प्राचीन भारतीय कल्पना

प्राचीन भारतीयांनी इतिहासलेखन असे फारसे केलेच नाही. तथापि इतिहासाविषयी, कालप्रवाहाविषयी, स्थित्यंतरे आणि त्यामागील सूत्रे ह्या अनुरोधाने पुष्कळ विवेचन ऋग्वेदकालापासून पुढे कित्येक शतके केलेले दिसते. इतर प्राचीन संस्कृतींप्रमाणे भारतातही दैवी शक्तीवर विश्वास होताच. निसर्गात बदल घडविणाऱ्या देवता मानवी जीवनाच्याही नियंत्रक होत्या. तेव्हा कर्ताकरविता परमेश्वर, माणसे म्हणजे त्याच्या हातातील बाहुली ही कल्पना आलीच. आपण काहीतरी करतो आणि त्यामुळे काहीतरी घडते असे माणसांना उगीच, अज्ञानामुळे वाटत असते. वस्तुतः परमेश्वरच सर्व करवितो. परमेश्वर हे जे करतो, ते अज्ञ मानवांना धडे शिकवण्याच्या हेतूने असेल; ते त्याच्या वैश्विक योजनेचा केवळ एक लहानसा भाग असेल किंवा त्या सगळ्या नुसत्या त्याच्या लीला असतील- काहीही असेल परंतु सर्व गोष्टींमागे परमेश्वरी सूत्र असते हा विचार प्राचीन भारतीय साहित्यात अनेक ठिकाणी, अनेक प्रकारे व्यक्त झालेला दिसतो.

आणि परमेश्वर हे जे सगळे घडवीत आहे त्याची काहीएक प्रदीर्घ योजनाही काहींच्या प्रत्ययास आली. त्यातून मन्वन्तर, कल्प, महायुग, युग आणि युगधर्म वगैरे तपशीलांचा विस्तार झाला. परमेश्वराने अमुक युगात, अमुक प्रकारेच माणसांना वागायला लावावयाचे असे ठरविलेले असते. त्यासाठी परमेश्वर पुन्हा पुन्हा मानवांच्या साह्याने आपल्या योजनेबरहुकूम कामे पार पाडीत असतो. -सदाशिव आठवले (इतिहासाचे तत्त्वज्ञान ह्या पुस्तकातून)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.