वनस्पतीः वैविध्य व अन्न
आज जगभरात वनस्पतींच्या जवळपास ३२,८३,००० प्रजातींची नोंद झाली आहे. यांपैकी २,८६,००० प्रजाती केवळ सपुष्प वनस्पतींच्या आहेत. उर्वरित प्रजातींपैकी रानात नैसर्गिक स्वरूपात वाढणाऱ्या अथवा लागवड होणाऱ्या अशा अंदाजे ७००० प्रजातींचा वापर अन्न म्हणून करण्यात येत आहे. निसर्गात सतत बदलांना तोंड देताना वनस्पतींच्या आनुवंशिक (गुणसूत्रांच्या) रचनेत दर पिढीमध्ये सूक्ष्म बदल होत असतात. कधी कधी हे बदल अचानक देखील घडून येतात. अशा बदलjळे वनस्पतींच्या अंतर्गत व बाह्य रचनेत बदल होऊन एखादी नवी प्रजाती (species) किंवा वाण तयार होतो. हे नवे वाण दर पिढीगणिक होणारे लहान लहान बदल संकलित होत जाऊन बऱ्याच कालानंतर तयार होते. निसर्गातील जैवविविधता हा डार्विनच्या उत्क्रांतिवादातील नैसर्गिक निवड ह्या तत्त्वाचा महत्त्वाचा घटक आहे. एखाद्या प्रजातीमधील वाणांची नैसर्गिक विविधता जेवढी जास्त, तेवढाच योग्य गुणयुक्त वाणांच्या नैसर्गिक निवडीला व पुढे नव्याने उत्क्रांत होणाऱ्या प्रजातीच्या निर्मितीला वाव अधिक. या नैसर्गिक प्रक्रियेळेच जगात आज गव्हाच्या १४,००० वाणांची नोंद झाली आहे. भारतात तांदळाचे जवळपास दोन लाख वाण अस्तित्वात असावेत असा अंदाज आहे. छत्तीसगढसारख्या भारतातील एका छोट्या प्रदेशामध्ये देखील रायपूर येथील ‘तांदूळ-संशोधन केंद्रात’ डॉ. रिछारिया यांच्या मार्गदर्शनाखाली तांदळाचे २०,००० वाण संकलित करण्यात आले होते. भारतात वांग्यांची २५००च्या वर वाणे वापरात आहेत. वातावरणातील बदल ही सतत चालू राहणारी प्रक्रिया आहे. एखाद्या पिकाचे निसर्गात जेवढे जास्त वाण आढळेल, तेवढी त्यांपैकी काही वाणांची निसर्गातील बदल सहन करण्याची व नव्या वातावरणाशी जुळवून घेण्याची शक्यता जास्त असेल.
आदिवासी व अन्नविविधताः
रानात अधिवास असलेल्या आदिवासींच्या आहारात अन्नाची विविधता खूप असते, यासाठी रानात आढळणाऱ्या अनेक वनस्पतिप्रजातींचा ते वापर करतात. काही आदिवासी व ते अन्नासाठी उपयोग करीत असलेल्या वनस्पती प्रजातींची संख्या खालीलप्रमाणे आहे.
– अमेरिका खंडातील शोनोन आदिवासी – १०० प्रजाती
– नामिबिया देशाच्या कालाहारी प्रदेशातील बुशमन आदिवासी- ११५ प्रजाती
– ऑस्ट्रेलिया खंडातील काही आदिवासी – २५० प्रजाती
– भारतातील आदिवासी – १५३० प्रजाती
भारतातील आदिवासींच्या आहारात असलेल्या या १५३० वनस्पती प्रजातींमध्ये १४५ कंदवर्गीय, ५२१ हिरव्या पालेभाज्या, १०१ फूलवर्गीय, ६४७ फळवर्गीय, ११८ बिया व सुकामेवा अशा स्वरूपातील आहेत. आदिवासींच्या या विविध अन्नप्रकारांच्या तुलनेत आजच्या घडीला आपल्या नागर संस्कृतीत केवळ ३० वनस्पती प्रकारांची अन्न म्हणून लागवड केली जाते.
अन्नसंकलनाकडून अन्नोत्पादनाकडे जवळपास १ लाख वर्षांपूर्वी आधुनिक मानव (Homo Sapian Sapian) आफ्रिकेमध्ये उत्क्रांत झाला. तेव्हापासून जवळपास ४०,००० वर्षांपूर्वीपर्यंतच्या मोठ्या काळात शिकार व सभोवतालच्या प्रदेशातील वनस्पतींपासून मिळणाऱ्या अन्नाचे संकलन यावरच त्याची गुजराण होत होती. हे अन्न मुख्यतः विविध प्राण्यांचे मांस, कंद, मुळे व फळे या स्वरूपातील होते. या एक लाख वर्षांच्या काळातील मानवाला वातावरणातील अनेक बदल झेलावे लागले व त्यांच्याशी जुळवून घेताना नवनव्या प्रदेशांत स्थलांतर करावे लागले. त्याचबरोबर नव्या स्थलांतरित प्रदेशांत नवनव्या अन्नप्रकारांचाही शोध घ्यावा लागला. हवामान – बदलामध्ये हिमयुग-काळाचाही (glaciation) अंतर्भाव होता. शेवटचे हिमयुग जवळपास १३००० वर्षांपूर्वी येऊन गेले. या काळात दाट जंगले विरळ होत गेली व विरळ जंगलांचीही कुरणे झाली. भटक्या जीवनशैलीतून बैठ्या जीवनशैलीत मानवाचे स्थित्यंतर झाले. मध्यंतरीच्या काळात मानवी टोळ्यांधील पुरुष जरी शिकारीसाठी जंगलात जात असला तरी स्त्रिया मुलांच्या देखभालीसाठी गुहेतच राहत. त्यामुळे त्यांना निसर्गातील वनस्पति-सृष्टीचे अवलोकन करण्यास खूप वेळ मिळत होता. यातूनच त्यांचे निसर्गातील वनस्पती व खाद्यान्ने ह्यांचे ज्ञान वाढले. विरळ जंगलांची कुरणे झाल्यानंतरच्या काळात गवत, बांबू, हरळी ह्यांसारखे वनस्पतींचे नवे तृणवर्गीय प्रकार अस्तित्वात आले. यातूनच तृणधान्यांचा शोध घेण्यात आला. त्या काळच्या महिलांनी उत्सुकतेपोटी ही खाण्यायोग्य तृणधान्ये आपल्या निवाऱ्याशेजारच्या जोतजमिनीत हाताने पेरून पाहिली. त्यांच्या निरीक्षणातून एका बीजातून खाण्यायोग्य अनेक बीजे निर्माण होतात. हे लक्षात आले व अशा प्रकारे हळूहळू कृषिशास्त्र विकसित होत गेले. आजही तिसऱ्या जगात शेतातून अन्ननिर्मितीमध्ये महिलांची भूमिका खूप महत्त्वाची आहे, बियाणे जतन करण्याची परंपरा त्यांनी मोठ्या निष्ठेने सांभाळली आहे.
शेतीला सुरुवात व नव्या बियाणांचा शोध
शेतीची सुरुवात पश्चिम आशियातील इस्रायल, तुर्कस्तान, लेबनॉन, सिरीया व इराक या देशांच्या चंद्रकोरीसारख्या सुपीक भूप्रदेशात सुारे १०,५०० वर्षांपूर्वी झाली. बार्ली व गहू ही पिके या प्रदेशातच निर्माण झाली. बकरी व मेंढी या प्राण्यांना माणसांच्या नियंत्रणाखाली आणून पशुपालनासही सुरुवात झाली. व्हॅव्हिलॉव्ह या रशियन शास्त्रज्ञाच्या मतानुसार त्याच सुमारास जगभर अन्ननिर्मितीची ८ मुख्य व ३ दुय्यम अशी एकूण ११ केंद्रे अस्तित्वात आली. ज्या भूप्रदेशात एखाद्या पिकाच्या वाणांची विविधता जगात सर्वाधिक असेल तो प्रदेश त्या वाणांच्या निर्मितीचे मूळ केन्द्र आहे असे त्याचे प्रतिपादन होते. यानुसार मेक्सिकोमध्ये मका, दक्षिण अमेरिकेत बटाटा व रताळी. इथओपियात ज्वारी, आशियात केळी, भारतात तांदूळ, वांगी, तूर इत्यादी पिके अस्तित्वात आली. आजवर जगात मका, भात, गहू, बटाटा, रताळी यांसारख्या सात मुख्य पिकांचा तर तृणवर्गातील गहू, बार्ली, मका, ओट, राय, ज्वारी यांसारख्या दुय्यम पिकांचा अन्न म्हणून मोठ्या प्रमाणावर उपयोग झाला आहे.
शेतीचा विकास होत असताना नवनव्या पिकांच्या जातींचा शोध घेण्यासाठी त्या काळातील शेतकऱ्यांनी केलेले अथक प्रयत्न नजरेआड करून चालणार नाही. कृषिविकासाच्या दीर्घ कालखंडात चिकित्सक प्रयोगशील शेतकऱ्यांच्या अनेक पिढ्यांनी निसर्गाचे सूक्ष्म निरीक्षण करीत नव्या वाणांच्या निर्मितीची प्रक्रिया समजून घेतली. शेतात वाढणाऱ्या पिकांच्या ताटां धून एखादे जास्त उत्पादन देणारे, रोगांना बळी न पडणारे, पाऊसपाण्याचा ताण झेलणारे रोप आढळल्यास ते त्याच्या बियाण्यांचे संकलन व संवर्धन करून हे नवे वाण पुढील हंगामात लागवडीस घेत असत. अशी कित्येक नवी वाणे त्यांनी निसर्गातूनशोधली आहेत. तसेच निसर्गात चालणाऱ्या परागसिंचन-प्रक्रियेचा अभ्यास करून त्या आधारावर काही वाणांचा आपसात संकर करून नवीन वाणेदेखील त्यांनी तयार केली आहेत. असे प्रयोगशील शेतकरी त्याकाळचे गावपातळीवरील शास्त्रज्ञच होते. त्यांनी अशा प्रकारे पिकांच्या हजारो वाणांची निर्मिती केली आहे. अशा विविध प्रकारच्या अनेक वाणांचे जतन करून तो वारसा पुढील पिढीकडे सोपविणे हा शेती-विकासाचा महत्त्वाचा भाग होता. देशातील प्रत्येक प्रदेशांत भिन्न भिन्न प्रकारची भौगोलिक-परिस्थिती, हवामान, माती व पाणी असल्यामुळे त्या त्या प्रकारच्या हवामानाशी जुळवून घेऊ शकणाऱ्या वाणांची निर्मिती व जपणूक हा पारंपरिक शेतीचा गाभा होता. किंबहुना गेली ७००० वर्षे टिकून राहिलेल्या भारतीय शेतीचा गाभा मातीचे स्वास्थ्य टिकवून ठेवून विविध परिस्थितीशी अनुरूप अशा काटक बियाणांचा वापर हाच राहिला आहे. शेतीचे आधुनिक तंत्र स्वीकारण्यापर्यंतच्या काळात शेतकऱ्यांमध्ये आपसांत बियाण्यांची देवाणघेवाण होत असे. तीनचार वर्षांनंतर आपल्याकडील बियाणे बदलून घेण्यासाठी पंचक्रोशीतील किंवा त्याबाहेरील एखाद्या गावामधून बियाणे विनिमयतत्त्वावर आणले जात असे. बियाणांचा विक्रय व त्याचे व्यापारीकरण कधी झाले नाही.
बियाण्यांचे व्यापारीकरण
शेतीच्या आधुनिकीकरणासोबतच बियाण्यांचा व्यापार सुरू झाला. पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी संकरीकरण (Hybridization) तंत्राचा वापर करण्यात आला. यात वेगवेगळ्या वाणांध्ये आपसांत संकर करून त्यांच्यामधील चांगले गुण एकत्र आणले जातात व जास्तीत जास्त गुणसंपन्न वाण निर्माण केले जाते. जसे जास्त उत्पादन देणारे वाण, कमी पाण्यात तगून राहणारे वाण, रोगप्रतिकारशक्ती चांगले असणारे वाण यांचा संकर. परंतु या तंत्राने विकसित केलेल्या वाणातील गुणसमुच्चय फक्त एका पिढीपुरताच मर्यादित राहतो. म्हणजे अशा संकरित वाणांची बियाणे पेरून आलेल्या पिकातील बियाणे पुढील हंगामासाठी ठेवता येत नाही. कारण त्या पिढीत त्यांतील गुणधर्म विखुरले जातात व पिकांचे उत्पादन पहिल्या पिढीइतके येत नाही. याचाच अर्थ असा की यापुढे पुढील हंगामासाठी बियाणे शेतकऱ्यांच्या हातात राहत नाही व त्याला दरवर्षी नवीन संकरित बियाणे बाजारातून विकत घेणे अनिवार्य होते.
जास्त उत्पादन देणाऱ्या सुधारित बियाणे-निर्मितीचे आणखी एक तंत्र म्हणजे उत्प्रेरण (Mutation). या तंत्रामध्ये बियाणांवर ‘गॅ| किरणे’ सोडून अथवा विशिष्ट रसायनांची प्रक्रिया करून त्यांच्यातील आनुवंशिक गुण बदलले जातात. अशा प्रक्रिया केलेल्या बियाणांचे मातीत रोपण करून त्यांधून येणाऱ्या पिकांचा अभ्यास करून ज्यांत अपेक्षित गुण उतरले आहेत अशी ताटे निवडली जातात. या नव्या वाणांच्या पुढील जवळपास पाच पिढ्यांचा अभ्यास करून नियमितपणे अपेक्षित गुण दाखविणारे वाण सरतेशेवटी निवडले जाते व इतर सामान्य वाणांसारखी ह्याची लागवड होऊ शकते. ह्याला सरळ वाण म्हणता येईल. सरळ वाण निर्मितीचा आणखी एक प्रकार म्हणजे एखाद्या पिकाच्या रानटी अवस्थेत आढळणाऱ्या अनेक जाती एकत्र आणून कृत्रिम परागसिंचनाच्या सहाय्याने नवे उन्नत वाण निर्माण करून पुढील ५ पिढ्यांपर्यंत निवडलेले गुणधर्म दर्शविणारे वाण तयार करणे म्हणजे एक प्रकारे निसर्गात जे घडते ते संशोधन केंद्राच्या परिसरात मानवी प्रयत्नाने घडवून आणले जाते. या सगळ्या शास्त्रीयदृष्ट्या विकसित झालेल्या बीजनिर्मितीचा मूळ उद्देश चांगलाच होता. परंतु शास्त्रज्ञांनी निर्मिलेल्या वाणांवर अथवा तंत्रावर पुढे त्यांचे नियंत्रण राहिले नाही. शेवटी त्याचे व्यापारीकरण झाले. आज बियाणेव्यापार मोठमोठ्या कंपन्यांच्या हाती गेला आहे. बियाणेनिर्मितीपासून बियाणे विपणनापर्यंत सर्व व्यवहार त्यांच्या हाती आहे. या व्यवहारात लाखो-करोडो रुपयांची वार्षिक उलाढाल होते. व शेवटी शेतकरीच लुटला जातो.
आधुनिक काळात शेतीला आवश्यक असलेल्या बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशके, विविध यंत्रसामुग्री ह्यांसारख्या निविष्टी (inputs) पुरविणारी आणि देशांतर्गत अथवा देशाबाहेर वितरण व विक्री करणारी प्रचंड मोठी साखळीयंत्रणा उभी राहिलेली आहे. या यंत्रणेवर उत्पादक शेतकरी अथवा ग्राहक यांपैकी कुणाचेही नियंत्रण नाही. तेथे बड्याबड्या कंपन्या अथवा बहुराष्ट्रीय कंपन्या यांची सत्ता चालते. छोट्या माशांना बड्या माशाने गिळावे तसे लहान लहान कंपन्यांना गिळंकृत करून मोठ्या झालेल्या काही मोजक्याच कंपन्या जागतिक कृषिव्यापार नियन्त्रित करतात. त्यामुळे या व्यापारातील प्रचंड नफा थोड्याच कंपन्यांच्या घशात जात असतो. जगातील बियाणांचा अर्धा व्यापार मोन्सॅन्टो, सिन्जॅन्टो यांसारख्या केवळ १० कंपन्यांच्या हातात एकवटला आहे व २०१५ पर्यंत केवळ तीन कंपन्यांचे या व्यापारावर नियंत्रण राहील असा अंदाज आहे. बियाणे व्यापारीकरणाचे पुढीलप्रमाणे परिणाम आहेतः
* शेतकऱ्यांचे बियाणांवरील नियंत्रण व त्याबाबतीतील स्वायत्तता संपली.
* बियाणांचा व्यापार झाल्यामुळे शेतकरी बाजारव्यवस्थेचा गुलाम झाला.
* बियाणे विकत घ्यावे लागत असल्यामुळे शेतीखर्चात वाढ झाली.
* अनियमित हवामानामुळे पेरणी बाद झाल्यास नव्या दुबार पेरणीसाठी पुन्हा महागडे बियाणे खरेदी करावे लागते.
* महिलांनी बियाणे जतन करणयाची चांगली परंपरा लुप्त झाली.
* बाजारात पिकांच्या मोजक्याच वाणांची उपलब्धता असल्यामुळे पारंपरिक वाणांची बियाणे नाहीत. (उदा. वाणीचा हुरडा खायला मिळत नाही.)
* पिकांची मिश्रशेतीकडून एकलशेतीकडे वाटचाल होणे हे एक सांस्कृतिक नुकसान.
* शेतीतील पिकांची बहुविधता नष्ट झाली.
बियाणे बाजारातील नवा ब्रह्मराक्षसः
या जनुकीय बदलांद्वारे निर्मित पिकाळे (genetically modified crops) आज बियाणेबाजारात नवा ब्रह्मराक्षस अवतरला आहे. यात वनस्पतीच्या एकाच प्रजातीतून नव्हे तर वनस्पती, प्राणी किंवा सूक्ष्म जीवाणु यांच्यापैकी कोणत्यातरी प्रजातींमधील जनुकांची अदलाबदल करून नवी जात निर्माण केली जात आहे. बीटी कापूस, बीटी मका, बीटी वांगी ही त्याचीच उदाहरणे आहेत. जनुकीय अभियांत्रिकी तंत्रज्ञानाद्वारे नवनव्या प्रकारची बियाणे केवळ नफेखोरीसाठी बाजारात आणली जात आहेत. राऊंड – सोयाबीन या प्रकारात सोयाबीन खरेदीसोबतच तणनाशक रसायन विकत घ्यावे लागेल. त्यामुळे केवळ तणांचा नाश होईल. परंतु सोयाबीनच्या पिकावर त्याचा परिणाम होणार नाही. टर्मीनेटर बियाण्यांच्या वापरामुळे पिकामधील पुढील पिढीत पराग नपुसंक राहतील म्हणजे त्या पिढीत बियाणे तयार करण्याची क्षमता राहणार नाही. (म्हणजे अशा पिकांची बियाणे बाजारातून घेणे अनिवार्यच होईल.)
जनुकीय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जनुकांचे आंतरप्रजातीय रोपण करून खालील काही नव्या प्रजाती निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
* रेशमी धाग्यासारखे दूध येण्यासाठी कोळ्याच्या जनुकांचे बकरीमध्ये रोपण
* मानवी प्रथिने असलेले दूध मिळविण्यासाठी मानवी जनुकांचे बकरीमध्ये रोपण
* तंबाखूतील जीवनसत्त्वाचे प्रमाण वाढविण्यासाठी हॅस्टर नावाच्या माशाच्या जन्कांचे तंबाखू वनस्पतीमध्ये रोपण
जनुकीय अभियांत्रिकीद्वारा सुधारित बियाणांच्या वापरामुळे सुरुवातीच्या काळात उत्पादन जरी वाढले तरी नंतरच्या काळात घटते व किडींचाही प्रादुर्भाव होतो असा चीन व इतरही देशांचा अनुभव आहे. पिकांच्या या नव्या जनुक- सुधारित जातींचे पर्यावरणावर व मानवी आरोग्यावर काय परिणाम होतील याविषयी बऱ्याच शंका आहेत.
या नव्या जैवतंत्रज्ञानामुळे एकूणच प्रजातींमधील जीवांच्या आनुवंशिक गुणांतच बदल होणार असल्यामुळे अशा पिकांच्या अन्नसेवनातून मानव व इतर प्राणी यांच्या आरोग्यावरही दुष्परिणाम संभवतात. याबाबतीत आज तरी आपण पूर्णपणे अंधारात आहोत. परंतु प्रयोगशालेत प्राण्यांवर सुरू असलेल्या प्रयोगांधून आपल्याला संभाव्य धोक्याची जाणीव होते. जनुकीय अभियांत्रिकीद्वारे निर्मित पिकांमध्ये खालील धोके संभवतात.
१. हे शास्त्र अंशतः विकसित आहे. जनुकांचे एका जीवातून दुसऱ्या जीवामध्ये स्थानांतरण करताना नको असलेली जनुकेही त्याच्या सोबत येऊ शकतात. अशा जनुकांचे पुढे काय परिणाम होणार हे अनिश्चित आहे.
२. हे बदल अपरिवर्तनीय आहेत. पुढील काळात हानिकारक परिणाम दिसल्यावर मागे येता येणार नाही.
३. अशा पिकांचा मानवी आरोग्यावर काय परिणाम होणार ह्याचा नीट अभ्यास झालेला नाही. जनुकीय अभियांत्रिकीतून घडवलेले टोंमॅटो व बटाटे उंदरांना खाऊ घातल्यावर त्यांना आतड्याचे अल्सर्स व कॅन्सर झाल्याचे आढळले.
४. पिकांमध्ये असलेले काही विषाक्त गुण (जसे अर्लर्जेन्स) आणि काही उपयुक्त पोषणमूल्य असलेले गुण (जसे, जीवनसत्त्वे, अॅन्टी-ऑक्सीडण्टस् वगैरे) यांत बदल संभवतात. माणसाच्या प्रतिकारशक्तीवर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
५. वातावरण-बदलाचे ताण सहन न झाल्यास उत्पादन घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे अन्नसुरक्षा धोक्यात येऊ शकते.
६. या तंत्रामुळे निसर्गातील जैवविविधता धोक्यात येण्याची शक्यता आहे.
नवीन तंत्रज्ञान वापरलेल्या पिकातील परागकण परिसरातील त्या प्रजातीच्या अथवा त्या वनस्पति-परिवारातील इतर पिकांवर जाऊन होणाऱ्या परागसिंचनामुळे अंतिमतः निसर्गसाखळी धोक्यात येण्याचा संभव आहे. याचा विपरित परिणाम निसर्गातील उपयुक्त कीटक, जमिनीमधील सजीव यांच्यावरही होऊ शकतो व यामुळे किडींच्या नव्या त्रासदायक जातींची निर्मिती होऊन नव्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
जैवविविधता विनियामक प्राधिकरण विधेयक २०११ (बायोटेक्नॉलॉजी रेग्युलेटरी अथॉरिटी बिल, २०११) लोकसभेत पटलावर ठेवले गेले आहे. त्यावर सविस्तर चर्चा होणे गरजेचे आहे. यांत जनुकीय तंत्रज्ञानाच्या व्यापारीकरणांचे लाभ घेणाऱ्या कंपन्यांना मागील दाराने आत प्रवेश मिळण्याची शक्यता असून शेतकऱ्यांच्या व ग्राहकांच्या हिताला धोका आहे. लोकसभेचे कामकाज सध्या सविस्तर चर्चा न होता गोंधळातच चालते. त्यात हे विधेयक चर्चेविनाच स्वीकृत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी व ग्राहक या समाजघटकांनी जागरूक राहून यातील अहितकारक कलमांना विरोध केला पाहिजे.
पारंपरिक मिश्रशेती व पिकांची विविधता
भारतात हजारो वर्षे वापरत असलेल्या मिश्रशेतीपद्धतीत पिकांच्या बहविविधतेला फार मोठे स्थान होते. एकाच शेताच्या विविध भागात अनेकविध पिके घेतली जात असत. १५ वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील मेंढा लेखा गावातील शेतीपद्धतीचा अभ्यास करताना मला त्या गावातील शेतांत तांदळाच्या किमान १० वाणांचा लागवडीसाठी वापर करतात असे दिसून आले. हलक्या जमिनीवर येणारी, भारी जमिनीवर येणारी, कमी पाण्यावर येणारी, जास्त पाण्यावर येणारी अशी विविध प्रकारची वाणे होती. ७-८ वर्षांपूर्वी विदर्भातील मेळघाट येथील पीकपद्धतीचा अभ्यास करताना तेथील शेतकरी कोदो-कुटकी अशा भरड पिकांसोबतच तांदूळ, गहू, मका, ज्वारी, डाळी यांसारख्या पिकांच्या विविध वाणांचा वापर करीत असल्याचे आढळून आले. यांपैकी काही पिकांची बियाणे एकत्र मिसळून पेरीत असत. माझ्या लहानपणी विदर्भातील शेतकरी कोरडवाहू जमिनीमध्ये ज्वारी, बाजरी, मोतीचूर यांसारखी तृणधान्ये, तूर, मूग, उडीद, बरबटी अशी कडधान्ये, जवस, तीळ, भुई ग अशी तेलवर्गीय धान्ये आणि कापूस आंबाडी यांसारखी धागावर्गीय पिके यांची लागवड शेतांत करीत असत असे आठवते. यवतमाळ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसोबत काम करताना त्यांच्यासोबतच्या चर्चेतून त्यांच्या परिसरात ज्वारीच्या जवळपास १४ वाणांची लागवड होत होती असे समजते. यातील बऱ्याचशा स्थानीय जाती आता नष्ट झाल्या आहेत किंवा होण्याच्या मार्गावर आहेत.
मिश्रशेतीतील पीकविविधतेचे फायदे
१. पाऊसपाणी अनियमित झाल्यावरही कोणते ना कोणते पीक हाती येते.
२. विविध प्रकारच्या पिकांचा पालापाचोळा खाली पडून जमिनीतील जीवांचे संवर्धन होते व त्यांच्या कार्यकलापामुळे जमिनीचा पोत सुधारतो.
३. पिकांच्या विविधतुळे मित्रकिडींची वाढ होते व कीडनियंत्रणाची नैसर्गिक व्यवस्था निर्माण होते.
४. वेगवेगळ्या पिकांच्या कमी जास्त खोलीच्या मुळjळे जमिनीतील पाण्याचा कार्यक्षम वापर होतो.
५. पिकांच्या विविधते ळे निसर्गनिवडीला वाव मिळून नव्या वाणांच्या व प्रजातींच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू राहते.
६. एकल पीकपद्धतीपेक्षा मिश्रपीक पद्धतीमध्ये सूर्यप्रकाशाचा जात कार्यक्षम वापर होत असल्यामुळे सकल उत्पादन (cumulative yield) जास्त येते.
७. तृणधान्ये, कडधान्ये, तैलवर्गीय पिके, भाजीपाला ह्यांळे शेतकरी कुटुंबीयांसाठी आवश्यक ती सर्व पोषणमूल्ये असलेला आहार उपलब्ध होऊ शकतो.
८. धान्यपिकांसोबत शेताच्या बांधावर फळझाडे, वनौषधी, इमारती लाकूड देणारी, इंधन देणारी झाडे यांची लागवड केल्यास शेतकऱ्यांच्या आवश्यक त्या दैनंदिन गरजा पूर्ण होऊ शकतात.
एकल पीक लागवडीचे दुष्परिणाम
शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाल्यावर अधिक उत्पादन देणाऱ्या पिकांच्या वाणांची लागवड करण्यावर भर देण्यात आला. यासाठी मोठ्या प्रमाणावर ‘एकल पीकपद्धती (mono-cropping)’ स्वीकारण्यात आली. यामुळे पिकांची विविधता नष्ट झाली. मानवी इतिहासात जवळपास ७००० वनस्पतींचा खाद्य म्हणून वापर होत होता. परंतु विसाव्या शतकात ७५ ते ९० टक्के एवढ्या प्रचंड प्रमाणात पिकांच्या विविधतेचा नाश झाल्यामुळे जगात आता केवळ ३० प्रकारच्या पिकांद्वारे अन्न म्हणून ९५ टक्के कॅलरीज व प्रथिने पुरविली जातात. तांदूळ, गह, मका, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, बटाटा, रताळी, ऊस/बीट आणि केळी यांसारख्या केवळ दहा प्रमुखपिकांद्वारे जगातील तीन चतुर्थांश प्रजेचे पोषण होते व त्यांतही तांदूळ, गहू आणि मका या तीन मुख्य पिकांद्वारे जवळपास ५० टक्के वनस्पतिजन्य कॅलरीज पुरविल्या जातात. हरितक्रांतीत या तीन पिकांच्या उत्पादनवाढीवर भर देण्यात आल्यामुळे प्रजेला आवश्यक त्या कॅलरीज मिळण्याची शक्यता जरी वाढली तरी संतुलित आहारासाठी आवश्यक असलेल्या प्रथिने, खनिजे, मेदे व जीवनसत्वे यांसारख्या अन्नघटकांची उणीव जाणवू लागली आहे. भारतासारख्या बहुसंख्येने शाकाहारी जनता असणाऱ्या देशात प्रथिनांचा पुरवठा डाळींद्वारा होतो. मात्र हरितक्रांतीमुळे गहू आणि तांदळाचे उत्पादन जरी वाढले असले तरी डाळी आणि तेलबियांचे उत्पादन लक्षणीयरीत्या घटले आहे. आज आपल्याला डाळी व खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणावर आयात करावी लागते.
माझ्या मार्गदर्शनाखाली दोन वर्षांपूर्वी वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यामधील ३० गावांचे पिकांच्या विविधतेविषयी सर्वेक्षण करण्यात आले. त्यांत असे आढळून आले की एकूण लागवडीखालील जमिनीपैकी ७८ टक्के जमीन केवळ कापूस व सोयाबीन या नगदी पिकाखाली आहे. तर १५ ते १७ टक्के जमीन तुरीखाली आहे. म्हणजे एकूण लागवडीखालील जवळपास ९३ ते ९५ टक्के जमीन ही नगदी पिकाखाली आहे. यांपैकी कापूस व सोयाबीन यांचे आपण अन्न म्हणून सेवन करीत नाही. अशीच परिस्थिती पश्चिम विदर्भातील इतर ठिकाणीचीही आहे. या ठिकाणी हे लक्षात ठेवण्यासारखे आहे की, हरितक्रांतीपूर्वी वहाडात जवळपास ५० टक्के जमीन ज्वारीच्या लागवडीखाली असायची. अशा प्रकारे पिकांची जैवविविधता कमी करून आपण अन्नसुरक्षा धोक्यात आणली आहे. माझ्या बालपणी विषमुक्त, निरामय व विविध प्रकारच्या अन्नसेवनामुळे जे धडधाकट स्त्री-पुरुष ग्रामीण भागात दिसायचे तसे आजच्या काळात दिसत नाहीत ही मोठी खंत आहे. आधुनिक शेतीमध्ये पिकांची विविधता कमी करून आपण एकरप्रकारे जमिनीचे, जनतेचे व गुरांचेही (वैरण कमी झाल्यामुळे) कुपोषणच करीत आहोत.
पारंपरिक बियाणेसंवर्धनाची गरज
बियाण्यांच्या जागतिक व्यापारीकरणाच्या पोर्शभूीवर आपल्या देशातील विविध भागात परंपरेने वापरात आलेल्या बियाणांचे पुढील पिढींच्या भवितव्यासाठी जतन करणे गरजेचे आहे. हवामान बदलाच्या पोर्शभूमविर अशा प्रकारची गरज फारच महत्त्वाची ठरते. कारण बदलत्या हवामानाला तोंड देण्यासाठी या जतन केलेल्या बियाणे वारशापैकी काही बियाणे उपयुक्त ठरू शकतात. यासाठी प्रत्येक प्रदेशातील नष्टप्राय प्रदेशातील नष्टप्राय होत चाललेल्या पण काही शेतकऱ्यांच्या वापरात असलेल्या बियाणांचा शोध घेऊन गावोगावी अथवा पंचक्रोशीच्या पातळीवर ‘बियाणे कोष’ (seed banks) तयार करणे आवश्यक झाले आहे. स्थानिक पातळीवर केवळ बियाणेसंग्रह केलेला चालणार नसून या बियाणांचा शेतीत प्रत्यक्ष लागवडीसाठी वापर करणेही महत्त्वाचे आहे. आपल्या देशात आंध्र प्रदेशातील ‘डेक्कन डेव्हलपमेंट सोसायटी’ नवी दिल्ली येथील ‘नवधान्य’ बंगलोर येथील ‘अन्नदाता’ यासारख्या सेवाभावी संस्था स्थानिक पातळीवर बियाणे बचाव’ करणाऱ्याची (seed savers) साखळी उभी करण्याचा प्रयत्न करून शेतकऱ्यांना या बियाणांचा वापर करण्यासाठी उद्युक्त करीत आहेत. उत्तराखंडातील श्री. विजय जरदारी, पश्चिम महाराष्ट्रातील श्री. संजीव पाटील, विदर्भातील श्री. रमेश साखरकर ह्यांसारख्या ध्येयवादी व्यक्तीदेखील तळमळीने बीजसंकलनाच्या कामात गुंतल्या आहेत. यादृष्टीने प्रादेशिक व राष्ट्रपातळीवर एक व्यापक चळवळ सुरू होण्याची आवश्यकता आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या भविष्यातील सुरक्षिततेसाठी हे कार्य सामूहिक प्रयत्नांनी मोठ्या जोोने पुढे नेणे ही आजच्या काळाची गरज आहे.
वरिष्ठ वैज्ञानिक व अध्यक्ष, धरामित्र, वर्धा
संपर्कः भ्र.ध्व.०९८५०३४१११२,
इमेलः vernal.tarak@gmail.com
अप्रतीम माहिती…