अनवरत भंडळ (२)

[मानवी व एकूण सजीवांचे आयुष्य, त्याचा आदि-अंत, त्याचे कारणपरिणाम, ते जेथे फुलते त्या जागेशी असलेले त्याचे नाते, त्याची स्वयंसिद्धता वा अवलंबित्व, विशाच्या विराट अवकाशातील त्याची प्रस्तुतता ह्या विषयांचे मानवी मनाला नेहमीच कुतूहल राहिले आहे. माणसाने विवेकवादी असण्या-नसण्याची व असावे-नसावेपणाची काही कारणे वा पूर्वअटीही ह्या मुद्द्यांध्येच दडून आहेत. त्यामुळे आ.स्.चा तर हा विशेष जिव्हाळ्याचा विषय आहे. ह्यावर वैज्ञानिक दृष्टिकोणातून लिहिलेली प्रभाकर नानावटींची मानवी अस्तित्व ही मालिका आपण गेल्या वर्षीपासून वाचत आहोतच. आता ही थोड्या वेगळ्या अंगाने लिहिलेली, विज्ञान व अध्यात्म ह्यांची सांगड घालणारी मालिका. किशोर देशपांडे ह्यांची पुण्यनगरी मध्ये प्रकाशित झालेली ही मालिका थोडी संपादित करून अनवरत भंडळ ह्या नावाने सुरू आहे.- संपादक]
एकच पानतत्त्व
आपण कोण आहोत ? आपल्या जीवनाला काही हेतू आहे का ? या प्रश्नांचा वेध घेत असता पदार्थविज्ञान व रसायनशास्त्राकडून जी सामान्य माणसांना समजू शकेल अशी माहिती मिळू शकते, तिची मांडणी या आधीच्या लेखांकांध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात ही माहिती मुख्यत: निर्जीव पदार्थांबाबत आहे. आमचे व सर्व सजीवांचे देहदेखील पदार्थय आहेत, जे निष्प्राण झाल्यानंतर निर्जीव पदार्थातच रूपांतरित होतात. या विशातील सर्व निर्जीव पदार्थ व ऊर्जा एकाच मूलतत्त्वाची निर्मिती असून सृष्टीच्या आरंभी तर अवकाश-काळासह सर्व ब्रह्मांड एकाच बिंदूध्ये सामावले होते, असा विज्ञानाचा बहुान्य तर्काधारित निष्कर्ष असल्याचेही आपण मागील लेखांकांत पाहिले. परंतु या माहितीने आपल्या मूळ प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत. भौतिक पदार्थय देह हा आपल्या मानवी अस्तित्वाचा केवळ एक भाग आहे. कोणताही जीव निव्वळ पदार्थय नसतो. पदार्थय देहात प्राण असेल तरच आपण त्या देहाला ‘सजीव’ म्हणतो. अचेतन सृष्टीची सचेतन होण्याकडे जी वाटचाल सुरू झाली, त्या यात्रेतला पहिला टप्पा प्राण आहे. प्रत्येक सजीव देह हा सूक्ष्म पेशींचा (सेल) बनलेला असतो. एकच पेशी असलेले कित्येक सूक्ष्म जीवाणू असतात, तसेच कोटी-कोटी पेशींनी मिळून घडविलेले मानवासारखे व मानवापेक्षाही अगडबंब देह असलेले प्राणी असतात. मात्र या नानाविध देहरचनांचा मळ घटक असलेल्या पेशीची कार्यपद्धती बरीचशी सारखी असते. अगदी वेगळी कार्यपद्धती असणाऱ्या पेशी कदाचित पृथ्वीवर फार पूर्वी अस्तित्वात आल्याही असतील; परंतु त्या टिकाव धरू शकल्या नाहीत. विशाल अंतराळातील दूरवरच्या एखाद्या किंवा अनेक ग्रहांवर अशी वेगळी कार्यपद्धती असणाऱ्या पेशी व त्या पेशींपासून तयार झालेले सजीव प्राणी अस्तित्वात असतीलही. मात्र त्याबाबत कोणताही पुरावा वैज्ञानिकांना अजून तरी आढळलेला नाही. पृथ्वीवरील प्रत्येक जीवपेशीला एक पातळ त्वचा असते, ज्या त्वचेतून काही द्रव व अतिसूक्ष्म घनपदार्थ आत येऊ शकतात व बाहेरही टाकले जाऊ शकतात. ही पातळ त्वचा त्या पेशीला बाह्य जगापासून वेगळे करते. भोवतालच्या वातावरणातून पोषक घटक आत शोषून घेणे; त्या घटकांवर रासायनिक प्रक्रिया करून स्वत:चे पोषण व दुरुस्ती करणे आणि स्वत:सारखीच दुसरी पेशी निर्माण करून निष्प्राण होणे, हे कार्य प्रत्येक सजीव पेशीमध्ये अविरत सुरू असते. पेशीच्या गाभ्यात लांबलचक साखळी असलेले न्यूक्लिक ॲसिड चे डीएनए नावाने ओळखले जाणारे जे रेणू असतात, त्या डीएनए मधील जीन्स नावाचे घटक हे त्या त्या सजीवाच्या देहरचनेचे गुणधर्म ठरवितात. पेशींच्या आत सतत सुरू असलेले हे नवनिर्मितीचे कार्य अतिशय गुंतागुंतीचे, जलदगतीचे व प्रचंड उलाढालीचे असते. हजारो रेणूंची त्यासाठी ठरावीक कार्यक्रमानुसार धावपळ सुरू असते. वेगवेगळ्या प्रकारचे रेणू वेगवेगळ्या प्रकारची कामे पार पाडत असतात. एखाद्या अजस्र कारखान्यासारखी प्रत्येक पेशीच्या आतली कार्यपद्धती असते. पोषण,दुरुस्ती व नवनिर्माण या कामासाठी आवश्यक ते पदार्थय घटक बाह्य वातावरणातून शोषून घेणे व प्रक्रिया झाल्यानंतर अनावश्यक द्रव्य पुन्हा बाह्य वातावरणात सोडून देणे, हे कामही अखंड सुरूच असते. अगदी स्वत:च्या त्वचेची निर्मिती व दुरुस्तीदेखील पेशीच्या आतूनच होत राहते. अशा लक्षावधी पेशींचा मिळून आपला एक एक अवयव बनतो. त्या पूर्ण अवयवाच्या निर्मितीचा आराखडा प्रत्येक पेशीजवळ असतो. अनेक अवयवांचा मिळून आपला देह बनतो. प्रत्येक अवयवाचे कार्य वेगळे, परंतु सर्व अवयव एकमेकांना पूरक असतात. कोट्यवधी पेशींचा समूह असलेला देहदेखील ढोबळमानाने पेशींसारखेच कार्य करतो – देहाबाहेरून पोषक अन्न आत घेणे, त्यावर प्रक्रिया करून देहाचे पोषण करणे, अनावश्यक पदार्थ बाहेर टाकणे, नवीन देहाची निर्मिती करणे व नंतर निष्प्राण होणे!
पृथ्वीच्या पोटात, पृष्ठभागावर व वातावरणात सूक्ष्म जीवाणूंची अफाट संख्या असते. आपल्या मानवी दृष्टीला हे जीवाणू दिसत नाहीत, परंतु आपल्या देहाच्या आत व देहाच्या त्वचेवरदेखील अब्जावधी जीवाणू नांदत असतात. आपल्या देहातील नित्य निष्प्राण होणाऱ्या पेशी हे जीवाणू फस्त करतात. ते अतिशय उंच जागी व अतिखोल विवरांध्ये तसेच कडाक्याच्या थंडीत व होरपळणाऱ्या उष्णतेतदेखील टिकाव धरून राहतात. हे सूक्ष्म जीवाणूदेखील पेशींचेच बनले असतात व त्यांच्या पेशीतदेखील वर नमूद केलेले कार्य सुरू असते.
सर्व सजीव पेशींची रचना व कार्यपद्धती मूलत: समान असल्यामुळे पृथ्वीवर आता आढळून येणाऱ्या व ज्यांच्या देहरचनांचा अभ्यास होऊ शकतो अशा पूर्वी नष्ट झालेल्या सर्व सजीवांची उत्पत्ती एकाच आद्य जीवापासून/पेशीपासून झाली असावी, असा जीवशास्त्राच्या अभ्यासकांचा अंदाज आहे. म्हणजेच पदार्थ-विज्ञान शास्त्राप्रमाणेच जीवशास्त्रदेखील अद्वैताकडे इशारा करते असे मानावे लागेल. सजीव सृष्टीचा प्रारंभ आपल्या पृथ्वीवर सुारे साडे तीन अब्ज वर्षांपूर्वी झाला असावा, असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे. प्रथम जीव कसा जन्मला याबाबत वेगवेगळे अंदाज आहेत. ज्वालामुखीच्या स्फोटातून निर्माण झालेल्या ढगांत मिथेन, अमोनिया व हायड्रोजन विपुल प्रमाणात एकत्र असावे व विजेच्या कडकडाटामुळे त्यांच्या संयोगातून अमिनो-अॅसिड्स व साखरेसारखे क्लिष्ट रचना असलेले रेणू तयार होऊन जीवनाची उत्पत्ती झाली असावी, असा काही वैज्ञानिकांचा अंदाज आहे. दुसरे काही वैज्ञानिक मात्र सूक्ष्म सजीव प्रथम परग्रहावरून अथवा अंतराळातून उल्कापातासोबत अथवा धुकेतूच्या शेपटीवर स्वार होऊन पृथ्वीवर आले व त्यांनीच येथे जीवनाचा विस्तार केला, असे मानतात. वैज्ञानिकांचा तिसरा गट असे मानतो की तीन अब्ज वर्षांपूर्वी सूर्य सध्यापेक्षा कमी तेजस्वी असल्यामुळे पृथ्वीवर हिमयुग होते व शेकडो फूट जाडीचा बर्फाचा थर समुद्रांवर पसरला होता.
त्या थराखाली समुद्राच्या तळाशी जीवनिर्मितीला पोषक वातावरण व घटक असल्यामुळे तिथे प्रथम जीवनिर्मिती झाली असावी. इतरही काही वेगळ्या मान्यता आहेत.
सारांश, पृथ्वीवर सजीवसृष्टीचा प्रारंभ नेका कसा व कोणत्या कारणाने झाला, याबाबत वैज्ञानिकांचे एकमत नाही. मात्र आज अस्तित्वात असलेल्या सर्व सजीवांचा आद्य पूर्वज एकच असावा, या बाबतीत मात्र दुत आढळून येत नाही. आपल्या सामान्य भाषेत असे म्हणू की किड्यामुंग्यांसह आपणांसर्व सजीवांध्ये एकच प्राणतत्त्व प्रवाहित असते.
सजीव-निर्जीव भेद
रॉडनी ब्रुक्स नावाचे एक वैज्ञानिक कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण करणाऱ्या संशोधकांपैकी एक आहेत. त्यांचा एक लेख इंटरनेटवर उपलब्ध आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता व कृत्रिम जीव निर्माण करण्याच्या वैज्ञानिक प्रयोगांद्वारे आजवर एकही जीव निर्माण करता आलेला नाही, हे ते कबूल करतात. मंगळावर जे स्वयंचलित रोव्हर यान पाठविण्यात आले, ते कृत्रिम बुद्धिमत्तेचे उत्कृष्ट उदाहरण होते. खरे तर संगणक जी कृत्रिम बुद्धिमत्ता व्यक्त करतो, ती विज्ञानाची थक्क करणारी भरारीच आहे. बुद्धिबळात निष्णात खेळाडूला हारविण्याचे सामर्थ्य वैज्ञानिकांनी यंत्र-मानवांना प्राप्त करून दिले आहे. तथापि अतिप्रगत तंत्रज्ञानाने घडविलेला यंत्रमानव व खरा मानव, यांच्यातील फरक क्षणार्धात लहान मुलेदेखील ओळख शकतात. या अपयशाची अनेक कारणे असू शकतात असे रॉडनी ब्रक्स मानतात. त्यांपैकी एक कारण म्हणजे सजीवांध्ये त्यांना निर्जीवांपासून वेगळे करणारा एक असा घटक असावा, जो आज तरी विज्ञानासाठी अदृश्य आहे. अर्थात ब्रुक्स हे अत्यंत आशावादी वैज्ञानिक असल्यामुळे विज्ञान त्या घटकाचा शोध लावेलच, असा त्यांना विशासही आहे. परंतु कदाचित तो शोध जीवशास्त्राच्या आजवरच्या धारणा मोडून टाकणाराही असू शकेल, अशीही शक्यता ब्रुक्स वर्तवितात. सापेक्षतेच्या (रिलेटिव्हिटी) सिद्धान्ताने जशी न्यूटनप्रणीत पारंपरिक पदार्थविज्ञानशास्त्रात खळबख माजवून दिली, तसाच प्रकार जीवशास्त्राबाबत घडू शकतो, अशी प्रांजळ कबुली ते देतात.
ते कोणते तत्त्व आहे जे सजीवांना निर्जीवांपासून वेगळे करते? सामान्य भाषेत ते तत्त्व ‘प्राण’ या नावाने ओळखले जाते. परंतु प्राण हे एक स्वायत्त तत्त्व आहे की ती केवळ भौतिक देहात चालणारी ‘प्रक्रिया’ आहे, याबाबत विज्ञान निश्चित काही सांगत नाही. भौतिक देहात विशिष्ट प्रक्रिया (पोषण, धारणा व पुनरुत्पादन) सुरू होणे म्हणजे जीवन आणि ती प्रक्रिया बंद पडणे म्हणजे मृत्यु, अशी सध्या तरी विज्ञानाची बहुान्य धारणा आहे. भौतिक देहात ‘प्राण’ नावाचा कोणी अभौतिक घटक प्रवेश करतो वा देहातून निघून जातो, ही बाब विज्ञानमान्य नाही. परंतु जीवसृष्टी निर्माण करण्यात येत असलेल्या अपयशामुळे
ब्रुक्ससारखे वैज्ञानिक त्या शक्यतेला एकदम नाकारतही नाहीत. आपण सामान्य माणसे मात्र हजारो वर्षांपासून ‘प्राण निघून गेला’ ‘निष्प्राण शरीर’ ‘प्राण कंठाशी आले’ असे शब्दप्रयोग अनुभवांच्या आधारे करत असतो. प्राणी हा शब्दच प्राणाचा अस्तित्व-वाचक आहे.
प्राण आणि मन वा बुद्धी यांतील फरकही सामान्य माणसांना समजतो. मनाचा संबंध कल्पना व विचारांशी आहे, तर प्राणाचा संबंध देहाला जिवंत राखण्यासाठी करावयाच्या घडामोडींशी आहे. शासोच्छ्वास, तहान-भूक, निद्रा, भय, चापल्य, कामवासना इ. प्राणांशी निगडित बाबी आहेत, मनाशी अथवा बुद्धीशी नव्हेत. मानवी पातळीवर भय व कामवासनेसारख्या प्राणिक प्रेरणांध्ये मनही मिसळते, ही बाब वेगळी. निर्जीवांतून उगवला असो, वा निर्जीवांत अवतीर्ण झालेला असो, परंतु प्राण हा एक वेगळाच प्राकृतिक पण अ-भौतिक घटक असावा, असे वाटते. सर्व सृष्टी ही केवळ भौतिक पदार्थांचीच बनलेली असून अ भौतिक असे कोणतेही तत्व सृष्टीत नाही, अशी धारणा बाळगणाऱ्यांना ‘भौतिकवादी’ (मटेरियालिस्ट) म्हणतात. भौतिकवाद म्हणजेच विज्ञानवाद असा एक गैरसमज आहे. आमच्या ज्ञानेंद्रियांना व बुद्धीला जे गम्य व आकलनीय असेल, तेच सत्य मानू अशी धारणा बाळगणे म्हणजे वैज्ञानिक मनोवृत्ती होय. आमच्या ज्ञानेंद्रियांना व बुद्धीला जर स्थिरचित्त शांत अवस्थेत एखादे अ-भौतिक तत्त्व सातत्याने अनुभवास आले, तर तेही सत्यच मानले पाहिजे. सृष्टीत जे काही आहे त्या सर्वास ‘प्राकृतिक’ अथवा ‘नैसर्गिक’ अशी संज्ञा आहे. परंतु जेजे प्राकृतिक/नैसर्गिक आहे, ते सर्व भौतिकच असणे आवश्यक नाही. विज्ञान प्रकृतीचा शोध घेते; केवळ भौतिक पदार्थांचा नव्हे! भौतिक पदार्थाशी प्राणाचा संयोग झाल्यावर पृथ्वीवर लक्षावधी जीव-जातींची निर्मिती झाली. भोवतालच्या वातावरणातून प्राणवायू (ऑक्सिजन), कर्बाम्ल (कार्बनिक अॅसिड), पाणी, नत्रवायू (नायट्रोजन) व अमोनियम ऑक्साईड हे विपुल प्रमाणात व त्यांच्या प्राथमिक स्वरूपात उपलब्ध असलेले निर्जीव घटक शोषून वनस्पती त्यांचे विविध सेंद्रिय पदार्थांत रूपांतर करतात. वनस्पतींना खाणारे प्राणी पुन्हा त्या क्लिष्ट रचना असलेल्या सेंद्रिय पदार्थाचे रूपांतर कर्बाम्ल, पाणी, नत्र व अमोनियम ऑक्साईड या मूळ घटकांत करून वातावरणास ते मूळ घटक परत करतात. दुसऱ्या शब्दांत असे म्हणता येईल की काही सुटे-सुटे निर्जीव पदार्थ हवेतून शोषून सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने वनस्पती त्या निर्जीव पदार्थांना संघटित करून एक क्लिष्ट सेंद्रिय रचना तयार करतात. प्राण्यांना मात्र ही पदार्थांची सेंद्रिय रचना वनस्पतींना खाऊन आयती प्राप्त होते. प्राण्यांध्ये या सेंद्रिय घटकांना पचविण्याचे अथवा जाळण्याचे कार्य चालते, ज्यातून ऊर्जा निर्माण होते. उष्णता व हालचालींची शक्ती प्राणिजगतास अशा प्रकारे प्राप्त करून देणारे वनस्पतिजगत हे खरे पाहता ज्वलनशील सेंद्रिय पदार्थांचे महाभंडारच आहे. वनस्पतींचा मुख्य उपयोग हवेच्या शुद्धीकरणासाठी नसून प्राण्यांना पोषक द्रव्य पुरविण्यासाठी होतो, जेणेकरून प्राणी अधिक शक्तिशाली हालचाली करू शकतील. आणखी वेगळ्या परिभाषेत असेही म्हणता येईल की वनस्पतिजगतात बाल्यावस्थेत उगवलेला प्राण प्राणिजगतात अधिकाधिक विकसित व सामर्थ्यशाली होत जातो. प्राणाची ऊर्जा ही भौतिक ऊर्जेपेक्षा वेगळी आहे, परंतु भौतिक ऊर्जा ही प्राणास बलवान करण्यात निश्चितच साहाय्यभूत ठरते. मरतुकड्या शरीराचा परंतु अत्यंत साहसी अथवा अत्यंत निर्भय अथवा अत्यंत कोपिष्ट मनुष्य असू शकतो. धाडस, साहस, निर्भयता, चपळपणा ही बलवान व विकसित प्राणाची लक्षणे आहेत. हे गुण बलवान देहाशी अथवा उच्च वैचारिक बुद्धीशी निगडित असतीलच असे नाही. लक्षावधी प्रकारांच्या प्राणिदेहांध्ये प्राणांचा जो विविधांगी विकास उत्क्रान्तिक्रमात साधला गेला, त्याचे चित्तथरारक व मनोहारी दर्शन नॅशनल जिऑग्राफिक अथवा डिस्कव्हरी चॅनेल्सच्या माध्यमांतून टीव्हीवर नित्य होत राहते. मुख्य म्हणजे या सर्व प्राणिक हालचाली देहाचे पोषण, रक्षण व प्रजनन या मूलभूत गरजांतून उद्भवतात व देहाच्या रचनेनुसार आणि भोवतालच्या पर्यावरणानुसार प्राणामध्ये भय, चपळपणा, चलाखी, साहस इ. गुणावगुण उमलतात व वाढतात. निर्जीव पदार्थांना वनस्पती खातात, वनस्पतींना शाकाहारी प्राणी तर शाकाहारी प्राण्यांना मासांहारी प्राणी खाऊन पुन्हा मूळचे निर्जीव पदार्थ निसर्गास परत करतात. या अद्भुत सृष्टिचक्रात सूक्ष्म जीवाणूंची कामगिरी सुद्धा अतिशय मोलाची असते. ते सर्व काडीकचरा व निष्प्राण देह्यांना फस्त करून पृथ्वीची स्वच्छता कायम राखतात.
जगणे व जगविणे
जड पदार्थातून व जडाचे आधारे उगवलेले जीवन क्षणभंगुर असते. पदार्थय देहात दीर्घकाळ प्राण टिकू शकत नाही. त्यामुळे प्राणाचा अथवा जीवनाचा विकास होण्यासाठी जगण्याची व प्रजातीच्या पुनरुत्पादनाची मूलभूत प्रेरणा (इन्स्टिंक्ट) सर्व सजीवांच्या अंतरंगात दृढ होणे गरजेचे होते. जीवनाचा विकास म्हणजे अधिकाधिक वाढत्या प्रमाणात सृष्टीचा बोध होण्याची, सृष्टीवर नियंत्रण मिळविण्याची व अनेक प्रकारे उपभोग घेण्याची प्रक्रिया. वैज्ञानिक असे सांगतात की जर एखाद्या जीवाणूवर संकट आले – म्हणजे तो नष्ट होण्याची परिस्थिती निर्माण झाली – तर तो जीवाणू स्वत:मधले डीएनए रेणू भोवतालच्या वातावरणात विखरून टाकतो आणि आजुबाजूचे जीवाणू लगेच त्या विखुरलेल्या डीएनए रेणूंना स्वत:मध्ये शोषून घेतात. डीएनएंची ही देवाणघेवाण कल्पनातीत वेगाने होत राहते व काही महिन्यांतच संपूर्ण पृथ्वीवरील जीवाणूंच्या डीएनए रचनेत काही बदल घडून येतात, जे त्यांना संकटांचा मुकाबला करण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक सक्षम बनवितात. त्यामुळेच कालपर्यंत प्रभावी ठरलेले अँटीबायोटिक औषध अथवा कीटकनाशक आज निष्प्रभ ठरल्याचा अनुभव येतो. म्हणजेच जगणे, व स्वत:ची प्रजाती वाढविणे या सर्व सजीवांच्या मूलभूत प्रेरणा आहेत. त्यांच्या ठायी त्या प्रेरणा नसत्या तर पृथ्वीवर जीवनाचा विकासच झाला नसता. शिवाय
आपल्या देहाच्या पोषणासाठी, रक्षणासाठी व देहाच्या पुनर्निर्मितीसाठी देहाबाहेरील पर्यावरणातून पोषक घटक (पदार्थ व ऊर्जा) देहाच्या आत ओढून घेणे, त्या घटकांवर देहान्तर्गत प्रक्रिया करून जीवपेशी बनविणे व नको असलेले घटक पुन्हा विष्ठेच्या रूपात बाह्य पर्यावरणात टाकून देणे (जी विष्ठा इतर कोणत्यातरी सजीवाचे अन्न असते), हे कार्य प्रत्येक सजीव अखंड करत राहतो. भोवतालच्या पर्यावरणातील संभाव्य बदलांचा अंदाज घेऊन अनुकूल काळातच अन्नाचे साठे जमवून ठेवण्याची अथवा पाऊस-वाऱ्यापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी भक्कम निवाऱ्याची तजवीज करण्याची कल्पक बुद्धीही मुंगीसारख्या क्षुद्र सजीवां ध्येदेखील आढळून येते. अर्थात ‘पावसाळ्यापूर्वी आपण अन्न साठवून वारुळाची डागडुजी केली पाहिजे’ असा माणसारखा विचार कोणतीही एक मुंगी करू शकत नसेल. परंतु ‘मुंगी’ या प्रजाती (स्पेसीज) मध्ये ते शहाणपण उत्क्रान्तिक्रमात जगण्याच्या व वृद्धिंगत होण्याच्या मूलभूत प्रेरणेतून पर्यावरणीय संकटांना तोंड देता-देता विकसित झाले असणार.
आमच्या घराच्या मागील भिंतीच्या आश्रयाने एक वेल वर चढत गेली. खोलीच्या खिडकीइतकी उंची होताच त्या वेलीने खिडकीच्या आतून गजाला वळसा घातला व पुन्हा उंची वाढल्यावर दुसऱ्याही वरच्या गजाला वळसा घातला. स्वत:चा आधार भक्कम करण्याचे हे ‘शहाणपण’ वेलीत प्रगटले.
माझ्या घराच्या मागील बाजूचे तारेचे कुंपण तुटले होते. मागच्या सर्व्हिस गल्लीतून डुकराची एक गर्भार मादी आमच्या परसदारी असलेल्या झुडपामध्ये मोठा खड्डा स्वत:च्या पायांनी करू लागली. सुरुवातीला हाकलले तर ती पळून जायची. परंतु जसजसे तिचे दिवस भरत आले, तसतशी ती धीट व आक्रमक होत गेली. खड़ा करून तिने त्यात पाचोळा अंथरला व पिलांना जन्मही दिला. पिले जन्मल्यावर ती अधिकच आक्रमक होऊन त्यांचे संरक्षण करत होती. पुढे पिले चालू लागून स्वतंत्र झाल्याबरोबर या इकरिणीची सर्व आक्रमकता लोप पावली व ती हाकलल्यावर घाबरून पळू लागली. स्वत:च्या प्रजातीची वृद्धी व्हावी यासाठी प्राण्यांची नित्याची प्रकृतीदेखील प्रसंगविशेषी कशी बदलते व असहाय अवस्थेतील पिलांचे रक्षण करण्यासाठी एरवी भित्रा स्वभाव असलेली मादी-माता कसा चंडिकेचा अवतार धारण करते, याची असंख्य उदाहरणे प्राण्यांध्ये आढळून येतात.
उत्क्रान्तीच्या खालच्या टप्प्यांतील सजीवांच्या प्रजातीतील प्रत्येक जीवाचे स्वत:चे वेगळेपण (त्या प्रजातीतील इतर जीवांपेक्षा) प्रगटताना दिसत नाही. त्या त्या प्रजातीची एकूण सामुदायिक प्रकृती जगण्याच्या ओघात अधिक शहाणी होत गेली, व्यक्तिगत जीवांची नव्हे, असे म्हणता येईल. मात्र उत्क्रान्तीच्या वरच्या टप्यात म्हणजे सस्तन प्राण्यांध्ये मात्र प्रजातीतील वैयक्तिक जीवांध्येदेखील स्वत:चे वेगळेपण व वैशिष्टच उमलू लागले. सर्व गाई साधारणपणे सारख्याच दिसत-वागत असल्या तरी प्रत्येक गाईच्या रूपात व स्वभावात इतर गाईंपेक्षा वेगळेपण कसे असते, हे आपण जाणतोच. असे डास अथवा मुंग्यांच्या बाबतीत म्हणता येत नाही. निर्जीव व सजीवांधला एक महत्त्वाचा फरक वैज्ञानिक असाही सांगतात की आपण एखाद्या दगडाला लाथ मारली तर त्याची प्रतिक्रिया काय होईल, याचा अचूक अंदाज करता येतो. परंतु एखाद्या कुत्र्याला लाथ मारली तर त्याच्या प्रतिक्रियेचा अचूक अंदाज करणे अशक्य असते. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर लाथ मारल्यावर दगड किती दूर जाऊन पडेल हे न्यूटनच्या भौतिकीय सिद्धान्ताच्या आधारे लाथेतील जोर व दगडाचे वजन माहीत करून अचूक वर्तविता येते, कारण त्या लाथुळे दगडाच्या आतील संरचने (स्ट्रक्चर) मध्ये बदल होत नसतो. परंतु सजीव प्राण्याला लाथ बसल्यावर त्याच्या अंतरंगातील एकूण संरचनेत काही बदल होऊ लागतात व त्या बदलांसह त्याची प्रतिक्रिया घडते. भोवतालच्या जगाकडून घडणारी क्रिया ही सजीवांच्या आतील संरचनांध्ये बदल घडविण्यास कारणीभूत ठरू शकते; परंतु ते बदल नेके कशा स्वरूपाचे असावे, हे त्या बाह्य जगाला ठरविता येत नाही. क्रियेला प्रतिसाद देणाऱ्या सजीवाची एकूण प्रकृती ते ठरविते. व्यक्तिस्वातंत्र्याची ही प्राथमिक सुरुवात आहे. भोवतालच्या पर्यावरणाशी आपले जीवन सुसंगत करण्याकरिता सर्व सजीव प्रजातींच्या प्रकृतीमध्ये उत्क्रान्तीच्या ओघात बदल होत गेले. हे बदल त्यांनी ठरवून जाणतेपणी केलेले नाहीत. परंतु ही यांत्रिकपणे अथवा अपघाताने घडलेली प्रक्रिया असावी, असेही म्हणता येत नाही. जगणे व आपली प्रजाती वृद्धिंगत करणे या आदिम प्रेरणा सजीवांध्ये इतक्या बलवान आहेत की जगणे व प्रजा वाढविणे शक्य व सुसह्य होण्यासाठी प्रकृतिपरिवर्तन ही अपरिहार्य व क्रमप्राप्त बाब ठरत । गेली. खरे पाहता जगणे व आपल्या प्रजातीची संख्या वाढविणे या दोन वेगळ्या प्रेरणा नसून ‘आपली प्रजाती प्रदीर्घकाळ टिकून राहणे’ ही एकच मूळ प्रेरणा त्या त्या सजीवाच्या प्रजातीच्या ठायी असते. एक व्यक्ती म्हणून सजीवाचे जगणे-मरणे ही गौण बाब असून निसर्गाला खरे मोल प्रजातीच्या टिकून राहण्याचे असते. पृथ्वीवर जीवनाचा सर्वांगीण विकास पदार्थय देहांच्या आधारे होण्यासाठी ही मूलभूत प्रेरणा अत्यावश्यक ठरते.
१२, विनोद, स्टेट बँक कॉलोनी, कॅम्प, अमरावती.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.