निवेदन : सामाजिक समता केंद्र

नितिन आगे हत्येमुळे दलितांवरील अत्याचाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मोहसीन शेखच्या हत्येने धर्मांध राजकारणाचा धोका स्पष्ट केला आहे. आदिवासी आणि भटक्या जमातींच्या लोकांवर आणि स्त्रियांवर होणारे अत्याचार ही तर नित्याचीच गोष्ट आहे. या घटना थांबल्याच पाहिजेत. दलित, आदिवासी, भटके, आदी पददलितांना आणि अल्पसंख्याक व स्त्रियांना न्याय मिळवून देण्यासाठी निरनिराळ्या आघाड्यांवर कामगार कर्मचारी संघटना, सामाजिक संस्था, – प्राध्यापक शिक्षक संघटना, महिला संघटना अशा संस्था व व्यक्तींनी खारीचा वाटा उचलला आणि अशा कामांमध्ये समन्वय साधला तर निश्चित प्रगती साधता येईल. त्यासाठी आपल्या गावात सामाजिक समता केंद्र स्थापन करावे व त्यामार्फत प्रबोधनात्मक व कृतिशीलतेचे काम करावे, असा प्रस्ताव ठेवत आहोत.
सामाजिक समता केंद्र
सामाजिक समता केंद्रामध्ये अनुसूचित जाती, जमाती, भटके, विमुक्त, स्त्रिया, मुले यांच्यासाठी शासनाच्या योजनांबाबतच्या माहितीपुस्तिका, त्यांच्या संदर्भातील खास कायद्यांची माहिती पुरवणारे साहित्य व सदर प्रश्नांसंबंधी प्रबोधनात्मक साहित्य उपलब्ध करावे. त्यासंबंधी अंमलबजावणीबाबत अडचणी आल्यास त्या निवारण्यासाठी मदत. पददलित, अल्पसंख्य व स्त्रिया यांच्यावर अन्याय होत असेल तर त्याबाबत केंद्राकडे समस्या नोंदवण्याची व्यवस्था करून संवाद, चर्चा अशा सामोपचाराच्या मार्गाने समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन व प्रयत्न. दाखले, माहिती, मदत देण्याबाबत विविध शासकीय अधिकारी व तक्रार नोंद आदींबाबत पोलीस दुर्लक्ष करत असतील, तर त्यातून मार्ग काढण्यासाठी मदत व जरूरीप्रमाणे अन्य मदत करणे.
समता मंडळे
आपल्या भागात प्रबोधनाचे काम करण्यासाठी गावोगावी शाळा, महाविद्यालये, कचेऱ्या, वस्त्या, सोसायट्या येथे कार्यरत असलेली विविध मंडळे तयार असल्यास त्याद्वारा अथवा नव्याने समता मंडळे स्थापन करून त्यामार्फत सामाजिक समतेस पोषक असे शैक्षणिक, सामाजिक कार्यक्रम आणि विविध दिन, वादसभा, नाट्य-कवितासत्रे असे प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करावे.

पुणे येथील शंकर ब्रह्मे समाजविज्ञान ग्रंथालयाद्वारा (सचिव – सुलभा ब्रह्मे) सर्व सामाजिक समता केंद्रांशी संपर्क ठेवण्यात येऊन आवश्यक ते साहित्य पुरवणे आणि ठिकठिकाणच्या केंद्रांमध्ये समन्वयाची जबाबदारी घेतली जाईल. वरील प्रस्तावाबाबत सूचना अवश्य पाठवाव्या. आपल्या गावी सामाजिक समता केंद्रे सुरू करणे आपणास शक्य वाटत असेल तर अधिक माहितीसाठी संपर्क साधावा…
१२९ब/२, एरंडवणे, पुणे ४११००४, ०२०-२५४३२९३३;
sulabhabrahme 2013@gmail.com

सूचना आजचा सुधारकचा पुढील म्हणजे ऑगस्ट २०१४ चा अंक हा ‘अनुवंश परिवर्तित अन्न’ (Genetically Modified Food) या विषयावरील विशेषांक असणार आहे. तरी इच्छुकांनी आपले लेख व इतर साहित्य दि. २० जुलै २०१४ पर्यंत संपादकांकडे अथवा आ.सु. च्या कार्यालयात पाठवावेत.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.