शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई

“तुम्ही तुमच्या शब्दांनी मला जखमी करा
डोळ्यांनी माझे तुकडे तुकडे करा
तुमच्या द्वेषाने मला ठार मारा
पण हवेतून वर मी परत उभी राहीन”

ती आठ वर्षाची होती तेव्हाच तिने बोलणे टाकले. त्याच वर्षी तिच्या आईच्या मित्राने तिच्यावर बलात्कार केला होता. तिच्या पोटातील तीव्र यातना, रक्त, खटकन्, ऊसकलेली तिची कंबर, या पेक्षा तिला सर्वात भयानक जाणीव होती ती तिच्या आवाजाने घेतलेल्या त्या नराधमाच्या प्राणाची ! न्यायालयात त्याच्या विरुद्ध तिने उंच आवाजाने भोकांड पसरल्यावर त्याला जोड्यांनी ठार मारण्यात आले होते. त्यानंतर ती पाच वर्ष आपल्या भावाशिवाय इतर कोणाशीच बोलली नाही.

त्यावेळी अमेरिकेत काळ्या लोकांनी मूक राहणे नवीन नव्हते. ते शिव्या खात मरमर काम करीत व रात्री गलितगात्र होऊन उपाशीपोटी झोपत. तर कुठे चूक केली व उलट बोलले तर त्यांना झाडावर उलटे टांगून ठेवत. माया तर नुसती काळी नाही तर मुलगी होती. तिला तर काहीच बोलण्याचा अधिकार नव्हता.

त्यानंतरच्या अनेक मोडक्या संसारात ती फक्त नवरा सांगेल तशीच नजर खाली ठेवून जीभ चावत जगली. परंतु त्या उंच, राकट शरिरात कुठचा तरी निराळाच प्राण होता. तो आपण गोरी राजकन्या असल्याचे स्वप्न अहोरात्र पहात होता. स्वातंत्र्य व अभिमान त्याच्या नसानसात भिनले होते. “बेबी, तू तुझ्या आयुष्यात नावडणाऱ्या सगळ्या गोष्टी बदलून टाक”. तिची आई तिला सतत सांगायची. तिची शेजारीण तिला आग्रह करी. “आरशासमोर उभी रहा अन् तुझ्या कविता म्हण”. जेव्हा नशिबाने व तिच्या संसारातल्या पुरुषांनी तिच्याकडे पाठ फिरवली होती तेव्हाच ती शेक्सपियरच्या सुनीतांच्या प्रेमात पडली. कमनशिबी व त्याज्य असली तरी ती राधा बनून स्वर्गाच्या दारी अभंग गात राहिली.

तरूणपणी तिने नाच क्लब मध्ये शहरातल्या बसमध्ये पहिली स्त्री वाहक म्हणून स्वयंपाकी, Calypso गाणारी म्हणून काम करून पैसे कमावले. नंतर ती दलित वर्गाच्या दु:खांना वाटा फोडणारी फर्डी व्याख्याती बनली. तिने मार्टिन लुथर किंग व माल्मक समवेत ‘काळ्यांना जागे केले.

२८ मे ला वयाच्या ८६ वर्षी माया अंजोली हे जग सोडून गेली. पण तिचे हे शब्द इथेच ठेवून.
“एखाद्याच्या नभावर इंद्रधनुष्य पसरण्याचा प्रयत्न करा
तुम्ही स्वतः केल्याशिवाय काहीच होणार नाही.
नग्न माणसाने दिलेला सदरा आपल्याकडे घेवू नका.”

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.