ग्रामीण जीवनातील अंधश्रद्धा

मागील सोळा वर्षांपासून या चळवळीत काम करत असताना अंधश्रद्धा निर्माण होण्यामागे भीतीची भूमिका सातत्याने जाणवत राहिली आहे. थोडीशी भीती, शिकलेल्या व अज्ञानी माणसांना सारख्याच वेगाने अंधश्रद्धेच्या गर्तेत नेते. लहानपणापासून एक गोष्ट मनावर बिंबविली जाते की, ज्या ज्या गोष्टींची भीती समाजाने, कुटुंबाने दाखविली त्या गोष्टींची तपासणी करू नये. भीतिदायक आठवण कधीच नाहीशी होत नाही. ह्या लेखात भीतीच्या दुष्परिणामांची चर्चा करूया.
१) भांडणातील भूमिकाः जादूटोण्याच्या नावावर गोंदिया जिल्ह्यात मागील साडेतीन वर्षांच्या काळात १९ खून झालेले आहेत. त्या खून करणाऱ्या १९ केसेसपैकी १५ केसेसमधील आरोपींशी मी प्रत्यक्ष भेट घेतली, मुलाखत घेतली, चर्चा केली. यांपैकी कोणीही गुन्हेगारी पोर्शभूीचा नाही, गुन्हेगारी स्वरूपाच्या धंद्याशी संबंधित नाही. तरीही एकाएकी खुनासारख्या निघृण गुन्ह्यासाठी तो प्रवृत्त का झाला ? या प्रश्नावर सगळ्यांचे उत्तर एकच होते की, ‘ही जादूटोणा करणारी व्यक्ती जर जिवंत राहिली तर मला, माझ्या कुटुंबीयांना, जनावरांना धोकादायक ठरू शकते, जीव घेऊ शकतो. मुले अपंग होऊ शकतात. दुभत्या जनावरांचे दूध संपवू शकते, त्याऐवजी यालाच संपविले म्हणजे झाले.” या भावनेतून कथित जादूखोराला संपविले. जादूविद्या आहे की नाही? जादूखोराला जादू येते की नाही? याची चौकशीसुद्धा कोणीही केली नाही. २) भालीटोणा (ता.आमगाव) या गावात एका व्यक्तीची म्हैस मरण पावली व जादूच्या संशयावरून त्याने शेजारच्या वृद्ध इसमाचा व त्याच्या पत्नीचा खाटेच्या ठाव्याने डोक्यावर मारून खून केला. पोलिसांनी मारणाऱ्याला अटक केली व म्हशीचे पोस्टमार्टे केले तेव्हा म्हैस घटसर्पाने मरण पावल्याचे निष्पन्न झाले. मारणाऱ्याने सांगितले की, “जर हा म्हातारा जिवंत राहिला असता तर सगळ्यांनाच घातक ठरला असता.” बहुतेक सगळ्या जादूटोण्यातून होणाऱ्या खुनांचे हे प्रातिनिधिक उदाहरण आहे.
३) जवळच्या छत्तीसगड राज्यातील अंबिकापूर जिल्ह्यात असाच एक ‘सखी’ बनविण्याचा प्रकार त्याच काळात झाला. एक मुलगा असलेल्या महिलेने एका ठराविक डिझाईनची साडी घेऊन गावातील किंवा दुसऱ्या गावचा एक मुलगा असलेल्या महिलेला ती साडी ‘सखी’ बनवून सप्रे भेट द्यायची. साडी बनविणाऱ्या मिल मालकाच्या लाखो साड्या हातोहात विकल्या गेल्या. या घोटाळ्याची ना चौकशी झाली ना कुणावर आरोप.
४) भीतीने भूत लागले. देवरी तालुक्यातील बोरगाव ते टेकावंदर या रस्त्यावर एक युवक सायकलवरून मजेत चालला होता. रस्त्यात एका आंब्याच्या झाडाखाली एक म्हातारी उभी होती. तिने या युवकाला समोरच्या गावातसोडून देण्याची विनंती केली.या युवकाने तिला सायकलवर बसविले. म्हातारी रस्त्यात त्या युवकाशी बोलतही होती. एकाएकी काही अंतरानंतर या युवकाला आठविले की ते आंब्याचे झाड भुतासाठी प्रसिद्ध आहे. ही म्हातारी भूत तर नसेल? युवकाने ताबडतोब म्हातारीला खाली पाडले. भूतबाधा होऊ नये म्हणून तिला दोन लाथा मारल्या व नंतर पूर्ण वेगाने आपल्या गावाला पोहोचला. थोड्या वेळानंतर या युवकाच्या अंगात भूत येणे सुरू झाले. पुढचे १० दिवस हा युवक कथित भूतबाधेने त्रस्त होता. नंतर ठीक झाल्यावर पुन्हा कामावर जायला निघाला तर पुढच्याच गावात शेतात काम करणारी तीच म्हातारी दिसली. म्हातारीनेही याला ओळखले व हातातील काठीने तीन-चार तडाखे व शिव्या दिल्या. मार खातानाही तो युवक मात्र हसत होता. भुताला सायकलवर बसवून नेण्याच्या दडपणातून तो आता मुक्त झाला होता. मधले दहा दिवस मात्र त्याने मानसिक विकृतावस्थेत घालविले.
५) खोडशिवनी येथे शारीरिक कमजोरीवर इलाज करण्यासाठी मोतीराम बाबाच्या एका महिला भक्ताला बाबाने व्रत सांगितले. व्रताचा कालावधी संपण्याच्या आत महिलेची मासिक पाळी आली. मासिक पाळी आल्याने बाबाचे व्रत अधुरे राहिल्याच्या धास्तीने महिलेत ‘भूत’ येणे सुरू झाले. भुताने नाव सांगितल्यावरून बाबाच्याच दोन भक्तांची महिलेच्या नातेवाईकाने पिटाई केली. २१ नोव्हेंबर २००९ ला गावकऱ्यांची बैठक घेऊन त्या महिलेची भीती दूर केली. भीती दूर झाल्यावर भूत गेले व भांडणही संपले.
सहारणवाणी येथील एक ३५ वर्षी महिलेला एकदा चक्कर आली व ती बेशुद्ध होती. बेशुद्धी जादूटोण्यामुळे झाली. या आजूबाजूच्या महिलेच्या सूचनेचा परिणाम असा झाला की या बाईला स्वतःच्या शरीरात वेगवेगळे आत्मे येत आहेत असे वाटणे सुरू झाले. फाशी घेऊन गावातील मरण पावलेल्या एकाचा आत्मा आपल्या शरीरात आल्याचा भास होताच तिच्या गळ्यातून वेगवेगळे आवाज निघत व जीभ बाहेर येई. पोटात मूल फिरत असल्याचा भास होई. हातपाय थंड पडत. भूत येऊन छेडखानी करतात, शरीरसंबंध ठेवतात अशी तक्रार त्या महिलेने केली. वर्षभर हे सगळे प्रकार चालले. भूत लावले म्हणून या महिलेने व तिच्या मुलीने एकाची पिटाईसुद्धा केली. तिच्या शरीरात होणारे बदल भीतीमुळे शारीरिक संबंध बंद झाल्यामुळे होत असल्याचे तिला समजावून सांगितल्यावर हे सगळे प्रकार पूर्णपणे थांबले. (अ.भा.अं.नि.स. प्रबोधन स्मरणिका २०१० मधून)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.