संपादकीय दिवस कसोटीचे आहेत

साप्ताहिक साधनाचे संपादक आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक व प्रमुख डॉक्टर नरेंद्र अच्युत दाभोलकर ह्यांची ज्या प्रकारे पुण्यात हत्या झाली, तो प्रकार अखिल महाराष्ट्राला अत्यंत लांछनास्पद आहे. विचाराचा आणि विवेकाचा झेंडा घेतलेले महाराष्ट्रात जे काही थोडके लोक आहेत, त्यांच्यामध्ये दाभोलकरांचा क्रमांक वरचा होता. अंधश्रद्धेचे विरोधक आणि विवेकवादी असल्यामुळे ते एका अर्थी आ.सु. परिवारातलेच होते. त्यांच्यावरील हल्ल्याचे व त्यांच्या निधनाचे आम्हाला अतीव दुःख होत आहे. कृष्णा देसाईंच्या खुनाचा साक्षीदार असलेल्या महाराष्ट्राला राजकीय हत्या अपरिचित नाहीत. गेल्या दोन दशकांत जमीन तसेच माहिती अधिकार ह्या क्षेत्रांतील कार्यकर्त्यांच्या हत्या महाराष्ट्रात सातत्याने घडत आहेत ; पण तरी ही घटना त्यांच्यापेक्षा वेगळी आहे.
डॉ. दाभोलकरांनी अंनिसचे जाळे राज्यभर विणले होते. त्याची चळवळ उभारली होती, आणि अंधश्रद्धा जोपासून सामान्यजनांचा छळ करणाऱ्या, जादूटोणा करून दहशत पसरविणाऱ्या भोंदू लोकांचा व त्यांच्या कृष्णकृत्यांचा विज्ञानाच्या आधारावर पर्दाफाश करून जनतेचे त्यांच्यापासून रक्षण करण्याचे व्रत घेतले होते. हे व्रत त्यांनी संयमी, अनाक्रमक रीतीने, समन्वयवादी वृत्तीने चालविले होते. व्यक्तिशः कोणाशी शत्रुत्व न पत्करता, त्या प्रवृत्तीच्या विरोधात त्यांनी ते चालविले होते. तसेच हिंदुधर्मावर वा त्यातील कोणत्याही देवतांचा विरोध वा त्यांवर टीका त्यांनी केली नव्हती. त्यामुळे अशा प्रकारे गोळीबार करून झालेला त्यांचा अंत अनपेक्षित व दुर्दैवी आहे. ह्याला महाराष्ट्राच्या सदसद्विवेकबुद्धीवर केलेला हल्लाच म्हणावे लागेल.
ह्या हत्येचा अन्वयार्थ लावण्यासाठी आजच्या काळातील राजकीय पर्यावरण व विविध संस्था-संघटनांच्या त्यावरील प्रतिक्रिया लक्षात घेणे आवश्यक आहे. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत. देशभरातील उजव्या शक्ती नरेंद्र मोदींचा राज्याभिषेक जणु झालाच आहे अशा थाटात वावरत आहेत. फेसबुकसारख्या माध्यमांतून मोदींचा विरोध करणाऱ्यांवर आक्रमकरीत्या हल्ले चढविले जात आहेत. काँग्रेसचा संधीसाधू कृतक धर्मनिरपेक्षतावाद व संघपरिवाराचा रोखठोक, निर्दय हिंदुत्ववाद ह्यांशिवाय देशातील जनतेसमोर पर्यायच नाही असे चित्र सर्व माध्यमांतून रंगविले जात आहे. अशा वेळी, सारेच राजकीय पक्ष अंधश्रद्धांना खतपाणी घालणारे व विवेकवादाला पायदळी तुडविणारे आहेत असे सांगायची हिम्मत करणाऱ्या मूठभरांपैकी दाभोलकर हे एक होते. ते सॉफ्ट टारगेट असल्यामुळेच कोणतेही ढळढळीत निमित्त नसतानादेखील धर्मांध शक्तींनी त्यांचा काटा काढला असावा. येताजाता फुले-शाहू-आंबेडकरांचा जप करणाऱ्या महाराष्ट्राच्या पुरोगामी शासनाने खूप प्रमाणात पातळ केलेले जादूटोणाविरोधी विधेयक पारित करण्यासाठी गेली अनेक वर्षे चालढकल केली व दाभोलकरांचा बळी गेल्यावर त्यासंबंधीचा अध्यादेश काढला. भ्रामक प्रचार करून विधेयकाला विरोध करणारे उजवे राजकीय पक्ष आजही त्या विधेयकाला निःसंदिग्ध पाठिंबा देत नाही आहेत. ह्या घटनेचा संशय ज्याच्यावर घेण्यात येत आहे, तो संस्थाप्रमुख आज उसळलेल्या प्रक्षोभातही केलेल्या कर्माचे फळ माणसाला भोगावेच लागते असे उद्दाम उद्गार काढतो, महाराष्ट्राच्या काही भागांत हा खून मुसलमानांनी केला असल्याचा प्रचार करण्यात येतो; ह्यावरून विवेकवादाच्या विरोधी शक्ती किती निगरगट्ट झाल्या आहेत, हे ध्यानात येते. ह्या पार्श्वभूीवर ‘मी पोलीस संरक्षण घेतले तर दुसऱ्या तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांवर हल्ले होतील’ असा विचार करून, विवेकवादाच्या वेदीवर स्वतःच्या प्राणांची आहुती देणारे डॉ दाभोलकर व ह्या घटनेने विचलित न होता ते व्रत पुढे चालू ठेवण्याचा संकल्प करणारी महाराष्ट्रातील पुरोगामी विचारधारा ह्यांना सलाम करायलाच हवा. आता येणारा काळ हा विवेकवाद्यांसाठी कसोटीचा असेल ह्यात शंका नाही. शासन बध्येपणाची भूमिका घेणार, राजकीय नेते बाबा-माता-बापू महाराजांच्या चरणी लीन होणार, सर्वसामान्य जनता बलात्काराचे आरोप झालेल्या संतांबद्दल श्रद्धा बाळगून असणार आणि धर्मांध शक्ती मोकाट सुटणार हे स्पष्ट आहे. अशा वेळी आपण तात्त्विक मतभेदांचा बाऊ न करता संघटित होणे अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य जनता अज्ञानी, भोळीभाबडी असेल, पण ती सरसकट विवेकवादविरोधी आहे असे न मानता, तिला सोबत घेऊनच पुढील वाटचाल करावी लागणार असल्याचे भानही आपल्याला ठेवावे लागेल. असे घडले तरच विवेकवादाला वारीच्या सामर्थ्याची जोड मिळावी ही दाभोलकरांची अपेक्षा आपण पूर्ण करू शकू.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.