पत्रसंवाद

वृन्दाश्री दाभोलकर, 57, प्रतापसिंह कॉलनी, बारावकरनगर (संभाजीनगर), सातारा 415004. (मोबा.9881736366)
बंधुभाव हा शब्द आपण वापरतो. आसुच्या अलीकडील दोन्ही अंकांत तो अनवधानाने असावा-वापरलेला आढळला. हा शब्दप्रयोग अतिशय आक्षेपाहे आहे हे कुणीही विवेकवंत मान्य करेल.
‘बंधुभाव’ यात भगिनीभाव अध्याहृत/गृहीत धरलेला आहे. पण ही समावेशकता या शब्दात वस्तुतः अजिबात नाही. परंपराझापड असल्यामुळे त्यातील आक्षेपार्हता कुणाच्या सहजी लक्षातही येत नाही.
आपण सभेत बोलताना कायम ‘बंधुंनो व भगिनींनो’ (भगिनींनो असे स्वतंत्रपणे) संबोधतो. त्याच जातकुळीतील हा प्रकार असल्याने आपण त्याच धर्तीवर बंधुभाव ऐवजी बंधुभगिनीभाव हा शब्द वापरणे युक्त आहे. विवेकनिष्ठ भूमिकेतून जरा खोलवर विचार केल्यावर बऱ्याच इतर गोष्टी ठळकपणे स्पष्ट होतात.
आजच्या काळात बंधुता हा असाच एक अपुरा शब्द, भगिनीत्वाला अनुल्लेखून नगण्यता देणारा. त्याऐवजी बंधुभगिनीत्व असा शब्दप्रयोग आवर्जून, उ खून होणे गरजेचे आहे; न्याय्य आहे. प्रबोधनाची वाटचाल अधिक सुरळीत होईल; त्यामुळे!
घटनेतील fraternity हा शब्द या मुळाशी आहे. पण माध्यमिक शाळेतील पाठ्यपुस्तकांतून ‘प्रतिज्ञे’त इंग्लिशमध्ये ब्रदर्स आणि सिस्टर्स असे शब्द योजले आहेत. हिंदीमध्येही ‘भाई-बहन’ असे भाषांतर आहे. मात्र मराठीत तसे नाही. चलनातील बाद झालेले नाणेच बधिरपणे वापरलेले अद्यापही बदलावेसे वाटलेले नाही.
आपण ‘आत्मभान’ विकसित करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवतो. दोन्ही गटांचे : स्त्रीचे तसेच पुरुषांचेही! असे अनेक शब्द आहेत. स्त्रीच्या पराक्रमाला ‘पुरुषार्थ’ म्हणून कसे चालेल? एवढीही भाषेची गरिबी नक्कीच नाही. नवनवीन नाणी टाकसाळीतून निघाली पाहिजेत तरच व्यवहारगाडा सुरळीत चालणार!
बदलत्या काळानुसार मूळ विचारविश्वात नवनवीन विद्याशाखांमुळे नानाविध संकल्पनांचे धुमारे फुटत असतात. त्यानुसार त्या संकल्पना चपखल झेलणारे नवीन शब्द अविरत परिभाषेत येत असतात, यावयास हवेत. मानवी व्यवहारात दळणवळणाचे शब्द हेच साधन असते.
अमेरिकन इंग्लिशच्या शब्दकोशातून आपल्याला कळते की निग्रो हा शब्द अधिक्षेपकारक आहे म्हणून ब्लॅक शब्द वापरावयास हवा. भाषिक विवेक वाढतो तो असाच ना?

प्रभा तुळपुळे, 46/बी-3, बचाजीनगर, मालाड (पू.) मुंबई 400097. मोबा.996934249
आजचा सुधारक, ऑगस्ट 2012 मधील चळवळी का यशस्वी होतात…… श्री आनंद करंदीकर यांच्या लेखावर थोडी प्रतिक्रिया द्यावीशी वाटली. श्री करंदीकर हे एक ‘हटके’ विचार करणारे गृहस्थ आहेत. आणि मला अशा व्यक्तींचे कौतुक आहे. (Argumentative Indian – अमर्त्य सेन)
कोकणातील एका विचारवेध संमेलनात ब्राह्मण समाजाची मानसिकता आणि त्यातून घडणारे त्याचे वर्णन यावर आनंद करंदीकर एक निबंध वाचला होता. तो मला भावला होता. त्यांच्या पिढीत आणखीही काही माणसे अशा विचारपद्धतीची निपजली. पण पढेपढे त्यांच्यात वितंडवृत्ती निर्माण होऊन त्यांचे लेखन विचारप्रवृत्त न करता नसते वाद निर्माण करताना आढळले. करंदीकरांचे तसे झालेले दिसत नाही म्हणून त्यांचे
अभिनंदन.
चळवळीच्या गणितशास्त्राचे आनंद करंदीकरांनी जे निरुपण केले आहे त्यात मला प्रथमदर्शनी तरी बरेच तथ्य आहे असे वाटले. पण त्याच्या पराव्यासाठी त्यांनी जी उदाहरणे दिली आहेत त्यांच्याशी मी पूर्णतया असहमत आहे.
एकच उदाहरण घेते. स्त्रीचळवळ यशस्वी झालीय – स्त्रीवरील कौटुंबिक अत्याचार थांबवणे हे चळवळीचे उद्दिष्ट होते असे मानून पुढे हे अत्याचार जवळजवळ नामशेष झालेल असे ते म्हणतात, जे अज्ञानमलक आहे. हे अत्याचार तर संपलेले नाहीतच पण लैंगिक शोषणही वाढत्या प्रमाणावर आहे. बलात्कार-घरातील-घराबाहेरचे, हंडाबळीच्या घटनाही घडताहेत. लगेच खटले दाखल अजूनही होत नाहीत. झाले तर वर्षानुवर्षे चालत अनिर्णीत राहतात. जामिनावर सुटलेले पुरुष लग्नसंस्कार करून धाकात संसार चालवताना आढळतात.
चळवळीचा उद्देश अत्याचारनिर्मूलन हा समजच चुकीचा आहे. लिंगसमानता प्रस्थापित करण्यासाठी ती चळवळ आहे. आणि तो उद्देश त्याच अंकामध्ये श्री वसंत पळशीकरांनी म्हटल्याप्रमाणे स्त्रीचे पुरुषीकरण करून साध्य झाल्यासारखे भासत आहे. पण या यशातच चळवळीचे अपयश आहे. पुरुष हा आपल्यापेक्षा थोर आहे. हे मान्य करूनच तर स्त्री त्याच्यासारखे बनण्याचा प्रयत्न करते ना?
करंदीकरांच्या विचारांतील हे न्यून त्यांच्या अनुभवविश्वाच्या मर्यादांमुळे आले आहे. सामाजिक प्रश्नांची उकल, ते प्रश्न ज्यांना पडतात, त्यांच्यातील विचारविमर्शातून व वादसंवादातून अधिक चांगल्यापैकी पुढे येतात.

गंगाधर रघुनाथ जोशी, 7, सहजीवन हौसिंग सोसा., ज्ञानराज, सिव्हिल लाईन्स, दर्यापूर, जि.अमरावती 444803.
(1) आसुच्या सप्टेंबर 2012 च्या अंकात ‘पत्रसंवाद’ सदरात श्री. संजीव चांदोरकरांनी काही मूलभूत प्रश्न उपस्थित केलेले आहेत. त्यांना साहजिकच वाटते की समाजसुधारणेला वाहून घेतलेले आसु सारखे व्यासपीठ सतत उपलब्ध असले पाहिजे. ते अल्पायुषी ठरता कामा नये. आसचा वाचकवर्ग हजारोंनी वाढला पाहिजे. बहजनसखाय असे आसचे व्यासपीठ असले पाहिजे. अनिष्ट परंपरांना छेद देणारे, तर्कनिष्ठ व सुधारणांना वेग देणारे, परखड विचारांचे ते व्यासपीठ असले पाहिजे. इतके परिणामकारक की सामाजिक/ राजकीय क्षेत्रात त्याचा दबदबा, किंबहुना दरारा असला पाहिजे.
आजचे सामाजिक/राजकीय/आर्थिक वातावरण पाहता आसु कडून अशी अपेक्षा करणे म्हणजे एकदम हनुमान उडी घेऊ पहाणे ठरेल. पण चांदोरकरांच्या तळमळीशी मी एकदम सहमत आहे. त्यांनी सुचविलेले दोन मुद्दे (1) सतत टिकणारे वित्तीय आरोग्य (2) उत्तम अद्ययावत व्यवस्थापन – ह्यांना प्राथमिकता द्यायलाच हवी, कारण आपोआपवादी दृष्टिकोण (म्हणजे जे होईल ते होईल, पुढचे पुढे पाहून घेऊ – आपोआपवादीचा मी असा अर्थ घेतलेला आहे.) धोक्याचा ठरू शकतो. हा धोका टाळण्यासाठी मी नम्रपणे सुचवू इच्छितो की :
(1) आसु ने जाहिराती घेण्यास मुळीच संकोच करू नये.
1990 चे जग आज राहिले नाही. दि.य.देशपांडे, मनुताई नातू यांचे; माझे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांनी कल्पनाही केली नसेल अशा जगात आज आपण आहोत. व आपणही स्वप्नातदेखील कल्पना करू शकणार नाही असे जग झपाट्याने पुढे येऊ घातलेले आहे. संस्थापक संपादकांनी जाहिराती न घेण्याचा निर्णय घेतला तर त्यालाच चिकटून राहून आर्थिक व्यवस्थापन का बिघडवायचे? उलट नरसिंह चिंतामण केळकरांनी जाहिरातीला पासष्टावी कला म्हटले आहे. आपले उत्पादन जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोचावे म्हणून ज्या मासिकाचा, नियतकालिकाचा, खप जास्त त्या मासिकाला जास्त जाहिराती मिळतात. त्यामुळे जाहिरातीच्या उत्पन्नातून आर्थिक समायोजन झाले तर पानांची संख्या वाढवून नवनवीन विषयांचा अंतर्भाव करून मासिकाचा खपदेखील वाढू शकतो असे सुष्टचक्र आहे. मी हे मान्य करतो की काही जाहिराती थिल्लर स्वरूपाच्या असतात. त्या टाळता येतील. धूर्त जाहिरातदारांना कोणती जाहिरात कुठे, कशी द्यायची हे चांगले कळते. मी रीडर्स डायजेस्ट, अमृत इ. मासिकांचा नियमित वाचक आहे.त्यात भरपूर जाहिराती, भरपूर ज्ञान, मनोरंजनात्मक मजकूर खच्चून भरलेला असतो. वर्षानुवर्षे ती उत्तमरीत्या चालत आहेत.
(2) आजची तरुण पिढी कालच्या पिढीच्या निश्चितच पुढे आहे. मी खांद्यावर घेतलेला माझा मुलगा, माझ्यापेक्षा जास्त दूरवरचे पाहू शकतो. त्यानेही आपल्या खांद्यावर घेतलेला त्याचा मुलगा त्याच्यापेक्षाही अधिक दूरवरचे पाहू शकतो. आज पुष्कळ बाबी मला माझ्या मुलाकडून व नातवाकडूनही समजावून घ्याव्या लागतात. म्हणून आजच्या पिढीला प्रेरक व विचारप्रवर्तक मजकूर देणारे व देण्याइतके आसु चे व्यासपीठ भक्कम असावे लागेल. पण विद्वज्जडता असता कामा नये. त्यात भरपूर चित्रे, व्यंग्यचित्रे असावीत. विनोदाचे वावडे नको. उगाच गंभीर चेहेरे तरुणांना आवडत नाहीत.
(3) माझे वैयक्तिक मत असे की मासिकाची वार्षिक वर्गणीच ठेवावी. ज्यांना परवडेल व रुचेल त्यांनी पुढील वर्षांची आगाऊ भरावी. आजीवन वर्गणीदार हा प्रकार नकोच. कारण आजीवन वर्गणीदारांचे जीवन संपले की ते व्यवस्थापकांना कळत नाही व मासिक जीवित असेपर्यंत अंक पाठविणे सुरूच असते. हा खर्च निरर्थक होतो.
(4) आजचा सुधारक अद्ययावत, आजचा, किंबहुना आजच्या पुढचा असावा लागेल. अन्यथा तो कालचा होऊन इतिहासजमा होईल. समाजपरिवर्तनासाठी तो नेहमीच आजचा म्हणजे नेहमीच ताजा वाटला पाहिजे. त्याचा चेहरा चिंतातुर/उदासीन/गंभीर नसावा. तो सदैव प्रफुल्लित, टवटवीत, तरुणाईला आकर्षिणारा जीवनाचा खळाळ त्यात दिसला पाहिजे.
(5) सुदृढ आर्थिक निर्भरता, उत्तम व्यवस्थापन, प्रत्येक बाबतीत पारदर्शकता ह्या त्रिसूत्रीत आजचा सुधारक यशस्वी वाटचाल करो व समाजाला मार्गदर्शक ठरो ही शुभेच्छा.
(2)
मेंदूविज्ञान
आजचा सुधारक चा जून-जुलै 12 चा मेंदूविज्ञानावरचा जोडअंक वैचारिक मेजवानीच ठरावा. सर्व लेख वाचन झाल्यावर अतप्तीच शिल्लक राहते. व अतप्तीचेही समाधान वाटावे अशी त्या अंकाची मांडणी दिसते. अनेक शास्त्रज्ञांचे संदर्भ त्यात आहेत पण ठोस निर्णयापर्यंत कोणीही येऊ शकले नाही.
प्रास्ताविकात म्हटल्याप्रमाणे मातीचे मडके तयार होते. त्या मडक्यात पोकळी असते. म्हणजे काहीच नसते. काहीच नसण्याच्या अस्तित्वाचा घटक त्या मडक्याच्या उपयोगितेला कारण ठरतो!
माणसाच्या कवटीच्या आत मेंदू असतो. आपल्याला कवटीची जाणीव असते पण आतला मेंदू अनाकलनीय असतो. त्याला आकलनच्या क्षेत्रात आणण्याची मेंदूशास्त्रज्ञांची धडपड व प्रयोग खरोखरच अचंबित करणारे आहेत.
‘अणुरेणूहूनि थोकडा, तुका आकाशाएवढा’ ह्या तुकारामांच्या चरणांशी आपला माथा टेकतो.
स्मशानात मृताला अग्नी देतात तेव्हा प्रेतयात्रेत जमलेली मंडळी मृताची कवटी फुटण्याची वाट पाहतात; व ती फुटल्याचा मोठा आवाज ऐक आल्यावर घरोघर परततात. याचा अर्थ कवटीच्या आतले अवकाश अनंताकाशात विलीन झाले, असा तर नसेल!
असेही वाचनात आल्याचे स्मरते की सिगमंड फ्राइडचे मते आपण आपल्या आई-वडिलांकडून जो डीएनए (डिओक्झिरिबो न्यूक्लिक ॲसिड) चा वारसा निसर्गतःच आपल्या पदरी पडलेला असतो त्याचा प्रामुख्याने आपल्या विचारप्रक्रियेवर प्रभाव प्रामुख्याने असतो. आपण आपल्या आयुष्यात जे आपले म्हणून निर्णय घेतलेले असतात. त्यांपैकी दोन तृतीयांश निर्णय आपले नसतातच ते आपल्या डीएनए ने घेतलेले असतात. आपले निर्णयस्वातंत्र्य कितीतरी मर्यादित असते! ‘पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा!’ असे म्हणण्याखेरीज आपण तरी काय करणार!

वसंत केळकर, ब्लॉक 525/सी-3, केंद्रीय विहार, सेक्टर – 38, नेरूळ, नेरूळ -Node-II-so, मुंबई – 400706
(1)
फेब्रुवारी 2012 अंकातील श्रुतींविषयी राजीव साने यांचा लेख वाचला.
भावनांचा ओघ आणि बुद्धीचा लखलखाट (Flow of soul & feast of reason) यातून सौंदर्यनिर्मिती होते असे मानल्यास संगीतातले सौंदर्य, त्यातल्या भावना व विचार यातून निर्माण होते असे म्हणता येईल.
रोजच्या जीवनातले ध्वनी, पशु-पक्षांचे, वनांचे व मानवांचे असतात त्यातून भावना व विचार आपल्याला प्रतीत होतात. त्यात आपल्या स्वतःच्या भावनांचा व विचारांचा समावेश असतो. त्यामुळे सौंदर्यनिर्मिती संपूर्णपणे वस्तुनिष्ठ नसते. त्यात रसिकाच्या स्वतःच्या भावनांचा व विकारांचा आवेग अंतर्भूत होऊन कलाकार व रसिक यांच्या संयोगातूनच सौंदर्यनिर्मिती होते असे म्हणता येईल. Beauty lies in the eyes (ears?) of the beholder हे पुष्कळ अंशी खरे असावे. निसर्गाने उत्पन्न केलेले आवाज आपल्याला आनंदित अथवा व्याकुळ करतात. गाढवाचे गर्दभगान आपल्याला का आवडत नाही पण कोकीळेचे कुहुकुहु का आवडते यात त्या ध्वनीच्या कंपनसंख्येपेक्षा आपल्याला गाढव आणि कोकीळा यांच्याबद्दल काय वाटते हे पण महत्त्वाचे आहे. ज्या बालकाचे बालपण गाढवाच्या संगतीत गेलेले आहे त्या बालकाला तो प्रौढ झाल्यावर अचानक गाढवाचा आवाज ऐकू आला तर त्याच्या वृत्ती सैरभैर झाल्या तर त्यात नवल नाही. मनुष्यनिर्मित यंत्रांचे आवाज कर्णकटूच असतात. पण गिरणीचा भोंगा, यंत्रांचा
यांत्रिक आवाज किंवा रहदारीचा आवाज, लोकांची गजबज यातून आकर्षित करतील यात संशय नाही. मनुष्यनिर्मित आवाजातला हळुवारपणा, प्रेमळपणा, आनंद, उत्साह, हृदयभेदक किंकाळी, परिचित संदर्भामुळे आपल्याला आकर्षित करतात. कित्येकदा ही कामगिरी ध्वनि व शब्द, अभिनय आणि परिस्थितीतले नाट्य या सर्वांच सौंदर्यनिर्मितीत समावेश असतो. लता मंगेशकर यांच्या तारसप्तकातील प्रावीण्याचा वापर करून शंकर जयकिशन या हिन्दी चित्रपट-संगीतकारांनी अतीव आनंदनिर्मितीचा अनुभव निर्माण केला आहे. ‘उनसे प्यार हो गया…’ हे ‘बादल’ चित्रपटातले गीत किंवा ‘जा जा जा रे, जा रे,…’ हे ‘नया घर’ चित्रपटातले गीत ऐका.
फक्त ध्वनीपुरता विचार केला तर असे आढळून येईल की, त्यातील जोर (loudness) परिणामकारकरीत्या कमी-जास्त नियंत्रित करून सौंदर्यनिर्मिती होते. कंपनसंख्येकडे (frequency/pitch) लक्ष दिले तर त्यातील ऐकू येणारी मर्यादा (au dible range) प्रथम लक्षात घेऊ. 20 ते 20 हजार या मर्यादित कंपनसंख्येचा ध्वनीच आपल्याला ऐकू येतो. एखाद्या कंपनसंख्येचा ध्वनी आपण निर्माण केला तर त्याचा जोर वाढवताना तो त्या कंपनसंख्येच्या पटीतच वाढतो. उदा. 400 सायकल्स प्रतिसेकंद ह्या कंपनसंख्येचा ध्वनी वाढवताना तो 800, 1200 कंपनसंख्येचा असाच होईल. म्हणूनच सतारीचा सा आणि सरोदचा सा आपल्याला वेगवगेळे ओळखू येतात.
400 ते 800 ही रेंज आपण सलग (मींडसारखी) वाजवली किंवा गायली तर अगदी नकोशी वाटेल. अशा त-हेचा आवाज प्राणांतिक वेदना, क्रोध किंवा आक्रोश व्यक्त करतो. नागपूरच्या एम्प्रेस मिलच्या भोंग्याची सुरुवात व शेवट अशा रीतीने होताना मी लहानपणी ऐकला आहे.
खालच्या सा’पासून वरच्या ‘सा’पर्यंत मीडच्या स्वरूपात गेल्यास सौंदर्यनिर्मिती होत नाही असे म्हणता येईल. कारण हे की थोड्या स्वरूपात मींड वापरून मनुष्य व इतर प्राणी भावना व्यक्त करतात पण थेट सा ते सा पर्यंत मींड वापरली जात नाही. उलट एखादी कंपनसंख्या अजिबात विचलित न करता गाणे (स्वर लावणे) आल्हादकारक वाटते. म्हणूनच प्रख्यात गायकाने ‘सा’ लावताक्षणीच सौंदर्यनिर्मिती होते.
400 ते 800 (किंवा 650 ते 1300 इत्यादी) च्या सलगतेमधले कोणते स्वर निवडून त्या रागाने आपला संसार थाटायचा यात भौतिकशास्त्राचा काही भाग नसून, त्या एका-पाठोपाठ स्वरांना एका विशिष्ट पद्धतीने गायल्यास परिचित भावना उमटत असतील तर सौंदर्यनिर्मिती होणार, असा ठोकताळा बांधता येईल. एकापाठोपाठ स्वर गात असताना, आवाजाचा चढउतार, मींड, ठहराव, वादी, संवादी यांचा चतुर वापर केल्यास सौंदर्यनिर्मिती होते. ही सौंदर्यनिर्मिती पाककृतीसारखीच आहे. नागपूरचे छोटुकाका पारनंदीवार, यमनकल्याण राग हार्मोनियमवर वाजवताना ‘थोडा चवीला शुद्ध मध्यमाचा स्पर्श केला’ असे बोलून जायचे. रेसीपी ठरलेली असली तरी संगीत प्रस्तुतीमध्ये प्रयोगशीलतेला खूपच वाव आहे. ‘मूर्तिमंत भीती उभी…’ या भीमपलासी रागासारखी सुरुवात करून सी. रामचंद्र यांनी ‘ये जिंदगी है’ उसीकी सी. रामचंद्र यांनी ‘ये जिंदगी उसीकी है’ मधे ‘उसीकी’ शब्दात भीमपलासी रागात नसलेले स्वर आणून आणखी माधुर्य ओतले आहे
खालचा सा आणि वरचा ता या रेंज मध्ये कोणते स्वर निवडावे याबद्दल भौतिकशास्त्राने किंवा गणितशास्त्राने काही दखल द्यायचे कारण नाही. संगीतशास्त्राने पणदखल द्यायची गरज नाही. या रेंजमधल्या काही विशिष्ट 22 स्वरांना श्रुती म्हणावे किंवा 12 स्वरांना कोमल, तीव्र, शुद्ध अशी नावे द्यावी किंवा 7 मुख्य स्वर आहेत अशी कल्पना करावी हा एक फक्त practical मुद्दा आहे. एक फूट 13 इंचाचा पण असू शकतो. एका सप्तकात कितीही स्वर किंवा श्रुती गणता येतील. पण प्रमाणीकरणासाठी काही नियम आवश्यक असतात. स्वराला स्वर मिळवणे आवश्यक असल्यामुळे हार्मोनियमसारख्या वाद्याबरोबर गायन, वादन करावयाचे असल्यास त्या वाद्यात उत्पन्न होणाऱ्या स्वरांशी मिळते घेऊनच इतर गायकांना व वादकांना आपली कला प्रस्तुत करावी लागते. सारंगी किंवा वायलीनमध्ये हा प्रश्न नाही. तिथे सर्व स्वर उमटू शकतात.

(2)
एप्रिल 2012 चा गुणवत्तापूर्ण शिक्षण विशेषांक वाचला. फार चांगला निघाला आहे. वय वर्षे 6 ते 14 हा सक्तीच्या (की हक्काच्या) शिक्षणाचा वयोगट. ही सगळी मुले वयानुसार आश्चर्यकारक पद्धतीने वाढत असतात. पहिलीतले मूल दुसरीत गेले की बदलते. दुसरीतले मूल तिसरीत गेले की बदलते. पहिलीतले मूल व आठवीतले मूल यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक असतो. प्रौढांमध्ये असे भराभर बदल होत नाहीत.
शिक्षणाचा दर्जा शाळेत सुविधा किती आहेत यावर जास्त अवलंबून नसतो. तो शिक्षकांवरच अवलंबून असतो. चांगला शिक्षक एखाद्या झाडाखाली पण उत्तम प्राथमिक शिक्षण प्रदान करू शकतो. यावरून सुविधा नसाव्यात असे मी म्हणत नाही. पण शासकीय शाळांमधून जर शिक्षक चांगले असले तर बराचसा कार्यभाग झाला असे म्हणता येईल.
खाजगी शाळांमध्ये शासकीय शाळांपेक्षा सुविधा जास्त असल्या तर तिथले शिक्षण शासकीय शाळांपेक्षा आर्थिक गुणवत्तापूर्ण असेलच असे म्हणता येणार नाही. चांगल्या शासकीय शाळांमधल्या चांगल्या शिक्षकांनी ही जाण आपल्या विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवली तर ती मुले न्यूनगंड न बाळगता निर्भीड पण विनयशील तयार होतील.
काही पालकांना त्यांच्या मुलांनी विशिष्ट शाळांमधून शिक्षण घ्यावे असे वाटते कारण तिथले विद्यार्थी एका विशिष्ट सामाजिक व आर्थिक स्तरातील असतात. तिथे सुविधा जास्त असतात. फी पण जास्त असते. आपल्या देशात याबाबत पूर्ण स्वातंत्र्य आहे. समाजात वेगवेगळे सामाजिक व आर्थिक स्तर असणे ही बाब समतावादी विचारवंतांना कदाचित पटणार नाही. माझ्या मनाला त्याचा विशेष त्रास होत नाही. पण विद्यार्थ्यांना (दोन्ही प्रकारच्या) याबाबत जाण असणे मात्र जरूरीचे आहे. शिक्षकांनी ही जाण निर्माण करायला पाहिजे.
मी जिल्हापरिषदेची काही प्राथमिक विद्यालये पाहिली. ती पाहता, शासकीय शाळा बहुधा नालायक असता हा एक गैरसमज असल्याचे माझ्या लक्षात आले. जी विद्यालये केवळ कागदावर आहेत, जिथे विद्यार्थी येतच नाहीत किंवा शिक्षक येतच नाहीत किंवा दोघेही गैरव्यवहार व गैरप्रकार करतात त्या ‘शाळांना’ मी नालायक म्हणतो.
आता मी लायक सरकारी शाळांबद्दल लिहितो. पालकांना भेटून त्यांच्या मुलांना शाळेत आणणे, शाळा सुटलेल्या मुलांना पुन्हा शाळेत आणणे, बेवारशी भटकणाऱ्या किंवा काम करणाऱ्या मुलांना शाळेत आणणे. वयाने मोठ्या मुलांना अनुरूप वर्गात दाखल करून घेणे, शारीरिक किंवा मानसिक दुर्बल मुलांसाठी विशेष व्यवस्था करणेही शासनाची महत्त्वाची कामे असली तरी शिक्षकांना या कामात ओढले तर त्यांचे मुख्य काम शिक्षणाचे वर्ग घेणे – याकडे दुर्लक्ष होते. म्हणून ही कामे शिक्षकांना देऊ नयेत.
शासकीय शाळांमधून प्रशासनाचे काम बघण्यासाठी कोणीच नसते. एखादा क्लार्क असला तर शिक्षकांवर पडणारे शिक्षणाबाहेरचे काम कमी होईल व शिक्षणाचा दर्जा सुधारेल.
सगळ्या मुलांना एका वर्गातून दुसऱ्या वर्गात पास करत जाणे हे सुरुवातीला जरा विचित्र वाटते. पण ते बरोबर आहे. एकतर व्यक्तिमत्त्वाचा विकास हे प्राथमिक शाळांचे मुख्य ध्येय आहे. परीक्षा घेऊन चाचणी करणे हे व्यक्तिमत्त्वाच्या विकासाचे अचूक मूल्यमापन नाही. खेळ, कला, साहित्य, संगीत, नाट्य, यामध्ये रूचि अपेक्षित आहे. प्रावीण्य नाही. सहली, अवलोकन, चर्चा यातून निर्माण होणाऱ्या शिक्षणासाठीदेखील परीक्षा आवश्यक नाहीत.
प्रस्तुतीकरणाइतक्याच वाचन, श्रवण, अवलोकन, विचारमग्नता, मनोरंजन या गोष्टी महत्त्वाच्या असतात. पण माझा बाळ्या सिनेमातले गाणे कसे छान म्हणतो किंवा सिनेमातल्या गाण्याची रेकॉर्ड वाजत असता कसा नाचतो याचे पालकांना कौतुक करणे असल्यामुळे प्रस्तुतीकरणाला जास्त महत्त्व देण्यात येते. चांगले गाणे ऐकवणे, चांगला चित्रपट दाखवण्याची व्यवस्था करणे यापेक्षा प्रस्तुतीकरणाची व्यवस्था करणे सोपेही
असते. त्यामुळे मुलांचे कौतुक होते पण अभिरुचि निर्माण होत नाही. सुंदर सुंदर मराठी, हिन्दीत व इंग्रजी पुस्तके पण शाळांमधून कमी दिसतात व मुलांना ती गोडी लागलेली आढळून येत नाही.
सामाजिक अध्ययन हा एक महत्त्वाचा विषय. प्राथमिक शिक्षण परिपूर्ण होण्यासाठी भूगोल, इतिहास व नागरिकत्व हे विषय फार महत्त्वाचे आहेत. पुढे माध्यमिक शिक्षणात व उच्च शिक्षणात हे विषय मागेच पडल्याने मूल प्रशिक्षित होते पण सुशिक्षित होत नाही.
सपाट नकाशाऐवजी पृथ्वीगोल समोर ठेवण्यात आला तर भूगोल हा विषय अतिशय मनोरंजक होतो व ‘पृथ्वीही मुलांच्या विचारांची मध्यवर्ती कल्पना बनते. इतिहासात युद्धाच्या रम्य कथा ऐकवण्यापेक्षा अभिमान व पूर्वग्रह न बाळगता, पुराव्यानिशी भूतकाळ कसा अभ्यासतात हे मुलांना समजायला पाहिजे असते.
नागरिकत्वात, कायदा, सुव्यवस्था, प्रशासन, प्रजेचा सांभाळ, प्रजेचे कल्याण, लढाई, शांति, राष्ट्र, इतर राष्ट्रांशी संबंध, लोकशाही, राजकीय संस्था इ. कल्पना abstruct असल्यामुळे शिक्षकाचे कसब पणाला लागते. बहुधा पाठांतर करून परीक्षा पास करण्याकडेच मुलांचा कल असतो.
व्यक्तिमत्त्वाचा विकास हे प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असले व प्रावीण्य व प्रस्तुती याला किंवा प्रगती पुस्तकात पहिला नंबर असणे इ. चढाओढींना दुय्यम स्थान असले तरी ते मल जेव्हा माध्यमिक शाळेत जाते तेव्हा भाषा व गणितातील एक किमान प्रावीण्य अपेक्षित असते व विज्ञाननिष्ठ समज आलेली असावी लागते. हा भाग आठवीतून नववीत जाणाऱ्या मुलाचा समाधानकारक नसेल तर पुढचे शिक्षण कष्टप्रद होते.
शासकीय प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची संख्या हजारोंच्या वर आहे. हे सर्व शिक्षक शिक्षण’ या विषयात डिप्लोमा प्राप्त झालेले असतात व दहावी पास असतात. त्यांचे वेतन चांगले झाले आहे ही समाधानाची गोष्ट आहे. पण वेतन चांगले झाले कीशिक्षणाचेकाम जास्त चांगले होते असे नाही. प्राथमिक शिक्षकांना dedicated and committed असावे लागते. हे गुण हजारो शिक्षकांमध्ये असण्याची व्यवस्था करणे ही प्रशासनाची मुख्य समस्या असली पाहिजे. पदविका प्रमाणपत्रास या गुणांचे मूल्यमापन होणे शक्य नाही.
प्रशासनाच्या नियंत्रणातून या गुणांची निर्मिती होऊ शकणार नाही. शिक्षकांचे प्रशिक्षण सतत सुरू असते. पण प्रशिक्षणमूल्ये शिकवू शकत नाही. शिक्षक व विद्यार्थी या दोहोंचाही प्रशिक्षित, सुशिक्षित, प्रतिभाशाली व्यक्तींशी संबंध अगदीच अत्यल्प आहे. निसर्ग, वनसंपदा, शेती, फळबागा, समुद्रकिनारे, नद्या, डोंगर, प्राणी, पक्षी, हस्तव्यवसाय, कारखाने, प्रयोगशाळा, विमानतळे, शहरे, शहरीकरण, गावे, श्रीमंती, गरिबी, गुन्हे तपास, पोलिस, सेना, न्यायालय, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, उद्योगांचे कर्णधार, कवि, लेखक, नट, गायक, विविध भाषा, त्यांचे साहित्य, या सर्वांना मुलांसमोर आणणे शक्य नाही. पण व्हीडीओ रेकॉर्डस् त्यांच्यासमोर दाखवता येतील. आकाशवाणी, दूरदर्शन, फिल्म्स डिव्हिजन यांचा पण उपयगो करता येईल. जिल्ह्यातल्या प्रतिभाशाली व्यक्तींना शाळेत बोलवता पण येईल. असा सत्संग झाला तर शासकीय शिक्षणाची गुणवत्ता नक्कीच वाढेल.

मोरेश्वर वड्लकोंडावार, मूल, (भ्र.ध्व. 8275553317)
कोरडवाहू शेतकऱ्याच्या हलाखीच्या स्थितीवर उपाय : एक प्रतिक्रिया
ऑक्टो. 12 च्या सुधारकात श्री. दिवाकर मोहनी यांचा वरील शीर्षकाचा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यांच्या लेखात सुचविलेली पद्धत एक आदर्श पद्धती होती, नि ती आजही खरेच आदर्श पद्धत ठरेल, अशीच आहे, पण कोणत्या काळात आज आपण आहोत याचाही विचार होणे तितकेच गरजेचे आहे.
शेती तोट्याचीच राहील हे आधी मान्य करावे लागेल. त्यातही नगदी पिके नि उत्पादनखर्चावर आधारित शेतीचा नफा मानला तर प्रत्येक शेतकऱ्यागणिक उत्पादनखर्च वेगळा असेल, नि ही पद्धत आज सरकारदरबारी मान्य होईल असे नाही.
कांद्याचा भाव चारपाच रुपयांनी वाढला तर कांदा महागल्याची ओरड होते. धानाचा भाव क्विंटलला दोन-तीनशेनी वाढला महागाई झाल्याची ओरड होते. असे प्रत्येक शेतमालाच्या किंमतीबाबत घडत असते. पण शेतकऱ्याच्या पदरात काय शिल्लक राहते याचा विचार कुणी करीत नाही. तसेही नाईलाज म्हणूनच शेती केली जाते आहे. जर त्याला पर्यायी दुसरा रोजगार मिळाला तर शेतकरी आज शेतात राबायला तयार नाही. शेती म्हणजे ‘श्रम’ नि आज श्रमणारे नाईलाज म्हणून ते श्रम करीत आहेत. दुसरा पर्याय मिळाला की शेती मोडण्याची पूर्ण तयारी त्यांची आहे. तशीही शेतकऱ्याची जी पिढी शिकली ती सरकारी निमसरकारी व्यवस्थापनात स्थिरावत असल्याचे चित्र दिसत आहे. शेतात भरवशाचे उत्पादन नाही. शेतजमिनीला किंमत मात्र पूर्वीच्या तुलनेत भरमसाठ म्हणावी अशीच आहे. दुर्दैवाने नोंदणी करताना कमी किंमतीची नोंदणी होत असल्याने सरकारदरबारी जमिनीची किंमत कमी असल्याचे दिसते खरे! पण ते सत्य नाही. रोडलगतच्या जमिनी बिल्डर, प्रापर्टी डीलर यांनी खरेदी केलेली आहे. त्या पैशातून शेतकऱ्यांची मुले शिक्षणसंस्थाचालकांना पंधरा ते वीस लाख रु. देऊन नोकरी विकत घेत आहेत. अशी भीषण अवस्था असली तरी तेरी भी चूप मेरी भी चूप असे झाले आहे. पैसे देऊन नोकरी घेणारा खाजगीत इतके द्यावे लागले, हे सांगतो पण उघड बोलत नाही. घेणारा तर बोलणार नाहीच! ही वास्तवता आहे.
आयकर चुकविण्यासाठी मोठ्या किंमतीने जमीन खरेदी करून पीक न घेताच शेतावर मशागत बी-बियाणे मजुरी इ.इ. खर्च दाखवून कर चुकवेगिरीही मोठ्या प्रमाणात होत आहे. एक गोष्ट दुसरीशी निगडित असताना त्याचा पृथक विचार कसा होऊ शकेल.
पंच्याहत्तर-अंशी टक्के शेती व्यवसायाशी निगडित असलेल्या जनतेला तुम्ही नुसतेच संघटना-सहयोग या गोष्टी शिकविणार आहात का? नि हे शिकवीत असताना मानवी वृत्तीत झालेल्या बदलाची दखल कोण घेणार?
शासनाने दोन रुपये किलोने धान्य, नि निराधार म्हणून सहाशे रुपये देऊन लोकांना आळशी करून ठेवले आहे. धडधाकट स्त्री-पुरुषही आज मजुरीला जायला तयार नाहीत. त्यामुळे कामाला मजूर मिळत नाहीत. शेती एकट्याने करावयाचा व्यवसाय नाही. शासनाकडून मदत घेणारे, शेतात काम करायला तयार नाहीत. अशा अवस्थेत शेतकरी अडकला आहे.
दुसरीकडे अमर्त्य सेनसारखा अर्थशास्त्री म्हणतो, ‘मोजक्या लोकांना उच्च आणि उत्तम संधी मिळणार असेल तर, उर्वरित समाज त्याकडे असूयेने पाहणार. अभिजन वर्गात दाखल होणे हा कुठल्यातरी वर्गाचा विशेष अधिकार ठरू लागतो. तेव्हा उच्चवर्गीय आणि अभिजन यांच्याविषयी तेढ वाढते.’ सवलतीचा दुरुपयोग होत आहे, हे अमर्त्य सेनांना कोण सांगणार!
त्यातच आज गावात जे नोकरदार (शासकीय/निमशासकीय) आहेत त्यांचे राहणीमान, वापरले जाणारे कपडे, कास्मेटिक्स, साबण, शेतकऱ्याची बायको मुलेही मागू लागली आहेत. शिक्षणाचा अभाव, संस्कारित शिकवण कुठे मिळणार! काटकसरीने नि घोंगळी आहे तेवढे पाय पसरावे, अशी म्हण होती. पण ती आता कालबाह्य झाली आहे. मिळेल तितके कर्ज घेऊन घर चालविण्याची वृत्ती बळावत आहे.
कर्ज मिळेनासे झाले नि घेतलेले कर्ज फेडेनासे झाले की, कर्ज देणारे लोक धनको, बँका परतफेडीचा/वसुलीचा तगादा लावणारच, त्यातून सुटायचे तर शेवटचा मार्ग फास लावन घेणे, विषारी किटकनाशक घेणे नि स्वतःला संपविण्याचा अघोरी मार्ग पत्करतो. आत्महत्या करणाऱ्याला दोन लाख रु. देण्याची सरकारची घोषणाही त्याला कारणीभूत आहे. आत्महत्याग्रस्ताला वाटते मी मेलो, नि कुटुंबाला दोन लाख मिळाले तर उर्वरित कुटुंबातले लोक सुखी होतील. पण ही दोन लाखांची ऑफर फसवी आहे हे त्याचे ध्यानी येत नाही.
कारण मिळणारे दोन लाख त्या कुटुंबासाठी नसून बँकांना पुष्ट करण्यासाठी असतात. दोन लाखातले व्याजासकट बँक कापून घेणार! उर्वरित रक्कमेचे वाटेकरी गावातले बचत गट, सावकार हे असतात. म्हणजे पुनः ते कुटुंब उघड्यावरच! ऐंशी टक्क्यांच्या करावर वीस टक्क्यांची मिरासदारी चालली आहे. या वीस टक्क्यांना ऐंशी टक्क्यांच्या बरोबरीत आणा! देशातला एकही आर्थिक प्रश्न शिल्लक राहणार नाही. नि सामान्य माणसाला जगायला अवसर मिळेल.
श्री मोहनीजी म्हणतात एकमेकांच्या सहकार्याने जमिनीच्या मोठ्या तुकड्यावर शेती केल्याशिवाय तरणोपाय नाही. ही कधीही न घडणारी गोष्ट आहे. हे मोहनीजींना इतक्या वर्षांच्या अनुभवाने कळू नये का?

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.