मार्क्सवाद आणि संस्कृती

मार्क्सवाद म्हणजे खरे तर शास्त्रीय समाजवाद. त्याचा आणि संस्कृतीचा घनिष्ठ संबंध आहे. मार्क्सने माणसाची व्याख्याच स्वतःला आणि जगाला निर्माण करणारा, अशी केली आहे. निर्मिती ही सर्जनशील गोष्ट आहे. त्यामुळे मार्क्सवादात किंवा शास्त्रीय समाजवादात माणूस सर्जनशील आहे हे गृहीतकच आहे. दि. के. बेडेकर म्हणतात, माणूस हा केवळ समाज-क्रांतिकारक किंवा तर्कशास्त्र- निर्माता नाही तर तो दिव्यकथा-निर्माता, प्रतीक-निर्माताही आहे. नंतरच्या मार्क्सवादयांनी मात्र या दोन पैलूंकडे दुर्लक्ष केले. म्हणून युरोपातला मार्क्सवाद जडवादासारखा झाला. मुळात मार्क्सचे तत्त्वज्ञान माणसातील चैतन्यालाच आवाहन करते. यातून हे स्पष्ट होते, की मार्क्सवाद किंवा शास्त्रीय समाजवाद हा मानुषकेंद्री अध्यात्माशी सुसंगत आहे. मार्क्सवादी संस्कृतीचा परिप्रेक्ष्य मानुषकेंद्री अध्यात्म हा आहे. त्यात धर्मश्रद्धा नाही, मात्र धर्मप्राय श्रद्धेलाच एक पैस आहे. तेव्हा अध्यात्म आणि श्रद्धा ही प्रतिगाम्यांची मक्तेदारी नाही. त्यातील मानुषता आणि मनुष्यकेंद्रित्व हे मार्क्सवाद्यांनी मांडलेले आहे. काहीनी ते प्रकटपणे मांडले आहे, तर काहींनी अप्रकटपणे. मानवी संस्कृतीचा एक महत्त्वाचा पैलू असलेल्या अध्यात्म आणि श्रद्धा यांसंबंधी मार्क्सवाद्यांचे ठोस विचार आहेत. ते अतिमानवी किंवा अतींद्रिय नाहीत, तर मानवी आणि इंद्रियसंवेद्य आहेत. हे मार्क्सवादाने मानवी संस्कृतीला दिलेले योगदान आहे.

दि.के. बेडेकर म्हणतात, की धर्म, तत्त्वज्ञान, कला, विज्ञान हे माणसाचे मूलभूत आविष्कार आहेत. मार्क्स तर धर्माला दडपलेल्यांचा हुंकार व हृदयशून्य जगाचे हृदय म्हणतो. तर तत्त्वज्ञानाला एक वेगळेच परिमाण देतो. तत्त्वज्ञानाचा मूळ प्रश्न ‘मी कोण ?’ हा आहे. ते बदलून मार्क्स तो ‘मी कोणाचा/कोणाची?’ असा करतो आणि तत्त्वज्ञानाला गूढ, आधिभौतिक कल्पनारम्य अश्या संकल्पनांतून बाहेर काढून, त्याला माणसाच्या हाताला लागणारा भौतिक पाया देतो. मग प्रत्येक व्यक्तीला मार्क्स, आपण कोणत्या समाजविभागाच्या बाजूने उभे आहोत असा प्रश्न स्वतःला विचारायला भाग पाडतो. कलेच्या बाबतीत बोलायचे तर, कलेच्या सर्व प्रकारांबद्दल शास्त्रीय समाजवादाला काही म्हणायचे आहे. शास्त्रीय समाजवादाचा भर या सर्व कलांना बाजारमुक्त करून लोकाभिमुख करण्यावर आहे. त्याचबरोबर त्या-त्या प्रकारातील मानुष सर्जनशीलतेला वृद्धिंगत करण्याचे आहे. म्हणून शास्त्रीय समाजवाद, शुद्धकला, उपयोजित कला, प्रायोगिक कला (नाटक सिने ), शास्त्रीय संगीत, शास्त्रीय नृत्य, लोकसंगीत, लोकनृत्य, तसेच सर्व शैलींच्या चित्रकला, शिल्पकला ह्यांना, त्यांच्या क्रयवस्तूपणातून मुक्त करण्याचा प्रयत्न करत असतो. तेच त्याचे प्रेयस असते. जी गोष्ट कलेची तीच ललित साहित्याची. ललित साहित्य मुक्त सर्जनशील करणे व त्याचवेळी त्यात सामाजिक बांधिलकीचा अंतर्भाव असणे हे शास्त्रीय समाजवादाच्या कलास्वरूपशास्त्राला अभिप्रेत आहे.

आता आपण विज्ञानाकडे वळू. विज्ञानासंबंधीसुद्धा शास्त्रीय समाजवादाचा एक दृष्टिकोन आहे. अणूचा किंवा अणु-ऊर्जेचा शोध हे मानवमुक्तीकडे नेणारे संशोधन आहे. पण अणुबॉम्बचा शोध हा मानवसंहार करण्याचा शोध आहे. तसेच कृत्रिम अवयवारोपण करणे आणि माणसाला जगविणे हे मानवी आहे. तर मानवी क्लोन तयार करणे हा मनुष्यजातीला कलंक आहे. त्यामुळे शास्त्रीय समाजवाद विज्ञानाविषयी भूमिकाशून्य असू शकत नाही, तर विज्ञानाच्या सर्व शाखा या मानवाची मुक्ती व त्याची उन्नती यासाठी कटिबद्ध व्हाव्यात अशी शास्त्रीय समाजवादाची भूमिका आहे. आता आपण अधिक मूलभूत मुद्द्याकडे वळू. माणसाच्या प्राथमिक गरजा अन्न, वस्त्र, निवारा अशा आहेत. या मूलभूत गरजांधूनच माणूस आणि इतर प्राणी यांतील मूलभूत फरक स्पष्ट होतो. तो असा की, इतर प्राणी निसर्ग जशाचा तसा स्वीकारतात. याउलट माणूस निसर्गावर संस्कार करतो. इतर प्राणी जे उपलब्ध आहे ते खातात. माणूस अन्न शिजवून खातो. इतर प्राणी घरटी व गुहां ध्ये राहतात. माणसाचा महालच काय झोपडीसुद्धा, या घरटी किंवा गुहांपेक्षा वेगळी असते. अगदी रस्त्यावर राहाणारी माणसेसुद्धा जो आडोसा करतात, किंवा लमाणांचे तांडे जे तंबू ठोकतात. तसे इतर प्राणी करूच शकत नाहीत. हाच माणूस आणि इतर प्राणी ह्यांच्यामधला भेद आहे. ज्याला संस्कृती, संस्कृती असे म्हणतात, तिचे दर्शन माणूस आपल्या प्राथमिक गरजांच्या पूर्तीतूनही दाखवून देत असतो. लैंगिकता ही माणूस आणि इतर प्राण्यां धील मूलभूत प्रेरणा आहे, पण तिचा आविष्कारही प्रत्येक ठिकाणी वेगळा आहे. माणसामध्ये दीर्घकालीन पालकत्व आहे. तसेच विवाह आणि कुटुंबसंस्था आहे.

कुटुंबसंस्था आणि शासनसंस्था यांचा विलय होणे शास्त्रीय समाजवादाला अभिप्रेत असले तरी त्यांच्या जागी स्त्रीपुरुषांधील खरे मानुष नाते प्रस्थापित करणे, त्यांचा लैंगिक व्यवहार मानवी समतेच्या सौंदर्याने परिपूर्ण करणे, पालकत्वाचा सामाजिक परीघ वाढवत नेणे व त्याचबरोबर सामूहिक व स्वतःचे शासन मनुष्यसमाजाच्या मुक्तपणे अंगवळणी पाडणे हे शास्त्रीय समाजवादाचे वास्तव स्वप्न आहे. यात हिंसेला व बलात्काराला अजिबात स्थान नाही. या अमानुष आहेत. शांती व सर्व स्त्रीपुरुषांधील परस्पर संतीचे नाते हेच मानुष आहे. तसेच कुठलेच संबंध हे उतरंडीवर आधारलेले असता कामा नयेत. अर्थात हे सर्व मांडायला माणसाला भाषेची आवश्यकता असते. माणूस आणि प्राणी यांतील महत्त्वाचा फरक म्हणजे इतर प्राणी एकमेकांशी ध्वनीतून संवाद साधतात तर माणसाला संवाद साधण्यासाठी भाषा लागते. खरे पाहता जगात जेवढे समूह आहेत तेवढ्या भाषा आहेत. बोलीभाषा आणि प्रमाण भाषा असे काही नसतेच. सर्व भाषाच आहेत. आणि सर्व भाषां ध्ये ज्ञानभाषा होण्याचे सामर्थ्य आहे. ते सामर्थ्य माणसाने मिळवणे म्हणजे भाषेला, संस्कृतीला वरच्या स्तरावर नेणे आहे. हेच करणे मार्क्सवादाला अपेक्षित आहे. एकाच भाषेची मक्तेदारी नष्ट करणे हे सुद्धा मानवी संस्कृतीचेच काम मार्क्सवाद मानतो.

एका मूलभूत बाबीचा उल्लेख करायलाच हवा. श्रम ही माणसाची प्राथमिक गरज आहे, तशीच ती सामाजिक आवश्यकता आहे. श्रमानेच जग निर्माण केले आहे. श्रमशक्ती विकायला लागणारी व्यवस्था ओलांडून श्रमऊर्जेचा आविष्कार करायला वाव देणाऱ्या संस्कृतीकडे नेणे हे समाजवादाचे संस्कृतीकरण आहे. प्रत्येक व्यक्तीला श्रम करण्याचा अधिकार आहे व तो एण्या व्यक्तीला मिळायलाच हवा. तो मिळवून देणे हे समाजवादी संस्कृतीचे काम आहे. त्याच वेळी व्यक्तीला शारीरिक व मानसिक उसंत मिळणे हेही तितकेच आवश्यक आहे. त्या आवश्यकतेची पूर्ती ही सांस्कृतिक जबाबदारीच आहे. भांडवलशाहीतील भांडवल हे मृत श्रम आहेत. समाजवादी संस्कृतीला जिवंत माणसांचे जिवंत श्रम हवे आहेत. असो. आता आपण सुखसोयींकडे वळू. सुखसोयी या मनुष्यनिर्मित आहेत. त्यात एकाच वेळी माणसांनी निर्माण केलेले अर्थशास्त्र आणि तंत्रज्ञान यांचा मेळ आपल्याला दिसून येतो. अर्थशास्त्राला समाजशास्त्राची एक शाखाच मानतात. पण सुखसोयीतून प्रकट होणारे तंत्रज्ञान हे सुद्धा मानवी आहे. त्याला मानव्याचा स्पर्श झाला आहे.

आता आपण चैन या गोष्टीचा विचार करू. आज जरी मूठभरांना चैन परवडत असली, तरी चैनीमध्ये अंतर्भूत असा एक मुबलकतेचा आशय आहे. ती मुबलकता सार्वजनिक व्हावी म्हणून तर शास्त्रीय समाजवाद झटत असतो. शास्त्रीय समाजवाद म्हणजे गरिबीचे वाटप नव्हे, तर मुबलकतेचे सार्वजनिकीकरण होय. मुबलकेतेचे सार्वजनिकीकरण हे संस्कृतीचे सर्वोच्च रूप आहे. ते माणसाने गाठावे म्हणून समाजवाद व टप्प्याटप्प्याने साम्यवादही आवश्यक आहे. साक्षरता, शिक्षण व सार्वजनिक आरोग्य ह्यांचाही विचार व समीक्षा समाजवादात केली आहे. समाज नुसता साक्षर होऊन चालत नाही तर तो सुशिक्षितही व्हायला हवा आणि संपूर्ण समाज तसा व्हायला हवा. मूठभर सुशिक्षित लोक आणि बहुसंख्यक अशिक्षित लोक ही शैक्षणिक विषमताच आहे. तेव्हा ही विषमता नष्ट करणे आणि शैक्षणिक समता प्रस्थापित करणे हे शास्त्रीय समाजवादाचे उद्दिष्ट आहे. जी गोष्ट शिक्षणाची, तीच आरोग्याची. निरोगी निरामय जीवन जगणे हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे आणि तो बजावता येणे, म्हणजेच शास्त्रीय समाजवादाची अं लबजावणी करणे होय. समानतेचा असा सर्वंकष विचार केल्यावर एक मुद्दा राहतो, तो म्हणजे लिंगभेदाचा. माणसातील लिंगभेद हा एकच असा भेद आहे, जो नष्ट करता येत नाही. तेव्हा स्त्रीपुरुषांतील समता ही माणसातील स्त्रीत्व आणि पुरुषत्व यातील भिन्नत्व स्वीकारूनही त्यांना समानतेचे मूल्य बहाल करून, स्त्रीपुरुषांनी एकत्रितपणे केलेला प्रवास हा शास्त्रीय समाजावादाने स्त्रीपुरुष समतेकडे केलेला प्रवास आहे. भांडवलशाहीने, भांडवली लोकशाहीने कितीही समतेचा पुरस्कार केला, तसे वर्तन करण्याचा प्रयत्न केला, तरी जिथपर्यंत पितृसत्ता आहे, स्त्रीचे बाजारीकरण आहे तिथपर्यंत खऱ्या अर्थाने स्त्रीपुरुष समता प्रस्थापित होणार नाही. मार्क्स म्हणतो, भांडवलशाही हाच एक मोठा वेश्यावसाय आहे. त्यातील वेश्यावसाय हा एक छोटा भाग आहे. मोठा भाग नष्ट केल्याशिवाय छोटा भाग नष्ट होऊ शकत नाही. ज्या व्यवस्थेत कुठल्याही माणसाला आपली श्रमशक्ती विकता विकता आपलीच क्रयवस्तू करावी लागते, त्या व्यवस्थेत खऱ्या अर्थाने समता व स्त्रीपुरुषसमता कशी प्रस्थापित होणार?

जी गोष्ट लिंगभेदाची, तीच थोड्या फार प्रमाणात जातिभेदाची, जमातभेदाची, वर्णभेदाची व वंशभेदाची, एवढेच नव्हे तर क्षमताभेदाचीही आहे. शास्त्रीय समाजवाद हा एक वैशिक दृष्टिकोण आहे. कारण त्याला केवळ वर्गभेद मिटवायचे नाहीत, तर जातजमातवाद, वर्णवाद, वंशवाद, क्षमतावाद यांच्या विरुद्धही लढायचे आहे. त्यांना नष्ट करायचे आहे. तसेच समलिंगी व अनिश्चितलिंगी व्यक्तींना संपूर्ण मानवी अधिकार प्रदान करायचे आहेत. ही कृती आर्थिक, राजकीय तर आहेच आहे. परंतु तेवढीच ती सांस्कृतिकही आहे. किंबहुना तिचा मूळ गाभा सांस्कृतिकच आहे. संस्कृतीचा थेट संबंध मानसिकतेशी असतो आणि क्रांती म्हणजे मानसिकतेची क्रांती होय.

अवरुद्ध क्रांती आणि निरंतर क्रांती या दोन्ही संकल्पना जरी देशांतर्गत आणि जागतिक स्तरावरच्या असल्या तरीही, आणि त्या आर्थिक-राजकीय असल्या तरीही, त्यात आर्थिक राजकीयतेबरोबर अविभाज्यपणे जोडला गेलेला सांस्कृतिक आशयही आहे. खरं म्हणजे क्रांती ही आमूलाग्र सांस्कृतिक परिवर्तनासाठी आवश्यक आहे.

ही आपोआप घडणारी गोष्ट नाही. यासाठी केवळ समतेची आस पुरेशी नाही. किवा केवळ आर्थिक राजकीय लढे पुरेसे नाहीत. कारण राज्यसत्ता बदलली, उत्पादनाची मालकीही बदलली, नवीन उत्पादनपद्धत आणली तरी मनात खोलवर रुजलेली विषमता नष्ट होणे तेवढे सोपे नाही. मानवी संस्कृतीचा इतिहास हा माणसानेच स्वीकारलेल्या उतरंडीचा इतिहास आहे. त्या उतरंडीची भौतिक कारणे नष्ट केली तरी जोपर्यंत सामाजिक सांस्कृतिक कारणे नष्ट होत नाहीत तोपर्यंत ती उतरंड वेगवेगळ्या रूपांत अवतरणार. कारण माणसाला सुरक्षिततेचे स्वातंत्र्याइतकेच मोल आहे. आणि जेव्हा जेव्हा माणूस समूह बनून स्वातंत्र्याचा प्रयोग करतो, मुक्तीचा प्रयोग करतो तेव्हा तेव्हा एका टप्प्यावर तो स्वतःला असुरक्षित मानू लागतो आणि या असुरक्षिततेतूनच नवनव्या विषमतेला जन्म देत राहतो. तेव्हा मानवी संस्कृतीने स्वातंत्र्याच्या मूल्याइतकाच सुरक्षिततेच्या मूल्याचा सांगोपांग विचार केला पाहिजे. स्वातंत्र्याइतकाच, मुक्ततेइतकाच सुरक्षितसाठीही लढा द्यायला हवा. पुढचे लढे हे स्वातंत्र्याइतकेच सुरक्षिततेसाठी होणार आहेत, याची नोंद घ्यायला हवी. तसे झाले तरच मानवी संस्कृती एक मोठी झेप घेईल आणि आकाशाला गवसणी घालेल. त्याचबरोबर सागराचा तळ गाठेल आणि आपल्या जमिनीशी नाळ घट्ट जोडून ठेवेल. हीच माणसाच्या ऐहिक सुखाची गोष्ट आहे.

३३५/ए, अनंत निवास, वीर सावरकर मार्ग, दादर, मुंबई ४०००२८.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.