मानवी अस्तित्व (८)

मी कुणाच्या तरी हुकुमाचा ताबेदार आहे का?

आपण आपल्या स्वतःच्या इच्छेनुरूप वागतो की आपल्याकडून कोणी हे करून घेते याबद्दल नेमके भाष्य करणे जवळजवळ अशक्य आहे. रेने देकार्त (१६४४) म्हणून एक तत्त्वज्ञ होऊन गेला. त्याने हे जग खरोखर आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला. जग आहे का म्हटल्यावर त्यातील चराचर सृष्टी आहे का असाही प्रश्न ओघाने आलाच. पैकी चेतन सृष्टीतला जो मी आहे, तो तरी खरा आहे का इथपर्यंत त्याची शंका पोहोचली. मग त्यावर, अशी शंका घेणारा कुणीतरी आहे, म्हणजे मग तोच मी आहे असे त्याने स्वतःच्या प्रश्नाला उत्तर दिले. “कॉगिटो अर्गो सुम- आय थिंक देअरफोर आय ऍम” हे त्याचे वाक्य प्रसिद्ध आहे. “मी विचार करतो तेव्हा मी असलो पाहिजे.”

तुमच्या अस्तित्वाचा पुरावा तुमच्या जाणिवेतील स्वभानातून मिळतो. मात्र ह्या मार्गाने तुम्ही इतरांच्या जाणिवेतील विचारापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे इतरांना स्वभान आहे की नाही हे तुम्ही ठामपणे सांगू शकत नाही. देकार्तनंतर पुलाखालून भरपूर पाणी वाहून गेले आहे. तरी आजही, आपल्या अस्तित्वाबद्दल ठामपणे काहीही सांगण्याच्या स्थितीत आपण नाही.

आज संगणकांनी पर्यायी जगाची कल्पना मूर्तस्वरूपात आणली आहे. हजारो गेम्स व सदृशीकरण ह्यांच्या शोधामुळे आपल्या या जगात इतर अनेक जगे असून त्यांपैकी एकात आपण आहोत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तंत्रज्ञानातील या अभूतपूर्व ‘प्रगती’मुळे हे पर्यायी जग खरोखरीच ‘कुठेतरी’ अस्तित्वात असल्यासारखे वाटत आहे. यानंतरचे मूळ जग, हजारो आभासी जगे व आभासी नागरिकता असलेला समाज यांनी व्यापून गेलेले असेल. तेथेसुद्धा आपल्यासारखीच स्वतंत्र व जाणीव असलेली माणसे असतीलही, कुणास ठाऊक. कदाचित ह्या जगातील आपले ‘अस्तित्व’ हे कुठल्यातरी दुसऱ्या जगातील नागरिकतेने शोधून काढलेले आभासी जग असेल आणि आपण त्यांच्या हुकुमाची ताबेदारी करीत असू.

याचा सुगावा आपल्याला कसा लागला, हाही प्रश्न येथे उद्भवू शकतो. संगणकावरील पॉप अप प्रमाणे ‘तुम्ही संगणकातील सदृशीकरणामुळे आहात’ असा काही संदेश वाचण्यात आला नाही. किंवा ‘सदृशीकरणाच्याच प्रक्रियेचा भाग म्हणून संगणक तुम्हाला सदृशीकरणातून मुक्त करून खरेखुरे अस्तित्व बहाल करत आहे’ असाही संदेश स्क्रीनवर कधी दिसला नाही.

एक मात्र खरे की शंभर टक्के जरी नाही तरी अगदी अंधुकसा का असेना आपल्या खऱ्याखुऱ्या अस्तित्वाची खात्री देता येईल एवढा पुरावा नक्कीच कुठेतरी मिळेल. परंतु या ‘परम’ संगणकावरील ‘ऑपरेटर’ कदाचित तुम्हाला मागे मागे नेत नेत आहे तो पुरावासुद्धा नष्ट करून टाकेल. आपल्याला हा ‘ऑपरेटर’ काही तरी घोळ घालत आहे हे कळत असले तरी त्याचा उपयोग होणार नाही. कारण तुम्ही काही करायच्या आत तो आहे ते सर्व पुसून पुरावा नष्ट करून टाकेल. जस्ट इरेज. काय झाले हे सुद्धा कळणार नाही. मुळात सत्याचा हा शोध फार महागात पडेल. तुम्ही खरोखरच अंतिम सत्याच्या शोधात असाल तर कठीण आहे. खूप प्रयत्न करूनही सरतेशेवटी वैताग, अडचणी व भास याशिवाय हाती काही लागणार नाही. तुम्ही त्या निर्मिका’च्या मौजमजेच्या अडथळा आणल्याचा दोषारोप तुमच्यावर ठेवला जाईल. क्लिक व डिलीट करून तुम्हाला सृष्टीआड करून टाकेल.

इतर काही वैज्ञानिकांच्या मते येथे एकच भले मोठे सदृशीकरण नसून तुकडे पाडलेले कित्येक वेगवेगळी लहान सहान सदृशीकरणे (व सदृशीकरणांची मालिका) आहेत. त्यामुळे आपण सदृशीकरणाचे भाग आहोत याची कल्पना येत नाही. ते आपल्याला समजणारही नाही.. याचाच अर्थ मी सोडून इतर सर्व आपल्या दृष्टीने रोबो आहेत. परंतु नेमके काय घडत आहे याची कल्पना नसल्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा देकार्तच्या ‘त्या’ विधानापर्यंत जावे लागते.

देकार्तच्या नंतरच्या काळात मेंदूविषयीच्या तंत्रज्ञानात भरपूर प्रमाणात भर पडलेली आहे व हे तंत्रज्ञान एक मायावी वस्तूप्रमाणे भासत आहे. मेंदूचे स्कॅनिंग मात्र देकार्तच्या त्या प्रसिद्ध वाक्याच्या विरोधात जाणारे ठरत आहे. मला जसे वाटते तसा मी आहे का? जरी तुम्हाला तसे वाटत नसले तरी तुम्हीच आहात. आता आपल्याला दुसऱ्यांच्या ‘डोक्या’तील विचार काय असू शकतील याचा अंदाज घेणे शक्य होत आहे. परंतु दुर्दैववशात आपण त्यांच्यातील स्वभानापर्यंत पोचू शकत नाही. मेंदूतील तरंगांचे मोजमाप करता येत असले तरी त्या कुठल्या अनुभवाचे आहेत याची अजूनही कल्पना नाही. देकार्तच्या गृहीतकाला ब्रेन स्कॅनिंगकडूनच उत्तर मिळू शकते. त्यामुळे तुम्ही स्वतः रोबो असू शकाल. मीसुद्धा असू शकेन. मी रोबो आहे हे जाणवत नसले तरी मी खरोखरच रोबो असू शकेन.

ब्रेनस्कॅनवरून, माणसाकडे संकल्प स्वातंत्र्य (free will) नाही यावर मात्र बहुतेक तज्ज्ञांचे एकमत झालेले आहे. आपल्या ‘मशीन’ मध्ये आपल्याकडून काहीही काम करून घेणारे सुप्तपणे बसलेले भूत नाही हेही तितकेच खरे. आपण करत असलेल्या प्रत्येक कृतीमागे मेंदूचेच नियंत्रण असते व आहे हेही आपल्याला मान्य करावे लागेल… परंतु “मला वाटते म्हणून मी आहे ” हादेखील एक प्रकारचा भासच असू शकेल. कदाचित मी, तुम्ही व आपण सर्व सदृशीकरणाचे भाग असून आपण एका भ्रमावस्थेत वावरत आहोत, ही शक्यता नाकारता येत नाही. संगणकाच्या सदृशीकरणाच्या प्रक्रियेनुसार फक्त तुम्हीच स्वभान असलेली व्यक्ती आहात. इतर सर्व रोबो आहेत. (फक्त त्यात तुम्हीही आहात!)

८, लिली. अपार्टमेंटस्, वरदायिनी सहकारी गृहसंस्था, पाषाण सूस रोड, पाषाण, पुणे ४११०२१

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.