विज्ञान आश्रमातील समुचित तंत्रज्ञान

ग्रामीण विकासासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग आवश्यक आहे, अशी कलबाग सरांची श्रद्धा होती. आपल्या कामाचा वेग, उत्पादकता व कार्यक्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञान आपल्याला मदत करू शकते. म्हणून विज्ञान आश्रमात तंत्रज्ञानावर भर आहे.

कुठले तंत्रज्ञान कुठल्या भागात आणि कशासाठी सोयीचे आहे, हे पडताळून बघावे लागते. ते तंत्रज्ञान कोणत्या परिस्थितीत स्वीकारले जाईल ते तपासून बघावे लागते. हे तपासून बघण्याचे काम शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या प्रकल्पामार्फत करता यावे असा आमचा प्रयत्न असतो. प्रदर्शनामध्ये त्यांना जे प्रकल्प करायचे असतात, त्यासाठी हेच प्रयोग देता येतात. गावातले विकासाचे जे प्रश्न आहेत, त्यांना उत्तरे शोधण्यासाठी काही तंत्रे वापरून बघितली जातात. त्यांच्या नोंदी ठेवल्या जातात. एखादे साधन वापरून त्याचा कसा उपयोग होतो, काय त्रुटी आढळतात, काय अडचणी येतात याच्याही नोंदी ठेवल्या जातात. त्यात ज्या सुधारणा सुचतात, त्यांचा पाठपुरावा करून एखादे तंत्रज्ञान विकसित करता येते. विज्ञान आश्रमात विकसित झालेल्या अनेक गोष्टी या अशाच प्रकारे विकसित झाल्या आहेत.

विज्ञानाश्रमात विकसित झालेली समुचित तंत्रे
१. पाबळ जिओडेसिक डोम –
बकमिन्स्टर फुलर नावाच्या शास्त्रज्ञाने या डोमचा शोध लावलेला होता. या डोमसाठी अगदी कमी साधने पुरतात. वापरलेले लोखंड आणि मिळणारी ताकद यांचे गुणोत्तर बघितले, तर या रचनेमध्ये कमीत कमी साधनसामुग्री वापरून जास्तीत जास्त ताकद मिळते. पण हा डोम बांधायला कौशल्य फार लागत असे. हे तंत्र सोपे करण्यांसाठी विज्ञानआश्रमात विद्यार्थ्यांच्या मदतीने प्रयोग केले. श्री. विजयकुमार व श्री. कासिम इनामदार यांनी त्या डोमच्या रचनेसाठी लागणारे भाग विशिष्ट पद्धतीने बनवले. तिथे लागणारे लोखंडी अँगल जोडण्यासाठी सांधे बनवले. त्याला आम्ही तवे (Dish) म्हणतो. सांध्यापाशी जो विशिष्ट कोन लागतो, तो कोन असलेले तवे आम्ही बनवून घेतले. तव्यांसाठी डाय तयार करून घेतले. ठरावीक लांबीच्या अँगलना ठरावीक रंग दिले. आता थोड्याशा प्रशिक्षणानंतर हे भाग वापरून, गावातल्या कारागिराला हा डोम बांधता येऊ लागला. कमी श्रमात कमी कौशल्यात या डोमचा सांगाडा बनू लागला. चटकन बांधता येणारी घरे म्हणून जिओडेसिक डोमचा भरपूर प्रसार झाला. शेकडो – हजारो डोम बांधले गेले.

२. भूजल संशोधणारे यंत्र
पाबळमध्ये पाण्याचा प्रश्न असल्याने विंधन विहिरी घ्यायची वेळ वारंवार येते. विंधन विहिरी घ्यायला जागा ठरवण्यासाठी अतिशय अवैज्ञानिक पद्धतीने काम होत असे. उदा. पायाळू माणसाला त्याबद्दल अंदाज विचारणे वगैरे… त्यामुळे जागा चुकत आणि खर्च वाया जाई. अर्थ रेझिस्टिव्हिटी मीटर नावाच्याच उपकरणाने जमिनीचा विद्युत विरोध मोजून, पाणी कुठे लागेल याचा अंदाज मिळू शकतो. हे तंत्रज्ञान उपलब्धच होते. ते आपल्या भागात वापरायला सुरुवात करायची असे आम्ही ठरवले. आपल्या भागात ते सुकरपणे वापरता यावे यासाठी प्रयोग सुरू केले. तंत्रज्ञानाचे सुलभीकरण केले. त्यातला क्लिष्टपणा, गूढपणा काढायचा प्रयत्न केला.

खरे शास्त्र, खरे तंत्रज्ञान अत्यंत तर्कशुद्ध असते. पायऱ्या पायऱ्यांनी शिकत गेले, तर समजणे सोपे होते. अशा पद्धतीने तंत्रज्ञानाचा स्वीकार करायला हवा.

अर्थ रेझिस्टिव्हिटी मीटरचा उपयोग करायला आम्ही शिकवू लागलो. विंधन विहिरी घेणाऱ्याच लोकांना याचे प्रशिक्षण देऊ लागलो. अशी यंत्रे बनवली. या यंत्राने जमिनीच्या आत दीडशे फुटापर्यंतच्या पाण्याचा अंदाज घेता येत होता. त्यापेक्षा खोल क्षमता असलेली यंत्रेही आता बाजारात उपलब्ध आहेत. अगदी हजार फुटापर्यंतचा अंदाजही घेता येतो. पण आम्ही असा निर्णय घेतला आहे की दीडशे फुटाखाली आपण जायचे नाही. तंत्रज्ञान जरी उपलब्ध असले, तरी त्याचा वापर विवेकानेच व्हायला हवा.

३. मेक-बुल (Mech-Bull)
हे तंत्र असेच सोपे करून वापरात आणले. बाजारात 50-55 H.P. चे ट्रॅक्टर उपलब्ध होते. पण लहान शेतकऱ्यांना ते गरजेचे नव्हते, परवडतही नव्हते. बैलाच्या दोन महिन्याच्या कामासाठी, वर्षभर त्याचे चारापाणी परवडत नाही. अशा शेतकऱ्यांसाठी आम्ही मेक-बुल बनवला. कमी ताकदीचा छोटा ट्रॅक्टर.

कमी अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरला मागणी नसेल, तो तयार करणे व्यवहार्य नाही असे समजून इकडे कोणी फारसे लक्ष दिले नव्हते. पण ती गरज लक्षात घेऊन आम्ही असा छोटा ट्रॅक्टर बनवला. डिझेल इंजिन घेऊन त्याबरोबर जीपची गिअर बॉक्स वापरून, इतर साधने तयार केली. त्याचे मॅन्युअल बनवले. ते वापरून लोकांनी आपापले ट्रॅक्टर बनवले. शिंगाडे नावाच्या विज्ञान आश्रमाच्या विद्यार्थ्यांने कनेरसर येथे वर्कशॉप टाकून असे ट्रॅक्टर बनवायला सुरुवात केली.

२००० सालानंतर बाजारात छोटे ट्रॅक्टर मिळू लागले होते. तंत्रज्ञानाची गरज स्पष्टपणे लोकांपुढे मांडली गेली होती, तेव्हा आम्ही हा उद्योग बंद केला. शैक्षणिक प्रकल्प म्हणून मेक-बुल तयार करताना, वेगवेगळ्या प्रकल्पातून मुलांनी कामे केली. कोणी गिअर बॉक्स बनवायच्या रचनेचा आराखडा केला. कोणी विहिरीवर मेक- बुल वापरण्यासाठी प्रयोग केले. कोणी ट्रॅक्टरची ट्रॉली तयार केली. समाजातल्या वेगवेगळ्या गरजा ओळखून, ती शिक्षणाची संधी समजून त्यावर काम करायचे या पद्धतीने आम्ही तंत्रज्ञान विकसित करत गेलो.

४. प्रकल्पातून विकसित झालेली तंत्रे
आमच्या नावाच्या वेबसाइटचा विकास असाच झाला. (AAQA – Almost all Question & answers) शेतकऱ्यांच्या प्रश्नांना कृषिविज्ञान केंद्रातल्या तज्ज्ञांकडून उत्तरे मिळावीत यासाठी ही वेबसाइट तयार झाली. आय.आय.टी. (पवई), कृषिविज्ञान केंद्र (बारामती), आणि विज्ञान आश्रम (पाबळ) यांनी मिळून ही योजना तयार केली. सध्या, शेतकरी हिचे सभासद आहेत.

याशिवाय वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ आम्ही तयार केले. चिक्की बनवायची, तर विशेषतः कमी स्निग्धपदार्थ असलेली बनवायची. (त्यात जे शेंगदाणे – तीळ वापरायचे असतात, त्यातून थोडे तेल काढून घ्यायचे.) पुरणपोळीसाठी तयार पुरणाची (Ready-mix) पाकिटे बनवली. नागलीची शेव, शेवया बनवल्या. कवठाची जेली करण्याची कृती विकसित केली. मोहाच्या फुलांचा हलवा बनवण्यासाठी पाककृती तयार केली. असे अपारंपरिक पदार्थ तयार केले. बचतगटांना त्यांचा स्वतंत्र व्यवसाय उभारण्यासाठी अशा कृतींचा उपयोग होतो. या कृतीसुद्धा मुलांनी प्रकल्पांमध्येच तयार केल्या.

कोणत्याही उत्पादनासाठी लागणारा खर्च कमी करणे हाही प्रकल्पाचा भाग असतो. अन्नप्रक्रियेमध्ये शक्य असेल तो तो भाग सूर्यऊर्जेवर करणे, (उदा. शेंगदाणे भाजणे, भाज्या वाळवणे, बटाटे उकडणे इ.) त्यांच्या नोंदी ठेवून किती बचत होऊ शकते ते पाहणे, खर्च कमी करणे यासाठी प्रकल्प केले.

विज्ञानाश्रमात आल्यावर तिथल्या सर्व प्रकारच्या बांधकामात असे वेगवेगळे प्रयोग केलेले तुम्हाला दिसतील. प्रत्येक घर, प्रत्येक खोली, भिंती, छते वेगवेगळी आहेत. उन्हाळ्यात घर गरम होऊ नये, त्यात हवा खेळती राहावी, यासाठी मुलांनी अनेक वेगवेगळ्या रचना करून पाहिल्या. निरीक्षणे घेतली. त्या प्रत्येक रचनेची काय क्षमता आहे, काय दोष आहेत हे नोंदले. तसेच फेरोसिमेंट वापरूनही अनेक प्रयोग केले.
अशाच प्रकारे प्रकल्प पद्धतीने एक अंडी – उबवणी केंद्र तयार केले. शिवाय अॅक्वापॉनिक नावाचे एक नवीन तंत्र वापरायची पद्धत तयार केली आहे. त्यात माशांची शेती आणि शेतीला खत अशा दोन्हीची सांगड घातली जाते. शेतात मोठा खड्डा करून, त्यात खालपासून सलग प्लास्टिक कापड अंथरून पाणी साठवले, आणि त्यात मासे पाळले, तर एक अडचण येते. त्याच पाण्यात माशांची विष्ठा राहिल्याने त्यातले पाणी दूषित होते. मासे नीट वाढत नाहीत. अॅक्वापोनिक तंत्रात, या तळ्यातले पाणी पंपाने झाडांच्या वाफ्यातून फिरवून पुन्हा गोळा केले जाते, परत तळ्यात सोडले जाते. माशांच्या विष्ठेमुळे या पाण्यात जो अमोनिया व नायट्रेट तयार होतात, तेच झाडांना खत म्हणून वापरता येते. झाडे ते शोषून घेतात, त्यामुळे पाणी शुद्ध होऊन परत माशांच्या तळ्यात येते. झाडे या चक्रात सेंद्रिय शुद्धीकरणाचे काम करतात. अशी तंत्रज्ञाने आश्रमात तयार होतात.

आश्रमाची ताकद
कुठल्याही प्रश्नाला उत्तर असते हा विश्वास आश्रमात राहून मनात निर्माण होतो. या सगळ्या अडचणी सोडवणे हे मोठेच काम आमच्या हातात असते. प्रत्येक अडचण ही एकेक संधी असा आमचा दृष्टिकोन आहे. देश परदेशातून (उदा. आय.आय.टी.मधून, एम.आय.टी.मधून) अनेक विद्यार्थी प्रकल्पासाठी आमच्याकडे येतात याचे कारणच असे आहे, की आमच्यापुढे समाजाच्या अडचणी आलेल्या असतात. यांच्यापुढे पाय रोवून उभे राहायचे आहे – त्या सोडवायच्या आहेत – हेच तर विद्यार्थ्यांना शिकवायचे असते.

समस्या आली की ‘ती सोडवण्यासाठी काही तंत्रज्ञान उपलब्ध आहे का? ते वापरता येईल का? त्यासाठी काय करावे लागेल? तंत्र उपलब्ध नसेल तर काय करावे लागेल?’ असे त्याचे विश्लेषण करण्याची दृष्टी तयार होणेच महत्त्वाचे असते. तुम्ही किती नवीन तंत्रे तयार केली हे गौण आहे, तुम्ही प्रश्न किती सोडवलेत, किती प्रश्नांशी लढलात हे महत्त्वाचे. आम्ही असे पुष्कळ प्रश्न सोडवायला घेतो. सगळे काही यशस्वीपणे सुटतात असे नाही. त्यामुळे आमचे अयशस्वी प्रकल्प कदाचित जास्तही असतील. विज्ञानाश्रमात याच्या खुणा जागोजागी दिसतात, पण हे सगळ्यांचे शिकणे असते असे मला वाटते.

तुम्ही काहीही बनवू शकता
या सगळ्या प्रवासात आमची गाठ मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑव्ह टेक्नॉलजीचे डॉ. नील ग्रेशनफील्ड यांच्याशी पडली. ‘सेंटर फॉर बिट्स अॅन्ड आयटम’ चे संचालक. ते तिथे हाउ टू मेक अलमोस्ट एनिथिंग How to make almost anything नावाचा वर्ग चालवतात. तुमच्याकडे एखादी कल्पना असेल, तर त्यानुसार वस्तू बनवायला या वर्गात मदत केली जाते. त्यासाठी लागणारी साधने उपकरणे – तंत्रे – तज्ज्ञांची मदत हे सारे तुम्हाला दिले जाते. ते भारतात एका कॉन्फरन्सला आले असताना त्यांना पाबळ विज्ञानाश्रमाची माहिती समजली. कानपूर येथील आय. आय. टी. चे प्राध्यापक धांडे आणि ग्रेशनफील्ड दोघेही इथे येऊन डॉ. कलबागांना भेटले. या बैठकीत त्यांनी मिळून ठरवले, की इथले व्यवहारातले खरे प्रश्न तिथल्या विद्यार्थ्यांना प्रकल्प म्हणून द्यावेत. मग आम्ही त्यांना कामाची मोठी लिस्ट पाठवली. मी त्यांच्या विद्यार्थ्यांशी बोलू लागलो. माझ्या असे लक्षात आले, की आम्ही जे सांगतोय ते त्यांना कळत नाहीये. तिथली परिस्थिती, तिथले संदर्भ इतके वेगळे होते की असे कळणे दुरापास्तच होते. कितीही स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना नक्की अंदाज येत नसे. मग शेवटी आम्ही आमच्या डोक्यातल्या कल्पनाच प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांना साधने / उपकरणे मागू लागलो. ती यंत्रे घेऊन आपणच करून बघावे असे ठरवले. यातून एकेक यंत्र इथे येऊ लागले.

ग्रामीण भागात काही प्रश्नांच्या उत्तरांसाठी उच्च तंत्रज्ञान आवश्यक असते. उदाहरण घेऊया पहाटे पडणाऱ्या दंवाचे. आमच्याकडे काही शेतकरी असा प्रश्न घेऊन आले होते की, जास्त दंव पडले तर त्यांच्या पिकावर कीड पडते. मग हे दंव पडण्याचा कालावधी मोजून पाहता येईल का, तो मोजून पुढची उपाययोजना ठरवता येईल का, हे तपासायचे ठरले. बाजारात जे साधन उपलब्ध होते, त्यात तापमान, आर्द्रता, पाऊस, वाऱ्याचा वेग सगळे काही मोजता येई. पण आम्हाला फक्त एकच गोष्ट मोजायची होती – दंव किती वेळ पडले. दंव दोन तासापेक्षा जास्त पडले, तर उपाययोजना करायची; नसेल तर सोडून द्यायचे.

यासाठी जो सेन्सर लागणार होता, तो उच्च तंत्रज्ञानानेच तयार होणारा आहे. तो बनवायला खर्च कमी कसा येईल, ते पाहता येईल. पण तंत्रज्ञान उच्चच लागणार. मोठ्या उपकरणाची किंमत कितीही असली, तरी त्यातला एकच लहानसा भाग वापरायचा आहे. हा भाग तयार करण्यासाठी जे उच्च तंत्रज्ञान लागणार ते आम्हाला फॅब लॅबकडून उपलब्ध झाले.

फॅब-लॅब ही एक चळवळ आहे. विज्ञान आश्रमात फॅब लॅब सुरू झाली याचा आम्हाला अभिमान आहे. जगभरात सगळ्या खंडांमध्ये मिळून अशा लॅब आहेत. ही डिजिटल फॅब्रिकेशन लॅबोरेटरी आहे. इथे कॉम्प्युटर अत्यंत अचूकपणे वस्तू बनवून देतो. त्यासाठी त्यात लेझर कटर, मिलिंग (पेषण), लाकूड कापणे अशासारख्या प्रक्रियांसाठी साधने असतात. मि.मी. किंवा मायक्रॉन इतकी अचूकता यात मिळते.
यू कॅन मेक ऑलमोस्ट एनिथिंग असे फॅब लॅबचे ब्रीदवाक्य आहे. तुमच्या डोक्यात काही कल्पना असेल, काही बनवायचे असेल, तर तुम्ही स्वतः हे यंत्र वापरू शकता. त्यासाठी वयाची शिक्षणाची कसलीही अट नाही. तुम्ही स्वतः काम करा, तुम्हाला इथे मदत मिळेल.

थोडक्यात काय, लोकांना हातात तयार तंत्रज्ञान / वस्तू देण्यापेक्षा ते कसे बनवायचे, हेच शिकवायचे. ते चिरकाल टिकते. वस्तू स्थानिक पदार्थांपासून बनवता येतात, तिथल्या तिथे बनवून वापरता येतात. आत्ता ही यंत्रे पुष्कळ महाग आहेत ( लाख रु.), पण काही वर्षांनी अशी यंत्रे स्वस्त होतील आणि शाळाशाळांतून असतील, तेव्हा लोक आपापल्या कल्पना प्रत्यक्षात आणू शकतील.

फॅब-लॅबच्या तंत्रामुळे जगभरात कुठूनही कुठेही ज्ञानाचे वहन होऊ शकेल असे स्वप्न आहे. तुमचा प्रश्न जगभरात इतरत्र समजल्यावर, त्याचे उत्तर शोधण्यासाठी सगळीकडच्या तंत्रज्ञांच्या कल्पना तुम्हाला उपलब्ध होतील. प्रत्यक्षात काम तुमचे तुम्ही करायचे. स्थानिक लोकांनी स्थानिक वस्तू – पदार्थ वापरून साधने तयार करायची आणि प्रश्न सोडवायचा अशी ती दिशा आहे.

स्थानिक संसाधने वापरून, जगभरातील ज्ञान वापरून, स्थानिक पातळीवर उत्पादन करता येते हे फॅब लॅबचे वैशिष्ट्य आहे व विकेंद्रित उत्पादन ही पुढील विकासाची दिशा आहे असे आम्हाला वाटते.

संचालक, जे. पी. नाईक केन्द्र,
एकलव्य पॉलिटेक्नीकच्या मागे, पौड रोड, पुणे

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.