दुष्काळ – पाण्याचा की विचारांचा?

(थोर पर्यावरणतज्ज्ञ अनुपम मिश्र ह्यांचा हा लेख काश्मीरमधील प्रलयाच्या पार्श्वभूमीवर ह्या अंकात प्रकाशित करीत आहोत. डॉ राजेन्द्रप्रसाद ह्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचे हे विचार प्रथम आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात आले होते. प्रस्तुत लेखात, समुद्रकिनाऱ्यावरील खारफुटीची जंगले नष्ट केल्यामुळे त्या प्रदेशात किंवा मुद्दाम उंचावरून रस्ते काढल्यामुळे सखल प्रदेशात पूर आल्याची उदाहरणे देऊन त्यांनी एक महत्त्वाचा सिध्दान्त मांडला आहे, तो असा की दुष्काळ किंवा पुरासारख्या आपत्ती अचानक कधीच येत नाहीत. त्यांच्या आधी चांगल्या विचारांचा दुष्काळ आलेला असतो. ‘ज्ञानोदय’ मासिकाच्या जून २०१४ च्या अंकातून अनुवादित, संपादित, साभार. -कार्यकारी संपादक)

आजपासून सुमारे ९३ वर्षे जुना असा हा प्रसंग. तत्कालीन राष्ट्रपती बाबू राजेन्द्रप्रसाद ह्यांनी ‘देश’ नावाच्या वर्तमानपत्रात एक लेख लिहिला होता. त्या लेखात त्यांनी म्हटले होते, जर कुणाला असे वाटत असेल की सेवा करण्यासाठी त्याला विशेष पदाची आवश्यकता आहे आणि पदाशिवाय त्याला सेवा करता येत नाही, तर. तो त्याचा फार मोठा गैरसमज आहे. ह्या ऐतिहासिक लेखाच्या अखेरीस ते म्हणतात, सेवकासाठी भरपूर जागा रिकामी पडलेली असते. सेवेसाठी कधीच उमेदवारांची गर्दी नसते. गर्दी असते ती सेवेच्या फळाच्या वाटपासाठी. सेवेचे फळ नसून सेवा हेच ज्याचे ईप्सित आहे, त्याला ह्या स्पर्धेत उतरण्याची, ह्या धक्काबुक्कीत शिरण्याची काहीच गरज नाही.

तर त्या काळात, जमिनीवर हे सारे घडत असताना, आकाशात एक भयानक संकट येऊन ठेपले होते. अश्विन महिन्यात बिहारच्या ‘छपरा’ जिल्ह्यात एक दिवस मुसळधार पाऊस पडला. परिणाम, पूर्ण जिल्ह्यात भयानक पूर आला. चोवीस तासांत सुमारे छत्तीस इंच पाऊस. तेथील सरकारी कर्मचाऱ्यांनी अत्यंत उदासीनतेने व उपेक्षेने ह्याकडे पाहिले. तेव्हा तर आजच्यासारखी खंडीभर वर्तमानपत्रे, रात्रंदिवस बातम्यांचा महापूर वाहवणारे टीव्ही चॅनल्स नव्हते. पण जे काही थोडेफार होते, त्यांनी आपल्या पत्रांमध्ये छापले होते की जेव्हा माणसे, घरे, शेतीवाडी, गुरेढोरे पाण्यात बुडत होते, त्राहि त्राहि करीत होते, तेव्हा काही सरकारी कर्मचारी होड्यांमध्ये बसून ‘झिरझिरी’ खेळत होते.

झिरझिरी हा एक प्रकारचा लपाछपीचा खेळ आहे. बुडणाऱ्या माणसांनाच काय, तर महिला व बालकांनाही वाचवण्याचा ह्या अधिकाऱ्यांनी काही प्रयत्न केला नाही. लोक बुडतच राहिले, आणि प्रशासन लपाछपी खेळतच राहिले. अशा परिस्थितीत एक इंग्रज न्यायाधीश व एक भारतीय उपन्यायाधीश ह्यांनी लोकांना चांगली मदत केली. राजेन्द्र बाबूंसारख्या सभ्य, शालीन व्यक्तीने आपल्या आत्मचरित्रात त्या दिवसाचे वर्णन ‘कलेक्टर, पुलीस अफसर तथा डिप्टी मजिस्ट्रेट टस से मस नहीं हुए’ ह्या शब्दांत केले आहे. दुसऱ्या दिवशी छपरामध्ये भर पाण्यातच स्थानिक लोकांनी एक विशाल सार्वजनिक सभा घेतली. तीमध्ये सरकारची उघडउघड निर्भर्त्सना केली गेली व त्याचबरोबर मदतीला धावून आलेल्या लोकांची प्रशंसा. त्यांच्याप्रति कृतज्ञताही व्यक्त करण्यात आली.

खेडोपाड्यांमध्ये तर याहूनही वाईट परिस्थिती होती. त्या काळात छपराकडून मशरकला जाणाऱ्या रेल्वेलाइनमुळे पाणी पुढे वाहून जाण्याऐवजी तेथेच एका विस्तीर्ण भागात अडकून पडले होते आणि मागून येणारा पाण्याचा विशाल प्रवाह त्याची पातळी सतत वाढवीतच होता. त्यातून वाचण्याचा एकच मार्ग लोकांना दिसला. तो म्हणजे रेल्वे रूळ तोडण्याचा. त्यांनी तसा निर्णय घेतलाही. परंतु समोर सशस्त्र पोलीस दल पाहून ते थबकले.

ह्याचे वर्णन करताना राजेन्द्र बाबूंनी लिहिले आहे, “लोक कष्ट सहन करत राहिले. पण सहनशक्तीच्या पलीकडे गेले तेव्हा दोनचार जण खांद्यावर कुऱ्हाड घेऊन पाण्यातून पोहत रुळापर्यंत पोहोचलेच. पोलिसांनी त्यांना धमकावले तेव्हा त्यांनी उत्तर दिले, की इकडे आमच्यावर पाण्यात बुडून मरण्याची वेळ आली आहे आणि तुम्ही रूळही तोडू देत नाही आहात. आतापर्यंत आम्ही सोसले, पण ह्यानंतर सोसणे शक्य नाही. आता जर कोणत्याही परिस्थितीत आम्हाला मरायचेच असेल एकतर बुडून, नाहीतर तुमच्या बंदुकीच्या गोळ्या खाऊन तर बुडण्यापेक्षा तुमच्या गोळ्या खाऊनच मरावे झाले! आमचा निर्णय झाला आहे. आम्ही रूळ तोडतो, तुम्ही गोळ्या घाला.

अशा रीतीने, हे शूर लोक आवेगी वाहत्या पाण्यातून निकराने पोहत रुळापर्यंत पोहोचले व रुळांवर त्यांनी आपल्या कुन्हाडींचे घाव घालायला सुरुवात केली. पोलिसांची हिम्मत नाही झाली गोळ्या घालण्याची. रूळ थोडेसेच तुटले होते तेवढ्यात, लोकांच्या संकल्पाला साथ देण्यासाठीच जणू काही, मागून पाण्याचा एक जोरदार लोंढा आला आणि रूळ ताडकन तोडून पुढे वाट काढत निघून गेला. तो रूळ पुराबरोबर गवताच्या काडीप्रमाणे कुठे वाहून नेला कोणास ठाऊक! पण तेव्हा मागची अनेक गावे पूर्ण बुडण्यापासून वाचली होती. नंतर पोलिसांनीही रिपोर्ट दिला, की रूळ तुटला तो जलप्रवाहाच्या दबावानेच.

ह्या संकटाच्या वेळी राजेंद्र बाबू आणि त्यांच्या गटातील असंख्य स्वयंसेवक ह्यांनी रात्रंदिवस काम केले. छपरातील एका अधिकाऱ्याने तर म्हणे तेव्हा असेही म्हटले होते, की ह्या सगळ्या तक्रारी घेऊन माझ्याकडे कशाला आलात? जा. त्या गांधीकडे जा. तेव्हा त्या गांधीचा अर्थ होता काँग्रेसचे लोक.

अशा ह्या संकटकाळात राजेंद्रबाबूंच्या हे लक्षात आले होते की पूर व त्यासोबतचा दुष्काळ एकेकटे येत नाहीत. त्यापूर्वी समाजात असे बरेच काहीतरी होते, जे व्हायला नको असते. ते कधी सावकाश घडते तर कधी वेगाने, पण घडते एवढे खरे. ते घडत असताना समाजाचे नीतिनिर्धारक, संचालक व नेते ह्यांचे लक्ष त्याकडे जात नाही आणि मग पूर वा दुष्काळाचे संकट समोर येऊन ठेपते.

वाईट कामांचा पूर येतो पाण्याची प्रकृती समजून न घेताच विकास कामे उभी केली जातात. ही कोण्या एका काळाची गोष्ट नाही. दुर्दैवाने सर्वच कालखंडांमध्ये अशा प्रकारच्या चुकांची पुनरावृत्ती केली जाते. थोडक्यात काय, तर एका बाजूला प्रकृती, पर्यावरण ह्यांच्या विरुद्ध दिशेला जाणाऱ्या कामांचा पूर, तर दुसरीकडे चांगल्या कामांचा दुष्काळ.

राजेंद्रबाबूंनी आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे की “रेल्वे रुळांमुळे पुरांची भीषणता आणखी वाढते. माझ्या मुलखात गेल्या तीस वर्षांत आलेल्या भयानक पुरांचा मला चांगला अनुभव आहे. रेल्वे रूळ तसेच डिस्ट्रिक्ट कोर्ट व इतर इमारतींसाठी उंचावरून घेतलेले रस्ते हे पुराचे प्रमुख कारण असल्याचे माझे ठाम मत झाले आहे. ह्याऐवजी जागोजाग जर रुंद पूल बांधण्यात आले असते, तर असे घडले नसते. पण रेल्वेच्या नफ्याकडेच अधिक लक्ष दिल्यावर आणखी काय होणार! त्यांना पूल बांधण्यासही भाग पाडले जात नाही, मग रूळ तोडणे तर दूरच राहिले. बी एन डब्ल्यू रेल्वेने तर ह्या बाबतीत अत्यंत कंजूसपणा दाखवला आहे. आता जरी त्यांनी अनेक पूल बनविले असले तरी अनेक ठिकाणी पूल बनवायचे शिल्लकही आहे. जे बनवले आहेत तेही जनतेचा त्रास दूर करण्यासाठी नाही, तर आपल्याच फायद्यासाठी. जनतेच्या त्रासाच्या अनेक गोष्टी सांगूनही त्यांनी काहीच ऐकून घेतले नाही. पण जेव्हा निसर्गानेच रूळ तोडले आणि कित्येक महिने रेल्वे धावलीच नाही तेव्हा नाइलाजाने त्यांना दुसरे पूल बनवावेच लागले.

पाऊस तर दर वर्षी पडतोच. संपूर्ण देशात. कुठे कमी, तर कुठे जास्त. कुठे अतिशय जास्त सुद्धा. परंतु त्या वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये राहणाऱ्या समाजांनी, अनेक वर्षांच्या अनुभवातून, ह्या कमी-जास्त प्रमाणाच्या पावसामध्ये आपले जीवन बरोबर विणले आहे. आता बघा – एका बाजूला आहे जैसलमेर. जिथला पाऊस इंचांमध्ये बोलायचे तर ६ च्या वर जात नाही. बिहारच्या छपरामध्ये मात्र एका दिवसात ३६ इंच पाऊस पडला. ईशान्येत तर आपल्या एका राज्याचे नावच मेघांचे घर असे ठेवले आहे. ह्या सर्व समाजांनी अनेक पिढ्यांच्या अनुभवाने आपल्या अवतीभवतीचे ऋतू, जमीन, हवा, झाडे-झुडपे इतकेच काय तर पशूंच्या बरोबरही जिव्हाळ्याचे संबंध ठेवले आहेत.

आज आपण पाहतो की जलनीती तयार केल्या जात आहेत. पूर्वी हे असे घडत नसे. समाज आपले एक ‘जलदर्शन’ बनवीत असे. ते कागदावर न छापता लोकांच्या मनावरच कोरून ठेवीत असे. समाजातील लोक त्याला आपली जीवनपद्धती बनवून टाकीत असत. मग ती सहजासहजी तुटत नसे. आजच्या जलनीतीप्रमाणे ती येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक सरकारबरोबर बदलत नसे. ह्याच पद्धतीने तेथील विशिष्ट पिकेदेखील तो समाज निश्चित करून ठेवत असे. जलसिंचनासाठी आपली साधने जुळवून ठेवत असे.

आता बिहारच्या संबंधात आपण पाहिले की इंग्रजांनी त्या प्रदेशाची ठेवण लक्षात न घेता रेल्वेचे रूळ खूप उंचावर बनवून ठेवले, ज्यामुळे गंगा व इतर नद्यांच्या मैदानात जागोजागी अडथळे निर्माण झाले. त्या एवढ्या मोठ्या प्रदेशात पाण्याच्या सुरळीत वाहतुकीसाठी काय करायला पाहिजे ह्याचा विचारही नाही केला, तर प्रयत्न करणे दूरच राहिले. रुळांमध्ये किती अंतरावर मोठमोठे पूल असायला पाहिजेत, त्याकडेही लक्ष दिले नाही. कमी खर्चात जास्तीत जास्त नफा मिळवण्याचेच काम केले, आणि आता असे लक्षात येते की ते काम त्यांच्या भाषेतील इंग्रजीतील एका म्हणीप्रमाणेच परिणाम देत आहे. ती म्हण आहे – पेनी वाइज, पाउंड फूलिश. पैसे वाचविण्यात मारे सतर्कता दाखवायची अन् रुपये घालविण्यात निष्काळजीपणा.

इंग्रज आपल्या देशात आले तेव्हा येथे ‘सिंचन विभाग’ नव्हता. एकही इंजिनियर नव्हता. इंजिनियरिंगचे शिक्षण देखील नव्हते. म्हणजे तसे शिक्षण देणारे कोणतेही विद्यालय किंवा महाविद्यालय नव्हते. जलसिंचनाचे अभ्यासक्रम नव्हते, परंतु ते शिक्षण मात्र जागोजाग मिळत असे आणि समाज ते आपल्या मनात सांभाळून आपल्या जमिनीवर उतरवत असे. परत एकदा सांगतो की इंग्रज आपल्याकडे आले तेव्हा इथे एकही इंजिनियर नसताना काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सुमारे २५ लाख लहान लहान तलाव होते. त्याहूनही अधिक संख्येत, ठिकठिकाणी जमिनीचा पिंड ओळखून खोदलेल्या विहिरी होत्या. पावसाचे पाणी ह्या तलावांमध्ये कसे येईल, कुठल्या प्रदेशातून कसकसे वाहत येईल ह्याचा अंदाज अनुभवी नजरांकडून घेतला जाई. मग ते पाणी वर्षभर पिण्यासाठी कसे उपयोगी पडेल, पिकांना कसे जीवन देईल ह्या सर्वाची योजना शेकडो मैल दूर वसलेले इंग्रज नव्हे, तर तिथेच वसलेले लोक करीत. त्यातून ते आपल्या तेथे वसण्याचे सार्थक करीत. ही परंपरा आजही पूर्णांशाने संपलेली नाही – जरी सुशिक्षित लोकांमधली तिची प्रतिष्ठा कमी झाली असली तरी. परंतु आज आमच्या सुशिक्षित समाजाला हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल की आमच्या देशातील तंत्रशिक्षणाची पायाभरणी करण्यामध्ये आज अशिक्षित मानला गेलेला समाजच प्रमुख होता.

आज फार कमी लोक हे सांगू शकतील की आमचे पहिले इंजिनियरिंग कॉलेज कुठे व केव्हा उघडले. जे झाले, ते थोडक्यात असे देशाचे पहिले इंजिनियरिंग कॉलेज हरिद्वारजवळ रुडकी नावाच्या लहानशा गावात सुरू करण्यात आले. ते होते इ.स. १८४७. तेव्हा ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य होते. ब्रिटिश सरकारही आलेले नव्हते. आपला येथे येण्याचा उद्देश व्यापार करणे हा असल्याचे कंपनीने जाहीर केले होते. प्रशासन किंवा लोककल्याण नाही. व्यापार हादेखील सभ्य शब्द झाला. खरे तर ती लुटायलाच आली होती. अशा परिस्थितीत ती येथे उच्च शिक्षणाचे ध्वज कशाला फडकवायला बसलीय?

ही कथा बरीच लांबलचक आहे. पूर्ण सांगण्याची गरज नाही, परंतु एवढे तर सांगायलाच पाहिजे की देशाच्या वायव्य प्रदेशात त्या काळात भीषण दुष्काळ पडला होता. कमी मात्रेत पडलेला पाऊस हेदेखील दुष्काळाचे एक कारण होते. परंतु चांगल्या कामांचा व चांगल्या विचारांचा दुष्काळ आधीच येऊन ठेपला होता व त्याचे खरे कारण होते ईस्ट इंडिया कंपनीचे दुर्व्यवहार. सुदैवाने, तेव्हा नॉर्थ वेस्टर्न प्रॉविन्सेस म्हटल्या जाणाऱ्या त्या क्षेत्रात उपराज्यपालाच्या पदावर एक सहृदय इंग्रज अधिकारी काम करीत असत. त्यांचे नाव होते श्री. जेम्स थॉम्सन. लोकांना दुष्काळात मरताना पाहून त्यांच्याने राहवले नाही. त्यांनी कंपनीच्या संचालकांना पत्र लिहून ह्या भागात एक मोठा कालवा खोदण्याचा प्रस्ताव ठेवला. त्या पत्राला काहीच उत्तर आले नाही. थॉमसनने आणखी एक पत्र पाठवले. त्यालाही उत्तर नाही. त्यानंतर थॉमसननी जे तिसरे पत्र लिहिले, त्यामध्ये दुष्काळ व पाणी ह्याबरोबरच, लोकांच्या कष्टातून त्यांना (इंग्रजांना) मिळणाऱ्या नफ्याची कलाबूत लावली. त्यांनी कळविले की ह्या योजनेमध्ये इतके इतके पैसे घातल्यावर, सिंचनावरील कराच्या रूपात त्याहून अधिक इतके इतके रुपये मिळतील. हे वाचून मात्र ईस्ट इंडिया कंपनीचे डोळे चमकले. नफा मिळणार? मग ठीक. बनवा. पण बनवणार कोण? कंपनीकडे कोणी इंजिनियर तर नाही. थॉमसनने कंपनीला आश्वस्त केले की गावातले लोकच तो कालवा तयार करतील. काम अचाट होते. हरिद्वारजवळील गंगेतून एक कालवा काढून त्याला २०० किमीच्या प्रदेशात पसरवायचे होते. ही काही आपल्या देशातलीच पहिली जलसिंचन योजना होती असे नव्हे, तर जगातील इतर अनेक देशांत तेव्हापर्यंत इतकी मोठी योजना बनली नव्हती.

ह्या व्यापक योजनेचे व्यापक वर्णन मला येथे करायचे नाही. फक्त एवढेच सांगायचे आहे की ती योजना अत्यंत चांगल्या रीतीने पूर्ण झाली. मग थॉमसनने त्याचे यश पाहून, त्याच कालव्याच्या काठावर रुडकी इंजिनियरिंग कॉलेज काढण्याचाही प्रस्ताव कंपनीकडे ठेवला. तोदेखील कंपनीने मान्य केला, कारण त्यामध्ये थॉमसनने अशी साखरपेरणी केली होती, की ह्या कॉलेजमधील मुले मोठी होऊन आपले साम्राज्य वाढविण्यास मदत करतील. तर अशा रीतीने इ.स. १८४७ मध्ये रुडकी येथे देशातील पहिले इंजिनियरिंग कॉलेज स्थापन झाले. इंजिनियरिंगचे विषय शिकविणारे हे देशातीलच नव्हे तर आशियातील पहिले कॉलेज होते. काही वर्षांनंतर ह्या कॉलेजमध्ये इंग्लंडमधील विद्यार्थ्यांची एक तुकडी शिकण्यासाठी पाठवली गेली होती.

… ह्या कॉलेजच्या पायाभरणीमध्ये आमचा अशिक्षित मानला गेलेला समाज आपले शिर उन्नत करून उभा आहे. तो तेव्हाच लोकांना दिसला नव्हता. आज तर त्याला मागासलेपणाचे लेबल लावून त्याच्या विकासाचे अनेकविध प्रयत्न चालू आहेत. आता ह्या विषयाचा शेवट करताना हेही सांगून टाकतो, की त्या स्थानिक लोकांनी १८४७ चे कॉलेज बनण्यापूर्वी बनविलेला तो कालवा आजही वायव्य प्रदेशाच्या शेतांना गंगेचे पाणी पोहोचवीत आहे. रुडकी कॉलेजला आता शासनाने भारतीय प्रौद्योगिकी संस्थानाचा (आय आय टी) दर्जा दिला आहे. कॉलेजचे स्थान जरी उंचावले असले, तरी ज्यांच्यामुळे ते कॉलेज बनले, ज्यांच्यामुळे इतकी सुंदर जलयोजना जमिनीवर उतरली, इंग्रज लोक येण्याच्या पूर्वी ज्यांनी देशाच्या मैदानी भागांत, पहाडांत, वाळवंटात, देशाच्या सीमावर्ती भागांत नेटके जलसंयोजन केले, ते लोक मात्र आज दूर कुठल्याकुठे फेकले गेले आहेत.

आधुनिक धरणांमुळे दुष्काळ दूर झाले आहेत असेही आज खात्रीपूर्वक म्हणता येत नाही. पंजाब, हरियाणा व देशाच्या अन्य भागांमध्ये, महाराष्ट्रामध्ये तीव्र दुष्काळ पडले. तेव्हा ही धरणे काय करू शकली? धरणांमध्ये तर पाणी तेव्हा भरेल, जेव्हा पाऊस पुरेसा पडेल.

प्रकृती ठीक नाही, ठीक-ठाक पाऊस पाडते. ती आई आहे आमची, पण मदर डेयरीची मशीन नाही, की जी जेवढ्या रुपयांचे टोकन घालू, बरोबर तेवढेच पाणी ओतेल. एकीकडे आपण मोठ्या धरणांनी बांधलो गेलो, आणि दुसरीकडे भूगर्भजल वर उचलून घेण्याची नवीन तंत्रेही शोधून काढली. शहरा-गावांत चाळणीसारखी जागोजाग भोके पाडून ठेवली जमिनीला आणि ह्या पृथ्वीच्या विशाल अंतरंगात जपलेल्या विशाल जलसाठ्याला उपसून बाहेर काढले. त्यामध्ये घातले मात्र काहीच नाही. अशा रीतीने हा पृथ्वीगोल पोकळ होत चालला आहे. भूगर्भजलात जी घट होऊ घातली आहे, तिला वाचविण्यासाठी हवे तर जिल्हावार, प्रदेशवार आकडेही दिले जाऊ शकतील, पण जेथे जीवनाचा प्रेरणादायी रसच पिळून घेतला जातो आहे, तेथे ते शुष्क आकडे नवीन काय व किती सांगणार? असो. कटुता येऊ न देता एवढे तर म्हणता येईलच, की पाणी आणि आपले राजकारण ह्यांमध्ये काय अधिक घसरले आहे, ते सांगणे कठीण आहे. ह्या दोहोंचा स्तर उंचावण्यासाठी आपल्याला आधी आपला स्तर उंचावावा लागेल.

गेल्या काही वर्षांपासून एक नवीन शब्द ऐकू येतो जल भागीदारी. सर्वसाधारणपणे असे घडते की नवीन शब्द प्रथम इंग्रजीत येतात आणि नंतर आपण फारसा विचार न करता त्याचा आपल्या भाषेत अनुवाद करून घेतो, तसाच हा शब्द. परंतु हा नकली शब्द नव्हता, तेव्हाही आपल्या समाजात पाण्याविषयी विलक्षण भागीदारी होती. ह्या लोक-भागीदारीत मुख्यतः तीन भूमिका असत. लोक स्वतः आपल्या गावात जलयोजना तयार करीत, ही पहिली भूमिका. ते तलाव, कालवा, विहिरी इ. बनवून त्या योजनेची अंमलबजावणी करीत, ही दुसरी भूमिका. शेवटी, ह्या बनवलेल्या योजनांची देखभाल करण्याची जबाबदारीही स्वतःच उचलीत, ही तिसरी भूमिका. तीदेखील जबाबदारी न मानता आपले कामच मानून आणि केवळ दोन-चार वर्षे नाही, तर चांगली दोन चार पिढ्यांपर्यंत निभवीत. असे करीत असताना समाज कधीकधी राज्याची भागीदारीदेखील कबूल करीत असे. एका परीने पाहिले तर समाज आणि राज्य एकमेकांशी ताळमेळ ठेवून अगदी सहजतेने हे व्यवहार पार पाडीत. आज क्वचितच कोणाला ह्या गोष्टीची जाणीव शिल्लक राहिली असेल की आपल्यापैकी अनेकांची आडनावे अशा कामांतूनच आपल्याला मिळाली होती. कालव्या (नहर)ची देखभाल करणारे नेहरू होते, पहाडातील कालवा (कूल) बनविणारे कोहली, तर स्कूल बनविणारे गुलाटी झाले. देशाच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत अनेक जाती, अनेक लोक असे होते, की जे गावागावांसाठी पाण्याचे काम करीत असत. ह्यामध्ये दुष्काळ आणि पूर ह्या संकटांना तोंड देण्याचे कामही सामील होते. ही सर्व कामे ते लोक खरोखरीच आपले तन-मन-धन अर्पून करीत असत.

त्यांच्या मनात रुजलेल्या कामाला ते आपल्या शरीरावरही सांभाळून ठेवीत. कसे, ते पहा. आपल्या देशातील सर्व भागांत गोंदण्या-गोंदविण्याची एक महान परंपरा आहे. ह्यामध्ये शुभ चिह्ने तर गोंदवली जातातच, पण देशातील काही भागांत आणखी एक विशेष चिह्नही आढळून येत असे. त्याचे नाव ‘सीता बावडी’. साध्यासुध्या आठ- दहा रेषांचे हे भव्य चित्र कोणत्याही जत्रेत, ठेल्यावर मनगटावर गोंदवून मिळत असे. अशा रीतीने पाण्याचे काम मनातून शरीरावर आणि शरीरावरून कष्टाने जमिनीवर उतरू लागे.

परंतु आज जमिनीच्या किंमती आकाशाला भिडू लागल्या आहेत. शहरांतच काय पण गावांतही तलाव एकामागून एक बुजवले जात आहेत, कचऱ्याने भरले जात आहेत. पाण्याचे संकट समोर आहे आणि आपण त्याला पाठ दाखवीत आहोत. आपल्याच तलावांना, आपल्याच जलस्रोतांना नष्ट करून टाकल्यावर तहानलेल्या शहरांसाठी खूप दुरून, दुसऱ्या कुणाचा हक्क डावलून, मोठ्या खर्चिक योजना बनवून पाणी आणले जात आहे. परंतु आपल्याला एक गोष्ट विसरून चालणार नाही. ह्या शहरांनी इंद्रदेवतेकडे अशी तर मागणी केलेली नाही, की आमचे प्यायचे पाणी शंभर- दोनशे किलोमीटर दुरून येत असताना आता आमच्या आकाशात येऊन तू बरसू नकोस म्हणून……. पूर्वीचे तलाव तेवढ्या प्रदेशात पडणाऱ्या पाण्याला आपल्यामध्ये सामावून घेऊन शहराला पुरापासून वाचवीत असत.

दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळुरु, जयपूर, हैदराबाद ह्यांसारखी आधुनिक होत जाणारी, महाग होत जाणारी नवी जुनी शहरे आळीपाळीने अशा पुरांनी ग्रस्त होत आहेत. हे सारे नवीनच आहे. असा पूर ह्यापूर्वी तेथे कधीही आला नव्हता. आपल्या देशाची किनारपट्टी खूप मोठी आहे. पश्चिमेला गुजरात कच्छपासून कन्याकुमारीला वळसा घालून, बंगालच्या सुंदरबनपर्यंत ती जाते. पूर्व तटावर अजूनही जबरदस्त सागरी वादळे येतात. काही महिन्यांपूर्वी ओदिशा व आंध्र प्रदेशमध्ये आलेल्या वावटळीची सूचना मिळाल्यामुळे इतर नुकसान जरी झाले असले, तरी जीवितहानी सुदैवाने झाली नाही. परंतु त्यानंतर थोड्याच दिवसांत तेथे आलेल्या पुरामुळे त्याहूनही जास्त नुकसान झाले.

आपल्या पूर्व तटावर सागरी वादळे येतच असतात. नुकसान करण्याची त्यांची क्षमता दिवसेंदिवस वाढतेच आहे. ह्याचे एक कारण आहे आपल्या किनारपट्टीवरील जंगले झपाट्याने तोडली जाणे. ती जंगले होती तेव्हा ती वादळे किनाऱ्यावर येऊन त्यांच्यावर आदळत व इतर नुकसान बरेच कमी होई. समुद्र व धरणीच्या मीलन बिंदूवर हजारो वर्षांपासून एखाद्या उत्सवाप्रमाणे उभी असलेली ही जंगले एका विशिष्ट स्वभावाची असतात. दिवसातून दोनदा ते खाऱ्या पाण्यात बुडतात, तर दोनदा मागून येणाऱ्या नदीच्या गोड्या पाण्यात. मैदानावरील, पहाडावरील झाडांशी ह्यांची तुलना करणे योग्य नाही. वनस्पतीचे असे दर्शन अन्य कोणत्याही ठिकाणी शक्य नाही. येथे ह्या झाडांची मुळेही लख्ख उजेडात, जमिनीच्या वरच राहतात. मुळे, बुंधा आणि फांद्या ह्या तीन्हींचे एका वेळेस दर्शन करून देणारा हा वृक्ष. त्याचे संपूर्ण जंगलच इतके सुंदर दिसते की त्याचे नावच सुंदरबन ठेवण्यात आले.

परंतु आज दुर्भाग्याने आपले सुशिक्षित जग, आपले वैज्ञानिक १३-१४ प्रदेशांमध्ये पसरलेल्या हा वनाचे, ह्या प्रजातीचे नाव अगदीच विसरून गेले आहेत. त्यांची जेथे कुठे चर्चा होते, तेथे मॅनग्रोव्ह ह्या इंग्रजी नावानेच त्यांचा उल्लेख केला जातो. आपल्या एवढेही लक्षात येत नाही, की स्थानिक भाषांमध्ये तरी त्यांचे नाव असेल, त्यांच्या गुणांची स्मृती तेथे जपली असेल. ह्या निमित्ताने हेही सांगून टाकतो, की मॅनग्रोव्ह हा इंग्रजी शब्द नाही. तो त्यांनी पोर्तुगीज भाषेतून घेतला आहे.

किनारपट्टीवरच्या प्रदेशांकडून सुरुवात करू या. गुजराती व कच्छीमध्ये ह्या वनाला चैरव, मराठी व कोंकणीमध्ये खारफुटी वा तिवर, कन्नडमध्ये कांडला काडु, तमिळमध्ये सधुप्पूनिल्लम काड्ड, तेलुगुमध्ये माडा आडवी, उडियामध्ये झाउवन म्हटले जाते. बंगाली नाव सुंदरबन हे तर सगळ्यांनी ऐकलेलेच आहे. तसेच त्याचे एक नाव मकडसिरा असेही आहे. हिंदी प्रदेश तर बोलूनचालून किनाऱ्यापासून दूरच आहे. परंतु, जी गोष्ट ज्या समाजात नाही, तो त्याचे नावच ठेवत नाही अशातला काही भाग नाही. तर, हिंदीत त्याला चमरंग वन असा शब्द आहे, परंतु तो आताच्या नवीन शब्दकोशांमध्ये समाविष्ट नाही.

पर्यावरणतज्ज्ञ सांगतात की आंध्र व उडियामध्ये विशेषतः पारद्वीपाच्या भागात चमरंग वनांची विकासाच्या नावाखाली खूप कत्तल केली आहे. म्हणूनच पारद्वीप नंतर अशाच एका वावटळीत पूर्णपणे नष्ट झाले. त्याच्यासाठी एक भक्कम भिंत उभारण्याचाही प्लान होता. आता खरे सांगायचे तर काही थंड प्रदेशांचा अपवाद सोडला, तर जिथे सागरा धरणी मिळते तिथे निसर्गानेच सुरक्षेसाठी ही सुंदर हिरवी भिंत उभी केली आहे. आज आपण आपल्या लोभासाठी ह्यांचा नायनाट करून त्याऐवजी पाच वार रुंदीची सिमेंट काँक्रीटची भिंत उभारून आपण सुरक्षित राहू असे म्हणणे मूर्खपणाचेच नाही काय? हा धडा काळाने आपल्याला शिकवला नाही तर बरे होईल. चौथीच्या वर्गात शिकवले जाते की पृथ्वीवर सत्तर टक्के समुद्र व तीस टक्के जमीन आहे. समुद्राच्या पुढे आपण नगण्य आहोत.

ही सुंदरबने, चमरंग वने आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यास कारणीभूत आहेत. भिंती उभ्या करताना समुद्र मागे हटेल, तट उभारून पूर थोपवता येईल, बाहेरून मागवलेले अन्नधान्य वाटून दुष्काळ दूर होईल…. अशाच वाईट विचारांचा पूर येऊन, चांगल्या विचारांचा दुष्काळ पडून, आपले जल संकट वाढले आहे.

(ज्ञानोदय ऑगस्ट २०१४ मधून संपादित, अनुवादित, साभार) गांधी शांति प्रतिष्ठान, २२१-२२३, दीनदयाल उपाध्याय मार्ग, नवी दिल्ली – ११०००२ फोन – ००१- २३२३७४९१

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.