आज आपण २१ व्या शतकात जागतिक भांडवलशाहीच्या अवस्थेत जगत आहोत. आज प्रचंड प्रमाणात महागाई, मोठ्या प्रमाणात बेकारी, रुपयाची कमालीची घसरण, त्याबरोबरच राजकारणाचे गुन्हेगारीकरण, रोज होणारे खून, अपघात, घातपात, बलात्कार, दलित, अल्पसंख्यक व दुर्बल घटक ह्यांवर अत्याचार, अशी परिस्थिती आहे. धनदांडगे, बिल्डर लाबी, वाळू माफिया, अंडरवर्ल्ड आणि देशी-परदेशी भांडवलदार आणि व्यापारी हे सारे आपल्यावर राज्य करत आहेत. ही गोष्ट मार्क्सवादी आणि बिगर मार्क्सवादी पुरोगामी जाणून आहेत. म्हणूनच आज मार्क्सवादी आणि बिगर मार्क्सवादी पुरोगामी यांच्यामध्ये संवाद होण्याची आवश्यकता आहे. अनेक भांडवली पक्ष आहेत. खपरे निधर्मी, खोटे निधर्मी, धर्मवादी, जातीयवादी प्रांतवादी पक्ष आहेत. परंतु आर्थिक धोरणांबाबत त्यांचे जवळजवळ एकमत आहे. या देशात आणि जगात समता नांदावी जातिभेद, धर्मभेद,वर्गभेद, स्त्री-पुरुषभेद नसावा असे मार्क्सवादी आणि बिगर मार्क्सवादी पुरोगाम्यांना वाटते. याबाबत त्यांच्यात एकवाक्यता आहे. मग त्यांच्यामध्ये संवाद का बरे होत नाही ? जर भांडवलदारांचे वेगवेगळे पक्ष आपले मतभेद राखूनही महत्त्वाच्या प्रश्नांवर जर एकत्र येऊ शकतात, तर लोकांचे खऱ्या अर्थाने असलेले पुरोगामी पक्ष आपले मतभेद राखूनही महत्त्वांच्या प्रश्नांवर एकत्र का येत नाहीत ? त्यांनी आले पाहिजे ही काळाची गरज आहे. पुरोगाम्यांधील अंतर्गत अनेक प्रवाह मार्क्सवाद्यांमध्ये अनेक प्रवाह आहेत. तसेच लोकशाही समाजवाद्यांमध्येही आहेत. तसेच ते फुले आंबेडकरवाद्यांमध्येही आहेत. गांधीवाद्यांमध्येही आहेत, स्त्रीवाद्यांमध्येही आहेत आणि पर्यावरणवाद्यांमध्येही आहेत. परंतु हे सारे वादी आणि त्यांच्यातील प्रवाह सामान्य लोकांचे प्रतिनिधित्व करत असतील, तर त्यांनी आपल्यातील मतभेदांसकट पहिला संवाद सुरू केला पाहिजे आणि किमान कार्यक्रमांवर एकत्र आले पाहिजे. असा प्रयत्न खरे म्हणजे कॉ. विलास सोनावणे यानी काही वर्षांपूर्वी सुरू केला होता. पण ती संवादप्रक्रिया फारशी पुढे गेली नाही. त्यातून यवा भारत नावाची संघटना उभा राहिली, हा भाग वेगळा. असो.
भारतात जातिव्यवस्था आहे. म्हणून ब्राह्मणशाहीही आहे. हा समाजच पुरुषसत्ताक आहे. पण राज्य म्हणून आणि शासनकर्ता वर्ग म्हणून जगभर भांडवलशाही आहे. भांडवलशाहीची पहिली शास्त्रीय समीक्षा कार्ल मार्क्सने केली आहे. म्हणून या संवादप्रक्रियेला पुढे नेण्याचे काम मार्क्सवाद्यांनीच करायला हवे. त्यासाठी अगोदर मार्क्सवाद्यांनी आपल्या निरनिराळ्या प्रवाहातील कार्यकर्ते व विचारवंत यांच्यात संवाद सुरू केला पाहिजे. आता आपण २१व्या शतकात जगत आहोत. तेव्हा २०व्या शतकातील मार्क्सवादी क्रांतिकारी नेते कार्यकर्ते व विचारवंत यामधील वैचारिक मतभेद आणि त्यांचे ओझे आपण किती दिवस बाळगून राहाणार आहोत. उलट प्रत्येकातील सकारात्मक गोष्टी घेणे आणि २१व्या शतकाला साजेशी त्यात भर घालणे म्हणजेच शास्त्रीय समाजवाद पुढे नेणे आहे. लोकशाही समाजवाद्यांनीही तसेच इतर बिगर मार्क्सवादी पुरोगाम्यांनीही आपल्यातील जुनी ओझी फेकून दिली पाहिजेत. मगच मार्क्सवादी आणि बिगर मार्क्सवादी पुरोगामी किमान कार्यक्रमावर एकत्र येतील.
किमान कार्यक्रम
किमान कार्यक्रमावर एकत्र यायचे म्हणजे काय? तर लोकशाही, समता, सामंजस्य आणि सहिष्णुता ही जीवनमूल्ये म्हणून स्वीकारायची आणि तसा व्यवहार करायचा. ही मूल्ये दडपलेल्या, पिळवणूक होणाऱ्या समाजविभागांमध्ये त्यांना जगण्यासाठी प्राथमिक आवश्यकता म्हणून असतातच. हीच जीवनमूल्ये सर्व छटांच्या पुरोगाम्यांनी दडपलेल्या आणि पिळवणूक होणाऱ्या समाजातून, समाजासाठी, समाजापर्यंत फुलवायची आणि सफळ संपूर्ण बनवायची. ही जीवनमूल्येच विषमतेवर आधारलेल्या माणसामाणसांतील संबंधांपासून ते समाजरचनेपर्यंतच्या जीवनव्यवहारांना आह्वान देतील. म्हणजेच उच्चवर्णीय पुरुषसत्ताक भांडवलशाहीला आह्वान देतील.
लोकशाही
मार्क्सवाद्यांपासून सर्व बिगर मार्क्सवादी पुरोगाम्यांना लोकशाही हवी असते. त्याबाबत प्रत्येक विचारसरणींची आणि त्या अंतर्गत छटांची व्याख्या थोडी थोडी वेगळी असेल. तरीही जनताभिमुख लोकशाही सर्व डाव्यांना हवी आहे. डावे ज्या दडपलेल्या पिळवणूक होणाऱ्या समाजविभागांचे प्रतिनिधित्व करतात त्यांना तर जगण्याची ती प्राथमिक अटच आहे. हे कधी कधी त्या समाजविभागांना समजत नाही. कारण लोकशाहीचे खोटे रूप ते पाहातात. तेव्हा ते लोकशाहीविरोधी भूमिका घेतात व फॅसिझम, हुकूमशाही, झोटिंगशाही, लष्करशाही यांच्या बाजूंनी हे विभाग कधी कधी भूमिका घेतात. तेव्हा खरे म्हणजे त्यांचा लोकशाहीला विरोध नसतो, तर ते अनुभवत असलेल्या खोट्या लोकशाहीविरुद्धची ती प्रतिक्रिया असते. सर्व डाव्यांचे हे कर्तव्य आहे की, त्यांचा खऱ्या लोकशाहीवरचा विशास त्यांना परत मिळवून दिला पाहिजे. तो घरापासून, शेती. कारखाने, कचेऱ्यांपर्यंत तसेच शहरी आणि ग्रामीण विभागातील सर्व समाजजीवनातील व्यवहारांपर्यंत लोकांना लोकशाही त्यांच्या हाताला लागली पाहिजे.
समता
समाजवाद, साम्यवाद, सर्वोदय, अंत्योदय, लोकशाही समाजवाद, दलित-बहुजनवाद, स्त्रीवादातील सर्व प्रवाह व पर्यावरणवादातील सर्व प्रवाह यांचा गाभा समता हाच आहे. मग मोठे मोठे शब्द वापरले नाहीत तरी चालू शकते. खरे म्हणजे आजची गरज या टिपिकल शब्दांना, त्या मागील संकल्पनांना, त्यांचा कितीही चांगला अर्थ असला, त्या कितीही चागंल्या असल्या तरीही आजच्या बाजाराभिमुख खाजगी नफ्यावर आधारलेल्या ग्राहकवादी जागतिक व्यवस्थेने, या (समाजवाद वगैरे) संकल्पनांना कालबाह्य, त्याज्य, तुच्छ ठरवले आहे. पण तसे समतेचे नाही. माणसाला विषमतेचे कितीही आकर्षण वाटले, तरीही, त्याच्या अंतर्मनात समतेची आस आहे. ही आसच साऱ्या पुरोगामी तत्त्वज्ञानांागील चैतन्य आहे. त्या चैतन्यालाच सर्व प्रोगाम्यांनी आपल्या मतभेदांसकट आवाहन केले पाहिजे. सर्व पुरोगाम्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, ते प्रथमतः आणि अंतिमतः मानवतावादी आहेत. सर्व पुरोगाम्यांचा मूळ गाभा हा मानवतावादच आहे.
सामंजस्य
आज समाजात सर्वांत मोठी गरज कशाची असेल, तर ती सामंजस्याची आहे. दुसऱ्याचे मत, दुसऱ्याच्या श्रद्धा, दुसऱ्याचे विचार शांतपणे समजून घेण्याची गरज आहे. मार्क्सवादी विचारवंत दि. के. बेडेकर असे म्हणत असत, की एखादा विचार चूक की बरोबर यापेक्षा तो विचार निर्माण का झाला यात मला रस आहे. कारण विचार मग तो कोणताही असो, त्याला भौतिक परिस्थिती कारणीभूत असते आणि त्याला भौतिक आधार असतो. प्रतिगामी विचारांचे खंडन करण्यासाठी हे आवश्यक आहे. तसेच पुरोगाम्यांतर्गत विविध मतप्रवाह का तयार झाले, त्याला भौतिक आधार काय आहे, हे समजून घेण्यासाठी तर खूपच आवश्यक आहे. यातूनच विविध विचारप्रणाली मानणाऱ्यांमध्ये आणि त्यातील विविध छटांचा आविष्कार करणाऱ्यांमध्ये सामंजस्य निर्माण होऊ शकते. आणि असे सामंजस्य सध्याच्या काळात खूपच महत्त्वाचे आहे. कारण आजचा समाज आणि त्यातील दडपलेला, पिळवणूक होणारा समाजविभाग हा अनेक पैलूंनी आणि अनेक कारणांनी दडपणूक, छळवणूक आणि पिळवणूक सहन करणारा आहे. तेव्हा या सर्व पैलूंचा आणि सर्व कारणांचा सांगोपांग विचार आणि त्या अनुषंगाने ते नष्ट करण्यासाठी आचरण करण्यासाठी गरजेचे आहे. हे परस्परसामंजस्याशिवाय अशक्य आहे.
सहिष्णुता
आजकाल जगभर आणि आपल्या देशात गरिबी, बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार यांच्या इतकीच सगळ्यांत मोठी समस्या कोणती असेल, तर ती असहिष्णुतेची आहे. आज जरा वेगळा विचार मांडला तर तो दसऱ्या व्यक्तीला खपत नाही. ती व्यक्ती संवाद करण्याऐवजी हमरीतुरीवर येऊन शत्रुत्वच पत्करते. हे कुठल्याही पुरोगामी विचाराला, जो असा दावा करतो, की त्याला समाज पुढे न्यायचा आहे, त्यासाठी घातक आहे. असहिष्णुता हे प्रतिगामी विचारवाहकांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. परंतु पुरोगामी विचारांना लागलेला तो रोग आहे. आणि त्यावर तातडीने इलाज करून त्यातून मुक्त व्हायला हवे. आणि निकोप मनोवृत्ती जोपासायला हवी. कुठल्याही पुरोगामी विचाराच्या वाहकांनी सहिष्णु असायलाच हवे. ज्या समाजाचे नेतृत्व पुरोगामी करू पाहातात, त्या समाजात जगण्यासाठी सहिष्णुता असायलाच लागते. परंतु प्रतिगामी विचारवाहक या समाजविभागात शिरतात आणि त्यांच्यात असहिष्णुतेचे विष पेरतात. मग याचा परिणाम म्हणून जाती- जातीत, धर्मा-धर्मात, तसेच स्त्रीपुरुषांमध्ये असहिष्णुता वाढीस लागते. आणि मग उच्चजातीच्या, उच्चवर्गाच्या, बहुसंख्यक धार्मिकांच्या तसेच पुरुषी मनोवृतीच्या पुरुषांच्या समूहाची झोटिंगशाही सुरू होते. हीच झोटिंगशाही मनोवृती जर दडपलेल्या, छळवणूक, पिळवणूक झालेल्या समाजविभागांनी आणि त्यांचे नेतृत्व करणाऱ्या, त्यांच्यात काम करणाऱ्या पुरोगामी विचारवाहकांनी दाखवली, तर ते मानत असलेल्या लोकशाही व समता या मूल्यांनाच छेद जातो. मग ज्या उद्देशांसाठी लढायचे त्या उद्देशांनाच आपल्याच हातांनी हरताळ फासल्यासारखे होते.
काय करायला हवे?
मार्क्सवाद्यांनी लोकशाही समाजवाद्यांचा लोकशाहीचा आग्रह आपला मानला पाहिजे. तसेच गांधीवाद्यांचे अहिंसेचे मत गांभीर्याने घेतले पाहिजे. आंबडेकरांचा जातिअंताचा लढा आपला मानायला हवा. स्त्रीवाद्यांचा स्त्री-माणूसपणासाठीचा लढा आपल्या आचारविचारांचा भाग करण्याला हवा. तसेच जगात कोणतेही बदल करायचे असतील तर अगोदर पृथ्वी वाचली पाहिजे. तेव्हा पर्यावरणवाद्यांचे म्हणणेही गांभीर्याने घेऊन आपल्या विचारात त्याचा अंतर्भाव करायला हवा.
मी मार्क्सवादी असल्यामुळे मार्क्सवाद्यांनी काय केले पाहिजे हे आग्रहाने मांडू शकतो. परंतु बिगर मार्क्सवादी पुरोगाम्यांनी काय केले पाहिजे हे फक्त सुचवू शकतो. पहिली गोष्ट मार्क्सवाद्यांबद्दलच्या सर्व पूर्वग्रहांतून त्यांनी मुक्त व्हायला हवे. सर्व पुरोगामी आपण भांडवलशाहीत जगत आहोत हे मानतातच. मग आजची भांडवलशाही समजून घेत असताना सर्व पुरोगाम्यांच्या अंतर्गत विचारसरणीतून सकारात्मक काय काय घेता येईल हे त्यांचे त्यांनी ठरवायला हवे. त्यासाठी आपली विचारसरणी सोडायची आवश्यकता नाही. आपल्या विचारसरणीशी प्रामाणिक राहून इतर पुरोगामी विचारांच्या खिडक्या उघडल्या तर त्यातून येणारे विचारांचे वारे आपण अंगावर झेलायला त्यांनी घाबरता कामा नये. त्या विचारप्रणालीतील शुद्ध हवेचा शास घ्यायची मनाची तयारी ठेवायला हवी.
शेवटी एकच सांगायचे आहे. सर्व पुरोगाम्यांनो एक व्हा. परस्परांशी संवाद साधा. सामंजस्य दाखवा. सहिष्णुता दाखवा. लोकशाहीचा सूर्य आणि समतेचा चंद्र तुच्याशी हातमिळवणी करेल. कारण तुच्या बरोबर जो समाज आहे, त्याला लोकशाहीच्या सूर्याची आणि समतेच्या चंद्राशी हातमिळवणी करण्याची, त्याच्या जगण्यासाठीची ती अपरिहार्य अशी मूलप्रेरणात्मक गरज आहे.
सी ३५ ए. अनंत निवास, वीर सावरकर मार्ग, दादर, मुंबई २८.
भ्र.ध्व.: ९००४६१४५९४, इ-मेल – raj27k@ymail.com