धर्मसुधारणा – विचाराचा एक अंतर्गत प्रवाह

श्रद्धा आणि परंपरा हीच धर्माची बलस्थाने असतात असे मानले जाते. त्यामुळे धर्म आणि धार्मिक आचार यांच्यात सुधारणा संभवत नाही, असे गृहीत धरले जाते. जो धर्म एकाच धर्मग्रंथाचे प्रामाण्य मानत नाही, त्या हिंदुधर्मात थोडी लवचिकता होती; परंतु पारतंत्र्याच्या काळात ती नष्ट होऊन रूढींना कवटाळून बसण्याची प्रवृत्ती निर्माण झाली.
ह्यावर मात करून धर्मचिकित्सा करण्याचे प्रयत्न दीडशे वर्षांपूर्वी सुरू झाले. धार्मिक परंपरा न मानणाऱ्यांनी व त्या न पाळणाऱ्यांनी धर्मसुधारणेचा विचार मांडला तर तो लोकांना पटणे अवघड असते. वाईसारख्या क्षेत्री धर्मशास्त्राचे अध्ययन आणि अध्यापन करणाऱ्या एका ज्ञाननिष्ठ तपस्व्याने धर्मसुधारणेचा एक क्रांतिकारक प्रयत्न केला. महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातील ही एक महत्त्वाची घडामोड होती. हिंदू सामाजिक सुधारणांचे तीन प्रवाह एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध आणि विसाव्या शतकाचा प्रथमार्ध या सुारे शंभर वर्षांच्या काळात महाराष्ट्रात धर्मसुधारणेचा विचार प्रबळपणे मांडण्यात आला व त्यादृष्टीने काही कार्यही झाले, असे दिसते. माणसांच्या मूलभूत हक्कांच्या, त्यांच्या स्वातंत्र्याच्या आणि आत्मसन्मानाच्या संपूर्णतः विरोधी असणाऱ्या अनेक अनिष्ट रूढी हिंदू समाजात प्रचलित होत्या. त्यांचे अस्तित्व विचारी माणसांना बोचू लागले होते. जातींच्या श्रेष्ठ-कनिष्ठत्वांच्या कल्पनांनी समाज विभागलेला होता. या समाजस्थितीचे आकलन ज्यांना झाले, त्यांनी आलेल्या पारतंत्र्याचीही कारणे शोधली. समाजाच्या पुनर्बाधणीसाठी काय करावे, याचा विचार केला. हिंदु-धर्मसुधारणेचा विचार हा त्यांपैकीच एक महत्त्वाचा भाग होता. अर्थात धर्मसुधारणा हा विषय सामाजिक हिताबरोबरच व्यक्तिगत जीवनाच्या नैतिक बाजूशीही संबंधित होता.
धर्मसुधारणेचा हा विचार तीन अंगांनी प्रगट होत होता. ज्यांना हिंदू धर्मातील देवदेवतांची गर्दी, मूर्तिपूजा अमान्य होती, ज्यांना जातिभेद अमान्य होता, सामाजिक विषमता अमान्य होती; पण जे परमेशराचे अस्तित्व मान्य करीत होते व शुद्ध अंतःकरणाने केलेली प्रार्थना हीच ईशराची योग्य उपासना आहे असे मानत होते, त्यांनी आपल्या विचारांना आचरणात आणून काही पंथ स्थापिले. या पंथांचे स्वरूप पूर्वीच्या धर्मपंथांप्रमाणे एक धर्मगुरू आणि बाकीचे अनुयायी असे नव्हते; तर ते समविचारी लोकांनी एकत्र येऊन स्थापिलेल्या संस्थेसारखे होते. मानवधर्मसभा, परमहंससभा, प्रार्थनासमाज, सत्यशोधकसमाज इत्यादींचा जन्म धर्मसुधारणेच्या याच विचारातून झाला. अर्थात प्रत्येक धर्मपंथाचा भर वेगवेगळ्या गोष्टींवर होता. अंतःकरणाची शुद्धी हा कोणाचा महत्त्वाचा कार्यक्रम तर कोणाचा भर सामाजिक विषमता नष्ट करण्यावर आणि भक्त आणि परमेशर यांच्यातील मध्यस्थाची गरज नष्ट करण्यावर अधिक होता. धर्मसुधारणेचा विचार प्रगट करणारा दुसरा प्रवाह म्हणजे विशिष्ट अनिष्ट सामाजिक रूढीविरुद्ध चळवळ. विधवाविवाह, केशवपनाचा निषेध, परधर्मात गेलेल्यांचे शुद्धीकरण, जातनिर्बंधांचे शिथिलीकरण, अशी एकएक गोष्ट घेऊन त्यासाठी लोकमत अनुकूल करण्याचाही प्रयत्न झाला. चळवळीने पुरस्कारिलेल्या या सुधारणा प्रत्यक्ष अं लात आणण्याचेही प्रयत्न झाले. आणखी एका मार्गाने धर्मसुधारणेचा विचार प्रगट झाला. ज्यांनी धर्मसंहितांचा अभ्यास केला होता, जे धर्मचरणाच्या परंपरेचे जाणकार होते, त्यांच्यापैकीही काहींना धर्मसुधारणेची आवश्यकता जाणवू लागली होती. ते धर्म किंवा परंपरा यांना नाकारत नव्हते, त्यांच्या मनात धर्म व धर्मसंस्थांबद्दल आदर कायम होता; पण धर्म परिवर्तनशील आहे असा त्यांचा विशास होता. धर्म व धार्मिक आचार कालबाह्य होऊ शकतात, देशकालपरिस्थितीचा विचार करून आपल्यात इष्ट बदल करण्याची क्षमता हिंदू धर्मात आहे, असे त्यांना वाटत होते. धर्मपरंपरेत वाढलेल्या अशा धर्माभ्यासकांच्या मनात येणारा धर्मसुधारणेचा विचार हा या वैचारिक खळबळीतील तिसरा प्रवाह होता. या तिसऱ्या सुधारणा-प्रवाहाचा विचार येथे प्रस्तुत आहे.
एखाद्या धर्माचे किंवा धर्मपरंपरेचे प्रमुखत्व ज्याच्याकडे आहे, त्याला आपल्यावर परंपरेच्या रक्षणाची जबाबदारी आहे असे वाटत असते. धर्माच्या बाह्यलक्षणांचे रक्षण म्हणजेच धर्मरक्षण असा त्याचा समज असतो. तो स्थितिवादी असतो. कोणत्याही बदलासाठी पुढाकार घेण्याची त्याची मानसिकताच नसते. पोप किंवा आद्य शंकराचार्यांनंतरचे पीठाधीश शंकराचार्य यांच्याकडून धर्मसुधारणेच्या विचारांना पाठिंबा मिळण्याची शक्यता फारच कमी असते. त्यांनीच जर सुधारणेचा पुरस्कार केला तर काम फारच सोपे होईल ; पण तसे होत नसते. पोप किंवा शंकराचार्यांसारखे धर्मपीठप्रमुख आपले महत्त्व परंपरेनेच निर्माण केले आहे व परंपरेला धक्का लागला की आपल्यालाही धक्का लागेल असे मानत असण्याची शक्यता आहे. धर्मसुधारणेचा विचार मांडणारांचा आचार व्यक्तिजीवनात नास्तिकतेकडे, धर्मच नाकारण्याकडे झुकणारा असेल तर त्यांच्या विचाराकडे धर्मानुयायी फारशा गांभीर्याने लक्ष देत नाहीत. हे लोक पाखंडी आहेत, नास्तिक आहेत, हे धर्मातले उणेदुणे काढणारच, असे लोकांना वाटते. महाराष्ट्रातलेच उदाहरण घ्यावयाचे तर आगरकरांच्या क्रांतिकारक समाजविचाराला फारसे अनुयायी का लाभले नाहीत? ज्यांच्या धर्माभ्यासाबद्दल, धर्माचरणाबद्दल व वैयक्तिक नैतिक आचरणाबद्दल लोकमानसात श्रद्धा असते, अशा लोकांनी जर धर्माची मुळ चौकट अबाधित ठेवत काही धर्मसुधारणा सुचवल्या तर त्या समाजाला हळूहळू का होईना, पटण्याची शक्यता असते. केवलानंद सरस्वती (पूर्वाश्रमीचे नारायण सदाशिव मराठे), त्यांचे शिष्य तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आणि केवलानंदांच्या भोवती जमा झालेले शिष्य-सहकारी आणि काही विचारवंत यांनी मांडलेला धार्मिक सुधारणांचा विचार हा महाराष्ट्राच्या धर्मविचाराच्या इतिहासातील एक महत्त्वाचा भाग आहे. वाई-ज्ञानपरंपरेच्या शिक्षणाचे क्षेत्र सातारा जिल्ह्यात असलेले कृष्णाकाठचे वाई हे सु रे चारशे वर्षांपासून प्राचीन ज्ञानपरंपरेचे एक विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. सु गरे दोनशे वर्षांपूर्वी सरदार रास्ते यांनी वाईत काही नवीन वस्ती केली व ज्ञानोपासना करू इच्छिणारी अनेक ब्राह्मण घराणी वाईत राहण्यास आली. वाई हे कृष्णाकाठी असले तरी तीर्थयात्रा करणारांची गर्दी असलेले आणि त्यांच्या धर्मकृत्यातून उपजीविका करणारे भिक्षकांचे गाव झालेच नाही. वाईची परंपरा इतर तीर्थक्षेत्रांच्या परंपरेपेक्षा वेगळी होती. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात वाईत प्राचीन विद्येच्या विविध ज्ञानशाखांची तज्ज्ञ मंडळी उपलब्ध होती. न्यायशास्त्राचे गुरु बाळशास्त्री डेंगवेकर, व्याकरणाचे तज्ज्ञ विष्णुशास्त्री करंदीकर, यजुर्वेदाचे गुरु बाळंभटजी तात्या रानडे, ऋग्वेदाचे गुरु विष्णुशास्त्री मेणवलीकर वगैरेंची ख्याती सर्वत्र होती. वाईत आप्पाशास्त्री राशीवडेकर ‘संस्कृतचंद्रिका’ नावाची मासिकपत्रिका प्रसिद्ध करीत होते, तर काशीनाथशास्त्री लेले ‘धर्म’ ही मराठी मासिकपत्रिका काढत होते. विविध ज्ञानशाखांची तज्ज्ञमंडळी वाईत होती; पण शिक्षण मात्र कष्टाचे होते. ही गुरुमंडळी स्वतः फारसे काही अपेक्षित नव्हती. अनेक जण अयाचित वृत्तीने राहून कोणी आणून देईल तेवढ्यावरच निर्वाह करीत; पण शिकणारेही निर्धनच असत. गुरु आणि शिष्य दोघेही अनेकदा माधुकरी मागून क्षुधानिवारण करीत.
नारायणशास्त्री मराठे
अशा या वाईत ज्ञानसंपादनार्थ नारायण मराठे नावाचा तरुण १८९८ साली आला. आताच्या रायगड जिल्ह्यातील रोहे तालुक्यातील सडकोली हे त्याचे गाव. ८ डिसेंबर १८७७ रोजी त्याचा जन्म झाला होता. वडील चरितार्थासाठी गावातल्या जमीनदारांची शेती खंडाने घेऊन शेतीवरच उदरनिर्वाह करीत. या कृषिजीवनातील श्रमाची ओळख नारायणास बाळपणातच झालेली होती. शेतीतील सर्व कामे सदाशिवराव स्वतःच करीत. प्राचीन विद्येचे ज्ञान संपादन करावयाचे ठरल्यानंतर प्रारंभी पनवेल व इतरत्र काही ठिकाणी तो राहिला; पण तेथे फारसे काही संपादन होणार नाही असे दिसताच वयाच्या एकविसाव्या वर्षी नारायण वाईस आला. वाई येथे पूर्वाश्रमीचे कृष्णशास्त्री गौरीशंकर परांजपे यांनी संन्यास घेऊन ‘प्रज्ञानंद’ असे नाव स्वीकारले होते. कृष्णेच्या घाटावर असलेल्या मारुतीच्या पडक्या देवळाची दुरुस्ती करून त्यावर एक छोटीशी माडी नानासाहेब रिजबुडांनी बांधून दिली होती. तेथेच प्रज्ञानंदांचा प्रस्थानत्रयीचा पाठ सुरू झाला. नारायणशास्त्री मराठे, लक्ष्मणशास्त्री रिजबुड, विष्णुशास्त्री बापट आदी सहाध्यायांनी आपल्याला शिकवावे अशी विनंती प्रज्ञानंदांना केली व नारायणशास्त्रींच्या अध्ययनाला प्रारंभ झाला. वाईत आल्यानंतर सुारे दोन वर्षांतच, २२-२३ वर्षांचे वय असतानाच, आपण विवाह करावयाचा नाही आणि अध्ययन आणि अध्यापनातच सर्व आयुष्य वेचावयाचे असा त्यांनी निश्चय केला. पुढे वयाच्या ५३ व्या वर्षी संन्यास घेईपर्यंत त्यांनी संन्यस्तवृत्तीनेच राहन, माधकरी मागून आपला निर्वाह केला आणि इतर सर्व वेळ अध्ययन आणि अध्यापनामध्ये व्यतीत केला. साधारण १९०१ च्या स ाराला नारायणशास्त्र्यांनी वाईत अध्यापन सुरू केले. प्रारंभी फक्त तीन-चार विद्यार्थी होते. पुढे त्यांची संख्या वीस-पंचवीसपर्यंत गेली. प्रज्ञानंदांचा मठ, दातारमठ आणि मुरलीधरमठ अशा मठांत नारायणशास्त्र्यांचे विद्यार्थी राहत आणि त्यांच्याजवळ पंचमहाकाव्ये, भागवत, व्याकरण, वेदान्त, न्याय इत्यादी विषयांचे शिक्षण घेत असत. थोडे शिक्षण झाल्यानंतर विद्यार्थ्यांपैकी काही नवागतांना थोडेफार शिकवीत, त्यामुळे अध्ययन आणि अध्यापन दोन्हींचा त्यांना अनुभव मिळे. प्राचीन ज्ञानशिक्षणाला राष्ट्रीय शिक्षणाची जोड इ.स. १९०५ साली भारतात राष्ट्रीय शिक्षणाची चळवळ सुरू झाली. ‘समर्थ विद्यालय’ नावाची एक राष्ट्रीय शिक्षणाची संस्था प्रा. विष्णू गोविंद विजापूरकरांनी कोल्हापुरात सुरू केली होती. तेथील वातावरणामुळे तिचे स्थलांतर पुण्याजवळ तळेगाव येथे झाले. समर्थ विद्यालय ही संस्थाच इ.स. १९१० च्या सु ाराला सरकारने बेकायदा ठरवली, त्यामुळे उघडपणे ती शाळा चालू ठेवणे अशक्य झाले. तेथे शिकवणारी व राष्ट्रीय विचाराने भारलेली काही शिक्षक मंडळी विविध शिक्षणसंस्थांत विखुरली. त्यातील काही वाईलाही आले. त्यातील महत्वाचे दिनकरशास्त्री कानडे आणि महादेवशास्त्री दिवेकर. त्यांना संस्कृत भाषेत असलेल्या प्राचीन ज्ञानपरंपरेविषयी आदर असला तरी राष्ट्रीय विचारानेसुद्धा ती प्रभावित झालेली होती. वाईत ही मंडळी आल्यानंतर त्यांचेही अध्ययन आणि अध्यापन दोन्ही सुरू झाले. याच काळात काही प्रौढ विद्यार्थीही नारायणशास्त्रींकडे शिकण्यासाठी येऊ लागले. त्यात पाली-सिद्धेशरचे कोनकर बंधू आणि बीड जिल्ह्यातल्या अंजनवतीचे केशवबुवा विप्र, पेणचे विष्णू विनायक परांजपे तसेच खुद्द वाईतली काही तरुण मंडळी यांचा समावेश होता. साबरमती येथील गांधीजींच्या आश्रमातून विनोबा भावे सहा महिन्यांसाठी प्राज्ञमठात येऊ राहिले होते. तेथे त्यांनी शांकरभाष्याचे अध्ययन केले. स्वतः नारायणशास्त्रींचे वाचन संस्कृतव्यतिरिक्तही बरेच होते. ते स्वतः लोकमान्य टिळक आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या विचारांनी प्रभावित झालेले होते.
प्राज्ञपाठशाळेचा प्रारंभ
अशा सहकाऱ्यांच्या आगमनानंतर आपल्या अध्यापनकार्याला संस्थारूप द्यावे, असा विचार नारायणशास्त्रींच्या मनात आला आणि त्यांनी आणि सहकाऱ्यांनी मिळून नारायणशास्त्र्यांच्या अध्यापन केंद्राला – प्राज्ञमठाला – संस्थारूप दिले. १९१६ सालच्या विजयादशमीस म्हणजे ६ ऑक्टोबर रोजी संस्थेची स्थापना झाली. पुढे वहाडात असलेले सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी सीताराम विशनाथ पटवर्धन यांनी कृष्णेकाठचा गंगापुरीतील अनगळांचा वाडा तीन हजार रुपयांस विकत घेऊन संस्थेला अर्पण केला. त्या वाड्यातच संस्थेचे काम चालू लागले. प्रारंभी साठ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. त्यातील बावीस विद्यार्थी शास्त्रशाखेत म्हणजे केवळ प्राचीन विद्येच्या अध्ययनासाठी आलेले होते आणि उरलेले विद्यार्थी मध्यमशाखेत शिकत होते. ज्यांना एखाद्या विशिष्ट शास्त्रात पारंगतता मिळवण्यासाठी दहाबारा वर्षे खर्च करण्याची इच्छा नाही व ज्यांना जीवनोपयोगी इतरही शिक्षण घ्यावयाचे आहे, त्यांच्यासाठी ही मध्यमशाखा होती. या शाखेच्या अभ्यासक्रमात संस्कृत, मराठी, इंग्रजी या भाषा व इतिहास आणि युरोपीय देशांच्या प्रचलित राज्यपद्धतीचे ज्ञान, गणित, जमाखर्च, भूगोल इत्यादींची आवश्यक माहिती यांचा समावेश होता. संस्कृत भाषांतर्गत ज्ञानात निवडक वेदभाग, स्मृति, निरुक्तादि वेदांगे यांतील काही भाग, उपनिषदे आणि रामायण-महाभारतासारख्या महाकाव्यांची ओळख, वेदान्त आणि धर्मशास्त्र यांतील सिद्धान्त समजण्याची पात्रता इत्यादी गोष्टी होत्या. प्रातःकाळी पाच वाजता प्रार्थना होई. त्यात राष्ट्रीय प्रार्थना अंतर्भूत झालेली होती. सकाळी सूर्यनमस्कारही घातले जात. नंतर पाठ सुरू होत. ज्या विद्यार्थ्यांचा खर्च त्यांचे पालक पाठवीत नव्हते, ते विद्यार्थी गावात माधुकरी मागून आपल्या निर्वाहाची सोय करीत. भोजनानंतर दुपारी दोन वाजता पुन्हा पाठ सुरू व्हावयाचे. लोकमान्य टिळकांनी १९१६ साली संस्थेला भेट दिली होती. दिनकरशास्त्री कानडे आणि महादेवशास्त्री दिवेकर समर्थ विद्यालयातून प्राज्ञपाठशाळेला सामील झाले, त्याच सु रास नारायणशास्त्र्यांकडे शिकण्यास आलेल्या इतरही काही मंडळींनी त्याचे वैचरिक नेतृत्व स्वीकारून धर्मसुधारणेच्या संकल्पित कार्यात सहभाग घेतला. तर्कतीर्थ पं. रघुनाथशास्त्री कोकजे, महादेवशास्त्री दिवेकर आणि महामहोपाध्याय श्रीधरशास्त्री पाठक यांनी अतिशय उत्साहाने ठिकठिकाणी व्याख्याने दिली, ‘केसरी’सारख्या वृत्तपत्रात लेख लिहिले आणि धर्मसुधारणेचा विचार विस्ताराने मांडण्यासाठी ग्रंथही लिहिले. दिवेकरशास्त्री सुारे दहा वर्षे प्राज्ञपाठशाळेचा प्रचार करत होते. नंतर त्यांनी संस्थेचा निरोप घेतला तरी धर्मसुधारणेच्या विचारांचे प्रसारकार्य मात्र चालूच ठेवले. “हिंदू समाज समर्थ कसा होईल ?’ (१९२७), ‘आर्यसंस्कृतीचा उत्कर्षापकर्ष’ (१९२९), ‘धर्मशास्त्राचे गंथन’ (१९३३), ‘नवा हिंद धर्ग’ (१९४२) ही त्यांची गहत्त्वाची प्रतके. याच गहादेवशारत्र्यांनी ‘किर्लोरकर’ गासिकातून केडगावच्या नारायणगहाराजांच्या व इतरांच्या बुवाबाजीवर झोड उठवली. तर्कतीर्थ रघुनाथशास्त्री कोकजे लोणावळ्याच्या कैवल्यधामात दर्शनाध्यापन करत होते; परंतु जवळजवळ पूर्णवेळ प्रचारकांसारखे त्यांचे काम होते. ‘धर्मस्वरूपनिर्णय’ १९३३), ‘नवा आचारधर्म’ (१९३६), ‘हिंदूंच्या अवनतीची मीमांसा’ (१९४५४) ही त्यांची उल्लेखनीय ग्रंथसंपदा. श्रीधरशास्त्री पाठक हे सुधारणांना अनुकूल शास्त्रार्थ काढून देणारे विद्वान पंडित होते व त्यांचेही प्रचारकार्य सुरू असे. येरवड्याला गांधीजींसमोर जेव्हा अस्पृश्यतेसंबंधी शास्त्रार्थ झाला, त्यावेळी काढलेल्या संदर्भाचे एक पुस्तक ‘अस्पृश्यतेचा शास्त्रार्थ’ (१९३३) गांधीजींच्या उपवासकालातच पाठकांनी लिहून प्रसिद्ध केले. याशिवाय महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे, विद्वद्रत्न केशव लक्ष्मण दप्तरी, पुण्याच्या विधिमहाविद्यालयाचे संस्थापक ज.र.घारपुरे आणि ना.गो. चपेकर यांसारखी अनेक मंडळी या कार्याला पाठिंबा देण्यास पुढे आलेली होती.
२१ जुलै १९२० रोजी ‘प्राज्ञपाठशाळामंडळ’ ही संस्था रजिस्टर करण्यात आली आणि १९२१ पासून नुकत्याच स्थापन झालेल्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला ती संलग्न करण्यात आली. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षांना संस्थेचे विद्यार्थी बसू शकत असत. १९२२ पासून १९३० च्या अखेरपर्यंत माध्यमिक राष्ट्रीय शिक्षणास संस्कृत उच्चशिक्षणाइतकेच महत्त्व प्राज्ञपाठशाळेत देण्यात आले होते. १९४२ पासून संस्थेत सर्व जातींच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. १९३० नंतर माध्यमिक शिक्षणावरचा भर कमी झाला. संस्थेचा प्रचार करणे आणि तिच्यासाठी निधी जमवणे ही कामे मुख्यतः महादेवशास्त्री दिवेकर आणि गंगाधरशास्त्री सोहनी यांनी केली.
लक्ष्मणशास्त्री जोशी १९१४ च्या सु ाराला वाई ध्ये आले होते. त्यांच्या वडिलांचे नाशिकच्या वेदशाळेध्ये अध्ययन झाले होते. वडिलांची इच्छा लक्ष्मणने नुसते याज्ञिक किंवा वैदिक बनण्याऐवजी पंडित, शास्त्री व्हावे अशी होती. या अध्ययनासाठी त्यांनी मुलाला वाईला पाठवले. शास्त्रीजींच्या गावी त्यावेळी असलेले एक वनखात्याचे अधिकारी देवकुळे नारायणशास्त्री मराठे यांना ओळखत होते, म्हणून त्यांनी नारायणशास्त्र्यांचे नाव लक्ष्मणच्या वडिलांना सुचवले. चार वर्षे तेथे अध्ययन केल्यानंतर वाराणसीला जाऊन तेथे नव्यन्यायाचे पुढील अध्ययन करण्यास नारायणशास्त्र्यांनी त्यांना सांगितले. तेथे लक्ष्मणशास्त्री सारे चार वर्षे होते. वाराणसीत त्यांनी वामाचरण भट्टाचार्य, राजेशरशास्त्री द्रविड, न्यायाचार्य भंडारीशास्त्री इत्यादींकडे नव्यन्यायाचे अध्ययन केले. त्याच काळात त्यांनी ‘तर्कतीर्थ’ या पदवीसाठीची परीक्षा देऊन ती संपादन केली. वाराणसीत असतानाच समन्वयवादी पद्धती आणि ऐतिहासिक पद्धती या दोन पद्धतींबद्दल तज्ज्ञ अभ्यासकांबरोबर चर्चाही केल्या. वाईला परत आल्यावर लक्ष्मणशास्त्र्यांनी वेदान्ताबरोबरच नव्यन्याय हा विषय आणि ‘मीमांसान्यायप्रकाश’ हा ग्रंथही शिकवला. न्याय म्हणजे ढोबळमानाने तर्कशास्त्र. सर्व शास्त्रांच्या अभ्यासाचे हे पायाभूत शास्त्र समजले जाते. प्राचीन भारतीय शास्त्रपरंपरेत न्यायशास्त्र खूप विकसित झाले. नव्यन्याय हे त्याचे आणखी प्रगत रूप. नव्यन्यायात प्रमाणविचाराला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यातील संकल्पनात्मक विश्लेषण हे आधुनिक तर्कशास्त्राच्या खूप जवळ येणारे असे आहे. या शास्त्राचे तर्कतीर्थांनी केलेले अध्ययन, प्राचीन ज्ञान आणि आधुनिक ज्ञान या दोहोंच्या गुणदोषांची चिकित्सा करण्याला त्यांना उपयोगी पडले असणार.
नव्या दृष्टीचा आचार्य
स्वतः नारायणशास्त्रींचे शिक्षण प्राचीन भारतीय शास्त्राबद्दलच झाले असले तरी त्यांची ज्ञानजिज्ञासा चौफेर होती. मराठीत विज्ञानावरची जी पुस्तके तेव्हा भाषांतरित झालेली होती, ती त्यांनी वाचली होती. त्याशिवाय स्पेन्सर, मिल, सिजविक यांसारख्यांच्या तत्त्वज्ञानाचे ग्रंथ मराठीत आले, तेही सर्व स्वामीजी वाचू लागले होते. त्यांनी इंग्रजी शिकण्याचाही थोडासा प्रयत्न केला होता; परंतु तो नंतर त्यांनी सोडून दिला. पाश्चात्त्य तत्त्वज्ञांची तात्त्विक मांडणी नारायणशास्त्रींना त्यांच्या भारतीय तत्त्वज्ञानाच्या अभ्यासामुळे अधिक चांगली समजतही होती आणि आकर्षकही वाटत होती. पाश्चात्त्य ज्ञानपरंपरेचाही परिचय झाल्यामुळे इतर शास्त्रीपडितांपेक्षा नारायणशास्त्रींचा दृष्टिकोण वेगळा झाला होता. पूर्वग्रहाने नव्या ज्ञानाकडे पाहणारी त्यांची दृष्टी नव्हती. भारतात विज्ञान यावे आणि नवे राजकीय आणि सामाजिक विचार यावेत असे त्यांना वाटू लागले होते. प्राज्ञपाठशाळा ही केवळ प्राचीन संस्कृत ज्ञानग्रंथांचे अध्यापन करणारी संस्था न राहता ती ज्ञानपरंपरा कालसुसंगत व्हावी आणि आपला सांस्कृतिक व तत्त्वज्ञानपर वारसा नव्या ज्ञानाच्या प्रकाशातसुद्धा डोळसपणे अभ्यासला जावा यासाठी प्रयत्न करणारी संस्था व्हावी, असे त्यांना वाटत होते. पारंपरिक शास्त्रांचा अभ्यास व्यवस्थित केलाच पाहिजे; परंतु त्यात जे भौतिकी, वैज्ञानिक विचार आले आहेत (व जे कालबाह्य झाले आहेत) ते बदलले पाहिजेत, नव्या संशोधनाने सिद्ध झालेले सत्य स्वीकारले पाहिजे, असा त्यांचा दृष्टिकोण होता.
प्राज्ञपाठशाळा सुरू झाली त्या काळात भरास आलेल्या राष्ट्रीय शिक्षणाच्या चळवळीचा आणि तत्कालीन राजकीय विचारांचाही परिणाम नारायणशास्त्रींवर होत होता. भारतात दलित आणि स्त्रिया यांवर समाजव्यवस्था दीर्घकाळ जो अन्याय करीत होती, त्याविरुद्ध मांडला जाणारा फुल्यांचा आणि आगरकरांचा विचार नारायणशास्त्रींना ज्ञात असला पाहिजे; परंतु त्यांच्यावर खरा संस्कार झाला तो राष्ट्रवादाचा. आपला धर्म आणि आपली परंपरा ही सर्व त्याज्य आहे, असा विचार कधीही त्यांच्या मनात आला नाही. त्यांचा सामाजिक विचार, त्यांच्या राजकीय विचारातून आणि धर्माच्या सखोल अभ्यासातून निर्माण झालेला होता. भारताने स्वराज्य का गमावले, याची चिकित्सा करीत असताना त्यांनी धर्मचिकित्सा केली. धर्म हा केवळ कर्मकांडाचा संग्रह नसून त्यामागे नैतिक तत्त्वज्ञान आहे हे त्यांनी लक्षात घेतले होते. या नैतिक तत्त्वज्ञानात सर्व मानवजात एकच आहे हा विचारही समाविष्ट होता. राष्ट्रीय एकता स्थापन करावयाची असेल तर त्याला पायाभूत असणारी समतेची भावनासुद्धा स्वीकारावी लागेल हे त्यांना पटलेले होते. मानवजात एकच आहे हा नैतिक विचार नारायणशास्त्रींनी स्वीकारला त्यामागे स्पेन्सर किंवा मिल यांच्या विचारांचा प्रभाव असू शकेल का असा प्रश्न मे. पुं. रेग्यांनी लक्ष्मणशास्त्रींना एका मुलाखतीत विचारला होता. त्याचे तर्कतीर्थांनी विस्ताराने दिलेले उत्तर नारायणशास्त्र्यांच्या वैचारिक उत्क्रांतीचे यथायोग्य विश्लेषण करणारे आहे. “धर्मशास्त्राचे त्यांनी सखोल अध्ययन केले होते. त्यामुळे त्यांना असे दिसले की, आपला धर्म वेळोवेळी परिवर्तन पावलेला आहे. जातिभेद हा देवनिर्मित आहे असे त्यांना कधीच वाटले नाही. निरनिराळे वर्ण खालीवर गेले याविषयीची अनेक उदाहरणे त्यांना भागवतात आणि इतरत्र सापडली. यावरून त्यांची खात्री पटली की हा काही जातिनिष्ठ समाज नाही. आपण जातिसंस्था बदलू शकतो. त्याप्रमाणे प्रौढविवाहाची उदाहरणे त्यांनी वाचलेली, पुनर्विवाहाविषयीची धर्मशास्त्रातील वाक्ये वाचलेली, त्याचप्रमाणे घटस्फोटाविषयी वाक्ये नारदस्मृतीत वाचलेली; तेव्हा देशकालपरिस्थितीप्रमाणे हा धर्म बदलतो असा त्यांचा विचार झाला. तेव्हा देशकालपरिस्थितीप्रमाणे आणि समाजाला उपकारक ठरेल अशा रीतीने हा धर्म बदलला पाहिजे ही त्यांची भूमिका दृढ झाली. स्पेन्सर आणि मिलचे ग्रंथ वाचीत असताना आपल्याही देशात मोठे परिवर्तन झाले आहे, हा समाजही बदलत गेला आहे असा त्यांचा विचार झाला होता.’ नारायणशास्त्र्यांची समाजपरिवर्तनाची भूमिका आगरकरांच्या विवेकवादावर आधारलेली किंवा त्याच्याशी जुळती नव्हती. धर्माच्या परिवर्तनशीलतेवर असलेल्या विशासातून ती जन्माला आली होती व तिच्या पाठीमागे धर्मातूनच निर्माण झालेला नैतिक विचार होता. नारायणशास्त्री मराठ्यांपूर्वी शेकडो अभ्यासकांनी त्यांच्याएवढाच किंबहुना अधिकही अभ्यास केलेला होता, धर्मग्रंथ वाचले होते, ते समजूनही घेतले होते. मग धर्माची ही परिवर्तनशीलता जशी नारायणशास्त्रींना जाणवली, तशी इतरांना ती का जाणवली नाही ? याचे उत्तर असे देता येईल की धर्म हा बुद्धिगम्य आणि मनुष्यनिर्मित आहे हे मान्य झाले म्हणजे मग धर्माची परिवर्तनशीलता लक्षात येणे सोपे होते. पूर्वीच्या अभ्यासकांपैकी या दोन्ही गोष्टी मानणारे लोक फार कमी होते. त्यांच्या दृष्टीने धर्मग्रंथ हा श्रद्धेचा विषय होता आणि धर्मवचनांची छाननी न करता परंपरेने किंवा रूढीने स्वीकारलेला अर्थ मान्य करावयाचा ही त्यांची भूमिका होती. वेद अपौरुषेय आहेत; म्हणजे माणसांनी केलेले नाहीत. ते अनादिसिद्ध आहेत किंवा ईशराने केलेले आहेत आणि बाकीचा सर्वधर्मविचार हा वेदांच्या आज्ञेप्रमाणेच आहे, तेव्हा तो अपरिवर्तनीय आहे ही सनातन्यांची भूमिका होती. जास्तीत जास्त स्वातंत्र्य होते ते अर्थ लावण्याबद्दल. या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका नारायणशास्त्र्यांनी घेतली आणि त्यामुळेच महाराष्ट्रातील हिंदुधर्मसुधारणेच्या चळवळीत एक वेगळा प्रवाह निर्माण झाला. १९२३ मध्ये वाईध्ये एक ब्राह्मणपरिषद झाली. या परिषदेत ब्राह्मणांत असलेल्या विविध पोटजातींच्या एकीकरणाचा मुद्दा चर्चिला गेला. ही चर्चा चालू असताना ब्राह्मणांतील निरनिराळ्या पोटजातीसंबंधी ज्या काल्पनिक कथा निर्माण झाल्या व त्यांतील काहींना स्कंदपुराणातील सह्याद्रिखंडात स्थानही मिळाले, त्यांचाही उल्लेख झाला. लक्ष्मणशास्त्र्यांनी या कथा खोट्या आहेत असे प्रतिपादन केले. बुद्धी आणि तर्क यांवर आधारलेले हे प्रतिपादन वाईतील सनातन्यांना पटले नाही. त्यांनी सभा उधळून लावण्याचाही प्रयत्न केला. शेवटी स्वत: नारायणशास्त्र्यांना हस्तक्षेप करून शांतता प्रस्थापित करावी लागली.
सोनगीर आणि अकोल्याच्या परिषदा
१९२६ सालच्या जानेवारी महिन्यात खानदेशात नरढाण्याजवळ असलेल्या सोनगीर येथे एक पंडित-परिषद झाली. निरनिराळ्या पीठांचे आचार्य तर हजर होतेच; शिवाय दूरदूरहून अनेक शास्त्री-पंडित आले होते. पंडित लक्ष्मणशास्त्री द्रविड, राजेशरशास्त्री द्रविड, अनंत कृष्णशास्त्री द्रविड, काशीशेष व्यंकटाचलशास्त्री इत्यादी पंडित स्मृत्युक्त धर्मशास्त्रात आणि चालू रूढींत कसलाही फेरबदल न करता सामाजिक व धार्मिक आचार हिंदूंनी चालवावेत या मताचे होते. तर नारायणशास्त्री मराठे आणि महादेवशास्त्री दिवेकर, श्रीधरशास्त्री पाठक, सदाशिवशास्त्री भिडे आदींचा पक्ष असा होता की धर्म हा परिवर्तनीय आहे म्हणून त्यात आणि त्यानुसार करावयाच्या आवारांत बदल होऊ शकतो. या परिवर्तनवादी पक्षातर्फे जे विचार मांडले गेले, त्यात महत्वाचे मुद्दे असे होते –
(१) देशकालपरिस्थितीप्रमाणे मूलभूत नैतिक तत्वांच्या अनुसराने इष्ट बदल केले जाऊ शकतात.
(२) ऐतिहासिक दृष्टीने धर्मग्रंथांचा अर्थ लावणे योग्य आहे. वेद हे माणसांनीच तयार केलेले आहेत, देवाने नव्हे.
(३) धर्मभ्रष्टांचे शुद्धीकरण केले पाहिजे.
(४) ब्राह्मण आणि शूद्र हे दोनच वर्ण कलियुगात आहेत हे म्हणणे बरोबर नाही. क्षत्रिय आणि वैश्य हे वर्णसुद्धा अस्तित्वात आहेत. ज्या क्षत्रिय-वैश्यांत संस्कारलोप झाला, त्यांचा व्रात्यसंस्कार करून उपनयनादी संस्कार करावेत.
(५) परदेशात जाऊन आलेल्या कोणावरही बहिष्कार टाकू नये.
सोनगीर परिषदेत नारायणशास्त्र्यांनी मांडलेले हे विचार त्या काळात फारच क्रांतिकारक होते. १९२७ साली हैदराबाद येथे हिंदु-धर्मपरिषदेचे एक अधिवेशन वामनराव नाईक यांनी भरवले. तेथेही हेच विचार नारायणशास्त्र्यांनी मांडले. त्याचवर्षी अकोल्यात एक ब्राह्मण परिषद झाली. या परिषदेचे अध्यक्षपदच नारायणशास्त्रींनी स्वीकारलेले होते. ही परिषद अनेक दृष्टीने महत्त्वाची होती. या परिषदेकडे परमहंस प्रज्ञानेशर यति यांनी एक अर्ज पाठवला होता. सकेशा ब्राह्मण विधवा हिलाही जे अस्पृश्य मानण्यात येते व तिला धर्मकृत्य करण्याचा अधिकार नाही आणि केशवपन झाल्याशिवाय ती शुद्ध होत नाही असा जो समज काही जमातींत होता, तो चुकीचा असल्याचे जाहीर करावे अशी त्यांनी मागणी केली होती. अकोला परिषदेत झालेल्या ठराव क्र.९ प्रमाणे ‘सकेशा विधवांना कोणत्याही प्रकारे अशुभ मानू नये व श्राद्धपक्ष, कुळधर्म कुळाचार, हव्यकव्य, नैवेद्य, वैशदेव, उपनयन, विवाहादी संस्कारप्रसंगी त्यांनी सिद्ध केलेले अन्न निषिद्ध मानू नये व त्यांना व्रते-वैकल्ये व पारमार्थिक धर्मकृत्ये करण्याचा पूर्ण अधिकार आहे असे परिषदेचे मत आहे.’ या परिषदेस साडेसातशे लोक हजर होते. त्यांपैकी फक्त अकरा लोकांनी ठरावाविरुद्ध मत दिले व ठराव बह ताने मंजूर झाला. आपल्या अध्यक्षीय भाषणात नारायणशास्त्र्यांनी ब्राह्मण म्हणवून घेणाऱ्या सर्व पोटजातींचा परस्पर अन्नोदक व्यवहार आणि विवाहसंबंध व्हावा याचा पुरस्कार केला. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील मराठे आणि माळी वगैरे लोक हे खरेखुरे क्षत्रिय आहेत व त्यांचे वेदोक्त संस्कार व्हावयास हवे आहेत, असे मत मांडले. नारायणशास्त्री मराठ्यांनी आपल्या भाषणात सर्व जाती जन्मतः समान आहेत अशी घोषणा केली. त्या काळी ही घोषणा क्रांतिकारकच होती. हा विचार धर्मसुधारणेचे अंतिम उद्दिष्ट होता. नुसते विचार मांडूनच नारायणशास्त्री थांबले नाहीत तर त्यावेळच्या मध्यप्रांतातील चंद्रपूर वगैरे ठिकाणी असलेल्या वैश्यांच्या वेदोक्त संस्काराकरिता आपले एक सहकारी वासुदेवशास्त्री कोनकर यांना त्यांनी पाठवले. नारायणशास्त्र्यांचे स्नेही धुंडिराजशास्त्री बापट यांनी मराठे, माळी वगैरे जातींना वेद शिकवण्याकरिता व त्यांच्या वेदोक्त संस्काराकरिता ‘स्वाध्याय मंदिर’ या नावाची संस्था काढली. या संस्थेच्या वतीने बापटशास्त्र्यांनी आणि नारायणशास्त्र्यांनी भुईंज येथील इनामदार जाधवांकडे वेदोक्त उपनयन संस्काराचा समारंभही केला.
संन्याशाश्रमाचा स्वीकार
नारायणशास्त्र्यांनी लग्न केलेच नव्हते. संन्यास घेण्याचा विचार मनात होताच. तो त्यांनी २१ ऑक्टोबर १९३१ रोजी तडीस नेला. कराडजवळ टेंबू नावाचे गाव आहे. गोपाळ गणेश आगरकरांचे जन्मस्थान म्हणून ते प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणी जाऊन त्यांनी संन्यास घेतला. तेथेच दोनतीन गहिने राहन बद्रीकेदाराचे दर्शन घेऊन स् रे दीड वर्षांनंतर ते पुन्हा वाईस आले. नारायणशास्त्री गराठे संन्यासाश्रगात आता ‘केवलानंद सरस्वती’ झाले होते. संन्यास घेण्याअगोदरही त्यांचा दिनक्रम जवळजवळ संन्याशासारखाच होता. व्यक्तिगत लाभांच्या इच्छांचा लोप केव्हाच झाला होता. आता त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले एवढेच. धर्मसुधारणेविषयी केवलानंदांची मते तयार होण्याला प्रारंभ झाला होता. अशा काळात लक्ष्मणशास्त्री जोशी केवलानंदांचे शिष्यत्व पत्करून त्यांच्या प्रबोधनकार्यातही सहभागी होण्यास तयार झाले होते. धर्मसुधारणेचा विचार लोकांना पटवून देणे ही तशी अवघड बाब होती.
धर्मनिर्णयमंडळ
१९३४ साली ठाण्यामध्ये धर्मसुधारणांना अनुकूल असणाऱ्या ब्राह्मणमंडळींची एक सभा झाली. या सभेत ‘तत्त्वनिष्ठ-परिवर्तनवादी-परिषद’ या नावाची संस्था स्थापन करण्याचे ठरले. पहिली चार वर्षे संस्थेचे काम याच नावाखाली चालले. पुढे संस्थेचे नाव अधिक अन्वर्थक करून ‘धर्मनिर्णयमंडळ’ असे ठेवण्यात आले. अहमदनगर येथे १९३६ साली झालेल्या व लोणावळे येथे १९३८ साली झालेल्या मंडळाच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद केवलानंदांनीच भूषविलेले होते.अहमदनगरला झालेल्या दुसऱ्या परिषदेत बुद्धी हीच धर्माचे प्रमाण आहे, ऐतिहासिक पद्धतीने धर्मनिर्णय करावा, वेळोवेळी आचारधर्माध्ये परिवर्तन होत असते, आजही आजच्या शिष्टांना आजच्या परिस्थितीला अनुसरून परिवर्तन करण्याचा अधिकार आहे, हा महत्त्वाचा विचार मान्य करण्यात आला. धर्माचे परिवर्तन बुद्धीच्या आधाराने शिष्टांनी घेतलेल्या निर्णयानुसार होऊ शकते असे त्यामुळे ठरले. त्याशिवाय याच परिषदेत काही क्रांतिकारक निर्णय झाले. अस्पृश्यता मानू नये, विधवेचा पुनर्विवाह शास्त्रसंत आहे, तो मान्य करावा, मात्र तो विधुराशीच व्हावा, कोणत्याही जातीच्या व्यक्तीबरोबर सामुदायिक प्रसंगी पंगतीव्यवहार करावयास हरकत नाही, इतर धर्मांत गेलेल्या किंवा असलेल्या व्यक्तींना शुद्ध करून पुन्हा हिंदू होता येते असे या परिषदेचे निर्णय होते. नंतर झालेल्या बदलापूरच्या परिषदेतसुद्धा काही महत्त्वाचे निर्णय झाले. त्यात आज हिंदू विवाह कायद्यात घटस्फोटासाठी जी कारणे आहेत जवळजवळ त्याच कारणांसाठी घटस्फोट घेता यावा असे मत व्यक्त करण्यात आले आहे. कोणतीही जात जन्मतः श्रेष्ठ अथवा कनिष्ठ समजू नये व स्त्रियांना धार्मिक व सामाजिक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीचे अधिकार आहेत असे ठरावात म्हटले आहे. हिंदू कायद्याचे संहिताकरण करण्यात यावे अशीही महत्त्वाची मागणी या परिषदेत करण्यात आली आहे. अनेक धार्मिक निर्णयांबरोबर एक राजकीय ठरावही या परिषदेत झाला. ‘लोकशाही शासनपद्धती आणि राष्ट्रस्वामित्व यांच्या यशस्वितेसाठी लोककल्याणाशी सुसंगत होईल अश्या रीतीने राजकीय आणि आर्थिक विकेन्द्रीकरणाच्या तत्त्वांचा स्वीकार करणे योग्य होईल.’ धर्मक्षेत्रातच काम करणाऱ्या एका परिषदेत अशा रीतीचा ठराव करण्याची गरज संयोजकांना आणि स्वतः केवलानंदांना वाटावी ही लक्षणीय गोष्ट आहे. धर्मनिर्णयमंडळाचे काही अहवाल उपलब्ध आहेत. त्यात धर्मनिर्णयमंडळाने केलेल्या विविध कामांचा तपशीलही आहे. स्वातंत्र्योत्तर काळातही धर्मनिर्णयमंडख हे कालबाह्य झाले नव्हते व पन्नासच्या दशकातही त्याचे काम व्यवस्थित चालू होते. महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे हे ‘हिंदुधर्मातील सुधारणांची आवश्यकता’ या विषयावर व्याख्याने देत. हिंदू कोड बिलावर चर्चा करण्यासाठी एप्रिल १९५० मध्ये मध्यवर्ती सरकारने एक परिषद बोलावली होती. त्या परिषदेस महामहोपाध्याय काणे आणि कोकजेशास्त्री हजर होते. परिषदेनंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई येथे काण्यांच्या बरोबर या प्रश्नाबद्दल चर्चाही केली होती. मंडळाने विवाहादी संस्कारांबद्दल संक्षिप्त ; परंतु सर्व महत्त्वाच्या गोष्टींचा अंतर्भाव असलेल्या कर्मकांडाच्या पुस्तिका प्रसृत केल्या होत्या. मंडळाचे कार्यकर्ते कोणत्याही जातीच्या हिंदूकडे त्याने बोलावल्यास ही धर्मकृत्ये करण्यास जात असत. तसेच ख्रिस्ती, मुस्लिम, ज्यू, पारशी वगैरे धर्मातील स्त्री-पुरुषांचे शुद्धीकरणसुद्धा करण्यात आले. १९५२ साली धर्मनिर्णयमंडळाचे अधिवेशन वाई येथील प्राज्ञपाठशाळेच्या सरस्वती मंदिरातच झाले. या अधिवेशनात धर्मविचाराबरोबरच मूलभूत राजकीय विचारालाही मोठे स्थान मिळाले होते. आचार्य स.ज.भागवत या अधिवेशनाला उपस्थित होते. ‘धर्मनिर्णयमंडळाने प्रत्यक्ष तपशिलात न शिरता आर्थिक विषयात शोषण नसावे असे सांगून लोकशाही, राष्ट्रस्वामित्व आणि विकेंद्रीकरण यांची तात्त्विक बाजू लोकांपुढे मांडावी’ असे त्यांनी सुचवले. लक्ष्मणशास्त्री जोशींनी या विचाराला पाठिंबा दिला. पूर्वी कायदे करणाऱ्याजवळ (धर्म आणि समाजनेत्यांजवळ) सत्ता नव्हती. आता लोकच कायदे करू शकतात हे मान्य झाल्यामुळे कायदे कसे असावेत याविषयी मंडळाने मार्गदर्शन करावे असा विचार श्री. चिक्केरूर यांनी मांडला. मंडळाची घटना दुरुस्त करण्याचा विचार करताना नव्या घटनेत हिंदू शब्द वगळावा व सर्व धर्मांच्या सुधारणेचाही विचार करता यावा असेही मत मांडण्यात आले होते. या परिषदेतील एक महत्त्वाचा ठराव म्हणजे हिंदू कोड बिलाला तिने दिलेला पाठिंबा. हिंदू कोड बिलाच्या विरोधकांची समजूत काढण्याकरिता हिंदू कोड बिलच खच्ची करण्याचे जे धोरण सरकारने अवलंबिले होते, त्याबद्दल परिषदेने नापसंती व्यक्त केली. या काळात धर्मनिर्णयमंडळाच्या कार्यात किंवा निदान विचारमंथनात जे सहभागी झाले होते, त्यात महामहोपाध्याय काणे, आचार्य स.ज.भागवत, पुढे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू झालेले त्र्यंबक कृष्ण टोपे आदी अनेक महत्त्वाची नावे दिसतात. स्वातंत्र्योत्तर काळात धर्म आणि समाज यांच्या नियमनाचे कायदे करताना तज्ज्ञांचा विचारही घेण्याची प्रथा पडली असती तर अधिक योग्य झाले असते. दुर्दैवाने सामाजिक व धार्मिक बाबतीतील कायदेसुद्धा त्या सुधारणेची समाजाला किती आवश्यकता आहे, यावरून न ठरवता आनुषंगिक राजकीय परिणाम लक्षात घेऊनच होण्याचे प्रकार काही वेळा घडतात.
शास्त्री-पंडितांचा पाठिंबा मिळवण्याचा गांधीजींचा प्रयत्न स्वातंत्र्यचळवळीत जीवनाचा सम्यक विचार करताना महात्मा गांधींनी अस्पृश्यतेचा प्रश्नही हाती घेतला होता. अस्पृश्यता ही मूळ हिंदू धर्मात नाही व ती शास्त्रसं त नाही असे प्रतिपादन करणारा जर धर्मपंडितांचा वर्ग असेल तर या प्रथेविरुद्ध लोकमत तयार होणे सोपे जाईल असा विचार त्यांच्या मनात होता. धर्मसंहितांच्या आधारानेच वाद करून अस्पृश्यतेच्या रूढीविरुद्ध बाजू मांडणारे कोणी मिळतात का, हाही त्यांचा प्रयत्न होता. १९३० आणि १९३२ अशा दोन्हीवेळी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्र्यांनी गांधीजींच्या चळवळीत भाग घेऊन सत्याग्रह केला होता. धुळ्याच्या जेलमध्येच जमनालाल बजाजही शिक्षा भोगीत होते. लक्ष्मणशास्त्रींच्या धर्मविषयक पुरोगामी मतांचा त्यांना परिचय झाला होता. त्यांनी लक्ष्मणशास्त्रींना तुरुंगातून निरोप देताना ‘मी बापूजींना तु च्यासंबंधी पत्र लिहीत आहे, तुम्हाला बापूजींचे निमंत्रण येईल. तरी हे लक्षात ठेवून फिरतीचा कार्यक्रम ठरवा’ असे सांगून ठेवले होते. १९३३ साली सुटका होऊन घरी आल्यानंतर येरवडा जेलमधून आलेला महात्मा गांधींचा निरोप हरिभाऊ फाटकांर्फित लक्ष्मणशास्त्र्यांना मिळाला. निरोप मिळताच शास्त्रीजी पुण्याला रवाना झाले. ‘तुरुंगातून राजकीय काम मी करणार नाही’ असे गांधीजींनी ओशासन दिल्यामुळे सामाजिक काम आणि चर्चा यांसाठी त्यांना सर्व सवलती तुरुंगात उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यांनी निमंत्रण दिलेले लोक तुरुंगात येऊन त्यांना भेटू शकत असत व तेथे चर्चाही होऊ शकत. फेब्रुवारी ते जूनपर्यंत सुरे चार महिने येरवडा तुरुंगात अस्पृश्यतेच्या प्रश्नावर चर्चा चालू होत्या. लक्ष्मणशास्त्रींचा मुक्काम पुण्यातच असे. गांधीजी त्यांना बोलावून घेत. या चर्चांना ख्यातनाम दार्शनिक बाबू भगवानदास, आचार्य आनंद किशोर ध्रुव यांसारख्या आधुनिक शास्त्राभ्यासकांच्या बरोबर काशी, कलकत्ता, मद्रास, वाई, नाशिक अशा अनेक ठिकाणच्या पारंपरिक अध्ययन केलेल्या पंडितांनाही गांधीजींचे निमंत्रण असे. त्यात स्वाभाविकपणेच बरीच मंडळी सनातनीही असत.
चर्चा चालू असताना धर्मशास्त्राप्रमाणे अस्पृश्यतानिवारण होऊ शकते असे जाहीर करणारे एक पत्रक असा विचार असणाऱ्या पंडितांर्फित प्रसिद्ध करावे असे गांधीजींना वाटले. हे पत्रक आपण लिहा असे गांधीजींनी केवलानंदांना सांगितले तेव्हा त्यांनी लक्ष्मण हे पत्रक तयार करील व ते पाहून मी अंतिम करतो असे सांगितले. लक्ष्मणशास्त्र्यांनी लिहिलेले व त्यांची इतरांच्या सह्या असलेले हे पत्रक पुढे प्रसिद्ध झाले. या वादकाळात काही नाट्यमय प्रसंगही घडले. वादाचा प्रारंभ होताना सनातनी मंडळींनी प्राथमिक मुद्द्यावर लेखी सहमती व्हावी असा आग्रह धरला. सहमतीचे मुद्दे कोणते, यांवर बराच खल झाला. येरवडा तुरुंगाच्या दिंडी दरवाजातून बाहेरचा कागद आत जायचा आणि आतील मंडळी (ज्यात गांधीजी, लक्ष्मणशास्त्री आणि रघुनाथशास्त्री कोकजे हे होते.) त्यावर मान्य किंवा अमान्य असे लिहून आपले प्रस्तावही लेखी पाठवायची. असा बराच घोळ होऊन शेवटी ही अतिसावध सनातनी मंडळी त्या दिवशी चर्चेला आलीच नाहीत.
दुसरा प्रसंग हा फारच हृदयस्पर्शी आहे. एके दिवशी गांधीजींनी बारा वाजता आपण चर्चा सुरू करू असे केवलानंदांना सांगितले. केवलानंद म्हणाले, ‘बारा ही माझ्या भिक्षेची वेळ आहे, मी त्यात बदल करू शकत नाही.’ गांधीजी हरणार थोडेच. ते म्हणाले, ‘आज मीच तुम्हाला भिक्षा घालतो.’ महात्माजींनी तुरुंगातलीच भाकरी आणि वरण केवलानंदांना भिक्षा म्हणून दिले. केवलानंदांनी ते आनंदाने स्वीकारले आणि लगेच खाल्लेही. हे अन्न गोड लागते आहे, असा अभिप्रायही दिला. ही घटना फार बोलकी आहे. बाह्य कर्मकांडापेक्षा त्यामागचे तत्त्व लक्षात घेणारा केवलानंदासारखा ऋषी एक क्रांतिकारक गोष्ट करीत होता आणि गांधीजींचा प्रभावही त्याला कारण होता. ही भिक्षा एका वैश्याने घातली होती आणि त्यातले अन्न कोणत्या जातीच्या किंवा धर्माच्या माणसाने शिजवले होते हेही माहीत नव्हते.
या काळातच २१ दिवसांचा एक उपवास गांधीजींनी आरंभिला. त्यांच्या प्रकृतीची चिंता देशभर व्यक्त होऊ लागली. गांधीजींचे सचिव महादेवभाई देसाई काळजीमुळे अस्वस्थ असणे स्वाभाविक होते. त्यांची अवस्था लक्ष्मणशास्त्रींनी केवलानंदांच्या कानावर घातली तेव्हा ‘महात्म्याला उपवासात कसलाही उपद्रव होत नसतो. उपवासकाली परमात्मोपासना शांतपणे चालू राहते, आत्मचैतन्याचे सामर्थ्य एकदम वाढते, असे तू महादेवभाईंना सांग’ असा केवलानंदांनी निरोप दिला. हा निरोप महादेवभाईंना व नंतर गांधीजींनाही लक्ष्मणशास्त्र्यांनी सांगितला. या उपवासादरम्यानच गांधीजींची तुरुंगातून मुक्तता झाली व ते येरवड्याच्या कोपऱ्यावरील प्रमिलाबाई ठाकरसी यांच्या बंगल्यात राहू लागले. गांधीजींचा उपवास संपल्यानंतर काही दिवसांनी लक्ष्मणशास्त्र्यांनी आणखी एका कृतिशील सुधारणेला हातभार लावला.
प्रतिलो विवाहाचे पौरोहित्य
महात्मा गांधींचा मुलगा देवदास आणि राजगोपालाचारींची मुलगी लक्ष्मी यांनी विवाहबद्ध होण्याचे ठरवले होते. या विवाहाला पालकांची संमती अद्याप मिळावयाची होती. राजगोपालाचारी ब्राह्मण तर गांधीजी वैश्य त्यामुळे हा प्रतिलोविवाह ठरत होता. हा शास्त्रसंत होईल का, असा प्रश्न होता. गांधीजींनी याबाबत लक्ष्मणशास्त्र्यांचे मत घ्यावे असे ठरवले. स्वतः राजगोपालाचारींनी लक्ष्मणशास्त्र्यांबरोबर चर्चा केली होती. लक्ष्मणशास्त्र्यांचा अधिकार गांधीजींना मान्य होण्याचे एक कारण शास्त्रीबुवांनीच एका मुलाखतीत सांगितले आहे. बाबू भगवानदास आणि आचार्य ध्रुव यांनी हिंदीत दोन निबंध लिहून आणले होते. अस्पृश्यतेच्या संदर्भातील या निबंधात मीमांसादृष्ट्या काय अडचणी आहेत, हे लक्ष्मणशास्त्र्यांनी गांधीजींना सांगितले. गांधीजी हे अतिशय तल्लख वकिली बद्धीचे असल्यामुळे त्यांना मद्दे ताबडतोब लक्षात आले आणि लक्ष्मणशास्त्र्यांच्या ज्ञानाबद्दल त्यांना विशास निर्माण झाला. लक्ष्मी आणि देवदास यांचा विवाह लक्ष्मणशास्त्र्यांनी लावावा अशी सूचना काका कालेलकरांनी केली. ‘हा विवाह परंपरेच्या विरुद्ध नाही का’, असा प्रश्न गांधीजींनी शास्त्रीबुवांना विचारला. ‘होय. हा प्रतिलो विवाह होईल; पण मी हा लावण्यास तयार आहे’, असे त्यांनी उत्तर दिले. ते पुढे म्हणाले, ‘जातिनिष्ठ वर्णव्यवस्था मानणारा मी नाही. म्हणून हा समानवीय विवाह आहे, असे मी मानतो. दोन घरांत जर समान संस्कृती, समान आचार असतील तर विवाह टिकतात आणि तुमच्या दोन्ही कुटुंबातील परिस्थिती अशीच आहे. जातिव्यवस्था काल्पनिक आहे. वर्णव्यवस्था कर्म लक आहे.’ पुढे हा विवाह शास्त्रीबुवांनी लावला. नंतरच्या काळात उत्तरेत जेथे अस्पृश्यतेबद्दल शास्त्रार्थ व्हावयाचा असेल, तेथे गांधीजी मुद्दाम तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्रींना पाठवत असत. महंमद गजनीने फोडलेल्या व लुटलेल्या सौराष्ट्रातल्या सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ठरले. स्वतः राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद आपल्या काही सहकाऱ्यांची नाराजी बाजूला सारून त्या कार्यक्रमात यजमानकृत्य करण्यासाठी आले. मंदिर नव्याने बांधले होते व त्यात नव्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावयाची होती. या विधीचे पौरोहित्य करण्यास सनातनी मंडळी तयार होईनात. कारण या मंदिरात कोणत्याही धर्माच्या मानवाला प्रवेशाचा आणि कोणत्याही जातीच्या हिंदूला पूजेचा अधिकार असणार होता. या प्रतिष्ठापनेचे पौरोहित्य केवलानंद सरस्वती व तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी या दोघांनी केले व देवालयांच्या जीर्णोद्धारात एक नवा अध्याय लिहिला.
धर्मसुधारणेचा जो आग्रह केवलानंद आणि लक्ष्मणशास्त्री हे गुरु-शिष्य आणि त्यांचे सहकारी धरीत होते, त्याचा आधार धर्मशास्त्राकडे पाहण्याची नवी दृष्टी हाच होता. हिंदुधर्मशास्त्रातील वचनांचा अर्थ लावण्याची पद्धत मीमांसेने निश्चित केली आहे. श्रुती आणि स्मृती यांतील प्रत्येक वचनाच्या प्रामाण्याचा स्वीकार हे मीमांसापद्धतीचे आधारभूत तत्त्व आहे. दोन शास्त्रवचने जर परस्परविसंगत असतील तर त्यांतील निदान एक विधान असत्य सगजावे लागेल असे गानून गीगांसापद्धती शास्त्रवचनाचे शब्दप्रागाण्य निश्चित करते. धर्मशास्त्राकडे पाहण्याची ऐतिहासिक दृष्टी वेगळाच दृष्टिकोण रवीकारते आहे. विविध काळात त्या त्या परिस्थित्यनुसार आणि बदललेल्या मूल्यानुसार माणसांनी धर्मशास्त्रात वेळोवेळी बदल केले आहेत असे ऐतिहासिक पद्धती मानते. एकदा ही पद्धती मानली म्हणजे धर्मशास्त्रात अनुभवाचे संचित आणि नव्याने प्राप्त झालेले ज्ञान यांना अनुसरून बदल करण्याचा अधिकार आहे असे ठरते. मीमांसापद्धतीचाही अभ्यास प्राज्ञपाठशाळेने केला; परंतु ऐतिहासिक पद्धतीचा त्यांनी जाणीवपूर्वक पुरस्कार केला. यामुळेच त्यांना धर्मसंस्थेच्या आणि धर्माचरणाच्या परिवर्तनशीलतेचे यथायोग्य ज्ञान झाले आणि सुधारणांची गरज आणि शक्यता लक्षात आली.
स्वतंत्र भारताच्या सरकारने आपल्या शासनाचा कोणताही धर्म असणार नाही असे ठरवले हे योग्य झाले. परंतु लोकजीवनात धर्म कायमच राहणार होता व काही बाबतीत धर्मनियम समजल्या जाणाऱ्या पारंपरिक रूढींचे नियमन सरकारला करावेच लागणार होते. विवाह, वारसा, पोटगी, दत्तक अशा काही बाबीही धार्मिक परंपरेने नियंत्रित केल्या असल्या तरी त्यासंबंधी काही कायदे करणे आवश्यक होते. असे कायदे एका अर्थाने धर्मसुधारणाच समजता येतील. धार्मिक बाबतीतील हे कायदे करताना ज्यांनी नव्या मानवी मूल्यांच्या प्रकाशात धर्मनियमांचा विचार केला त्यांचा सल्ला घेणे केव्हाही हितकारक असते; परंतु राजकारणात विवेकी शक्ती कमकुवत आणि परंपरावादी शक्ती बलवान असेच चित्र दिसते आणि राजकारण या परंपरावादी शक्तींना शरण जाते. हिंदू कोड बिल मूळ स्वरूपात संत न होता ते परत घ्यावे लागले ही भारतीय न्यायक्षेत्रातील दुर्दैवी घटना होती. परंपरावाद्यांचा मुकाबला करण्याचे धैर्य सरकारला झाले नाही. नंतरच्या काळात तर अशा बाबतीत सरकारे अधिकच दुबळी झाली. मुस्लिम घटस्फोटित स्त्रीला इतर स्त्रियांप्रमाणेच असलेला पोटगीचा धर्मनिरपेक्ष अधिकार नाकारणारा कायदा झाला तो मूलभूत मानवीहक्कांचा आग्रह सोडून, धर्मसुधारणेचा धर्मनिरपेक्ष मार्ग नाकारण्याचे अलीकडील उदाहरण होय.
समाजजीवनातील धर्म पूर्णपणे वगळून टाकता येणे नजीकच्या काळात तरी अशक्य आहे. धर्म हा व्यक्तीच्या श्रद्धेपुरता मर्यादित असावा, व्यवहारात व्यक्तीच्या मूलभूत हक्काचे हनन होऊ नये, असेच धर्मनियम असावेत असा प्रयत्न एकेकाळी धर्मसुधारक करीत होते. आज आपली वाटचाल उलट दिशेला चालू आहे. अधिकाधिक अंधश्रद्धा वाढाव्यात, विविध समाजगटांत द्वेषभावना वाढावी म्हणजे त्यातून राजकीय लाभ मिळवता येतो हे गणित अनेकांच्या मनात पक्के रुजले आहे. अश्यावेळी समाजाच्या पुनर्बाधणीसाठी ऐतिहासिक पद्धतीने धर्मपरंपरा आणि रूढींचा अभ्यास करून धर्म परिवर्तनशील आहे व कालमानानुसार आवश्यकतेप्रमाणे त्यात बदल होऊ शकतात हे समाजाला सांगणारा धर्माभ्यासकांचा एक अंतर्गत प्रवाह केवलानंद सरस्वती आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी या गुरुशिष्यांनी आणि त्यांच्या शिष्यसहकाऱ्यांनी निर्माण केला होता, याचे स्मरण महत्त्वाचे आहे.
(पद्मगंधा, दिवाळी विशेषांक २०१३ वरून साभार) १३, जयनगर, दशमेशनगरजवळ, औरंगाबाद-४३१००५, फोन : (०२४०) २३३११६६

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.