मन व अंतःकरण
आपल्या अस्तित्वाची अनेक अंगे अथवा घटक असतात. पदार्थय भौतिक शरीर हा एक घटक, प्राण दुसरा, मन तिसरा, बुद्धी चौथा आणि जाणीव हा आणखी वेगळा घटक आहे. त्याखेरीज आत्मा हाही एक घटक अति-महत्त्वाचा असल्याचे अध्यात्म मानते, परंतु आत्म्याचे अस्तित्व हा वादाचा विषय आहे. प्राण आणि बुद्धीच्या मधात मन आहे. मन म्हणजे वासना, भावना, विचार अथवा कल्पना नव्हे. माझ्या मनात कल्पना आली किंवा विचार आला असे आपण म्हणतो. म्हणजेच आपण मनाला कल्पनेपेक्षा किंवा विचारापेक्षा वेगळे मानतो. थोडे तटस्थ होऊन आपण आपल्या मनाला न्याहाळले तर असे दिसून येते की त्यात अनेकानेक भावना, कल्पना, विचार तरंगत येतात. त्यांपैकी जी भावना, कल्पना अथवा विचार त्या त्या वेळी आपल्या प्रकृतीला हवीहवीशी वाटते, त्या भावनेच्या, कल्पनेच्या वा विचाराच्या स्वाधीन मनाला करून आपण त्यामागे फरफटत जातो. सामान्यत: मनावर आपला अंकुश नसतो व आपले बाह्य मन हे भोवतालच्या वातावरणातून ज्ञानेंद्रियांार्फत ग्रहण केलेल्या स्पंदनांना प्रतिसाद देण्यात गुंतले असते.
बुद्धी ही बहुतांश मनाच्या दासीसारखे कार्य करते. बुद्धीचे कार्य विश्लेषण तर्क करण्याचे असते. आम्ही वकील लोक आमची बुद्धी पक्षकारांना भाड्याने देतो. म्हणजे त्यांना हवे तसे विचार व तर्क सुसंगत पद्धतीने पुरवितो. त्या तर्काचा सत्याशी संबंध असेलच असे नाही. आपली बुद्धी हमखास आपल्या मनाला हवे तसेच घटनांचे विश्लेषण करते व तर्क पुरविते.
मन काय आहे?
उत्क्रान्तीच्या ओघात सस्तन प्राण्यांध्ये असे वेगळे वैशिष्ट्य निर्माण झाले की प्रत्येक प्राणी त्याच्या प्रजातीतील इतर प्राण्यांसारखीच प्रकृती धारण करत असला तरी त्याच्याच प्रजातीतील इतर प्राण्यांपेक्षा त्याच्या स्वभावात जाणवण्यासारखे वेगळेपण आढळून येते. मानवांध्ये या व्यक्ती स्वातंत्र्याने कळस गाठला. प्रत्येक माणसाचे मन हे त्याचे अत्यंत खाजगी क्षेत्र असते, ज्यातील घडामोडींबाबत इतर लोक केवळ अंदाज बांधू शकतात परंतु प्रत्यक्ष जाणू शकत नाहीत. मनुष्येतर प्राण्यांच्या जगण्याच्या प्रेरणा उपजत म्हणजे निसर्गदत्त असतात. सोप्या भाषेत असे म्हणता येईल की त्या त्या प्राणिजातीचे एक सामुदायिक मन असेल जे त्यातील व्यक्तींच्या जीवनाचे संचालन अबोध पातळीवर करत असावे. परंतु मानव हा निसर्गापासून तुटलेला प्राणी आहे. त्याला स्वत:च्या वेगळ्या अस्तित्वाचे भान आलेले आहे. ‘मी’ आणि ‘ते’ (म्हणजे माझ्याबाहेरील सर्व जग) अशी स्पष्ट विभागणी व्यक्तीच्या मनात झालेली आहे. शिवाय स्मृती व कल्पकता हे दोन वर म्हणा अथवा शाप म्हणा, मानवाला जास्तीचे मिळाले आहेत. त्यामुळे त्याच्या मनात असंख्य स्मृतींचा साठा आहे आणि कल्पकतेच्या बळावर त्याचे मन गतिमान भराऱ्या घेऊ शकते. शिवाय उपजत प्रेरणा कमी झाल्यामुळे मनाला सतत निवड करावी लागते व ते हेलकावे खात राहते. मानवी मनाची खोली व व्याप्ती अथांग आहे. पृथ्वीवरील सर्व सजीव उत्क्रान्ती मानवाच्या मनात अवचेतन स्वरूपात साठविलेली आहे. आपण केवळ आपल्या मनाचा पृष्ठभागच पाहू शकतो. आपल्या जाणिवेच्या कक्षेत नसलेला अर्ध/अवचेतन भाग अतिशय मोठा आहे. परंतु आपल्या क्रिया-प्रतिक्रिया बहुतेक अवचेतन मनातून प्रगटलेल्या असतात. पूर्वजांकडून आनुवंशिकतेने प्राप्त झालेले गुणधर्म, बालपणापासून भोवतालच्या वातावरणातून झालेले संस्कार, आपल्या व्यक्तिगत अनुभवांतून झालेले शिक्षण इत्यादी बाबी आपल्या सचेतन मनाची जडण-घडण करण्यात सहाय्यभूत ठरतातच. परंतु या सर्व गोष्टी सारख्या असूनही दोन जुळ्या भावा/बहिणींचे स्वभाव अतिशय भिन्न असल्याचेही आपण नेहमी पाहतो. ‘पिंडे पिंडे मतिर्भिन्ना’ असे एक संस्कृत वचन आहे. प्रत्येक व्यक्तीचा पिंड वेगळा असतो. म्हणजे बाह्य जगाकडून आपल्यावर होणाऱ्या क्रियेला प्रत्येक व्यक्तीचा प्रतिसाद । वेगवेगळा राहू शकतो. कोणत्या विषयात रुची घ्यायची, कोणत्या माहितीकडे दुर्लक्ष करायचे हे प्रत्येक व्यक्तीने अजाणताच ठरविलेले असते. एकाच घटनेागील कारणांचे निष्कर्ष प्रत्येक व्यक्तीचे वेगवेगळे आढळतात. बाह्य जगाविषयीचे एक स्वतंत्र चित्र प्रत्येक व्यक्तीच्या मनात अबोध पातळीवर बनलेले असते आणि ते वेगवेगळे असते. तसेच स्वत:च्या पिंडाचे/स्वभावाचे जोरदार समर्थनदेखील प्रत्येक व्यक्ती स्वत:शी करत असतो. तसे समर्थन त्याने केले नाही तर तो दुबळा ठरतो व त्याच्या व्यक्तित्वाला टोक येत नाही.
विकार, संवेदना, सद्गुण, दुर्गुण, आळस, कर्तृत्व सारे काही आपल्या मनात आहे. भौतिक जगातील भौतिक घडामोडींइतकेच मानसिक घडामोडींचे क्षेत्र विशाल आहे. कोणता मानसिक पिंड/स्वभाव घेऊन जन्माला यावे हे व्यक्तीच्या हाती नाही. बौद्धिक आटापिटा करून तो बदलताही येत नाही. परिस्थितीच्या रेट्याने, हादरून टाकणाऱ्या विपरीत अनुभवातून होणाऱ्या शिक्षणामुळे नाईलाजाने, जगणे अधिक सुसह्य व्हावे म्हणून थोडाफार स्वभावात बदल होतो पण तो वरवरचाच ! शालेय शिक्षणामुळे स्वभाव बदलत नाही.
आपल्या मनाच्या उथळ पृष्ठभागातच आपली जाणीव गुंतली असते. आपल्या पिंडाला साजेसे विश्लेषण बाह्य घटनांचे करून आपल्या आत आपोआप प्रतिक्रिया निर्माण होत राहतात. सहसा आपले मन सतत या भानगडीत गुंतले असल्यामुळे अशांत व अस्वस्थ असते. परंतु आपल्या पिंडाचा एक आंतरिक हिस्साही असतो, जो तुलनेने अधिक स्वस्थ असतो. त्याला आपण अंत:करण म्हणतो. पश्चात्ताप हा अंत:करणाच्या उपस्थितीमुळेच होतो व तो आपल्याला असंख्य वेळा होत राहतो. बहधा एखाद्या आकस्मिक घटनेवर आकस्मिक प्रतिक्रिया दिल्यानंतर काही वेळाने मनाची उत्तेजना कमी झाल्यावर आपल्याला चकल्यासारखे वाटते; कारण अंत:करणातून जाणिवेपर्यंत येणारी स्पंदने स्वीकारण्याच्या अवस्थेत आपण आधी नव्हतो व आता आलो. मन व अंत:करण या काय वस्तू आहेत हे आपण सर्व एका अबोध पातळीवर जाणतो, परंतु त्यांची व्याख्या करणे महाकठीण आहे. तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, विज्ञान, धर्म हे आपापल्या परीने मनाची व्याख्या करून पाहतात. परंतु आपली व्याख्या अपूर्ण आहे, याचेही भान सर्व शास्त्रांना आहे. अवचेतन मनात बुडी मारून त्याचा तळ शोधण्याचे मानसशास्त्रीय प्रयत्न व मज्जातंतूंच्या विद्युत्-रासायनिक उत्तेजनांचा अभ्यास करून त्याद्वारे मनाची व्याख्या करू पाहणारे विज्ञानाचे प्रयत्नदेखील सध्यातरी प्राथमिक अवस्थेतच आहेत. ध्यान व योगासारख्या पद्धतींचा ताळमेळ वैज्ञानिक प्रयोगांशी करून मनाचा शोध घेण्याचे प्रयत्न अलीकडे सुरू झाले आहेत. मनापासून जाणिवेला वेगळे करून त्या जाणिवेच्या सहाय्याने स्वत:च्या मनाचा तळ शोधण्याच्या अनेक पद्धती प्राचीन काळापासून विकसित झालेल्या आहेत.
प्राणाचा आवेग व बुद्धीचा अंकुश मानवी मनाचा आवाका, खोली व व्याप्ती अतिप्रचंड असल्याचे आपण मागील लेखात पाहिले. एकतर जे गुणसूत्र जीन्स (सशपशी) च्या रूपात आपल्याला पितरांकडून मिळतात, त्यांतच पृथ्वीवरील सजीव उत्क्रान्तीचे गडद अनुभव साठविलेले असतात, जे आपल्या मनात समाविष्ट होतात. शिवाय असे म्हणतात की अगदी जन्मल्यापासून आपण डोळ्यांनी जे जे पाहतो, कानांनी जे जे ऐकतो, त्वचेने जे जे स्पर्श अनुभवतो, नाकाने जे जे वास घेतो व जिभेने ज्या ज्या चवी अनुभवतो ते ते सर्व काही आपल्या मनात साठविले जाते, काहीही पुसले जात नसते. फक्त आपल्या जागृत मनाला त्यांची विस्मृती होते; मात्र सर्व आठवणी आपल्या सुप्त मनात साठविल्या जातात. याखेरीज सर्व वासना, सर्व भावना, सर्व विचार, सर्व कल्पनादेखील सुप्त मनात साठविलेल्या असतात. याचाच अर्थ ज्याचे आम्हाला भान असते ते आमचे जागृत मन हे आमच्या मनाचे समुद्रातून वर आलेल्या हिमनगासारखे अगदी वरवरचे टोक असते आणि खाली पसरलेल्या अथांग सुप्त / अवचेतन मनाचा आम्हाला पत्ताच नसतो. कदाचित आमच्या सुप्त मनाचा हा मोठा हिस्सा आतल्या आत मानवजातीच्या सामुदायिक सुप्त मनाशीही जोडलेला असू शकतो.
निसर्गाचे असेही स्वरूप आहे जे आमच्या मर्यादित दृष्टीला दिसत नाही. दुर्बिणीच्या आणि सूक्ष्मदर्शक यंत्राच्या सहाय्यानेच आमच्या दृष्टीचा विस्तार करून आम्ही सृष्टीच्या महाकाय व सूक्ष्म रूपाचे काही अंश पाह शकतो. तार्किक बुद्धिमत्तेच्या/गणिताच्या सहाय्याने ऊर्वरित सृष्टीबाबत आडाखे बांधू शकतो. सृष्टीत असेही ध्वनी आहेत जे आमचे कान ऐकू शकत नाही; असे गंध आहेत ज्यांचा आमच्या नाकास पत्ता लागत नाही. भौतिक शरीराच्या या मर्यादा आहेत. आमचे डोळे अतितीव्र प्रकाशकिरणे सहनकरू शकत नाहीत; आमचे कान तीव्र ध्वनिलहरी सहन करू शकत नाहीत. आमच्या जागृत मनालाही प्रकृतीने विस्मृतीचा वर दिलेला आहे. अन्यथा ते मनातला प्रचंड गोंगाट सहन करू शकले नसते.
परंतु आमच्या जाणिवेच्या पलीकडे आमच्या सुप्त/अवचेतन मनात एक अशी आमच्या जागृतावस्थेपेक्षा ज्ञानी यंत्रणा निश्चितच कार्यशील असावी, जी त्या सप्तमनाच्या प्रचंड गोदामातून वेळोवेळी/सतत आमच्या व्यक्तिमत्त्वाला/स्वभावाला साजेशा आठवणी, कल्पना, भावना, गाणी विचार हडकून काढते व जागृतावस्थेकडे पाठवून देते. ही यंत्रणा आमच्या व्यक्तिमत्त्वाचे आगळेपण संघटित ठेवते. अशी यंत्रणा नसती तर आपण सर्व वेडे झालो असतो. किंवा असेही म्हणता येईल की ज्या मानवांच्या अवचेतन मनातील अशी निवड व संघटन करणारी यंत्रणा विस्कळीत होते, कमजोर होते अथवा नष्ट होते, ते वेडे होतात. अशीच ज्ञानी यंत्रणा आमच्या देहांची निर्मिती, पोषण व विकासात गुंतलेली असल्याचे आपण पूर्वीच्या लेखांध्ये पाहिले आहे, ज्या यंत्रणेची संपूर्ण कार्यपद्धती आम्हाला अजून समजलेली नाही. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव/पिंड/व्यक्तिमत्त्व इतरांपेक्षा वेगळे असते. ते त्याने निवडलेले नसते. त्याच्यात प्रवाहित झालेल्या पितरांच्या गुणसूत्रांनी त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा एक छोटा हिस्सा व्यापला असतो. पर्यावरण व संस्कार ह्यांनी आणखी एक छोटा हिस्सा तयार होतो. परंतु त्याला त्याच्या सख्ख्या भावंडांपासूनही वेगळे व्यक्तिमत्त्व /स्वभाव प्रदान करणारा व्यक्तीच्या स्वभावाचा मोठा हिस्सा कुठून व कसा निर्माण होत असेल ? आणि कशासाठी ? मानवी मनाला, म्हणजे जागृत मनाला, बुद्धीची संगत लाभली आहे. अमूर्त स्वरूपात विचार करण्याची क्षमता हे बुद्धीचे एक लक्षण आहे. आमची भाषा हे या गुणाचे उत्तम उदाहरण आहे. ‘राम’ ही दोन अक्षरे खरे तर नुसत्या रेघोट्या आहेत. परंतु ती दोन अक्षरे एकत्र वाचली अथवा ऐकली की आमच्या कल्पनेत धनुर्धारी, एकवचनी, एकपत्नीव्रती, त्यागी, पराक्रमी असा अवतारी पुरुष उभा ठाकतो. त्या दोन अक्षरी रेघोट्या म्हणजे त्या महामानवाचे अमूर्त रूप ठरतात. अमूर्त विचार करण्याच्या या क्षमतेने तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान व गणितासारख्या शास्त्रांच्या रूपाने अतिउंच भराऱ्या मारल्या असून मानवाचा फार मोठा भौतिक व सांस्कृतिक विकास साधला आहे. भोवतालच्या वस्तूंची/घटनांची परस्पर संगती लावण्याचा व कारणे आणि परिणामांची संगती लावण्याचा प्रयत्न करणे, हेही बुद्धीचे लक्षण मानले जाते. तसेच तर्काद्वारे निवाडा करणे, योग्य-अयोग्य ठरविणे, नियोजन करणे, शिकणे हीदेखील बुद्धीची कामे मानली जातात. आमच्या सचेतन/जागृत मनाच्या धारणा, पूर्वग्रह, श्रद्धा, संस्कार, आम्ही ज्या पाळत आलो त्या परंपरा व सामाजिक संस्थात्मक रचना यांना जाणीवपूर्वक बदलविण्याची क्षमता बुद्धी आम्हाला प्रदान करते. परंतु अवचेतन मनाला व आमच्यातील वासनांना/भावनांना/कल्पनांना जोश, आवेश, आवेग पुरविणाऱ्या प्राणाला नियंत्रित करणे बुद्धीला फारसे जमत नाही. एकतर उत्क्रान्तीत त्यांचे स्थान बुद्धीच्या अगोदरचे असल्यामुळे जोदार, आवेशपूर्ण, आवेगी व भरदार अशा नाट्यपूर्ण प्राणिक मनाची आम्हाला चटक लागलेली आहे. किंवा त्याचेच दुसरे रूप म्हणजे हताश, उदास, खिन्न व भकास जे असते, त्याचेही आगच्या अवचेतन गनाला गोठे आकर्षण असते. (त्यामुळेच बेगग अख्तर, तलत गहगूद, गेहदी हसन किंवा गुलाग अलींनी सुरेल पण उदारा रवरांत गायलेल्या उर्दू शायरांच्या पराभूत मनोवृत्तीच्या गजला क्रांतिकारकांनादेखील आवडतात.) बुद्धीमध्ये असा आवेग अथवा हताशा नसल्यामुळे ती योग्य-अयोग्याचा निवाडा अधिक चांगला करू शकते. पण त्यासाठी तिला अधिकाधिक सचेतन होत जाणाऱ्या मनाची व बलवान परंतु शांत प्राणाची साथ मिळावी लागते. जाणीव हा आमच्या अस्तित्वाचा आणखी वेगळाच घटक असावा. जाणीव (Consciousness) ही स्वतंत्र वस्तू नसून मेंदूच्या माध्यमातून घडणारी एक प्रक्रिया आहे, असे बहुतांश वैज्ञानिक मानतात. प्राण-मन-बुद्धी यांचेदेखील प्रक्रियांच्या स्वरूपातच विश्लेषण व अध्ययन करण्याकडे विज्ञानाचा कल आहे. परंतु एक गंत म्हणून आपण एक प्रयोग करून पाहू शकतो. बाहेरच्या जगातून चित्त काढून स्वत:वर केंद्रित करून पहावे. त्यासाठी पद्मासनासारखे कठीण आसन लावून बसण्याची गरज नाही. परंतु मन सैरभैर होऊ नये अशा तत्पर सुखासनात साधी मांडी घालून जरी एकाग्रतेने स्वत:कडे पहात राहिलो तरी आपली जाणीव ही शरीराच्या सर्व अवयवाध्ये, मनाच्या भावनाध्ये, विचाराध्ये वगैरे पसरली/विखुरली असल्याचे लक्षात येते. दोन्ही स्तनाग्रांना जोडणाऱ्या रेषेच्या मध्यभागी अथवा टाळूवर चित्त एकाग्र करत राहिलो तर हळूहळू ही विखुरलेली/पसरलेली जाणीव त्या ठिकाणी एकवटू लागते. ती आपल्याला हळूवारपणे छातीत खोलवर अथवा टाळूच्या वर ढकलू पाहते. तिचे स्वतंत्र अस्तित्व तर जाणवतेच, परंतु ही जाणीव जेव्हा पलटून स्वत:लाच निरखू लागते तेव्हा एक विशेष आनंद शरीरात, मनात पसरू लागतो. हा अनुभव मानवजातीसाठी नवीन नसून लक्षावधी मानवांना जाणिवेची अशीच अनुभूती वेगवेगळ्या काळी व स्थळी झालेली आहे.
संतुलनाचा यक्षप्रश्न
जड पदार्थांपासून मानवापर्यंत जी पृथ्वीवर उक्रान्ती झाली, तिचे स्थूल निरीक्षण करता असे म्हणता येईल की सुरुवातीस अचेतन, अबोध, निरानंद असलेला निसर्ग सजीव रूप घेऊन आधिकाधिक सचेतन, अधिकाधिक संवदेनशील व ज्ञानी आणि अधिकाधिक आनंदी होत गेला. यापैकी आनंद या शब्दाला अनेकांचा आक्षेप असू शकतो. कारण सजीवांच्या जीवनात धडपड, कष्ट, वेदना व दुःख कदाचित आनंदापेक्षा अधिक आहेत. परंतु स्वाभाविक प्रेरणा तपासली असता ती आनंदप्राप्तीचीच आहे, असे म्हणावे लागेल. जगण्यात आनंद नसता किंवा अधिकाधिक आनंद प्राप्तीसाठी जगणे नसते, तर जगणे ही मूलभूत प्रेरणा म्हणून टिकू शकली नसती. आधुनिक मानवी मनाने बरीच विकृत वळणे घेऊन जगण्यातला नैसर्गिक आनंद गढुळ करून टाकला, ही बाब वेगळी. परंतु आहार, निद्रा, मैथुनासारख्या प्राथमिक गरजा पूर्ण झाल्याबरोबर जो भाव पशु-पक्षी व निसर्गापासून अद्याप फार दूर न गेलेल्या मानवांतही उमटतो, तो आनंदाचाच असतो. इतकेच काय, लहान बालके सुद्धा खूप भूक लागली नसेल, झोपेला आली नसतील व शारीरिक व्यथा/वेदना नसेल तर सर्वकाळ आनंदीच असतात. विविध इंद्रियांकरवी स्वत:चे विविध पैलू जाणणे, स्वत:चाच विविध प्रकारे उपभोग घेणे हेही उत्क्रान्तिक्रमात निसर्ग करत राहिला. स्वत:चे रूप न्याहाळण्यासाठी त्याने सजीवांच्या रूपात दृष्टी विकसित केली, नाद ऐकण्यासाठी कान, स्पर्शासाठी त्वचा, गंधासाठी नाक, चवीसाठी जीभ व आत स्त्रवणाऱ्या ग्रंथी, असे स्वत:चाच आस्वाद अनेक अंगांनी घेण्यासाठी निसर्ग सजीव सृष्टीच्या माध्यमातून उमलत गेला, विकसित होत गेला. स्वत:च स्वत:चा भक्षक रूपाने उपभोग घेत राहिला व स्वत:च स्वत:चे भक्ष्यही झाला. सजीवांध्ये उत्क्रान्तिक्रमात विकसित होत गेलेल्या प्रत्येक इंद्रियाला आनंदाचीच ओढ असते. जे अन्न आनंद देत नाही, ते जिभेला नकोसे वाटते; जो नाद आनंद देत नाही, तो कानांना कर्कश वाटतो; जो स्पर्श पुलकित करत नाही, तो त्वचेला असह्य वाटतो; जे दृश्य आनंददायी नसते, ते डोळ्यांना बघवत नाही. असे म्हणतात की, सृष्टीमध्ये जे काही अस्तित्वात आहे ते जाणण्याच्या साधनांचा विकासच उत्क्रान्तिक्रमात निसर्ग करत आहे. इंद्रियांच्या विकासापाठोपाठ किंवा सोबतच मनही उगवले व विकसित झाले. उत्क्रान्तीच्या वरच्या पातळीवरील मनुष्येतर प्राण्यांध्ये भावभावना व विचार करण्याची क्षमता कमी-अधिक प्रमाणात निश्चितच आढळून येते. परंतु मानवी पातळीवर उत्क्रान्तीने झेप घेतली, त्यातून मनाचा भव्य व विविधांगी विस्तार जो झाला त्याने फारच वरचा टप्पा गाठला. आत्मभान (सेल्फ अवेअरनेस) हा मानवात असलेला व मानवेतर पशूध्ये अभावाने आढळणारा विशेष गुण आहे. मनुष्येतर प्राणी बहधा त्यांच्या नैसर्गिक उपजत प्रेरणांनी संचलित असे जीवन जगतात. परंतु इतर प्राण्यांच्या तुलनेत मानवाला मात्र उपजत प्रेरणा कमी व बुद्धी म्हणजेच शिक्षण कौशल्य व विचारक्षमता अधिक मिळाली. इतर प्राण्यांची पिले जन्मत:च किंवा जन्मल्यावर लवकरच स्वत:चे अन्न मिळविण्यास सक्षम होतात. इतर सर्व प्राण्यांच्या तुलनेत मानवाचे मूल मात्र सर्वाधिक काळ परावलंबी असते. परंतु त्यांचा मेंदू इतर सर्व प्राण्यांपेक्षा मोठा असतो. मानवाच्या या परावलंबी बालकांच्या रक्षण-पोषणासाठी मानवाला सामूहिक जीवन पद्धतीचा अंगीकार करावा लागला. समूहाला भाषेची गरज असते. कारण भाषेशिवाय समूहातील व्यक्ती एकमेकांशी निगडित कसे राहणार? आधी इशाऱ्यांच्या स्वरूपात असलेली भाषा हळूहळू ध्वनी, शब्द व वाक्य रूपात विकसित होत गेली. भाषेच्या विकासासोबतच विचार क्षमताही आपोआप विकसित होत गेली. किंवा विचार क्षमतुळे भाषा विकसित होत गेली, असेही म्हणता येईल. मानवेतर प्राण्यांना भोवतालच्या सृष्टीचे भान असते, परंतु स्वत:च्या वेगळ्या अस्तित्वाचे व स्वत:मधील वासना-भावना-इच्छा-विचार यांचे वेगळे भान त्यांना नसते. असे आत्मभान हे मानवाला मिळालेले विशेष वरदान म्हणता येईल. अर्थात आधुनिक साहित्यात आत्मभान हा शाप मानणाराही एक प्रवाह आहे. परंतु मनाने निरोगी असणाऱ्या कोणत्याही मानवाला आत्मभान हे वरदानस्वरूपच वाटावे. आपणच आपल्याला आतून बाहेरून पाहता येणे व आपण तसे पहात आहोत किंवा पाह शकतो, याचीही स्वतंत्रपणे जाणीव असणे, म्हणजे आत्मभान ! स्वत:ला पाहणे म्हणजे आपल्या मनातील इच्छा, वासना, विचार, भावना वगैरे न्याहाळता येणे व समजता येणे. अधिक सोप्या पद्धतीने सांगायचे तर एखादी वासना देहात/मनात उत्पन्न होणे, ही एक बाब व अशी वासना माझ्यात उत्पन्न झाली आहे हे समजणे व मी हे समजतो आहे याचेही भान असणे ही दुसरी बाब. पहिला प्रकार सर्व प्राण्यांत आढळेल. दुसरा प्रकार मात्र फक्त मानवांतच दिसून येतो.
भोवतालच्या सृष्टीला समजून घेण्यासाठी, अन्न मिळविण्यासाठी व प्रतिकूल निसर्गावर मात करण्यासाठी मानवाला उपजत प्रेरणांपेक्षा विचारशक्तीचा उपयोग अधिक करावा लागला. इतर प्राण्यांच्या बाबतीत आपण असे म्हणू शकतो की या गोष्टींसाठी प्राण्यांना निसर्गानेच उपजत प्रेरणा (इन्स्टिंक्ट) बहाल केल्या आहेत. किंवा उत्क्रान्तीच्या ओघात प्रत्येक प्राणिजातीच्या सामुदायिक प्रकृतीमध्ये त्या उपजत प्रेरणा विकसित होत गेल्या असाव्या. मानवी मुलाला मात्र उपजत प्रेरणांच्या अभावी शिक्षणावर अधिक भर द्यावा लागतो. अगदी खाद्यपदार्थांपासून हे शिक्षण सुरू होते. आपल्या देहाला पोषक खाद्य कोणते व घातक कोणते, याबाबत मानवेतर प्राणी जन्मतः अधिक समंजस असतात. मानवाचे मूल मात्र दिसेल ती वस्तू तोंडात टाकू पाहते. परंतु निरीक्षण, अनुभव-विश्लेषण, निष्कर्ष इ. पद्धतींनी मानवी बुद्धी विकसित होत गेली. निरीक्षण-विश्लेषण-तर्कसंगती- निष्कर्ष हे बुद्धीचे गुण आहेत. पूर्वग्रहरहित, अनाग्रही, शुद्ध विवेकशील विचार (Reason) ही निसर्गाने मनाच्या स्वरूपात गाठलेली उत्क्रान्तीमधील सर्वोच्च अवस्था आहे. परंतु ती
अवस्था जरी निर्सगाला मानवी देहात गाठता येत असली, तरी फारच तुरळक प्रमाणात ती मानवजातीत आढळते. याचे महत्त्वाचे एक कारण बहुधा असे असावे की मानवाला उत्क्रान्तीच्या आधीच्या टप्प्यांचेही ओझे वहावे लागते. म्हणजे त्याची विवेकी बुद्धी त्याला काहीही सांगत असली तरी त्याचा पदार्थय देह, त्या देहाच्या मर्यादा, त्या देहातील जगण्याची व पुनरुत्पादित होण्याची धडपड करत असलेला प्राण, त्या अनुषंगाने येणारे इच्छांचे, वासनांचे आवेग, नैसर्गिक उपजत प्रेरणेपासून काहीसे दुरावल्यामुळे दोलायमान असलेले, विकृतीकडे सहज झुकणारे व आत्मभानामुळे ‘अहं’ चा परिपोष करू पाहणारे मन – हे इतर तत्त्व त्याला अन्यान्य दिशांनी ओढू पाहतात व या सर्वांपासून तटस्थ होऊन जगता येणे दुष्कर वाटते. अनेक महामानवांनी मनाची अत्यंत विवेकशील बुद्धीचे वैभव प्रगट करणारी अवस्था निश्चितच गाठली आहे. मात्र देहाच्या प्राणिक वासना व भावभावनांच्या आणि मन-बुद्धीच्या वेगवेगळ्या मागण्यांध्ये संतुलन कसे साधावे, हा यक्षप्रश्न मानवजातीकडून अद्यापही उत्तराची अपेक्षा बाळगून आहे. १२, विनोद, स्टेट बँक कॉलोनी, कॅम्प, अमरावती.