राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि गांधीविचार

शिांतिवन कुष्ठधाम ह्या गांधीवादी संस्थेत काही महिन्यापूर्वी रा. स्व. संघाची उच्चस्तरीय बैठक पार पडली व तीत मोहन भागवतांपासून ते तोगडियांपर्यंत अनेक नेते हजर होते ह्या बातमीने सध्या सर्वत्र खळबळ माजवली आहे. महत्त्वाची बाब ही की त्यामुळे गांधीवादी संस्था व संघपरिवार ह्यांच्या परस्पर-संबंधाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुळात गांधींचे रामराज्य व संघाचा हिंदुत्ववाद ह्यांतील मूलभूत फरक खुद्द गांधीवादी मंडळी विसरली व त्यामुळे खादी व खाकी ह्यांच्यातील फरकही—विचाराच्या तसेच आचाराच्या पातळीवर – दिसेनासा झाला, ही प्रक्रिया बरीच जुनी आहे. हिंदुत्वाला खरा धोका गांधींपासून आहे, बोलघेवड्या निधर्मीवाद्यांपासून नाही हे सर्व छटांच्या हिन्दुत्ववाद्यांना फार आधीपासून माहीत आहे. गांधीहत्या ही ह्याच विचाराची परिणती होती. आजही आपला स्पष्ट अजेंडा असलेली, स्वतःचे शत्रू कोण, मित्र कोण ह्याची नीट जाण असणारी संघटना म्हणजे रा. स्व. संघ हीच होय. ह्याउलट स्वतःला गांधीवादी म्हणविणारी मंडळी गांधीहत्या विसरली, वर बाबरी मशीदही त्यांच्या विस्मृतीत गेली. नुकतेच ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत श्री बाबूराव चंदावार ह्यांचे एक पत्र प्रकाशित झाले आहे. त्यात त्यांनी नमूद केले आहे की विनोबांच्या ‘गीताप्रवचने’मधील काही भाग अलीकडच्या आवृत्तीत बदलण्यात आला असून वेदकाळात ऋषी मांसाहार करत असत हा भाग त्यातून वगळण्यात आला आहे. ही सेन्सॉरशिप संघप्रणीत इतिहासलेखनाशी सुसंगत आहे. गांधीविचारधारेत संघाचा हस्तक्षेप कोठवर झाला आहे ह्याचे हे एक बोलके उदाहरण आहे.
ह्या पोर्शभूीवर विवेकवादाला महत्त्वाची सक्रिय भूमिका वठवावी लागेल असे मला वाटते.
विनोबाजींचा एक छोटेखानी उतारा सोबत पाठवीत आहे. रा.स्व.संघाविषयी विनोबांचे आकलन काय होते ते त्यावरून कळेल. ह्या लिखाणाला पोर्शभी आहे गांधीहत्येची. गांधीहत्येनंतर थोड्याच दिवसांत सेवाग्रामला सर्व गांधीविचारक व कार्यकर्ते ह्यांची एक बैठक झाली. अत्यंत शोकाकुल अवस्थेत झालेल्या ह्या बैठकीत ‘ह्यापुढे काय ?’ ह्या प्रश्नाचाही वेध घेण्यात आला. अतिशय महत्त्वाच्या ह्या बैठकीचे इतिवृत्त दादा धर्माधिकारी यांनी तयार केले. मूळ हिंदी ती इंग्रजी अनुवादासह गोपालकृष्ण गांधी ह्यांनी GANDHI IS GONE. WHO WILL GUIDE US NOW? ‘ ह्या नावाने प्रकाशित केला. प्रकाशक आहेत “Orient BlackSwan’. प्रस्तुत आहे ह्या पुस्तकातील विनोबाजींचे विवेचन, (जाड ठसा माझा.)
“मला काही सांगायचे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म जेथे झाला, त्या प्रांताचा मी आहे. मी जातपात सोडून दिली असली, तरी ज्यांच्याकडून ही घटना घडली, त्यांच्याच जातीचा मी आहे, हे विसरू शकत नाही. परवा कुमारप्पाजी आणि कृपलानीजी ह्यांनी लष्करी बंदोबस्तावर कडक टीका केली. मी गप्प बसून राहिलो. ते दुःखाने बोलत होते, आणि मी दुःखाने गप्प होतो. गप्प बसणाऱ्याचे दुःख उघड होत नाही. मी बोललो नाही कारण मला दुःखाबरोबरच लज्जाही वाटत होती. पवनारमध्ये मी अनेक वर्षांपासून राहत आहे. पण तेथूनही चारपाच जणांना अटक केली आहे. बापूंच्या हत्येशी काही ना काही प्रकारे संबंधित असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. वर्धा व नागपूरमध्येही लोकांना अटक होत आहे. जागोजागी होत आहे. हे संघटन इतक्या मोठ्या प्रमाणावर कुशलतेने पसरविण्यात आले आहे. ह्याची मुळे फार खोलवर रुजली आहेत. ही संघटना अगदी फॅसिस्ट पद्धतीची आहे. तीमध्ये मुख्यतः महाराष्ट्राच्या बुद्धीचा उपयोग करण्यात आला आहे, मग ती व्यक्ती पंजाबमध्ये काम करीत असो वा महाराष्ट्रात. सगळ्या प्रांतांध्ये त्याचे शिपाई आहेत. मुख्य संचालक शक्यतो महाराष्ट्रीय ब्राह्मणच असतात. गुरुजीही तेच होते. ह्या संघटनेतील लोक इतरांना विशासात घेत नाहीत. सत्य हा गांधीजींचा नियम होता. तर त्यांचा नियम असत्य हाच असला पाहिजे असे वाटते. हे असत्य म्हणजे त्यांचे तंत्र, टेक्निक व त्यांचे तत्त्वज्ञान ह्यांचा भाग आहे.
एका धार्मिक वर्तानपत्रात मी गुरुजींचा लेख वाचला. त्यामध्ये असे म्हटले होते की, हिंदुधर्माचा उत्तम आदर्श म्हणजे अर्जुन आहे. त्याला आपल्या गुरुजनांबद्दल आदर व प्रे होते. त्याने आपल्या गुरुजनांना प्रणाम करून त्यांची हत्या केली. अशा प्रकारची हत्या जो करू शकतो, तो स्थितप्रज्ञ आहे. आता हे लोक गीतेचे माझ्यापेक्षा कमी उपासक नाहीत. ते माझ्याइतक्याच श्रद्धेने रोज गीता वाचत असतील. मनुष्य जर पूज्य गुरुजनांची हत्या करू शकत असेल तर तो स्थितप्रज्ञ आहे, असे त्यांच्या गीतेचे तात्पर्य आहे. बिचाऱ्या गीतेचा अशा प्रकारे उपयोग होतो. तात्पर्य असे की, ही फक्त दंगाधोपा करणाऱ्या उपद्रवकाऱ्यांची जमात नाही. ही फिलॉसॉफर्सची जमात आहे. हे त्यांचे तत्त्वज्ञान आहे आणि त्यानुसार निर्धाराने ते काम करतात. गांधीजींच्या हत्येनंतर महाराष्ट्रात विचित्र परिस्थिती झाली आहे. येथे सारे काही आत्यंतिक रूपातच होते. गांधीहत्येच्या नंतर गांधीवाद्यांच्या नावाने जनतेने जी काही प्रतिक्रिया दिली, ती पाकिस्तानच्या निर्मितीच्या वेळी पंजाब्यांनी दिली तशीच भयानक होती.
नागपूरपासून कोल्हापूरपर्यंत भयानक प्रतिक्रिया झाली. साने गुरुजींनी मला महाराष्ट्रात फिरण्याचे आवाहन केले. पण जो पवनारही सांभाळू शकला नाही, नागपूरच्या लोकांवर परिणाम करू शकला नाही, तो महाराष्ट्रात फिरून काय करणार – मी गप्प बसलो. रा. स्व. सं. च्या आणि आमच्या कार्यपद्धतीत नेहमीच विरोध राहिला आहे. आम्ही जेव्हा जेलमध्ये जात होतो, तेव्हा त्यांची नीति लष्करात नाहीतर पोलिसांत दाखल होण्याची होती. तेव्हाचे सरकार ह्या गोष्टींना आपल्या फायद्याचे समजत असे. म्हणून त्यांनीही त्यांना उत्तेजन दिले. त्या सर्वांचे परिणाम आज आपल्याला भोगावे लागत आहेत.
आजच्या परिस्थितीत मुख्य जबाबदारी माझी – महाराष्ट्राच्या लोकांची आहे. ही संघटना महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. महाराष्ट्राचे लोक त्याच्या मुळापर्यंत पोहोचू शकतात. म्हणून आपण लोकांनी मला माहिती द्यावी. मी कोणतेही पूर्वग्रह न ठेवता आपल्या पद्धतीने काम करीन. मी कोणत्याही कमिटीशी स्वतःला कमिट करणार नाही. रा. स्व. संघाहून भिन्न असलेल्या सर्व गंभीर व दृढविचारी लोकांची मदत घेईन. आपला गट म्हणजे साधनशुद्धीचा मोर्चा होवो. त्यामध्ये सोशालिस्ट व इतरही सर्व लोक येऊ शकतात. स्वतःला मानव समजणाऱ्या सर्वांची आम्हाला जरूर आहे.
‘ ३०३, स्टाफ क्वार्टर्स, NMIMS-SPTM, मुंबई-आग्रा महामार्ग, तापीकाठ, बाबुळदे, ता.शिरपूर, जि.धुळे ४२५४०५.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.