जातींची उपपत्ती : एक उपसिद्धान्त

जाती कश्या निर्माण झाल्या ह्याविषयी काही मते मांडली गेली आहेत आणि बहुतेकांची मते मनुस्मृती आणि तत्पूर्वी लिहिले गेलेले पुरुषसूक्त ह्यापलीकडे गेलेली नाहीत. मनुस्मृतीची भाषा पाहिली तर ती अर्वाचीन आहे. तिची रचना छंदोबद्ध आणि व्याकरण पाणिनीय आहे. त्यामुळे तिचा काळ फार प्राचीन असू शकत नाही. मनुस्मृति हा ग्रंथसुद्धा कोणा एका ‘मनु’ नावाच्या ब्राह्मणाने रचला असण्याची शक्यता नाही. मनु हे नाव कोणी मानवांचा आदिपुरुष कल्पून त्याला दिले आहे असे जाणवते. मानवाचा आदिपुरुष कोण? मनु. म्हणून मनूचे ते मानव. मनुस्मृति ह्या ग्रंथात त्या काळात प्रचलित असलेल्या समजुतींचा संग्रह आहे, असे म्हणायला पुष्कळ वाव आहे. ह्या समजुती एका विशिष्ट कालखंडातल्या आणि काही विशिष्ट प्रदेशातल्या असल्या पाहिजेत. त्या सार्वकालिक त्याचप्रमाणे सार्वदेशिक असू शकत नाहीत.

जाती फक्त हिन्दुस्थानातच आहेत असेही नाही. समाजशास्त्राचे अध्ययन सुरू झाल्यापासून जगभरात पसरलेल्या विविध जातीजमातींची माहिती गोळा होऊ लागली. त्यांच्या भाषा भिन्न आणि चालीरीतीही वेगवेगळ्या. निरनिराळ्या जातीजमातींमधला उच्चनीचभावच नव्हे तर अस्पृश्यतादेखील भारताच्या बाहेरच्या काही देशांमध्ये आढळून येते. भारताबाहेर तर मनुस्मृती नव्हतीच पण तरीही तेथे क्वचित काही ठिकाणी आपल्या जातिसंस्थेसारखी समाजरचना आहे असे आढळते. ह्या सगळ्याचा विचार करता जातींचा उद्गम काही निराळ्या कारणांमुळे झाला असावा, असे म्हणावे लागते.

ह्या बाबतीत मला एक नवीन theory मांडावीशी वाटते. अर्थात हे सिद्ध झालेले आहे असे नाही तर hypothesis आहे. पुरातत्त्वशास्त्राच्या अभ्यासातून असे लक्षात येते की ज्या समाजाचा एकमेकांशी संपर्क नव्हता तरी त्यांची राहणी एका काळात पुष्कळशी समान होती. भाजलेल्या मातीची मडकी व इतर वस्तू एकाच काळात एकमेकांशी संबंध नसला तरी, निरनिराळ्या प्रदेशांत एकाच कालखंडात आढळून येतात. म्हणजे माणसाच्या मनात येणाऱ्या कल्पना एकमेकांशी संपर्क नसला तरी समान असू शकतात. ह्या समान कल्पना आपोआप उपजलेल्या असतात आणि एका कालखंडात अनेकांच्या मनात एकाच प्रकारच्या त्या असतात. ह्यामध्ये पापपुण्य, पवित्र अपवित्र, सोवळे-ओवळे, शकुनापशकुन, शुभाशुभ ह्या सर्वांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे भिन्न भिन्न भाषांच्या निर्मितीचाही.

सुरुवातीचे वेगवेगळे धर्म आणि धार्मिक विधी हे कोणा एका माणसाने कल्पना करून निर्मिले आणि नंतर इतरांनी त्यांचा स्वीकार केला असा प्रकार मला दिसत नाही. धर्मसंस्थापकांनी स्थापन केलेले धर्म वेगळे. त्यांना ‘किताबी मज़हब’ म्हणण्याचा प्रघात आहे. त्यांमध्ये कुठल्यातरी धर्मग्रंथाला महत्त्व असते. आपल्या हिन्दुधर्माला ‘सनातन’ धर्म असेही एक नाव आहे. सनातन ह्याचा अर्थ ज्याला आरंभ नाही असा आहे. वेदांना अपौरुषेय म्हणतात, त्याचेही कारण तेच असावे. हिन्दुधर्माला वैदिक धर्म बनवण्याचा मागाहून काहींनी प्रयत्न केला असे माझे मत आहे. परन्तु वेदांमध्ये काय लिहिले आहे हे ज्याप्रमाणे आज बहुसंख्य हिन्दूंना माहीत नाही, तसेच ते इतिहासकाळातही माहीत नव्हते. वेदांत वापरली गेलेली भाषा ही पाणिनीय व्याकरणाशी जुळणारी नाही; तिला ‘छांदस्’ असे म्हणतात. त्या भाषेचे अध्ययन करणारे लोक लाखात पाच-दहा असतील. तेसुद्धा काही तीर्थक्षेत्रांमध्ये एकवटलेले होते. ब्राह्मणांपैकी अनेकजण पौरोहित्य करीत होते तरी त्यांचे अध्ययन पंचांग पाहणे (तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण ही दिवसाची पाच अंगे ) आणि काही जुजबी विधी करणे ह्यापलीकडे नव्हते. यज्ञ करू शकणारे ब्राह्मण तीर्थक्षेत्राहून मुद्दाम बोलवावे लागत. हा ‘वैदिक’ धर्म हिन्दूंचा अन्य धर्मांशी संपर्क आल्यानंतर अस्तित्वात आला. आपल्यालाही धर्मग्रंथ हवेत कशी भावना गेल्या एक-दीड शतकात निर्माण झाली असावी, त्यापूर्वी ‘हिन्दु’ हा शब्द देखील आमच्या सनातनधर्मासाठी क्वचित वापरलेला आढळतो.

ज्या धर्मांना ग्रंथ नाही असे धर्म, म्हणजे हिन्दु धर्मासारखे धर्म अजून दक्षिण व मध्य आफ्रिकेत अस्तित्वात आहेत. इतकेच नाही तर ब्रह्मदेश आणि आग्नेय आशियातसुद्धा अस्तित्वात आहेत. सांगण्याचा मतलब असा की हे स्फुरलेले आणि अनेकांना एकाच वेळी सुचलेले असे धर्म आहेत. त्यामुळे एका प्रदेशात वापरल्या जाणाऱ्या बोलींमध्ये जसे साम्य- वैधर्म्य असते तसेच ह्या धर्मांमध्येही काही साम्य-वैधर्म्य आहे. आपण ग्रंथाधार असणाऱ्या धर्मांना ‘शिकवलेले’ आणि ग्रंथाधार नसलेल्यांना ‘उत्फूर्त / स्फुरित’ असे म्हणू या.

ज्याप्रमाणे धर्म नवीन सुचतो, त्यातले विधी सुचतात, त्याचप्रमाणे अंधश्रद्धाही सुचतात. ह्या कल्पना-संकल्पना एका वेळी एका मोठ्या समुदायाला स्फुरलेल्या किंवा सुचलेल्या अश्या असतात. त्या काही काळानंतर बदलतात. त्या बदलतात तेव्हा सुरूवातीला अगदी थोडे लोक त्या समजुतींतून बाहेर पडतात आणि नंतर त्यांची संख्या वाढत जाते; त्यांचे पुरोगामी व प्रतिगामी असे वर्ग पडतात. पुरोगामी प्रतिगामयांना सनातनी, कर्मठ, दकियानूसी अशा नावांनी संबोधतात. महाराष्ट्रातील विधवा विवाहांचा इतिहास अभ्यासावा. पुरोगाम्यांची संख्या वाढण्यासाठी मुद्रण आणि अलीकडची संपर्क साधने ह्यांचा बराच उपयोग होतो. पण हे मानसिक परिवर्तन सहजपणे होत नाही. ते घडायला कधी १०० तर कधी शे-पाचशे वर्षांचा काळसुद्धा लागू शकतो. ते मन्वन्तर किंवा युगान्तरच असते. आणि काहींच्या बुद्धीला ह्या नवीन संकल्पना समजत असल्या, त्यांत त्यांना तर्कदोष काढता येत नसले तरी त्या स्वीकारण्यासाठी बहुतेकांची मने तयार नसतात. त्या नव्या कल्पना स्वीकारताना त्यांना अतिशय क्लेश होतात. ह्याबाबतीत एकच उदाहरण देतो. ते स्त्री-पुरुषसंबंधातील नीतिनियमांचे. ह्यामध्ये सतीप्रथा, उच्चवर्णीयांच्या विधवांचा विवाह, आन्तरजातीय विवाह ह्या सगळ्या बाबींचा समावेश होतो. आज जे उच्चवर्णीय भारतीय विदेशांत जातात, त्यांच्या तरुण मुलामुलींचे वागणे पाहून त्यांना होणारा त्राससुद्धा ह्याच प्रकारचा आहे. मला असे वाटू लागले आहे की आपल्या मनातल्या देवाविषयीच्या, धर्माविषयींच्या म्हणजे धर्माभिमान, देशाभिमान, जातीचा अभिमान, इतिहासाचा अभिमान ह्या साऱ्या अशा काही समुदायांना एकाच वेळी स्फुरलेल्या संकल्पना आहेत. इतकेच काय तर खाजगी मालकीची संकल्पनासुद्धा ह्यांपैकीच एक आहे असे मला वाटू लागले आहे. हा अभिमान इतका तीव्र असतो की त्यासाठी माणसे प्राण पणाला लावतात, धर्मयुद्धे होतात. ती शतकानुशतके चालू शकतात. आपल्या राष्ट्राच्या सीमा वाढवत नेण्याच्या प्रेरणा होतात आणि त्यांतून जागतिक महायुद्धे होतात. ह्या अभिमानातून आपल्या देशात युद्धे जरी घडली नसली तरी युद्ध-सदृश घटना घडल्या आहेत. त्यांपैकी मला सहजपणे आठवणाऱ्या येथे दोन-तीन मांडतो. बाबरी मशीद, इजरत बाल, सुवर्णमंदिर ह्यांच्या निमित्ताने घडलेल्या घटना.

मोठमोठ्या समुदायांना काही नवीन कल्पना सुचतात पण काही समुदायांना सामुदायिकपणे त्या सुचतच नाहीत. आम्हा भारतीयांना सार्वजनिक स्वच्छता समजतच नाही. आपले घर स्वच्छ पण रस्ते मात्र घाण. कितीही शिकवले तरी त्यात फरक पडत नाही. शिक्षणाचा काही उपयोगच होत नाही. आम्हाला वाहतुकीचे नियम पाळता येत नाहीत. आम्हाला कार्यक्रम वेळेवर सुरू करता येत नाहीत. सार्वजनिक संस्था चालवता येत नाहीत. कोणत्याही म्युनिसिपालटीचा कारभार नीट चालत नाही. त्या दिशेने आमची सामुदायिक बुद्धी कामच करीत नाही. आम्हाला एकमेकांसोबत कामे करता येत नसल्यामुळे आणि ती काटेकोरपणे तडीस नेण्याचा स्वभाव आमचा नसल्यामुळे आम्ही नवीन यंत्रसामुग्रीही तयार करीत नाही. कोणाच्या मनात नवीन यंत्राच्या कल्पना आल्या तर त्यांना त्या राबवण्यासाठी परदेशात जावे लागते. भिसे ह्या नावाचे एक अत्यंत कल्पक गृहस्थ होते. त्यांना अमेरिकेला जावे लागले. विष्णु महादेव अत्रे ह्यांना नागरी टाइपरायटर घडवण्यासाठी जर्मनीस जावे लागले, ह्याची मला आठवण होते. त्या उलट इंग्लंडमध्ये अंदाजे पावणे दोनशे वर्षांपूर्वी वाफेचे इंजिन असलेली आगगाडी रुळावरून चालू लागली. तेथे हे का शक्य झाले तर तेथे अनेक जणांनी मिळून कामे करण्याची आणि ती कामे करताना प्रत्येकाने मूळ कल्पनेत आपली भर घालण्याची पद्धत पडली होती. ही गाडी तेथे चालू लागली त्यावेळी, ते काम कसे करायचे हे सांगणारे अभियन्ते नव्हते; इतकेच काय तर त्यावर पुस्तकेसुद्धा नव्हती. एका प्रकारे ती इंग्रजांनी शून्यातून केलेली निर्मिती होती. ते त्यांच्या विषयांत इतके पारंगत झाले की तेथे आगगाडी सुरू झाल्यानंतर २५-३० वर्षांत त्यांनी ती भारतात आणली.

साधे पोस्टऑफिसचे उदाहरण घ्या. आपल्या इथे पत्रांची ने-आण होत होती, पण त्यासाठी ते एक पत्र, फार थोड्यांच्या कडून हाताळले जाई. आपल्या इथल्या शासनकर्त्यांनी पत्रे लवकर पोहोचावीत ह्यासाठी सांडणीस्वारांची योजना केली आणि त्यांचे टप्पे निर्माण केले, हे खरे असले तरी सामान्य माणसांसाठी सुद्धा अशी काही योजना करता येऊ शकेल असे आम्हांस सुचले नाही. एखादा पैसा खर्च करून कोणत्याही गावाला आपले पत्र पोहोचवण्यासाठी जी यंत्रणा उभी करावी लागली ती करण्यासाठी लागणारी बुद्धीच आमच्या जवळ नव्हती की काय अशी शंका येण्यासारखी परिस्थिती आहे. ही टपालाची सेवा सुरू होऊन दीडशे वर्षे झाली पण आजही त्यात काम करणाऱ्या प्रत्येकाला, तो करीत असलेल्या कामाचे महत्त्व समजून तो ते करीत असेल की ते न केल्यास त्याला होणाऱ्या शिक्षेच्या भीतीने तो ते करीत असेल, अशी मला शंका आहे.

आपल्या इथल्या सामान्य माणसाच्या कल्पनाशक्तीला पडलेल्या किंवा असलेल्या मर्यादांमुळे, ज्या मर्यादा त्याच्या ठिकाणी जन्मजात आहेत, त्यांच्यामुळे तर हे घडत नसेल? एका पूर्ण समुदायाला एक कल्पना एकावेळी सुचण्याचा आणि प्रत्येकाला ती कल्पना स्वतंत्रपणे स्फुरली नसली तरी कोणी सांगितल्यास त्याचे ताबडतोब आकलन करण्याचा हा जो प्रकार आहे त्याला ‘सृष्टिक्रम’ असे नाव द्यावे असे मला वाटते. जैविक उत्क्रांती जरी समान असली तरी कल्पनांच्या भरारीच्या बाबतीत ह्या पृथ्वीवरच्या माणसांचे मोठमोठे गट पडताते; आणि त्यांचे एकमेकांशी दळणवळण असले तरी त्यांच्या कल्पनाशक्तीत फारसा फरक पडत नाही, असे दिसते. त्यामुळेच आशियातल्या काही देशांमधले लोक युरोपात जाऊन राहिले तरी त्यांच्या सवयी आणि विचारसरणी ह्यांत फार मंद गतीने फरक पडतो. हा जो गटांमधील जन्मजात फरक आहे तो कसा कमी करायचा, हे आपल्यामुळे मोठे आह्वान आहे.

इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली तशी आशिया, आफ्रिका आणि अमेरिका, ऑस्ट्रेलिया ह्या खंडांमध्ये झाली नाही. म्हणजे तेथील जे स्थानिक लोक त्यांच्या विचारसरणीत फरक पडला नाही. आपल्या भारतातच असे अनेक प्रदेश आहेत की तेथे राहणाऱ्या लोकांना वस्त्रे कशी विणायची हे सुचलेले नाही. इतकेच नव्हे तर विणलेली वस्त्रे पाहिल्यावर ती कशी निर्माण केली जातात ह्याविषयी त्यांच्या मनात जिज्ञासाही निर्माण झाली नाही, असे दिसते.

‘सृष्टिक्रम’ हा शब्द निवडण्याचे कारण असे की हा जो विचारसणीत फरक पडतो त्याला एकच दिशा नसते. उत्क्रांतीमध्ये उत् हा उपसर्ग आहे. आणि त्या उपसर्गामुळे ऊ र्ध्वदिशेचा बोध होतो. तशी ऊर्ध्व दिशा सृष्टिक्रमांत नसते. ‘क्रम्’ म्हणजे जाणे किंवा फरक पडणे. सृष्टिक्रम हा चक्रनेमीप्रमाणे म्हणजे चाकाप्रमाणे वर्तुळाकारदेखील असू शकतो.

राष्ट्राभिमान, धर्माभिमान किंवा पातिव्रत्याविषयींच्या कल्पना कालांतराने कमी जास्त होतात किंवा नष्टही होऊ शकतात. म्हणून ह्याला उत्क्रांती न म्हणता ‘सृष्टिक्रम’ म्हणावे असे मला वाटते.

मी हे जे सारे प्रतिपादन करीत आहे, ते माझे निरीक्षण आहे; सिद्धान्त नाही. सिद्धान्त मांडायचा असला तर पुष्कळ जास्त अध्ययन आणि संशोधन करावे लागेल. आणि कदाचित मी मांडत असलेली ही जातींची उपपत्ती पूर्णपर्ण टाकून द्यावी लागेल. पण जर माझ्या प्रतिपादनात तथ्य असेल जे आहे अशी माझी खात्री झाली आहे. तर जातिभेद निर्मूलन करण्यासाठी आजवर केलेल्या प्रयत्नांच्या सोबत काही नवीन प्रकारचे प्रयत्नदेखील करून पाहावे लागतील. त्यांचे स्वरूप विद्रोहात्मक वा संघर्षात्मक असण्याऐवजी प्रबोधनात्मक असावे लागेल. आमच्या मनातला जातिभेद व त्यासोबत येणारा उच्च-नीच भाव नष्ट करण्यासाठी संघर्ष उपयोगी पडणार नाही; ह्याचे कारण संघर्ष नेहमी दोन गटात होतो आणि त्या संघर्षातून जय-पराजय ह्यांशिवाय दुसरे काही निघत नाही. ते दोन गट सतत समांतर रेषांसारखे चालतात. त्यांच्यातील जात्या भिमान कमी होत नाही.

जात्याभिमान हा शतकानुशतके चालेल असे समजण्याचे कारण नाही. पण त्याचा कालखंड आपल्या सामुदायिक प्रयत्नांनी आपल्याला कमी करता येईल असे मात्र मला वाटते; जसा विधवा-विवाह, सतीप्रथा, विधवांचे केशवपन इत्यादींच्या बाबतीत झाला. तर आपण त्या प्रयत्नांना लागू या.

श्रीमोहिनीराज, बारलिंगे मार्ग, खरे टाउन, धरमपेठ, नागपूर ४४० ०१०

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.