाव ‘स्त्रीधर्म’, आता स्त्रीचा धर्म काय? यावर बरेच काथ्याकट होऊन रामायणातील सीतादहन आणि महाभारतातील द्रौपदीवस्त्रहरणापासून मनुस्मृतिपर्यंत या स्त्रीधर्माची रचना झाली.(11) येथे धर्म म्हणजे स्त्रीची कर्तव्ये, असा अर्थ केला गेला. ही कर्तव्ये अर्थात वर्णव्यवस्था आणि जातिव्यवस्था यानुसार निश्चित केली गेली. येथेच ‘बाईजात’ या संकल्पनेची मुळे आढळतात. स्त्रीधर्म संकल्पनेतच स्त्रीच्या वस्तूकरणाची, गुलामगिरीची बीजे रोवली गेली.
Religion
इंग्लिशमधील Religion या संज्ञेचे भाषांतर म्हणून धर्म ही संज्ञा मराठी, हिंदी व इतर भारतीय भाषांमध्ये वापरली जाते. ते अर्थातच योग्य भाषांतर नाही. प्राचीन काळापासून या शब्दाचा उगम, व्युत्पत्ती आणि अर्थ याविषयी वाद आहेत. तथापि Religion आणि धर्म यांचे मूळ अर्थ जुळणारे आहेत. तेच पाहिले पाहिजेत.
Religion हा शब्द लॅटीन भाषेतील Religio > releg > पासून बनतो. त्याचा अर्थ लोकांनी एकत्र असणे, राहाणे किंवा काहीतरी बांधून ठेवणे, (जशी लाकडांची मोळी बांधणे) या अर्थाचा आहे. त्याचे मूळ to relig (are) किंवा religare असे आहे. त्याचा अर्थ एकत्र बांधणे, घट्ट करणे, नंतर religio असे रूप बनले. याचा अर्थ नैतिक बंधन, स्थिती कायम राखणे, स्व-जाणिवेविषयी सजग राहणे, असा झाला. नंतर मध्ययुगीन इंग्लिशमध्ये जुन्या फ्रेंच भाषेत religioun पासून बनला. शेवटी religion असे रूप झाले. या संक्रमणात अर्थ बदलत गेला. तो अर्थ चैतन्य, पावित्र्य, समानता असा बनला. याच दैवी, धार्मिक अर्थाने रोमनांनी, ख्रिश्चनांनी तो अमलात आणला. यानंतर विश्वाची चैतन्यशक्ती, ईश्वर, धार्मिकता असे अर्थ जोडले गेले. अपहर
तेव्हा धर्म आणि religion याचा अर्थ मूलतः एकत्र येणे, बंधनात राहणे, नैतिक बांधिलकी असा आहे, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. पण दुर्दैवाने ‘स्वतःहून नैतिक दृष्टिकोणातून बांधून घेणे’ या अर्थापासून ‘सक्तीचे बांधणे’ (12) असे अर्थांतर झाले. परिणामी हिंदू, इस्लाम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन असे संस्थात्मक धर्म अस्तित्वात आले. आणि प्रत्येक जण आईच्या गर्भगृहातच धर्माने बांधला गेला. अशा रीतीने धर्म सक्तीचा झाला.
जात
जात ही खास एतद्देशीय घटना आहे. तिचे भाषांतर करणे शक्य नाही. तरीही आपण सोय म्हणून काही भाषांतरे गृहीत धरतो. त्यानुसार ‘जाति’ शब्दाचे भाषांतर caste या शब्दाने व्यक्त केले जाते. Caste हा शब्द लॅटीनमधील castus (मूळ casteis) या शब्दापासून बनला. castus म्हणजे ‘अलग, शुद्ध अथवा मुख्य प्रवाहातून तोडलेला’, त्याची उत्पत्ती carere पासून होते. त्याचा अर्थ ‘वेगळे पाडणे’. हा शब्द युरोपियन समाजातील आपले वेगळे पारंपरिक उच्च स्थान सूचित करण्यासाठी प्रथम पोर्तुगीजांनी वापरला. नंतर भारतीयांच्या संदर्भातसुद्धा पोर्तुगीजांनीच 17 व्या शतकात प्रथम वापरला. पोर्तुगीज भाषेतील casta पासून हा caste शब्द तयार झाला.(13) Casta म्हणजे वंश, कुल,. हा शब्द स्पॅनिशही असू शकतो. Casta चे मूळ casto यात आहे. त्याचा अर्थ म्हणजे शुद्धता. Casto हा शब्दसुद्धा castus या शब्दापासून बनतो. (14) (de casta म्हणजे या सगळ्या अवडंबरातून मुक्त झालेला.)
अ) जातीची व्याख्या
‘जात'(15) हा शब्द व संकल्पना मुळात ‘जाति’ अशी आहे. ‘जाति’ म्हणजे ‘असा जन्मलेला’. जात, वंश, कुल, घराणे इत्यादीसाठी तो वापरला जातो. ‘जन्’ धातूला ‘क्त’ हा प्रत्यय लागून ‘जात’ हा भूतकालवाचक शब्द बनला. ‘जन्’ पासून ‘जनन’ (जन्मण्याची प्रक्रिया) व ‘जननी’ (जन्म देणारी) हेही अन्य शब्द बनतात. म्हणून अनुषंगाने जाति म्हणजे जन्म, असा अर्थ होतो. हा मूळार्थ. (बुद्धसुद्धा जाती म्हणजे जन्म, असे म्हणतो) हा मूळार्थ लक्षात घेता ‘जाति’ या शब्दाचे दोन अर्थ जातिसंस्था व जातिव्यवस्थेच्या संदर्भात तयार होतात:
1. वर्णव्यवस्थेत वर्ण म्हणून चिरंतन स्थान प्राप्त झालेला कुलसमूह म्हणजे जाति.
2. समान अधिकार असलेल्या (वर्णव्यवस्थापनेनुसारच्या) एकेका जातीत उपजाती,पोटजाती असतात, त्यांनाही ‘जाति’ असे म्हणतात..
याखेरीज ज्ञानकोशकार डॉ.श्री.व्यं केतकर यांनी दिलेली जातीची व्याख्या 16) आज सर्वमान्य आहे. ती अशी :
जन्मना जायते संघे प्रवेशो नान्यतः कदा।
संघमर्यादितं क्षेत्रं विवाह जातिरुच्यते ।।
अर्थ : “ज्या विशिष्ट संघात केवळ जन्म घेतल्यानेच प्रवेश होतो आणि ज्या संघातील लोकांना त्या संघाबाहेर (जाऊन) लग्न करता येत नाही, त्या संघास ‘जाति’ म्हणावे.”
जातीचे हे लक्षण वर्णासही लागू करता येते. कारण वर्ण म्हणजेच जाति, असा अर्थ मनुस्मृति व याज्ञवल्क्यस्मृति या ग्रंथांत दिला आहे. या ग्रंथांच्या म्हणण्यानुसार वर्ण व जाति एकच असतात.
ब) जातिसंस्थेची वैशिष्ट्य
धर्मशास्त्राचा इतिहास’ या जगद्विख्यात ग्रंथात म.म.पां.वा.काणे जातिसंस्थेची पुढील वैशिष्ट्ये नमूद करतात :
(1) आनुवंशिकता (जन्मसिद्धता),
(2) विवाहनिबंध,
(3) अन्ननिबंध,
(4) व्यवसायनिबंध,
(5) जातींमधील उच्चनीचता.
जातीच्या वरील व्याख्या आणि वैशिष्ट्य लक्षात घेता जात ही परंपरा असून तीच जातिव्यवस्थेत रूपांतरित होते. एका व्यक्तीची जात मिळून अनेकांची जात आणि अशा अनेक जाती मिळून जातिव्यवस्था बनते. ही व्यवस्था अनुल्लंघनीय, अपरिवर्तनीय, युक्त, अपरिहार्य व सत्य ठरविली जाते.
इथे आपल्याला जातिसंस्था व जातिव्यवस्ता यात फरक करावा लागेल. जातिसंस्था ही जातिसंकल्पनेची धर्मशास्त्रीय सैद्धान्तिक बाजू आहे. तर जातिव्यवस्था जातिसंकल्पनेची व्यावहारिक व प्रात्यक्षिक स्वरूपाची बाजू आहे. जातिसंस्था ही जातिसंस्थेचे ‘धोरणात्मक व्यवस्थापन’ आहे, असे म्हणता येते. साहजिकच जातिसंस्था व जातिव्यवस्था यांची रचना एकास एक अशी सुसंवादी बनते. संस्था व व्यवस्थापन या गोष्टी फरक करता येण्याजोग्या आहेत पण एकमेकांपासून अलग करता येण्याजोग्या नाहीत. एखाद्या इमारतीचा आराखडा व प्रत्यक्ष ती इमारत यांच्यात जो संबंध असतो तसा जातिसंस्था व जातिव्यवस्था यांच्यात आहे. आराखडा अमूर्त असतो तर इमारत मूर्त वास्तव असते. जातिसंस्था ही अमूर्तता आहे तर जातिव्यवस्था ही मूर्त वास्तविकता आहे. (17)
थोडक्यात, जात बदलता येत नाही, ती निर्माण अथवा नष्टही करता येत नाही. कारण ती संकल्पना असते. आणि संकल्पना नेहमी अमूर्तच असते. ती भौतिक जगात अस्तित्वात कधीही नसते. पण संकल्पनेचे प्रत्यक्षीकरण होते आणि वास्तव अस्तित्वात येते. या तर्कशास्त्रीय नियमानुसार जातिरचना होते. भारतीय समाजवास्तव पाहता आज जन्मजातता वगळता जात निर्माणच होत नाही.
आता, या पारंपरिक अपरिवर्तनीय व अनुल्लंघनीय दैवी जातिव्यवस्थेला तीन छेद मिळाले. लोकशाही(18) एकूणच भारतीय समाजव्यवस्थेला अनेक प्रकारे छेद गेले. जातिव्यवस्थेला दिला गेलेला पहिला छेद म्हणजे सरकारने जातिरचनेत बदल केले. SC, ST, VJNT, OBC, SBC, Open इत्यादी नवी सरकारी जातिव्यवस्था अस्तित्वात आली. ही अर्थातच चांगली गोष्ट आहे. कारण जातीचा उल्लेख अवमानजनक आहे,
विषमता पोसणारा आहे, म्हणून तो टाळला पाहिजे. जातीची खरी नावे आता केवळ जातीच्या दाखल्यावर आणि वैधता प्रमाणपत्रावरच उरली आहेत.
दुसरा छेद म्हणजे जे जातित्याग करतात, त्यांचीही एक नवी जात होऊ शकते. व-हाडात कुठेतरी अशी ‘अजात'(19) नावाची जातच आहे म्हणे. अर्थात याच विचित्रपणा काही नाही.
तिसरा छेद बाईजात नावाची नवी जात तयार होणे! मागणी
बाईजात
धर्म, जात आणि बाई या तीन संकल्पनांना (खरे तर त्यांच्या केवळ व्युत्पत्तींचा) हा संक्षिप्त परिचय पाहता ‘बाईजात’ या संकल्पनेची रचना लक्षात येऊ शकते. बाईजात ही संकल्पना पुरुषजात या संकल्पनेची प्रतियोगी संकल्पना आहे. म्हणजे ती केवळ विरुद्ध नाही, तर विरोधी विचारप्रणाली व्यक्त करणारी आहे. सत्ताश्रेणीत परुषजात हीच अंतिम सत्यता असते.
जातिनिर्मूलन, जातित्याग, आंतरजातीय विवाह, आंतरधर्मीय सलोखा इत्यादी गोष्टी आणि खुद्द सनातनी अपरिवर्तनीय व अनुलंघनीय दैवी जन्मजात जातिव्यवस्था लक्षात घेता ‘बाईजात’ या नावाची जात असू शकते का?
या प्रश्नाचे ठळक उत्तर असे की, —
बाई नामक स्वतंत्र जात असू शकत नाही, काही कारणे अशी :
1. बाई किंवा स्त्री ही लैंगिक वर्गवारी आहे. जातीय वर्गवारी नाही.
2. व्यक्तीला प्रचलित व्यवस्थेनुसार जन्माबरोबरच जात मिळते तशी बाईजातीत्व (20) मिळत नसते.
3. परिणामी जातिव्यवस्थेत असेनाव धारण करणारा इतरांपासून वेगळा व्यक्तिसमूह अस्तित्वात येऊ शकत नाही.
परिणामी बाई नावाची जात असणे शक्य नाही. तरीही ‘बाईजात’ अशी मानसघटना (फिनॉमिनन phenomenon) मात्र अस्तित्वात आहेच. ती इतकी व्यापक असते की सर्व जातिधर्माच्या कक्षा ओलांडून ती सर्वत्र असते. भारतीय तत्त्वज्ञानाच्या परिभाषेत ती ‘विभू’ (सर्वत्र स्थलकालविरहित उपलब्ध असणे) असते. बाईला बाई म्हणून दुय्यम नागरिकत्वच (सेकंड सेक्स) वाट्याला येते. याची कारणे कोणती?
याची संभाव्य उत्तरे अशी देता येतील :
1. वर्णव्यवस्थेनुसार सर्व वर्णातील आणि प्रत्येक जातीतील स्त्रिया शूद्रच आहेत. ब्राह्मण वर्णजातीच्या स्त्रीपासून ते दलित स्त्रीपर्यंत सर्व स्त्रियांचा दर्जा वर्ण व जात म्हणून एकच आहे. म. फुले अशा या वर्गाला ‘शूद्रातिशूद्र’ म्हणतात.
2. सर्व स्त्रिया शूद्रवर्णीय असल्या तरी प्रत्येकीला पित्यापासून निष्पन्न होणारी जात स्वीकारावीच लागते. तिची तीच जात असते. पतीही त्याच वर्णाचा, पुत्रही त्याच वर्णाचा मान्य करावाच लागतो.
3. तिच्या पोटी जन्माला मुलगी आली की ती वरील गोष्टींची वाहक असते.
4. वर्ण व जात या दोन्ही अर्थाने स्त्रीवर्ग एकच असला तरी, ब्राह्मण जसे वर्ण व जात, या दोन्हींचे लाभधारक आहेत, तसा स्त्रीवर्ग वर्णाचा लाभधारक असू शकत नाही. म्हणूनच वर्णभेद राखूनही बाईजात मात्र अपरिहार्य व अनिवार्य बनते.
ही उत्तरे अर्थातच दुरुस्तीसाठी खुली आहेत. त्यांची संख्याीह कमीजास्त होऊ शकते.
‘स्त्री’ शब्दाचा ‘बाई’ हा बोलीभाषेतील शब्द जेव्हा ‘जात’ संकल्पनेशी जोडला जातो, तेव्हा व्यवहारात बाईजात खरीच अस्तित्वात येते. बाईजात नावाचा हा शब्द केवळ शब्दसामर्थ्यावर, साहित्यिक, काव्यजोरावर निर्माण केलेले मिथक नाही, ती अस्सल व दाहक वास्तवता आहे. ‘स्त्री’ ऐवजी ‘बाई’ हा बोलीभाषेतील शब्द समग्र अर्थच्छटांसह चिंतनाच्या केंद्रस्थानी येतो, तेव्हा स्त्रीची वेदना जास्त ठळक होते. ही ‘बाई’ मादीत्वापासून मानवी माता ते जगन्माता असा प्रवास करते. दुर्गा होऊन ती परपुरुषातील राक्षसांशी लढते. त्याचवेळी देव असलेल्या पुरुषाची दासीही होते. तिचे दुय्यमत्व नष्ट होत नाही. दुर्दैवाने तिच्या देवीत्वातही, देवीरूपातसुद्धा बाईच्या दुःखाचे सारतत्त्वच अधोरेखित होते. एका अर्थाने शोकांतिकेचे हे नव्याने जाणवणारे सनातन रूप म्हणावे.
किती चमत्कारिक विरोधाभास आहे हा! एक तर मूलतः वर्ण-जातिव्यवस्थेला कोणतेही ज्ञानशास्त्रीय अस्तित्व नाही, वर्णजात अस्तित्वातच नाही. पण अस्तित्वात नसलेली परंपरा आणखी नव्या अस्तित्वात नसलेल्या आणखी एका मानसघटनेला जन्म देते. ती उघडपणे वाजत-गाजत मिरविते, तिला सतीत्व देते, देवीत्व देते, बाजारही देते.
बाईजात मुख्यतः बाईपणाचे दुःख व्यक्त करते आणि नंतर जातीचे दुःख व्यक्त करते. “बाईच्या जातीने पायरी ओळखून वागावे”, “बाईच्या जातीला हे शोभत नाही”, इत्यादी विधानेच बाई नावाची जात जन्माला घालतात. ही निर्मिती पुरुषच करतो. बाईला जातीची वागणूक तो देतोच. एक बाई दुसऱ्या बाईला उद्देशून ही विधाने करते, तेव्हा ती स्वतःचे मत मांडत नसते, तर पुरुषाचे प्रतिनिधित्व करीत असते. (21) ती पुरुषी राजकारणाला बळी पडते. पुरुषच बाईला बाईविरुद्ध शस्त्र म्हणून वापरतो, स्वतः नामानिराळा राहतोच. पण या शस्त्राचीही परंपरा बनवितो.
‘बाईजात’ या जातीचे एकमेवाद्वितीय सदसद्विलक्षण स्वरूप म्हणजे ती सर्व धर्मांना कवेत घेते. धर्मांची प्रयोगशाळा (22) कोणताही धर्म वगळत नाही, प्रत्येक धर्म पंज्यात पकडते. ती केवळ हिंदू धर्माची मक्तेदारी नाही. धर्म कोणताही असो, बाईची जात पक्की, अभेद्य बनते. म्हणून एखादी स्त्री ब्राह्मण असो वा नवबौद्ध दलित असो वा मुसलमान असो किंवा ख्रिश्चन असो; अथवा देवीदेवता असो, ती प्रथम बाई असते, म्हणून तिला तिच्या धर्माच्याही आधी ‘बाईजात’ मिळते. तिची सारी गात्रे, सारे शरीर, तिचे गर्भगृह, तिचे स्त्रीबीज, तिचे आत्म, तिचा आत्मा, तिचे समग्र अस्तित्वच बाईजातीला बांधले जाते. तिच्या गर्भगृहात बालब्रह्म पुरुषाची स्थापना झाली तर तो पुरुष म्हणून स्वतंत्र होतो, पण आईचे बाईजातपण अबाधित राहते. आणि जर बालब्रह्म स्त्रीची स्थापना झाली तर त्या बालिकेचेसुद्धा बाईजातपण अबाधित राहते. ती स्त्रीच्या मूलभूत व्याख्येला बांधील राहते. “त्सायेते शुक्रशोणित यस्यो सा स्त्री!”(23). कारण त्या बालिकेच्या पोटातही नव्या गर्भमंदिराची रचना होते. आईचे बाईपण घेऊनच हे प्रतिरूप जन्माला येते, त्याबरोबरच बाईजातही जन्माला येते. बाईचे हे जीवशास्त्रीय भागधेयच तिची सामाजिक शोककहाणी लिहिते.
ही कहाणी आणखी अधोगतीला जाते ती हिजडा नावाच्या बृहन्नला धर्मरूपात! केवळ भारतीय उपखंडातच ही नवी जमात जन्माला आली. विज्ञानवादी पाश्चात्त्य राष्ट्रात लिंगभाव सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करता झाला, पण भारतीय उपखंडात धर्माच्या विखारी विळख्यात अडकला. धर्मश्रद्धेच्या, दैवीपणाच्या भयानक अजगरी साखळदंडात अडकलेली ही जमात मातेच्या गर्भगृहातून कधीही निर्माण होत नसते, ती बाईसारखे गर्भाचे संततिसातत्य जनत नाही; तरीही ना धड ना पुरुष, ना धड बाई’ अशी कायम शिखंडीशापाने जगत
राहते.
अर्ध्या मानवजातीला बाईजातीत ढकलणारी, शिखंडीधर्माची पताका उभारणारी भारतीय हिंदू संस्कृती तरीही महान असते!
परवशतेच्या नभात तूचि आकाशी होशी! ….
मोक्षमुक्ति ही तुझीच रूपे तुलाच वेदान्ती !!
संगमनेर महाविद्यालय, संगमनेर, जि.अहमदनगर – 422605
(दू.भा.9226563052) madshri@hotmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.