सत्य

सत्याचे आह्वान, बुद्धीचे विधान
सत्याचे स्वरूप, दमणूक.
सत्य काडीमोड, सत्यप्रतिशोध
सत्य तो आनंद, परावलंबी.
सत्य प्राणिमात्र, सत्य सर्व गात्र
गात्रांचे नवल, सत्यशोध.
आभास सत्य, विश्वास सत्य,
अश्रद्ध सत्य, ऐहिकाचे.
सत्य पंचतत्त्व, सत्य गुणसूत्र
सत्य अणुस्फोट, पृथ्वीवरी.
सत्य गरजवंत, सत्य प्रज्ञावंत
सत्य अदलाबदल, दोघांचीही.
सत्य जीवशास्त्र, सत्य गर्भज्ञान
सत्य संगतीच्या, निर्जीवाचे.
सत्य आसवांत, सत्य विचारात
सत्याची कायम, हालचाल.
सत्यविलासात, सत्य संन्यासात
सत्याचे पाय, फरपटते.
सत्य लिंग फक्त, सत्य योनीमात्र
सत्याचा ओरखडा, एकमेकां.
सत्य भूक जोर, सत्य पचन थोर
सत्याचे आतडे, लांबवर.
कातडे सत्य, बचाव सत्य,
सत्य मांसगोळा, भौतिकाचा.
अंधार सत्य, प्रकाश सत्य
सत्याचे वर्णन, विशेषनाम.
सत्य मुक्त नाही, मेंदूचा तुरुंग
सत्याची सीमा, सापेक्षता.
सत्य बंदिवान, सत्य कोतवाल
सत्याचा गोंधळ, भूमिकेचा.
जडावते सत्य, तगमगते सत्य
सत्याची वेदना, अमानुष.
रक्तनलिका सत्य, रक्तपात सत्य
रक्तद्वेष सत्य, अंतरात.
सत्य एकजीव, सत्य शिवाशीव
सत्य तो आभास, संस्कृतीचा.
सत्य ते शौर्य, सत्य ती भीती
असत्य सत्य, रणांगणी.
राष्ट्रवाद सत्य, विश्वभान सत्य
सत्याची गिरकी, अंगणात.
रॅशनल सत्य नोशनल सत्य
अंतिम क्लॅरिटी, कन्फ्यूजन.
सत्याची उड्डाणे, कोटीच्या घरात
सत्य ओलांडते, दारिद्र्यरेषा
सत्य गडचिरोली, सत्य यवतमाळ
सत्य हत्या आणि आत्महत्या.
सत्य संसदेत, सत्य दंतेवाडा
सत्याचे डिस्ट्रीब्यूशन, जनपथी.
सत्य निवडणूक, सत्य अडवणूक
सत्य भूकबळी, लोकशाहीचा.
सत्य कनेक्टेड, सत्य डाऊनलोड,
सत्य एररमय, सर्व्हरचे.
भाषावार सत्य, प्रांतवार सत्य
सत्य स्थलांतर, अर्थकारणे.
सत्य केंद्रीभूत, सत्य विकेंद्रित
सत्य प्रश्न थोर, रचनेचा.
सत्य तो कापूस, सत्य ती ज्वारी,
सत्याचे मूळ, उसापाशी.
लावण्य सत्य, फिगर इत्यादी
परखड सत्य, शौचकूप.
सत्य अयोध्येचे, सत्य निधर्माचे
सत्य आड वाणी, बहुतांची.
सत्य मराठीचे, सत्य गर्जनेचे
सत्य गुजराती, दुकानाचे.
उत्क्रांती सत्य, क्रांती सत्य
मार्क्सचे सत्य, वरकड.
सत्य साम्यवाद, सत्य भांडवलवाद
शुद्धरूप अस्तित्व, अशक्यची.
नैसर्गिक सत्य, वैज्ञानिक सत्य
अंतिम सत्य, संज्ञाप्रवाह.
सत्याचा मार्ग, गणिताचा वेध
तरी व्यापून उरावी, संवेदना….

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.