हतबलतेची जागतिक व्यापकता

सध्या सर्वत्र चीनचा बोलबाला आहे. संशोधने, आर्थिक क्षमता, नागरी व्यवस्था अशा अनेक संदर्भातून पाहता चीन आघाडीवर आहे. अमेरिकेच्या तर नाकी दम चीनने आणलेला आहे. चीनमध्ये बंडखोरी स्वागतार्ह तर मानली जात नाही, उलट बेमालूमपणे कापून काढली जाते. ऑलिंपिकमध्ये चीनला मिळणाऱ्या यशामागे खेळाडूंकडून उत्कृष्ट उतारा पदरात पडावा यासाठी त्यांचा लहानपणापासून अक्षरशः छळ केला जातो. याबद्दलच्या बातम्या आपण वाचलेल्या असतील.
शिक्षणव्यवस्थेतल्या भ्रष्टाचारातही चीन आपल्याप्रमाणेच आघाडीवर आहे. चांगल्या शाळांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून तिथे स्वयंस्फूर्त देणग्या घ्याव्याच लागतात. या देणग्या फक्त प्रवेशासाठीच नाही तर हुशार मुलांच्या तुकडीत जाण्यासाठी इतकेच नाही तर वर्गात फळ्यासमोरच्या पहिल्या-दुसऱ्या रांगेतल्या बाकावर जागा मिळण्यासाठीही असतात. त्सिंगुआ (Tsinghua) विद्यापीठातल्या शिक्षकांच्या आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी काढलेल्या बालशाळेत इतरांना यायचे असले तर त्यातल्या कुणा प्राध्यापकाला त्या बाळाच्या पालकत्वाची जबाबदारी घेत असल्याचा दाखला द्यावा लागतो. हा दाखला मिळवण्यापोटी पालकांना त्या प्राध्यापकाला लाखो रुपयांची भर करावी लागते. दर्जेदार शिक्षण हा इथे फक्त पैशाचा खेळ झालेला आहे. त्यामुळे आपल्या बाळाला चांगले शिक्षण मिळावे अशी इच्छा असणारे अनेक लोक आपल्या मुलांना चीनमध्ये न ठेवता परदेशात शिकायला पाठवतात. आपल्या बाळाने सुखाने शिकावे. त्याला शिक्षणातला आणि जीवनातला आनंद मिळावा अशी इच्छा असलेल्या चीनी पालकांना त्याला स्वतःजवळ ठेवता येणारच नाही असे बिजिंगमधल्या एका मोठ्या व्यापाऱ्याने म्हटले. आपल्याकडेही बॉलीवूडमधल्या राजकारणातल्या आणि मोठ्या उद्योगधंद्यांच्या मोठ्या हस्तींची मुले आता परदेशीच शिकतात.
(संदर्भ : Article : In China, Unwritten Rules of the Education Game (लेखक : देंन लेव्हीन) द हिंदू, 23 नोव्हेंबर 2012)
[तिन्ही भाषांच्या उच्चारणातील चूक-भूल द्यावी घ्यावी. ]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.