रावणातोंडी रामायण

[ पाण्याचा पुरवठा व त्याचे वितरण ही आजच्या काळातील अतिशय गहन समस्या आहे. व ती अधिकाधिक तशी बनतेही आहे. आधुनिक विज्ञान, त्याचे उपयोजन करणारी अनेकविध तंत्रे, तज्ज्ञ शासकीय अधिकारी व त्यांनी पाण्याच्या समान वाटपासाठी तयार केलेल्या योजना इतक्या साऱ्या गोष्टी आपल्या हाताशी आहेत, परंतु ह्यामधून निष्पन्न काय होते आहे, तर एकीकडे दिवसेंदिवस कोरडे पडत जाणारे जलस्रोत, तर दुसरीकडे पाण्यावरून होणारी भांडणे. आणि वाढत जाणारी पाणीटंचाई.
सुप्रसिद्ध जलतज्ज्ञ अनुपम मिश्र ह्यांचे व्याख्यान ऐकण्याची मला गेल्या महिन्यात संधी मिळाली. राजस्थानच्या मरुभूमीतील जलस्रोतांचे जतन हा प्रामुख्याने त्यांच्या अभ्यासाचा विषय राहिलेला आहे. राजस्थान की रजत बूँदे आणि आज भी खरे हैं तालाब ह्या त्यांच्या दोन पुस्तकांमधून त्यांनी तो मांडला आहे. ह्या पुस्तकांच्या आजवर विभिन्न भाषांमधून एकूण काही लाख प्रती छापल्या गेल्या आहेत. अनुपमजींनी त्यांचा कॉपीराइट स्वतःकडे ठेवलेला नाही, हे येथे उल्लेखनीय आहे.
अनुपमजींशी चर्चा करीत असताना पाणीपुरवठा व समन्यायी वाटप ह्यांच्या संबंधात शासकीय योजना कितपत उपयोगी ठरू शकतात असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्याच्या उत्तरादाखल त्यांनी आपला एक लेख वाचायला दिला. ‘रावणातोंडी रामायण’ असे त्याचे नाव. हिंदीत अशा अर्थाची म्हण नसल्यामुळे मराठीतील म्हण त्यांनी शीर्षक म्हणून वापरली आहे. रावणाने रामायणकथा म्हणजे आपल्याच विनाशाची कथा आपल्याच तोंडाने सांगावी तद्वतच शासकीय योजना व आपल्या इतर कृतींमधून आपण पद्धतशीरपणे आपलाच विनाश ओढवून घेत आहोत असे त्यांनी ह्या लेखात म्हटले आहे. गेल्या पावसाळ्यात उत्तराखंडमधील केदारनाथला जे काही अस्मानी संकट आले. त्याच दिवशी योगायोगाने हे भाषण दिले गेले. जणु काही केदारनाथला येऊ घातलेल्या संकटाचा त्यांना दिल्लीत सुगावा लागला होता.
पृथ्वीवरील संसाधने टिकवण्याचे काम निसर्गाचे आहे व आपण (मानवाने) त्यात ढवळाढवळ करू नये. केली तर त्याची प्रकृती जाणून केवळ मदत करावी.
निसर्ग शतकानुशतके हे काम निरलसपणे करीत आहे. गरज आहे ती त्यातील प्रवाह बारकाईने जाणून घेण्याची. ते घेण्यासाठी अंगी नम्रता बाणली पाहिजे, हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख सूत्र आहे. अनुपम मिश्र ह्यांच्या विचारांचा व शैलीचा परिचय होण्यासाठी हे व्याख्यान अनुवादित करून देत आहे. निसर्गाला सर्व काही कळते. हजारो वर्षे तपश्चर्या किंवा जतन करून निसर्ग एखादी गोष्ट घडवून आणतो, ते तें उचित व आवश्यक असते, म्हणूनच निसर्ग असे घडवून आणतो असे जरी त्यामध्ये ध्वनित होत असले, तरी ते वाक्य पारलौकिक शक्ती आहे असे त्यांना म्हणायचे नाही, कृपया वाचकांनी तसा अर्थ काढू नये. गंगा आणि यमुना ह्यांची पात्रे अलाहाबाद येथे एकमेकांशी मिळतात. कृतज्ञ समाज त्या जागेला तीर्थ म्हणतो, असे ते जे म्हणतात, त्यातून, कृतज्ञता व नम्रता हे मानवाचे सहज गुण आहेत व ते प्रत्येकाने अंगी बाणवले पाहिजेत एवढेच त्यांना सांगायचे असते. तसेच, भारतातील प्राचीन ज्ञानपरंपरांचे जतन अथवा त्यांचा त्याग करताना सरसकटपणे न करता तारतम्याने करावा, असेही ते सुचवितात.
मी अनुवादामध्ये निसर्ग ह्या पुल्लिंगी शब्दाऐवजी प्रकृति ह्या मूळ हिंदीतील स्त्रीलिंगी शब्दाचाच जाणीवपूर्वक प्रयोग केला आहे, तो सृजन हा स्त्रीचा गुणधर्म आहे म्हणून.
कार्य. संपादक ]
ह्या दोन अगदी वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रकृतीचे कॅलेंडर आणि आपल्या घरात भिंतीवर टांगलेले कालनिर्णय किंवा पंचांग. आपल्या घरातील कॅलेंडरची पाने वर्षातून बारा वेळा उलटली जातात. प्राकृतिक कॅलेंडरची पाने मात्र हजार नाही, लाख करोड वर्षांत एखादेच पान पलटते. म्हणूनच, हिमालय, उत्तराखंड, गंगा, नर्मदा इत्यादींच्या गोष्टी करताना आपल्याला प्राकृतिक कॅलेंडरचा कधीही विसर पडता कामा नये. दुसरीकडे, करोडो वर्षांचे हे कॅलेंडर लक्षात ठेवताना आपण आजचे आपले कर्तव्यही विसरता कामा नये. तेही लक्षात ठेवावेच लागते. आणि त्या हिशोबाने काम करावे लागते. पण मेंदू स्वच्छ नसताना काम कसे होणार ?
गंगा गढूळ झाली आहे. तिला स्वच्छ करायचे आहे. तिच्या स्वच्छतेच्या अनेक योजना पूर्वीही झाल्या आहेत. अशा योजनांमध्ये काही अब्ज रुपयांचा चुराडा झाला आहे. त्याचा कोणताही चांगला परिणाम पहायला मिळालेला नाही. आता पुन्हा भावनेच्या आहारी जाऊन तसे काही काम न करणेच इष्ट ठरेल.
आपली मुले मग ते मुलगे असोत वा मुली – वाईट असू शकतात. कुपुत्र वा कुपुत्री पण असू शकतात. पण आपल्याकडे नेहमीच असे मानले गेले आहे की माता ही कधीही कुमाता नसते. आता जरा असा विचार करू या, की ज्या गंगामाईची मुले तिला स्वच्छ करण्यासाठी तीस-चाळीस वर्षे घालवतात, तरीही ती स्वच्छ का होत नाही? काय इतकी हट्टी आहे आमची ही आई ?
सरकारने तर आता गंगेला राष्ट्रीय दर्जाही देऊन टाकलेला आहे. साधु- संतांचा गट, प्रत्येक राजकीय पक्ष, शास्त्रज्ञांचा गट, गंगा प्राधिकरण, इतकेच काय तर जागतिक बँकेसारखी अतिप्रचंड संस्था सगळेच्या सगळेच तन-मन-धन अर्पून गंगा स्वच्छ करायला निघाले आहेत. आणि ही अशी, की स्वच्छच व्हायला तयार नाही. ह्या गुंत्याला जरा शांतपणे विचार करून समजून घ्यावे लागेल.
चांगला असो वा वाईट, प्रत्येक युगात एक नवा विचार समोर येत असतो. त्याचाच झेंडा सगळीकडे फडकत राहतो. त्या रंगाची अशी काही जादू असते, की तो अन्य कोणत्याही रंगावर चढतो. तिरंगा, दुरंगा, लाल, भगवा सगळे झेंडे त्याला नमस्कार करतात आणि त्याचेच गाणे गातात. त्या युगातले सर्व प्रभावी लोक व अडाणी लोकही, एक बळकट विचार मानून त्याचाच अंगीकार करतात.
काही समजून उमजून, तर काही न समजता. तर तात्पर्य हे, की गेल्या साठ-सत्तर वर्षांपासूनच्या आजच्या ह्या युगाला, विकासाचे युग असे म्हणण्यात आले. ह्या युगात सर्वांनाच आपला देश मागासलेला वाटू लागला. जो तो, संपूर्ण निष्ठा वाहून ह्या देशाचा विकास करून देऊ इच्छितो ‘विकासपुरुष’ सारखी विशेषणे, कोणा एकाच नाही तर सर्वच पक्षांना आवडतात.
आता परत गंगेकडे येऊ या. पौराणिक कथा आणि भौगोलिक तथ्य हे दोन्ही असेच सांगतात की गंगा ही अपौरुषेय आहे. तिला कोणी एका पुरुषाने नाही बनविले. अनेक संयोगांतून, अनेक घटितांतून गंगेचे अवतरण झाले. भूगोल, भूगर्भशास्त्र असे म्हणते की गंगेचा जन्म हिमालयाच्या जन्माशी जुळलेला आहे. म्हणजे सुमारे दोन करोड तीस लाख वर्षे जुन्या घटिताशी. आता पुन्हा एकदा आपल्या भिंतींवर टांगलेल्या कॅलेंडरकडे पहा. त्याच्यात आता कुठे जेमतेम 2013 वर्षे उलटली आहेत.
परंतु हिमालय प्रसंगात आपण आता ह्या मोठ्या कालखंडाला विसरून जाऊ.
सध्या आपण एवढेच लक्षात ठेवू की निसर्गाने गंगेला सदानीरा बनविण्यासाठी फक्त आपल्या एका प्रकाराशी – पावसाशी नाही जोडले. पाऊस तर वर्षातील फक्त चार महिनेच असतो. उरलेल्या आठ महिन्यांमध्ये हिच्यात सतत पाणी कसे टिकून राहील ह्यासाठी निसर्गाने आपल्या उदारतेचे आणखी एक रूप गंगेला दिले आहे, ते त्या नदीचा संयोग हिमनगाशी करवून. त्यासाठी त्याने पाणी आणि बर्फ ह्यांचे मीलन घडवून आणले. घनरूपाचे द्रवरूपाशी मीलन. निसर्गाने गंगोत्री व गौमुख इतक्या उंच शिखरावर ठेवले आहे, की जिथले बर्फ कधी वितळून समाप्त होत नाही. पावसाळा संपल्यानंतर हिम आणि बर्फ ह्यांचा एक विशाल भाग हळूहळू वितळत वितळत गंगेच्या प्रवाहाला अखंड वाहता ठेवतो.
….तर आमच्या समाजाने गंगेला आई मानले आणि आमच्या अनेक पिढ्यांनी संस्कृतपासून तर भोजपुरीपर्यंत अनेक भाषांमध्ये तऱ्हेतऱ्हेचे गंगेवरचे श्लोक, मंत्र, गीते व इतर साधे सहजसुंदर साहित्य रचून, तिच्या रक्षणासाठी आपला धर्म राबवला. ह्या धर्माने आपल्या सनातन धर्मापेक्षाही जुना असा आणखी एक ‘धर्म’ असल्याची जाणीव बाळगली. तो म्हणजे नदी धर्म नदी आपल्या उगमापासून तर मुखापर्यंत एका धर्माचे पालन करते. एका रस्त्याचे, एका घाटीचे, एका वाहण्याचे अनुसरण करते. आपण आजवर ह्या नदीधर्माला वेगळे म्हणून ओळखले नव्हते, कारण आजवर आपली परंपरा, त्या नदीधर्माशी आपला धर्म जोडण्याचीच होती.
परंतु त्यानंतर, कोणजाणे काळाच्या ओघात केव्हातरी, विकास नावाच्या एका नव्या धर्माचा झेंडा सगळ्याच्या वर फडकू लागला. ह्या झेंड्याखाली सर्वच नद्यांवर बांध बनू लागले. एका नदीप्रवाहातील पाणी त्या नदीधर्माची सारी शिस्त मोडून दुसऱ्या नदीपात्रात सोडण्याच्या मोठमोठ्या योजनांबद्दल, वेगवेगळ्या विचारांच्या राजकीय पक्षांमध्येही कमालीची एकजूट दिसून येते. अनेक राज्यांमधून वाहणारी भागीरथी, गंगा, नर्मदा ह्या विकासाच्या झेंड्याखाली येताच ‘आई’च्या भूमिकेतून उडी मारून अचानक कुठल्या ना कुठल्या राज्याची जीवनरेखा बनून जाते. आणि मग त्या त्या राज्यात बनणाऱ्या बंधाऱ्यांवरून तेथे इतका काही तणाव वाढतो. की काही संवाद किंवा सुदृढतेने चर्चा होऊच शकत नाही. दोन राज्यांमध्ये एकच पक्ष सत्तेवर असला तरी पाण्याच्या वाटपातून असे काही तंटे निर्माण होतात की महाभारतही त्यांच्यापुढे थिटे पडावे. सगळे मोठे लोक, सत्तेत येणारा प्रत्येक पक्ष, प्रत्येक नेतृत्व आज जणु काही ह्या धरणांनीच बांधला गेला आहे.
नदी जोडणे हे प्रत्येकाला एक आवश्यक काम वाटते. सर्व लहानमोठे पक्ष, सर्व न्याययंत्रणा, प्रसारमाध्यमे – सर्वजण अशा प्रकारच्या योजनांनाच सर्व समस्यांचे उत्तर मानू लागतात. त्यामध्ये त्यांना ह्या गोष्टीचा विसर पडतो की गरज पडल्यानंतर निसर्गच नद्यांची जोडणी करून देतो. त्यासाठी तो कोणालाही ह्या कामाचे कंत्राट देत नाही. मात्र काही हजार लक्ष वर्षे तपश्चर्या मात्र करतो. त्यानंतर कुठे गंगा व यमुना ह्यांचा अलाहाबादेत संगम होतो. कृतज्ञ समाज त्या जागेला तीर्थस्थान मानतो. अशाच रीतीने तो नदीच्या मुखाजवळ तिला अनेक प्रवाहांमध्ये विभाजितही करतो. तिच्या प्रवाहाची अशी मोडतोड केल्याशिवाय नदीचे सागराशी मीलन होऊ शकत नाही. तात्पर्य हे की नदीला तोडणे वा जोडणे हे प्रकृतीचे काम आहे. आपण ते न केलेलेच बरे. केल्यास पुढे पश्चात्तापाचीही वेळ येऊ शकेल.
आज काय होते आहे ? नदीतून स्वच्छ पाणी जागोजाग धरणे, कालवे काढून उपसले जात आहे. सिंचन, वीजनिर्मिती व उद्योग चालविण्यासाठी. थोडक्यात सांगायचे तर ‘विकासा’साठी. त्यातून जगले-वाचलेले पाणी वेगाने वाढणाऱ्या शहरांकडे व राजधान्यांकडे, मोठमोठ्या पाइपलायनी टाकून चोरूनही नेले जाते.
आपल्याला हे विसरून चालणार नाही की, तीस-चाळीस वर्षांपूर्वीपर्यंत ह्या सर्व शहरांमध्ये अगणित लहान-मोठे तलाव असत. ते चारमाही वर्षाऋतूला आपल्यामध्ये सामावून घेत. शहरी भागातील पुराला आळा घालत. हे पातळी उंचावलेले भूगर्भजल मग येणाऱ्या आठ महिन्यांमध्ये शहराची तहान भागवीत असे. आता ह्या सर्व तलावांमध्ये भराव घालून त्यांचे जमिनीत रूपांतर करण्यात आले आहे. त्या जमिनीचे भाव आता गगनाला भिडले आहेत. म्हणूनच बिल्डर- नेता-अधिकारी सारे मिळून देशातील सारे तलाव मिटवून टाकत आहेत. महाराष्ट्रात नुकताच पन्नास वर्षांतील सर्वांत मोठा दुष्काळ पडून गेला. आणि आता त्याच महाराष्ट्रातील पुण्या-मुंबईत पावसाळ्यातील एका दिवसाच्या पावसातच पूर येऊन गेला.
इंद्राचे एक जुने, सुंदर नाव आहे पुरंदर. त्याचा अर्थ आहे नगरांना, किल्ल्यांना, शहरांना तोडणारा. आमच्या शहरांना जर इंद्राशी मैत्री करून त्याचे पाणी तोडणे जमत नसेल, तर ते पाणी पुराचे रूप घेऊन त्यांना नष्ट करेलच आणि ते पाणी वाहून गेले, तर उन्हाळ्यात दुष्काळ हा पडणारच. ही परिस्थिती केवळ आमच्याच नाही, तर सर्वच देशांमध्ये आली आहे. थायलंडची राजधानी दोन वर्षांपूर्वी सहा महिनेपर्यंत पुरातच बुडाली होती. ह्या वर्षी पहिल्याच पावसात दिल्लीच्या विमानतळावरील ‘आगमन’ क्षेत्रात पावसाच्या पाण्याचे ‘आगमन झाले.
तर आता पुन्हा गंगेकडे वळू. काही दिवसांपासून उत्तराखंडमधील गंगेच्या पुराच्या टीव्हीवर चाललेल्या बातम्यांची पुन्हा एकदा आठवण करू या. नदीचा धर्म विसरून आपण आपल्या अहंकाराचे प्रदर्शन करण्यासाठी तऱ्हेतऱ्हेची बेढब देवळे बांधली, धर्मशाळा बांधल्या. हे करताना नदीचा धर्म विचारात न घेतल्यामुळे तिच्या पुराने केवळ मूर्तीच नाही, सर्वकाही आपल्याबरोबर वाहून नेले.
आपण सध्या काय करतो आहे? विकासाच्या नावाखाली नदीचे सारे पाणी काढून घेत आहोत. जमिनीच्या किंमतीच्या नावावर तलाव मिटवीत आहोत आणि त्यानंतर शहरातली असो वा शेताडीतली असो सारी घाण, विष नदीतच पुन्हा मिसळत आहोत. त्याच्यानंतर आपण असाही विचार करतो, की आता कोणतीतरी नवी योजना बनवून नदी साफ करून घेऊ या. आता नदीच नाही उरली तर साफ तरी कशाला करणार? तिच्या नावाने वाहणाऱ्या घाणेरड्या नाल्याला ? गुजरातेतील भरूचमध्ये जाऊन बघा जरा तिथल्या रासायनिक उद्योगांनी विकासाच्या नावाखाली नर्मदामैय्याचे कसे वाटोळे केले आहे ते बघा.
अशा रीतीने काय नद्या स्वच्छ होणार आहेत? असे काही करायला गेलो तर प्रत्येक वेळी निराशाच पदरी येईल. मग काय करायचे? आता कुठलाच आशेचा किरण उरला नाही काय ? नाही. असे तर खचितच नाही. आशा आहे जरूर, पण ती केव्हा? तर आपण जेव्हा नदी धर्म नीटपणे समजून घेऊ तेव्हाच. आज आपण ज्याला विकास म्हणतो आहोत त्या गोष्टी नीटपणे समजून घेऊ या. मनात कुठलाही पूर्वग्रह न बाळगता (आपल्याला विकासविरोधी म्हटले जाईल ह्याची भीती न अनुवादक) गंगेला किंवा हिमालयाला कोणी गुपचाप षड्यंत्र करून मारत नाहीय, हे तर सगळे आपलेच लोक आहेत. ते उघडपणे विकास, मोठी धरणे, नदी जोड प्रकल्प वगैरे राबवून जीडीपी वाढविण्याचा प्रामाणिकपणेच प्रयत्न करीत आहेत. हजारो लोक मिळून काही षड्यंत्र रचत नाहीत. एखाददुसराच कुणीतरी करतो गुपचाप म्हणजे त्याला चांगले काम समजूनच सारे करत आहेत. ‘विकास’ हा शब्दही किती सकारात्मक आहे! म्हणजे हे षडयंत्र नाही, सर्वसम्मती आहे.
विकासाच्या झेंड्याखाली पक्षोपपक्षांचा भेदही संपुष्टात आला आहे. आमच्या लीलाताईंनी आम्हाला मराठीतील एक विचित्र म्हण ऐकवली होती. रावणातोंडी रामायण. रावण स्वतःच इथे रामायण कथा सांगतो आहे. हिमालयात, गंगेत, गावा- शहरांत आपण विकासाच्या नावाखाली अशी काही कामे न करू या, ज्यामुळे आपलेच नुकसान होईल. नाहीतर आपल्यालाही रावणाप्रमाणेच, आपला नायनाट होण्याची कथा आपल्याच तोंडाने सांगावी लागेल.
(गांधी मार्ग, सप्टेंबर-ऑक्टोबर 2013 मधून)
गांधी शांति प्रतिष्ठान, 221-223, दीनदयाल उपाध्याय मार्ग, नवी दिल्ली

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.