मानवी अस्तित्व (९)

संगणक आपला ताबा घेतील का?

आपला मेंदू म्हणजे एक अजब व विचित्र रसायन आहे. जगातील इतर कुठल्याही गुंतागुंतीच्या रचनेपेक्षा मेंदूची गुंतागुंत अनाकलनीय ठरत आहे. तरीसुद्धा आपण त्याला रक्त-मांस-चेतापेशी-मज्जारज्जू पासून तयार झालेले मशीन असेच म्हणू शकतो. म्हणजेच मेंदच्या कार्यप्रणालीप्रमाणे कार्य करू शकणारे मशीन आपणही बनवू शकतो असा अर्थ त्यातून ध्वनित होतो. या दिशेने होत असलेल्या प्रयत्नांध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या रोबोंची रचना – थोडक्यात एआय (Artificial Intelligence) – आघाडीवर आहे.
एआय आज ज्या पातळीवर आहे त्याच पातळीवर पुढील काळातही राहील याची खात्री नाही. २०५० पर्यंत एआय मानवी बुद्धिमत्तेला मागे टाकून पुढे जाणार आहे, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. त्यातील काही तज्ज्ञ तर ही तारीख २०३० सुद्धा असू शकेल, असे म्हणत आहेत.
सर्वांत प्रथम आपण आपल्याला जितके बुद्धिमान समजत होतो तेवढे नाही, हे मान्य करायला हवे. हेच जर खरे असेल तर त्याचे अनेक परिणाम होतील. मानवाच्या एकल अवस्थेचा (singularity) पडदा केव्हाच फाडला गेला आहे. मानवाचे ‘एकमेवाद्वितीयतेचे आसन डळमळीत झालेले आहे. परंतु यामुळे नेके काय होईल, याची मात्र कुणालाच कल्पना नाही. हे म्हणजे झुरळांनी वा मांजरानी मानवी तंत्रज्ञानाचे भविष्य वर्तविल्यासारखे होईल. अशी स्थिती असली तरी भविष्यात काय वाढून ठेवले आहे याचा अंदाज घेणे थांबलेले नाही.
एका तज्ज्ञाच्या मते, चित्रपटात दाखविल्याप्रमाणे एखाद्या गुप्त प्रयोगशाळेतील मॉन्स्टरसदृश एआय भस्मासुर आपल्या डोक्यावर हात ठेवून आपल्याला भस्मीभूत करण्याआधीच एआयशी दोस्तीचा हात मिळवून मानवाच्या सर्व व्यवहारांत त्याचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवा. हे अर्थातच सोपे नाही. तरी कल्पनाकरू, हे जरी शक्य झाले तरी आठवड्यातील सातही दिवस व दिवसातील २४ तास अव्याहतपणे न चुकता कार्य करू शकणाऱ्या एआय बरोबर आपण कसे काय स्पर्धा करू शकतो? या पुढील पिढीतील एआयची उडी फार मोठी असणार आहे. विज्ञान,तंत्रज्ञान व ललितकला, साहित्य इत्यादी
क्षेत्रातील त्यांचे प्रावीण्य आपल्यापेक्षा कित्येक पट जास्त होणार असल्यामुळे ते आपल्याला सहजपणे मागे टाकतील. आपणच जन्माला घातलेल्या या बाहल्या आपल्याच जिवावर उठतील आणि आपल्याला विस्थापित करतील. काही का असेना, एआय या जगावर सत्ता गाजविणार हे मात्र नक्की. यातही एक अंधुकसा आशेचा किरण आपल्याला दिसतो. रोबोंची शरीरयष्टी माणसासारखी नाजूक व कमकुवत नसल्यामुळे ते फक्त पृथ्वीवरच राहतील याची खात्री नाही. त्यांच्यासारख्यांना हजारो वर्षांचा अंतरिक्षातील प्रवास कठीण नाही. त्यामुळे स्वत:ची अक्कल वापरून दूर कुठल्यातरी ग्रहावर वा कुठल्यातरी ग्रहाच्या उपग्रहावर जाऊन राहू लागतील. तेथील प्रदूषणविरहित शांत वातावरणात ते आणखी चांगल्या प्रकारे कार्य करू शकतील. त्याच्याशी आपले कुठलेही वैर नसल्यामुळे व आपण त्याच्याशी स्पर्धा करू शकत नसल्यामुळे एआय यंत्रमानव आपल्याला पूर्णपणे नष्ट करण्याची शक्यता कमी वाटते. आपण त्यांची बरोबरी करू करणार नाही, त्याच्यावर कुरघोडी करणार नाही. त्यामुळे आपण जसे किडा मुंग्यांना जगण्यास मुभा देतो तसे ते आपल्याला जगू देतील. कदाचित हे यंत्रमानव एका कुठल्यातरी दीर्घिकेवर स्थलांतरित होतील व या धोक्यात असलेल्या पृथ्वीवर आपल्याला आहे तसेच राह देतील- आपल्या अस्तित्वाची दखल न घेता. फार फार तर या पृथ्वीला मानवी अभयारण्य असे समजून केव्हातरी अधून मधून मजेखातर भेट देत राहतील. वरील वर्णनावरून उघडच आहे की अशा परिस्थितीत मानवी अस्तित्वाला काही अर्थ राहणार नाही. मुळात मानवाला इतर कुणीतरी कमी क्षमतेचा, ‘ढ’ म्हणून वागवलेले अजिबात आवडणार नाही. कदाचित कामेच्छा, व्यसनाधीनता व मनोरंजनाच्या भन्नाट कल्पना यांच्या आधारावर मानव प्राणी स्वत:ला प्राणी जगतात सर्वश्रेष्ठ मानून सत्ता गाजवीत आहे. परंतु एआय मात्र माणसाला या घमेंडीतून बाहेर काढणार आहेत. तरीसुद्धा आपल्यातील काही मोजके जण विज्ञान, तंत्रज्ञान व कला यासंबंधीचे प्रयोग करीतच राहतील. जरी त्यांची ही सर्जनशील कृती एआयपेक्षा निकृष्ट दर्जाची व टाकावू असली तरी त्यापासून आनंद मिळत असल्यास माणसे ते करीतच राहतील. कदाचित एआय यंत्रमानव आपल्याला प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांसारखे जगू देतील. शक्य झाल्यास मानवाने स्वत:च आपली बुद्धिमत्ता वाढवावी, क्षमता वाढवावी या अपेक्षेने एआय सोई सवलती देतील, प्रशिक्षणाची व्यवस्था करतील. माणसेही हळू हळू बदलत बदलत त्यांच्या इतके बुद्धिमान होण्याचा प्रयत्न करीत राहतील. त्यामुळे आता आपल्यासमोर दोन पर्याय असतील: एक माणसासारखे जगत जगत एका दिवशी मृत्यूला कवटाळणे किंवा अती बुद्धिमत्ता असलेल्या मशीनप्रमाणे जगत राहून अजरामर स्थितीस प्राप्त होणे.
८, लिली अपा., वरदायिनी सह.गृह., पाषाण-सूस रोड, पाषाण, पुणे ४११ ०२१

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.