शेवटचा स्टॉप नाही!

“म्हणजे एकंदरीतच वेदान्त हा मानवी कल्याणाचा विचार दिसतो. तिथे ‘हिंदू’ ‘इस्लाम’ या लेबलांना स्थान नाही. हे पाहता सतत मनात येणारा एक प्रश्न तुला विचारतो, ‘संघपरिवाराला विवेकानंद एवढे जवळचे कसे काय वाटतात व डाव्या पुरोगामी मंडळींना ते निदान कालपर्यंत तरी जवळपास पूर्णत: अस्पृश्य होते हे कसे काय?’

‘हे बघ मित्रा, समाजातील उच्च स्थान, प्रभाव व कर्तृत्व यांनी फार मोठ्या असलेल्या व एरवी अत्यंत आदर वाटावा अशा अनेक व्यक्ती विचारांच्या उदारतेच्या प्रांतात त्या त्या परिस्थितीच्या मर्यादा ओलांडू शकत नाहीत असे दुर्दैवाने घडताना अनेकदा दिसते खरे. त्याचा परिणाम काय होतो? काळ त्यांना मागे टाकून पुढे निघून जातो व ती माणसे स्वत: या नंतर त्यांचे अनुयायी काळाला वा त्यांच्याबरोबर न येणाऱ्या समाजाला दूषणे देत राहतात. असे सर्वच विचारांच्या मंडळींच्या बाबतीत आज हे घडताना अधिकच स्पष्टपणे जाणवत आहे. संघमंडळींच्या बाबतीत काय झाले? आपली भूमी, धर्म, संस्कृती याविषयी कोणत्याही समूहाला असते तसेच अत्यंत तीव्र भावनिक प्रेम त्यांनाही होते व आहे. त्यात गैर काहीही नाही. किंबहुना समाजाच्या एका अवस्थेत ते आवश्यकही असते. त्यात काही घटनांची इथे भर पडली. एक, भारतासारख्या हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या फार थोड्या संस्कृती जगात टिकून आहेत. दोन, असे असूनही ही भूमी शेकडो वर्षे परकीयांच्या टाचाखाली तुडवली गेली होती याचे तीव्र दु:ख या भूमीच्या मनात सलत होते. स्वत्व जिवंत ठेवल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीचा व समाजाचा विकास होऊ शकत नाही असे दुःख हे स्वत्व जिवंत असल्याचा पुरावा असतो, तसेच ते जिवंत ठेवण्याची इच्छाही त्यात दडलेली दिसून येते. पण इतिहासाला भावुकता – अभिमान यांचा विषय बनवले की भावना विचारावर मात करतात. मग ‘इतक्या चिवटपणाने टिकणाऱ्या आपल्या संस्कृतीचा प्राण कोणता व कोणत्या वाईट घटकांनी ती एवढी जर्जर झाली’ याचा तटस्थपणे विचार होत नाही. तसा तो होता तर भयाण सामाजिक विषमता हाच हिंदूंना जर्जर करणारा सर्वांत मोठा रोग आहे हे त्यांच्या नक्कीच लक्षात आले असते. किमान संघाच्या महाराष्ट्रात म्हणजेच शिवरायांच्या जन्मभूमीत तरी ! इथे वारकरी पंथाने मोठ्या खुबीने ही सामाजिक विषमता तसेच कर्म-कांड यांची तीव्रता कमी करण्यासाठी खरा ईश्वर काय आहे हे समाजाला सांगण्याचा मार्ग निवडला. हीच तर त्यांच्या आंदोलनांची प्रमुख दिशा होती. त्यातून थोडी सामाजिक पण मूलत: धार्मिक उदारता येत गेली. संघाने मात्र भावनेच्या अभिमानाचा मार्ग निवडला. वारकरी चळवळीत कदाचित त्यांना प्रामुख्याने हवी असलेली विजिगीषुत्वाची भावना दिसली नाही. (अर्थात जी नव्हतीही असे म्हणायला हरकत नाही) पण संपूर्ण मानव जातीच्याच नव्हे तर चराचराच्या एकत्वातून त्याच्या कल्याणाचा शोध घेणारे भारतीय आध्यात्मिक सत्य हा ज्या धर्माचा पाया आहे. त्यात विजिगीषुत्वाला स्थानच कोठून असणार? इथे दुसरे आहेच कोण की त्याला जिंकावे? अभिमान अहंकाराशिवाय विजिगीषुत्वाची भावना येणारच कशी? आणि जिथे अभिमान अहंकार आहे तिथे धर्म-ईश्वर यांना स्थान कसे काय राहणार ? अभिमान-अहंकाराच्या व विजिगीषुत्वाच्या भावनेवर आधारलेले विचारसंघटन काही काळ प्रचंड कर्मप्रेरणा देऊन भरपूर कामही करून घेतील, पण ते टिकणार नाही. कारण तो जीवनसत्त्वाचा शाश्वत धार्मिक- आध्यात्मिक विचार नव्हे त्यातून संस्कृती निर्माण होत नाही वा टिकत तर नाहीच नाही.

एकदा सेमिटिक धर्मांच्या परंपरेतील येशू व मोहंमद यांना स्वतःला आलेल्या ईश्वराच्या अनुभूतीविषयी कोणालाही तिळमात्र संशय येऊ शकत नाही. जणू त्यातूनच निर्माण झालेल्या प्रचंड शक्तिस्रोतातून त्यांच्या धर्मानुयायांनी अनुक्रमे सेवेचे व सामाजिक समतेचे असामान्य कार्य जगभर करून मानवी संस्कृतीत मोलाची भर टाकली. पण अखेर ‘न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ।’ ज्ञान हीच अंतिम व शाश्वत शक्ती आहे. त्यांच्या अनुयायांची मात्र स्वत:ची शक्ती ही मूलतः त्यांच्या धर्मसंस्थापकांवरची फेथ ही राहिली. एका बाजूला त्यातून बाह्य गोष्टींना कवटाळून राहण्याच्या गरजेतून असहिष्णुता आली. तर दुसऱ्या बाजूला आज विज्ञान-तंत्रज्ञानाच्या नव्या युगात अत्यंत वेगाने बदलणाऱ्या भौतिक- सामजिक-सांस्कृतिक आह्वानांना तोंड देताना त्यांना किती कठीण जाते आहे हे आपण पाहातच आहोत. इस्लामच्या बाबतीत हे विशेषत्वाने जाणवतेय. युरोपमधील रेनॉसाँ’, व्यक्तिस्वातंत्र्य-लोकशाही यांचा विकास व विज्ञान-तंत्रज्ञानाची आत्ताआत्तापर्यंत मुख्यतः ख्रिश्चन, युरोप-अमेरिकेत झालेली प्रगती व त्यातून आलेली समृद्धी या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून ख्रिश्चनांनी अनेक कालबाह्य गोष्टी सोडल्या. म्हणूनच मुख्यत: केवळ ख्रिश्चन राष्ट्रांनीच आधुनिकतेचे, आर्थिक विकासाचे जागतिक नेतृत्व इतके दिवस केले. पण तरीही धर्मविचार व धर्मसंघटना म्हणून कॅथॉलिक चर्च हे मात्र गे-लेस्बियन संबंध व अशा व्यक्तींचे विवाह, चर्चकडे न फिरकणाऱ्या समृद्ध गोऱ्यांची वाढती संख्या व घटस्फोटांनी तुटलेली कुटुंबसंस्था अशा अनेक प्रश्नांनी चिंतित आहे. आधुनिकता व समृद्धीबरोबर घटस्फोटासारखे प्रश्न हिंदू पुढेही उभे राहू लागलेच आहेत व ते वेगाने वाढणारही आहेत. पण धर्मविचार व धर्माला गंभीर धोका या अर्थाने हिंदू फारसा चिंतित असल्याचे बिलकूल दिसत नाही. त्याचे कारण विश्व आणि मनुष्य-जीवन हे सारे काय गौडबंगाल आहे याविषयीच्या त्यांच्या दृष्टीत असावे कारण ती दृष्टी हे त्याचे अध्यात्म आहे व ते अध्यात्मच त्यांच्या धर्माचा आधार आहे. वेगाने बदलत राहणारी कोणतीही बाह्य परिस्थिती वा कोणतीही वैज्ञानिक प्रगती (अगदी उत्क्रांतीविचारापासून ते ‘हिग्ज बोसॉन’ पर्यंत तरी ! ) त्या जीवनदृष्टीच्या प्राणाला अजून तरी धक्का लावू शकलेली नाही. या जीवनदृष्टीसाठीच भरतभूमी ‘धर्म’ हा शब्द वापरते.

म्हणून स्वामी विवेकानंद म्हणायचे, ‘भरतभूमीने धर्म सोडला तर तिला कोणीही वाचवू शकणार नाही आणि तिने या जीवनसत्याच्या धर्माला घट्ट पकडून ठेवले तर तिच्या नखालाही कोणी धक्का लावू शकणार नाही’. इथेच येतो संबंध वर उल्लेखिलेल्या विजिगीषुत्वाच्या धाग्याचा. परकीयांच्या टाचांखाली शेकडो वर्षे ही भूमी पिचली गेली याचे दुःख विवेकानंदांनाही होते. पण त्यासंबंधीच्या भूतकाळातील घटनांविषयी ते भावुक होत नाहीत व म्हणून त्याविषयीच्या उपायांकडे ते विवेकनिष्ठ दृष्टीने पाहू शकतात. इतिहासाकडे एक प्रक्रिया म्हणून पाहिल्यानंतर आपल्या अवनतीच्या कारणांचा ते तटस्थपणे शोध घेतात. म्हणून सामाजिक विषमता, दलितांवरील अमानुष अन्याय, ब्राह्मण वर्गाने ‘ब्रम्हन्’ ची म्हणजेच जीवनसत्याच्या विद्येची साधना सोडून धर्माला ‘शिवू नको’ वादी बनवणे अशा असंख्य गोष्टींवर ते कडक टीका करताना जराही मागे पुढे पाहात नाहीत. धर्माचा प्राण प्राणिमात्राचे एकत्व व म्हणून सहनशीलता या विषयीचे त्याचे भान मातृभूमीच्या आणि धर्म-संस्कृतीच्या इतिहासातील नष्टचर्याच्या अतीव दुःखाने कणभरही सुटत नाही. उलट ते म्हणतात ‘आमची मंदिरे तोडणाऱ्यांसाठीही आम्ही आशीर्वचनेच देऊ व त्यांच्यासाठी आम्ही मशिदी-चर्चेसही बांधू!, हे शब्द म्हणजे ना भावुकता ना ‘व्होट’ भीक मागणारा सेक्युलॅरिझम ! त्या शब्दांमागचा नेमका भाव कळला की उदारता आपोआपच येईल; नव्हे ती उदारता असल्याचे मग स्वतःला जाणवतही नाही.

‘म्हणजे याचा अर्थ अन्याय सहन करावा असा आहे का?’ ‘बिलकून नव्हे, पण अन्यायाचा तुम्ही प्रतिकार करू शकत नाही तेव्हा द्वेषापेक्षा सहनशीलतेची साधना करा व त्याचा प्रतिकार करू शकाल त्या वेळेला तर भगवान श्रीकृष्यांचा तर अर्जुनाला स्पष्टच आदेश नाही का, ‘रडतोस काय, युद्ध कर!’ पण त्यालाही त्यांनी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट जोडली होती ते मात्र आपण अभिमान व अहंकारापोटी विसरून जातो. काय होता तो आदेश नेमका ? ‘मामनुस्मर युध्यच’! (युद्ध करच पण ‘माझ्या म्हणजेच ईश्वराच्या, त्या विश्वजननी अनंत चेतन शक्तीच्या-‘ अखंड स्मरणात राहून!) म्हणजे काय होईल? ज्याच्याशी तुम्ही लढत आहात त्याच्याविषयीही मनात द्वेषभावना निर्माण होणार नाही. आठवलं, गांधीजी काय म्हणाले होते? ‘माझा लढा ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी मनोवृत्तीविरुद्ध, ब्रिटिश माणसाविरुद्ध नव्हे!

‘माणसांत वाईट प्रवृत्ती आहेत तोपर्यंत संघर्ष हे होणारच व होतही राहिलेच पाहिजेत. पण माणसामाणसांत द्वेषभावना मात्र नको. कारण मग जुने संघर्ष संपले (नवीन निर्माण होतच राहतात) तरीही द्वेषभावना अमर्याद काळ माणसाच्या मनावर राज्य करीत राहते. न्यायनीतीने वेळ पडल्यास संघर्ष जरूर करायचा. पण तो ईश्वराच्या स्मरणात राहून, हे आहे गीतेचे मर्म. डाव्या हाताकडून चूक झाली म्हणून उजवा हात त्याचा द्वेष करतो की त्याला मारतो ? वेदान्तासाठी हा ईश्वरविचार ही केवळ भावुक आदर्शवादी स्वप्नाळू मांडणी नव्हे! ती आमच्या ऋषीमुनींची साक्षात अनुभूती आहे. ती अजूनतरी विज्ञानाने खोटी ठरविलेली नाही. (पुढचे पुढे!) आणि हजारो वर्षांच्या संस्कारांनी ती आता आमच्या जणू डी.एन.ए. तच उतरली आहे. म्हणून विवेकानंदांसाठी केवळ हिंदू धर्मच नव्हे तर सारेच धर्म सत्य होते. परधर्मसहिष्णुता वा युरोपचा आम्ही उधारीने आणलेला सेक्युलॅरिझम या संकल्पना तर या विचाराच्या अनंत कोस मागे राहतात. स्वामीजी म्हणाले होते, ‘दुसरा धर्म सहन करण्याचा प्रश्नच कुठे येतो? माझ्यासाठी तोही धर्म पूर्णत: सत्यच आहे!’

अर्थात साऱ्या मानवजातीला ललामभूत असलेले सर्वच धर्मात्मे वेगळे आणि त्यांचे अनुयायी वेगळे. त्यामुळे परधर्मीय आक्रमकांनी शेकडो वर्षे या भूमीवर केलेल्या धार्मिक अत्याचारांचा उल्लेख स्वामीजींनी भावुक दुःखातून छाती पिटण्यासाठी वा समाजात कोणाविषयी सूडभावना निर्माण करण्यासाठी जसा कधी केला नाही तसेच एकंदरीतच मानवी सहिष्णुतेच्या गरजेचा विचार समजावण्यासाठी जरूर वाटेल तेव्हा त्या अत्याचारांचा स्पष्टपणे उल्लेख करायलाही ते कचरलेले नाहीत. अशा गोष्टींवर पांघरूण घालणाऱ्या ‘व्होट- सेक्युलॅरिझमचा ‘ व केवळ भावुक आदर्शवादी व म्हणून शक्तिहीन सर्वधर्मसमभावाचा जमाना अजून सुरू व्हायचा होता. त्यामुळे अशा उल्लेखांनी कोणाच्या भुवया उंचावत नव्हत्या. अर्थात स्वामीजींनी त्याची पर्वाही केली नसती कारण त्याचे हृदय शुद्ध होते. ‘येशूंची पौर्वात्य- पद्धतीनुसार पूजा करण्यापासून मला कोण रोखू शकतो?, असे ते म्हणू शकत होते.

मानवी संस्कृती निर्माण झाली. टिकून आहे व पुढे प्रगतीची आशा आहे ती मानवात सहनशीलता आहे म्हणूनच. असहिष्णुतेने कोणतीच संस्कृती निर्माण होत नाही वा टिकतही नाही. गांधी आठवतात ना? ‘Eye for an eye will make the whole world blind’ दुसऱ्या कुणाला आश्चर्य वाटण्याचे सोडा पण येशूच्या ‘Resist-no evil चे (गांधींचा आत्मक्लेश) महत्त्व विवेकानंदांनाही मान्य होते हे वाचून मलाही प्रथम धक्का बसला होता. मात्र त्यासाठी येशूएवढे थोर हृदय हवे, ते असेल तर ती गांधीजींची ‘शूरांची अहिंसाच’ भ्याडांची अहिंसा गांधीनाही नको होती. ती माणसे थोर होती, पण तुमचे आमचे काय? त्या दृष्टीने गीता आपल्या सर्वसामान्यांसाठी मोठा सुंदर सुवर्णमध्य देते, ‘मामनुस्मर युध्य च!’ आपल्या विकासाचा तोच प्राथमिक रस्ता : ‘सम सर्वेषु भूतेषु’ अवस्था येईपर्यंत! येशूच्या बलिदानामागची सहनशीलता क्षमाशीलता आज दोन हजार वर्षांनंतरही मानवजातीला सत्प्रवृत्त होण्याची प्रेरणा का बरे देऊ शकते? यातच अस्तित्वाचे संपूर्ण जीवनाचे एकत्व दडलेले आहे. उपनिषदांची वेदान्ताची गीतेची विवेकानंदांची दृष्टी संघपरिवाराला मान्य नसेल असे मी म्हणू इच्छित नाही. पण त्यांचे ही भूमी-धर्म-संस्कृती यावरील प्रेमाची अतीव भावुकता व इतिहासात परचक्रांमुळे तिच्यावर झालेल्या अपार आघाताचे दुःख या गोष्टी त्या साऱ्या तत्त्वज्ञानावर मात करायला लावून त्यांना अनैतिहासिक दृष्टी देतात व बरोब्बर उलट्या मार्गाने नेतात असे मला वाटते. सोन्याच्या मूर्तीच्या रक्षणासाठी लोखंडी साखळदंड तयार करण्याच्या कामात माणूस एवढा गढून जातो की त्याला त्या सोन्याच्या मूर्तीचा विसर पडून तो त्या लोखंडाच्या आराधनेशीच पूर्णत: एकरूप होऊन जातो.

‘मला वाटते पुन्हा मी तत्त्वज्ञानाच्या पोपटपंचीकडे घसरायला लागलोय आणि तू लवकरच जांभई देण्यापूर्वी एक कथा सांगू का?’ ‘वाऽऽऽ क्या बात है!’ ‘खूप वर्षांपूर्वी कधी कुठे तरी (कदाचित रजनीशांची) एक छोटीशी पण मोठी सुंदर कथा वाचलेली आठवते. काळ्या-गोऱ्यांची वेगवेगळी चर्चेस असण्याचा तो अमेरिकेचा काळ. चर्चपासून फर्लांगभर अंतरावर गोऱ्यांच्या चर्चकडे येणाऱ्या रस्त्याला एक फाटा फुटे व काळे नेहमी त्या फाट्यानेच जात कारण त्यांनी त्या चर्चकडे येण्याचा प्रश्नच नसायचा. चर्चच्या गेटवरूनच हे सर्व दिसे. एक दिवस रात्री एका काळ्या गरीब व्यक्तीच्या स्वप्नात येशू आले. त्यामुळे त्या भावुतेत त्याला घराजवळच्याच चर्चमध्ये (जे गोऱ्याचेच होते) जाऊ न येशूचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा झाली, सकाळी उठल्याबरोबर नेहमीप्रमाणे तो त्या फाट्यावरून पुढे न जाता चर्चच्या रस्त्याने चर्चकडे येऊ लागला. हे गोऱ्या पादऱ्याने पाहिले आणि तो आश्चर्यचकित झाला. तसेच काळजीतही पडला. घाईघाईने तो पुढे जाऊन चर्चच्या कंपाऊंडच्या बाहेरच त्याला भेटला. ‘काय राव, इकडे कुणीकडे आज?’ ‘नाही. म्हटलं येशूचं दर्शन घ्यावं.’

आता तर पाद्री पुरते घाबरलेच. (येशू बाटेल ना! आमचा देव हरिजनांच्या सावलीनेही बाटत होता ना तसा !) पण सरळ सरळ ‘गोऱ्यांच्या चर्चमध्ये तू कसा येतोस? तू काळा आहेस’ असे म्हणण्याचे दिवस कदाचित संपले होते व त्यामुळे हे ‘संकट’ युक्तीनच टाळणे भाग होते.

‘अरे बाबा, आंघोळ वगैरे केलीस का?’ ‘नाही गुरुजी, उठल्यावर राहावेचना, लगेचच निघालो. शिवाय आम्ही दिवसभर घाम गाळणारी माणसे, आंघोळ सकाळीच करून कसे चालेल?’ ‘असे कसे चालेल बाबा? आंघोळीशिवाय भेटायला गेलास तर येशूंना काय बरे वाटेल?”

तो बिचारा निराश होऊन माघारी फिरला. ‘मन:स्थिती तात्पुरती तरी बिघडल्याशिवाय काळा माणूस असे धाडस करण्याचा प्रश्नच नव्हता त्यामुळे तो पुन्हा येईल ही अजिबात शक्यता नव्हती’. अशा विश्वासाने पाद्रीबोवा निर्धास्त झाले.

दुसऱ्या दिवशी सकाळी तोच माणूस पुन्हा फाट्यावरून चर्चच्याच रस्त्याने येताना दिसला आणि पाद्रीबोवा पुरते हादरले. ‘आता काय करावे?’ हा विचार करत करतच त्यांनी भराभर पुढे जाऊन कालच्यासारखे त्याला कंपाऊंडबाहेरच गाठले.

‘काय राव, आज पुन्हा इकडे कुठे?’ ‘फादर, आपण काल सांगितल्याप्रमाणे आंघोळ करून आलोय आज मी. ‘अरे वा, हे तर उत्तम. फारच उत्तम! पण बायबलमध्ये कुठले बरे श्लोक म्हणून आलास?’

‘श्लोक? नाही बुवा, माझे काही श्लोक वगैरे पाठ नाहीत.’ ‘अरे गड्या, असे कसे चालेल? एवढे येशूंना प्रेमाने भेटायला यायचे आणि तेहो बायबलमधील त्यांच्या शिकवणुकीचे निदान पाच तरी श्लोक पाठ करून व म्हणून आल्याशिवाय ? काय वाटेल बिचाऱ्या येशूंना ? हे बघ, हा कागद घे आणि त्याच्यावर लिहिलेले हे पाच श्लोक पाठ झाले की मग ये. येशूंना मोठा आनंद होईल. तो बिचारा पुन्हा निराश होऊन परत गेला. ‘जवळपास अशिक्षित असा हा माणूस दुसऱ्याच्या तोंडून ऐकून ऐकून तो काय तो श्लोक पाठ करणार?’ या विचारात पाद्रीबोवा आता मात्र खरोखरच निर्धास्त झाले.

निरक्षर व गरीब असल्याने बिलंदरगिरी त्याच्यात शिरू शकली नव्हती. थोडे दिवस गेले आणि पाद्रीबोवांच्या कानांवर सतत बातमी यायची की हा माणूस कोणाकडून तरी ऐकून ऐकून मोठ्या नेटाने सतत ते श्लोक पाठ करीत आहे. बोवा पुन्हा चिंतेत. आता काय करायचे? सतत बारीक चौकशी करीत तर त्याचे पाठांतर फार चांगले होत आहे असे त्यांना समजायचे. बोवांचे काळजीबरोबरच कुतूहलही तीव्र होऊ लागले. अखेर त्याचे श्लोक उत्तम पाठ झाले असून दुसऱ्याच दिवशी तो पुन्हा त्या चर्चमध्ये येशूच्या दर्शनाला येणार असल्याची बातमी कोणाकडून तरी त्यांना कळली. बोवा रात्रभर अस्वस्थ !

सकाळ झाली. बोवा त्याच्या येण्याच्या वेळेआधीच तो फाटा आणि चर्चच्या रस्त्यावरील मधल्या ठिकाणी जाऊनच वाट पाहात राहिले. अर्थात त्यांनी नवी ‘युक्ती’ तयार ठेवलीच होती. अपेक्षेप्रमाणे थोड्याच वेळात रॉबर्ट दूरवरून येताना त्यांना दिसला. पण काय आश्चर्य? तो चर्चच्या रस्त्याकडे न येता फाट्याच्या दुसऱ्या रस्त्यानेच जाऊ लागला. संकट टळले म्हणून आनंदित होण्याऐवजी उलट अचानक बोवा फार अस्वस्थ झाले! थोडे वाईटही वाटले त्यांना. अखेर पाद्री काय, पुरोहित काय वा मुल्ला काय ही सारी माणसासारखी माणसेच नव्हेत का ? आपापल्या परिस्थितिसंस्कारांची शिकार!’ ‘का बरे हा इकडे येत नाहीये आज? त्याच्या पाठांतराच्या बातम्या खोट्या तर नव्हत्या ?’ असे प्रश्न. अखेर त्यांनीच जोरजोराने हाका मारून त्याला थांबवून फाट्याच्या ठिकाणी भेटले. ‘हे काय? मी तर ऐकले होते की तू आज चर्चमध्ये येणार आहेस म्हणून पाठांतर झाले नाही वाटते?’ ‘नाही, नाही बोवा! पाठांतर तर उत्तम झालंय. तुम्ही सांगितलेले सर्व श्लोक पुन्हा एकदा म्हणून रात्री अत्यंत आनंदानं झोपी गेलो की उद्या चर्चमध्ये आपल्याला प्रभू येशूचं दर्शन घडणार!’ ‘मग झालं तरी काय? तू तर चर्चचा रस्ता सोडून दुसरीकडेच चालला आहेस, हे कसं काय?’ ‘अत्यंत गाढ सुंदर झोप लागली. प्रभू येशू पुन्हा स्वप्नात आले. माझ्या डोक्यावर मोठ्या प्रेमानं हात ठेवत अश्रूपूर्ण नयनांनी ते मला म्हणाले, ‘बेटा, शांत हो. सोडून दे तो चर्चमध्ये जाण्याचा नाद. ज्या चर्चमध्ये मलाच गेली दोन वर्ष प्रवेश नाही तिथे तुला आत तरी कोण घेणार आणि घेतले तरी माझ्याशी तुझी भेट तरी कशी होणार?’ मंदिर-मस्जिदमध्ये तरी राम-रहीम कुठे आहेत? म्हणजे किमान एवढ्या कारणामुळे तरी आपण सर्व धर्मवाले अगदी सख्खे भाऊच नव्हेत का? साऱ्याच धर्माचे हेच झाले, अगदी विसाव्या शतकातील सर्व ‘साम्यवाद- निधर्मवादी’ धर्मांचही तचे झाले! मानवी स्खलनशीलतेपुढे त्यांना एका दृष्टीने तात्पुरती तरी हार खावी लागली. पण ती स्खलनशीलता आहे म्हणून तर धर्माची जरुरी आहे व ते पुन्हा पुन्हा अधिकाधिक जोमाने नवनव्या स्वरूपात वर येत राहाणारच. पिळवणूक- विषमतेविरुद्धचा समाजवादी संतप्त आक्रोश हा एक प्रकारे त्या एकत्वाच्या धर्मतत्त्वाचे नवे रूपच होते. त्याचाही पराभव हा तात्पुरताच आहे. हे अविनाशी मानवीमूल्य पराभवाच्या राखेतून पुन्हा पुन्हा उठेलच उठेल. अनुभवातून अधिकाधिक शिकून शहाणे होऊन नव्या नव्या रूपात! मानवाची समतेची तहान तृप्त होत नाही (नष्ट ती होणारच नाही!) तोपर्यंत या धर्मतत्त्वाच्या जन्म-मरण – पुनर्जन्म या रहाटचक्राला शेवटचा स्टॉप नाही; शेवटचा स्टॉप नाही; आणि म्हणूनच जगण्यात, झगडण्यात, पडण्यात, पुन्हा उठण्यात गंमत आहे!

(देवाची बडतर्फी- (विनाचौकशी?) ह्या राजा देसाई यांच्या पुस्तकातून साभार) सी-६, न्यू सुयश सोसायटी, गोडबोले हॉस्पिटलजवळ, महात्मा गांधीमार्ग, नौपाडा, ठाणे ४००६०२ चलभाष – ८६००००१०६४

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.