आत्मा आणि पुनर्जन्म : सत्य की कपोलकल्पित? (भाग-२)

बहिर्गमन ही काय भानगड आहे?
गर्भनलिकेमध्ये जेव्हा वडिलांकडून आलेले पुंबीज आणि आईकडून आलेले स्त्रीबीज (Ovum) यांचा संयोग होतो तेव्हा आत्मा त्यात प्रवेश करतो आणि माणसाच्या मृत्यूच्या वेळी तो बाहेर पडतो अशी कल्पना आहे. ही कल्पना शास्त्राद्वारे चुकीची सिद्ध करण्याचा हा प्रयत्न:
1) एका वीर्यामध्ये (साधारण पाव चमचा) सहा ते बारा दशलक्ष शुक्राणू असतात. वीर्यपतनाच्या वेळी साधारण 3-4 घनसेंमी वीर्य पडते म्हणजे एका समागमाच्या वेळी दोन ते तीन कोटी इतके शुक्राणू मातेच्या योनिमार्गात सोडले जातात. त्यांतील फक्त एक शुक्राणू स्त्रीबीज फलित करतो. बाकी दोन ते तीन कोटी शुक्राणू नष्ट होतात. मग त्या एका यशस्वी शुक्राणूतच मागच्या जन्मीच्या कोणाचा तरी आत्मा असतो काय?
2) गर्भधारणेच्या वेळी, म्हणजे पुंबीज आणि स्त्रीबीज फलित होण्याच्या वेळीच आत्मा शरीरात प्रवेश करीत असेल, तर ‘क्लोनिंग’ पद्धतीने तयार करण्यात आलेल्या ‘डॉली’सारख्या अनेक मेंढ्यांचे आणि इतर प्राण्यांचे काय? कारण ‘क्लोनिंग’मध्ये पुंबीजाची आवश्यकताच नसते. म्हणजे ‘डॉली’ मध्ये आत्मा नसूनही ती आयुष्य जगली काय?
3) टेस्ट ट्यूब बेबी (Invitro fertilisation I.V.E) तयार करणारे तज्ज्ञ त्यांच्या मर्जीनुसार आणि त्यांना उपलब्ध वेळेनुसार मातेच्या शरीराच्या बाहेरच कृत्रिम गर्भधारणा करतात. त्यावेळी त्या गर्भात घालण्याकरिता ते कोठून ‘आत्मा’ पकडून आणतात?
4) मत्स्यपालन आणि कुक्कुटपालनाचा धंदा करणारे अनेक धंदेवाईक ‘हार्मोनसारखी’ औषधे वापरून माशांची आणि कोंबड्यांची संख्या वाढवितात. ते कोठून इतके आत्मे आणतात?
5) स्त्रीबीज आणि शुक्राणू, प्रयोगशाळेत द्रव नायट्रोजन वापरून क्रायोप्रिझर्वेशन या पद्धतीने अनेक वर्षे साठवून ठेवता येतात. शास्त्रज्ञांच्या मर्जीनुसार त्यांचे मीलन घडवून आणता येते. त्यावेळी इतक्या वर्षांनंतर ते शास्त्रज्ञ कोठून आत्मा आणतात?
6) अतिसूक्ष्म विषाणू जीवाणू किंवा अमिबासारखे एकपेशीय जंतू सोडले तर इतर सर्व सजीवांत कोट्यवधी पेशी असतात. मानवाच्या शरीरात 10,00,00,00,00,00,000 (103) इतक्या पेशी असतात. यांतील प्रत्येक पेशीला स्वतंत्र अस्तित्व असते. त्या स्वतंत्रपणे जन्मतात, वाढतात,
आणि मरतात. याचा अर्थ आपल्या शरीरात 101% इतके आत्मे असतात काय?
7) आपल्या शरीरातील लाखो पेशी रोज मरत असतात आणि तेवढ्याच उत्पन्न होत असतात. आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशी ज्या रोगजंतूंसारख्या बाह्य शत्रूचा नायनाट करतात, त्यांचे आयुष्य तर फक्त 7-8 तासांचे असते. त्या प्रत्येक पेशीला स्वतंत्र अस्तित्व असते. याचा अर्थ आपल्या शरीरातून रोज लाखो आत्मे बाहेर पडत असतात आणि तेवढेच आपल्या शरीरात जात असतात काय?
8) या पेशींना जगण्यासाठी ‘आत्म्याची’ जरूरी नसून फक्त ऊर्जेची जरूरी असते. अशा पेशी प्रयोगशाळेत काचेच्या थाळीत वाढविता येतात.
9) आत्मा हा जर ऊर्जारूपी असेल तर त्याला विश्वातील इतर ऊर्जाचे (उदा. विद्युत् औष्णिक, सौर, ध्वनि वा चल ऊर्जा) गुणधर्म लागू पडले पाहिजेत. आपल्या शरीरात असणाऱ्या सर्व प्रकारच्या ऊर्जा ह्या पूर्णपणे त्यांच्या भौतिक व रासायनिक गुणधर्माप्रमाणे वागत असतात. उदा. आपल्या मेंदूतील पेशी रसायनांच्या माध्यमांतून विद्युत निर्माण करतात. ही मज्जातंतूसारख्या विद्युत्-रोधक आवरण माध्यमातून विद्युत निर्माण करतात. ही विद्युत मज्जातंतूसारख्या विद्युत्-रोधक आवरण असलेल्या (इन्स्युलेटेड) तारांमधून शरीरातील निरनिराळ्या अवयवांकडे पाठविली जाते आणि तेथे काहींचे परत रसायनांत परिवर्तन होऊन शरीरांतील सर्व कार्ये होतात. हृदयातही तसेच. हृदयातील ‘सायनो ॲीयल (Sino-artrial) आणि सायनो ऑरिक्युलर नोड (Sino-auricular node) मध्ये तयार होणाऱ्या विद्युत ऊर्जेमुळे हृदयाचे स्पंदन होते.
मेंदूतील विद्युत इ.इ.जी. (इलेक्ट्रो एनसॅफॅलोग्राम) यंत्राने मोजता येते. त्यांचे आलेख काढता येतात. हृदयांतील विद्युत् इ.सी.जी. (इलेक्ट्रोकार्डियोग्राम) यंत्राने नोंदता येते. मज्जातंतूमधून जाणारी विद्युत नर्व्ह कंडक्शन स्टडीजच्या माध्यमातून तपासता येते.
शरीरातील इतर सर्व क्रिया रासायनिक, विद्युत, चलत किंवा भौतिकशास्त्राचे नियम काटेकोरपणे पाळूनच होत असतात. त्यांना कोणत्याही ‘आत्म्याच्या’ शक्तीची जरूरी नसते. परंतु पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या पंचमहाभूतांपासूनच (पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश) मिळणाऱ्या शक्तीची असते मात्र. जोपर्यंत कोणत्याही सजीवाला ही ऊर्जा मिळत असते आणि त्या जीवाची मूळ रचना किंवा सांगाडा (इन्फ्रास्ट्रक्टर) शाबूत असतो, तोपर्यंत तो जीव जगू शकतो.
10) सजीव आणि निर्जीव वस्तूंत काय फरक आहे? कोणतेही कार्य करण्याकरिता सजीवांना आणि कोणत्याही हालचाल करणाऱ्या किंवा कोणत्याही प्रकारची ऊर्जा निर्माण करणाऱ्या निर्जीवांना दोन गोष्टींची आवश्यकता असते. एक म्हणजे त्या वस्तूची मूळ रचना किंवा सांगाडा आणि दुसरी म्हणजे कोणत्या तरी प्रकारची ऊर्जा. आपण घड्याळाचे उदाहरण घेऊ या. कोणत्याही घड्याळाला – मग ते बॅटरीवर चालणारे असो की स्प्रिंगवर – दोन गोष्टींची आवश्यकता असते निरनिराळ्या छोट्या छोट्या भागांपासून, चाकांपासून बनविलेला एक सांगाडा. एक गुंतागुंतीची रचना, आणि ती चाके, घड्याळाचे काटे फिरविण्याकरिता लागणारी ऊर्जा. ही ऊर्जा एकतर बॅटरीच्या माध्यमातून किंवा पूर्वीच्या घड्याळांत किल्लीने स्प्रिंग घट्ट करून दिली जाते.
घड्याळाला दिलेली ऊर्जा बॅटरी पूर्ण उतरल्याने काढून घेतल्याने किंवा चावी संपल्यावर घड्याळाची ‘टिकटिक’ बंद होते. परंतु या परिस्थितीत घड्याळाची अंतर्गत रचना पूर्णपणे शाबूत असते आणि नवीन बॅटरी टाकल्यावर किंवा परत चावी भरल्यावर घड्याळ पूर्ववत चालू होते. परंतु त्या घड्याळांतील एखादा जरी भाग, एखादे चाक किंवा तार तुटली वा बिघडली, तर जोपर्यंत तो भाग दुरुस्त न करता किंवा न बदलता त्या घड्याळाच्या कितीही बॅटऱ्या बदलल्या किंवा त्याला कितीही चावी भरली तरी ते घड्याळ चालणार नाही. घड्याळाने त्याचे कार्य व्यवस्थित करण्याकरिता त्याचे सर्व भाग, अंतर्गत रचनाही, शाबूत पाहिजे आणि योग्य ती ऊर्जा त्याला दिली गेली पाहिजे.
त्याचप्रमाणे कोणत्याही जिवंत पेशीला आवश्यक असलेली ऊर्जा अन्न, पाणी, ऑक्सिजन ह्यांसारख्या गोष्टी मिळाल्यावर आणि त्यांची रचना शाबूत असेल तरच त्यांचे जीवनकार्य चालू राहील. नाहीतर त्या मरतील. सजीवांत आणि निर्जीवांत एक फार मोठा फरक आहे. कोणतेही सजीव – मग तो कोणताही प्राणी असतो की वनस्पती – स्वतःला लागणारी ऊर्जा आणि स्वतःची रचना शाबूत राखण्यासाठी लागणारे पदार्थ (लोह, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशिअम इ. मूलद्रव्ये) या दोन्ही गोष्टी निसर्गातून म्हणजे पंचमहाभूतांपासून स्वबळाने मिळवून त्यांचा उपयोग स्वतःच्या जीविताकरता करू शकतात. कुंडीत लावलेल्या एखाद्या छोट्याश्या रोपाला पाणीच घातले नाही, त्याची मातीच काढून घेतली किंवा त्याला हवाबंद वातावरणात ठेवले तर त्या रोपट्याचा तात्काळ मृत्यू होणारच.
ह्या उलट कोणत्याही निर्जीव वस्तूला, यंत्राला, मोटारगाडीला, गीझरला, रेडियोला टी.व्ही.ला किंवा संगणकाला त्यांचे कार्य करण्याकरिता बाहेरून कोणत्या तरी रूपात ऊर्जा पुरवावी लागते; अन्यथा त्या कामच करणार नाहीत.
11) आता वरील तत्त्वाचा उपयोग जीवन-मरणाच्या बाबतीत करून पाहू.
आपले जीवन हे एखाद्या समईप्रमाणे (त्यांतील तेल-वातीसकट) असते. तेल घातलेल्या समईची वात आगपेटीने (बाह्य शक्तीने) पेटवली की त्यात जोपर्यंत तेल म्हणजे शक्तीचा स्रोत आहे तोपर्यंत ती तेवत राहील. हवेच्या झोताने किंवा कुंकर मारून तिची ज्योत विझवली, तरी ती परत पेटवता येते. कारण तिच्यातील तेल (ऊर्जा) आणि तिची वात (मूळ रचना शाबूत असतात. परंतु समईत तेल टाकले नाही तर शेवटी वात जळून तिची राख होते. म्हणजे तिची ऊर्जा आणि त्याबरोबर तिची रचना/सांगाडा, दोन्ही नष्ट पावतात. नंतर तिच्यात कितीही तेल टाकले, तरी जोपर्यंत तिच्यात नवीन वात (नवीन शरीर) घालीपर्यंत तिला पेटविता येणार नाही.
मातेच्या स्त्रीबीजाला पित्याच्या पुंबीजाशी संयोग करून पेटविलेल्या त्या एकपेशीय वातीपासून कोट्यवधी (103) पेशी असलेला हा मानवाचा देह प्रथम आपल्या आईच्या उदरातून ऊर्जा आणि ऑक्सिजनसकट इतर सर्व पदार्थ घेतो, आणि जन्म झाल्यानंतर पहिल्या श्वासापासून हवेतून ऑक्सिजन आणि मातेच्या दुधातून इतर लागणारी द्रव्ये घेत वाढतो. नंतर स्वतःच्या हाताने आपले अन्न पाणी घेऊन आणि नाकाने श्वास घेऊन या शरीराचा हा गुंतागुंतीचा सांगाडा शाबूत तेवत असतो. .
जोपर्यंत त्याला खाण्यापिण्यातून ऊर्जा मिळत राहते ……… इत्यादीवर जाते. शरीराच्या सर्व मूळ गरजा-श्वसन, रक्तभिसरण, इत्यादींवर नियंत्रण ठेवणाऱ्या (मेंदूच्या मुळाशी असलेला एक छोटासा भाग) (ब्रेनस्टेम) मधील पेशीची रचना शाबूत असते (म्हणजे समईत वात शाबूत असते) तोपर्यंतच माणूस जिवंत राहू शकतो. कोणत्याही कारणाने जर त्याच्या ऊर्जेचा स्रोत बंद झाला तर तो हळूहळू झिजत मरतो. एकाएकी श्वास बंद पडल्यामुळे जीवनाला अत्यावश्यक ऑक्सिजनचा पुरवठाच बंद झाला, तर फुकर मारून समईची ज्योत क्षणार्धात विझल्याप्रमाणे त्याचा अंत होतो.
जन्म-मरणाच्या ह्या क्रियेत कोठेही शरीरात आत्मा शिरण्याचा वा बाहेर पडण्याचा संबंधच येत नाही. या सर्व भौतिक क्रिया आहेत.
समईला कुंकर मारून विझविल्यानंतर समईतील वात शाबूत असल्यामुळे ती परत पेटविता येते. तद्वतच हार्ट अॅटॅक येऊन किंवा ऑपरेशन टेबलावर भूलीच्या औषधाची जास्त मात्रा दिल्यामुळे हृदयक्रिया आकस्मिकपणे बंद पडली तर हृदयाला, छातीला, मसाज करून, इलेक्ट्रिक शॉक देऊन, ऑक्सिजन वा कृत्रिम श्वसन देऊन, एखादेवेळेस त्या व्यक्तीला पुनरुज्जीवन देता येते, कारण यावेळेस मेंदूतील ब्रेनस्टेमच्या श्वसनक्रिया आणि हृदयक्रिया नियंत्रित करणाऱ्या पेशी शाबूत असतात (समईची वात) म्हणून बाह्य उपायाने हृदय आणि श्वसनक्रिया परत सुरू करता येते, परंतु ही बाह्य मदत हृदय आणि श्वसन बट पडल्यापासून एक ते दीड मीनिटाच्या आत दिली गेली, तरच पुनरुज्जीवन शक्य होते. समईची वात जळल्यावर किंवा घड्याळाचा एखादा भाग कायमचा नादुरुस्त झाल्यावर कितीही प्रयत्न केला तरी त्या पेशींना परत जीवित करता येत नाही. समईसारखी त्यांची वात बदलता येत नाही किंवा घड्याळासारखा एखादा नवीन पार्ट टाकून ते पेशीचे घड्याळ परत चालू करता येत नाही. यात आत्मा बाहेर पडून माणूस मरण्याचा काहीएक संबंध नाही. या सर्व भौतिक, रासायनिक आणि जीवशास्त्रीय क्रिया आहेत. मेंदूला कोणत्याही कारणामुळे गंभीर इजा होऊन ब्रेन स्टेनला धक्का पोहोचून आकस्मिक मृत्यू येतो. त्यातही ‘आत्मा’ बाहेर पडण्याचा काही संबंध नाही.
आजचे युग (ऑर्गन ट्रान्सप्लाँटचे) हे निरनिराळ्या अवयवांच्या प्रत्यारोपणाचे युग आहे. आज जगात जिवंत किंवा मृत व्यक्तींपासून काढलेल्या मूत्रपिंड, यकृत, हृदय, डोळ्यांचा पुढचा पडदा अशा अनेक अवयवांचे दान देऊन त्यांचे गरजू रुग्णांत प्रत्यारोपण करण्यात येते. यांपैकी मूत्रपिंडांचे दान एक जिवंत व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीस करू शकते कारण माणसाला दोन मूत्रपिंड असतात. नेत्रदान हे व्यक्ती मृत पावल्यानंतर 1-2 तासानंतरसुद्धा करता येते. परंतु यकृत आणि हृदय यांच्यासारख्या अवयवांचे दान मृत व्यक्तीकडूनच घेता येते. हे काम व्यक्तीच्या निधनानंतर ताबडतोबच करावे लागते. कारण यकृताच्या आणि हृदयाच्या पेशी ऑक्सिजन, पाणी आणि ग्लुकोजअभावी काही मिनिटांतच मरण पावतात. मग याचे दान कसे शक्य होते? एखाद्या मरणासन्न, मुख्यतः मेंदूला गहन इजा झालेल्या व्यक्तीला वाचवण्याकरिता अगोदरच त्याच्या श्वसननलिकेत नळी घालून त्याला कृत्रिम श्वसन चालू असेल आणि नैसर्गिक किंवा यंत्राच्या साहाय्याने त्याची हृदयक्रिया आणि रक्ताभिसरण चालू असेल तर अशा व्यक्तीचे हृदय किंवा यकृत ती मृत झाल्यावर काढून ते दुसऱ्या रुग्णाला देता येते. ही मशीनच्या साहाय्याने देण्यात येणारी कृत्रिम क्रिया केव्हा बंद करावी, जीवन चालू ठेवणाऱ्या यंत्राचे बटन केव्हा बंद करावे, ती व्यक्ती मृत झाली हे केव्हा जाहीर करावे हा मोठा गहन प्रश्न इंद्रियदानाच्या शस्त्रक्रिया करणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकापुढे आज उभा आहे.
तात्पर्य असे, आज मृत्यूची व्याख्या पूर्णपणे बदलली आहे. पूर्वी श्वास आणि हृदय बंद पडले की ती व्यक्ती मृत झाल्याचे घोषित करण्यात येत होते. आजही साधारणपणे असेच म्हटले जाते परंतु अतिदक्षता विभागात आणि प्रामुख्याने जेथे अवयवाच्या दानाच्या शस्त्रक्रिया होतात तेथे ही व्याख्या कुचकामाची आहे कारण श्वसन आणि हृदयक्रिया या दोन्ही गोष्टी नातेवाईकांची इच्छा असेपर्यंत यंत्राच्या सहाय्याने चालू ठेवता येतात.
आज वर ब्रेनस्टेमच्या मेंदूपेशींना कायमची हानी झाल्यास ती व्यक्ती मृत झाल्याचे घोषित करण्यात येते. हे इलेक्ट्रो-एनसेफॅलोग्रामसारख्या यंत्राने सिद्ध करता येते. अशा व्यक्तींचे निरनिराळे अवयव, कृत्रिम श्वसन आणि रक्ताभिसरण चालू असतानाच काढून घेतले जातात आणि मगच मशीनचे बटन बंद केले जाते. याचा अर्थ आजच्या परिभाषेत त्या व्यक्तीच्या मृत्यू (पूर्वीच) मेंदूस मार लागतो तेव्हाच झालेला असतो. आता आत्म्याच्या संदर्भात बोलावयाचे झाल्यास अशा व्यक्तीचा आत्मा त्याच्या शरीराबाहेर केव्हा पडला असे समजावे? तिला अपघात होऊन मेंदूस इजा पोहोचली तेव्हा, की कृत्रिम श्वसन देणाऱ्या मशीनचे बटन बंद केले तेव्हा?
याचाच अर्थ असा की माणसाचा मृत्यू आणि आत्म्याचे शरीराबाहेर जाणे यांचा काहीही संबंध नाही. मृत्यू ही एक रासायनिक आणि भौतिक क्रिया आहे.
आपण वर पाहिल्याप्रमाणे आकस्मिक हृदयप्रक्रिया बंद पडल्यानंतरची उपाययोजना जर थोडी उशिरा म्हणजे 1-2 मिनिटानंतर सुरू केली, तर एखादे वेळेस ब्रेनस्टेम मधील पेशींचेकार्य आणि त्याद्वारे स्वसन आणि हृदयक्रिया परत सुरू होतात, पण या 1-2 मिनिटांच्या कालावधीत मोठ्या मेंदूतील (Cerebral) पेशींना रक्तपुरवठा न झाल्यास तेथील पेशी मरूही शकतात.आपल्याला असलेली जाणीव (Consciousness) विचार करणे, सर्व इंद्रियांपासून आलेले संदेश ग्रहण करणे आणि त्यानुसार शरीरातील सर्व ऐच्छिक क्रिया करण्याचे तसेच बुद्धीशी संबंधित सर्व गोष्टी करण्याचे ठिकाण मोठ्या मेंदूत असते (Cerebral cortex). रक्तपुरवठा बंद पडल्याच्या काळात मेंदूच्या या भागाला इजा झाली तर, जरी ती व्यक्ती श्वास घेत असली किंवा तिचे हृदय चालू असले तरी स्वतः होऊन खाणे पिणे, उठणे बसणे, चालणे फिरणे, बोलणे पाहणे किंवा मलमूत्र-विसर्जन यांसारख्या कोणत्याही क्रिया न करता ती एखाद्या झाडाप्रमाणे, वनस्पतीप्रमाणे नुसते पडून जीवन जगत असते. तिला जगविण्याकरिता नाकांतून पोटात नळी घालून अन्नपुरवठा करावा लागतो आणि मलमूत्र विसर्जनाच्यासारख्या क्रिया कृत्रिमरीत्या करवून घ्याव्या लागतात. यालाच पर्सिस्टंट व्हेजेटेटिव्ह स्टेट PVC असे म्हणतात.
आपल्या वेद-उपनिषदांसारख्या पवित्र ग्रंथांत सांगितल्याप्रमाणे बुद्धी, विचार, कल्पना, नैतिकता यांसारख्या गोष्टी ‘आत्म्यामुळे शक्य होत असतील तर अशा वनस्पतिसदृश जीवन जगणाऱ्या व्यक्तींना त्यांचा आत्मा सोडून गेलेला असतो काय? मग त्या श्वास कशा घेतात? त्यांचे हृदय कसे चालते जर हे आत्म्यामुळे शक्य होत असेल व त्यांचा आत्मा शरीरातच असेल तर मग त्या चालत-फिरत-बोलत का नाहीत? यांचे उत्तर एकच आहे की, जीवन, मरण, बुद्धी, विचार, मन यांपैकी कोणत्याही गोष्टींशी ‘आत्मा’ या कल्पनेचा सुतराम संबंध नाही. कारण, असा कोणताही आत्मा आपल्या शरीरात कोठून येत नाही आणि आपण मेल्यावर तो निघून जाऊन दुसऱ्या शरीरांत प्रवेश करीत नाही. या सर्व गोष्टी पूर्णपणे रासायनिक, भौतिक आणि जैविक सिद्धान्तानुसार होत असतात.
‘प्रत्येक जिवंत प्राणिमात्रांत आत्मा असतो. आत्म्याशिवाय कोणताही जीव जगूच शकत नाही. आत्मा निघून गेल्यावर त्या जिवंत शरीराला कलेवर म्हणतात.’ हे जर खरे असेल तर मानव जातीला आंव किंवा आमांशसारखे आजार देणाऱ्या अमिबासारख्या एकपेशीय जीवातही आत्मा असलाच पाहिजे. प्रयोगशाळेतील सूक्ष्मदर्शक यंत्राखाली अमिबाच्या सर्व हालचाली, तो त्याचे अन्न कसे खातो, आपला आकार कसा बदलतो या सर्व गोष्टी दिसतात. त्याचप्रमाणे एका अमिबाचे विभाजन होऊन एकाच गुणाचे दोन स्वतंत्र जीव कसे तयार होतात हे देखील प्रयोगशाळेत बघता येते.
आता प्रश्न असा येतो की, मूळ अमिबात आत्मा होता मग दुसरा अमिबा तयार होताना त्या आत्म्याचे दोन आत्मे तयार झाले का? तसे नसेल तर नवीन जीवात कोठून तरी दुसरा आत्मा आला का? आणि तो पूर्वीच्या कोणत्या शरीरातून आला? की एखाद्या मानवप्राण्याच्या मृत्यूनंतर त्याने केलेल्या कुकर्मामुळे त्या आत्म्याला या अमिबाचे शरीर मिळाले? का चौऱ्याऐंशी योनीतील कोणत्यातरी एखाद्या जीवातून आला?
जर या अमिबाच्या आत्म्याला ‘मुक्ती’ पाहिजे असेल तर स्वामी विवेकानंद म्हणतात त्याप्रमाणे त्याला प्रत्येक आयुष्यात चांगली कर्मे करीत करीत शेवटी परत माणसाच्या शरीरात प्रवेश करूनच ती प्राप्त करावी लागेल. कारण स्वामीजींच्याच शब्दांत सांगावयाचे तर “मनुष्य हा सर्व प्राणिमात्रांतच नव्हे तर” देवदूतांपेक्षाही श्रेष्ठ आहे. अगदी देवांनासुद्धा मोक्षप्राप्ती पाहिजे असेल तर त्यांना पृथ्वीवर येऊन मानवाचा देह धारण करूनच तो प्राप्त करून घ्यावा लागेल.
आता जर या अमिबाच्या आत्म्याला मुक्ती हवी असेल, तर त्याला हळूहळू नवीन नवीन शरीरे धारण करत शेवटी माणसाच्या जन्मात यावे लागेल. तरच त्याला ब्रह्मतत्त्वांत विलीन होता येईल. पण काय दैवदुर्विलास! अमिबाला स्वाभाविक मृत्यूच नाही!
त्याला फक्त जगणे आणि दुभागून आपला वंश वाढविणे एवढेच माहीत आहे. त्यामुळे त्या बिचाऱ्या आत्म्याला मुक्तीची शक्यता नाही. अनंत काळपर्यंत त्याला तो सध्या राहत असलेल्या ‘नरकातच’ राहावे लागणार आहे.
काही कारणामुळे त्याला मृत्यू आला तरच या नरकातून त्याची सुटका होईल आणि ते काम बहुधा एखादा आमांश (आंव) झालेल्या मानवाने त्याला अॅमीबीसायडल (अमीबाला मारणारे) औषध देऊनच होऊ शकेल!
आत्म्याशी संबंधित इतर गूढ घटना
पुनर्जन्म: सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आत्म्याच्या अस्तित्वाशिवाय पुनर्जन्म शक्य नाही. भारतात तर ‘पुनर्जन्म’ ही प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत घडणारी अटळ अशी घटना मानली जाते. पण जगभरात इतरत्रही पुनर्जन्माच्या अनेक घटना अगदी सत्य म्हणून नोंदविल्या गेल्या आहेत. अनेक व्यक्ती, आपल्या अनेक शतकांपूर्वीच्या पूर्वायुष्यांतील घटना अगदी बारीक-सारीक तपशिलांसह कथन करीत असतात. अशा घटना आत्म्याच्या अस्तित्वाचा सबळ, स्पष्ट व निश्चित पुरावा आहे असे ठामपणे सांगितले जाते.
आतापर्यंत आपण बघितल्याप्रमाणे आत्माच जर अस्तित्वात नसेल तर ह्या घटनांचे स्पष्टीकरण कसे देता येईल? ‘गॉड, डेमन्स अॅण्ड स्पिरिट्स् या 1970 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात डॉ. अब्राहम कोवूर यांनी या सर्व घटना बनावट आणि फसवेगिरीच्या असतात हे सप्रमाण स्पष्ट केले होते.
इंग्लंड, अमेरिकेमधील मानसोपचार व संमोहनतज्ज्ञांनी अनेक व्यक्तींना संमोहित करून त्यांच्या पूर्वायुष्यात जाण्यास सांगून अशा पुनर्जन्माच्या घटनांचा अभ्यास केला. या तंत्राला ‘हिप्नोटिक रिग्रेशन’ तंत्र ‘पुनर्जन्म उत्खनन’ प्रक्रिया असे म्हणतात.
इ.स.1952 मध्ये अमेरिकेत या प्रकारचे कार्य ‘मर्फी’ नावाच्या व्यक्तीपासून सुरू झाले आणि त्यानंतर तेथे अशा घटना शोधून काढण्याची एक लाटच आली. डॉ. बियान विझ यांनी सम्मोहित प्रतीपगमन (हिप्नोटिक रिग्रेशन’) हे तंत्र अधिकच विकसित केले. या तंत्रात संमोहन तज्ज्ञ एखाद्या व्यक्तीला संमोहित करतो नंतर त्या व्यक्तीला आपल्या गतायुष्यात जाऊन त्यावेळची परिस्थिती, अनुभव, कथन करण्याची सूचना दिली जाते. सर्व कथन ध्वनिमुद्रित किंवा त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हावभावही टिपण्यासाठी व्हीडीओ रेकॉर्डिंग करण्यात येते. संमोहन अवस्थेत असताना त्या व्यक्तीस सांगितले जाते. आता तू 14 वर्षांच्या वयात जा, आणि सांग, काय होते आहे; आता तू 5 वर्षांचा आहेस आणि तुझे अनुभव कथन कर, असे करत करत त्या व्यक्तीला सांगण्यात येते आता तू तुझ्या पूर्वायुष्यात जात आहेस, पूर्वायुष्यात गेला आहेस. आता तू काय अनुभवत आहेस ते सांग.
रेकॉर्ड केलेल्या त्या टेप्सचा नंतर सखोल अभ्यास करण्यात येतो अणि जर त्या व्यक्तीने पूर्वायुष्यांबाबत कथन केले, तर ती पुनर्जन्माची घटना असल्याचे मानले जाते त्या टेप्सचा नंतर सखोल अभ्यास करण्यात येतो आणि जर त्या व्यक्तीने पूर्वायुष्यांबाबत कथन केले, तर ती पुनर्जन्माची घटना असल्याचे मानले जाते. डॉ. विझ् यांनी अशा शेकडो व्यक्तींचे अनुभव एकत्रित करून त्या आधारावर 3 पुस्तके प्रकाशित केली ती सर्वच अतिशय लोकप्रिय झाली. इंग्लंडमध्येही ब्लॉक्सहॅम या संमोहन-तज्ज्ञाने अशा अनेक केसेसच्या टेप्स तयार केल्या. त्या आयव्हर्सन नामक निर्मात्याने बी.बी.सी.वरून प्रक्षेपित केल्या. आयव्हर्सनने ब्लॉक्सहॅमकडील 400 टेप्स ऐकल्या. त्यांतील ज्यांचा पडताळा घेता येणार नाही अशा टेप्स नाकारून, खात्रीने पडताळा घेता येईल अशा फक्त 2 टेप्सची त्याने सखोल चिकित्सा केली. त्यांतील पहिली केस जेम्स इव्हॅन्स या वेल्श मोलकरणीची. एव्हॅन्सने संमोहित अवस्थेत पूर्वजन्मीच्या 6 आठवणी सांगितल्या. त्यांपैकी 3 आठवणींचा पाठपुरावा करून त्या खऱ्या असल्याचा दावा करण्यात आला. त्यातील एक तिसऱ्या शतकातील होती. त्यांत इव्हॅन्स ही टायटस नावाच्या कॉन्टेटियस या रोमन सरदाराच्या मुलांच्या शिक्षकाची पत्नी होती, तर इ.स. 1500 मध्ये इव्हॅन्स फ्रान्समध्ये अॅलिसन नावाची तरुण होती, तेव्हा ती कूर या श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी काम करीत होती. कूरच्या संदर्भात अगदी बारीक तपशील इव्हॅन्सने सांगितलेल्या ट्रेप्सवर होता. लुई व दुसरा चार्लस् राजा यांच्यामधील झगड्य तिला इत्थंभूत आठवत होता. कूरच्या संपत्तीविषयी आणि त्याच्या घराबद्दल तिला सर्वकाही आठवत होते. आपल्या धन्याच्या पोशाखाचा बारीक सारीक तपशील तिला आठवत होता. उदा. बंडीची तांबडी किनार, तांबडे बूट, कमरेचा रत्नजडित पट्टा इ.बद्दल. कूरच्या अटकेची तिला माहिती होती. अटक होण्यापूर्वी कूरने ॲलिसनला विषाचा प्याला देऊन तिचे जीवन संपविले. बी.बी.सी. टेलिव्हिजन प्रेक्षक संमोहित अवस्थेतील इव्हॅन्सच्या आश्चर्यकारक पूर्वस्मृती ऐकून प्रभावित झाले. इव्हॅन्स यावेळी नाटकी वाटत नव्हती. ती अगदी खरे बोलते आहे असे वाटत होते. संमोहनातून बाहेर आल्यावर तिला यांतील काहीही माहीत नाही असे तिने सांगितले.
आयव्हर्सन यांनी असा निष्कर्ष काढला की ‘ब्लॉक्सहॅमच्या टेप्सच्या पुराव्यावरून ठामपणे असे म्हणता येईल की या टेप्स म्हणजे पुनर्जन्माचे दर्शन होय. एवढा निष्कर्ष काढून तो थांबला. परंतु मेल्वीन हॅरीस या लेखकाने या प्रकरणाचा वस्तुनिष्ठ शोध घेतला. तेव्हा त्या, ह्याच जन्मातील, काही कारणाने पुसल्या गेलेल्या, नेणिवेत लुप्त झालेल्या व मागाहून संमोहनाने जागृत झालेल्या स्मृती असल्याचे त्याच्या लक्षात आले. या मनोविकाराला प्रच्छन्न स्मृतिलोप (क्रिप्टोम्नेशिया) असे नाव आहे. विविध ज्ञानेंद्रियांनी ग्रहण केलेलं माहिती अंतर्मनात साठून राहते. सर्वसामान्यपणे काळाच्या ओघात ती धूसर होते. पण कधी कधी ही अचानक व्यक्तही होऊ लागते. तेव्हा ती ऐकणाऱ्याला व त्या व्यक्तीला स्वतःलाही बुचकळ्यात टाकते. कारण या स्मृतीचा उगम ती व्यक्ती विसरलेली असते. यालाच प्रच्छन्न स्मृतिलोप (क्रिप्टोम्नेशिया) म्हणतात.
मेल्विन हॅरीस हे बी.बी.सी.शी संबंधित लेखक व निर्माते होते त्यांनी इव्हॅन्सच्या टेप्सची पूर्ण तपासणी केली. त्यांना असे आढळले की,
1) इव्हॅन्सने सांगितल्याप्रमाणे ती एका पूर्वजन्मात कॅथेरिन ऑफ अरेगॉनची दासी होती, या पूर्वजन्मातील तिच्या आठवणी जेना लेडीच्या ‘Catherine, The virgin widow’ या कादंबरीवर आधारित आहेत. ही कादंबरी इव्हॅन्सने वाचली असणार आणि ते ती आता विसरली असणार म्हणजे हा क्रिप्टोम्नेशिया चा प्रकार होता.
2)मात्र जेम्स कूर या 15 व्या शतकातील फ्रेंच व्यापाऱ्याच्या अॅलिसन या दासीबद्दल ही इव्हॅन्स इतक्या अचूकपणे कशी सांगू शकते? पण कूरच्या भव्य घराचे, आतील व बाहेरील भागाचे, छताच्या नक्षीकामाचे अचूक वर्णन देते, सॅरिल राणीच्या थडग्याची पण माहिती देते. जागृतावस्थेत तर तिला काहीच आठवत नाही. हे पूर्वजन्मातील स्मृतीशिवाय शक्य नाही असे मानले गेले.
पण वस्तुस्थिती काय आहे? सॉरेलचे थडगे आजही प्रवाशांच्या भेटीचे आकर्षण आहे ते कोणीही पाहू शकते.
सेजविकच्या ‘A Short Histoy of France’ या 1930 साली लिहिलेल्या ग्रंथात त्या थडग्याचे वर्णन आहे. हे पुस्तक सार्वजनिक ग्रंथालयात आणि शाळांतून ठेवलेले असते.
3) कूरच्या घराबद्दल काय वस्तुस्थिी आहे? फ्रान्समधील सर्वांत जास्त फोटोग्राफ घेतलेले ते घर आहे. Dame Erance च्या Life in Medieval France या पुस्तकात या घराचे सुंदर, स्पष्ट फोटो आहेत. या फोटोत घरातील फायरप्लेसच्या वरील छताचे नक्षीकाम स्पष्ट दिसते.
इव्हॅन्सने हे फोटो पाहिले असले पाहिजेत याबद्दल शंका नाही आणि संमोहनावस्थेत तेच वर्णन ती करीत असेल. इव्हॅन्सनच्या टेपवरील आठवणींचा उगम तिने वाचलेल्या ‘The Money Man’ या कूरच्या जीवनावर आधारित कादंबरीतून होता.
इव्हॅन्सने कूरच्या लग्नाबद्दल कौटुंबिक अशी कोणतीच माहिती तिच्या टेपमध्ये सांगितली नव्हती, कारण या कादंबरीच्या प्रस्तावनेतच कॉस्टन या लेखकाने लिहिले आहे. ‘कूरच्या कुटुंबीयांचा मी कादंबरीत कुठेच उल्लेख केलेला नाही. त्यामुळे इव्हॅन्सला त्याच्या कुटुंबाबद्दल काहीच माहिती सांगता आली नव्हती.
4) लिव्होनिया केस : इव्हॅन्सन तिच्या लिव्होनिया या पुनर्जन्माबद्दल सांगितलेले पूर्ण वर्णन 947 साली लुईस डी वूल याने लिहिलेल्या प्रचंड खपाच्या ‘The Living Wood’ या कादंबरीवर आधारित होते. अशाप्रकारे बी.बी.सी.ने प्रक्षेपित केलेल्या घटना या पुनर्जन्माच्या नसून एकतर इव्हॅन्सने वाचलेल्या ऐतिहासिक कादंबऱ्या, तिचा कल्पनाविलास आणि क्रिप्टोम्नेशिया हा तिचा मनोविकार यामुळेच होता हे निर्विवाद सिद्ध झाले आहे. त्या पुनर्जन्मामुळे नव्हत्या.
हीच गोष्ट, पुनर्जन्माच्या कोणत्याही दाव्याची खोलात जाऊन चौकशी केली तर सिद्ध होऊ शकते. 1956 मध्ये डॉ. झोलिक या मारक्वेट विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञाने क्रिप्टोम्नेशिया सप्रयोग सिद्ध केला. त्याने संमोहित व्यक्तींना पूर्वजन्म आठवायला सांगितला. तो आठवून त्यांनी डॉ. झोलिकला त्या आठवणी सांगितल्या. जागृतावस्थेत आल्यावर मात्र त्यांना त्याबद्दल काहीच आठवत नसल्याचे अगर माहीत नसल्याचे म्हणाले. परंतु जेव्हा त्या व्यक्तींना डॉ. झोलिक यांनी पुन्हा एकदा संमोहित करून, पूर्वजन्मीच्या म्हणून सांगितलेल्या हकीगती त्यांना कोठून मिळाल्या, त्यांचे उगमस्थान कोणते याची माहिती विचारली, तेव्हा कुठे त्या व्यक्तींनी ती माहिती दिली. सारांश तथाकथित पूर्वजन्माच्या हकिगती, याच जन्मातील पूर्वी अनुभवलेल्या भावनांचे मिश्रण झालेल्या स्मृति आहेत. सम्मोहित प्रतीपगमनाद्वारा पूर्वजन्म सिद्ध करू पाहणऱ्या संशोधकांना डॉ.झोलकनी आपली पद्धत वापरण्याचे आवाहन केले, पण संशोधकांनी त्याकडे कानाडोळा केला. ब्लॉक्सहॅमने 400 टेपचा डोंगर जमा केला पण या स्मृति क्रिप्टोम्नेशियातून असण्याची शक्यता पडताळून पाहिली नाही.
याउलट फिनलॅण्डमधील मानसशास्त्रज्ञ डॉ. कॅम्पमन यांनी अशा घटनंचा झोलिक पद्धतीने अभ्यास केला.आठवी-नववीच्या वर्गातील एका मुलीला डॉ. कॅम्पमननी संमोहित केले. प्रतीपगमनाच्या तंत्राने मुलीला मागे नेऊन पूर्वस्मृति आठवायला सांगितल्या असता तया मुलीने 8 पूर्वजन्माच्या स्मृति सांगितल्या. 13 व्या शतकातील एका खाणावळवाल्याची मुलगी असताना त्यावेळच्या जन्मात गायलेले Summer Song हे गीत गाऊन तिने सर्वांना धक्का दिला कारण चालू जन्मात हे गाणे तिने ऐकलेले वा वाचलेले नव्हते. तसे तिने संमोहित अवस्थेत सांगितले. नंतर झोलिक पद्धतीने मुलीला पुन्हा संमोहित करून, याच जन्मात मागे यायला सांगून वरील गीत तू केव्हा वाचलेस असा प्रश्न तिला विचारला असता. 13 व्या वर्षांपर्यंत मागे गेल्यावर, एका वाचनालयांतील शेल्फवरून ह्या गीताचे पुस्तक घेऊन आपण वाचल्याचे तिने सांगितले. एवढेच नव्हे तर हे गीत पुस्तकाच्या कितव्या पानावर आहे हेही तिला आठवले.
डॉ. कॅम्पमननी त्या वाचनालयात जाऊन ते पुस्तक शोधले. ते मिळाले. कविताही मिळाली. नेमक्या त्याच पानावर. म्हणजे 13 व्या शतकातील पुनर्जन्मामुळे नसून याच जन्मातील पुसल्या गेलेल्या स्मृतींमुळे संमोहनावस्थेत तिला ते आठवले.
पुनर्जन्म आहे हे सिद्ध करताना एखाद्या व्यक्तीने कधीही न पाहिलेली किंवा ऐकलेली गोष्ट (Xenoglossy) ती व्यक्ती कशी सांगू शकते याचे कारण पुनर्जन्म म्हणतात, पण हे खोटे आहे. उदा. कधीही इंग्रजी न शिकलेला एखादा खेडेगावातील मुलगा चकन इंग्रजी बोल लागतो. ह्याचे स्पष्टीकरण काय? लहानपणी टी.व्ही.वर त्याने इंग्रजी बातम्या, चर्चा, सिनेमा पाहिला असेल किंवा गावात झालेल्या एखाद्या इंग्रजी भाषणाच्या वेळी तो तेथे उपस्थित असेल. अशा वेळी त्याचे डोळे जे जे बघतील किंवा कान जे जे ऐकतील ते सर्व त्याला समजले नसले तरी त्याच्या मेंदूतील पेशींवर रेकॉर्ड केले जाते. पुढे मागे काही दुखण्यामुळे किंवा औषधांच्या वा मादक द्रव्यांच्या परिणामामुळे त्याच्या सेरेब्रेल कॉर्टेक्सच्या पेशींचे कनेक्शन जर डोळ्यांशी आणि कानाशी असलेल्या मेंदूतील भागाशी चुकून जोडले गेले (फोनवर होणाऱ्या क्रॉस कनेक्शनप्रमाणे) तर, त्याला त्या जुन्या काळातील आठवणी आणि शब्द त्याच्या जाणिवेत येतात. तो तसे कधीही न शिकलेले बोलू किवा सांगू शकतो. त्याचा पुनर्जन्माशी संबंध नाही.
जन्मजात हुशार मुले
अनेक मुले लहान वयात आपल्या असामान्य बुद्धिमत्तेने इतरेजनांना थक्क करतात. ज्ञानेश्वरांनीही लहान वयातच ज्ञानेश्वरी लिहिली. अगदी आजकालचे उदाहरण डॉ. ओकांनी आपल्या लेखात दिले आहे ते म्हणजे ‘रिपा शिवा’ या मुलीचे. तिने 10 व्या वर्षांतच तबला-वादनात जागतिक कीर्ती मिळविली होती.
अशा जन्मजात हुशारीचे कारण काय? पूर्वजन्मात याच विषयात मिळविलेल्या प्रावीण्यामुळे ते गुण, ती हुशारी या जन्मात आपल्याला प्राप्त होते आणि हे सर्व आत्म्याच्या अस्तित्वामुळेच शक्य आहे असे म्हटले जाते. रिपा शिवा ही पूर्वजन्मी तबलावादकच असली पाहिजे आणि या जन्मास ती तिचे उर्वरित कार्य पूर्ण करीत असली पाहिजे असे प्रतिपादन करण्यात येते. पण हे खरे आहे काय?
या बाबतीत तर आता शास्त्र अतिप्रगतावस्थेत पोहोचले आहे. हुशार मुलांच्या हुशारीचे कारण त्यांचा पुनर्जन्म नसून खालील दोन गोष्टी आहेत.
1) आनुवंशिकता
2) भोवतालची परिस्थिती म्हणजेच मुलाचे संगोपन व शिक्षण.
आनुवंशिकता ही अपत्याला आपल्या आईवडिलांपासून प्राप्त झालेल्या गुणसूत्रांतील जनुकांवर अवलंबून असते.
जनुक किंवा जीन हे कोणत्याही सजीवांतील आनुवंशिकतेचे मूल एकक आहे. डी.एन.ए. (डीऑक्सिरायबोन्युक्लिक ॲसिड) या रासायनिक द्रव्याच्या अनेक कणांपासून एक जीन तयार होतो. अगदी एकपेशीय विषाणु किंवा जीवाणुपासून ते अतिप्रगत मानवापर्यंत प्रत्येक पेशीत डी.एन.ए. आणि जनुके असतात. कोणत्याही सजीव गोष्टीचे अस्तित्व जनुकांवर अवलंबून असते. या जनुकामध्ये कोणत्याही पेशी तयार होऊन वाढण्याकरिता लागणारी संपूर्ण माहिती नोंदविलेली असते. त्याचप्रमाणे ही माहिती पुढे आपल्या वंशजांकडेही सरकविण्याची क्षमता त्यांच्याकडे असते. डी.एन.ए.च्या ज्या भागात ही माहिती असते, त्यालाच जनुक असे म्हणतात.
जनुकेच त्या सजीवाचे गुणविशेष आणि स्वभाव ठरवतात. सर्वसजीव, हे सुरुवातीच्या एका पेशीचे अनेक पेशींत विभाजन होऊन तयार होतात. माणसाच्या बाबतीत एका पुंबीजाने फलित केलेल्या एका स्त्रीबीजापासून अब्जावधी 1013 पेशी असलेला पूर्ण माणूस तयार होतो आणि त्या प्रत्येक पेशीत आईवडिलांपासून आलेली जनुके मूळ स्वरूपात असतात. त्या एका पेशीपासून त्या जीवाचे पुढे अमिबात रूपांतर करावयाचे की झाडात, त्याचे माकड तयार करावयाचे की माणूस, तो काळा की गोरा, उंच की बुटका, डोक्यावर टक्कल असलेली की खूप केसाळ, तापट की शांत स्वभावाचा, हुशार की मंदबुद्धीचा हे सर्व त्या मूळ पेशीत असलेले जीन्सच ठरवतात. रिचर्ड डॉकीन्सच्या शब्दांत सांगावयाचे झाल्यास, अखिल सजीव विश्वात आपली हुबेहूब प्रतिकृती निर्माण करणे हे फक्त जनुकांमुळेच शक्य होते आणि ते परत परत आपल्या प्रतिकृती निर्माण करून पुढच्या पिढीच्या रूपात आपले अस्तित्व चालू ठेवू शकतात. याचा अर्थ असा, की सजीवांत फक्त जनुकेच अमर्त्य असतात. म्हणजेच ते शाश्वत, अनादि, अनंत आहेत. ‘आत्मा’ नावाची कोणतीही शक्ती किंवा अव्यक्त गोष्ट हे साध्य करू शकत नाही कारण ती अस्तित्वातच नसते. आत्म्याचे जे गुणधर्म उपनिषदांत किंवा भगवद्गीतेत सांगितले आहेत ते फक्त जनुकांनाच लागू पडतात.
परंतु कोणतीही जनुके ही रासायनिक आणि भौतिक पदार्थांपासून बनलेली असून त्यांना भौतिकशास्त्राचे सर्व गुणधर्म लागू होतात आणि शरीराबरोबरच त्यांचाही मृत्यू होतो. शरीर जाळल्यावर तीही नष्ट होतात. परंतु आपल्या वंशांच्या, अपत्यांच्या स्वरूपात गुणधर्मांच्या रूपाने जिवंत राहतात. जर एखाद्या जोडप्याला आयुष्यात एकही अपत्य झाले नाही तर त्यांचा वंश येथेच खुंटतो आणि त्यांच्या मरणाबरोबरच त्यांची जनुकेही मरतात. त्यांचे आत्मे पढे कोणत्या तरी शरीरांत प्रवेश करतात ही गोष्ट पूर्णपणे असत्य आहे. आपण परत रिपा शिवाकडे वळू या. एखाद्या मुलाच्या आईवडिलांपैकी एक जरी हुशार असेल तरी त्यांचे हुशारीचे जीन्स त्या मुलांत येतात. जर त्या मुलाला योग्य ते शिक्षण देऊन त्याचे संगोपन चांगल्या प्रकारे केले तर तो मुलगा आपली हुशारी बालपणातच दाखवू शकतो. म्हणजे हुशारपणाकरिता आनुवंशिकता आणि संगोपन या दोन्ही गोष्टींची सारखीच आवश्यकता असते. रिंपा शिवाच्या बाबतीत हेच घडले. तिचे वडील प्रा. स्वपन शिवा हे फारुखाबाद घराण्याचे प्रख्यात तबलावादक होते. त्याचबरोबर ते तबला शिकविण्याचे नियमित क्लासेस घेत असत, वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून रिपा तबला वाजवणे बघत होती आणि तबल्यावर वेडेवाकडे हात मारत होती. तिचे हे गुण बघून 9 व्या वर्षांपासून तिच्या वडिलांनी तिला तबला वाजवावयाचे धडे नियमित देणे सुरू केले आणि एका वर्षांतच ती अव्वल तबलापटूंबरोबर स्पर्धा करू लागली. तिच्या बाबतीत आनुवंशिकता आणि उत्कृष्ट संगोपन या दोन्ही गोष्टी उपलब्ध असल्यामुळेच ती ‘जन्मजात हुशार’ मुलांत गणली जाऊ लागली या तिच्या हुशारपणात कोठल्याही प्रकारच्या पुनर्जन्माच्या किंवा आत्म्याचा संबंध नव्हता. तर तिच्या वडिलांपासून तिला मिळालेल्या ‘जनुकांची’च ही करामत होती.
आत्म्याचे शरीरबाह्य अस्तित्वाचे आणि मृत्युमुखातून परत आलेल्या व्यक्तींचे अनुभव
अनेक वेळेला ऑपरेशन टेबलावर झोपलेल्या किंवा अतिदक्षता विभागात असलेल्या रुग्णांची हृदयक्रिया अचानक काही कारणांमुळे बंद होते पण सर्व सुविधा लगेच हाताशी उपलब्ध असल्यास त्यांना मरणाच्या दारातून परत ओढून आणता येते.
शुद्धीवर आल्यावर त्यांतील काहीजण एक ठराविक मजेदार अनुभव कथन करतात. ते सांगतात की, मी वर हवेत उडत होतो आणि माझे शरीर खाली गादीवर पडले होते. वरून डॉक्टर्स माझ्या शरीरावर करत असलेले उपचार मी वरून पाहत होतो. याला ‘शरीरबाह्य अस्तित्वाचा (Out of the body) अनुभव’ म्हणतात.
पूर्वी याचे स्पष्टीकरण देताना असे सांगितले जात असे की, त्या व्यक्तीचा ‘आत्मा’ तात्पुरता बाहेर गेला होता. पण तो परत शरीरात आल्यामुळे त्या व्यक्तीला जीवदान मिळाले!
पण आजच्या प्रगत मेंदूविज्ञानामुळे आणि कालब्ध असलेल्या मायक्रोप्रोब आणि फंक्शनल मॅग्नेटिक रिझोनन्स सारख्या अत्याधुनिक उपकरणांमुळे अशा प्रकारच्या आत्मा शरीराच्या बाहेर जाऊन परत येण्याचा काडीमात्र संबंध नसून, हे अनुभव आज प्रयोगशाळेत मेंदूतील ‘सुपिरीयर टेम्पोरल गायरस’ या छोट्या भागाला उद्दीपित केल्यास कोणालाही अनुभवता येतात.
मेंदूच्या या भागाचे कार्य आपल्याला, अवकाशातील आपल्या शरीराच्या स्थितीची कल्पना देणे असे आहे. म्हणजे आपण सरळ उभे आहोत की तिरपे, आपला उजवा भाग वर आहे की डावा की आपण डोके खाली पाय वर असे शीर्षासन करीत आहोत, आपण बसलो आहोत की झोपलो आहोत, झोपलो असल्यास उताणे झोपलो आहोत, पालथे की कुशीवर? कुशीवर झोपलो असू तर डाव्या की उजव्या, शरीराची कोणतीही स्थिती डोळे बद करूनही आपण सांगू शकतो. आपल्या मेंदूस ह्याचे आकलन कसे होते? हे होण्याकरिता शरीरांतील अनेक अवयवांकडून गोळा केलेल्या माहितीचे संकलन करूनच हे शक्य होते. त्वचेकडून आलेल्या स्पर्शाच्या संवेदना, डोळ्यांकडून आणि प्रामुख्याने कानाच्या मधल्या भागात असलेल्या लॅबरिंथ या छोट्या अवयवाकडून आलेल्या माहितीच्या आधारे शरीराची स्थिती ठरविता येते. लॅबरिंथमध्य पातळ द्रवाने भरलेल्या 3 अर्धगोल नळ्या आडव्या तिडव्या जोडलेल्या असतात. आपण शरीर किंवा डोके मागे पुढे किंवा उज्वया डाव्या बाजूला कलते केले तर या अर्धगोल नळ्यांतील द्रवाची पातळी बदलते आणि त्या नळ्यांत असलेल्या निरनिराळ्या ठिकाणच्या संवेदनशील पेशींना उद्दीपित करून ती माहिती मेंदूतील अशा प्रकारे मेंदूंच्या निरनिराळ्या भागांत साठवलेली माहिती शेवटी सुपिरियर टेंपोरल गायरस या भागाकडे पाठवून तिचे एकत्रित संकलन केले जाते आणि त्यानंतरच आपल्याला आपल्या शरीराच्या स्थितीचे वास्तव समजते. काही कारणामुळे लॅबरिंथ या अवयवास सूज आली (Labarynthitis) तर तेथील द्रवाच्या पातळीत फरक होतो आणि त्यामुळे आपणास चक्कर येणे, डोके गरगर फिरणे असा त्रास होतो. या गुंतागुंतीच्या प्रक्रियेमध्ये कोठेही थोडी गडबड झाली तरी त्या व्यक्तीला, आपले शरीर जमिनीवर पडले आहे अन् आपण वर आकाशात तरंगत आहोत असा भास वा अनुभव येऊ लागतो.
यात त्याचा आत्मा बाहेर जाऊन त्याच्या शरीराकडे बघतो आहे असे काहीही नाही. खरे तर पुराणशास्त्राप्रमाणे आत्मा हा अकर्ता आणि अभोक्ता आहे त्यामुळे तो काहीच करू शकत नाही. शेकडो वर्षांपूर्वी ज्यांना असे अनुभव आले त्यांना त्याचे कोणतेही स्पष्टीकरण न देता ही गोष्ट प्रथम योगायोगानेच लक्षात आली. अमेरिकेतील एका रुग्णाला अनेक दिवसांपासून कानात प्रचंड आवाज व भयंकर डोकेदुखी असा त्रास सुरू झाला. अनेक प्रकारची औषधे, इन्जेक्शन्स देऊनही त्याचा आजार बरा होईना म्हणून त्यांच्या मेंदूचे ऑपरेशन करावयाचे ठरविण्यात आले ते ऑपरेशन तो शुद्धीत असताना डोक्यावरील त्वचा बधिर करून करण्यात येत होते. त्याच्या मेंदूतील सुपिरीयर टेम्पोरल गायरसमध्ये विद्युत उपकरणांतून विद्युतप्रवाह सोडून त्याला उद्दीपित करण्यात आले तेव्हा त्याला अचानक आपण हवेत तरंगतो आहोत आणि आपले शरीर ऑपरेशन टेबलवर पडले आहे असा भास होऊ लागला. ऑपरेशन करणाऱ्या शल्यचिकित्सकाने परत परत तो भाग उद्दीपित केला. रुग्णाला प्रत्येक वेळेस तोच अनुभव आला. त्यानंतर हाच प्रयोग अनेक सृदृढ स्वयंसेवकांवर करण्यात आला आण त्यांनाही तोच अनुभव आला. यावरून असा निष्कर्ष काढण्यात आला की ‘आऊट ऑफ द बॉडी’ अनुभव हा मेंदूत होणाऱ्या काही बिघाडामुळे होतो. त्याचा आणि आत्मा शरीराबाहेर जाऊन परत शरीरात शिरण्याचा काडीमात्र संबंध नाही.
पूर्वदृष्ट – फ्रेंच भाषेत Dejavu म्हणजे यापूर्वीच बघितलेले. काही वेळेस आपण एखाद्या विशिष्ट परिस्थितीचा प्रथमच सामना करत असतो किंवा एखाद्या विशिष्ट स्थळाला प्रथमच भेट देत असतो. पण आपल्याला सारखे असे वाटत राहते की आपण यापूर्वी नक्की केव्हातरी हे सर्व पाहिलेले किंवा अनुभवलेले आहे. पण असे हे वाटणे क्षणकाळच असते. या भावनेला पूर्वदृष्ट म्हणतात. शास्त्रज्ञ अशा प्रकारचे अनुभव नाकारत नाहीत. या अनुभवाचाही संबंध पूर्वजन्मीच्या आठवणींशी जोडला जात असे परंतु आज आधुनिक शास्त्राच्या आधारे असे अनुभव कसे येतात याचेही उत्तर सापडले आहे. शास्त्रज्ञांच्या मते असे अनुभव मेंदूत काही दोष निर्माण झाल्यामुळे येतात. आपण ज्या काही गोष्टी अनुभवतो, बघतो, ऐकतो, स्पर्श करतो, जिभेने चाखतो किंवा नाकाने हुंगतो तेव्हा याबाबतच्या स्मृती, आठवणी, मेंदूतील हिप्पोकॅम्पस नावाच्या भागात साठवून ठेवल्या जातात. एखादी नवीन घटना अनुभवतो ती मेंदू आपल्या पूर्वीच्या आठवणींमध्ये शोध घेऊन ही घटना आपण पूर्वी अनुभवली आहे काय, याचा धांडोळा घेतो. जर सद्यः अनुभवाशी जुळणारी घटना आपण पूर्वी अनुभवली नसली तरी मेंदू कधीकधी गफलतीने उलट संदेश देतो. त्यामुळे पूर्वदृष्टासारखे अनुभव येतात. मेंदूतील जोडणीत बिघाड झाल्यामळे हे घडते. पूर्वजन्माच्या स्मृतींशी ह्याचा काहीही संबंध नसतो.
आत्मा आणि बुद्धी:
ज्ञान, विचार करणे, कल्पना करणे, गहन विषय सोडविणे, स्मरणशक्ती, निमिर्तिक्षमता, नैतिकता इ. मानवाचे गण हे आत्म्याच्या अस्तित्वामळेच शक्य आहेत असे पूर्वी मानले जायचे. परंतु आता असे सिद्ध झाले आहे की या सर्व गोष्टी मानवाच्या प्रगत मेंदूमुळेच शक्य आहेत. मन, चेतना, बुद्धी, स्मरणशक्ती या पूर्णपणे यांत्रिक, रासायनिक भौतिक आणि जैविक क्रियांचा परिपाक आहेत आणि या सर्व गोष्टी इ.इ.जी, पेटस्कॅन, एफ.एम.आर.आय. अशा अत्याधुनिक उपकरणांमुळे निर्विवाद सिद्ध करता येतात.
आत्मा आणि दैवी शक्ती :
अनेक व्यक्ती बाबा, बुवा, बापू, महाराज, “आपल्या अंगात दैवी शक्ती आहे, आपण अमक्या तमक्या देवाचे किंवा देवीचे अवतार आहोत, पूर्वजन्मी मी अमका तमका होतो” इत्यादी दावे करून भोळसट लोकांकडून कोट्यवधीची माया गोळा करीत असतात. त्यांनी दैवी शक्ती म्हणून केलेले गूढकृत्य आणि ते करीत असलेले सर्व दावे हे खोटे, आणि फसवेगिरीचे असतात. आधुनिक शास्त्राद्वारे या सर्व दाव्यांचे पितळ उघडे पाडता येते. त्यांच्या अंगांत अशी कोणतीही दैवी शक्ती नसते. ना कधी ते कोण्या देवतेचे वा महान विभूतीचे अवतार असतात कारण आत्माच अस्तित्वात नाही तर पुनर्जन्म कोठून येणार?
असे जर आहे तर लाखो लोक या बुवा, बापूंच्या मागे का जातात? याचे एकच कारण असते जेव्हा हे लोक बाबाकडे जाऊन त्यांचे प्रवचन ऐकतात किंवा ते सांगतील तशी कृती, जप, मंत्रोच्चार, नृत्य, सुदर्शन क्रिया किंवा कपालभातीसारख्या क्रिया करतात तेव्हा त्या लोकांच्या मेंदूत एन्डॉरफिन नावाचे द्रव्य (न्युरोट्रान्समीटर) तयार होते. अफूच्या मादक द्रव्यांचे माणसाला व्यसन लागते त्याप्रमाणे या लोकांना मेदूत एन्डॉरफिन परत परत तयार होऊन ‘बरे वाटण्याकरिता त्या बाबा-बुवांकडे परत परत जाण्याचे व्यसन लागते आणि याच गोष्टींच्या पूर्ण अभ्यासाअंती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने, दैवी शक्तीने कोणताही चमत्कार करून दाखविल्यास किंवा पुनर्जन्माची घटना सिद्ध करून दाखविल्यास रु.21,00,000/- (एकवीस लाख रुपयांचे) नगद बक्षीस जाहीर केले आहे. तर अमेरिकेत ‘जेम्सरॅन्डी’ यांनी एक मिलीयन डॉलर्स (म्हणजे पाच कोटी) रुपयांचे बक्षीस ठेवले आहे.
आजतागायत कोणीही हे बक्षीस मिळवू शकला नाही. याचाच अर्थ कोणालाही दैवीशक्ती नाही आणि कोणीही कुणाचा अवतार नाही. ही सर्व शुद्ध फसवेगिरी आहे!
आज उपलब्ध असलेल्या प्रगत विज्ञानाच्या आधारावर असे ठामपणे म्हणता येईल की ‘आत्मा’ ‘पुनर्जन्म’ आणि त्याचबरोबर ‘देव’ या गोष्टी अस्तित्वातच नाहीत.
एक सच्चा विज्ञानाचा अभ्यासक म्हणून एक गोष्ट मी स्पष्ट करू इच्छितो ती ही की, जर उद्या एखाद्या शास्त्रज्ञाने प्रगत शास्त्राच्या आधारे आत्मा आहे असे सिद्ध केले तर पूर्वीप्रमाणे माझा आत्म्यावर विश्वास परत बसू शकेल. कारण सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे विज्ञान हे बदलत असते. पण त्या शास्त्रज्ञाला असे काही तरी शोधावे लागेल, ज्यायोगे ‘आत्म्याची अनुभूती’ 2-4 निवडक व्यक्तींना न येता अगदी सर्वसामान्य माणसाला आली पाहिजे. जसे 500 वर्षांपूर्वी कोपर्निकसने सांगितले सूर्य पृथ्वीभोवती फिरत नसून पृथ्वी सूर्याभोवती फिरत आहे. पृथ्वी सपाट नसून गोल आहे, जसे न्यूटनच्या आणि आइन्स्टाइनचा सिद्धान्त सर्वांना पटवून देता आला तसा आत्मा आहे हे आधुनिक शास्त्राच्या आधारावर त्या शास्त्रज्ञाला पटवून देता आले तरच आत्मा आहे हा सिद्धान्त ग्राह्य धरता येईल.
डॉ. टोणगांवकर हॉस्पिटल, दोंडाईचा, ता. शिंदखेडा, जि.धुळे – 425408 फोन : (02566) 244042, 244742,
E-mail: rrtongaonkar@gmail.com
(साभार अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रावरून)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.