संपादकीय विवेकवाद व्यापक करू या!

विवेकवाद व्यापक करू या!

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला एक महिना उलटून गेला. अद्याप त्यांच्या खुन्याबद्दल कोणताही महत्त्वाचा दुवा पोलिसांच्या हातात लागलेला नाही. ‘पोलिस तपास जोरात सुरू आहे’ ह्यापलीकडे शासन काहीही बोलायला तयार नाही. आतापर्यन्तच्या पोलिस तपासाचा निष्कर्ष – दाभोलकरांचा खून सुपारी देऊन करण्यात आला-एव्हढाच आहे. हे सांगायला पोलिस कशाला हवेत ? दाभोलकरांचे विरोधक स्वतः हातात पिस्तुल घेऊन त्यांचा भर रस्त्यात खून करणार नाहीत, तर कोणा गुंडाकरवी तसे घडवून आणतील हे येथील सर्वसामान्य माणसालाही कळते. एकूण दाभोलकरांचा खुनी सापडणार नाही ; सापडलाच तर त्यामागील मेंदू (व अर्थातच उद्देश) कधीच समोर येणार नाही अशा निष्कर्षाला येणे चुकीचे ठरणार नाही. ह्याहून वेगळे काही घडले तर त्याचे स्वागतच आहे.

ह्या विशेषांकामागील भूमिका समजून घेण्यापूर्वी गेल्या महिन्याभरात काय घडले त्याचा अर्थ लावणे आवश्यक आहे. दाभोलकरांची हत्या ही सर्व पुरोगाम्यांना लगावलेली सणसणीत चपराकच होती. देवाधर्मावर हल्ला न करता संयत ठामपणे विवेकवादी भूमिका मांडणारे दाभोलकरही आम्हाला चालणार नाहीत. किंबहुना हिंदू धर्माच्या आम्ही करीत असलेल्या संकुचित व्याख्येपलीकडे कोणी विचार मांडत असेल तर ते आम्ही चालवून घेणार नाही असा इशाराच ह्या खुनातून देण्यात आला होता. ह्याविषयी आम्ही मागच्या अंकाच्या संपादकीयात लिहिले होते. दाभोलकरांच्या खुनाबद्दल कोणी काय प्रतिक्रिया दिली हे पाहिले तर महाराष्ट्राच्या वैचारिक विशाची उभी फाळणी झाल्याचे दिसून येते. माओवादी ते सर्वोदयी अशा सर्व छटांचे पुरोगामी एकीकडे व अन्य दुसरीकडे असे हे चित्र आहे. बाबरी मशीद पडल्यानंतर पहिल्यांदाच प्रतिकूल वास्तवाच्या प्रखरतेचे भान येऊन महाराष्ट्रातील पुरोगामी जागे झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. कदाचित, दाभोलकरांनंतर पुढचा क्रमांक आपलाही असू शकतो ही जाणीव त्यांना प्रकर्षाने झाली असावी. फुले-शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी वारशाच्या वल्गना आता महाराष्ट्राला करता येणार नाहीत, हेही ह्या निमित्ताने स्पष्ट झाले. एरवी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कोणत्याही मुद्द्यावर धर्मांध शक्तींनी ‘धार्मिक भावना दुखावल्याची’ आवई उठवून दहशतीचे वातावरण निर्माण करून सर्व सामाजिक-सांस्कृतिक अवकाश व्यापून टाकावा व उरलेल्यांनी हतबुद्ध होऊन गप्प राहावे असेच प्रातिनिधिक चित्र महाराष्ट्रात गेली अनेक वर्षे दिसत होते. ह्यात हस्तक्षेप करून कोणी येथील स्मशानशांतता भंग करू शकणार नाही अशी हतबलतेची भावना विवेकवाद्यांच्या अकर्मण्यते ळे निर्माण झाली होती. दाभोलकर हत्येच्या निमित्ताने त्याला छेद गेला. म्हणूनच महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यातून ह्या घटनेचे पडसाद उमटले. आंबेडकरवादी , गांधीवादी, सर्व छटांचे मार्क्सवादी व समाजवादी तसेच लिबरल मंडळी निषेध कार्यक्रमात उस्फूर्तपणे सहभागी झाली. सर्वसामान्य माणसालाही ह्या हत्येळे धक्का बसल्याचे जाणवले. ह्याउलट हिंदुत्ववादी मंडळी त्यामुळे बचावात्मक भूमिकेत गेली. शिवसेना-भाजपने ह्या कृत्याचा निषेध केला, पण तेवढेच. आमचे दाभोलकरांशी मतभेद होते, पण आम्ही त्यांच्या खुनाचे समर्थन करीत नाही ही त्यांची भूमिका होती. परंतु स्वतःला धर्माचे कैवारी म्हणविणाऱ्यांपैकी कोणीही दाभोलकर हे महत्त्वाचे सामाजिक काम करीत होते व त्यांचा खून हा समाज-प्रबोधनाच्या, हिंदू धर्मासह सर्व धर्मांच्या उन्नयनाच्या कामातील प्रतिरोध आहे असे मांडले नाही, हे आपण लक्षात घ्यायला हवे. त्यापलीकडे जाऊन सनातन धर्म व हिंदू जागृती समिती ह्यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसते. सनातन संस्थेचे प्रमुख दाभोलकरांच्या मृत्यूबद्दल ‘प्रत्येकाला आपल्या कर्माचे फळ मिळते’ असे बोलले व संस्थेच्या वेबसाईटवर दाभोलकरांच्या प्रतिमेवर काट मारलेली दिसली अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. दाभोलकरांच्या मृत्यू ळे घडलेले वैचारिक ध्रुवीकरण, सर्व पुरोगामी संघटनां ध्ये आलेली सक्रियता व समाजाच्या सर्व थरातून झालेला झालेला हत्येचा निषेध ह्या गोष्टी स्वागतार्ह आहेत, पण पुरेशा नाहीत. कारण ह्या सर्व तात्कालिक भावनिक प्रतिक्रिया आहेत. जनसामान्यातली सहानुभूती थोडा काळ टिकेल नंतर ही घटनाही विस्मृतीत जाईल.

वैचारिक आधार नसेल तर पुरोगाम्यामधले ऐक्य टिकणार नाही. प्रागतिक विचार करणाऱ्यामधील वैचारिक व मानसिक मतभेद व मनभेद हा अतिशय आवश्यक पण गुंतागुंतीचा विषय आहे. त्याचा उहापोह करण्यास अनेक व्यासपीठे आहेत. पण ‘आजचा सुधारक’च्या दृष्टीने विवेकवादावरील अस्तित्त्वाचे संकट हा कळीचा मुद्दा आहे. किंबहुना ते ह्या वैचारिक व्यासपीठाच्या अस्तित्वाचे प्रयोजनच आहे. म्हणूनच आम्ही दाभोलकरांच्या हत्येच्या पोर्शभूीवर आ.सु.चा ‘अंधश्रद्धा निर्मूलन: कायदा व व्यवहार’ विशेषांक काढण्याचे ठरविले.
ह्या संदर्भात आम्हाला खालील निरीक्षणे महत्त्वाची वाटतात:
१. दाभोलकरांच्या मृत्यूनंतर जनमानसात उसळलेला प्रक्षोभ शमला नव्हता तेव्हा, म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांत जादूटोणाविरोधी अध्यादेशाच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांना हिंदुत्ववादी संघटनातर्फे निवेदने देण्यात आली. म्हणजे प्रस्तावित कायद्याला संघटितरीत्या विरोध करण्याची प्रक्रियाही तेव्हाच सुरू झाली.
२. बंडातात्या कराडकर व अन्य मान्यवर वारकरी नेते गेली दोन वर्षे प्रस्तावित अंधश्रद्धाविरोधी विधेयकाला पाठिंबा देत आहेत. तरीही वारकऱ्यांचा त्याला विरोध असल्याचे चित्र माध्यमांद्वारे सातत्याने रंगविण्यात येत आहे. यासाठी ते निवेदन/आवाहन या अंकात मुद्दाम प्रसिद्ध करीत आहोत.
३. उजव्या पक्षाचे नेते अध्यादेशाच्या बाजूने जाहीर भूमिका घेत असले तरी ह्या विचारांचे गाव-वस्ती पातळीवरील कार्यकर्ते मात्र ‘हा अध्यादेश हिंदू धर्माच्या विरोधातले आहे’ असेच मानतात व सर्वसामान्य हिंदू जनतेला त्यात तथ्यही वाटते असे चित्र आजही कायम आहे. ते पुसण्यासाठी अंधश्रद्धा-निर्मूलन कार्यकर्त्यांना बरीच मेहनत करावी लागणार आहे.
४. जादूटोणाविरोधी कायद्याच्या समर्थनार्थ अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या दोन्ही संघटनाद्वारे वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येत आहेत. आजच्या परिस्थितीतही किमान काही कार्यक्रमांपुरते तरी आपण एकत्र यावे अशी प्रेरणा दोन्ही समूहांना झालेली नाही. कोणी त्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही दिसत नाही.
५. ‘अंधश्रद्धा’ ह्या विषयावर महाराष्ट्रात गेल्या शंभर वर्षांत बरीच चर्चा झाली आहे. ‘प्रत्येक श्रद्धा ही अंधश्रद्धा असते’ ह्यापासून तर ‘खऱ्या धर्मात अंधश्रद्धेला स्थान नाही’ ह्यापर्यंत मतमतांतरे आढळतात. परंतु गेल्या अनेक वर्षांत ह्या विषयावरील वैचारिक मंथन थंडावले आहे. प्रत्येक समूह आपापल्या वर्तुळात चर्चा करतो, किंबहुना आपापल्या भूमिकांवर ठाम राहून तिची उजळणीकरतो. ह्या हवाबंद कप्प्यांधून खुल्या विचाराचे, देवाण-घेवाणीचे मोकळे वारे वाहताना दिसत नाही. आज विवेकवाद व विवेकवादी कार्यकर्ता दोघांचे अस्तित्व धोक्यात आल्यावरही अशी गरज त्यांना भासू नये ही बाब खचितच चिंताजनक आहे.
६. मुख्य म्हणजे ज्या सामान्य माणसासाठी हे सारे करायचे त्याच्यापर्यंत अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार फारसा पोहचत नाही, पण परिवर्तनविरोधी विचार मात्र येथील वातावरणातच भिनला असल्याने तो अनेक धार्मिक-सांस्कृतिक- सामाजिक-राजकीय व्यासपीठांद्वारे लोकांपर्यंत पोहोचतो आहे. वारकरी परंपरेला संकुचित धर्माच्या विरोधात केलेल्या व्यापक बंडखोरीचा वारसा लाभला आहे. आज ही परंपरा परिवर्तनाभिमुख आहे की नाही ह्या विषयी मतभेद होऊ शकतात.

पण वारकरी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा राजकीय घटक आहे व त्यातील काहींनी सातत्याने अंधश्रद्धाविरोधी कायद्यास विरोध केला होता. अशा वेळी त्या समूहास आपली भूमिका पटवून देणे, त्याच्या मनातील गैरसमज दूर करणे महत्त्वाचे आहे असे ह्या कायद्याच्या समर्थकांना जाणवायला हवे व त्यानुसार कृतीही त्यांच्याकडून घडायला हवी. कायद्याचे विरोधक अनेक प्रकारे वारकऱ्यांचा बुद्धिभेद करताना दिसतात. पण त्यांचाशी संवाद साधण्याची प्रक्रिया कायद्याच्या समर्थकांच्या बाजूने घडताना दिसत नाही. महाराष्ट्र अंनिसची तर वेब साइटच इंग्रजीत आहे.

थोडक्यात म्हणजे अंधश्रद्धेला खरापाणी घालणाऱ्या शक्ती संघटित आहेत, त्यांची उद्दिष्टे स्पष्ट आहेत, ते सक्रिय आहेत, आक्रमक आहेत व समाजातील मोठ्या वर्गाचा त्यांना पाठिंबा आहे. ह्याउलट अंधश्रद्धेविरुद्ध लढणारे विविध कप्प्यात विभाजित आहेत, त्यांच्यात परस्पर संवाद नाही, काय करायचे ह्याविषयी संभ्र आहे व जनमानसाशी संवाद साधण्याची प्रेरणा व क्षमता त्यांच्यात दिसत नाही असे हे विदारक चित्र आहे. प्रस्तुत अंक ही वैचारिक कोंडी फोडण्यासाठी टाकलेले पहिले नम्र पाऊल आहे.

ह्या अंकाचे तीन विभाग आहेत.
पहिला विभाग आहे ‘कायदा.’ त्यात जादूटोणाविरोधी अधिनियम, त्याची अर्थउकल, गैरसमजांचे निराकरण, त्याच्या अंलबजावणीसाठी काय करता येईल, काय केले पाहिजे, पूर्वी मांडलेल्या अधिनियमातील गाळलेल्या तरतुदी ह्यांची चर्चा आहे.
दुसरा विभाग आहे ‘व्यवहार’. ह्यात अंधश्रद्धेचे मानसशास्त्रीय/समाजशास्त्रीय मूळ, आधुनिक अंधश्रद्धा, ग्रामीण भागातील अंधश्रद्धा, देव-धर्माच्या बाजारीकरणातून फोफावणाऱ्या अंधश्रद्धा ह्यांविषयक विमर्श आहे.
तिसरा विभाग आहे- ‘चिंतन’. ह्यात श्रद्धा-अंधश्रद्धा- धर्म-अध्यात्म ह्या परिघावरील मत-मतान्तराचा मागोवा घेण्यात आला आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन करणाऱ्या दोन्ही संघटनातील कार्यकर्ते, विचारक तसेच वारकरी संप्रदायातील विधेयकाचे समर्थक ह्या सर्वांनी ह्या अंकात लेखन केले आहे. किंबहुना त्यांच्या मांडणीतील ‘महत्तम साधारण विभाजक’ पहिल्यांदाच ह्या अंकाच्या रूपाने आ.सु.च्या वाचकांपर्यंत, किंबहना विवेकवादाविषयी आस्था असणाऱ्या सर्व मराठी वाचकांपर्यंत पोहचतो आहे, ह्याचे आम्हाला समाधान आहे.

दि. य. देशपांडेंच्या लेखांशातून विवेकवाद ही संकल्पना किती प्रगल्भ व व्यापक आहे, अंधश्रद्धा विरोध हे त्याचे केवळ अंग आहे हे भान जागे होईल. प्रस्तुत कायदा केवळ जादूटोणाविरोधी आहे,

प्रगल्भ व व्यापक आहे, अश्रद्धा विरोध हे त्याचे केवळ अग आहे हे भान जागे होइल. प्रस्तुत कायदा केवळ जादूटो अंधश्रद्धेची अनेक रूपे त्यात समाविष्ट झालेली नाहीत. किंबहना कितीही व्यापक अधिनियम मांडला तरी केवळ कायद्याद्वारे अंधश्रद्धा-निर्मलन होणे अशक्य आहे, कारण त्याची पाळेळे येथील आर्थिक-सामाजिक राजकीय संरचनेत, तसेच येथील माणसांच्या मानसिकतेत गुंतलेली आहेत. ही बाब डॉ. प्रदीप पाटकर व कॉ. विलास सोनवणे ह्यांच्या लेखांवरून स्पष्ट होईल. असे असले तरी ह्या कायद्याची अंलबजावणी होणे, त्यानिमित्ताने जनमानसाचे प्रबोधन होणे ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. ह्या प्रक्रियेत जेव्हढा राजकीय-सामाजिक अवकाश आपल्याला व्यापता येईल, तितकेच आपण विवेकवादाच्या दिशेने पुढे जाऊ. श्याम मानव, नरेंद्र दाभोलकर व सदानंद मोरे ह्या तिघांच्या भूमिका वाचकांसमोर आहेत. त्या वेगवेगळ्या आहेत, पण परस्पर-संवादाची संभावना घेऊन आहेत, हे आम्ही नम्रपणे सांगू इच्छितो. दिवस कसोटीचे आहेत, त्यात आपला सर्वांचा कस लागणार आहे, हे निश्चित. आतापर्यंत आपण सारेच आपापल्या भूमिकांच्या प्रेमात होतो. त्या सोडून द्याव्या, किंवा सर्वानी पॉप्युलिस्ट पद्धतीने राजकीय दृष्ट्या सोयीस्कर गोलमोल भूमिका घ्यावी असे आमचे म्हणणे नाही. पण बदलत्या काळाप्रमाणे विवेकवादाची संकल्पनाही प्रवाही असली पाहिजे. मुख्य म्हणजे विवेकवादी असणे कठीण असले तरी तो परग्रहावरील प्राणी, किंवा असामान्य गुणांनी युक्त मानव आहे ह्या भ्राचे निरसन आपण केले पाहिजे. नामदेव-तुकारामासारखे संत कित्येक शतकांपासून अंधश्रद्धेवर प्रहार करीत आहेत. त्यांच्यापासून ते थेट फुले आंबेडकर- गाडगे हाराजांपर्यंतची ओजस्वी परंपरा आपल्याला लाभली आहे. विवेकवाद व विवेकवादी ह्यांच्यावरील अस्तित्वाचे संकट दूर करायचे असेल तर विवेकवादाला व्यापक केलेच पहिजे. त्याची नाळ सर्व सामान्य माणसाशी बांधली पहिजे. हे आपण केले नाही तर येणारा काळ आपल्याला क्षमा करणार नाही.

अतिशय कमी कालावधीत हा अंक मला अभिप्रेत असलेल्या संकल्पनेनुसार संपन्न करण्याची परवानगी व स्वातंत्र्य दिल्याबद्दल मी आ.सु.चा आभारी आहे. ह्या अंकात लेखन सहकार्य करणाऱ्या सर्व लेखकांचे मनापासून आभार. घाईघाईत काढलेल्या ह्या अंकात ह्या चुका राहिल्या असतील, त्यांची जबाबदारी सर्वस्वी माझी आहे. ह्या अंकाद्वारे सुरू झालेली संवादाची प्रक्रिया सर्व संबंधित कार्यकर्ते, विचारक, नेते पुढे चालवतील अशी आशा आपण करावी काय ?

ravindrarp@gmail.com भ्र.ध्व. 9833346534.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.