जनुक-संस्कारित अन्नापासून सावधान: डॉक्टरांचा इशारा

अमेरिकन अॅकॅडमी ऑफ एन्व्हायरन्मेंटल मेडिसिन (एएईएम) ह्या संघटनेने एकोणीस मे दोन हजार नऊ रोजी सर्व फिजिशियनना आवाहन केले की, त्यांनी आपले पेशंट, अन्य वैद्यकीय व्यावसायिक व सर्वसाधारण जनता ह्यांचे, जनुक -संस्कारित (जी एम) अन्न, शक्य तेव्हढे टाळण्याविषयी प्रबोधन करावे व जी एम अन्नाच्या आरोग्यावरील दुष्परिणामाबद्दल शैक्षणिक साहित्य त्यांना उपलब्ध करून द्यावे. ह्या संघटनेने अशीही मागणी केली की जी एम अन्नाच्या परिणामांबद्दल केल्या जाणाऱ्या दीर्घकालीन चाचण्या व त्याचे लेबलिंग अधिस्थगित करण्यात यावे. त्यांनी ह्या विषयावर प्रकाशित केलेल्या आपल्या भूमिकापत्रात असे मांडले आहे की, जी एम अन्नामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात, असे प्राण्यांवर करण्यात आलेल्या अनेक चाचण्यांतून सिद्ध झाले आहे. त्यांनी विषद केलेल्या परिणामांत वंध्यत्व, रोगप्रतिकारशक्तीत घट, झपाट्याने वृद्धत्त्व येणे, इन्सुलिनच्या नियमनात व्यत्यय, पचनसंस्था व शरीराच्या महत्वाच्या अवयवात बिघाड ह्यांचा समावेश होतो. ह्या भूमिकापत्राच्या निष्कर्षात असे सांगितले आहे की, जी एम अन्नाचा वापर व उपरिनिर्दिष्ट घटक परिणाम ह्यांचे नाते केवळ अनुषंगिक नसून प्रस्थापित शास्त्रीय कसोट्यांनुसार ते कारक नाते आहे. प्राण्यांवरील अनेक चाचण्यांतून जी एम अन्न व हे रोग ह्यांचे नाते वारंवार जोरकसपणे सिद्ध झाले आहे.

अधिकाधिक डॉक्टर्स आता पेशंटना जी एम मुक्त आहार घेण्याचा सल्ला देत आहेत. मिशिगन येथील अंतर्गत औषध तज्ञ व एएईएमचे समिती सदस्य डॉ. अमी डीन ‘म्हणतात, ‘माझ्या पेशंटनी केवळ जीएम मुक्त आहारच घ्यावा ह्याविषयी मी आग्रही आहे.’ ओहियो येथील अॅलर्जीतज्ञ डॉ. जॉन बॉईल्स सांगतात, ‘मी पूर्वी अनेकदा सोयाबीनच्या अॅलर्जीची तपासणी करीत असे. पण आता सोयाबीन जनुक – संस्कारित असल्यामुळे ते इतके धोक्याचे झाले आहे की मी लोकांना सांगतो की ते मुळीच खाऊ नका.

एएईएमचे अध्यक्ष डॉ. जेनिफर आर्मस्ट्रॉंग ह्यांच्या मते (अमेरिकेतील) डॉक्टरना अनेकदा आपल्या पेशंटमध्ये हे घातक परिणाम दिसतात, पण पेशंटना योग्य प्रश्न कसे विचारायचे हे त्यांना शिकविण्याची गरज आहे. (ते माहित नसल्यामुळे त्यांना ह्या दुष्परिणामांची जीएमशी सांगड घालता येत नाही.) पुष्पमित्र भार्गव ह्या जगप्रसिद्ध जीवशास्त्रज्ञांनी सुमारे ६०० शास्त्रीय नियतकालिकांचा अभ्यास करून असा निष्कर्ष काढला आहे की, अमेरिकन जनतेच्या खालावलेल्या प्रकृतीमानाचे महत्वाचे कारण जी एम अन्न हे आहे.

गरोदर माता व बालकांवरील दुष्परिणाम साक इन्स्टिट्यूटचे जीवशास्त्रज्ञ डेव्हिड शूबर्त इशारा देतात की लोकसंख्येतील इतर घटकांच्या तुलनेत लहान मुलांमध्ये जी एम अन्नामुळे होणाऱ्या टॉक्सिन्स व अन्य घटकांचे दुष्परिणाम होण्याची शक्यता अधिक आहे. पुरेशा चाचण्यांच्या अभावी बालके हे जी एम अन्नाच्या प्रयोगात वापरले जाणारे प्राणी ठरतात.

जी एमच्या प्राण्यांवर प्रत्यक्ष घेतलेल्या चाचण्यांचे परिणाम भीतीदायक आहेत. नैसर्गिक सोयाबीन व जी एम सोयाबीन हे वेगवेगळ्या गटातील उंदीर माद्यांना खिलविण्यात आले. जी एम गटातील उंदरणीनी जन्माला घातलेल्यांपैकी बहुसंख्य पिले तीन आठवड्यात मृत्युमुखी पडली. नैसर्गिक सोयाबीन गटात हे प्रमाण १०% होते.

जी एमवर वाढवलेल्या उंदरांच्या पिलांचा आकार लहान होता व कालांतराने गर्भधारणेच्या वेळी त्यांना समस्या निर्माण झाली. हेच जी एम सोयाबीन जेव्हा नर उंदरांना खिलविण्यात आले, तेव्हा त्यांच्या अंडकोशांचा रंग गुलाबीऐवजी गडद जांभळा झाला. त्यांच्या पुंबीजांवरही परिणाम झाला. त्यांच्या पुढच्या पिढीच्या डीएनएतही बराच बदल झाला. ऑस्ट्रियन सरकारने केलेल्या एका अभ्यासात असे आढळले की जी एम मक्यावर वाढविलेल्या मूषकांना कमी संख्येने पिले झाली. त्यांचा आकारही लहान होता.

पुनरुत्पादनाचे असे प्रश्न मोठ्या प्राण्यांमध्येही दिसून आले. भारतातील हरयाणा-राज्यात असे आढळले की जी एम सरकीवर वाढलेल्या म्हशींपैकी बहुतेकांमध्ये गर्भपात, वंध्यत्व, प्रमिती प्रसूती व गर्भाशय बाहेर येण्यासारख्या अनेक समस्या निर्माण झाल्या. त्यातील अनेकांची पारडी मृत्यूमुखी पडली. अमेरिकेत सुमारे पंचवीस शेतकऱ्यांनी तक्रार नोंदविली की विशिष्ट प्रकारचा जी एम मका खाल्ल्यामुळे त्यांच्या जवळचे हजारो वराह पुनरुत्पादन करण्यास अक्षम ठरले. तेच धान्य खाणाऱ्या गाई व बैलांमध्येही असेच परिणाम दिसून आलेत.

अमेरिकेतील रहिवाश्यांमध्ये कमी वजनाच्या अर्भकांचा जन्म, वंध्यत्व, व बालमृत्यू ह्या समस्या वाढीला लागल्या आहेत.

अन्नाद्वारे विष निर्मिती जी एम मका व कापूस ह्यांच्या प्रत्येक पेशीत कीडनाशक निर्माण व्हावे अशी तिची रचना असते. जेव्हा कीड रोपाचा चावा घेते, तेव्हा हे विष तिचे पोट फाडून बाहेर येते व तिला मारते. बायोटेक कंपन्यांचा दावा आहे की बी टी नावाचे हे. कीडनाशक (जे बॅसिलस थुरिंजिनेसिस नावाच्या जीवाणूपासून बनविले असते) सुरक्षित आहे. कारण सेंद्रिय शेती करणारे किंवा अन्य शेतकरी ह्या जीवाणूचा फवारा नैसर्गिक कीडनियंत्रणासाठी वापरतात. जनुकीय अभियांत्रिकीद्वारे हाच बी टी जनुक थेट मका किंवा कपाशीच्या रोपात घातला जातो, ज्यामुळे कीड मारण्याचे कार्य स्वतः रोपेच करतात.

परंतु हे आपण लक्षात घेतले पाहिजे की जी एम रोपांमध्ये निर्माण होणारे बी टी टॉक्सिन हे नैसर्गिक फवाऱ्यापेक्षा हजारो पट अधिक तीव्र, त्यामुळे अधिक घातक असते, त्यामुळे अॅलर्जी होऊ शकते, तसेच फवाऱ्याप्रमाणे ते धुतले जाऊ शकत नाही. त्यामुळे त्याचे परिणाम दीर्घ काळ टिकतात.

बी टी पिकांपेक्षा हजारो पट सौम्य असणारा फवाराही बिनधोक नाही. एका विशिष्ट किडीचा नाश करण्यासाठी तो विमानाने फवारला असता सुमारे पाचहजार ते दहाहजार लोकांमध्ये अॅलर्जी किंवा फ्लूसारखी लक्षणे आढळली. काहीना तर त्यासाठी तातडीची वैद्यकीय मदत घ्यावी लागली.

बी टी कापूस हाताळणाऱ्या भारतीय शेतमजुरांकडून आता अशाच स्वरूपाच्या तक्रारी येत आहेत. २०१३ साली संडे ऑब्झर्व्हरने वैद्यकीय पुराव्यांच्या आधारे असे मांडले की ह्या वर्षी बी टी कापसाच्या लागवडीमुळे खाजेच्या समस्येत खूप वाढ झाली आहे.

रोगप्रतिबंध व्यवस्थेवर आघात एएईएमनुसार विविध प्राणी चाचण्यांतून असे दिसते की (जी एममुळे) रोगप्रतिबंधक व्यवस्थेचे नियमन मोठ्या प्रमाणावर उध्वस्त होते. दमा, अॅलर्जी व सूज ह्यांच्याशी संबंधित सायटोकाईन्सचे प्रमाण वाढल्याचे दिसते. (अमेरिकेत सर्वत्र विकारांचे प्रमाण वाढले आहे.)

जी एम अन्नाच्या सुरक्षिततेचे अभ्यासक डॉ अर्पद पुस्ताई सांगतात की रोगप्रतिबंधनाचे विनियमन ही बाब जी एमच्या सर्व चाचण्यात सातत्याने आढळून येते. मॉन्सॅन्टोच्या स्वतःच्या प्रयोगात बी टी मका खाणाऱ्या उंदरांमध्ये रोगप्रतिबंधक व्यवस्था ढासळलेली दिसली. नोव्हेंबर २०१० च्या इटालियन सरकारच्या एका अध्ययनानुसार बी टी मक्यावर वाढविलेल्या मुषकांमध्येही असेच परिणाम दिसून आले.

जी एम सोयाबीन व मका दोघांमध्ये अॅलर्जीकारी गुणधर्म असणारी प्रत्येकी दोन नवी प्रथिने आहेत. जी एम सोयाबीनमध्ये सोयाबीन अॅलर्जीकारक असणाऱ्या ट्रिप्सीन प्रतिबंधकाचे प्रमाण सामान्य सोयाबीनच्या तुलनेत सात पटीने आहे. त्वचेवर घेतलेल्या चाचण्यांतून असे निष्पन्न झाले की बऱ्याच व्यक्तींना जी एम सोयाबीनची अॅलर्जी असते, पण सामान्य सोयाबीनची नसते. इंग्लंडमध्ये जी एम सोयाबीनचा शिरकाव झाल्यावर सोयाबीनच्या अॅलर्जीत १३% नी वाढ झाल्याचे आढळले. अमेरिकेतही अलीकडच्या काळात अन्नोत्पन्न अॅलर्जी व दमा ह्यांची जी साथ आली आहे, तिच्या मुळाशी बहुधा जनुकांशी केलेली छेडछाड असण्याची शक्यता आहे.

प्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर मृत्यू भारतात कापूसवेचणीनंतर पऱ्हाटी गुरांना खायला घालतात. पण बीटी कापसाची पऱ्हाटी खाल्ल्यावर हजारो मेंढ्या मृत्युमुखी पडल्या. त्यांच्या शवतपासणीत दोन्ही आतड्यात तीव्र क्षोभ, काळे व्रण, तसेच यकृत व पित्त वाहिनी ह्यांचा आकार वाढलेला आढळला. प्राथमिक पुराव्यानुसार मेंढ्यांच्या मृत्यूचे कारण विषद्रव्य (टॉक्सिन), बहुधा बीटी टॉक्सिन हे असावे, असे संशोधनकर्त्यांचे मत आहे. डेक्कन डेव्हलपमेंट सोसायटीने त्यानंतर एक छोटासा अभ्यास केला. त्याअंतर्गत बीटी कापसाची पऱ्हाटी खाणाऱ्या सर्व मेंढ्या तीस दिवसात दगावल्या; नैसर्गिक कपाशीची पऱ्हाटी खाणाऱ्या मेंढ्या मात्र सुरक्षित राहिल्या.

आंध्रप्रदेशातील एका गावात नैसर्गिक कपाशीची पऱ्हाटी म्हशींना आठ वर्षे खाऊ घातल्यावरही काही विपरीत परिणाम आढळला नव्हता. पण त्यांना पहिल्यांदा बीटी कापसाची पऱ्हाटी खाऊ घालण्यात आली, त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या सर्व आजारी पडल्या व पंधरा दिवसात मेल्या.

जर्मनीत गाई, तसेच फिलिपाइन्समध्ये घोडे, कोंबड्या व म्हशींच्या मृत्यूसाठी देखील बीटीमक्याला जबाबदार ठरविण्यात आले आहे.

एका प्रयोगशाळेतील अभ्यासात असे दिसले की (नैसर्गिक मक्याच्या तुलनेत) लिबर्टी लिंक मका (बीटी मक्याचे एक विशिष्ट वाण) खाल्ल्यामुळे कोंबड्या दुप्पट संख्येने दगावल्या. जीएम टोमॅटोवर वाढविलेल्या २० पैकी ८ उंदरांमध्ये जठरातून रक्तस्राव सुरु झाला; अशाच एका गटातील ४० पैकी ८ उंदीर दोन आठवड्यात दगावले. प्रख्यात फ्रेंच जीवशास्त्रज्ञ सेरालिनी ह्यांच्यानुसार मॉन्सॅन्टोच्या स्वतः च्या अध्ययनात असे दिसले की बीटी मका खाल्ल्यामुळे उंदरांच्या महत्वाच्या अवयवात विषबाधा झाली.

सर्वात मोठा धोका – जीएम आपल्या शरीरात ठाण मांडून बसते जीएमच्या मानवांवर होणाऱ्या संभाव्य परिणामाबद्दल एकच संशोधन करण्यात आले होते; ज्यातून जीएमचा सर्वात घातक परिणाम समोर आला आहे. जीएम सोयाबीनमध्ये घुसविण्यात आलेले जनुक आपल्या आतड्यातील जीवाणूंच्या डीएनएत स्थानांतरीत होते व तेथे आपले कार्य चालू ठेवते. ह्याचा अर्थ असा की आपण जीएम अन्न खाणे बंद केल्यावरही आपल्या शरीरात घातक जीएम प्रथिनांची निर्मिती चालूच राहू शकते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर बीटी मक्यापासून बनविलेले चिप्स खाल्ल्यावर उरलेल्या आयुष्यात आपल्या आतड्यातील जीवाणू म्हणजे कीडनाशकाचे जिवंत कारखाने म्हणून काम करतील.

अमेरिकेतील वैद्यकीय परिषदांमध्ये जेव्हा हा जनुक स्थानांतरणाचा मुद्दा चर्चिला गेला, तेव्हा अनेक डॉक्टरांनी मांडले की गेल्या दशकात देशभरात पचनसंस्थेसंबंधित विकारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. जीएम अन्नामुळे अमेरिकनांच्या आतड्यातील जिवाणूंवर परिणाम झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

शासकीय संशोधकांच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष अमेरिकेच्या अन्न व औषध प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी १९९० च्या दशकात ह्या सर्व घातक परिणामांविषयी इशारा दिला होता. एका खटल्याच्या निमित्ताने प्रसिद्ध झालेल्या सरकारी कागदपत्रांवरून असे दिसून येते की त्यावेळी प्राधिकरणाच्या शास्त्रज्ञांचे एकमत होते की जीएम अन्न हे मुळातच घातक असून, त्यामुळे अॅलर्जी, आतड्यातील जीवाणूंमध्ये जनुकाचे स्थानांतरण, विषबाधा, आहारविषयक समस्या, तसेच नव्या रोगांची निर्मिती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अतिशय कडक चाचण्या केल्याशिवाय जीएम अन्नाला परवानगी देण्यात येऊ नये, असे त्यांनी आपल्या वरिष्ठांना कळविले होते. पण व्हाईट हाऊसने बीटीला उत्तेजन देण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून, प्राधिकरणाने जीएमविषयक धोरण ठरविणाऱ्या समितीच्या अध्यक्षपदी मॉन्सॅन्टोचे माजी वकील मायकेल टेलर ह्यांची नियुक्ती केली. (त्यांच्या समितीने ठरविलेल्या व) आज अस्तित्वात असलेल्या धोरणात प्राधिकरणाच्या संशोधकांनी दिलेल्या इशाऱ्याचे अस्तित्वच नाकारण्यात आले आहे. उलट जीएम अन्नासाठी कोणत्याच प्रकारच्या सुरक्षितता चाचण्यांची गरज नाही; अशा चाचण्या करायच्या की नाही हा निर्णय मॉन्सॅन्टो व इतर कंपन्यांवर सोडवा असे त्यात प्रतिपादन केले आहे. श्री. टेलर ह्यांची नंतर मॉन्सॅन्टो कंपनीच्या उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली.

अपुरे अध्ययन, अनाकलनीय विकार जीएम अन्नाविषयी पुरेसा अभ्यास करण्यात आलेला नाही व त्यामुळे मानवी आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असे एएईएमचे स्पष्ट मत आहे. आतापर्यंत जीएम अन्नाचा एकही शास्त्रशुद्ध क्लिनिकल ट्रायल (मानवावरील अभ्यास) घेण्यात आलेला नाही. जीएम वनस्पतींच्या संभाव्य आरोग्यविषयक धोक्यांवर उपलब्ध शास्त्रीय माहितीचा आढावा घेणारा एक परिक्षणवजा शास्त्रीय लेख रिव्ह्यू पेपर प्रकाशित झाला. त्यात लेखक म्हणतात की ह्या विषयावर उपलब्ध शास्त्रीय माहिती अगदी तुटपुंजी आहे. पुढे ते प्रश्न करतात की, बायोटेक कंपन्या गृहीत धरतात की जीएम वनस्पती/अन्न हे सुरक्षित आहे. पण ते सिद्ध करणारा शास्त्रीय पुरावा कुठे आहे?

प्रसिद्ध कॅनेडियन जनुकतज्ञ डेव्हिड सुझुकी ह्या प्रश्नाचे उत्तर असे देतात, असे प्रयोग मुळात करण्यातच आले नाहीत, परिणामस्वरूप आम्ही सर्व आता गिनी पिग्ज बनले आहोत. जो कोणी हे अन्न अगदी सुरक्षित आहे असे म्हणतो, तो एक तर अविश्वसनीय मुर्ख असावा, किंवा चक्क खोटारडा.

ह्या सर्व व्यवहारातला एक मोठा धोका डॉ. शुबर्त आपल्या लक्षात आणून देतात. ते म्हणतात, जर जीएममुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले, तर ते आपल्याला कळणारही नाहीत. कारण एक तर त्यांचे कारण हुडकता येणार नाही व दुसरे म्हणजे असे रोग निर्माण व्हायला अनेक वर्षे लागतात. (म्हणून त्यांचा जीएमशी कार्यकारण संबंध प्रस्थापित करणे अवघड ठरेल.) जर जीएममुळे एखादा स्पष्ट लक्षणे असणारा तीव्र विकार तात्काळ उद्भवला, तरच असा कार्यकारण संबंध शोधता येईल.

१९९० च्या दशकात अशा विकाराची चुणूक अमेरिकेला दिसली. त्यामुळे रक्ताच्या काही गुणधर्मात सहज मोजण्यासारखे बदल झाले, रोग झपाट्याने वाढला. तरीही मुळात ही एका नव्या रोगाची साथ आहे, हे कळायला चार वर्षे लागली. तोपर्यंत पाच ते दहाहजार लोक त्यामुळे ग्रस्त झाले होते व काही मृत्युमुखी पडले होते. त्या रोगाचे कारण होते एल ट्रिप्टोफॅन नावाचे जनुक संस्कारित पूरक अन्न (फूड सप्लीमेंट).

सध्या अमेरिकन समाज स्थूलत्व, अॅलर्जी, दमा, कर्करोग, मधुमेह, हृद्रोग, पुनरुत्पादनविषयक समस्यांनी ग्रस्त आहे. ह्या विकारांच्या निर्मितीत विविध जीएम अन्नांचा काय हातभार लागला आहे हे आपल्याला कधीच कळणार नाही. जीएमवर वाढविलेल्या प्राण्यांमध्ये इतक्या विविध प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या आढळल्या आहेत, की मानवामध्येही जीएममुळे विविध लक्षणे दिसणे शक्य आहे. मध्ये अमेरिकेत जीएमचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झाला. त्यानंतरच्या वर्षात तीन किंवा अधिक दीर्घकालीन रोग असणाऱ्या व्यक्तींची संख्या % वरून % वर गेली हे लक्षणीय आहे.

जीएमचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो का, हे तपासण्यासाठी एएईएमने आपले सदस्य, वैद्यकीय व्यावसायिक व शास्त्रज्ञ ह्यांना असे आवाहन केले आहे की त्यांनी जीएमशी संबंधित असू शकतील अशा केस स्टडीज जमविण्यास सुरुवात करावी, ज्या आधारावर नंतर जीएम अन्नाच्या आरोग्यावरील परिणामांविषयी रोगपरिस्थितीविज्ञानविषयक (एपिडेमॉलॉजिकल) संशोधन करणे शक्य होईल. त्याच प्रमाणे जीएमचे मानवी आरोग्यावर होणारे परिणाम तपासण्यासाठी सुरक्षित पद्धती शोधणेही आवश्यक आहे.

अर्थात सुजाण नागरिकांनी जीएम पासून दूर राहण्याचा डॉक्टरी सल्ला अंमलात आणण्यासाठी अश्या अध्ययनांच्या निष्कर्षांची वाट पाहणे गरजेचे नाही. ज्यावर सेंद्रिय किंवा नॉन-जीएम असा शिक्का नाही अशी सोयाबीन किंवा मक्याची उत्पादने, सरकी किंवा कॅन्युला तेल व बीटी बीटासून बनवलेली साखर ह्यापासून दूर राहणे त्यांच्या हिताचे आहे. इन्स्टिट्यूट ऑफ रिस्पॉन्सिबल टेक्नोलॉजी व सेंटर फॉर फूड सेफ्टी ह्या संस्थानी संयुक्तरीत्या प्रकाशित केलेल्या नॉन-जीएमओ शॉपिंग गाईड ह्या पुस्तिकेत ह्याविषयी अधिक माहिती मिळू शकेल. ही पुस्तिका आंतरजालावरून डाऊनलोड करता येईल, किंवा किंवा सेंद्रिय अन्न पदार्थांच्या दुकानात किंवा अनेक डॉक्टरांच्या कार्यालयात ती उपलब्ध आहे.

थोड्या लोकांनी जरी नॉन-जीएम बँड वापरण्याचा आग्रह धरला तरी अन्नउद्योगावर त्यांच्या कृतीचा दबाव पडू शकतो, आणि युरोपप्रमाणे अमेरिकेतही अन्नपदार्थातून जीएम घटक वगळले जाऊ शकतात. त्या दृष्टीने एएईएमचा जीएममुक्त आहाराचा आग्रह ही अमेरिकन अन्नउद्योगाच्या दृष्टीने क्रांतिकारी बाब ठरू शकते.

इन्स्टिट्यूट ऑफ रिस्पॉन्सिबल टेक्नोलॉजीचे कार्यकारी संचालक डॉ जेफ्री स्मिथ हे जीएमचे आरोग्यावरील दुष्परिणाम ह्या विषयावरील जगप्रसिद्ध तज्ञ आहेत. त्यांचे पहिले पुस्तक सीड्स ऑफ डिसेप्शन (फसवणुकीची बीजे) हे ह्या विषयावरील सर्वोत्तम खपाचे पुस्तक आहे. त्यांचे दुसरे पुस्तक जेनेटिक रुलेट: द डॉक्युमेंटेड हेल्थ रिस्क्स ऑफ जेनेटिकली इंजिनियर्ड फूड्स जीएमच्या संभाव्य धोक्याचे दस्तऐवजीकरण करते व त्याचबरोबर सरकारच्या थातुरमातुर व्यवस्थेत हे धोके नोंदविले जाणे कसे अशक्य आहे, हेदेखील दाखविते. लेखकाने बायोटेक उद्योगाला आवाहन केले होते की त्यानी पुस्तकात दाखविलेल्या प्रत्येक धोक्याबद्दलचा आपला प्रतिवाद जाहीररीत्या मांडावा. पण बायोटेक उद्योग तसे करणार नाही, कारण त्यांचे उत्पादन सुरक्षित असण्याबद्दल कोणताही डाटा त्यांच्याजवळ नाही, हे लेखकाने केलेले भाकीतही खरे ठरले आहे. (स्पिलिंग द बीन्स न्यूजलेटर, मे २००९ च्या अंकावरून साभार)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.