आकडेबाजी (३) : एक फसव्या आकड्याची

एखाद्या देशाची अर्थव्यवस्था जोदार आहे का, ती वाढती-बहरती आहे का, हे मोजायला ऋझ हा आकडा वापरतात. GDP(Gross Domestic Product), सकल राष्ट्रीय उत्पाद) हे एखाद्या अर्थव्यवस्थेत खेळणाऱ्या पैशाचे एक माप आहे. वाढणारा GDP जोदार अर्थव्यवस्था दाखवतो, स्थिर ऋझ साचलेपण उघडे करतो आणि घटता GDP ही अर्थव्यवस्थेची वृत्ती पराभूत होत असल्याची खूण असते. आजची जगाची अर्थव्यवस्था आवर्जून स्पर्धेवर बेतलेली आहे, आणि वाढत्या अर्थव्यवस्था (=देश) साचलेल्या व आक्रसत्या अर्थव्यवस्थांना मागे टाकतात. आजच्या अर्थविचारांध्ये सर्वत्र GDPचे महत्त्व इतर सर्व निर्देशांकांपेक्षा जास्त मानले जाते. पण अनेक अर्थशास्त्र्यांनी दाखवून दिले आहे, की GDP आणि माणसांचे सुख-समाधान यांचा संबंध नाही. १९३०-४० च्या दशकात जॉन मेनार्ड केन्सने (ग. च. घशूपशी) हा मुद्दा ठसवला होता, व तो अनेक अर्थशास्त्र्यांना ‘आत’पासून पटलेला आहे. पण GDP, त्याची वाढ, त्या वाढीचा वेग, या बाबींनाच महत्त्व देणे मात्र सुरूच आहे. काही उदाहरणे पाहू.
अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष (१९६८ ते १९७४) रिचर्ड निक्सन याने उद्योगांना स्वतःच्या व्यवहारातून होणाऱ्या प्रदूषणाच्या जबाबदारीपासून ‘मुक्त’ केले. आता प्रदूषण करणे फायेदशीर झाले, कारण ते कमी करण्याची जबाबदारी प्रदूषक उद्योगांवर नव्हती. त्यांना साफसफाईवर खर्च करावा लागत नसे. मग ज्या प्रांत-प्रदेश-देशांना स्वच्छ हवापाणी हवे असेल, ते प्रदूषण हटवणाऱ्या उद्योगांना चालना देऊ लागले, या साफसफाई उद्योगांची उत्पन्ने, नफे वगैरेळेही GDP वाढत जाई. इतर कोणत्याही प्रगत देशांपेक्षा अमेरिकेत गुन्हेगारी जास्त आहे. यामुळे अनेक अमेरिकन मरतात किंवा जखमी-जायबंदी होतात. इतर अनेक जण नाइलाजाने स्वतःच्या स्वातंत्र्यावर बंधने घालून घेतात (याला पर्यायच नसतो). पण गुन्हेगारी अनेक उद्योगांची भरभराट घडवून आणते. गुन्हेगार व त्यांच्यापासून संरक्षण देणारे, असे दोघेही शस्त्रास्त्र उद्योगांना चालना देतात. तिजोया बनवणे, मजबूत घरे-बँका बनवणे, हे उद्योगही गुन्हेगारीमुळे भरभराट साधतात. पोलीस, जेलकर्मी, वकील, न्यायव्यवस्था, साऱ्यांची उत्पन्ने ऋलझ चा भाग बनतात, आणि ती थेटपणे गुन्हेगारीसोबत वाढतात. आजच्या अमेरिकेत पिस्तुले-बंदुका बनवणारे उद्योग, वकिली पेशा वगैरे वेगाने नवश्रीमंत घडवत असतात. या साऱ्याने GDP ही वाढतो. पण गुन्हेगारीही नसणारे आणि त्यावर उपाय ठरणारे उद्योगही नसणारे समाज जास्त सुख-समाधान-समृद्धी भोगतील. अशा समाजांचा GDP मात्र कमी असेल.
आजच्या अमेरिकेतील, प्रगत देशांतील, विकसनशील देशांच्या वरच्या थरांतील अन्नउद्योगही हाच प्रकार दाखवतात. या सर्व माणसांसाठी मांसाचे उत्पादन वाढवणे हे GDP वाढीचा महत्त्वाचा भाग असते. वाढीव मांसाहाराने स्निग्ध पदार्थ (चरबी!), साखर, मीठ इत्यादींचा वापर आपोआप वाढतो. यातून श्रीमंती आजार वाढतात. लठ्ठपणा, गॉलस्टोन्स, मधुह, लकवा मारणे, हृद्रोग इ. पण या रोगांवर, समस्यांवर इलाज करणारे उद्योगही आहेत. माणसांना रोडावण्याचा उद्योग, वैद्यकशास्त्र, हे सारे वाढीव मांसाहारासोबतच वाढतात. आणि मांसोत्पादन, वैद्यक, सारेच उद्योग GDP त भर टाकतात. आणि पैशांचा प्रवाह वेगवान करणारे हे उद्योग कमीकमी माणसांना रोजगार पुरवतात. अमेरिकेत एका माणसाने वर्षाकाठी पाच लक्ष कोंबड्यांचा सांभाळ करणे आश्चर्याचे नाही. म्हणजे हा वाढीव मांसाहार-श्रीमंती रोग इलाज प्रकार अनेक शेतकऱ्यांना बेकार करतो, आणि अनेक माणसांना अकाली मारतो. या GDP वाढवण्याच्या व्यवहारात वैज्ञानिक खेचले गेले आहेत. अनेक कुशल वैज्ञानिक-तंत्रज्ञांना वाटते, की उत्पादकता, अन्नाबाबतची उत्पादकता वाढवणे, हे मनुष्यजातीला उपकारकच आहे.
तसे ते नाही. आजही सर्व माणसांना पुरेलशा अन्नाचे उत्पादन होते आहेच; भलेही ते सर्व माणसांपर्यंत पोचवले जात नसेल. आज ज्यादा अन्नोत्पादन फक्त श्रीमंतांना गरजेपेक्षा जास्त खायला उद्युक्त करत आहे. हे जिथे होत नसेल, तिथे अतिरिक्त उत्पादनाने किंमती ढासळून दलालांची उत्पन्ने GDP वाढवते आहे. या कमी किंमती ना शेतकऱ्यांचे भले करतात, ना खऱ्याखुऱ्या उपभोक्त्यांचे. अन्नव्यवसायातील शास्त्रज्ञ ना मूर्ख आहेत, ना बदमाष, पण त्यांना सांगितले गेले आहे, की GDP वाढवणाऱ्या सर्व कृती चांगल्याच असतात. जेव्हा तुम्ही GDP वाढवणे मानवी सुख-समाधानाशी असंबद्ध आहे हे लोकांना पटवून द्याल, तेव्हाच अनेक वैज्ञानिक- तंत्रज्ञांना त्यांची फसवणूक जाणवेल. माणसांचे सुख-समाधान मोजायची इतर मापे आहेत : GDP पेक्षा वेगळी.
बालमृत्युदर, आयुन, साक्षरता… इ.इ. ही मापे जास्त तरल, जास्त नेकी, जास्त प्रातिनिधिक करणे शक्य आहे. आज अनेक जण अशा नव्या मापांबाबत आग्रही होत आहेत. वाढ आणि विकास यांतील फरक समजून घेऊन नवी मापे वापरण्यावर आग्रह वाढतो आहे. पण हे सारे विसरून, दुर्लक्षित करून, GDP एके GDP करणे, त्यातील वाढीला शुभ मानणे, साधु मानणे, चांगले मानणे, हा मात्र फार तर वैचारिक आळस ठरेल. कठोर विश्लेषणात तो गाढवपणा ठरेल, आणि शंकास्पद वातावरणात ती बदमाषी ठरेल ! आकडेबाजी नावाच्या स्तंभात एकही आकडा न देणे कोणाला आश्चर्यकारक (गर्हणीय) वाटेल. तसे ते वाटो! GDP, त्याची वाढ यांवर आग्रह धरणे ठार चुकीचे आहे, हे आसु ने आधीही सुचवले आहे. आज कॉलिन टज्च्या ‘सो रॉल वुई रीप’ या ग्रंथाच्या नव्या आवृत्तीतील Afterword च्या आधारे घडवलेले हे टिपण जुन्याच मांडणीची री ओढते आहे. जर कोणाला हे जास्तच डावे झाले असे वाटत असेल, तर त्यांच्या मतप्रदर्शनाचे स्वागतच आहे. उजव्या विचारांतील त्रुटी दाखवणे, त्या विचारांच्या मर्यादा स्पष्ट करणे, हे आजच्या सुधारकाचे एक प्रमुख कर्तव्य आहेच.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.