चंपारणचा नीळविरोधी सत्याग्रह: स्वातंत्र्यलढ्याचा अहिंसात्मक शुभारंभ

चंपारणचा नीळविरोधी सत्याग्रह इ.स.1917 चा आहे. दक्षिण आफ्रिकेतन गांधीजी 1915 साली भारतात परतले. त्यावेळी ते महात्मा झाले नव्हते. दक्षिण आफ्रिकेतील बावीस वर्षांच्या कालावधीत त्यांनी बौद्धिक आदांना व्यावहारिक रूप दिले होते. रस्किनची Unto this Last पुस्तिका वाचून स्वतःची जीवनशैली बदलली होती. फिनिक येथे आश्रम स्थापून त्यांनी शेतकऱ्याची जीवनशैली अंगीकारली होती. द. आफ्रिकेतील लढ्यांमुळे कच्चे लोखंड पोलादात बदलले होते. व्यक्तिगत जीवन व मानवसंबंध यांबाबतचे व्यापक जीवनदर्शन त्यांच्यात विकसित झाले होते. तसेच समाजाची अर्थव्यवस्था व सरकारचे कर्तव्य यांबाबतही त्यांचे विचार स्पष्ट झाले होते.
गांधीजी भारतात परतले तेव्हा गुरुवर्य गोपाळ कृष्ण गोखल्यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी सार्वजनिक जीवात भाग न घेता केवळ भारत पाहण्याचे ठरविले होते. तरीदेखील वीरगावचे जकात रद्द करणे तसेच गिरमीट प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी सक्रिय पुढाकार घेतला होता. ते प्रश्न तडीसही नेले होते.
गांधीजी भारतात परतले तेव्हा शांतिनिकेतनमध्ये दीनबंधू अॅण्ड्यूज यांनी त्यांना विचारले होते, ‘भारतात सत्याग्रह करण्याचा प्रसंग येईल असे तम्हाला वाटते का? आणि वाटत असेल तर केव्हा?” त्यावर गांधींचे उत्तर होते, “मला ह्या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे. पाच वर्षांपर्यंत सत्याग्रह करण्याचा प्रसंग येईल असे मला वाटत नाही.” मात्र दोन वर्षांतच हा प्रसंग आला आणि भारतीय स्वातंत्र्यलढा कोणत्या पद्धतीने लढवायचा आहे याचा धडा (वस्तुपाठ) देशाला देऊन गेला.
1916 च्या लखनऊ येथील कांग्रेस अधिवेशनात ब्रजकिशोरबाबू (प्रभावतींचे वडील, जयप्रकाजींचे सासरे) व त्यांचे सहकारी आले होते. बिहारमधील नीळेच्या शेतकऱ्यांचे दुःख निवारणाकडे कांग्रेसने लक्ष द्यावे ही त्यांची धडपड होती. तसा ठराव ते अधिवेशनात मांडू इच्छित होते. हा ठराव गांधींनी मांडावा ही त्यांची इच्छा होती. परंतु ज्या गोष्टी प्रत्यक्ष पाहिल्याच नाहीत त्यांविषयी ठराव मांडण्यास गांधींनी नकार दिला. मात्र या मंडळींच्या आग्रहाखातर चंपारण्याला भेट देण्याचे त्यांनी मान्य केले.,
अधिवेशन संपले परंतु बिहारचे नेते व त्यांचे प्रतिनिधी पंडित राजकुमार शुक्ल यांनी गांधींपाठी टुमणे लावले. कलकत्ता येथे कमिटीच्या बैठकीला आले असता दोन दिवसांच्या बोलीवर गांधी चंपारणाला दौरा करण्यास गेले. व तेथील भीषण परिस्थिती पाहून त्यांनी तेथेच खुंटा ठोकला.
चंपारण संस्थानिकांनी व्यापले होते. बेतियाचे संस्थान सर्वांत मोठे होते. संस्थानिकांनी आपल्या जमिनी ठेक्याने दिल्या होत्या. शेहेचाळ टक्के जमिनीवर इंग्रज ठेकेदारांचा अधिकार होता. जवळपास चंपारण जिल्ह्याचा अर्धा हिस्सा इंग्रज ठेकेदारांकडे होता. गावेच्या-गावे ठेकेदाराच्या ताब्यात होती. ठेक्याची रक्कम संस्थानिकाला मिळाली म्हणजे झाले. ठेकेदाराने रयतेला कसेही वागवले तरी संस्थानिकाला त्याच्याशी देणेघेणे नसायचे. गांधीजी चंपारण्यात गेले तेव्हा तेथे सत्तरहून अधिक कोठ्या (निळीचे कारखाने) होत्या. या कोठ्या म्हणजे जळवा होत्या. त्यांनी चंपारणच्या रयतेची उभारीच संपवली होती. व त्यांना गुलाम करून टाकले होते. कोठ्यांच्या शोषणामुळे रयत भयभीत होती. पोलिस यंत्रणा व कोर्ट होते; पण ते कोठीवाल्यांना म्हणजेच नीळेवाल्यांना फायदा देण्यासाठीच, जणू निळेवाल्यांच्या रूपाने चंपारणच्या रयतेला करकचन आवळून धरले होते.
गांधीजींनी चंपारण्यात येताच रयतेला शोषणातून मुक्त करण्यासाठी एका विशेष तंत्राची आखणी केली. ज्यांच्याविषयी पाऊल उचलायचे त्याला प्रथम त्याची कल्पना दणे हे सत्याग्रही या नात्याने गांधीजी आपले कर्तव्य मानीत. मुजफ्फरपूर येथे येताच त्यांनी मळेवाल्यांच्या संघाचे सेक्रेटरी व तिरहत विभागाचे कमिश्नर यांची भेट घेतली व शेतकरी, जमीनदार व नीळेवाले यांच्यात सन्मानाने समेट करणे या कर्तव्यापोटी ते आल्याचे त्यांना सांगितले. तरीदेखील निळेवाल्यांनी त्यांच्या उपस्थितीचा अर्थ इंग्रजांना देशातून घालवून देणे हाच लावला. कमिश्नरांनी त्यांना चंपारण्यातून निघून जाण्याचा सल्ला दिला.
मुझफ्फरपूर येथे ब्रजकिशोरबाबू वगैरे वकिलांशी बोलल्यावर गांधीजींच्या लक्षात आले की केवळ खटले चालवून ‘तीन-कडीया’ प्रकार बंद होणार नाही. रयत चिरडून गेली आहे. भयग्रस्त आहे. भयातून मुक्त करणे हे खरे औषध आहे.
गांधीजींनी सहकाऱ्यांना (जे मुख्यतः वकील होते) कडून आश्वासन घेतले की कारकुनी काम त्यांना करावे लागेल व आपआपला धंदा अनिश्चितकाळापर्यंत बंद ठेवावा लागेल. तसेच सर्व काम सेवाभावाने व बिनपैशाने झाले पाहिजे हेही बजावले. या लढ्यात तुरुंगात जाण्याचीही शक्यता त्यांनी वर्तविली. परंतु सहकाऱ्यांना चुचकारतच ‘जर त्यांनी ही जोखीम पत्करली तर त्यांना आवडेल’ असे नम्रपणे सुचविले. ही गांधीची पद्धत होती. जो जितका सोबत चालेल तितके त्याला चालवायचे.
गांधींना सुगावा लागला होता की इंग्रज त्यांना पकडणार. तेव्हा सरकारतर्फे ज्या कारवाया होतील त्या रयतेसमोर व्हाव्यात या उद्देशाने त्यांनी मुजफ्फरपूर सोडून चंपारण जिल्ह्याचे मुख्य ठिकाण मोतीहारी गाठले. मोतीहारीत पोहोचताच रयतेची रीघ लागली. जो तो आपले दुःख सांगू लागला. गांधीजींवर याचा परिणाम होऊ लागला होता.
मोतीहारीस पोहोचताच दुसऱ्याच दिवशी गांधींना जिल्हा मॅजिस्ट्रेटने नोटीस दिली. त्यांचा वास्तव्यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होईल. भयंकर दंगे माजतील. म्हणून त्यांनी जिल्ह्यातून निघून जावे असे नोटिशीत बजावले होते. परंतु गांधींनी जिल्हा सोडून जाण्यास नकार दिला. त्यांनी स्पष्ट सांगितले की चळवळ करण्यासाठी नव्हे तर सत्यपरिस्थितीचा शोध घेण्यासाठी ते येथे आले आहेत.
सरकारने गांधीजींच्या विरोधात कोर्टात खटला दाखल केला. कोर्टात उभे राहिल्यावर कोर्टाने विचारले की त्यांचा कोणी वकील आहे का? गांधींनी उत्तर दिले, ‘नाही!’ हे ऐकताच तेथे जमलेले हजारो सेठ चकित झाले. तरीदेखील लोकांना वाटले की गांधीजी स्वतः मोठे बॅरिस्टर आहेत, तेव्हा ते स्वतःची बाजू स्वतः मांडतील. सरकारी वकिलाने साक्षीदार उभे करताच गांधींनी सांगितले की साक्षीची गरज नाही! त्यात उगाच वेळ वाया दवडला जातो. त्यांनी कोर्टासमोर आपले निवेदन वाचून दाखविले. जनतेत राहूनच जनतेची सेवा करता येते. ते त्यांचे कर्तव्य आहे. आणि म्हणून त्यांनी कायदेभंग करून शिक्षा सहन करण्याचे ठरविल्याचे सांगितले. निवेदन ऐकताच लोक स्तब्ध झाले. या प्रकारचे निवेदन कदाचित यापूर्वी हिंदुस्तानातील कोण्या ब्रिटिश कार्यालयात न कोणी दिले होते व न कोणी ऐकले होते. मॅजिस्ट्रेटही गोंधळून गेला. मॅजिस्ट्रेटला वाटले होते की खटला काही दिवस चालेल. त्याला कळेना निर्णय देईपर्यंत गांधींचे काय करायचे. मॅजिस्ट्रेटने निर्णय चारपाच दिवसांवर टाळला.
सत्याग्रह म्हणजेच सविनय कायदेभंग. गांधीजी लिहितात, “सरकारी नोटिशीना मी कायदेशीर विरोध करू शकलो असतो. तसे न करता मी त्यांच्या सर्व नोटिसा स्वीकारल्या. त्यावरून व अमलदारांशी प्रत्यक्ष संबंध आला असता वापरलेल्या सौजन्यावरून त्यांना कळून आले की, पहा, त्यांना विरोध करायचा नव्हता तर त्यांना हुकूमाचा सविनय कायदेभंगच करायचा होता. त्यामुळे त्यांना एकप्रकारची निर्भयता प्राप्त झाली. पण त्याचबरोबर त्यांच्या हेही लक्षात आले की आपली सत्ता आजपासून लुप्त झाली. लोक क्षणभर शिक्षेचे भय सोडून आपल्या नव्या मित्राच्या प्रेमशक्तीच्या अधीन झाले.”
कमिश्नरने दिलेल्या या नोटिशीला बिहार सरकारने चुकीचे पाऊल ठरविले व खटला मागे घेतला. सविनय कायदेभंगात आदर असावा लागतो, संयम असावा लागतो. तिच्यात केव्हाही उद्धटपणा येता कामा नये. तिच्यात द्वेष व घृणेची भावना असता कामा नये. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील ही ऐतिहासिक घटना होती. देशाच्या पहिल्या सविनय कायदेभंगाची म्हणजेच सत्याग्रहाची ही सुरुवात होती.
इंग्रज कोठीवाले (निळीचे कारखानदार) जबरदस्तीने शेतकऱ्याला नीळ पेरण्यास भाग पाडीत. तेथे तेथे तीनकठिया प्रथा प्रचलित होती. एक बिघ्यातील तीन कठे जमिनीवर नीळ पेरण्याची पद्धत म्हणजेच तीनकठिया होय. शेतातील सुपीक जमिनीवर शेतकऱ्याला नीळ पेरण्यास भाग पाडले जाई. शेतकऱ्याशी कोठीवाले करार करीत. कराराप्रमाणे ठरलेली रक्कम नीळ पेरण्याच्या बदल्यात शेतकऱ्याला कोठीवाले देत. जर पीक चांगले आले नाही तरी ती रक्कम शेतकऱ्याला द्यावीच लागे. जी कोठीवाले देत. जमिनीची नांगरणी, खुरपणी शेतकऱ्याला स्वतः करावी लागे. शेतकऱ्याच्या मनाविरुद्ध करार केला जायचा. कोठीवाल्यांचा हा सारा व्यवहार शेतकऱ्यांची पिळवणूक करणारा होता. कोटीचे नोकर त्यांच्यावर अत्याचार करायचे. मृत गुरांच्या चामड्यावर वहिवाटीनुसार चांभाराचा हक्क असायचा. कोठीवाल्यांनी तो हक्क काढून घेतला. शेतातील झाडांवर कोठीवाले हक्क दाखवीत. गुरांच्या चरणीची जमीन उपयोगात आणू द्यायची की नाही हा अधिकार कोठीवाल्यांनी स्वतःकडे घेतल्याने गावच अडचणीत यायचे. जर रयतेने कोठीवाल्याला नाराज केले तर त्याला कोंडवाड्यात कोंडण्यात यायचे. झाडाला बांधून चाबकाने फडकावले जायचे. त्याच्या स्त्रीला नग्न केले जायचे. काही कोठीवाले तर पहिले न्हाण आले की मुलीला रात्री कोठीवर बोलावून घ्यायचे. अनेक अंगांनी कोठीवाले रयतेचे शोषण करीत होते. या अन्यायाच्या विरोधात उद्रेक व्हायचे. 1908 चे बंड असेच होते. शेतकऱ्यांनी नीळ पेरण्यास नकार दिला. कोठीच्या शिपायांना मारपीट केली. मॅनेजरबर हल्ला केला. बंडाला रोखण्यासाठी सैनिक व पोलिस तैनात केले गेले. नेत्यांना अटक झाली. परिसरात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. तीनशेहून अधिक लोकांना शिक्षा ठोठावण्यात आली. जेव्हा जेव्हा उद्रेक झाला तेव्हा तेव्हा रयतच अडचणीत येत गेली. इंग्रजांकडून चिरडली गेली.
गांधीजींनी ठरविले की राष्ट्रीय कांग्रेसच्या नावे लढा चालवायचा नाही. वर्तमानपत्रवाले व पुढाऱ्यांना त्यांनी दूरच ठेवले. (कांग्रेसचे नाव न घेता कांग्रेसने के कांग्रेसच्या पुढाऱ्यांनी या प्रदेशात प्रवेश केला. या विषयाचे राजकारण करायचे नाही हे त्यांनी आधीच ठरविले होते. कोठेही राजकारणावर भाषण न देण्याची अट त्यांनी स्वतःकर व कार्यकर्त्यांवर लावली होती. रयतेचे दुःख दूर करण्यासाठी ते तेथे आले होते. आंदोलन करण्यासाठी नव्हे. गांधींना माहीत होते, कोठलेही आंदोलन करा शेवटी त्याचे राजकारण हे होतेच.
गांधींनी रयतेची निवेदने, लिहून घेण्यास सुरुवात केली. दररोज हजारो शेतको कार्यकर्त्यांना घेऊन बसत. कार्यकर्ते निवेदने लिहीत. कार्यकर्ते मध्यमवर्गीय, उच्चवर्णीय होते. रयत गरीब, अज्ञानी होती. गांधींच्या या कार्यपद्धतीमुळे दोघांत सरमिसळ झाली. कार्यकर्त्यांमध्ये ग्रामीणांविषयी दुरावा दूर होण्यास मदत झाली. कार्यकर्ते निवेदने लिहीत त्यामुळे रयतेला आपले दुःख ऐकणारेही कोणीतरी आहे, ही त्यांची भावना त्यांचे मनोधैव उंचावण्यास कारणीभूत ठरली. त्यांचे दःख होऊन कार्यकर्त्यांचे प्रबोधन झाले. स्वराज्याचा अर्थ केवळ गोऱ्यांना हाकलणे नव्हे तर लोकांची दशा सुधारेल तेव्हाच स्वराज्य अवतरेल. ही गांधींची दृष्टी त्यांच्यात अवतरली.
सशस्त्र बंडासाठी सशस्त्र-शिक्षण आवश्यक असते. त्याचप्रमाणे सत्याग्रहासाठी विधायक कार्याच्या प्रशिक्षणाची आवश्यकता असते. रयतेच्या चिरंतन उन्नतीसाटी उपाय शोधणे महत्त्वाचे होते. यासाठी गांधीजींनी चंपारण्यात तीन आश्रम (शाळा) उघडले. या केवळ शाळा नव्हत्या. लोकांनी एकत्र येण्याचे स्थान होते. भयग्रस्त जनतेत जाऊन बसणे हेच एक मोठे काम होते. शाळा भीती, अज्ञान व घाण यांचे उच्चाटन करण्याचे माध्यम होत्या.
स्वयंसेवकांना गांधीजींची ताकीद होती की कोणाही मळेवाल्याविरुद्ध तक्रार आल्यास त्यात पडायचे नाही. राजकारणाला स्पर्शही करायचा नाही. कोणाच्या तक्रारी आल्यास त्याला गांधींकडे पाठवून द्यावे. शाळेत औषध व फळा एवढेच असायचे सफाईचे काम अवघड होते. विहिरीच्या भोवतीच्या सडलेला चिखल उपसण्याची मोहीम शाळेने घेतली होती. प्रौढांना साक्षर करण्यासाठी रात्र-शाळा उघडण्यात आली. काहींना आंघोळ घालन स्वच्छ राहाण्याचे धडे दिले जात. आश्रमांच्या कोठीवाल्यांना धाक होता त्यांच्या वेड्यावाकड्या वागण्याच्या तक्रारी आश्रमात आल्यास त्याला प्रत्युत्तरही दिले जाई. आश्रम हे गावांची इभ्रत होते. तसेच कोठीवाले व रयत मधील दुवाही होते.
विरोधकांच्या बाबतीत सौजन्य, त्यांचा दृष्टिबिंदू समजून घेण्याविषयी आतुरता, विरोधकांमध्ये जे काही सर्वोत्कृष्ट आहे ते शोधून काढून त्याला आळवणे यात साधुत्व आहे. सत्याग्रहाचे ते अंग आहे. गांधीजींनी आश्रमच्या कामाविषयी जिल्हाधिकाऱ्याला माहिती लिहून कळविली व कर्मचाऱ्यांचे सहकार्यही मागितले. तसेच कोठीवाले इंग्रजांनाही या कार्यात मदत करण्याचे आवाहन केले. सत्याग्रहीला विरोधकावर विश्वास टाकण्याची कधीच भीती वाटत नाही.
गांधीजींच्या या कार्य-शैलीचा रयतेवर परिणाम झाला नसता तरच नवल. गांधींच्या उपस्थितीमुळे लोकांचे मनोधैर्य वाढले. भय कमी झाले. लोकांना सामर्थ्याचा बोध होऊ लागला. शेतकरी सारा भरल्याची पावती कोठीवाल्याला मागू लागले. बेकायदेशीर कोंडवाड्याला गुरे कोंडण्यास प्रतिबंध आला.
सत्याग्रह हा जसा अन्यायनिवारणाचा लढा आहे. तसाच तो आत्मशुद्धीचाहो लढा आहे. यासाठी बाह्य आचरण कसे असावे याचा वस्तुपाठ गांधीजींनी कार्यकर्त्यांना दिला. दुसऱ्याच्या हातचे कधीच न खाणारे राजेंद्रबाबू सामूहिक रसोड्यात जेवू लागले. स्वतःचे कपडे स्वतः धुऊ लागले. स्वतःची खरकटी भांडी स्वतः घासू लागले. तिसर वर्गातून प्रवास करण्यास त्यांना अपमान वाटला नाही. गांधीजींचा साधेपणा त्यांना लोकांजवळ नेण्यास कारणीभूत ठरला.
गांधीजी खेड्यांना भेटी देत होते. निवेदने लिहून घेत होते. त्याचप्रमाणे रयतेवर होणाऱ्या अन्यायाबाबत कोठीच्या मॅनेजरांना जाबही विचारत होते. नीळवाल्यांनी गांधींना घालवून देण्यासाठी आणि त्यांचे कार्य निष्फळ करण्यासाठी कोणतीही कसूर टेवली नव्हती.
यूरोपियन डिफेन्स असोसिएशनने ठराव मंजूर केला होता. या ठरावानुसार सरकारला चंपारण्यात शांती हवी असेल तर त्याने गांधीजी व त्यांच्या सहकाऱ्यांना ताबडतोत्र चंपारण्यातून घालवून द्यावे असा त्यांचा आग्रह होता. या साऱ्याचा परिणामी बिहार सरकारने गांधींशी बोलणे केले. व शेवटी एक चौकशीसमिती नियुक्त केली. बिहार सरकारने आग्रहपूर्वक गांधींना या समितीचे सदस्य होण्यास भाग पाडले. व त्यासाठी गांधींच्या अटीही मान्य केल्या. सत्याग्रहाचा हा विजयच होता.
समितीने तीन कठिया पद्धत रद्द करण्याची शिफारस सरकारला केली. अन्य छोट्या-मोठ्या अन्यायकारक गोष्टींवर गांधी अडून बसले नाहीत. तीन कठिया गेली की त्याबरोबर अन्य गोष्टीही आपसूक जातील व कोठीवाल्याना चंपारण्यात राहाणेही नकोसे होईल. ही गांधींची धारणा होतो. शेवटी गांधींची रणनीती व रयतेची एकजूट फळाला आली. व सरकारने ‘चंपारण शेती कायदा’ मंजूर केला.
नवा कायदा होताच निळवाले आपली जमीन, कोठी व गुरेढोरे विकून निघून गेले. गांधीजींच्या जाण्याने त्याचा दबाव उतरला होता. केवळ सामान्य जमीनदाराच्या रूपातच ते तेथे राहू शकणार होते. यात त्यांचे भागणारे नव्हते. पहिले महायुद्ध संपले होते. वस्तूंच्या किंमती वाढल्या होत्या. त्यांनी त्यांचे होते-नव्हते ते सारे विकून टाकले. पैसे चांगले मिळाल्याने निळवाल्यांचाही हिरमोड झाला नाही आणि रयतेलाही मुक्तीचा आनंद मिळाला.
आचार्य कृपलानी लिहितात, “हे आंदोलन शुद्ध रूपाने आर्थिक होते. परंतु गांधीजींनी कधीच अर्थकारणाला राजनैतिक व सामाजिक सुधारणांपासून वेगळे केले नाही. चंपारण आणि सामान्यतः बिहारच्या जनतेच्या आत्मसन्मानाची उपलब्धी राजकीय मूल्यांपेक्षा महान होती.” स्वातंत्र्यलढ्याचा हा अहिंसात्मक शुभारंभ होता.
78/77, यशवंतनगर, गोरेगाव (प.) मुंबई 400101.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.