स्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य, आणि मार्क्सवाद

मार्क्सवादाविषयी अनेक गैरसमज आहेत. त्यापैकी एक म्हणजे मार्क्सवादात किंवा साम्यवादी राज्यकर्ता असलेल्या देशात व्यक्तिस्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य नसते. मार्क्सवाद हा लोकशाहीविरोधी आहे; असे मत होण्याला अर्थात काही कारणे आहेत. काही मार्क्सवाद्यांच्या भूमिकाही त्याला कारणीभूत आहे. एका विशिष्ट ऐतिहासिक परिस्थितीत अप्रगत अशा भांडवली देशात म्हणजे रशियात क्रांती झाली. तिकडे झारशाही होती. भांडवली लोकशाही नव्हती. प्रगत भांडवली देशात पहिली क्रान्ती होईल असे मार्क्सने भाकित केले होते. परंतु क्रांती झाली ती लोकशाही नसलेल्या झारशाही रशियात. ग्रामशी या इटालिअन मार्क्सवाद्याने त्या क्रांतीला मार्क्सविरोधी क्रान्ती असे म्हटले आहे. नंतर क्रान्ती झाली, ती सुद्धा भांडवली लोकशाही नसलेल्या चीनमध्ये. क्यूबा काय किंवा व्हिएतनाम काय तेथेही युरोपीय पद्धतीची भांडवली लोकशाही नव्हती. त्यामुळे एका विशिष्ट ऐतिहासिक परिस्थितीत हे देश सापडले आणि कामगारवर्गीय हुकूमशाही म्हणजे कम्युनिस्ट पक्षाची हुकूमशाही आणि कम्युनिस्ट पक्षाची हुकूमशाही म्हणजे त्यांच्या मध्यवर्ती समितीची हुकूमशाही असे चित्र दुर्देवाने उभे राहिले. आणि स्टालिनवाद म्हणजेच मार्क्सवाद म्हणजेच साम्यवाद असेही चित्र उभे राहिले. माओच्या चीनमध्ये माओने सांस्कृतिक क्रांती केली, तसेच माओने लोकांना मध्यवर्ती कचेरीवर हल्ला करा असा आदेश दिला आणि लोकांनी तसा हल्ला केलाही. परंतु दुर्देवाने माओने हा आदेश देण्यापूर्वी किंवा नंतर मध्यवर्ती कचेरीवर लोकांनी कधीच तसा हल्ला केला नाही. त्यामुळे स्टालिनने केलेल्या चुका माओनी सुधारण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्याला मर्यादा होत्या.
हे सारे असे का झाले? याचे प्रमुख कारण म्हणजे स्टालिनपूर्वीचे मार्क्सवादी जागतिक क्रांतीबद्दल बोलत. स्टालिनने सोविएत संघात समाजवाद बांधण्याचा चंग बांधला. आणि समाजवाद एक देशात शक्य आहे हे जगाला पटवायचा प्रयत्न केला. थोड्या फार फरकाने माओ, फिडेल कॅस्ट्रो, व हो चि मिन्ह यांनीही तेच केले. खरं म्हणजे समाजवाद कुठल्याही देशात आलाच नाही. आली ती शासकीय भांडवलशाही. लेनिनचा प्रामाणिकपणा एवढा की, त्याने हे सुरुवातीलाच कबूल केले होते की आम्ही शासकीय भांडवलशाहीची उभारणी करत आहोत. पण थांबा. एकदा का युरोपात क्रांती झाली की आम्ही समाजवादाकडे जाऊ स्टालिनपासून या शासकीय भांडवलशाहीला समाजवाद असे म्हणण्यात येऊ लागले. भांडवली हुकूमशाही व भांडवली लोकशाही या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे लेनिन यांनी म्हटले. परंतु व्यवहारात लेनिन व लेनिनोत्तर अधिकृत मार्क्सवाद्यांना कामगारवर्गीय हुकूमशाही व कामगारवर्गीय लोकशाही या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे दाखवून देता आले नाही. म्हणून आज मार्क्सवाद, जी भांडवशाहीची पहिली समीक्षा आहे आणि ती समीक्षा बिगर मार्क्सवादीच काय तर मार्क्स-एंगल्स-स्टालिन-माओ या परंपरेत अडकलेल्या अधिकृत मार्क्सवादी कार्यकर्त्यांनाही त्याबद्दल फारशी माहिती नाही. ही माहिती करून घ्यावी अशी गरज अधिकृत मार्क्सवाद्यांना का बरे वाटली नसेल ? यालाही काही कारणे आहेत. तथाकथित समाजवादी देशांकडून काही गंभीर चुका, घोडचुका झाल्या आहेत हे मान्य करूनही तसेच राजवटी या एकपक्षीय हुकूमशाहीच्या होत्या हे मान्य करूनही त्या राजवटीच्या आजही काही जमेच्या बाजू आहेत. काही मार्क्सवादी या राजवटींना समाजवादी न म्हणता क्रांत्युत्तर समाजरचनेच्या राजवटी असे म्हणतात. ते पुढे असेही म्हणतात या राजवटीत काही दोष होते तर काही गुण होते. दोष तर उघड उघड होते. अभिव्यक्ति-स्वातंत्र्याचा संकोच हा तर उघडउघड दोष होता. तसेच आपल्यापेक्षा वेगळा विचार करणाऱ्या मार्क्सवाद्यांना देशाबाहेर हाकलून लावणे किंवा उघडउघड खून करणे हे स्टालिनच्या राजवटीत मोठ्या प्रमाणावर झाले. ट्रॉटस्कीचा खून झाला आणि जागतिक कीर्तीचा महान कामगारवर्गीय कवी मायकोव्हास्की ह्याने आत्महत्या केली. या दोषांवर पांघरूण घालणे मी आणि माझ्यासारख्या अनेक असंख्य मार्क्सवाद्यांनी कधीच केले नाही आणि करणारही नाही, पण देशाला अमेरिकेएवढे सामर्थ्यवान बनविण्याची किमया ही सोविएत संघाने केली तसेच जगातला पहिला व्यवसाय म्हणून ज्याकडे पाहिले जाते तो वेश्याव्यवसाय या तथाकथित समाजवादी देशांनी सर्व प्रथम नष्ट केला हे सर्वान्य आहे. स्त्रियांना मतदानाचा अधिकार हुकूमशाही रशियात १९१७ साली तर लोकशाही अमेरिकेत तो १९२४ साली मिळाला. लोकशाही अमेरिकेत आर्मस्ट्राँग या पुरुषाला सर्वप्रथम चंद्रावर पाठविले. हुकूमशाही रशियाने दोन स्त्रिया अंतराळात पाठवल्या. तर पहिला अंतराळवीर युरी गागारीन हक्मशाही रशियातील आहे हे मान्यच आहे.
आता जेव्हा २००८ साली जागतिक मंदीची पुन्हा लाट आली आहे तशीच ती १९२९ साली आली होती. या मंदीपासून मुक्त होता तो हुकूमशाही रशिया हेही सर्वान्य आहे.
सोविएत संघराज्यात अनेक राष्ट्रके होती. त्या राष्ट्रकांच्या वेगवेगळ्या भाषा होत्या. या सर्व राष्ट्रकांसाठी लिखित भाषा विकसित करून त्यात त्यांना शिक्षण देण्यात आले. त्यांचे साहित्य निर्माण करण्यात आले. कुठलाही राष्ट्रसमूह अभिव्यक्त होण्यासाठी भाषेचा उपयोग करत असतो. आपल्या भाषेतून साहित्य निर्माण करण्याचे स्वातंत्र्य याच हकूमशाही सोविएत संघाने उपभोगले. सिनाची भाषा व त्याचे व्याकरण निर्माण करणारा जगमान्य आयझेनिस्तिन हा त्याच हुकूमशाही रशियातला. सर्वांना मोफत उच्च शिक्षण व मोफत अद्ययावत वैद्यकीय सेवा व मोफत पाव हा हुकूमशाही रशियात मिळत होता. कुठलाही कामगार विमानप्रवास करू शकत होता. हे सारे पाहूनच फेबिअन समाजवादी असलेले वेब पती-पत्नी तसेच जगद्विख्यात कवी रवीन्द्रनाथ टागोर हे लोक प्रभावित झाले.
स्टालिन हुकूमशहा होता. हे अमान्य करण्याचा प्रश्नच येत नाही. पण तो फसिस्ट नव्हता. म्हणून ब्रिटनने व अमेरिकेने हिटलरचा पाडाव करण्यासाठी सोविएत संघाशी आघाडी केली. दुसऱ्या महायुद्धात लाल सेनेने केलेला पराक्रम खूपच मोठा होता. मुख्यतः त्यांच्याच प्रयत्नातून हिटलरचा पराभव झाला आणि हुकूमशहा स्टालिनने युरोपातील सांसदीय लोकशाही वाचवली. सोविएत संघाच्या स्थापनेपूर्वी व नंतरही अनेक मार्क्सवादी त्याचे टीकाकार होते. त्यातले प्रमुख टीकाकार म्हणजे रोझा लक्झेंबर्ग,ट्रॉटस्की व माओ हे होत. माओनी स्टालिनची परंपरा न सोडताही स्टालिनवादावर टीका केली. तो म्हणतो, स्टालिनने समाजवादी पाया सुधारण्याच्या नादात इमल्याचे अपरिमित नुकसान केले. तर क्रुश्चेव्ह यांनी इमल्यामध्ये सुधारणा करण्याच्या नादात समाजवादी पायाचेच नुकसान केले आहे. ट्रॉटस्कीला एवढे भान होते की, जागतिक भांडवलशाही एकट्या देशात समाजवाद टिकू देणार नाही. एकट्यादुकट्या देशात शक्य नाही म्हणून आपण जागतिक क्रांती केली पाहिजे.
रोझा लुक्झेंबर्गचा तर लोकशाहीसाठी पहिल्यापासून आग्रह होता. ती म्हणते प्रश्न हुकूमशाही की लोकशाही असा नसून, प्रश्न भांडवली लोकशाही की समाजवादी लोकशाही असा आहे. आपले विरोधी मत मांडणाऱ्याना स्वातंत्र्य असणे म्हणजेच खरे स्वातंत्र्य. असे तिने केव्हाच म्हणून ठेवले आहे. मार्क्सवादी चळवळीच्या दुर्देवाने जर्मन भांडवलदारांनी तिचा खून केला आणि मार्क्सवादांतर्गत समाजवादी लोकशाहीची परंपरा खंडित झाली. नंतरच्या मुक्ततावादी मार्क्सवाद्यांनी स्टालिनची आणि माओची सकारात्मक बाजू मान्य करून, ट्रॉटस्की व रोझा लुक्झेंबर्गची परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. एवढ्या साऱ्या गदारोळात आणि सोविएत संघाच्या पतनापूर्वीच पाब्लो पिकासोसारखा जागतिक कीर्तीचा चित्रकार फ्रेंच कम्युनिस्ट पक्षाचा काही काळ का होईना पण सभासद होता. तसेच अस्तित्ववाद माडंणारा जागतिक कीर्तिचा विचारवंत लेखक ज्यांपॉल सार्च शेवटी मार्क्सवादी झाला.आणि शेवटपर्यंत मार्क्सवादी राहिला. याचा विचार व्हायला हवा.
एक गोष्ट सांगायला हवी ती म्हणजे बर्लिन भिंत कोसळल्यानंतर कित्येक कुटुंबातील आईवडील अधिक पगार मिळतो म्हणून भांडवली प. जर्मनीत नोकरी करत असत. मात्र आपली मुले मोफत शिक्षण व इतर सोयी सुविधा मिळतात म्हणून पूर्व जर्मनीत ठेवत असत.
आता आपण एका नव्या मुद्द्याकडे वळू या. या तथाकथित समाजवादी देशांत व्यक्तिस्वातंत्र्य नव्हते. मतस्वातंत्र्य नव्हते. हे पूर्वीच मांडले आहे. कामगारवर्गीय हुकूमशाहीचा खरा अर्थ हा आहे की, स्थित्यंतराच्या काळात भांडवलदारांना त्यांचे भांडवल काढून घेऊन, त्याला व्यक्ती म्हणून मुक्तपणे जगू देणे, खाजगी मालमत्तेचा अधिकार काढून घेऊन, तसेच खाजगी नफा करण्याचा हक्क काढून घेऊन त्यांना इतर समाजघटकांचा भाग बनवणे. हे खूपच कठीण आहे. पण हे करता आले पाहिजे. तसेच अल्पभूधारकाची जमिनीची भूक लक्षात घेऊन त्याला पहिल्यांदा जमीन कसू देणे नंतर हळूहळू त्यांच्या कलाने घेऊन सामूहिक शेतीत त्यांना सामावून घेणे हेही खूप कठीण आहे. पण करता आले पाहिजे. तशीच सर्व सत्ता सोविएतकडे देऊन खालपासून वरपर्यंत सत्तेची कमान बांधणे. उत्पादन काय करायचे किती करायचे, कुणासाठी करायचे कसे करायचे हे अगदी खालच्या थरांनी ठरवायला हवे. तसेच उत्पादनाच्या पद्धतीमध्ये यंत्राचा वापर केला तरी माणसाने यंत्र चालवले पाहिजे. यंत्रानी माणसे चालवता कामा नयेत याचे पक्के भान हवे. तसेच कुठल्याही परिस्थितीत नोकरशाहीची आवश्यकता हळूहळू कशी कमी करता येईल व शेवटी नष्ट होईल ते पाहायला हवे. समाजवाद या पहिल्या पायरीवरून साम्यवाद या दुसऱ्या पायरीवर जाता आले पाहिजे. हे सारे घडू शकते पण त्यासाठी जागतिक क्रांतीची आवश्यकता आहे. जगात बहुसंख्याक देश जर भांडवली अर्थशास्त्रानुसार चालत असतील तर हे अल्पसंख्याक देशात समाजवादाची अपेक्षा करणे नुसते कठीणच नाही तर दुरापास्त आहे. विसाव्या शतकातल्या क्रांत्युत्तर समाज रचनांच्या प्रयोगांनी हे दाखवून दिले आहे. आस्कर वाईल्ड हा काही मार्क्सवादी नाही. तरी तो सोल ऑफ मॅन अंडर सोशलिझम या लेखात असे म्हणतो की, भांडवलशाही माणसाचा खरा व्यक्तिवाद नाकारते. तो काय आहे यापेक्षा त्याच्याकडे काय आहे याला महत्त्व देते. समाजवादाने, माणसाला तो काय आहे हे समाजाला दाखविण्याची पूर्ण संधी द्यायला हवी. मार्क्सवाद म्हणजे कामगारवाद नाही. तो समाजवाद आहे. तो साऱ्या समाजाचा आहे. हे समजून घेऊन, साऱ्या समाजघटकांना, त्यातील प्रत्येक व्यक्तीला हवे ते करण्याचे, हवे ते होण्याचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे.
भांडवली लोकशाहीपेक्षा अधिक प्रगल्भ लोकशाही, भांडवली उदारमतवादापेक्षा अधिक प्रगल्भ उदारमतवाद, समाजवादी लोकशाहीतच शक्य आहे हे कामगारांनी आणि साम्यवाद्यांनी प्रत्यक्षात आणून दाखवायला हवे. रोझा लुक्झेंबर्गला नेके हेच अभिप्रेत होते.
ह्या लेखाचा शेवट करत असताना माओचे वचन उद्धृत करतो. माओ म्हणतो, “आपल्याला शासनसंस्था काबीज करायची आहे कारण आपल्याला शासनसंस्था नष्ट करायची आहे. आपल्याला कम्युनिस्ट पक्ष स्थापन करायचा आहे कारण आपल्याला कम्युनिस्ट पक्ष नष्ट करायचा आहे. विसाव्या शतकातील मार्क्सवादाच्या नावाखाली आलेल्या राजवटी नेक्या याच गोष्टी विसरल्या. म्हणून तेथे भांडवली देशांपेक्षा जास्त कल्याणकारी राज्य असूनही, लोकशाहीचा व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच व अभाव यामुळे क्रांत्युतर समाजरचनेचे प्रयोग फसले. त्या अर्थव्यवस्थाही फसल्या. ज्या देशांध्ये समाजवाद कधी नव्हताच त्या देशांध्ये समाजवाद फसला असे म्हणणे अशास्त्रीय होईल. समाजवाद अजून यायचाच आहे. पण भांडवलशाहीची आजची गती व गत पाहता तो लोकांना वाटतो त्यापेक्षा लवकर येण्याची शक्यता आहे. तो समाजवाद मार्क्स ज्याला कामगार म्हणतो तोच आणेल असे नाही तर त्याबरोबर भांडवलशाही ज्या समाजघटकांना रोज बेदखल करत आहे, त्यांना माणूस म्हणून जगू देत नाही, एक अमानुष रानटी संस्कृती त्यांच्यावर लादत आहे, ते सारे समाजघटक एकत्र येऊन तो समाजवाद आणतील. ज्यात जल-जमीन-जंगल आणि यंत्रही माणसांच्या ताब्यात असतील. ज्यात एकजण सर्वांसाठी आणि सर्वजण एकासाठी हे मार्क्सचे स्वप्न प्रत्यक्षात येईल. गरजेच्या साम्राज्याकडून मानवजात स्वातंत्र्याच्या साम्राज्याकडे जाईल.
सी ३५ ए, अनंत निवास, वीर सावरकर मार्ग, दादर, मुंबई-२८. भ्र.ध्व.९००४६१४५९४, इ-मेलः raj27k@ymail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.