तुह्या धर्म कोंचाः एका महत्त्वाच्या विषयाचे हृदयस्पर्शी चित्रण

आदिवासी’ ह्या शब्दाचा अर्थ मूळचे निवासी असा असला, तरी भारतातल्या सुारे पावणेसात कोटी आदिवासींचे अनेक शतकांपासून येथे पद्धतशीरपणे शोषणच होत आहे. आपल्या देशात नक्षलवादी चळवळ सुरू होण्याचे मूळ कारणदेखील हेच आहे हे आता सर्वान्य झाले आहे. हे आदिवासी पूर्वीपासून जंगलातच राहत आले आहेत, मात्र ब्रिटिश राज्यकर्त्यांनी स्वतःला येथील वनांचे मालक जाहीर करून त्यांचे मूळ मालक असलेल्या आदिवासींना एका झटक्यात अतिक्रमित ठरवून टाकले. स्वातंत्र्यानंतर गेल्या साठ वर्षांत जर काही बदल झाला असेल तर तो एवढाच की आदिवासींच्या आपत्ती आणखी वाढल्या आहेत. लेखक-दिग्दर्शक सतीश मनवर ह्यांनी ‘गाभ्रीचा पाऊस’ हा विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवरचा उत्कृष्ट चित्रपट काढून चित्रपटाच्या क्षेत्रात पदार्पण केले होते. आता त्यांनी तुह्या धर्म कोंचा मध्ये आदिवासींच्या शोषणाचा महत्त्वाचा विषय दमदारपणे, आगळ्यावेगळ्या शैलीत हाताळला आहे. त्यासाठी त्यांनी खानदेशची पोर्शभूी निवडली आहे. निसर्गपूजक आदिवासींवर प्रभावी धार्मिक गटांकडून आणला जाणारा दबाव व त्यामध्ये होणारी त्यांची ससेहोलपट ह्यांचे चित्रण त्यांनी ह्या चित्रपटात केले आहे. सरकारला आदिवासींची संस्कृती व जीवनशैली ह्यांची काहीच जाणीव व महत्त्व नसल्यामुळे त्यांच्याकडून होणाऱ्या आदिवासींच्या अवहेलनेचे अस्तरही त्या कथेला आहे. कवडू (उपेंद्र लिमये), त्याची पत्नी भुलाबाई (विभावरी देशपांडे), मोठा मुलगा छोटू आणि दुसरे तान्हे मूल बिरसू हे कुटुंब खानदेशातील एका व्याघ्र अभयारण्याच्या प्रदेशात राहते आहे. वाघ मारल्याच्या खोट्या आरोपाखाली कवडूला अटक केली जाते. दरम्यान त्यांचे तान्हे मूलही आजारी पडते. ह्या संकटामधून तगून राहण्यासाठी एकमेव आशेचा किरण म्हणून हे कुटुंब धर्मांतराच्या दुष्टचक्रात सापडते आणि स्थानिक आदिवासींचा व धार्मिक नेत्यांचा रोष ओढवून घेते. अशी ह्या चित्रपटाची थोडक्यात कथा. अर्थातच चित्रपट काय सांगतो त्यापेक्षा तो ते कसे सांगतो ते अधिक महत्त्वाचे असते. हा चित्रपट ह्या दोन्ही कसोट्यांवर उतरला आहे.
‘गाभ्रीचा पाऊस’ मध्ये ह्या दिग्दर्शकाने पहिल्या शॉटपासूनच मुद्द्याला हात घालून प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. त्यात कॅमेरा दोन लहान मुलांवर स्थिरावला होता. ते सायकलचे टायर हाकत रस्त्याने पळत असतात, आणि त्यांना झाडावर स्वतःला टांगून घेतलेला एक माणूस दिसतो. विलक्षण प्रत्ययकारी शॉट होता तो! ‘तुह्या धर्म कोंचा’ मध्ये सुरुवातीपासूनच सुरांनी लक्ष वेधले आहे. आदिवासींच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असणाऱ्या बासरीच्या सुरांनी चित्रपटाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. चित्रपटाचे तरुण, नवोदित संगीतकार आहेत ऑगस्टीन सॅम्युएल आणि बासरीवादक आहेत नवीन अय्यर. हे दोघेही इलियाराजा आणि ए. आर. रहान ह्यांच्या तालमीत तयार झाले आहेत. अलिकडच्या काळात भारतीय चित्रपटात पोर्शसंगीताचा इतका समर्पक व प्रभावी उपयोग क्वचितच झाला असेल. चित्रपटाच्या पहिल्या दृश्यातच, आदिवासी जंगलात कसे आयुष्य जगतात ते दाखवले आहे. कवडूला आपल्या मुलाबद्दल वाटणारे ममत्व त्यामध्ये चित्रित होते. अन्य कोणत्याही बापाप्रमाणे कवडू आपल्या जवळचे ज्ञान मुलाला देण्यास उत्सुक आहे. निसर्गाच्या सान्निध्यात आणि त्याच्या भरवशावर अनेक शतकांपासून आदिवासी कसा तगून राहिला, ह्यासंबंधीचे हे ज्ञान आहे. येथेही बालकलाकार यश सुतारकडून सतीश मनवर ह्यांनी देखणा अभिनय करून घेतलेला दिसतो. एकूण चित्रपटात आपण कवडूच्या कुटुंबाशी असे काही एकरूप होतो की हे आदिवासी म्हणजे आपलेच भाईबंद असल्याची जाणीव आपल्याला होते. आपल्या लहान मुलाला शिकवणारा कवडू तसेच आपल्या घराला बरे दिवस यावेत म्हणून वेगवेगळ्या देवदेवतांची करुणा भाकणारी भुलाबाई हे सगळे आपल्यापेक्षा वेगळे नाहीतच मुळी. मला तर तेव्हा माझ्या आईवडिलांचीच आठवण झाली. पात्रांची सुयोग्य निवड हे सतीश मनवर ह्यांचे आणखी एक वैशिष्ट्य. कवडूसाठी उपेन्द्र लिमयेची आणि भुलाबाईसाठी विभावरी देशपांडेची त्यांनी केलेली निवड हे त्याचे द्योतक आहे. उपेन्द्रमध्ये नाना पाटेकर व अतुल कुलकर्णी ह्या दोघांचे स्फोटक मिश्रण आहे असे मला वाटते. भाषेचा लहेजाच नव्हे, तर आदिवासींच्या आयुष्यातील साऱ्या व्यथावेदनांना त्याने आपल्या अभिनयातून मुखर केले आहे. विभावरीने अलिकडच्या काळात अनेक चित्रपटांत नायकाच्या पत्नीची भूमिका समर्थपणे साकारली आहे. त्यातील प्रत्येक भूमिका वेगळी आहे हे विशेष.
जाज्वल्य इहवादी आणि नास्तिकतेचा खंदा पुरस्कर्ता कार्ल मार्क्स ह्याची तसबीर आपल्या देव्हाऱ्यात ठेवून साधी, श्रद्धाळू भुलाबाई त्याची पूजा करते आहे हे तर चित्रपटातील अत्यंत बोलके व विदारक दृश्य आहे. तू मार्क्सवादी विचारसरणीचा अंगीकार करशील तरच आम्ही तुला मदत करू असे एक स्थानिक नक्षलवादी तिला सांगतो. ते ऐकून ती भोळीभाबडी स्त्री आपल्या देव्हाऱ्यात त्याच्या फोटोसाठी जागा करते. भक्तिभावाने त्याच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावते. स्थानिक चर्चच्या पादयाने दिलेल्या येशूच्या मूर्तीवरही ती तेवढ्याच भक्तिभावाने कुंकवाचा टिळा लावते. येशू आणि मार्क्स ह्यांच्यामध्ये आदिवासींचे अनेक डोंगरदेव सामावले आहेत. लेखक-दिग्दर्शकाच्या प्रतिभेचा हा सर्वोच्च आविष्कार म्हणायला हवा.
रावणानी लंका (रावणाची लंका) हे अहिराणीमधील गाणे दासू वैद्य आणि सखाराम पाटील ह्यांनी रचले आहे.
भाऊ रावणानी लंका तिना तीन्ही लोकी डंका
भाऊ रावणानी कीर्ती तिनं उमटना पाय
कथेकरी दमन उठे रावण सरतच नाय
रावणानी भक्ती जशी कायी कायी माती
भाऊ माटेला सागरमा जीव जत सुख राहाटी
आदिवासी संस्कृतीत रावणाचे महत्त्व फार आहे. त्याचीच थोरवी ह्या गाण्यात वर्णन करून सांगितली आहे. रावणाच्या लंकेचा डंका तिन्ही लोकांत वाजतो. रावणाची कीर्ती इतकी अगाध आहे की तेथे आणखी कुणाचाच ठसा उमटत नाही. रावणाची गाथा गाता गाता कथेकरी दमून जातो तरी ती संपत नाही. रावणाची भक्ती काळ्या काळ्या मातीप्रमाणे किंवा सागरातील पाण्याप्रमाणे अथांग पसरलेली आहे. सागराच्या लाटा उंच उंच झेपावतात पण वरून कितीही रौद्र रूप धारण केले तरी तो अंतयाी शांतच असतो. त्याच्या पोटात सगळी जीवसृष्टी सुखाने नांदत असते. त्याचप्रमाणे रावणाने कितीही भयंकारी रूप धारण केले तरी त्याच्या पोटात सर्व प्राणिमात्रांविषयी अपार माया असते. तर असे हे रावण महाराजांचे स्तोत्र.
आता चित्रपटातील मला खटकलेल्या गोष्टींविषयी थोडी चर्चा करू या. चित्रपटातील पात्रे मुख्यतः काळ्या-पांढऱ्या रंगात रंगविली आहेत. अधल्या मधल्या करड्या छटा त्यामध्ये नाहीत. प्रमुख पात्रे असलेल्या कवडू व भुलाबाई ह्यांच्याबद्दल तर हे विशेष खरे आहे. मनाने कितीही चांगले असले तरी आदिवासी हेदेखील इतरांसारखे स्खलनशील आहेत, पण चित्रपटात तसे दिसत नाही. खुर्दुर्रा हे गाणे पोर्शीवर वाजविले जात असताना मला खटकले. भुलाबाईच्या मनातील घालमेल व्यक्त करण्यासाठी ह्याचा उपयोग करण्यात आला आहे. परंतु बेला शेंडेचा कमावलेला आवाज आणि तिचे ब्राह्मणी उच्चार भुलाबाईच्या ओबडधोबड व्यक्तिमत्वाला शोभत नाहीत असे मला वाटले. आणखी एक गोष्ट म्हणजे चित्रपटातील सर्व नकारात्मक पात्रे हिन्दी बोलतात. मराठी चित्रपटकर्त्यांध्ये अशी एक वृत्ती दिसून येते की मराठी माणसाच्या किंवा किमानपक्षी मुंबईकरांच्या मानसात खोलवर रुजलेल्या प्रांतवादाला वाचा फोडण्यासाठी ते नकारात्मक पात्रे हिंदी वळणाची मराठी बोलताना दाखवितात. मराठी माणूस राजकारणाचाच हा परिणाम म्हणायचा. सतीश मनवरसारख्या संवेदनशील दिग्दर्शकाकडून मात्र ही अपेक्षा नव्हती. हे खानदेशच्या सामाजिक पर्यावरणाचे यथातथ्य वर्णन आहे असे म्हणून स्वतःचे समाधान करून घेणेही कठीण आहे. चित्रपटात नक्षलवाद्यांना मात्र सगळ्यात हलके माप देण्यात आले आहे. त्यांचे दिशाहीन, निरुद्देश स्त्रीपुरुष असे केलेले चित्रण मला सोयीस्कर व अती भाबडे वाटले. ‘तुह्या धर्म कोंचा’ हा एका आदिवासी कुटुंबाचा एक वादळी प्रवास आहे. त्याला धर्मांतराची पोर्शभूी आहे. त्यामुळे वेगवेगळ्या धर्मांच्या गुणदोषांवर टीकाटिप्पणी केलेली पहायला मिळेल ह्या अपेक्षेने येणाऱ्या लोकांची निराशा होणार. चित्रपट सुदैवाने धार्मिक सुलभीकरणाच्या प्रांतात पाऊल टाकत नसला तरी त्याच्या अगदीच पलीकडे आहे असेही म्हणता येत नाही. विविध धर्मांचा आशय तसेच त्यांच्या उत्सव साजरे करण्याच्या पद्धती कशा समान आहेत ते सांगण्याचा प्रयत्न त्यात केला आहे. घनदाट अरण्ये, त्यातील तळी ह्यांची काही सुंदर दृश्ये जरी पाहायला मिळत असली, तरी ‘गाभ्रीचा पाऊस’ सारखा दृश्यमानतेचा सातत्याने प्रभाव मात्र येथे जाणवत नाही. चित्रपटाच्या दोन्ही बाजूंचे विवेचन केल्यानंतर मात्र मला असे सांगायचे आहे की त्याचा चांगला प्रभाव अधिक बलशाली आहे. उत्तरार्ध अधिक चांगला असलेल्या मोजक्या भारतीय चित्रपटांपैकी तो एक आहे. अखेरची दृश्ये तर मनावर इतका खोलवर परिणाम करून जातात की पूर्वीचे मुद्दे त्यामध्ये ध्वून निघतात. शेवट गोड तर सारेच गोड असे जे म्हणतात ते उगीच नव्हे.
विषय, आशय, संगीत, अभिनय ह्या सर्व बाबतीत झगमगणारे हे रत्न पटकथा लेखनाचा ह्युबॉर्ट बॉल्स हा नामांकित पुरस्कार मिळूनही भारतातील वा जगातील चित्रपट महोत्सवांनी का दुर्लक्षित केले हे एक न सुटणारे कोडे आहे. रॉटरडॅम महोत्सवाने ह्याच्या ऐवजी ‘शांघाय’चा स्वीकार केला. खरे तर ‘शांघाय’ हा ‘तुह्या धर्म..’ पेक्षा निश्चितच डावा आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाव्यतिरिक्त अन्यत्र कोठेही ‘त्ह्या धर्म..’ दाखविण्यात आलेला नाही. पुण्याराही तांत्रिक कारणांळे त्याला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. ह्या चित्रपटाची निवड न करणारे लोक आणखी कशाच्या शोधात आहेत, तेच मला कळत नाही. दर वर्षी मराठीत काही चित्रपट उत्तम, दर्जेदार निघतात. ‘तुह्या धर्म..’ हा निश्चितच त्यांच्यापैकी एक आहे. सतीशचा पहिला चित्रपट गाभ्रीचा पाऊस हा भारतातील अत्युत्कृष्ट चित्रपटांपैकी एक होता. ‘तुह्या धर्म…’ देखील त्याच्या तोडीस तोड निघाला असता तर सतीशची गणना भारतीयच नाही तर जगातील थोर दिग्दर्शकांध्ये झाली असती. तेवढे साध्य झाले नसले तरी ‘तुह्या….’ हा एक हृदरस्पर्शी, आदिवासींच्या जगण्याचा अनुभव शुद्ध रूपात मांडणारा चित्रपट आहे. मेंदू व हृदय ठिकाणावर असलेल्या साऱ्यांनाच तो भावेल ह्यात शंका नाही.

रसिक तिरोडकर
डी ४९-४५९ एम आय जी कॉलनी, वांद्रे (पू), मुंबई ५१

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.