[पुस्तके व इतर ललित-वैचारिक कलाकृतींचा परिचय व समीक्षा करणारे हे सदर आपण गेल्या तीन महिन्यांपासून चालवीत आहोत. ह्यामध्ये अनेक विषयांवरच्या कलाकृतींचा अंतर्भाव होईल. साहित्य अर्थातच त्याला अपवाद नसेल.
स्त्री-पुरुष नाते त्यांच्या (विशेषतः स्त्रीच्या) रूपावर अवलंबून असावे का ह्या आदिम प्रश्नाचा वेध एका मिथक कथेच्या व त्यावर आधारित टागोरांच्या नाटकाच्या निमित्ताने ह्या लेखात घेतला आहे. ह्या प्रश्नाशी असलेला (आजच्या आपल्या) मानवी वर्तनाचा संबंध ध्यानात घेऊन कृपया हा लेख वाचावा – संपादक ]
भारतीय साहित्यपरंपरा विलक्षण समृद्ध आहे. भारतातील विविध प्रदेश, विविध भाषा, विविध वैशिष्ट्यांनी समृद्ध झालेली संस्कृती, लोकजीवन, लौकिकासोबत पारलौकिकाची अनुभूती, येथे स्थापन झालेले, विकसित झालेले व बाहेरील जगतातून येऊन येथील प्रवाहात मिसळलेले धर्म व दर्शने अनेकविध विद्याशाखा, असंख्य विचारप्रणाली, वेद-उपनिषदे, बुद्ध-चार्वाक यांच्या तत्त्वज्ञानापासून ते आजच्या तंत्रज्ञानापर्यंत झालेला भौतिक, सामाजिक, सांस्कृतिक विकास या साऱ्यांचे यथार्थ प्रकटीकरण भारतीय साहित्य करीत आलेले आहे.