सम्यक जीवनशैली

या सर्वांना जोडून सामाजिक व व्यक्तिगत जीवनशैलीबद्दल आखणी करणे व धोरण असणे आवश्यक बनले आहे. जीवनशैलीचा मुद्दा उपभोगाशी, वस्तू व साधनसंपदेच्या वापराशी निगडित आहे. उपभोगवाद किंवा चंगळवाद हा मुद्दा व्यक्तिवादी नैतिकतेबरोबरच सामाजिक नीतीचा (सोशल मॉरॅलिटी), आपल्याशिवाय इतरांच्या लोकशाही हक्कांचा व साधनसंपत्तीविषयक धोरणांचा आहे. प्रत्येकाने किती पाणी, वीज, जंगल, नैसर्गिक साधनसपंत्ती वापरावी, इथपासून किती धन व वस्तूसंग्रह करावा येथपर्यंत अनेक बाबी वापरण्यावर कमाल मर्यादा येतील. अमेरिका-युरोपप्रमाणे दरमाणशी वीजवापराचे व अन्य उपभोगाचे उद्दिष्ट प्रमाण मानले तर भारतातल्या सर्व नद्यांवर अगडबंब धरणे बांधून सर्व जंगले, जमीन, पैसा वापरूनही त्याची पूर्तता होणार नाही.

अशा मर्यादा असणे म्हणजे ज्यांना आजपर्यंत काहीच मिळाले नाही, त्यांना विकासाचे फायदे नाकारणे असे नव्हे. अनिर्बंध वापरावरच्या या कमाल मर्यादेशिवाय प्रत्येकाला किमान वस्तू, सेवा व संसाधनेही मिळणार नाहीत. सर्वांना व सर्वत्र किमान वीज-पाणी मिळायचे असेल, तर पंचतारांकित व अनावश्यक शहरी औद्योगिक वीजवापरावर, पाण्याच्या उधळपट्टीवर नियंत्रण जरुरीचे आहे. भपका व चंगळवादावरची नियंत्रणे ही सामाजिक न्यायासाठी आवश्यक आहेत. तसेच प्रतिष्ठेच्या छद्मी आधुनिकतेच्या कल्पनांवरसुद्धा प्रश्नचिन्ह लावले जात आहे.

वस्तूंचा अनिर्बंध व विषम उपभोग हा व्यक्तीच्या हितासाठी स्वास्थ्यासाठीसुद्धा नुकसानकारक आहे. त्यामुळे व्यक्तीच्या ऐहिक जीवनाचे इतर अनेक संपन्न व सुंदर पैलू, वैचारिक, कलात्मक आयाम, मानवी संबंध, निसर्गाविषयी प्रगाढ जाणीव, सौंदर्यबोध, आत्मशोध या जीवनाच्या तेवढ्याच महत्त्वाच्या बाबींना आपण मुकतो. साधेपणा आणि दरिद्रीपण नाही. जीवनावश्यक व अधिक सुटसुटीत व सुखकर वस्तू सर्वांना उपलब्ध व्हाव्यातच. मात्र, त्यापलीकडे ऐषआराम व प्रतिष्ठा अहंकारपूर्तीचे साधन म्हणून वस्तूंसाठीची वखवख आपले जीवन दळभद्री करते. -संजय संगवई

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.